नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०२० हे सर्वाथाने अत्यंत विचित्र वर्ष होतं! पूर्वी कधीही न अनुभवलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षात घडल्या. महायुद्धाची झळ न पोहोचलेल्या आमच्या पिढीला युध्यसदृष्य परिस्थिती काय असू शकते ह्याची चुणूक ह्या निमित्ताने बघायला मिळाली. घरात अडकून पडावं लागणं,  प्रवासाचे बेत रद्द होणं, शाळा बंद होणं, रनिंग/सायकलींग इत्यादींचे कार्यक्रम रद्द होणं वगैरे त्रास झाला पण अनेकांना नोकरीवर गदा येणे, धंदा तात्पुरता बंद करावा लागणे, स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तींना करोनाची लागण होणे ह्या सारखे आयुष्य बदलून टाकणारे त्रास सोसावे लागले! अशी वेळ पुन्हा कधीही कोणावरही न येवो अशी प्रार्थनाच आपण फक्त करून शकतो. घरात अडकून पडल्यामुळे वाचन, टिव्ही, मालिका, खेळांचे सामने हे मात्र बरच बघून झालं.  गेल्या दोन वर्षांप्रमाणेच ह्या वर्षीही गेल्या वर्षी वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल.

डॉ. नारळीकरांनी लिहिलेलं व्हायरस नावाचं पुस्तक वाचलं. ते टीआयआरएफ मध्ये असताना संचालक पदाच्या निवडीवरून झालेल्या नाट्याबद्द्ल त्यांनी आत्मचरित्रात मोघम लिहिलं होतं. त्याबद्दल सविस्तर त्यांनी ह्या कादंबरीत कथेचा भाग म्हणून लिहिलं आहे असं एक मित्र म्हणाला होता. त्यामुळेही हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. १९९६ साली ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. भारतात तेव्हा इंटरनेट घरोघरी पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे नेटवर्क, इंटरनेट वगैरेंबद्दलची वर्णनं एकदम बेसिक स्वरूपातली आहेत. एकंदरीत कथा चांगली आहे फक्त मी वर म्हटलेला भाग त्या कथेत नसता तरी काही फरक पडला नसता असं वाटलं. 'व्हायरस' ही नुसती कथा म्हणूनही वाचायला आवडलं असतं.

बर्‍याच दिवसांपासून यादीत असलेलं 'स्मृतिचित्रे' वाचलं. इंग्रजीचा अजिबात प्रभाव नसलेली भाषा आणि साधी सरळ, "आहे हे असं आहे" (किंवा "होतं हे असं होतं") छाप वर्णनाची शैली ह्यामुळे आवडलं. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं एकदम वास्तव चित्रण आहे पण त्यात कुठलीही बाजू न घेतल्याने किंवा आवेश आणून न लिहिल्याने अजून चांगलं वाटतं. 'मांगिण', 'ब्राह्मणीण' असे जातिवाचक शब्द वापरणं तेव्हा एकदम कॉमन असावं. शिवाय स्पृश्यास्पृश्यता असूनही खेडेगावात सलोख्याचं वातावरण असे कारण त्या त्या नियमांमध्ये राहून लोकं अडीअडचणीला एकमेकांना मदत करत, आनंदाचे क्षण साजरे करत हे वाचून आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं की गावात अधिक कडक आणि कटटरता असेल. लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या विचारातं झालेल्या बदलांबद्दल सविस्तर लिहिलं आहे पण मुळात टिळकांनी ख्रिस्ती धर्म का स्विकारला ह्या मागची कारणं सविस्तर येत नाहीत (किंवा मला नीट कळली नसावी). बाकी टिळकांचं असं आवेगपूर्ण आणि धरसोड वागणं बघता त्यांनी संसार कसा केला असेल कोण जाणे. पुस्तक एकदम संपल्यासारखं वाटलं. कदाचित जेव्हडं लिहून तयार होतं तेव्हडं प्रकाशित केलं असं काहितरी असावं.

