मॅनहंट

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर अल्पावधीतच अमेरिकेने दहशतवादाविरोधी कारवाया सुरु केल्या. नंतर हाती आलेल्या माहितीनुसार 'अल-कायदा' ही संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बीन लादेन ह्यांचा ह्या हल्ल्यामागे हात होता आणि त्यामुळे ते अमेरिकेचे प्रमुख शत्रू बनले. बीन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडलं आणि अखेर मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सिल्सच्या पथकाने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला. 'मॅनहंट - /११ ते ॅबटाबाद' ह्या पिटर बर्गन लिखित आणि रवी आमले अनुवादित पुस्तकात ह्या १० वर्षांच्या शोधकथेचा थरार आपल्या सामोर उलगडतो
पीटर बर्गन हे टीव्ही पत्रकार आणि लेखक. तसंच वॉशिंग्टन डीसीमधल्या न्यू अमेरिका फाऊंडेशनच्या 'नॅशनल सिक्युरिटी स्टडीज' प्रोग्रॅमचे डिरेक्टर. हार्वर्ड आणि जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठात सहाय्यक अध्यापक म्हणूनही काम केलं आहे. /११ च्या सुमारे चार वर्ष आधी त्यांनी सिएनएन ह्या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानातल्या पर्वतराजीत जाऊन बीन लादेनची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना लादेन 'क्रांतीकारक' वगैरे वाटता अमेरिकेबद्दल द्वेष व्यक्त करणारा एखादा मुल्ला वाटला होता. अमेरिकेविरुद्धचा जिहाद लादेननं वेळोवेळी चित्रफितींद्वारे व्यक्त केला होता आणि पुढे /११ ला अमेरिकेवर हल्ला झाला.  /११ च्या हल्ल्यापासूनच एकप्रकारे बर्गन ह्या पुस्तकाची तयारी करत होते कारण अमेरिका ह्या हल्ल्यामागच्या सुत्रधाराला शोधून ठार मारणार ह्याबद्दल त्यांना खात्री होती. पुस्तक लिहिण्यासाठी आवश्यक ते संदर्भ, कागदपत्रे, व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी इतकच नव्हे ॅबटाबादच्या ज्या घरात लादेन मेला तिथे जाण्याची परवानगी हे सर्व त्यांना मिळालं आणि साकार झाला एक थरार!
पुस्तकाची सुरुवात होते ती 'सुखद निवृत्ती' ह्या प्रस्तावनेपासून. ह्यात ॅबटाबाद शहराचं वर्णन तसच लादेनच्या कुटूंबाची माहिती येते. लादेनच्या बायकांच उच्चविद्याविभुषीत असणं आणि तरीही धार्मिक असणं आणि लादेनच्या 'जिहाद' वर विश्वास असणं हे पाहून आश्चर्य वाटतं! ॅबटाबादमधल्या लादेनच्या घराबद्दलही सविस्तर माहिती ह्या प्रकरणात आहे.
नंतर /११ चा बराचसा माहिती असलेला भाग आणि तोरा-बोराच्या लढाईचा भाग येतो. तोरा-बोराच्या लढाईत अमेरिकेचे आडाखे चुकले आणि लादेन निसटला. ह्यानंतर अनेक दिवस लादेनचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यात इराकचं युद्ध सुरु झालं आणि लादेनच्या शोधाला आणखी विलंब होऊ लागला. 'सिआयए' मधल्या तसचं इतर युनिट्समधल्या लादेन मोहिमेवर काम करणार्या लोकांच्या कथा पुढील भागात सांगितलेल्या दिसतात.
२००७-०८ च्या सुमारास लादेन पाकिस्तानात असेल असा अंदाज अमेरिकेला आला होता आणि तो डोंगराळ भागाऐवजी कुठल्यातरी शहरात असेल असाही संशय बळावत चालला होता. त्याच्याकडून येणार्या चित्रफिती किती वेळात एखाद्या ठिकाणी पोहोचतात, मागे काय दिसतं, कसले आवाज येतात अश्या गोष्टींवरून लादेनच्या ठिकाणाचा अंदाज बांधण्याचे प्रयत्न केले जात असत. ॅबटाबादच्या त्या घरात लादेनच आहे ह्याची हळूहळू खात्री होत चालली होती पण तरीही तोरा बोरा सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राष्ट्राध्यक्ष ओबामा ह्यांना शक्य ती सगळी तयारी करायची होती आणि काळजी घ्यायची होती. लादेन ॅबटाबादच्या घराबाहेर कधीच पडत नसे, इतकच काय तो उपग्रहांच्या नजरेस येऊ नये म्हणून खुल्या आकाशात येणंही टाळत असे आणि अंगणात ताडपत्रीचं छप्पर असलेल्या भागातच संध्याकाळी फेर्या मारत असे. ॅबटाबादच्या घरात रहाणार्या लादेनच्या कुटूंबातल्या काही जणांनाही लादेन तिथे आहे हे माहित नव्हते. घरात रहाणार्या लोकांसाठी भाजीपाला आतच पिकवला जात असे तसच कचर्याची विल्हेवाटही आतच लावली जात असे. एकंदरीत बाहेरच्या जगाशी संबंध शक्य होईल तितका टाळण्याकडेच ह्या कुटूंबाचा कल असे. ह्या सगळ्यामुळे लादेन त्या घरात असण्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळणं जवळजवळ अशक्य होतं आणि म्हणूनच 'लादेन तिथे असण्याची शक्यता किती?' या प्रश्नाला ओबामांना  प्रत्येक सहकार्याकडून वेगळे उतर (६०%, ८०%, ९०%) मिळत असे!
अखेर कारवाई करायची वेळ आली त्यावेळी नेव्ही सिल्सचे पथक वापरायचे ठरले. पुस्तकात ह्या नेव्ही सिल्सची निवड कशी केली जाते, त्यांना प्रशिक्षण कसे दिले जाते आणि ह्या मोहिमेवर जाणार्या पथकाने तयारी आणि सराव कसा केला ह्याची रंजक माहिती येते.
प्रत्यक्ष कारवाईचे तसेच उत्तरक्रियेचे वर्णन एखाद्या थरारपटाला साजेसे आहे. लादेनला मारायची मोहिम अमेरिकेने पाकिस्तान सरकार तसेच लष्कर ह्यांना पूर्ण अंधारात ठेऊन केली. त्यामुळे लादेनला ठार मारल्यानंतर पाकिस्तानबरोबरचे संबंध कसे हाताळायचे ह्याबद्दलही ओबामांनी खूप तयारी केली होती. लादेननंतरच्या अल-कायदाच्या परिस्थिती बद्दल तसेच भवितव्याबद्दलची माहिती पुस्तकातल्या शेवटच्या प्रकरणात येते.
पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी फोटो तसच नकाशे समाविष्ट केलेले आहेत. तसच आवश्यक ती संभाषणे सविस्तर दिलेली आहेत. विषय संवेदनशील असल्याने लिहिल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीची १००% खात्री करण्यासाठी लेखकाने अनेक संदर्भ वापरलेले होते तसेच अनेकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या. ह्या सगळ्या संदर्भांची सुची तसेच ऋणनिर्देश सुमारे १०० पाने व्यापतील इतकी मोठी आहे!
अनुवादकार रवी आमले ह्यांनी भाषेचा बाज उत्तम संभाळला आहे. कुठेही बदलेल्या भाषेमुळे रसभंग होत नाही. तसच काही महत्त्वाच्या संभाषणामध्ये इंग्रजीतली वाक्य दिलेली आहेत जी अगदी योग्य भाव वाचकांपर्यंत पोहोचवायला मदत करतात. माझ्या दृष्टीने 'आवर्जुन वाचलेच पाहिजे' असे हे पुस्तक आहे!

-------------------------------------------------------------------------------------------------
हा पुस्तक परिचय महाराष्ट्र टाईम्सच्या ३० मार्च २०१४च्या 'संवाद' पुरवणीत प्रसिद्ध झाला. 

"P पण N" !

 यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मायबोलीवर म्हणींवर आधारीत गोष्टी किंवा किस्से लिहायला सांगीतले होते. आमच्या घरातल्या एका आवडत्या म्हणीवर आधारीत हे काही किस्से!

 प्रसंग पहिला :
आमच्या आईला एकंदरीत घोळ घालायची फार हौस.. म्हणजे अगदी साधं काही असलं म्हणजे हळदीकूंकू वगैरे तरी १०० लोकं बोलावून ठेवायची. मग त्यांचा पाहुणचार करत बसायचा आणि त्यात दमून जायचं. आम्ही कितीदा सांगितलं पण काही उपयोग नाही. मग कधी कधी आम्हीही चिडायला लागलो. एकदा अश्याच कुठल्यातरी प्रसंगाला (बहूतेक माझ्या मुलीच्या बोरनहाणाला) तिने गाव गोळा केलं. आमची परत चिडचिड झाली. पण ह्यावेळी जरा जास्तच. गच्चीत बोरनहाण... त्यामुळे तिथे दिवाबत्तीची सोय करायला हवी होती. आम्ही सोडून ते कोण करणार. मग आईने सकाळी सांगितलं की वर जरा दिवा लाव म्हणून. आम्ही खूप अटी घातल्या. इथे जागेवर चहा/खाणं आणून द्यायचं. नंतर दिवसभर एकही काम सांगायचं नाही. आम्ही दिवसभर तंगड्या वर करून मॅच बघत बसणार त्यावरून काही बोलायचं नाही. सगळ्या बाया आल्यानंतर आम्ही खालीवर सामान वहातूक वगैरे करणार नाही, आणि पुढच्या फंक्शनला आम्ही सांगू तेव्हड्याच लोकांना बोलवायचं. हे सगळं मान्य असेल तरच दिवे लावले जातील, मग आई म्हणे.. ऐकते सगळं.. लावा दिवे... .............................!
प्रसंग दुसरा:
माझी मुलगी रिया खायला भयंकर कटकट करते. लॅपटॉपवर गाणी दाखवा, स्वत: गाणी गा, नाचून दाखवा, डोळे बंद करून "कोणी खाल्लं कोणी खाल्लं.." करा, बाहेर भुभु, माऊ, काऊ दाखवा, टिव्हीवरच्या जाहिराती दाखवा की मग बाई थोडं खाणार.. त्यातही ती एक गोष्ट खाताना दुसरं काही दिसलं की तिला ते हवं असतं. एकदा तिला आमटी भात भरवत असताना गुळाचा डबा दिसला. मग तिला भातात गुळ घालून हवा होता. मी एक घास तसा दिला आणि तो तिला आवडला.. म्हटलं ठिक आहे तसं तर तसं .. आमटी भात + गुळ खा ! पण खा !!! .............................!
प्रसंग तिसरा:
एकदा असच आमच्या घरी काहितरी फंक्शन होतं. खूप भांडी पडली. भांड्यांचा ढिग पाहून बाई वैतागल्या. शिवाय एक कढई जळली होती. आणि ती माझ्या आज्जीची आवडती कढई.. रोजच्या वापरातली. त्यामुळे आज्जीने बाईंना कढई घासून स्वच्छ करायला सांगितली. बाई आधीच कावलेल्या त्यात हे. त्या म्हणाल्या तारेची घासणी द्या. दिली.. मग थोड्या वेळाने म्हणाल्या लिक्व्हिड सोप द्या.. दिला. मग म्हणाल्या चिंच द्या.. तिही दिली.. तरीही आज्जी हटेना ते बघून म्हणाल्या आता ती पितांबरी पावडर द्या... मग आज्जी म्हणाली.. तारेची घासणी घ्या, चिंच घ्या, पितांबरी घ्या... अजून काही घ्या पण भांडी घासा.. ती कढई स्वच्छा करा... .............................!
प्रसंग चौथा:
आमचा एक महत्त्वाचा रिलिज होता आणि तो फाटायला मार्गावर होता. त्यात ऑनसाईटला लाँग विकेंड होता. तिथला टेक्निकल लीड सुट्टीवर जाणार होता. काही फारच महत्त्वाची कामं त्याच्याकडे होती. आम्ही असं ठरवलं की कामं लवकर संपवली तर टेस्टींगला जास्त वेळ मिळेल. पण ऑनसाईटच्या लोकांचं एकंदरीतच नाक जरा वर असतं. त्यामुळे मी त्याला सुट्टीवर जायच्या आधी त्याची कामं संपवायला सांगितल्यावर साहेब सुरुच झाले. मला इतके ते इतके वाजताचं कॉल करायचा, माझं एक कमी महत्त्वाचं काम दुसर्‍याला द्या, ऑफशोरवरून संध्याकाळी सपोर्ट द्या, नंतर अर्धा दिवस सुट्टी वाढवून द्या, त्याचं टीम मधल्या ज्या एका मुलाशी पटत नव्हतं त्याला दुसर्‍या मोड्युलमध्ये टाका वगैर वगैरे,.. म्हटलं माज करा पण कामं करा.. आता रिलिज नीट जाणं महत्त्वाचं त्यामुळे ...................................................!
प्रसंग पाचवा:
रिया लहान होती तेव्हा तिला गॅसेस व्हायचे.. मग ती रात्री अपरात्री जोरात रडायची. आम्ही घाबरून उठायचो. मग ग्राईप वॉटर पाजा, पोटाला हिंग लावा वगैरे उपाय केले की गॅस पास व्हायचा आणि ती खुदकन हसायची. त्यामुळे ती अशी रडली की तिला म्हणायचो 'बाळ रडू नको, कायम असच हसत रहा.. पादा पण नांदा' Literally!!!!
हीच म्हण वरच्या ............... जागी .. फिदीफिदी

पिफ २०१४

दिवाळीपासून पुण्यात एकंदरीत मस्त वातावरण असतं. हवा चांगली असते. सणासुदीचे, सुट्ट्यांचे दिवस असतात आणि त्यात सवाई, पुणे मॅरेथॉन, पिफ सारखे वार्षिक कार्यक्रम येतात. गेल्यावर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ ला हजेरी लावली. अनुभव इतका सुंदर होता की ह्या वर्षी जायचं हे ठरलेलं होतच. गेल्यावर्षीचा कंपू यंदाही होता. ठरवाठरवी करता फोन, एसएमएस च्या जोडीला यंदा 'व्हॉट्स अ‍ॅप' ही आलं होतं. त्यावर तर ग्रुप करून जोरदार चर्चा वगैरे झडल्या. सकाळी उठून आवरून धावतपळत थिएटरला पोचायचं. लोकं वेळेत भेटली तर सगळे मिळून अन्यथा एकट्याने किंवा असतील तितक्यांनी मिळेल तिथे बसून सिनेमा पहायचा. मग बाहेर येऊन पुन्हा रांगेत लागायचं, मधल्या ब्रेकमध्ये मिळेल ते खाऊन घ्यायचं असं ते रूटीन. नंतर लोकं साग्रसंगीत डबे घेऊन यायला लागले होते. एकदा दिवसातल्या शेवटच्या सिनेमाच्या आधी इतकी भुक लागली की मी, चिन्मय, श्यामली आणि मिनू अश्या चौघांनी मिळून श्यामलीच्या डब्यातली अर्धी पोळी आणि वांग्याची भाजी आणि मिनूच्या पर्समधलं एक सफरचंद आणि एक पर्क वाटून खाल्लं! शिवाय चिन्मयने जवळच बसलेल्या त्याच्या ओळखीच्या एका काकूंना तुमच्याकडे काही खायलं आहे का? असंही विचारून पाहिलं !
यंदाच्या वर्षी आम्हांला गेल्यावर्षीप्रमाणे संक्रांतीची सुट्टी नव्हती. त्यामुळे मी एक दिवस सुट्टी घेऊन टाकली. 'पिक्चर बघण्यासाठी सुट्टी' ही कारण मलाच गंमतशीर वाटलं.
पिफचं आयोजन यंदाही गेल्यावर्षीसारखच होतं. अतिप्रोफेशनल नाही की ढिसाळही नाही. फक्त यंदा प्रत्येक सिनेमानंतर हॉल रिकामा करायचा होता. त्यामुळे त्याच हॉलमध्ये पुढचा सिनेमा पहायचा असला तरी तिथेच डेरा टाकून बसता येत नव्हतं. 'जागा अडवून ठेऊ नका' असं आयोजकांनी वारंवार सांगूनही अनेक जण ते करताना दिसत होते. एका ज्ये.ना. काकूंनी कोणासाठीतरी जागा अडवून वर आमच्याशीच भांडण केलं. शिवाय जब्बार पटेल, समर नखाते वगैरे मंडळींना एकेरीत संबोधून आपण फार मोठ्या असल्याच्या बतावण्याही केल्या!
ह्यावर्षी मी गेल्यावर्षीपेक्षा एक जास्त म्हणजे एकूण १२ चित्रपट पाहिले. सगळे अतिशय उत्तम होते. मी बघितलेल्यांपैकी एकही महायुद्धासंबंधी नव्हता. जितके बघितले त्यापेक्षा जास्त बघायचे राहिले.. वेळ, न जुळणारं वेळापत्रक किंवा इतर काही कारणं!  गेल्यावर्षी प्रमाणेच युरोपियन चित्रपट अतिशय नेत्रसुखद होते! ह्यावर्षी एक इराणी सिनेमाही पाहिला. तर यंदा पाहिलेल्या चित्रपटांबद्दल थोडसं.

१. अ‍ॅना अरेबिया : उद्धाटनाचा इस्रायली सिनेमा. इस्राईलच्या सिमेवरील प्रदेशातल्या एका वस्तीत ज्यु आणि अरब लोकं एकत्र रहात असतात. धर्म वेगळे असले तरी त्यांचे प्रश्न आणि आनंद दोन्ही सारखेच. एक पत्रकार त्या वस्तीत येते आणि तिच्या तिथल्या लोकांच्या संभाषणातून कथा उलगडत जाते. वैशिष्ट्य म्हणजे ८१ मिनीटांचा हा सिनेमा एकच शॉट म्हणजे सिंगल कट आहे! एकंदरीत चांगला असला तरी उद्धाटनाच्या सिनेमापेक्षा पुढचे सिनेमे जास्त आवडतात हा गेल्यावर्षीचा अनुभव ह्यावर्षीही आला!

२. फॉरेन बॉडीज : एक सुंदर इटालियन सिनेमा. ह्याच्या दिग्दर्शकाला विभागून बक्षिस मिळालं. कॅन्सर उपचार घेत असलेल्या आपल्या बाळाची काळजी घेणार्‍या एका बापाची गोष्ट. बाळाची काळजी, आर्थिक सोय, दुर असलेल्या बायको आणि दुसर्‍या मुलाची काळजी आणि शिवाय आजुबाजूला नको असलेले मोरक्कन लोकं. ह्या मोरक्कन लोकांशी त्याला अजिबात मैत्री करायची नसते. पण हळूहळू त्यांच्यात नातं तयार होत जातं आणि अगदी शेवटी तो आपल्या मुलाला त्या मोरोक्कन माणसाला 'फ्रेंड' म्हणायला सांगतो. अतिशय हळूवार प्रसंगांतून उलगडत जाणारी कथा सुखांत असल्याने चांगली वाटते. बापाचं काम करणार्‍या कलाकाराने उत्कृष्ठ अभिनाय केला आहे.

