भर पावसात कात्रज सिंहगड... !

कैलास मानस यात्रेच्या सरावासाठी म्हणून गेल्या २/३ महिन्यांपासून दर शनिवारी सिंहगडावर जायला सुरुवात केली होती. ज्याच्या बरोबर जातो तो मित्र उत्साही आहे, दांड्या मारत नाही शिवाय दोघच जण जात असल्याने फार फाटे फुटत नाही. त्यामुळे सलग ७ शविनार गेलो.  गड चढायचा प्रमुख उद्देश्य हा व्यायाम असल्याने भजी, झुणका भाकरी वगैरे गोष्टींसाठी आम्ही थांबत नाही. चढून झालं की पाच दहा मिनीटं थांबून त्याच पावली परत. त्यामुळे कोथरूडहून ५:१५ ला निघून आम्ही ८:३०/८:४५ ला घरीही परततो. सुरुवातीला भर उन्हाळा होता. नंतर हळूहळू हवा चांगली सुधारायला लागली. पावसाला सुरुवात झाल्यावर तर एकदम धमाल यायला लागली. एकदातर संपूर्णवेळ जोरदार पाऊस सुरू होता. वाटेवरून पाणी वहात होतं, एकदम पावसाळी सहलीचं वातावरण. नंतर शिल्पाचा भाऊ, सुहासही आमच्या बरोबर यायला लागला.

तश्यातच पुणे रनिंगच्या फेसबूक पानावर कात्रज ते सिंहगड ट्रेकींग स्पर्धेची जाहिरात वाचली. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तीन तीनच्या टीमने भाग घ्यायचा होता. आम्ही तिघे भाग घेऊ असं वाटत असतानाच सुहासने ऐनवेळी डिच दिला.. त्याची काहितरी ऑफिसची ट्रिप ठरली. नेमकं त्याच आठवड्यात मला ऑफिसमध्ये जोरदार काम आलं. मग गौतमने बरेच प्रयत्न करून तिसरा पार्टनर शोधला. ते आयोजक अगदी पूर्णपणे पुणेरी होते! त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस इतकी क्लिष्ट होती, आणि सगळी कागदपत्र प्रत्यक्ष येऊन दिली पाहिजेत अशी अट .. जग कुठे चाललय.. हे काय करतायत.. पण ते असो.  परत गौतमनेच बरीच फाईट मारून ते काम केलं.

ट्रेकच्या दिवशी सकाळी छान रिमझीम पाऊस होता.. मधेच थांबतही होता. सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजे कात्रज बोगद्याच्या वर एकदम उत्साही वातावरण होतं.  सुमारे ४०० लोकं होते. ७ ला ट्रेक सुरु झाल्यावर काही जण उत्साहात पळतच सुटली! ह्य रूटवर साधारण तेरा टेकड्या आहेत. पहिलीच टेकडी चांगली दणदणीत आहे. पळत सुटलेले लोक लवकरच ढेपाळले. आम्हाला डोंगर चढायची सवय झालेली असल्याने हा पहिला डोंगर फार अवघड गेला नाही. चढून तर गेलो पण उतरताना फार वाट लागली. कारण चिखल ! जवळजवळ सगळेच जण घसरगुंडी करत होते. ट्रेकला चांगले आणि सुयोग्य  बुट असणं किती गरजेचं असतं ह्याची खात्री त्या उतारावर पटली. रूटवर अधेमधे चेक पॉईंट होते. प्रत्येक ठिकाणचे स्वयंसेवक अतिशय चांगले होते आणि नीट बोलत होते. आधीच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध ! ह्या चेक पॉईंटला तिघेही असल्या शिवाय ते पुढे जाऊ देत नव्हते. त्यात आमच्या तिसर्‍या पार्टनरला फार काही सराव नव्हता त्यामुळे मी आणि गौतम चेक पाँईटला जाऊन उभं रहायचो मग तो मागून यायचा. थोड्या टेकड्या पार केल्यानंतर सिंडगड दिसायला लागला पण मधे अजून काही टेकड्या होत्या. आणि प्रत्येकवेळी भला मोठा उतार उतरायचा आणि मग तेव्हडाच मोठा चढ चढायचा असा प्रकार होता. एकंदरीत स्टॅमिना, गुडघे आणि बुटांचा चांगलाच कस लागला. शेवटचा चेक पॉईंटवर उकडलेली अंडी, एनर्जी ड्रिंक्स वगैरे होते. मुख्य संयोजक तिथे उपस्थित होते. त्यांना आमचा रजिस्ट्रेशनचा अनुभव सांगितला. त्यांनी आमचे आक्षेप साफ फेटाळले आणि असं होऊच शकत नाही वगैरे वगैरे मतं मांडली.. (पुन्हा पुणेरीपणा !) पण आम्हीही आमचे मुद्दे सोडले नाहीत. पण आम्हांला अजून आतकरवाडी गावापर्यंत पोहोचायचं असल्याने चर्चा आवरती घेत पुढे निघालो. आपल्याकडे ही स्पर्धा, मॅरेथॉन शर्यती वगैरे गोष्टी सुरु झालेल्या आहेत ही खरोखरच खूपच चांगली गोष्ट आहे पण अजून म्हणावी तितकी व्यवसायिकता त्यात आलेली नाही हे मात्र नक्की.

आतकरवाडी गावात म्हणजे सिंहगड पायथ्याशी, उतरणारा शेवटचा उतार हा आत्तापर्यंतच्या सगळ्या उतारांचा बाप होता. इतकी प्रचंड घसरडी वाट की ह्या वाटेवर आत्ता ट्रेक ठेवलाच कसा असा मला प्रश्न पडला. माझे कैलास मानससाठी घेतलेले चांगले बूट असल्याने कमी त्रास झाला पण बर्‍याच जणांचे खूप हाल झाले. घसरगुंड्या करून करून लोकांच्या ट्रॅकपँटची अक्षरशः चाळणी झाली. अखेर आम्ही आतकरवाडी आवात पोहोचलो अआणि तिथे वाहत्या ओढ्यात हात (आणि पाय) धुवून घेतले. हे सगळं होईपर्यंत ४ वाजले मग शेवटची  सिंहगडाची चढाई सोडून देऊन आम्ही टमटम पकडून घरी परतलो.

हिरव्यागार डोंगरांवर भर पावसात हा ट्रेक करायला खूप धमाल आली. वातावरण इतकं सुंदर होतं की ते अनुभवताना फोटो काढण्याचं डोक्यातही आलं नाही आणि आलं असतं तरी ते फारसं शक्यही झालं नसतं. आता एकदा पौर्णिमेच्या रात्री करायचा विचार आहे. बघू कसं काय जमतय ते. सध्या चालू असलेल्या ट्रेकींग फॅडमधला एक उपक्रम पार पडला!