मिलिंद बोकील लिखित 'गवत्या' वाचलं. मिलिंद बोकीलांच्या पुस्तकांमधली निसर्गाची वर्णनं आणि गोष्ट सांगायची शैली हे नेहमीच आवडतं. गोष्टींमध्ये वर्णन केलेली परिस्थिती वास्तववादी असते पण अतिवास्तवावादी आणि त्यामुळे उगीच आव आणलेली नसते. शिवाय त्यांची भाषाशैली खूपच आवडते. ह्या ही पुस्तकात निसर्गाची अतिशय सुंदर वर्णनं आणि त्या अनुषंगाने नायकाच्या मनस्थितीची वर्णनं आहे. गावातली माणसं आणि दृष्य मस्त उभी केलेली आहेत. आनंदच्या पूर्वायुष्यातली प्रेमकहाणी अतिशय संयतपणे कुठेही ड्रामॅटीक न करता मांडली आहे. अधेमधे कथानायकाची लांबलचक स्वगतं येतात पण ती कंटाळवाणी होत आहेत की काय असं वाटायला लागेपर्यंत संपतात! पुस्तकाचा विषय बघता 'कोसला'ची आठवण झालीच पण पुस्तकातल्या एकंदरीत सकारात्मक सुरामुळे आणि मुख्य म्हणजे सकारात्मक शेवटामुळे कोसलापेक्षा मला हे पुस्तक जास्त आवडले. 

राम पटवर्धन ह्यांनी अनुवाद केलेलं 'पाडस' वाचलं. पुस्तकातली 'गोष्ट' खूप सुंदर आहे! ज्योडी, मा, पेनी, बक आणि पाडस सगळी पात्र मस्त रंगवली आहेत. फक्त मला अनुवाद करताना वापरलेली भाषा खूप कृत्रिम वाटली. मुळच्या इंग्रजी भाषेचं मराठीकरण न करता जसंच्या तसं अनुवादित केलेलं आहे. उदा. "अरे ज्योडी, त्या सदगृहस्थाला आत तरी येउ दे" हे अगदी Let the gentleman come in ह्याचं शब्दशः भाषांतर आहे. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ सुरुवातील न कळाल्याने दृष्य डोळ्यासमोर उभं रहायला अडचण वाटली. उदा. 'तक्तपोशी' हा शब्द मी बहुतेक याआधी ऐकलेला नव्हता. भाषांतर जुनं आहे म्हणायचं तर नुकत्याच वाचलेल्या त्यापूर्वीच्या 'स्मृतीचित्रे' मध्येही अशी भाषा नाहीये. हे मला पहिल्या अर्ध्या भागात जास्त जाणवलं नंतर बहुतेक सवय झाली. मायबोलीवरही 'पाडस' हा मराठीतला सर्वोत्कृष्ठ अनुवाद आहे अश्या कमेंट वाचल्या आहेत. मला तरी तसं वाटलं नाही किंवा मग माझ्या बुद्धीचा दोष. आधी म्हटलं तसं गोष्ट मस्त आहे. त्यामुळे पुस्तक आवडलं. मुळ इंग्रजी पुस्तक शोधून वाचेन.

यंदाच्या लॉकडाऊनचा फायदा म्हणजे बर्‍याच दिवसांपासून वाचायचं राहिलेलं  माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅप्टन 'स्टिव्ह वॉ'चं 'आऊट ऑफ माय कंफर्ट झोन' हे आत्मचरित्र हे पुस्तक वाचलं.  ह्या ७००+ पानी ठोकळ्यात एक सामान्य क्रिकेटपटू ते ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन अशा प्रवासाचं वर्णन वाचायला खूप मस्त वाटतं. पाहिलेल्या बर्‍याच मॅचेस, स्पर्धा, दौरे ह्यांची वर्णन वाचायला आवडलच पण त्याच बरोबर ऑस्ट्रेलियन संघाच्या जडणघडणीचं पण सविडणीचं पण सविस्तर वर्णन येतं. फक्त स्टीव्ह वॉ स्वतःला तसेच बाकी ऑस्ट्रेलियन खेळाडू, अंपायर्स, इतर पदाधिकारी ह्यांना फारच "साधं" / "सभ्य" दाखवतो आणि तसे ते अजिबात नव्हते. दौर्‍यावर येणार्‍या प्रत्येक संघांबरोबर काही ना काही विवादास्पद घटना घडल्या होत्या आणि त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची वागणूक अजिबात धुतल्या तांदळाजोगी नव्हती. ह्या पुस्तकातला सगळ्यात मजेदार भाग कुठला असेल तर तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाच्या २००१ च्या भारत दौर्‍यादरम्यानच्या कलकत्ता कसोटीतला ऑस्ट्रेलियाचा पराभव! पराभूत कॅप्टन कडून त्या सामन्याचं तसेच एकंदरीत ह्या दौर्‍यादरम्यान सौरव गांगुली ह्या भारतीय कर्णधाराच्या खडूसपणाचं वर्णन ऐकताना मनात अगदी आनंदाची कारंजी वगैरे उडाली. ह्या पुस्तकाती प्रस्तावना दस्तुरखुद्द राहूल द्रविडने लिहिलेली आहे. आता 'फॅब-४' भारतीय खेळाडूंपैकी फक्त त्याचच आत्मचरीत्र यायचं बाकी आहे आणि ते वाचायची खूप उत्सुकता आहे !  