३. वन शॉट : क्रोएशियात घडलेल्या या सिनेमात दोन टीनएजर मुलींच्या हातून एका माणसाला अजाणतेपणी गोळी लागते आणि तो माणूस मरतो. ह्यात त्या मुलींची तसच पोलिस इन्सपेक्टरची उपकथानकं पण आहेत. मुली आधी गुन्हा कबूल करत नाहीतच. पुढे जिच्या हातात बंदूक असते तिने गुन्हा कबूल करेपर्यंतच्या प्रवासात ही उपकथानकं उलगडत जातात. पोलिस इन्सपेक्टरचं काम करणार्‍या अभिनेत्रीने सुंदर अभिनय केला आहे. शिवाय पूर्ण सिनेमाभर एक सेपियन छटा आहे. क्रोएशियन सिनेमा असल्याने मी आपलं कुठे गोरान इव्हानिसेव्हिच दिसतो का ते बघत होतो.. कारण आमच्या क्रोएअशियाशी संबंध तेव्हडाच!

४. अ‍ॅक्रीड (Acrid) : मी पाहिलेला पहिला इराणी सिनेमा. हा सिनेमा म्हणजे पूर्णपणे दिग्दर्शकाचं कौशल्य. एकातून दुसरी दुसर्‍यातून तिसरी अश्या कथा गुंफत नेल्या आहेत. मला कळेना की आता वर्तुळ पूर्ण कसं करणार. पण शेवटी एकदम मस्त वळण घेतलं आहे. ह्या चित्रपटातल्या सगळ्या नायिका पूर्ण बाह्यांचे आणि डोकी झाकणारे कपडे घातलेल्या होत्या ! आपल्या डोळ्यांसमोर इराणचं एक चित्र रेखाटलेलं असतं. पण ह्या सिनेमात तिथे भारी गाड्या, मोठे मोठे हायवे, शहरात मेट्रो ट्रेन तसच पुरुष स्त्रीरोग तज्ञ आणि त्याच्या कडे तपासायला येणार्‍या स्त्रीया हे सगळं होतं. कुठलंही पार्श्वसंगीत नसलेला, मोजकेच संवाद असलेला हा चित्रपट उकृष्ठ दिग्दर्शन आणि नैसर्गिक अभियनामुळे खूप खुलला!

५. द क्वीन ऑफ माँट्रियल : ह्या पिफमधला हा पहिला फ्रेंच सिनेमा. नवरा गेल्याने उध्वस्त झालेल्या एका बाईची गोष्ट. विधवा ते तिच्या आयुष्याची 'राणी' असा प्रवास ह्या सिनेमात दिसतो. जमैका ते आइसलँड प्रवासादरम्यान माँट्रीयलमध्ये अडकलेले एक माय लेक आणि एक सील तिच्या आयुष्यात येतात आणि सगळं हळूहळू बदलत जातं. हलके फुलके प्रसंग, भाषांच्या गोंधळातून उडालेले विनोद ह्यांमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटला. मला एकंदरीत प्लॉट खूप आवडला.

६. मिस्टर मॉर्गन्स लास्ट लव्ह : पॅरिसमध्ये रहाणारा फिलॉसॉफीचा वृद्ध प्रोफेसर मॅथ्यू मॉर्गन आणि सालसा डान्स शिकवणारी तरूण, सुंदर पाओलिन ह्यांची ही कथा. पत्नीच्या निधनानंतर पॅरीसमध्ये एकटा रहात असलेला हा अमेरिकन प्रोफेसर बसमध्ये पाओलिनला भेटतो. अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोघांमध्ये छान मैत्री निर्माण होते. पाओलिनच्या बाजूने तरी ती फक्त मैत्रीच असते. पुढे घटना अश्या घडत जातात की कथा खूप वळणं घेते. पाओलिन हे मॅथ्यू मॉर्गनचं शेवटचं 'प्रेम' ठरतं. देखणं पॅरिस, सुंदर कलाकार, त्यांच्या त्याहून सुंदर अभिनय, संयत हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन ह्यांमुळे हा सिनेमा अतिशय आवडला. नंतर कितीतरी वेळ त्यातले प्रसंग, संवाद आठवत होते. ह्याची डीव्हीडी मिळाली तर नक्की विकत घेणार आहे. पॅरिसमध्ये घडत असला तरी संपूर्ण सिनेमा इंग्रजीतच आहे. त्यामुळे सबटायटल्स न वाचायला लागता, पॅरिस अगदी डोळेभरून बघता आलं!

७. द लव्ह स्टेक : ही एक जर्मन प्रेमकथा. पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करणारी एक कूक आणि तिथेच काम करणारा एक मसाजर. अतिशय विजोड आणि भिन्न स्वभावाचे असे हे दोघे डेटींग करतात, प्रेमात पडतात. एकमेकांच्या सहवासात राहून त्यांच्या व्यक्तीमत्त्वात चांगले बदलही होतात जसं की तो तिचं दारूचं व्यसन सोडवायचा प्रयत्न करतो, ती त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करते. त्यांच्या प्रेमातले चढ उतार सिनेमात चांगले दाखवले आहेत. दोघांचाही अभिनयही चांगला होता.

८. द विकेंड : पश्चिम जर्मनीतल्या 'रेड आर्मी फॅक्शन'चा, म्हणजेच कम्युनिस्ट ग्रुपचा, सदस्य बर्‍याच वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटतो. त्याची बहिण त्याच्या सुटकेनिमित्त काही जुन्या मित्र-मैत्रिणींना विकेंडला घरी बोलावते. ह्यात त्याची जुन्मी प्रेयसी असते तसेच रेड आर्मी फॅक्शनमधले जुने सहकारीही असतात. एकंदरीत तणावपूर्ण वातावरणात भडका उडायला एक ठिणगी पुरेशी ठरते. जुन्या गोष्टी पुन्हा निघतात, काही गोष्टी एकमेकांना नव्यानेच कळतात! घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' असतो. कलाकारांचे नैसर्गिक अभिनय आणि मुळात सशक्त कथा ह्यामुळे हा सिनेमा खूप आवडला. ह्यातही जर्मनीतली सुरेख लँडस्केप्स होती.

९. द पॅशन ऑफ मायकेलँजेलो : आपल्या 'ओह माय गॉड'चं हे दक्षिण अमेरिकन व्हर्जन. चिले मधल्या एका गावात एक मुलगा व्हर्जिन मेरी आपल्याशी बोलते असा दावा करत असतो. तो सांगतो त्यावेळी आकाशात धुराचे वेगवेगळे आकार दिसतात. त्याला अमाप प्रसिद्धी मिळते. चर्चला नक्की काय भुमिका घ्यावी ते समजत नाही आणि त्यामुळे ते प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका पाद्रीला पाठवतात. तो पाद्री एका फोटोग्राफरच्या मदतीने प्रकरणाचा तपास लावतो. पुढे खरी गोष्ट कळल्यावर गाव मुलाला मारायला धावतं. शेवटी तो पाद्रीच त्या मुलाला वाचवतो आणि गावापासून दुर घेऊन जातो. हा खर्‍या गोष्टीवर आधारीत सिनेमा आहे. एकंदरीत चांगला आहे.

१०. नाईट ट्रेन टू लिस्बन : स्वित्झर्लँडमध्ये भाषा शिकवणारा एक प्रोफेसर कॉलेजला जात असताना एका पुलावरून उडी मारून आत्महत्या करू पहाणार्‍या तरूणीला पहातो. तो खूप प्रयत्नपूर्वक ती आत्महत्या थांबवतो. तो तिला आपल्या वर्गात घेऊन जातो. पण ती वर्गातून पळून जाते. मात्र तिचा कोट तिथेच विसरून जाते. त्या कोटाच्या खिशात एक पुस्तक असतं. तो त्या पुस्तकावरून तिचा माग काढायचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याला पुस्तकात ठेवलेली लिस्बनला जाणार्‍या आगगाडीची तिकिटं सापडतात. ती तरूणी गाडीच्या वेळेला स्टेशनवर येईल ह्या आशेने तो तिथे जातो. काय करावं ह्या विचारात तो लिस्बनच्या गाडीत चढतो आणि प्रवासात ते पुस्तक पूर्ण वाचून काढतो आणि तिथून सुरु होते एक शोधयात्रा! त्या पुस्तकात काय असतं आणि ती तरूणी कोण असते हे चित्रपटातच पहावं! स्वित्झर्लँड आणि लिस्बनमध्ये घडत असलेला हा सिनेमा पूर्ण इंग्रजीत आहे. पिफमधला मला सर्वांत आवडलेला हा चित्रपट! अतिशय वेगवान कथा, उत्कृष्ठ आणि अतिशय कल्पक दिग्दर्शन आणि सगळ्यांचे सुरेख अभिनय! सगळीच भट्टी फार मस्त जमली आहे. मिळेल तेव्हा नक्की पहावा असा चित्रपट.

११. यंग अँड ब्युटीफूल : पॅरिसमध्ये रहाणारी, चांगल्या घरातली, कॉलेजमध्ये शिकणारी एक यंग अँड ब्युटीफूल मुलगी कोणतही ठोस कारण नसताना, केवळ एक थ्रील म्हणून 'कॉलगर्ल' म्हणून काम करायला लागते. घरी अर्थातच काही माहित नसतं. एका अघटीत प्रसंगामुळे हा सगळा प्रकार घरी कळतो. पुढे अर्थातच घरी ओरडा, मानसोपचार तज्ज्ञ वगैरे सगळे प्रकार होतात. पण मुलीला त्यातून बाहेर पडणं खूप अवघड जातं. नवीन बॉयफ्रेंड मिळाला तरी त्याच्या बरोबर एकापेक्षा जास्त रात्री घालवूच शकत नाही. मग अजून एक असा प्रसंग घडतो की ती सगळा प्रकार संपवते आणि पुन्हा आपल्या सामान्य आयुष्याकडे वळते. असं काही बघून खर सांगायचं तर भिती वाटली! एकंदरीत चित्रपटाची हाताळणी जरा भडक होती पण ती विषयाची गरज होती. भडकपणात कुठे काही अचाट आणि अतर्क्य किंवा मुद्दाम दाखवायचे म्हणून काही प्रसंग दाखवलेत असं मात्र मुळीच वाटलं नाही.

१२. द क्लबसँडविच : सिंगल मदर आणि तिच्या टिनेजर मुलाची ही मेक्सिकन कथा. आईसाठी मुलगा हेच विश्व असतं. त्यांच्यातलं नातही अतिशय खुलं असतं. ते एकदा रिसॉर्टवर सुट्टीसाठी आलेले असताना त्याला एक मैत्रिण भेटते. वयाच्या परिणामामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. आईला मुलाचा आयुष्यात आपल्याला मिळू लागलेलं दुय्यम स्थान पचवणं फार अवघड जातं. नंतर नंतर तिला ते पटायला लागतं. सुरुवातीचा काही भाग खूप संथ आहे पण आई मुलातलं नातं दाखवण्यासाठी ते आवश्यक होतं असं वाटलं. नंतर मात्र छोट्या छोट्या विनोदी प्रसंगांतून कथा भराभर पुढे सरकते. तिनही प्रमुख कलाकारांनी सुरेख अभिनय केला आहे.
हा मी पाहिलेला पिफमधला शेवटचा चित्रपट. हा आवडला नसता तर आणखीन एक पहाणार होतो कारण शेवट चांगला करायचा होता. पण शेवटच्या चित्रपटा कडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या !

तर असे हे १२ चित्रपट. ह्याही वर्षी सुंदर कथा, उत्कृष्ठ अभिनय आणि दिग्दर्शन आणि युरोपातली सुरेख लँडस्केप्स हे सगळं हाती लागलं!!

कंटाळा ! कंटाळा !! कंटाळा !!!

कंटाळा.. प्रचंड कंटाळा.. ! सध्या रूटीन फारच बोर होतय. दिवाळी झाली. किल्ला केला, कंदिल केला, अंक आणले, माळा/लायटींग केलं. मनसोक्त फराळ हाणला. माहेरच्या, सासरच्या मंडळींबरोबर गेट टू गेदर केली. पण ह्या सगळ्याची मजा ४ दिवसच टिकली. नंतर परत कंटाळा यायला लागला.
टेनीस खेळायला जावसं वाटत नाही. पळावसं त्याहून वाटत नाही. सकाळी उठून तासभर पेपर वाचत बसतो पण पळायला बाहेर पडत  नाही. सायकल घ्यायची तर बजेट मध्ये बसत नाही. पोहायला जायचं तर सकाळी थंडी वाजते. बसमध्ये कंटाळा येतो. संध्याकाळची बस अनकम्फर्टेबल आहे. त्यात बसून (बसण्याच्या पोझिशन वर डिपेंडींग) पाय किंवा मान दुखते. सहा महिने फॉलोअप करूनही कंपनी बस काही बदलत नाही! ऑफिसमध्ये जायला यायला फारच वेळ लागतो!
बाकी ज्या गोष्टी करतो त्या बर्‍याचदा उसनं अवसान आणून करतो. सध्या उसनवारी फार वाढल्याने अवसानही येत नाहीये!
सोशल लाईफ फारसं उरलं नाही. म्हणजे कोणी मित्र मैत्रिणी अमेरिकेतून आले तरच मित्रांशी भेटी गाठी होतात. कारण असलेले सगळे मित्र मैत्रिणी बाहेरच आहेत. इथे आहेत त्यांना आम्ही नसण्याची सवय होऊन गेली आहे. शिवाय न भेटाण्याची इथली नेहमीची यशस्वी कारणे आहेतच. ऐनवेळी टांग मारणे, दिलेल्या वेळेपेक्षा खूप उशीरा येणे, वन वे कम्युनिकेशन वगैरे वगैरे..
ऑफिसातही खूप काही वेगळं घडतं अश्यातला भाग नाही. रोजचे तेच ते इश्यूज, तीच पाट्या टाकणारी लोक, त्यांच्या डोक्यावर बसा, आपली कामं पुढे सरकवा.. कधी कधी असं वाटतं ही कामं करून ते आपल्यावर काही पर्सनल फेवरच करयातय की काय! शिवाय ह्या सगळ्यातून 'इनोव्हेटीव्ह' वगैरे गोष्टी करण्याच्या अपेक्षा. मग ऑफिसमधल्या अवसानाची उसनवारीही वाढते. तरी बरं टीम चांगली आहे आणि बॉसेस ऐकून घेणारे आहेत.
आजचं ह्यावरचं एक डिलबर्ल्ट सापडलं. ह्या सिच्युएशेनला अगदी परफेक्ट!
http://dilbert.com/strips/comic/2007-06-23/  ह्या लिंकवरून साभार!



तर हा कंटाळा घालवण्याचा तुर्तास एकच उपाय आहे तो म्हणजे रियाशी खेळणे, तिचे बोबडे बोल ऐकणे आणि तिच्या रोजच्या नवनव्या करामती पहाणे आणि जे मी अगदी मनापासून एन्जॉय करतो!


भर पावसात कात्रज सिंहगड... !

कैलास मानस यात्रेच्या सरावासाठी म्हणून गेल्या २/३ महिन्यांपासून दर शनिवारी सिंहगडावर जायला सुरुवात केली होती. ज्याच्या बरोबर जातो तो मित्र उत्साही आहे, दांड्या मारत नाही शिवाय दोघच जण जात असल्याने फार फाटे फुटत नाही. त्यामुळे सलग ७ शविनार गेलो.  गड चढायचा प्रमुख उद्देश्य हा व्यायाम असल्याने भजी, झुणका भाकरी वगैरे गोष्टींसाठी आम्ही थांबत नाही. चढून झालं की पाच दहा मिनीटं थांबून त्याच पावली परत. त्यामुळे कोथरूडहून ५:१५ ला निघून आम्ही ८:३०/८:४५ ला घरीही परततो. सुरुवातीला भर उन्हाळा होता. नंतर हळूहळू हवा चांगली सुधारायला लागली. पावसाला सुरुवात झाल्यावर तर एकदम धमाल यायला लागली. एकदातर संपूर्णवेळ जोरदार पाऊस सुरू होता. वाटेवरून पाणी वहात होतं, एकदम पावसाळी सहलीचं वातावरण. नंतर शिल्पाचा भाऊ, सुहासही आमच्या बरोबर यायला लागला.

तश्यातच पुणे रनिंगच्या फेसबूक पानावर कात्रज ते सिंहगड ट्रेकींग स्पर्धेची जाहिरात वाचली. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तीन तीनच्या टीमने भाग घ्यायचा होता. आम्ही तिघे भाग घेऊ असं वाटत असतानाच सुहासने ऐनवेळी डिच दिला.. त्याची काहितरी ऑफिसची ट्रिप ठरली. नेमकं त्याच आठवड्यात मला ऑफिसमध्ये जोरदार काम आलं. मग गौतमने बरेच प्रयत्न करून तिसरा पार्टनर शोधला. ते आयोजक अगदी पूर्णपणे पुणेरी होते! त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस इतकी क्लिष्ट होती, आणि सगळी कागदपत्र प्रत्यक्ष येऊन दिली पाहिजेत अशी अट .. जग कुठे चाललय.. हे काय करतायत.. पण ते असो.  परत गौतमनेच बरीच फाईट मारून ते काम केलं.

ट्रेकच्या दिवशी सकाळी छान रिमझीम पाऊस होता.. मधेच थांबतही होता. सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजे कात्रज बोगद्याच्या वर एकदम उत्साही वातावरण होतं.  सुमारे ४०० लोकं होते. ७ ला ट्रेक सुरु झाल्यावर काही जण उत्साहात पळतच सुटली! ह्य रूटवर साधारण तेरा टेकड्या आहेत. पहिलीच टेकडी चांगली दणदणीत आहे. पळत सुटलेले लोक लवकरच ढेपाळले. आम्हाला डोंगर चढायची सवय झालेली असल्याने हा पहिला डोंगर फार अवघड गेला नाही. चढून तर गेलो पण उतरताना फार वाट लागली. कारण चिखल ! जवळजवळ सगळेच जण घसरगुंडी करत होते. ट्रेकला चांगले आणि सुयोग्य  बुट असणं किती गरजेचं असतं ह्याची खात्री त्या उतारावर पटली. रूटवर अधेमधे चेक पॉईंट होते. प्रत्येक ठिकाणचे स्वयंसेवक अतिशय चांगले होते आणि नीट बोलत होते. आधीच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध ! ह्या चेक पॉईंटला तिघेही असल्या शिवाय ते पुढे जाऊ देत नव्हते. त्यात आमच्या तिसर्‍या पार्टनरला फार काही सराव नव्हता त्यामुळे मी आणि गौतम चेक पाँईटला जाऊन उभं रहायचो मग तो मागून यायचा. थोड्या टेकड्या पार केल्यानंतर सिंडगड दिसायला लागला पण मधे अजून काही टेकड्या होत्या. आणि प्रत्येकवेळी भला मोठा उतार उतरायचा आणि मग तेव्हडाच मोठा चढ चढायचा असा प्रकार होता. एकंदरीत स्टॅमिना, गुडघे आणि बुटांचा चांगलाच कस लागला. शेवटचा चेक पॉईंटवर उकडलेली अंडी, एनर्जी ड्रिंक्स वगैरे होते. मुख्य संयोजक तिथे उपस्थित होते. त्यांना आमचा रजिस्ट्रेशनचा अनुभव सांगितला. त्यांनी आमचे आक्षेप साफ फेटाळले आणि असं होऊच शकत नाही वगैरे वगैरे मतं मांडली.. (पुन्हा पुणेरीपणा !) पण आम्हीही आमचे मुद्दे सोडले नाहीत. पण आम्हांला अजून आतकरवाडी गावापर्यंत पोहोचायचं असल्याने चर्चा आवरती घेत पुढे निघालो. आपल्याकडे ही स्पर्धा, मॅरेथॉन शर्यती वगैरे गोष्टी सुरु झालेल्या आहेत ही खरोखरच खूपच चांगली गोष्ट आहे पण अजून म्हणावी तितकी व्यवसायिकता त्यात आलेली नाही हे मात्र नक्की.

आतकरवाडी गावात म्हणजे सिंहगड पायथ्याशी, उतरणारा शेवटचा उतार हा आत्तापर्यंतच्या सगळ्या उतारांचा बाप होता. इतकी प्रचंड घसरडी वाट की ह्या वाटेवर आत्ता ट्रेक ठेवलाच कसा असा मला प्रश्न पडला. माझे कैलास मानससाठी घेतलेले चांगले बूट असल्याने कमी त्रास झाला पण बर्‍याच जणांचे खूप हाल झाले. घसरगुंड्या करून करून लोकांच्या ट्रॅकपँटची अक्षरशः चाळणी झाली. अखेर आम्ही आतकरवाडी आवात पोहोचलो अआणि तिथे वाहत्या ओढ्यात हात (आणि पाय) धुवून घेतले. हे सगळं होईपर्यंत ४ वाजले मग शेवटची  सिंहगडाची चढाई सोडून देऊन आम्ही टमटम पकडून घरी परतलो.

हिरव्यागार डोंगरांवर भर पावसात हा ट्रेक करायला खूप धमाल आली. वातावरण इतकं सुंदर होतं की ते अनुभवताना फोटो काढण्याचं डोक्यातही आलं नाही आणि आलं असतं तरी ते फारसं शक्यही झालं नसतं. आता एकदा पौर्णिमेच्या रात्री करायचा विचार आहे. बघू कसं काय जमतय ते. सध्या चालू असलेल्या ट्रेकींग फॅडमधला एक उपक्रम पार पडला!
 

सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक

राष्ट्रउभारणी ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या निर्मितीनंतर राजकीय धोरणे, आर्थिक स्थैर, परराष्ट्रीय संबंध ह्याच बरोबर सामाजिक जडणघडण सुद्धा योग्य दिशेने होणं अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत जी वेगवेगळी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातील एक म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रिडाक्षेत्रातला सहभाग आणि यश हे देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, देशाला स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्त्वाची भावना रुजवतं. खेळांमध्ये जातिपाती, धर्म, प्रांत वगैरेच्या भिंती दुर ठेऊन राष्ट्रीय अस्मितेला जागृत करण्याचं तसच संपूर्ण राष्ट्राला सामूहिक आनंद देण्याचं एक सामर्थ्य असतं. आजच्या काळात क्रिडाक्षेत्रातलं अर्थकारण ही सुद्धा अतिशय महत्त्वाची बाब बनलेली आहे. आज विकसित देशांबरोबरच अनेक विकसनशील देश, देशाच्या जडणघडणीतलं क्रिडाक्षेत्राचे महत्त्व ओळखून क्रिडासंस्कृती आपल्या देशात जाणीवपूर्वक रुजवत आहेत. एशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिंपीक ह्यांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखत आहेत आणि खेळाडूही उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करत क्रिडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी, आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी जिवाचं रान करत आहेत.
ऑलिंपीक सारख्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवणं ही अशक्य बाब नक्कीच नव्हती. भारताच्या हॉकी संघाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिळून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत आणि त्यातलीही सहा सलग! भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच्या स्पर्धांमधल्या पदक समारंभात तिरंगा फडकवला गेला असेल, भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवली गेली असेल, खेळाडू साश्रू नयनांनी भारावून गेले असतील, भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला असेल! पण हे सगळे कधी तर आमच्या पिढीच्या जन्माच्या आधी! भारताने हॉकीतलं शेवटचं सुवर्णपदक मिळवलं ते १९८०च्या मॉस्को ऑलिंपीकमध्ये जेंव्हा अमेरिकाधार्जिण्या देशांनी (ह्यात पाकिस्तानही होते) स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. आमची पिढी ऑलिंपीक बघायला लागली त्यावेळी ऑलिंपीकमध्ये भारतासाठी अतिशय निराशाजनक चित्र होतं. अनेक कारणांनी हॉकी संघाची वाताहात झालेली होती. वैयक्तिक खेळांमध्ये अव्वल भारतीय खेळाडू आणि जागतिक खेळाडू ह्यांच्यात पडलेली दरी फार मोठी होती. बरीच राष्ट्रे स्वतंत्र होऊन काही प्रमाणात स्थिर झाल्याने क्रिडाक्षेत्रातली स्पर्धाही विलक्षण वाढली होती. गुरबाचन सिंग रांधवा, फ्लाईंग सीख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा ह्यांची वैयक्तिक पदकं अगदी थोडक्यात हुकल्याने भारतीय क्रिडाप्रेमी हळहळले होते. एकदा तर महिला हॉकी संघ (हो! महिला हॉकी संघच) पदकापर्यंत पोहोचणार असं वाटत असताना अचानक हरला होता. एकंदरीत १९८० नंतरच्या लॉस एंजेलीस, सोल आणि बार्सिलोना अशा सलग तीन स्पर्धांमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली होती. त्यामुळेच अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेत टेनिसपटू लिएंडर पेसने मिळवलेलं पदक ही भारताच्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. हे जरी कांस्यपदक असलं तरी ह्या पदकाने जुन्या पिढीतल्य भारतीयांना गतवैभवाची आठवण करून दिली तर नवीन पिढ्यांना देशाने ऑलिंपीक स्पर्धेत पदक जिंकण्याचा अनुभव दिला.

तसं बघायला जाता लिएंडरचं पदक हे स्वतंत्र भारतातल्या भारतीयाने मिळवलेलं दुसरं वैयक्तिक पदक. खाशाबा जाधवांनी कुस्तीत कांस्यपदक मिळवल्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी मिळवलेलं. परंतु ह्या ४४ वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. खाशाबा जाधवांनी पदक मिळवण्याच्या बातमीला त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर स्थान मिळालं नव्हतं. खाशाबांचे जंगी सत्कार समारंभ वगैरेही झाले नव्हते. केवळ ५ वर्षे वय असलेल्या देशाने खाशाबांच्या यशाची मर्यादीत प्रमाणावर दखल घेतली होती. त्याउलट अटलांटा ऑलिंपीकच्या वेळी भारत देश पन्नाशीच्या उंबरठ्यावर होता. त्याचवर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात भरली होती. देशातील वातावरण क्रिकेटमय झालेलं होतं. इतर खेळ 'यश मिळाल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि आर्थिक पाठबळाशिवाय यश मिळत नाही' ह्या चक्रात अडकलेले असताना, क्रिकेटने यश आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टींचं गणित बर्‍यापैकी जमवलेलं होतं. क्रिकेटेतर खेळांसाठी चांगली गोष्ट एव्हढीच की खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आलेल्या बर्‍याच देशी विदेशी दूरसंचार वाहिन्यांवरून भारतीयांना ऑलिंपीकसारख्या जागतिक स्पर्धा घरबसल्या पहाण्याची संधी मिळत होती.

लिएंडर म्हणजे वेस आणि जेनिफर ह्या पेस दांपत्याचं अपत्य. वेस पेस भारताकडून हॉकी खेळत. ते १९७२च्या ऑलिंपीक कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य होते तर जेनिफर पेस भारतीय बास्केटबॉल संघाच्या सदस्य होत्या. घरात इतकी तगडी क्रीडा पार्श्वभूमी असल्याने लिएंडरने कुठलातरी खेळ खेळणं स्वाभाविक होतं. लिएंडरने वयाच्या पाचव्या वर्षी टेनिसची रॅकेट हातात घेतली तर बाराव्या वर्षी अमृतराज टेनिस अ‍ॅकेडमीमध्ये टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या पाच वर्षात तो ज्युनियर गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आणि त्याने मानाची विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकली. पुढे तो भारतीय डेव्हिस कप संघाचा अविभाज्य घटक बनून गेला आणि त्याबरोबरच व्यावसायिक टेनिसमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात चमकू लागला. डेव्हिस कप स्पर्धेत अधून मधून आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना धक्केही देऊ लागला. लिएंडर त्याकाळचा भारताचा अव्वल टेनिसपटू असला तरी अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेच्यावेळी तो जागतिक क्रमवारीत तब्बल १२६व्या स्थानावर होता.

१९९६च्या सरत्या उन्हाळ्यात २४ वर्षांचा लिएंडर ऑलिंपीक स्पर्धेसाठी भारतीय चमूबरोबर अटलांटाला दाखल झाला. त्याकाळात तो काही जबरदस्त टेनिस खेळत होता अशातला भाग नाही. त्यामुळे क्रिडा रसिक तसेच समिक्षक, टेनिस मधल्या एकेरीच्या कुठल्याही पदकासाठी लिएंडरला दावेदार मानत नव्हते. अटलांटा ऑलिंपीक मधले टेनिसचे सामने अटलांटा शहरापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेल्या स्टोन माऊंटन परिसरात होणार होते. अटलांटातल्या कडक उन्हाळ्यात सगळ्या खेळाडूंच्या शारिरीक क्षमतेचा कस लागणार हे नक्की होते.
पहिल्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या अमेरिकन रिची रेनगर्बशी. रेनबर्गला घरच्या वातावरणाचा तसेच प्रेक्षकांच्या पाठींब्याचा फायदा मिळणार होता. दोन्ही खेळाडू अतिशय जिद्दीने खेळत होते. आपली सर्व्हिस न गमावता गेमची संख्या नेहमी बरोबरीत ठेवत होते. अखेर पहिला सेट टायब्रेकरला गेला. टायब्रेकरमध्ये लिएंडर अडखळला आणि रेनबर्गने टायब्रेकर ७-२ अशा फरकाने जिंकून सेट खिशात घातला. प्रेक्षकांनी जल्लोष केला. दुसरा सेटही खूप चुरशीचा झाला. पहिल्या सेट प्रमाणेच तो ही टायब्रेकरला गेला. अर्थात ह्या वेळी मात्र पेसने हार मानली नाही. दुसर्‍या सेटचा टायब्रेकर त्याने ९-७ असा खेचून आणला. गरम हवेत अतिशय दमणूक करणारे दोन सेट खेळल्यानंतर रेनबर्गला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि लिएंडरने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत त्याची गाठ होती ती व्हेनेझुएलाच्या निकोलस परेराशी. तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्याशी असलेला हा सामना लिएंडरने दोन सरळ सेटमध्ये जिंकला. ह्या विजयानंतरही त्याची दखल घेण्यास फार कोणी उत्सुक नव्हते कारण अमेरिका तसेच युरोपीय देशांचे तगडे खेळाडू अजूनही स्पर्धेत होते. तिसर्‍या फेरीत लिएंडर समोर स्विडनच्या थॉमस एन्क्विस्टचे आव्हान होते. एन्क्विस्ट म्हणजे क्रमवारीत दहाव्या क्रमांकाचा खेळाडू आणि त्यावेळचा एक उगवता तारा मानला जात असे. एन्क्विस्टचाही लिएंडरने सरळ सेटमध्ये फडशा पाडला. आता मात्र क्रिडासमिक्षकांना लिएंडरची दखल घेणं भाग पडलं. पुढच्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती इटालियन रझानो फुर्लानशी. फुर्लान लिएंडरपेक्षा बर्‍याच वरच्या क्रमांकावर असूनही लिएंडरने अगदी सहज विजय मिळवला. भारतीय पथकातले इतर खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना लिएंडर एकामागून एक फेर्‍या जिंकत असल्याने सगळ्यांच्या नजरा लिएंडरवर खिळल्या. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर आव्हान होते ते दस्तुरखुद्द आंद्रे अगासीचे! अव्वल मानांकित अगासी सुरवातीपासूनच सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता आणि तो ह्या स्पर्धेत जबरदस्त टेनिस खेळत होता. सामना सुरु झाल्यावर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत पहिला सेट टायब्रेकरला नेला. बघता बघता आघाडी घेत लिएंडर सेट पॉईंट पर्यंत पोहोचला परंतु जिद्दी अगासीने अव्वल क्रमांकाला साजेसा खेळ करत दोन सेट पॉईंट वाचवून सेट खेचून घेतला आणि दुसरा सेट त्यामानाने सहज जिंकून सामना जिंकला. पराभवानंतरही लिएंडरला पदक मिळवायची अजून एक संधी होती. कांस्य पदकासाठी त्याचा सामना ब्राझिलच्या फर्नांडो मेलिगनीशी होणार होता. अशातच लिएंडरच्या मनगटाला दुखापत झाल्याची बातमी आली. सामना वादळी पावसामुळे पुढे ढकलला गेला. ह्यात अजून भर म्हणजे सामना सुरु झाल्यावर लिएंडरला लय सापडेपर्यंत त्याने पहिला सेट ६-३ फरकाने गमावला सुद्धा! इतकं हातातोंडाशी आलेलं पदक निसटयत की काय ह्या काळजीने भारतीय क्रीडा रसिकांच्या तोंडचं पाणी पळालं. पण व्यावसायिक स्पर्धेपेक्षा देशाचे प्रतिनिधीत्त्व करताना लिएंडरचा खेळ खूप बहरतो, त्याच्यात दहा हत्तींच बळ संचारतं ह्याची प्रचिती ह्या स्पर्धेतही आली. मनगटाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत जिद्दीने पुढचे दोन सेट जिंकून त्याने कांस्य पदक अक्षरशः खेचून आणलं. भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला. पदकप्रदान समारंभात आंद्रे अगासी आणि सर्जी ब्रुग्वेरा सारख्या दिग्गज खेळांडूबरोबर आपल्यातला एकजण असलेला बघून भारतीयांची मान उंचावली! अनेक वर्षांत जे घडलं नाही ते आज घडताना पाहून तमाम भारतीय क्रीडा रसिक भारावून गेले होते. आपणही पदक जिंकू शकतो ही जाणीव झाली. लिएंडरच्या यशाचं देशभरात जोरदार कौतुक झालं.

लिएंडरच्या पदकाने रातोरात सारं बदललं का? तर अजिबात नाही! ह्या स्पर्धेनंतर दोन वर्षांनी झालेल्या आशियाई तसचं कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पदकतक्त्यातला भारताचा क्रमांक आधीच्या स्पर्धांपेक्षा घसरला. क्रिडारसिकांकडून अजूनही क्रिकेटेतर खेळांना दुय्यम वागणूक दिली जात होती. जागतिक खेळांडूच्या तुलनेत भारतातले खेळाडू अजूनही खूप कमी पडत होते. पुढच्या सलग दोन ऑलिंपीक स्पर्धांत भारताने एकेका पदकावरच समाधान मानले होते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे करनाम मल्लेश्वरी ही ऑलिंपीकमध्ये पदक मिळवणारी पहिला भारतीय महिला खेळाडू ठरली, तर राज्यवर्धन राठोडने पहिले वैयक्तिक रजत पदक जिंकले. पण लिएंडरच्या पदकामुळे भारतातील लोकांचा ऑलिंपीककडे पहाण्याचा दृष्टीकोन मात्र नक्कीच बदलला. त्या काळातले पालक आपल्या मुलांच्या खेळाकडे थोड्या गांभीर्याने पाहू लागले. खेळात गती असेल तर खेळातही करियर करता येऊ शकतं हा विचार हळूहळू रुजायला लागला. तसच ह्याच काळात माहितीच्या उपलब्धतेमुळे खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला. बदलत्या वातावरणामुळे ह्या काळात जी पिढी बाल्यावस्थेत होती, खेळांचे प्रशिक्षण घेत होती, ती पुढे उत्तम निकाल देऊ लागली. २००२ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली. २००६ आणि २०१०च्या स्पर्धांमध्ये तर भारताने अनुक्रमे तब्बल ५३ आणि ६५ पदके पटकावली. हीच कथा कॉमनवेल्थ स्पर्धेची. २००६च्या स्पर्धेत कामगिरी उंचावलीच पण घरच्या मैदानावर भरलेल्या २०१०च्या स्पर्धेत भारताने पदकांची शंभरी गाठून इंग्लड, कॅनडा सारख्या देशांना मागे टाकत पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. विविध खेळांच्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकू लागले, विजेतेपदं मिळवू लागले. लहान स्पर्धेतलं हे यश ऑलिंपीकमध्ये न दिसेल तरच नवल! २००८च्या बिजींग ऑलिंपीक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच अभिनव बिंद्राच्या रूपाने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं आणि भारताच्या राष्ट्रगीताची धून ऐकून आणि तिरंगा फडकताना पाहून भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर २०१२च्या लंडन ऑलिंपीक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण सहा पदके पटकावून आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

आता तर सरकारी पातळीवर ऑलिंपीकमध्ये ४० पदके मिळवण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी होत आहे. स्वत: लिएंडर पेस सकट काही वरिष्ठ खेळाडू ऑलिंपीक गोल्ड क्वेस्ट, मित्तल चॅंपियन ट्रस्ट सारख्या संस्थांमार्फत ऑलिंपीक मधल्या पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज सुशील कुमार, विजेंदर सिंग, गगन नारंग, रोहन बोपण्णा, साईना नेहवाल, मेरी कोम, राही सरनौबत सारख्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत खेळाडूंची फौज भारतात तयार होते आहे. टेनिस, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स बरोबरच नेमबाजी, तिरंदाजी, जलतरण, बॉक्सिंग सारख्या खेळांकडेही अनेक जण वळत आहेत. इतर खेळांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांचा हळूहळू का होईना पण विकास होत आहे. बॅडमिंटन/टेनिस सारख्या खेळांमधले सिटी लीग सारखे प्रयोग, वार्षिक मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन अश्यांसारखे उपक्रम वेगवेगळ्या शहारांमध्ये केले जात आहेत. बाहेरच्या देशांसारखी क्रिडासंस्कृती आपल्या देशातही हळूहळू रुजत आहे. आज भारतीय क्रिडाप्रेमी क्रिकेटबरोबरच इतर खेळांमधल्या स्पर्धा तसेच एशियाड, ऑलिंपीकसारख्या जागतिक पातळीवरच्या क्रिडास्पर्धांमधल्या सुवर्णकाळाची स्वप्न पहात आहेत. पुढील स्पर्धांमध्ये भारत भरघोस यश मिळवेलच पण ही सुवर्ण काळाची स्वप्न पहायला निमित्त देण्याचं आणि भारतातल्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राला गती देण्याचं काम लिएंडर पेसच्या कांस्य पदकाने अगदी योग्यवेळी आणि चोख बजावलं!

-------------------------
'मायबोली.कॉम'वरच्या लेखन स्पर्धेतली ही माझी प्रवेशिका. ह्या प्रवेशिकेला तिसरे बक्षिस मिळाले!
http://www.maayboli.com/node/44145

प्रथमग्रासे मक्षिकापातः !

मागे नववीच्या सुट्टीत आईची एक मैत्रिण कैलास मानससरोवरच्या यात्रेला जाऊन आली आणि तिने तिच्या प्रवासवर्णनाची हस्तलिखित प्रत वाचायला पाठवली होती. तेव्हा कैलास मानससरोवराबद्दल पहिल्यांदा ऐकलं. लगेच मी दहावीच्या सुट्टीत जाऊ ? असं घरी विचारलं. पण एकंदरीत बर्‍याच अटींमध्ये ते बसणारं नव्हतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेच पडलं. मग दिड वर्षांपूर्वी अनयाची मायबोलीवरची कैलास मानस यात्रेबद्दलची सुंदर लेखमाला वाचली आणि भारतात परतल्यावर लगेच इथे जायचच हे ठरवून टाकलं.

जानेवारीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाहिरात वाचल्या वाचल्या लगेच अर्ज भरून टाकला आणि इंटरनेटवर, पुस्तकांमध्ये जे जे काय सापडेल ते सगळं वाचून काढलं. अनयाच्या लेखमालेची पारायणं करून झाली!  एकीकडे व्यायाम वगैरे करणं सुरु होतचं. यात्रेसाठी निवड लकी ड्रॉ द्वारे केली जाते. आमचं कधी काही पहिल्या फटक्यात होतच नाही! इथेही नियमाला अपवाद नव्हताच. निवड न होता अर्ज वेट लिस्टमध्ये गेला. वेट लिस्ट क्रमांकही ५१ !!! त्यामुळे निवड व्हायची काही शक्यताच नाही असं गृहीत धरून टाकलं पण तरी एकदा अनयाला फोन केला. तिने खूपच धीर दिला आणि दिल्लीला फोन कर, निवड नक्की होईल असं सांगितलं. दिल्लीला फोनाफोनी, मेलामेली सगळं चालूच होतं. परराष्ट्र खात्याच्या लोक अगदी दिल्ली स्टाईलमध्ये.."हां हां.. जरूर यहा आजाईये भोलेबाबाकी कृपासे हो जायेगा कन्फर्म.. " म्हंटलं मला लेखी द्या की काहितरी.. मी ऑफिसमध्ये रजेच्या अर्जाबरोबर काय भोलेबाबांचा दाखला लाऊ का?! तर म्हणे कळवू तुम्हांला लवकरच.
त्याच दरम्यान कॉलेजमधला एक मित्र ऑफिसच्या बसमध्ये भेटला. त्याला म्हंटलं शनिवारी सकाळी सिंडगडावर येणार का ? तर तो हो म्हणाला. मग दर शनिवारी सकाळी सिंडगड, इतर दिवशी सकाळी ५-६ किलोमीटर चालणं असा व्यायाम सुरु केला. शेवटी एकदाचं परराष्ट्र खात्याकडून  कन्फर्मेशनच पत्र आलं! ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मोर्चेबांधणी सुरुच होती. यात्रेचा अर्ज भरण्याचं नक्की केल्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मधल्या एका आजारपणा व्यतिरिक्त एकही सुट्टी न घेता रोज पाट्या टाकून टाकून बरीच सुट्टी जमा केली होती.  सुट्टीचंही नक्की झालं. एव्हडं सगळं ठरल्यावर तयारीला एकदम जोर आला. इंटरनेट, पुस्तकं पुन्हा वाचली. खरेदीची यादी केली.  अनयाला भेटून आलो आणि तिच्याकडूनही टिप्स घेतल्या. एकंदरीत सगळेच कपडे घेऊन जावे असं वाटायला लागलं!!  बुट, सॅक, कपडे, खाऊ, आठवतील त्या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी केली. योगायोगाने आईची ती हस्तलिखित पाठवणारी मैत्रिणी मी निघायच्या आदल्या दिवशी पुण्यात होती. मी जाणार आहे हे कळल्यावर ती आमच्या घरीच आली. ती स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिने दिलेल्या टिप्स नुसार पुन्हा सामानात फेरफार केली. तिकडे सरकारला आपल्या कडून इन्डेम्निटी बाँड भरून दयावा लागतो, इतरही कागदपत्रं द्यावी लागतात त्याची सोय केली. कैलास मानससरोवरला जाणार्‍या प्रत्येक बॅचबरोबर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक लायझनींग ऑफिसर (ग्रेड १ अधिकारी) असतो. हा पूर्ण बॅचचा प्रमुख आणि त्याला/तिला सगळे अधिकार असतात. आमच्या बॅचच्या एल.ओ. म्हणून तिहार जेलच्या डायरेक्टर जनरल श्रीमती विमला मेहेरा ह्यांची निवड झाली आणि त्यांच्या ऑफिसमधून माहिती विचारणा करण्यासाठी फोन आला.

अखेर सर्व सामान/सुमान, कागदपत्र, पैसे घेऊन एकदाचं आमच्या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केलं.  एअरपोर्टवर पेपरमध्ये वाचलं की दिल्लीला मान्सुन पोचला म्हणे आणि उत्तरेत काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. दिल्लीला जाऊन बघतो तर व्यवस्थित उन! म्हंटलं पडून गेला असेल पाऊस. दिल्लीला दिल्ली सरकारतर्फे सगळ्या यात्रींची तीन दिवस रहायची-खायची सोय केली जाते. गुजराथी समाजमध्ये ही सोय मोफत असते. गुजराथी समाज म्हणजे गुजराथची एम्बसी आहे !! बोलण, खाणं, लोकं सर्व गुजराथीत. हिंदीत बोलल्यावर कपाळावर सुक्ष्म अठी उमटते. तिथल्या एसी डॉर्मिटेरीत बेड मिळाला. तिथेच दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन श्री. उदय कौशिक ह्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आल्याची नोंद केली. गुजराथी समाजात पोहोचल्यावर हाय, हॅलो, नमस्ते, गूड मॉर्निंग वगैरे सगळी अभिवादनं विसरून कोणालाही भेटल्यावर, निघताना वगैरे 'ओम नमःशिवाय' असच म्हणायचं हे कळलं! तिथे बाकीच्या यात्रींची ओळख झाली. दर बॅच प्रमाणे आमच्या बॅचमध्येही गुज्जूभाईंचा जोरदार भरणा होताच. मराठीचा झेंडा फडकवायला आम्ही एकटेच! मुंबई पुण्याचे दोन जण होते पण एकजण तमिळ तर एकजण तेलुगु भाषिक.

नंतर सगळ्या बॅचही ओळख परेड, देवाची पूजा, आरती वगैरे झाली. बॅच बाकी एकदम हायप्रोफाईल होती!! ४ डॉक्टर, ३ वेगवेगळ्या विषयांतले पीचडी डॉक्टर, १ शास्त्रज्ञ, १ डिसिपी, १ रेल्वे मत्रांलयातल्या अधिकारी (ह्या मागे एलओ म्हणून जाऊन आलेल्या होत्या.), २ कॉलेज प्रोफेसर, ३/४ शालेय शिक्षक! आणखी दोन आयटीवालेही सापडले. तिशीच्या आसपासचे आम्ही जवळजवळ दहा जणं होतो. त्यातल्या जवळ जवळ सगळ्यांना एक वर्षाच्या आसपासची मुलं होती आणि बायका मुलांची देखभाल करायला घरी थांबल्या होत्या. एकट्या आलेल्या बाया मात्र चाळीशीच्या पुढच्या होत्या. मुलं कॉलेज/नोकर्‍यांपर्यंत पोहोचली म्हणून आता यात्रेला आल्या.
दुसर्‍या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग इंस्टीट्यूट मध्ये सगळ्या मेडीकल तपासण्या झाल्या. त्या फारच जोरदार आणि डिटेलवार होत्या. दरम्यान आमच्या पुढे गेलेल्या दोन  बॅचेस बुधी आणि अलमोडा इथे अडकून पडल्याची बातमी आली. उद्या त्या पुढे सरकतील त्यामुळे आम्ही वेळेत निघू असही सांगितलं. मी तिथे अगदी दारासमोर बसून कसलातरी फॉर्म भरत असताना आमच्या एलओ मॅडम आल्या. माझ्या बॅजमुळे मी यात्री आहे हे त्यांनी ओळखलं आणि बोलायला आल्या. नाव वगैरे विचारल्यावर म्हणाल्या ' यू मस्ट बी अ स्टुडंट. वॉट डू यू स्टडी?' हा निष्कर्ष कशावरून काढला माहित नाही पण त्यावर 'स्टुडंट और मै ? ही ही ही .. मेरी त्त्वचा से मेरी उमर का पता ही नही चलता.. ही ही ही' असं उत्तर द्यायची फार फार इच्छा झाली!! पण म्हंटलं आधीच त्या तिहार जेलच्या प्रमुख.. उगीच पहिल्याच भेटीत अतरंगीपणा नको करायला.. ! एकंदरीत मॅडमचं व्यक्तिमत्त्व फारच रुबाबदार होतं.

गुजराथी समाजात कौशिकजींच्या ऑफिसमध्ये रोज हवन, पूजा, आध्यात्त्मिक पाठ वगैरे होतं असे. त्यातल सगळं पटलं नाही तरी आधी जाऊन आलेल्यांच्या सल्ल्यानुसार फार कंट्रोल करून शांतपणे सगळं ऐकून घेत असे.
दुसर्‍या दिवशी इंडोतिबेटन बॉर्डर फोर्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल रिपोर्टची तपासणी आणि त्यावरून सिलेक्ट की रिजेक्ट हे ठरणार होतं. तिथे सुरुवातीच्या सुचना झाल्यावर एकेकाची तपासणी सुरु झाली. भोलेबाबाच्या कृपेने आमच्या बॅचमधल्या ५९ साठ यात्रींपैकी ५७ जण पास झाले! सग़ळी कडे आनंदी आनंद पसरला. तिथे एका समितीतर्फे जेवण दिलं. ते लोकं फारच अदबीने वागत आणि आमची सेवा वगैरे करत होते. म्हणे यात्रींची सेवा केली की आम्हांला पुण्य मिळतं पण आपल्याला फारच अवघडल्यासारखं होतं.

नंतर गुजराथी समाजात परतल्यावर पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेल्याची बातमी आली. मी घरी फोन वगैरे करून कळवलं की आम्ही वेळेवर निघू. मग काही जणांना सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. दिल्ली मेट्रोने छान फिरून परत गुजराथी समाजात आलो आणि येऊन बघतो तर...........................तिथे एकदम शोककळा पसरली होती. काय झालं ते विचारलं तर कळलं की उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे यात्रेच्या मार्गाचं खूपच नुकसान झालं आहे. बरेच पुल वाहून गेले आहेत. पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेली कारण गुंजीला हेलिकॉप्टर उतरू शकतं आणि लोकांना परत आणता येऊ शकतं. शक्य झालं तर ते पुढे जाऊन यात्रा करून येऊ शकतात आणि आल्यावर हेलिकॉप्टरने परतू शकतील. बुधीहून मागे फिरणं शक्यच नाहीये. दुसरी बॅच उद्या अलमोड्याहून परत फिरणार आहे आणि आमच्या पासून पुढच्या ८ बॅचेस रद्द केल्या आहेत. सगळ्यांची एक मिटींग झाली आणि कौशिकजींनी परतीच्या प्रवासाची सोय करायला सांगितली. सगळे खूपच उदास झाले. बंगलोरच्या सुमती मॅडम रडायलाच लागल्या. पहिली उदासीची एक लाट ओसरल्यावर सगळ्यांना उत्तरांचलमधल्या गंभीर परिस्थितीची जाणिव झाली. आणि परत भोलेबाबाच्या कृपेनेच आपण वाचलो असं ठरलं. (एकंदरीत गुजराथी समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भोलेबाबांनीच घडवलेली असते.) नंतर सगळेजण सुटलेच. स्वतःवरचं हसण्यासारखी गोष्ट होती. सगळ्यांनी आपापल्या बॅगांमधले पदार्थ काढले. माझ्याजवळचे डिंकाचे लाडू गुज्जू गँगमधल्या एकाने प्रसाद म्हणून सगळ्यांना अग्राह करून करून खायला लावले. त्यांचे ठेपले, रोटवगैरेही दिले. त्या दिवशी गप्पांची मैफील रात्री १/१:३० वाजेपर्यंत सुरु होती. एकतर मेडिकल पास झाल्याने सगळे जरा मोकळेपणाने बोलायला लागले होते आणि त्यातच ही बातमी समजली.

दुसर्‍या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्रालयात सगळ्यांना बोलवलं होतं. चायनीज विसा काढून आमचे पासपोर्ट परत आले होते आणि आता पुढे काय हे ठरवायचं होतं. आमच्या एलओ मॅडमही हजर होत्या. जर ह्यावर्षी यात्रा सुरु झाली तर नंबर दोनच्या आणि आमच्या बॅचला प्राधान्य दिलं जाईल आणि जर कोणाला ह्यावर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षीच्या निवडीत आमच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकार्‍यांनी सांगितलं. यायच्या आधी दिल्लीत परत एकदा मेट्रोने फिरून घेतलं आणि तिथे मस्त पंजाबी जेवणही जेऊन आलो. दिल्ली मेट्रो, रस्ते, पूल सगळं एकंदरीत फारच सुरेख, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलं आहे.

जवळ जवळ सहा महिने तयारी करून, मेडिकल टेस्ट पास होऊन अगदी  ऐनवेळी यात्रा रद्द झाल्याने फार म्हणजे फारच वाईट वाटलं. बॅच चांगली होती, बरोबरीची बरीच जणं होती. त्यामुळे मजा आली असती असं वाटतय. घरीही सगळे जण हळहळले. घरी कोणाचाच जाण्यासाठी विरोध नव्हता. सगळ्यांनी अगदी जोरदार पाठींबा दिला होता. ऑफिसमधली सुट्टी वगैरे सगळच जुळून आलं होतं. पण योग नव्हता हेच खरं.   उत्तरांचलमधली एकंदरीत परिस्थिती बघता मधे कुठे जाऊन अडकलो नाही आणि वेळेवर परत आलो ते ही बरच झालं. ही खरोखर भोलेबाबांची कृपा म्हणायची!

सरकारी पातळीवर यात्रेचं आयोजन, पत्रव्यवहार सगळं फारच व्यवसायिक पद्धतीने केलं जातं. एकंदरीत सरकारने सगळे निर्णयही खूप विचारपूर्वक घेतल्याचं जाणवलं. आमच्या एलओ मॅडम, भेटलेले एक दोन माजी  एलओ, परराष्ट्र मंत्रालयातले इतर अधिकारी इतके व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने बोलत होते की 'सरकारी अधिकारी' म्हंटल्यावर जी प्रतिमा डोक्यात होती ती निश्चितपणे बदलली. आता ह्यावर्षी/पुढच्या वर्षी किंवा कधी यात्रेला जायला जमेल काहीच माहित नाही. पण आता यात्रेबद्दल आता इतकं वाचलं आहे की अगदी कधीही त्याबद्दल कन्सल्टेशन करू शकेन. यात्रेला जाण्याच्यानिमित्ताने चांगला नियमीत व्यायाम झाला आणि मेडिकल चेकअपही झाला. (तुका म्हणे त्यातल्या त्यात!)

जायच्या आधी ह्यावर्षीचं विंबल्डन बघता येणार नाही हे लक्षात आलं होतं. आता यात्रेच्या निमित्ताने रजा घेतलेलेलीच आहे तर ती रद्द न करता दोन आठवडे संपूर्ण विंबल्डन बघावं का असा विचार आता करतो आहे!

आज्जीच्या ओव्या...

आमची आज्जी लहान बाळांना झोपवताना काही विशिष्ट ओव्या म्हणायची. त्या अगदी पुर्वंपार चालत आलेल्या ओव्या असल्याने माझ्या बाबांच्या लहानपणी, मग आमच्या आणि मग नीरज, निशांत लहान असताना त्या म्हंटल्या गेल्या. आईच्या माहेरीही तिची काकू, आज्जी, आमची तिकडची आज्जी अशाच ओव्या म्हणत असत. दोन्ही कडच्या काही ओव्या वेगळ्या होत्या त्यामुळे आता त्यांचा एक सुपरसेट तयार झालाय!
रिया झाल्यावर महिन्या सव्वामहिन्यात आज्जी गेली. एखाद दिवसाचा अपवाद वगळता तिने रियाला झोपवण्यासाठी ओव्या म्हंटल्याही नाहीत कारण तिची स्वतःचीच तब्येत बरी नसायची. आता रियाला झोपवताना बाकी सगळे जण ओव्या म्हणतात आणि रोजच आज्जीची आठवण निघते. ह्या ओव्या कानाला फारच गोड वाटतात. त्यातला संकल्पना कालानुरूप नसल्या किंवा त्यात फार काही लॉजिक नसलं तरी छान वाटतात आणि मुख्य म्हणजे त्या बर्‍यापैकी लिंगनिरपेक्ष आहेत !आज्जी एकंदरीतच त्या इतक्या आश्वासक सुरात म्हणायची सगळीच बाळं अगदी शांत झोपून जायची. ह्यातल्याच काही ओव्या आज ब्लॉगवर टाकतोय.

अंगाई रे बाळा, तुझा लागून दे रे डोळा.
पापिणी चांडळा, दृष्ट लागी... ||१||

अंगाई, अंगाई, बाळ झोपी जाई.
बाळाला म्हणूनी, दुदु देई ||२||

नीज रे तान्हीया, आपुले पाळणी.
तुला राखण गवळणी, गोकूळाच्या ||३||

मोठे मोठे डोळे, हरणी पाडसाचे,
जसे माझ्या राजसाचे, नीरज बाळाचे ||४||

मोठे मोठे डोळे, भिवया चंद्रज्योती,
चांगली म्हणू किती, रिया बाळाला ||५||

मोठे मोठे डोळे, भिवया लांबरूंद
कपाळी लावा गंध, निशांत बाळाला ||६||

रिया बाळ खेळे, तिच्या पाई घालू वाळे,
निवतील डोळे, सखियांचे ||७||

नीरजबाळचा खेळ, कोणी गं मांडियेला,
राखफुलाला धाडीला, निशांत बाळ ||८||

आमंचा निशांता बाळ, आम्हांला आवडे,
दारीचे केवडे, जून झाले ||९||

आमंचा नीरज बाळ, आम्हांला हवा हवा,
देवाजीने द्यावा, जन्मभरी ||१०||

माझ्या गं अंगणातं, सांडिला दुधभातं,
जेविला रघुनाथ, निशांत बाळ ||११||

माझ्या गं अंगणातं, सांडिली दुधपोळी,
जेविली चाफेकळी, रियाबाई ||१२||

नीरज बाळ खेळे, अंगणी ओसरी,
त्याला संगत दुसरी, निशांत बाळाची ||१३||


माझ्या गं दारावरनं, दहापंधरा गाड्या गेल्या,
भावाने बाहिणी नेल्या, दिवाळीला ||१४||

जत्रा

       गेल्या आठवड्यात पुण्यात PIFF म्हणजेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. पिफला जायची यंदाची माझी पहिलीच वेळ. आधी पिफ बद्दल खूप ऐकलं होतं त्यामुळे पहायची खूप उत्सुकता होती. शिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी ह्या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधले चित्रपट पहायची पहिलीच वेळ असल्याने तो अनुभव कसा असेल हे ही माहित नव्हतं.

        मित्रमंडळींपैकी कोण कोण आहे हे साधारण पहिल्या दुसर्‍या दिवशी कळलं आणि मग रोज सकाळी SMS, फोन, पिंग करून ठरवाठरवी सुरु झाली. कॅटलॉगमध्ये सिनेमाबद्दल वाचायचं, त्यातुन फार काही कळलं नाही तर गुगलवर शोधाशोध करायची. एका मित्राच्या ओळखीतले एक जण पिफच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यांच्याकडूनही काही काही चित्रपटांची नावं समजली होती. पिफचं आयोजन एकंदरीत नेटकं होतं. फार भपकेबाज नाही पण तरीही खूप व्यवसायिक पद्धतीने केलेलं. यंदाच्या पिफची मुख्य संकल्पना 'Celebrating 100 years of Indian Cinema' अशी होती. वर्ल्ड कॉम्पिटीशन, ग्लोबल सिनेमा, रेट्रो सिनेमा (ह्यात स्मिता पाटील, यश चोप्रा ह्यांचाही समावेश होता), इंडीयन सिनेम आणि आजचा मराठी चित्रपट असे विभाग ह्याशिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फिल्म्सची स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम होता. हिंदी, इंग्रजी चित्रपट बघायचे नाहीत असं ठरवलं होतं. मराठी चित्रपट संहिताचा प्रिमीयर होता म्हणून आणि 'बालक पालक' बद्दल खूपच ऐकलं होतं म्हणून जायचं होतं पण संहिताची वेळ जुळली नाही आणि बालक पालकला जागा मिळाली नाही म्हणून दोन्ही पहायचे राहिले. चार दिवसांच्या काळात एकंदर ११ चित्रपट हाती लागले. १ हिब्रू, १ टर्की, १ इटालियन, १ फिनीश, १ नॉर्वेजियन, १ फ्रेंच, १ सर्बियन आणि बाकीचे जर्मन/पोलीश.

        पाहिलेल्या चित्रपटांबिषयी थोडसं :
१. एपिलॉग - हायुता अँड बर्ल : हा पिफचा उद्घाटनाचा सिनेमा होता. कहाणी एका वयस्कर इस्रायली जोडप्याची. कम्युनिस्ट विचारसरणीच्या ह्या जोडप्याला आत्ताच्या जगाशी जुळवून घेणं हळूहळू अवघड जायला लागतं. मुलगा वडिलांशी पटत नाही म्हणून अमेरिकेला निघून गेलेला. आर्थिक चणचणही भासत असते. अश्यात एका रात्री त्यांच्यात भांडण होतं. ते मिटवून ते दोघे आपल्या येऊ घातलेल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. अखेर सेवाभावी संस्था काढायचं स्वप्न बाजूला ठेवून अखेरच्या प्रवासाला निघून जातात. कम्युनिस्ट आणि आधुनिक विचारसरणीतला संघर्ष इस्राइलमध्येही आहे हे अजिबात माहित नव्ह्तं. नायक नायिका दोघांचीही कामं उत्तम झाली आहेत. सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य सिनेमा होता.

 २. कुमा : तुर्कस्तान : कुमा म्हणजे सवत.व्हेनिसमध्ये रहाणार्‍या टर्की फॅमिलीत घडणारी ही गोष्ट मस्त फुलवली आहे. सुन म्हणून लग्न करून आणतात पण सासरी आल्यावर तिला कळतं की ती खरतर सवत आहे. तसं असण्याची कारणंही नंतर कळतात. आधी ती हादरून जाते पण नंतर जुळवून घेते. पुढे त्या दोघींमधलं नातं कसं वळणं घेत जातं ते मस्त दाखवलं आहे. प्रमुख भुमिका करणार्‍या दोन्ही कलाकारांची काम सुरेख झाली आहेत. सगळेच कलाकार अगदी टिपीकल टर्की चेहेरापट्टी, शरीरयष्टीचे आहेत. एकंदरीत सुरेख सिनेमा.

३. द अ‍ॅडवेंचर : रेट्रो प्रकारातला हा सिनेमा मायकेलँजेलो ह्या दिग्दर्शकाचा, साधारण १९६०च्या आसपास आलेला. इटालियन मित्र मैत्रिणींचा ग्रुप समुद सफरीला निघतो आणि एका बेटावर येऊन पोहोचतो. त्यातली एक मुलगी ह्या बेटावर गायब होते. मुलीचा मित्र आणि मैत्रिण तिचा शोध घेता घेता एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि शेवटी आपल्या हरवलेल्या मैत्रिणीला विसरून जातात. ब्लॅक आण व्हाईट सिनेमा जरा संथ वाटला तरी ज्या काळात तो बनला ते लक्षात घेतलं तर ठिक वाटतो.

४. रोझः १९४५ साली दुसर्‍या महायुद्धानंतरच्या पोलंडव्याप्त जर्मन भागात घडणारी ही कथा. एका मृत जर्मन सैनिकाच्या पत्नीची आणि त्या सैनिकाच्या सहकार्‍याची. साम्यवादी पगडा असलेल्या ह्या भागात सामान्य नागरिकांवर, स्त्रियांवर झालेले अत्याचार, दडपशाही ह्यांचं वास्तववादी चित्रण ह्यात आहे. प्रचंड अंगावर येणारा सिनेमा पाहून झाल्यावर डोकं सुन्न होतं. ह्या चित्रपटाला वर्ल्ड कॉम्पिटीशनमध्ये बक्षिस मिळालं.

 ५. द टो रोप : मेक्सिकोमध्ये युद्धानंतर घडणारी कथा. युद्धामध्ये आई वडिल गेल्यानंतर आपल्या दुरच्या काकांकडे एक मुलगी येते. हे काका गेस्ट हाऊस चालवत असतात. तिथे उतरायला येणारे प्रवासी सोडून सगळं असतं. ह्या काकांचा मुलगा, त्यांना ही जागा सोडून शहरात यायला सांगत असतो कारण त्याला पुन्हा युद्धाची शक्यता वाटत असते. एका सकाळी काका आणि त्यांचा मुलगा हिला एकटीला सोडून शहरात सोडून जातात. आणि युद्ध आणि नंतर युद्धाची शक्यता तिला पुन्हा एकटं पाडते. कथा अतिशय संथपणे पुढे सरकते. मेक्सिकोच्या खेड्यामधलं चित्रीकरण सुरेख आहे. सगळ्या परिसरातला निसर्ग फार सुरेख दाखवला आहे.

 ६. होम फॉर अ विकेंड: एका जर्मन परिवारात घडणारी ही गोष्ट. एका विकेंडला आई वडिल आपल्या मुलांना दोन महत्त्वाच्या घडामोडी सांगतात. ह्या दोन्ही गोष्टींचा त्या परिवारावर होणारा परिणाम, प्रत्येक सदस्याचे वैयक्तिक आयुष्य आणि परिवारातल्या वेगवेगळ्या नात्यांचा वेध ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत. जर्मन घर आणि वातावरण तसेच आसपासचा परिसर ह्यांचे चित्रण सुरेख आहे.

७. द परेडः सर्बियात घडणार्‍या ह्या सिनेमात गे लोकांच्या प्रश्नाला हात घातला आहे. गे लोकं शहरात एक परेड करायची तयारी करत असतात आणि त्यांना मानवी हक्कांची मागणी करायची असते. सनातनी लोकांचा ह्याला अर्थातच विरोध असतो आणि त्यामुळे ह्या दरम्यान त्यांना अनेक अडचणी येतात. काही घडामोडींमुळे ज्युडो कराटेचे क्लास घेणारा एक जण आणि त्याची मैत्रिण ह्यांना परेडसाठी मदत करायला तयार होतात. अखेर ही परेड पार पडते पण त्यांच्यातल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू होतो. विनोदी अंगाने जाणारे संवाद विनोदांच्या मध्ये जोरदार फटके मारतात. पूर्व युरोपिय देशांमधली स्पर्धा, शत्रृत्त्व ह्या संवाद/विनोदांमध्ये खूपदा डोकावतं. पूर्व युरोपातल्या देशांचं चित्रीकरण सुरेख आहे. एकंदरीत मस्ट वॉच सिनेमा !

 ८. बार्बरा: हा ही चित्रपट दुसर्‍या महायुद्धोत्तर काळातला. पूर्व जर्मनीवर पोलादी पडदा असताना तिथल्या नागरिकांवर अनेक निर्बंध होते. सरकारचं नागरिकांच्या हालचालींवर बारिक लक्ष असे. बार्बरा ही एक बालरोगतज्ज्ञ. तिने आपल्याला सेवेतून मुक्त करण्यासाठी अर्ज केलेला असतो. ती तिथून पळूण जाण्याचे प्रयत्नही करत असते. परंतु एक एक केस हातावेगळी करताना ती तिथल्या परिस्थित गुंतत जाते. सरकारी कामगारांच्या चेहेर्‍यांमागे शेवटी आपल्यासारखीच माणसे आहेत ह्याची तिला जाणीव होते आणि मग पळून जायची संधी असताना ती माघार घेते. बार्बला चित्रपटालाही स्पर्धेत बक्षिस मिळालं. प्रत्येक कलाकाराच अभिनय उत्त्म होता, तसचं वातावरण निर्मितीही सुरेख होती.

 ९. द ओरहॅम कंपनी: दारूडा बाप, सोशिक आई, बंडखोर मुलगा अशी अगदी भारतीय शोभेल अशी ह्या नॉर्वेजियन चित्रपटाची कथा. सगळ्या कलाकरांचे खूपच नैसर्गिक अभिनय आणि अतिशय संयत हाताळणी ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्ये. शिवाय नॉर्वेमधलं अप्रतिम निसर्ग सौंदर्यही वारंवार दिसत रहातं.

१०. हेला डब्लू : ही पुन्हा दुसर्‍या महायुद्धाशी संबंधीत कहाणी. अनेक युरोपिय देश त्यांची चूक किंवा इच्छा नसताना दुसर्‍या महायुद्धात ओढले गेले. फिनलँडही त्यातलाच एक. हेला ही फिनलँडमधली प्रथितयश उद्योजक, लेखिका, कवी, नाटककार. फिनलँडमध्ये शांतता नांदावी म्हणून ती तिच्या ओळखी आणि वजन वापरून सोव्हिएट युनियनशी वाटाघाटी करते. पण पुढे तिच्या वर फितुरी आणि देशद्रोहाचे आरोप येतात आणि तिची रवानगी तुरुंगात होते. युध्द संपल्यानंतर तिची सुटका होते. युद्ध अगदी प्रत्यक्ष दाखवलं नसलं तरी युद्ध चालू असल्याची जाणीव चित्रपटभर होत रहाते. ह्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत अतिशय उत्कृष्ठ होते. खरतर मी बालक पालक हा गाजत असलेला मराठी सिनेमा पाहायला गेलो. पण तिथे जागा न मिळाल्याने शेजारच्या स्क्रीनला जाऊन बसलो आणि हा उत्तम चित्रपट पाहायला मिळाला.

११. ३७ विटनेसेस : फ्रान्समध्ये भरवस्तीत एका महिलेलेचा खुन होतो. आसपासच्या परिसरात रहाणारे ३७ लोकं आम्ही काहीच पाहिलं किंवा ऐकलं नाही अशी साक्ष देतात. अडतिसाव्याला मात्र रहावत नाही तो नंतर जाऊन पोलिसांना किंचाळण्याचे आवाज ऐकू आल्याचं सांगतो. नंतर सगळेच जण आपली साक्ष फिरवतात. सुरुवातीला 'मर्डर मिस्ट्री' वाटणारा चित्रपट खुन कोणी केला वगैरे तपशीलात शिरण्याऐवजी झालेल्या घटनेमुळे लोकांच्या मनावर आणि वागण्यावर झालेल्या परिणामांवर जास्त भाष्य करतो. एकंदरीत सिनेम्यांची जत्रा विविध विषय, उत्तम हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि अभिनय आणि नेत्रसुखद चित्रीकरण ह्यांच्यामुळे एक वेगळाच अनुभव देऊन गेली.(युरोपचं सौंदर्य बघून आता तिथे जायची इच्छा होते आहे!) अन्यथा हे सगळे चित्रपट मी कधी बघितले असते किंवा कधी बघितले असते का कोण जाणे!

झिम्मा - आठवणींचा गोफ

          मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात. पहिल्याने केलेल्या खुर्च्या पाहून खुष होतात आणि सगळ्या खुर्च्या लगोलग विकत घेऊन टाकतात. नंतर बेटाच्या दुसर्‍या बाजुला जातात आणि तिथे असलेलं शिल्प पाहून निश:ब्द होतात. पुढे अनेक जण ते शिल्प पहायला येऊ लागतात आणि त्या बेटाला शिल्पकाराचं म्हणजे दुसर्‍या मित्राचं नाव दिलं जातं. गोष्टीचं तात्पर्य काय तर अगदी गरज असेल तेव्हाच आणि तेव्हड्याच खुर्च्या बनवाव्या पण त्यात अडकून न पडता निरंतर टिकणारं शिल्प बनवायचा ध्यास घ्यावा. ही गोष्ट अगदी लक्षात राहिली आणि ती सांगणार्‍या प्रमुख पाहुण्या विजया मेहेताही! त्या आधी विजया मेहेतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता. पुढे 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ह्यांनी विजया बाईंचं नाव आदराने घेऊन, त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं. थोड्याच दिवसात विजया बाईंच आत्मचरित्र 'झिम्मा' प्रकाशित होणार अशी बातमी आली आणि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या ते घेऊन वाचायचं हे ठरवून टाकलं.

          'झिम्मा - आठवणींचा गोफ' अश्या शीर्षकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना बाई आधी वाचकांना शुभेच्छा देतात!!! तर शेवटी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच, प्रेक्षक आणि त्या स्वतः अश्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरे आणि संस्थांची संचालकपदे अश्या बर्‍याच गोष्टी. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मोठच काम. पण नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या बाजात सांगितलेल्या घटना उत्सुकता कायम ठेवतात. हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहेता चार टप्प्यांमध्ये लिहिलं आहे. ह्यातलं 'विजया मेहेता' हे त्यांचं आजचं रुप. आणि म्हणून बाकीच्या तिघींबद्दल तृतीय पुरुषी एकवचनात लिहिलं आहे. स्वतःच्या गतरुपांकडे असं त्रयस्थ नजरेने पहाणं मला फार आवडलं.

          विजया बाईंच्या बालपणीच्या म्हणजे बेबीच्या गोष्टी सुरस आहे. जयवंत परिवाराच्या मोठ्या कुटुंबकबिल्याची आणि बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्तींची वर्णनं येतात. भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं आपल्या डोळ्यासमोर त्या जागा उभ्या करतात. पुढे पुढे नाटकांच्या नेपथ्यांबद्दलचीही अशी वर्णनं वाचून न कळत आपण तो रंगमंच डोळ्यासमोर बघायला लागतो आणि बाईंनी वर्णन केलेल प्रवेश रंगमंचावर कसे घडत असतील ह्याची कल्पना करायला लागतो.

          विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ. बाई म्हणतात संपूर्ण भारतात ह्या काळात एक सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या, जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या, नवनवे कलाकार उदयाला येत होते आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट होती. ह्या सगळ्याचच छोटखानी रूप म्हणजे भुलाबाई इंस्टिट्युट. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या आणि त्यांना घडवण्यात ह्या इमारातीचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे चित्रपट माध्यमात काम करायला लागल्यावर 'वास्तू बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात.; असं बाईंचं ठाम मत पडलं त्याची सुरुवातही कदाचित भुलाबाई इंस्टिट्युट पासुन झाली असावी.

          विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास पुढील भागात उलगडतो. सुरुवातीच्या काळात पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका 'रंगायन'ने केल्या. बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची तसेच प्रशासकाची जडणघडण ह्या भागांमध्ये पहायला मिळते. दिग्दर्शनाही विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाततचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेले काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत. वयाने आणि अनुभवाने तुलनेने तरूण दिग्दर्शिकेने पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसाख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेले पाहून बाईंच्या ठाम विचारांचे आणि धैर्याचे कौतूक वाटते.

          भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटके भारतात तसेच जर्मनीत केली. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मित्र जोडले. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावे आपले माहेरच वाटू लागली. ह्या सगळ्या प्रकल्पांदरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत. शांकुतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी नाट्यप्रशिक्षण घेतले. तिथले अनुभव, तिथे पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत. रंगायन बंद पडल्यानंतर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं परंतु ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता 'लोकमान्य' रंगभुमी म्हणायचं ठरवलं. ह्या लोकमान्य रंगभूमीवर बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक अजोड नाटकं दिली. इतके वेगवेगळे विषय! ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल. प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींदरम्यान लागलेल्या ठेचांबद्दल बाईंनी अगदी विस्ताराने लिहिलेलं आहे. पुस्तकामधला लोकमान्य रंगभूमीबद्दलचा हा भाग मला सर्वात जास्त आवडला. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो.

          पुढे दुरर्शनकरता काही कार्यक्रमांवर तसचं काही चित्रपटांवर बाईंनी काम केलं. त्यांच्याच काही नाटकांचं रुपांतर चित्रपटांमध्ये केलं. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये कसे बदल केले, कुठला भाग माध्यम बदलामुळे जास्त खुलला, कुठला भाग नीट झाला नाही ह्यांबद्दलची माहिती पण छान आहे. ह्या माध्यमांमध्ये तुलना जरूर केली आहे पण आमचं जुनं तेच सोनं असा सुर कुठेही जाणवला नाही. पुस्तकातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? असा प्रश्न पडतो. एव्हड्या मोठ्या कारकिर्दीत बाईंना अनेक जण भेटले. भेटलेल्या मंडळीबरोबर आलेले चांगले अनुभव लिहिलेले आहेतच पण खटकलेल्या गोष्टी उदा. तेंडूलकरांबरोबर तुटलेली युती, भक्ती बर्वेंचा खटकेलेला अभिनय, नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद, वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग इ. कुठलीही सनसनाटी निर्माण न करता पुस्तकात नमुद केलेल्या आहेत. स्वतःच्या चुकाही कबूल करण्यात बाईंना काहीही कमीपणा वाटलेला नाही, एव्हडचं काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे. मी आधी वाचलेल्या चरित्र/आत्मचरित्रांच्या तुलनेत वैयक्तिक आयुष्याबद्दल जरा कमी लिहिलय का काय असं वाटलं पण कला/व्यवसाय ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं असताना, वैयक्तिक आयुष्याबद्दल कोण कशाला सांगेल असंही वाटलं.

          पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का? सध्या काही कलाकार मंडळी जुनी नाटकं नव्या संचात परत रंगभुमीवर आणण्याचे उपक्रम करत आहेत. बाईंची तसेच इतरही गाजलेली नाटकं मिळतील तितकी पाहून घ्यायची असं हे पुस्तक वाचल्यावर ठरवलं आहे. त्यावेळच्या प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळायची ती अनुभूती नाहीसुद्धा मिळणार कदाचीत, पण मिळतं आहे तितकं तरी बघुन घ्यायचं ठरवलय!

-----------------------------------------------------------------------------------------------------------
          'झिम्मा' नुकतच वाचून संपवलं. बाईंच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की त्याबद्दलच्या पुस्तकाचं परिक्षण/ परिचय/रसग्रहण माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पुस्तक वाचून संपल्यावर जे मनात आलं ते लिहिलय. अनेक जण सध्या 'झिम्मा' वाचत आहे. त्यांनाही पुस्तक वाचल्यावर काय वाटलं हे वाचायला नक्की आवडेल.

पुन्हा पळापळी...

परवा परत एकदा 'रन'मध्ये भाग घेतला.. जवळ जवळ दिड वर्षांनी. पण यंदा मात्र भारतात.. पुण्यात. परत आल्यावर बरीच गडबड सुरु होती. पुणे मॅरॅथॉम साधारण डिसेंबरमध्ये असते हे माहित होतं. त्यामुळे सप्टेंबरपासून वेबसाईट चेक करत होतो पण ती नोव्हेंबरपर्यंत अपडेट झालीच नाही. शेवटी मॅरॅथॉनभवनला फोन करून विचारलं आणि नाव नोंदणी सुरु झाल्याझाल्या लगेच १० किलोमिटर स्पर्धेत नोंदणी केली. हाफ मॅरॅथॉनची तयारी करणं शक्य नव्हतं आणि वेळही नव्हता. यंदा घरी पण सगळ्यांना उत्साहं होता. शिल्पाने डॉक्टरांना विचारून ३.५ किलोमिटरमध्ये नाव नोंदवलं त्यांच्याबरोबर वहिनी, नीरज आणि निशांतनेही नोंदवलं. दादाने हो-नाही करता करता शेवटी १० किलोमिटरमध्ये नाव दिलं. शिल्पाची भावंड श्वेता, अमित आणि सुहासपण १० किलोमिटरमध्ये भाग घ्यायला तयार झाले आणि आमची फॅमिली रनच झाली! एकंदरीत रेस बरी झाली. रूट चांगला होता. फार चढ उतार नव्हते. खंडूजी बाबा चौक ते बंड गार्डन व्ह्याया लक्ष्मी रोड, सेव्हन लव्हज चौक, एमजी रोड असा मार्ग होता. १० के मला साठी ७० मिनिटं लागली. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ! व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला अधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या. मधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्‍या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या. पेठांमध्ये बरीच पुणेरी मंडळी हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी पळणार्‍यांकडे बघत उभी होती. एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स. कारण सकाळी फारशी वर्दळ नव्हती आणि वहानंही नव्हती. मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. एरवी पादचार्‍यांना न जुमानणार्‍या पुणेरी ट्रॅफिककडे तुच्छ कटाक्ष टाकत पळायला फारच मजा येत होती ! २७वी स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्‍यांच्या मधेमधे वहाने येत होती. ३.५ किमी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं. २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता !!!! तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. ! (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... !! आमच्या ग्रुपमध्येही असा एक सुपरमॅन होता. :) अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट का नाही कोण जाणे. पळापळी असलं की छान असतं. आधी बरेच दिवस तयारीत जातात आणि नंतर परिक्षा संपल्यासारखं वाटून स्वतःचे लाड करून घेता येतात. २ पाच के, २ हाफ मॅरॅथॉन आणि आता तिसर्‍या १० के नंतर फुल मॅरॅथॉन करायची खूप इच्छा आहे. पण ४२ किलोमिटर करायची मानसिक आणि शारिरीक तयारी कशी आणि कधी होणार काय माहित ! एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली !!! -------------------------------------------------------------------------------------------------------------- परवा एका पार्टीत ब्लॉगर स्नेहा भेटली. मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरत असताना आम्ही जे काही ब्लॉगर नियमीतपणे लिहायचो त्यातली एक स्नेहा. त्या वेळचे ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्यांच्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. अनेकांच्या अनेक पोस्ट्सची उजळणी करून झाली. दोघांनीही एकमेकांना 'इतक्यात ब्लॉगवर काहीच का लिहिलं नाहीस?' असा प्रश्न विचारला...उत्तर माहित असूनही. :) परवा पळापळी झालीच होती. आदल्या दिवशी जुन्या ब्लॉग्जची उजळणीही झाली होती. त्यामुळे ब्लॉगवरची धुळ झटकायला निमित्त मिळालं. मस्त वाटतय एकदम इथे लिहून. शिवाय २०१२चं वर्ष ब्लॉगवर एकही पोस्ट न पडून भाकड जाता जाता वाचलं! त्याबद्दल थॅंक्न स्नेहा. :)

रसग्रहण - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर

मायबोली.कॉम वर नुकतीच रसग्रहण स्पर्धा पार पडली. त्यातली ही माझी प्रवेशिका.
सगळ्या प्रवेशिका इथे पहायला मिळतील. http://www.blogger.com/img/blank.gif

*********************************************************

पुस्तकाचे नावः वास्तव नावाचं झेंगट
लेखक: सुमित खाडिलकर
प्रकाशन संस्था- नविन प्रकशन
प्रथम आवृत्ती- एप्रिल २०१०

वास्तव नावाचं झेंगट

इंग्रजी पुस्तकं किंवा ब्लॉगविश्वावर नजर टाकली तर असं दिसतं की सर्व वयोगटांतली लोकं आपल्या अनुभवांवर आधारित भरभरून लिहीत असतात. नोकरी करणारे, नोकरी न करणारे, विद्यार्थी , प्रवास करणारे, खेळाडू, कलाकार, तंत्रज्ञ असे कुठल्याही क्षेत्रातले असले तरी लिहितात. आपल्याला आलेले अनुभव जमतील तसे जमतील त्या पद्धतीने आणि शक्य असेल त्या माध्यमात लिहितात. मराठीतही अशाप्रकारचं लिखाण वाचायला मिळतं पण त्याचं प्रमाण इंग्रजीपेक्षा बरंच कमी आहे. इतके दिवस लिखाणातली ही 'तरूणाई' थोडीफार पुस्तकं, काही ठरावीक ब्लॉग किंवा इतर माध्यमांमधून कमीअधिक प्रमाणात दिसणार्‍या लेखनापुरतीच मर्यादित होती. पण हल्ली संपादक तसेच प्रकाशकांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे आणि वाचकांकडून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकं, मासिकं, ब्लॉग, संकेतस्थळं ह्या सगळ्या माध्यमांमध्ये अश्या नविन लेखकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे.

नुकतच अश्याच एका नविन आणि तरूण लेखकाने, सुमित खाडिलकरने, लिहिलेलं 'वास्तव नावाचं झेंगट' हे पुस्तक वाचलं. लेखक अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण नुकतंच संपवलेला. ह्याचा उल्लेख इथे अशासाठी केला जेणेकरून लेखकाच्या वयोगटाचा आणि त्या अनुषंगाने असणार्‍या अनुभवविश्वाचा थोडाफार अंदाज यावा.
पुस्तकातली दोन प्रकरणे "मी - आम्ही- आमची टीम" आणि "वास्तव नावाचं झेंगट" एका अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतात. या कथांमधला कथानायक आणि त्याच्या कॉलेजमधले इतर विद्यार्थी एका सांघिक स्पर्धेत भाग घेतात आणि ती स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली विद्यार्थी वयोगटाला साजेशी धडपड, त्यांना आलेले अनुभव तसेच हाती न लागलेलं आणि लागलेलं बरच काही सांगणारी ही गोष्ट. अतिशय उत्स्फूर्त आणि मुख्य म्हणजे कथानायकाच्या वयाला साजेशी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि त्या प्रवासाचा भाग बनवून टाकते.

ह्यातला कथानायक हा भवानी शिक्षण मंडळाच्या प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल ब्रँचचा विद्यार्थी. परीक्षेनंतरच्या सुट्टीत ठरलेल्या एका कम्पनी व्हिजिटच्या मिटींगसाठी तो कॉलेजला जातो आणि त्यांचे सर तिथे एकदम वेगळाच विषय काढतात. 'एस.ए.इ. इंडिया' ह्या संस्थेतर्फे आयोजित 'ऑल टेरेन व्हेईकल' बनवण्याच्या स्पर्धेबद्दल ते सांगतात. कथानायक आणि त्याचा मित्र त्यात नाव देऊन टाकतात आणि नंतर त्याबद्दल विसरूनही जातात. सुट्टी संपल्यावर कळतं की त्यांच्याशिवाय अजून फक्त दोघांनी ह्या स्पर्धेसाठी नावं दिलेली आहेत. सर आणि हे चार जण ह्या स्पर्धेची कॉलेजमध्ये जोरदार प्रसिद्धी करतात, आपापल्या मित्रांना ह्यात खेचायचा प्रयत्न करतात आणि सरतेशेवटी दुसर्‍या वर्षाची सतरा आणि फक्त बाहेरून मदत करायला तयार झालेली शेवटच्या वर्षाची तीन, अशी एकूण वीस जणं गोळा होतात. ह्यातल्या कोणाला किंवा अगदी सरांनाही गाडी बनवायचा अनुभव सोडाच पण त्याबद्दल फारशी माहितीही नसते. त्यात अगदी शेवटच्या क्षणी असं कळतं की स्पर्धेचे संचालक स्पर्धेपूर्वी इंटरव्ह्यू घेणार आहेत. टीम मधल्या कोणालाच इंटरव्ह्यूला काय विचारणार हे माहीत नसतं किंबहुना काहीही विचारलं तरी सांगता येणार नाहीये ह्याची खात्रीच असते. अश्याच एका गोंधळातल्या मिटींगमध्ये रघुनाथ भावे नावाचा एक मुलगा येऊन स्वतःची ओळख करून देतो आणि पुढे "कुणाला असं वाटतं का, मी कॅप्टन बनू नये, किंवा दुसर्‍या कुणी बनावे?" असा सरळ प्रश्न विचारतो. अर्थातच कोणाकडूनही काहीच उत्तर न आल्याने हा रघुनाथ भावे टीमचा कॅप्टन बनतो आणि तिथून सुरु होते एका ध्यासाची सुरस कथा.

कॉलेजमधल्या टीमच्या संदर्भात जे जे काही घडू शकतं ते सगळं ह्या टीमच्या बाबतीत घडतं. दोन नेत्यांमध्ये मध्ये भांडणं होतात, ज्युनियर पोरांवर सिनियर्स दादागिरी करतात. काही जणं ही दादागिरी सहन करून पाट्या टाकत राहतात पण काही जण मात्र टीम सोडून जातात. सोडून गेलेल्यांपैकी काही जण तो राग मनात ठेऊन ह्या टीमच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करतात. ह्या सगळ्या प्रकारांमुळे टीम आणि कॉलेजमधले शिक्षक तसच व्यवस्थापन ह्यांचे संबंध बिघडतात. कॉलेज वेळच्या वेळी पैसे तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवत नाही. टीममधली मुलं आपल्या पालकांकडून पैसे घेऊन गाडीचं काम पुढे नेतात. अश्या परिस्थितीत पैसे देणार्‍या पण काम न करणार्‍या मुलांशी काम करणार्‍या मुलांना जुळवून घ्यावं लागतं. स्पर्धेच्या सुरुवातीला सगळेच जण भन्नाट कल्पना लढवून डिझाइन करतात पण ते प्रत्यक्षात उतरवणं जवळजवळ अशक्य ठरतं. मग ऐनवेळची धावपळ. त्यात तोंडावर आलेल्या परीक्षा. काही जण एखाददोन पेपर बुडवतात मात्र गाडी चाकांवर पळवायचीच ह्या एका इर्ष्येने पेटून उठतात. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडतो. जे जे शक्य होईल ते ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं जातं मात्र स्वप्न १०० % पूर्ण होतंच नाही. कल्पनांच्या कितीही भरार्‍या मारल्या आणि ध्येयपूर्तीचा कितीही ध्यास घेतला तरी वास्तव नावाचं झेंगट त्यांच्या स्वप्नाच्या आड येतं !
पुढच्या वर्षी टीम नव्या दमाने कामाला लागते. आदल्या वर्षी झालेल्या चुका टाळायची जबाबदारी कथानायक आपल्या खाद्यांवर घेतो, नवे वर्ष, नवी टीम आणि त्यांच्या पुढच्या नव्या समस्या ! फक्त आता गाठीशी असतं एका वर्षाच्या अनुभवाचं पाठबळ आणि आदल्यावर्षीच्या चुका टाळण्याचा निश्चय. टीमचा नविन वर्षातला स्पर्धेच्या दिवसापर्यंतचा प्रवासही अतिशय रंजक आहे. कथानायक म्हणतो, "पहिलं वर्ष स्वप्नवत होतं तर दुसरं वास्तव. या वेळी आम्ही आंधळेपणाने झपाटून नाही तर डोळसपणे कष्ट केले होते. पण त्यामुळेच बहूतेक ह्यावेळी कमी मजा आल्यासारखं वाटतं होतं."

काही काही प्रसंग लेखकाच्या शैलीमुळे तसेच नाट्यमय वर्णनांमुळे आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहातात. पहिल्यांदा गाडी चाकांवर चालवली जाते त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना आपल्यालाही स्फुरण चढतं. स्पर्धेच्या दिवशीची धावपळ, ऐनवेळची कामं आपल्याला तिथल्या वेगवान वातावरणात घेऊन जातात. लेखकाने पुस्तकात सांगितलेते इंजिनीयरिंग कॉलेजमधल्या शिक्षकांबद्दलचे अनुभव तर अगदी वास्तवदर्शी आहेत.
कॉलेजमधल्या शिक्षिकेशी संबंध बिघडलेल्या एका मुलाला लेखी परिक्षेत ७० मार्क मिळतात मात्र कॉलेजमधल्या शिक्षकांच्या हातात असलेल्या त्याच विषयाच्या तोंडी परीक्षेत तो नापास होतो. ह्या प्रसंगाबद्दल लेखक म्हणतो, "लायकी नसताना अधिकार मिळाले तर काय होतं याचं आमच्या मॅडम जिंवत उदाहरण होत्या."
किंवा अनेक वर्ष शिक्षकी पेशातच असलेले आणि बाहेरच्या कॉर्पोरेट जगात काय सुरु आहे ह्याची फारशी कल्पना नसलेले एक सर कथानायकाला टीमचा "मॅनेजर" कसा असावा ह्या बद्दल बरच काही ऐकवतात. ह्या प्रसंगाबद्दल लेखक लिहितो, "सर मला मॅनेजर बनवायच्या दृष्टीने लेक्चर द्यायला लागले. माझा टीशर्ट किंवा वरची एक दोन बटणे उघडी ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला शर्ट, जीन्स, सँडल, हातातलं कडं, गळ्यातला गंडा, चेहेर्‍यावरची बेफिकिरी, एवढंच काय पण माझी चालण्याची पद्धतसुद्धा 'त्यांच्या' मॅनेजरच्या श्रेणीत बसणारी नव्हती. त्यांना माझं हसणं सुद्धा मॅनेजरसारखं वाटायचं नाही. ते मला म्हणाले होते हसताना माझे डोळे खूप बारिक होतात. भरपूर मोठं लेक्चर ऐकून मला हसावं की रडावं ते कळेनासं झालं. रोहन मात्र पोट धरून हसत होता." अर्थात पुस्तकातले हे विद्यार्थी फक्त शिक्षकांच्या विरोधातच आहेत असं नाही. तसच या मुलांच्या वयाला अनुसरून असणारा समजुतदारपणा दाखवणारे काही प्रसंगही लेखाकाने भाषेचा बाज न सोडता लिहिले आहेत. एका प्रसंगात लेखक लिहितो, "त्यांना चढलेल्या धुंदीचा हेवा वाटून मलाही क्षणभरासाठी बडवायजरचा मोह झाला, पण मी तो यशस्वीरीत्या आवरला. जवळपासचा काही नातेवाईकांचा इतिहास ह्या बाबतीत चांगला नव्हता आणि तो आठवला की, मला या गोष्टीचा मोह आवरता यायचा. माझ्यासमोर माझ्या आईचा चेहेरा यायचा आणि मग मी असं काही करणं अशक्य व्हायचं. मी दारू प्यायल्याचं आईला नुसतं कळलं, तर तेव्हड्यानंच तिला काही तरी होऊन बसलं असतं."

स्पर्धेबद्दलची कहाणी सांगताना लेखक टीममधल्या मुलांची व्यक्तिचित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. विषयातली भरपूर आणि अचूक माहिती असलेला, समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच स्वभावात उद्दामपणा आलेला टीमचा कॅप्टन रघुनाथ, रघुनाथ इतकीच माहिती असणारा पण आपलं म्हणणं दुसर्‍यासमोर न मांडू शकल्याने मागे पडणारा रोहन, 'वन मॅन आर्मी' असलेला पण मुखदुर्बळ प्रसाद, दोघांच्या भांडणात न बोलून शहाणे ठरणारे कुंटे आणि शेट्टे आणि आपल्या क्षमतांची आणि उणिवांची पुरेपुर जाणीव असणारा आणि एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटली की त्यात स्वतःला झोकून देणारा कथानायक हे सगळेच जण आपल्या अवतीभवती कुठे ना कुठे सापडायला लागतात.

ही संपूर्ण कहाणी सांगताना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता लेखकाने अचूकपणे टिपली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अश्याप्रकारच्या सांघिक स्पर्धांमध्ये भाग न घेतलेल्या वाचकांना
ह्या पुस्तकानिमित्त एक आगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन होतं तर अश्याप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले वाचक नकळत "अगदी अगदी !" अशी दाद देऊन जातात. पुस्तकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यात मांडललेलं सगळं अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याची सतत जाणिव होते आणि म्हणूनच पुस्तक फार जवळच वाटतं आणि आवडून जातं !

ब्लॉगर्स आणि त्यांचे मला आवडलेले ब्लॉग

त्याकाळी, म्हणजे २००५/२००६ साली मराठी ब्लॉगविश्व फारच छोटं होतं. (कदाचित त्यामुळेच ?) खूप छान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. ब्लॉग आवडले तर सांगायचे, नाही आवडले तर ते ही सांगायचे, कोणी थोडे दिवस नाही लिहिलं तर लगेच मेल, कमेंट्स मधून चौकश्या व्हायच्या. तेव्हा आज आहे तितका युनीकोडचा सर्रास वापर सगळ्या ठिकाणी होत नव्हता. ब्लॉग असला तरी त्यावर टाईप करायला बरहा वापरायला लागायचं. मला मराठी ब्लॉगविश्वाचा शोध अचानकच लागला होता. "मासा आणि मासोळी" हे मी तेव्हा वाचलेलं मराठी ब्लॉगवरच पहिलं पोस्ट. नंतर मी रेग्युलरली ब्लॉग्ज वाचायला लागलो. काही काही ब्लॉग्ज अगदी खूप लक्षात राहिले. नंतर ते परत परत वाचले गेले.

मधे एकदा बोलता बोलता विषय निघाला तेव्हा परत काही ब्लॉग पोस्ट शोधून काढले आणि वाचले. पुढच्यावेळी एकेठिकाणी सापडावे म्हणून लिंक्स एकत्र टाकतोय.

१. मराठी ब्लॉगविश्वातला माझा सगळ्यात आवडता ब्लॉग म्हणजे ट्युलिपचा ब्लॉग. ह्यातले बरेच पोस्ट्स माझे अक्षरशः शेकडो वेळा वाचून पाठ झाले आहेत ! त्यातल्या माझ्या आवडत्या काही पोस्टच्या लिंक्स.

- जोशी आणि जोशीण : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/09/blog-post_12.html
- मुंबईतला पाऊस : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post.html
- चारुलता, स्वारोव्स्की आणि सरत्या उन्हाळ्यातली एक संध्याकाळ.. : http://tulipsintwilight.blogspot.com/2007/10/blog-post.html
- पांथविराम उचलण्यापूर्वी : http://tulipsintw
ilight.blogspot.com/2007/05/blog-post.html
- सुंदरबन : Sundarban: http://tulipsintwilight.blogspot.com/2007/04/blog-post.html

२. मी वर म्हंटलं तसं मी वाचलेलं पहिलं पोस्ट (पामरच्या ब्लॉग वरचं) : मासा आणि मासोळी : http://paamar.blogspot.com/2005/09/blog-post.html

३. नंदनच्या 'मराठी साहित्य' ब्लॉगवरचे बरेचसे पोस्ट खूप वाचनीय आहेत. त्यातला सखाराम गटणेवरचा पोस्ट खूप लक्षात राहिला. नंतर तो इमेलवरुनही बराच फिरला होता.
http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html

४. संवेदचा पूर्ण ब्लॉगच खूप सही असतो. अगदी ब्लॉगच्या नावला शोभेल असा !
http://samvedg.blogspot.com/

५. त्या काळी अभिजीत बाठे हा ब्लॉगर खूप अ‍ॅक्टीव असायचा. हल्ली फारसं लिहित नाही बहूतेक तो.
त्याचा 'एक डाव भुताचा' (आयटमच भुत) हा पोस्टपण खूप आवडला होता.
http://abhijitbathe.blogspot.com/2007/03/blog-post.html.

६. गायत्रीचं 'समईच्या शुभ्र कळ्या' गाण्याचं रहग्रहण फार सुंदर आहे. सारेगमप मध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं सादर झालं तेव्हा मी हे पोस्ट काढून वाचलय. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html

७. केतन कुलकर्णीचा ब्लॉग पण मला फार आवडायचा. त्याचं लिखाणं खूप ड्रिमी असायचं.
त्यातलं हे एक पोस्ट आणि VOF चं प्रवासवर्णन आवडलं होतं. http://asach-aapla.blogspot.com/2008/08/post-50.html

८. संवादिनीचा ब्लॉग एकदम हलकाफुलका असायचा. त्यातली काही पोस्ट वाचून 'अगदी अगदी' असं म्हणावसं वाटायचं. त्यातले काही लक्षात राहिलेले पोस्ट.
जग्गू : http://samvaadini.blogspot.com/2008/01/blog-post.html
दिल्ली आणि नेलपॉलीश : http://samvaadini.blogspot.com/2008/06/blog-post_19.html
लग्न : http://samvaadini.blogspot.com/2009/01/blog-post_29.html ह्यातलं 'नविन सूनबाईंच विविध गूणदर्शन' वाचून फार हसलो होतो !!

९. विद्या भूतकरचा ब्लॉगही मी फॉलो करायचो. साधा सिंपल छान असायचा. http://vidyabhutkar.blogspot.com/

१०. अभिजीत कुलकर्णीचा ब्लॉगपण सही असायचा. पण त्याने तो आता डिलीट केला की काय माहित नाही. आता सापडत नाहिये. :|

पुढे ब्लॉगविश्वाशी संपर्क थोडा कमी झाला. आता परत ब्लॉग्ज वाचणं सुरु करायचं आहे. सध्याच्या "पिढीतल्या" आपल्या आवडत्या ब्लॉग्जच्या लिंक कोणी इथे टाकल्यास माझी काही हरकत नाही.

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना...

सध्या मायबोली संकेतस्थळावर महिला दिनाच्या शतकमोहोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत. मुख्य म्हणजे हे कार्यक्रम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांसाठी खुले ठेवले आहेत. ह्यापैकी एका कार्यक्रमात संयोजकांनी सगळ्यांना 'स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना' ह्या विषयावर आपले मनोगत मांडण्याचं आवाहन केलं होतं.
तर मी लिहिलेला परिच्छेद खाली देत आहे....
--------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर लिहायला बसल्यावर स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे विषयांबद्दल सर्वप्रथम कधी विचार केला होता हे आठवायचा प्रयत्न करत होतो.
वैयक्तिक पातळीवर बघायला गेलं तर आमच्या घरातल्या सर्वच स्त्रिया फार कर्तबगार आहेत. आज्जीने नाशिक सारख्या ठिकाणी साधारण १९३० च्या आसपास वयाच्या आठ-दहाव्या वर्षी पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आणि बक्षिसे मिळवून क्रांती घडवली होती. नंतरही आजोबांच्या आजारपणामुळे एकटीने निर्णय घेऊन, पैशांची सोय करून ७० च्या दशकात पुण्यात जमीन घेतली. घरातले सगळे व्यवहार वगैरे तिच बघत असे. माझी आई आमच्या कुटूंबातली पहिली डबल ग्रॅज्युएट सून म्हणून आज्जीला तिचे फार कौतुक. आईनेही २२ वर्ष नोकरी करून बाबांच्या बरोबरीने किंवा थोडेफार जास्तच सगळे व्यवहार संभाळणे, महत्त्वाचे निर्णय घेणे वगैरे सगळं केलं. पुढे वहीनी आणि माझी बायको ह्या मार्कांनुसार, मिळवलेली बक्षिसे, sincerity वगैरेंनुसार आमच्यापेक्षा जास्त हुषार आहेत असं कौतुक माझी आई करत असते आणि त्या दोघींचाही घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच पूर्ण सहभाग असतो. त्यामुळे घरातल्या स्त्रियांकडे बघता त्यांना कधी 'मुक्ती' वगैरेची गरज आहे असं वाटलच नाही (hopefully !) आणि आजुबाजूचं जग बघेपर्यंत ह्याची कधी जाणिवच झाली नाही. घरातल्या स्त्रियांना कधी त्रास झाला नसेल असं नाही (म्हणजे घरी लवकर ये, परिक्षा आहे तर बाहेर नको जाऊ, घरात आजारपण आहे तर दांडी मार वगैरे हे फक्त आईला किंवा आज्जीलाच सांगितलं गेलं, बाबांना नाही) पण त्या स्त्रिया आहेत म्हणून तो झाला ह्यापेक्षा हक्काच्या भावनेतून तो झाला असावा असं मला वाटतं.

नंतर खटकलेली अगदी जवळची तीन उदाहरणं आठवली. एकामध्ये सासरच्या अतिधार्मिक वातावरणामुळे मुळात तसा स्वभाव नसतानाही आयुष्यभर करावी लागणारी तडजोड होती. दुसर्‍यामध्ये दोन्ही मुली झाल्या म्हणून आयुष्यभर सासूने टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे प्रकार होते. तर तिसर्‍यामध्ये सुनेने साडीच नेसली पाहिजे, असच वागलं पाहिजे, तसच केलं पाहिजे वगैरे गोष्टी होत्या. ह्या तीनही उदाहरणांचा विचार करताना वाटलं की मला ह्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतय. पण त्यांना तसं वाटतय का ? त्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव आहे का? पाहिल्या दोन्ही उदाहरणांमधल्या स्त्रिया ह्या अत्ताच्या काळातल्या, भरपूर शिकलेल्या, उत्तम नोकरी करणार्‍या अश्या आहेत. पण जर सासरी असणार्‍या इतर काही चांगल्या गोष्टींमुळे अन्यायाची जाणीव असूनही त्यांना हा अन्याय दुय्यम वाटत असेल आणि त्यांची तडजोडीची तयारी असेल तर 'मुक्ती' मुळात हवी का?
हा सगळा विचार करायला लागल्यावर स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय ह्याबद्दलच डोक्यात गोंधळ झाला !
स्त्रियांची मुक्ती नक्की कोणापासून करायची ? पुरुषांपासून, इतर स्त्रियांपासून, संपूर्ण समाजापासून की अजून कश्यापासून ? म्हंटलं तर ह्या सगळ्यांपासूनच, म्हंटलं तर कश्यापासूनच नाही.

स्त्रीमुक्ती झाली असं नक्की कधी म्हणायचं ?
- अन्याय होत असेल तर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव होण्याइतपत जागरुकता समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये आलेली असेल. जेणेकरून होण्यार्‍या अन्यायाचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल आणि कुठलीच जाचक गोष्ट परंपरा म्हणून सुरु होणार नाही.
- नैसर्गिक वेगळेपण वगळता बाकी कोणतीही लेबलं न लावता स्त्रीला सर्वसाधारण माणूस म्हणून वागवलं जाईल. स्त्री आहे म्हणून अन्याय होणार नाही किंवा स्त्री आहे म्हणून वेगळे मानसन्मान मिळणार नाहीत.
तसच ज्या कारणासाठी स्त्री आणि पुरूष ही नैसर्गिक रचना आहे ते कारण वगळता इतर गोष्टीत एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यांने फरक पडणार नाही.
- स्त्रियांच्या स्त्रीत्त्वाचा वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून वापर केला जाणार नाही (शारीरीक/मानसिक त्रास देणे, स्त्री आहे म्हणून संधी नाकारणे, पगार कमी देणे इत्यादी) किंवा स्त्री स्वत:ही तसा वापर करणार नाही ('कॉर्पोरेट' पिक्चरमध्ये बिपाशा बासू जे करते त्यासारखं काही, घरातल्या जबाबदार्‍यांची खोटी कारणे सांगून काम टाळणे, emotional blackmailing सारखे प्रकार इत्यादी ).
- मुलगी झाली म्हणून घरात दु:ख होणार नाही किंवा उलट टोक म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस केले जाणार नाहीत.
- समाजातले पुरुष आणि स्त्रियांमधले प्रमाण निसर्गाद्वारे ठरवले जाईल, त्यात माणसाची ढवळाढवळ असणार नाही.
- संयुक्ता सारखे वेगळे गट स्थापन करायची, स्त्री मुक्ती वर लिखाण करायची, त्यासाठी आंदोलने करायची गरज पडणार नाही.

हे साध्य होणं ही एका दिवसातली गोष्ट नक्कीच नाही. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल ते वेगवेगळ्या संस्था करतच आहेत. पण मुळात mentality बदलण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी जे शक्य होईल प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. समाजप्रबोधन आणि घरातले संस्कार ह्या सगळ्यातल्या मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि थोडेफार सकारात्मक बदल हे येणार्‍या पिढ्यांमध्ये दिसतच आहेत. मुलांच्या समोर "पोरीचं/बायकांचं असच असतं.. त्यांना काही झेपत नाही.. त्यांच्याशी कसही वागलं तरी काय फरक पडतो" वगैरे वाक्य किंवा मुलींना "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही.." वगैरे फंडे देणं लहानपणापासूनच टाळलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाचाच व्यक्ती म्हणून आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे.

वीस वर्षापूर्वी घरातल्या भांडीवाल्या बाईचे जे प्रश्न होते तेच आजही आहेत ! आणि हे बदलणं शिक्षण समाजातल्या तळागाळात पोचलं तरच शक्य होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर आपण जे शिकतो, आचरतो ते अगदी प्रत्येकाने, प्रसंगी इतरांचा विरोध पत्करून, थोडाफार धोकाही पत्करून सार्वजनिक जिवनातही आचरणात आणले तर परिस्थितीत नक्कीच लवकर फरक पडेल.

"ओपन" अगासी...

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता. मग मायबोलीकर लालूने पुस्तक घेतल्याचं ती म्हणाली आणि अगासीच्याच गावाला म्हणजे लास-वेगसला आमची भेट होणार होती तेव्हा मी ते तिच्या कडून घ्यायचं ठरलं. लास-वेगस ला आम्ही भेटेपर्यंत तिचं ते वाचून झालं नाही आणि मीही नंतर त्याबद्दल विसरून गेलो. पण नंतर जेव्हा आमची डिसीत परत भेट झाली तेव्हा तिने ते आठवणीने मला दिलं. पुस्तक वाचल्यानंतर मात्र जर मी ते वाचलं नसतं तर मी एका चांगल्या पुस्तकाला आणि एका चांगल्या खेळाडूच्या खेळाबद्दल, एकंदरीत करीयर बद्दल मांडलेल्या दृष्टीकोनाला आणि अनेक उत्कंठावर्धक सामन्यांच्या (ज्यातले बरेच मी पाहिले देखील आहेत) वर्णनाला मुकलो असतो असं निश्चीतपणे वाटलं !!

आत्तापर्यंत मी वाचलेल्या खेळाडूंच्या चरित्र-आत्मचरित्रांमधलं हे सगळ्यात "anti-sports" म्हणता येईल असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती अगासीच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या विजयापासून, जो त्याने खेळलेला शेवटून दुसरा सामना होता. अमेरीकन ओपन स्पर्धेतला बघदातीस विरुध्दचा हा सामना जिंकत असूनही त्याने अनेकदा मनात विचार केला होता की हे सगळं एकदाचं संपू दे !! पुस्तक ह्या प्रकरणापासूनच इतकं पकड घेतं की आपण त्यातला घटना त्या जागी उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटायला लागतं.
अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या माईक अगासी नामक इराण्याच्या पोटी जन्मलेलं आंद्रे हे चौथं आणि सगळ्यात धाकटं अपत्य. माईक स्वतः ऑलिंपियन आहेत आणि आपल्या मुलांपैकी एकाला तरी टेनीसपटू करायचचं असं त्यांचं स्वप्न होतं. मोठ्या तिनही मुलांना त्यांनी टेनीसचे धडे द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्यामते मोठ्या तीनही मुलांमधे मुळातच 'किलर इंस्टींक्ट' चा अभाव होता. मात्र आंद्रेची गोष्ट वेगळी होती. हा मुलगा नक्की यशस्वी खेळाडू बनू शकेल ह्याची त्यांना खात्री वाटली आणि त्यांनी आपल्या बॅकयार्डात टेनीस कोर्ट आणि बॉल्सचा मारा करणारं ड्रॅगनच्या आकाराचं मशिन बनवलं. सात वर्षाचा आंद्रे रोज २००० ते २५०० बॉल्स मारून सराव करत असे. बॉल्सचा मारा करणारं ते मशिन हे आपलं सर्वात नावडतं खेळणं होतं आणि आजही ते आपल्या स्वप्नात येतं असं आंद्रे म्हणतो. एकूणच त्याला ते बालपण अजिबातच आवडलं नाही असं दिसतं. इतक्या लहान वयात बराच वेळ चालणारा सराव, सतात अंगावर खेकसणारे वडील, लास वेगसचं गरम हवामान आणि ते बॅकयार्ड हे त्याला कित्येकदा नकोसं व्हायचं आणि काही वेळापुरता का होईना ती प्रॅक्टीस थांबवण्यासाठी तो मुद्दाम बॉल बाहेर मारायचा. ह्याबद्दल अगासी म्हणतो, "The game I mastered was a prison, I spent some 30 years trying to escape and the first cell was the backyard court." इतर टेनीसपटूंच्या तुलनेत ऊचीने कमी असलेल्या आंद्रेला सर्व्हीसवर थोड्याफार मर्यादा येत असतं त्यामुळे वडिलांनी ह्याच कोर्टवर त्याच्या कडून रिटर्नचे धडे गिरवून घेतले. पुढे प्रतिस्पर्ध्याने केलेल्या घणाघाती सर्व्हिसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आंद्रे प्रसिध्द झाला आणि ते त्याचं महत्त्वाचं शक्तिस्थान झालं !
लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये आंद्रेने चांगली चुणूक दाखवली आणि पुढे त्या विभागातली जवळजवळ सर्व विजेतेपदं देखील मिळवली. एव्हडं झाल्यावर आता आणखी प्रगती व्हावी म्हणून वडिलांनी आंद्रेची रवानगी फ्लोरीडा मधल्या Bollettieri Academy मधे केली. ह्यालाही आंद्रे "glorified prison camp" म्हणतो. ह्या कँपमधले अनुभव लिहिताना तो म्हणतो, "The constant pressure, the cutthroat competition, the total lack of adult supervision — it slowly turns us into animals,”

ह्या कँपमधेही आंद्रेचा खेळ इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरला आणि संचालक निक, जो पुढे बरेच वर्ष त्याचा कोच होता, आंद्रेकडून कोणतीही फी न घेता तिथे रहायची परवानगी द्यायला तयार झाला. आंद्रेच्या हे खूपच मनाविरुध्द होतं कारण त्याला त्याचं घर, त्याचा मोठा भाऊ फिली, त्याचा जिवलग मित्र पेरी आणि मैत्रीण वेंडी ह्यांच्या शिवाय इथे रहाणं अजिबातच आवडत नव्हतं. टेनीस खेळणं मनापासून आवडत नसल्याने, तसेच मनाविरुध्द तिथे रहावं लागल्याने त्याने शाळेचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. निदान ह्यामुळेतरी आपल्याला इथून हाकलून देतील अशी त्याला आशा होती. पण झालं उलटच ! कोच निकने त्याचा सगळ्या मुलांसमोर अपमान केला आणि त्याला साफसफाई करणे, हॉस्टेल बाहेर न जाणे इत्यादी शिक्षा सुनावल्या. आंद्रेने नंतर निकशी कोणत्याही प्रकारे संवाद साधणं बंद केलं आणि एकदा निकच्या ऑफिसमधे त्याच्या सगळ्या संतापाचा स्फोट झाला. निकलाही आपल्या हातून हे रत्न घालवायचं नव्हतं कारण अगासी जितका जास्त जिंकेल तितकी त्याला आणि त्याच्या अ‍ॅकॅडमीला प्रसिध्दी आणि पैसा मिळणार होता. निकने आंद्रेच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि ही त्याची व्यवसायिक टेनीसपटू होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी होती. बंडखोरीची सुरुवात इथूनच झाली होती आणि हीच बंडखोर वृत्ती पुढे विंबल्डन मधे पांढरे कपडे घालायला लागतात म्हणून त्यावर बहिष्कार टाकणे, वडिल/शिक्षक नको सांगत असतानाही कानात डूल घालणे/ केस वाढवणे, टेनीसचा पोशाख म्हणून सहसा कोणी वापरत नसलेली डेनिम शॉर्ट्स वापरणे अश्या गोष्टींमधून आणि सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्याचं शक्तिस्थान ओळ्खून त्यावरच हल्ला चढवण्याच्या मनोवृत्तीतून दिसली.

आंद्रे ह्या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात राहिला. सुरुवातीच्या काळात त्याचा पोशाख, त्याचे केस, त्याचं काही स्पर्धांमधे भाग ने घेणं/ काही स्पर्धांमध्ये दरवर्षी भाग घेणं, पीट सँप्रस/जीम कुरीयर/मायकेल चँग ह्या त्याच्या समकालीन खेळाडूंनी त्याच्या आधी मिळवले ग्रँडस्लॅम विजेतेपद, त्याने एका कॅमेर्‍याच्या जाहिरातीत बोललेलं "Image is everything" हे वाक्य अश्या गोष्टींवरून पत्रकारांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली. तर नंतरच्या काळात ब्रूक शिल्ड आणि स्टेफी ग्राफ ह्यांच्याबरोबरचे प्रेम-संबंध, लग्न, ब्रूक बरोबर झालेला घटस्फोट ह्या वरून माध्यामांनी टिका केली. तर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात निवृत्ती कधी स्विकारणार हे विचारून किंवा निवृत्त होण्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे सांगून भंडावून सोडलं.

अगासी हा कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅमची विजेतेपदं आणि ऑलिंपीक सुवर्णपदक अशी दुर्मिळ कामगिरी करणारा टेनीसपटू आहे. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला साथ देणारी आणि मदत करणारी काही लोकं होती त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचा फिटनेस ट्रेनर गील. तो ट्रेनर बरोबरच त्याचा मित्र, बॉडीगार्ड, सल्लागार सर्वकाही होता. "Gil was standing there for me, as always" असं अगासी पुस्तकात बर्‍याचदा म्हणतो. सुरुवातीच्या काळात शारीरि़क क्षमता काहीशी कमी पडत असताना गील भेटल्याचा त्याला खूपच फायदा झाला. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना आणि तीन वेळेला ग्रँडस्लॅम विजेता झालेला असताना तो अचानक फॉर्म हरवून बसला आणि त्याची अधोगती होत तो क्रमवारीतही बराच घसरला त्यात त्याचा कोच निक त्याला सोडून गेला. पुढे तो ड्रग्जसेवनाच्या सवयीलाही बळी पडला. परंतु ह्यातून सावरून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने आणि त्याचे मित्र, गील आणि नविन कोच ह्यांच्या मदतीने पुन्हा अग्रस्थानी पोचला. ह्या प्रवासादरम्यान त्याने जिंकलेल्या, खेचून आणलेल्या अनेक सामन्यांची अतिशय सुरस वर्णनं पुस्तकात येतात !

पुस्तक वाचायला सुरुवात करायच्या आधी मला काही काही गोष्टींबद्दल अगासीने काय लिहिलय हे वाचायची खूप उत्सुकता होती. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पीट सँप्रस आणि त्याची स्पर्धा. पुस्तकात पीटचा पहिला उल्लेख येतो तो "My next game was lined up with a kid named Pete something.. Sampras I think.." असा. :) ग्रँडस्लॅमचा बर्‍याच अंतिम सामन्यांमधे पीट ने अगासीला हरवलं आणि तरीही त्यांच्यामधली स्पर्धा ही नेहमीच निखळ स्पर्धा राहिली आणि त्याचा प्रत्यय पुस्तकातून पण मिळतो. अगासीच्या मते पीटसाठी टेनीस हे सर्वस्व होतं आणि तो प्रामाणिकपणे पण जिद्दीने खेळत असे आणि त्यासाठी पीट बद्दल अगासीला आदर वाटतो. ह्या उलट कुरीयर, बेकर, कॉनर्स ह्या खेळाडूंबरोबर त्याचे संबंध कधीच चांगले नव्हते. एकाच अ‍ॅकॅडमीत असून अगासीमधल्या उपजत गुणांमूळे आपल्याला दुय्यम वागणूक मिळते ह्या कारणाने कुरियर चिडलेला असायचा तर बेकरचे आणि त्याचे बर्‍याचदा खटके उडायचे. विंबल्डनच्या एका उपांत्य फेरी मधे बेकर जिंकूनही बेकरने पत्रकार परिषदेत अगासीला संयोजकांकडून आपल्यापेक्षा वरची वागणूक मिळाल्याची तक्रार केली. मिडीयानेही ती उचलून धरली. ह्या वर चिडून अगासी आणि त्याच्या कोचने "summer of revenge" जाहिर केला आणि बेकरला त्या उन्हाळ्यातल्या सगळ्या स्पर्धांमधे तसच युएस ओपन मधेही हरवलं. अगासीचा कारकिर्दीतला शेवटचा सामना बेंजामीन बेकर नावाच्या नवोदीत खेळाडूबरोबर झाला. बोरीस बेकरच्या आणि त्याच्यातल्या तेढीचा संदर्भ देऊन तो म्हणतो, "How is it possible that my final opponent is a guy named B.Becker?" :)

दुसरी एक गोष्ट जी मी पीटच्या पुस्तकात वाचली होती, त्याबद्दल अगासीचं मत. १९९० च्या युएस ओपन मधे अगासी वि पीट अशी फायनल होऊन त्यात पीट जिंकला होता. उपांत्य फेरीत पोचलेल्या तीन अमेरीकन खेळाडूंपैकी एकाला प्रेसिडेंट बुश फोन करणार होते. पीट जिंकलेला असूनही त्यांनी अगासीला फोन केला होता. नेहमीप्रमाणे कुठल्याही वादात न पडता पीटने "माझा फोन त्यावेळी बंद होता" असं पत्रकारांना सांगितलं होतं. ह्या घटनेबद्दल अगासीचं मत मला जाणून घ्यायचं होतं पण त्याबद्दल पुस्तकात काहीच उल्लेख दिसत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे १९९६ च्या अटलांटा ऑलिंपीक मधे अगासीला सुवर्ण पदक मिळालं होतं आणि त्यात त्याचा उपांत्य फेरीचा सामना लिएंडर पेस बरोबर झाला होता. मला त्याचं लिएंडर बद्दलच मत वाचायचं होतं. अगासी ह्या सामन्या बद्दल लिहीतो, "He's a flying jumping bean, a bundle of hyperkinetic energy, with the tour's quickest hands. Still, he's never learned to hit a tennis ball. He hits off speed, hacks, chips, lobs - he's the Brad of Bombay. Then, behind all his junk, he flies to the net and covers so well that it all seems to work. After an hour you feel as if he hasn't one ball cleanly and yet he's beating you soundly. Because I am prepared, I stay patient, stay calm, and beat Paes 7-6, 6-3."

जोडीदार आपल्या क्षेत्रातला असावा की नसावा ह्याबद्दल बर्‍याच ठिकाणी चर्चा चालू असतात. अगासीच्या गोष्टीतही हा मुद्दा दिसतो. ब्रूक शिल्डची आणि त्याची क्षेत्रं पूर्णपणे वेगळी. सुरुवातीचे "छान-छान" दिवस गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांचे प्रश्न, मित्रमैत्रीणी, कामातल्या अडचणी, आनंदाच्या/यशाच्या कल्पना हे सगळच समजून घेणं अवघड जाऊ लागलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. ह्या उलट स्टेफीची आणि त्याची प्रेम काहाणी सुरु झाली तीच विंबल्डन दरम्यान. ती स्पर्धा स्टेफीची शेवटची विंबल्डन स्पर्धा ठरली पण त्यांनी त्या स्पर्धेत एकत्र सराव केला होता. स्टेफीला व्यावसायीक टेनीसपटूच्या आयुष्यातल्या समस्या, ताण-तणाव, आनंदाचे क्षण व्यवस्थित माहित असल्याने तीने नेहमीच आंद्रेला योग्य ती साथ दिली. अर्थात टेनीस मधे दोघांनीही सुमारे १५ ते २० वर्ष काढलेली असल्याने आपल्या मुलांसाठी बॅकयार्डात टेनीस कोर्ट न बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. :)

ह्याच संदर्भात एक गमतीदार प्रसंग अगासीने पुस्तकात सांगितला आहे. आंद्रे आणि स्टेफीच्या लग्नाच्या काही दिवस आधी स्टेफीचे वडिल, पीटर, आंद्रेच्या वडिलांना भेटायला लास-वेगसला गेले होते. त्यांना तेव्हा आंद्रेच्या सरावासाठी बनवलं गेलेलं सुप्रसिध्द ड्रॅगन मशिन पण बघायचं होतं. पीटर म्हणजे माईक अगासी ह्यांचं जर्मन रूप आहे. स्टेफीला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ड्रॅगन मशिनचा उपयोग समजून घेण्यासाठी त्यांनी आंद्रेला बॉल मारायला सांगितले आणि आंद्रेच्या वडिलांकडे दुर्लक्ष करून ते आंद्रेला त्याने कोणता शॉट मारायला हवा होता हे सांगायला सुरुवात केली. ७ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या आपल्या मुलाला दुसर्‍या कोणी येऊन धडे द्यावे हे माईकला अजिबातच आवडलं नाही आणि त्यातून सुरु झालं ते जोरदार भांडण ! ह्या बद्दल अगासी लिहितो,
"The two men can't understand each other and yet they're managing a heated argument. My father comes around the net shouting. The slice is bullshit ! If Stefanie had this shot, she would been better off. He then demonstrated two-handed backhand he taught me. With this shot, my father says, Stefanie would have won thirty-two slams ! Occasionally I hear Peter mentioning my rivals, Pete and Rafter, and then my father responds with Stefanie's nemeses, Monica Seles and Lindsey Davenport." नवरा-बायको होऊ घातलेल्या दोन स्टार खेळाडूंचे वडिल आणि एकेकाळचे गुरु असे कोर्टवर भांडत असताना आंद्रेची काय अवस्था झाली असेल ह्या विचाराने हसू येतं. :)

मध्यंतरी सेरेनाचं विल्यम्सचं पुस्तक वाचलं होतं, त्याआधी पीटचं वाचलं होतं. सेरेना(आणि व्हिनस सुध्दा), पीट आणि आता आंद्रे, स्टेफी ह्या सगळ्या बड्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. ह्या सगळ्यांमधे गुणवत्ता अर्थातच आहे. पण त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी ती गुणवत्ता ओळ्खून आणि दुरदृष्टीने त्यांची केलेई घडण हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण असू शकेल का ?

आंद्रेने पुस्तकात सांगितलेली स्वतःच्या आयुष्याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे, त्याचबरोबर अतिशय प्रामाणिक आहे. ड्र्ग्ज प्रकरणापासून सगळ्या गोष्टी काहीही हातच राखून न ठेवता आपल्या चाहत्यांना सांगून टाकल्या आहेत हे जाणवतं पण काही गोष्टी इतक्या नाट्यमय रितीने खरोखरच घडल्या असतीला का की त्या नाट्यमय रितीने आपल्या समोर मांडण्याचं श्रेय पुस्तकाचा Ghost writer J.R. Moehringer ह्याला द्यावं असा प्रश्नही पडतो.
पण एकंदरीत पुस्तक संपल्यावर "Hats off to this great player !!!! " अशी वाचकाची अवस्था होते हे मात्र नक्की. :)

वेगे वेगे धावू

इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही. लांबपल्ल्याच्या शर्यतींमधे भाग घेता यायचा नाही कारण तेवढा स्टॅमिना नव्हता. नंतर "तू बारीक आहेस त्यामुळे ट्रेडमिल करायची गरज नाही" असं जिममधे सांगितल्यामुळे कॉलेजमधे असताना तसेच ऑफिसमधल्या जिम मधे ट्रेड मिलच्या वाटेलाही गेलो नाही (आणि तेव्हा मी खरच बारीक होतो. ;) ). नंतर मग ट्रेडमिल करायची खरज गरज पडायला लागली आणि नियमीतपणे खेळणे, पोहणे ह्यामुळे स्टॅमिना वाढून २०-२५ मिनीटं पळणंही शक्य व्हायला लागलं.

इथे अटलांटात आल्यापासून तर घराच्या मागेच असलेल्या सुंदर ट्रेल मुळे आठवड्यातून २-३ वेळा तरी (मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात वगैरे वगैरे) पळणं व्हायला लागलं. स्टॅमिना वाढत होताच आणि पळणं तितकं बोर नाहिये असं वाटून त्यात रसही वाटायला लागला. त्यात आवडती गाणी आयपॉडवर असली तर पळण तितकं कष्टदायी पण वाटेनासं झालं.

हे सगळं आज आठवायचं आणि लिहायचं कारण म्हणजे नुकताच गेलेला "मॅराथॉन" विकएंड ! मागच्या वर्षी इथे ट्रेल वर धावायला सुरुवात केल्यावर आधी जरा बारीक होणे, मग रोजचं धावण्याचं अंतर वाढवणे, मग न चालता सलग पळणे असे काही-बाही गोल ठेवून स्वतःला धावतं ठेवलं होतं. त्यातच ऑफिसमधल्या कॉफी-रूम मधे ५ आणि १० किलोमिटर रनची एक जाहिरात चिकटवलेली दिसली. लगेच उत्साही मित्रमंडळींना तसेच ऑफिसमधल्यांना विचारून आम्ही टिम वगैरे फॉर्म केली. ऑफिसमधल्या एका कलीगने खूपच प्रोत्साहन दिलं. तो स्वत: अगदी पट्टीचा पळणारा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ५ किलोमिटर फारच किरकोळ होतं. ठरल्या-ठरल्या लगेच पैसे भरून टाकले जेणेकरून निदान भरलेल्या पैशांमुळे तरी कोणी रद्द करणार नाही. :) मग जोरदार प्रॅक्टीस सुरु केली. त्याचा उत्साहं पण बर्‍यापैकी टिकला. आणि पहिली ५ किलोमिटर रन ३० मिनीटांच्या आत पूर्ण करून स्वतःची पाठही थोपटून घेतली !

एक रेस पूर्ण केल्यानंतर उत्साहं तर वाढला होता पण वाढती थंडी, मधली भारत वारी, ऑफिसतले काम, लहान झालेला दिवस अश्या अनेक गोष्टींमुळे पळणं परत कमी झालं. मधे समिरचा लेख वाचून परत एकदा उत्साहाने पळणं सुरु केलं. तेव्हाच नेटसर्फिंग करत असताना जॉर्जिया मॅराथॉन २०१० ची वेबसाईट सापडली. समिरचा लेखाच्या प्रभावामुळे लगेहात हाफ मॅराथॉन साठी नाव नोंदवूनच टाकावं असं फार वाटत होतं पण दुसर्‍या दिवशी पळायला गेल्यावर ५ किलोमिटर साठी २९ च्या जागी ४० मिनीटे लागतायत ह्यावरून स्टॅमिनाची किती वाट लागली आहे हे लक्षात आलं ! त्यामुळे मग आपल्या लायकीला योग्य अश्या 5K रन साठीच नावं दिली. हाफ आणि फुल मॅराथॉन दुसर्‍या दिवशी असल्याने आपण भाग घेत नाही आहोत तर निदान वॉलेंटियर म्हणून जाऊ हा शिल्पाचा सल्ला मानून त्यासाठीही नावं नोंदवली. परत एकदा उत्साहाने तयारी सुरु केली. शिल्पा कुठल्याही स्पोर्ट्स इव्हेंट मधे पहिल्यांदाच भाग घेत असल्याने ती पण खूप उत्साहात होती. इथल्या नको झालेल्या हिवाळ्याचा कृपेने जमेल तसा सराव केला.

रेसच्या ठिकाणी सकाळी आपल्या इथे नरकचतुर्दशीला असतं तसं वातावरण होतं. सगळे अगदी उत्साहात sports accesories नी नटून-थटून तिथे आले होते. चांगली थंडी होती. ग्रँटपार्क वसंत ऋतुच्या फुलोर्‍याने मस्त फुललेलं होतं आणि स्पर्धकांनी गजबजलेलं होतं. ह्या स्पर्धेत साधारण ३००० स्पर्धक होते. आणि मुख्यत: जे दुसर्‍या दिवशी मॅराथॉन किंवा हाफ मॅराथॉन पळणार होते ते वॉर्म-अप रेस म्हणून आलेले होते. हा कोर्स चांगलाच चढ-उताराचा होता. धावताना एक वेळी "कशाला पैसे भरून स्वतःच्या जिवाला त्रास ! द्यावं सोडून" असा विचार जोरदार आला होता पण वेबसाईट वर म्हंटल्याप्रमाणे असा दिवस रोज येत नाही जेव्हा तुम्ही पळताय आणि आजुबाजूला अनेक लोकं टाळ्या वाजवतायत, तुमचं कौतुक करतायत, तुमचे फोटो काढतायत आणि रेस पूर्ण केल्यावर तुमचं अभिनंदन करयातय !! त्यामुळे उगाच येणारे निगेटिव्ह विचार बाजूला सारत ५ किलोमिटर अंतर मी ३२ मिनीटांत आणि शिल्पाने ५० मिनीटांत पूर्ण केलं. रेस झाल्यावर खूपच भारी वाटलं !!!!!!

आम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या मुख्य मॅराथॉनच्या दिवशी सकाळी ६:३० ला अटलांटा डाऊनटाऊन मधे हजर झालो. डाउनटाऊन अक्षरश: भरून वहात होतं. पहाटे पहाटे ऑलिंपीक पार्क मधे अगदी प्रसन्न वाटत होतं. खूपच मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा असल्याने सगळी अगदी चोख व्यवस्था होती. ह्या स्पर्धेत सुमारे १८००० स्पर्धक आणि ३००० स्वयंसेवक होते. आमची नेमणूक "फुड अँड बिवरेजेस अ‍ॅट फिनीश लाईन" ह्या टिम मधे होती. ह्यात रेस संपवून आलेल्या स्पर्धकांना हिट-शीट्स, पाणी, केळी, सफरचंद, ग्रॅनोलाबार, स्नॅक्स, दही ई गोष्टी वाटायच्या होत्या. कॅरोल नामक एक आज्जी आमची टिमलीडर होती आणि ह्या विभागात आम्ही साधारण ५० जणं होतो.

हाफ तसेच फुल मॅराथॉन एकाच वेळी सुरु झाल्याने साधारण तासभरातच स्पर्धक यायला लागले. सगळे जण त्यांच जोरदार स्वागत करत होते आणि त्यांना मेडल्स तसेच खाणं-पिणं देत होते. संयोजकांचा तसेच स्वयंसेवकांचा हा उत्साहं अगदी ६-७ तासांनंतरही तितकाच टिकून होता ! अगदी १५ वर्षांच्या मुलांपासून आज्जी-आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांमधले स्पर्धक होते. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर आनंदाबरोबरच लक्ष्य पूर्ण केल्याचं विलक्षण समाधान दिसत होतं. कितीतरी स्पर्धक आम्हालाच धन्यवाद देत होते की तुम्ही सगळे काम करयात म्हणून ही स्पर्धा पार पडत्ये ! इथे एकमेकांच्या अगदी लहान कामाबद्दल, यशाबद्दल कौतूक तसेच आदर व्यक्त करण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे त्याचच हे एक उदाहरण. कॅरोल अधे-मधे सगळी कडे हवं-नको बघून जात होती. अगदी प्रत्येक स्वयंसेवकाला तुम्ही कॉफी घेतली का? खाल्लं का वगैरे विचारून जात होती. तिथे अनेक स्वयंसेवक याआधी बर्‍याच ठिकाणी हे काम केलेल होते त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायलाही मजा आली. काही जणांची मुलं, नवरा/बायको, मित्र/मैत्रिणी स्पर्धक होते आणि त्यामुळे ते काम करायला आले होते तर काही जण "I have to return something to the sports !" ह्या भावनेतून काम करत होते. आम्ही साधारण ७ तास काम करून १ वाजता तिथून निघालो. त्यावेळी रेस अंतिम टप्प्यात होती आणि आवरा-आवरी पण सुरु झाली होती. नंतर थोडावेळ फिनीश लाईन पाशी उगीच थोडावेळ रेंगाळत राहिलो. स्पर्धकांपैकी कोणीच ओळखीचं नसूनही त्यांना रेस पूर्ण करताना बघून खूप छान वाटत होतं.

एकंदरीत एक खूप वेगळा आणि सुंदर अनुभव होता. आम्ही स्पर्धक म्हणून त्यात नसलो तरी कुठल्यातरी प्रकारे ह्या "घरच्या कार्यात" सहभागी होतो ह्याचं खूप समाधान वाटलं ! होपफुली आम्हीही कधीतरी हाफ/फुल मॅराथॉन मधे सहभागी होऊ, संयोजक आमच्या गळ्यात मेडल घालतील, लोकं आम्हाला चिअर करतील आणि मग आम्हीही स्वयंसेवकांना धन्यवाद देत "बिकॉजाफ यॉल.. वी आ रनिंग..." असं म्हणू शकू.. :)