२०२० मध्ये याआधी न वाचलेल्या इंग्रजी लेखकाचं किमान एक पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. वर्षाच्या सुरूवातीला जॉन ग्रिशमचं एक आणि वूडहाऊसची दोन अशी पुस्तकं आणली होती. तिनही पुस्तकांनी पकड घेतली नाही आणि मग ते राहूनच गेलं. मध्यंतरी  मायबोलीवर अगाथा ख्रिस्ती फॅन क्लब ही चर्चा दिसली. तो वाचून आणि मग लायब्ररीतून अगाथा ख्रिस्तीचं 'अ मर्डर इज अनाऊन्स्ड' हे पुस्तक मिळेपर्यंत वर्षाचा शेवटचा आठवडा उजाडला. अखेर हे पुस्तक परवा वाचायला घेतलं आणि काल वाचून संपलं. नावावरून समजतय त्याप्रमाणे 'मर्डर मिस्ट्री' आहे. टिपीकल ब्रिटिश व्यक्तिरेखा, सेट-अप आणि भाषा वाचायला छान वाटतं.  लोकांनी लिहिलं तसं पहिली पंचवीस तीस पानं प्रचंड बोअर झाली पण नंतर इतकी भारी पकड आली की बसं. हे पुस्तक आवडलच आता तिची बाकीची प्रसिद्ध पुस्तकंही वाचेन.

खालिद हुसैनीचं "And the mountains echoed" वाचलं. बर्‍याच दिवसांपासून वाचायचं होतं. ह्याच लेखकाच्या पहिल्या दोन पुस्तकांइतकं नाही आवडलं. सुमारे ६० वर्ष इतक्या मोठ्या कालावधीत घडणारी कथा अफगाणीस्तान, पॅरीस, सॅन फ्रँसिस्को आणि ग्रीस अश्या विविधं ठिकाणी घडते. दुसर्‍या महायुद्धापासून ते तालिबानोत्तर कालावधी एव्हड्या सगळ्या राजकीय कालखंडाचे संदर्भ येत रहातात. मुख्य कथानक चांगलं आहे पण अधेमधे नवीन नवीन पात्र येतात आणि त्यांची उपकथानकं सुरू होतात. त्यांचा मुख्य कथेही संबंध काय हे कळायला बरीच पानं खर्ची पडतात. काही धागे चांगले गुंफले आहेत पण काही उपकथानकं इतकी सविस्तर नसती तर काहीही फरक पडला नसता असं वाटतं. पुस्तकाच्या उत्तरार्धात सुरू झालेलं एक कथानक वाचता वाचता मला चक्क झोपच लागली आणि ते संपल्यावर "बरं मग?" असा प्रश्न पडला. विशेषतः ग्रीसमध्ये घडलेले प्रसंग तर केवळ पानं भरायला लिहिले आहेत की काय असं वाटलं. काईट रनरमध्ये अफगाणिस्तानातल्या निसर्गाचंही बरच वर्णन आहे. तसं ह्यात फारसं नाहीये. नेहमी प्रमा़णे पात्र आणि त्यांच्यातले संबंध छान फुलवले आहेत. लहान बहीण भावाचं गाणं आणि पुस्तकाचं नाव ज्यावरून स्फुरलं त्या कवितेबद्दल लेखकाने थोडक्यात लिहिलं आहे, ते वाचायला चांगलं वाटलं. एकंदरीत खालीद हुसैनीचं पण डॅन ब्राऊन सारखं होणार की काय असं वाटलं.

रियाच्या बारश्याच्या वेळेला विकत घेतलेलं कविता महाजन लिखित 'कुहू' नावाचं पुस्तक वाचलं. ही एक रूपक कथा आहे. ही मराठीतली पहिली 'मल्टीमिडीया' कादंबरी. सुंदर रंगित प्रिटींग, हाताने काढलेली चित्रं आणि बरोबर येणारी सिडी. ह्या सिडीत हे पुस्तक ऑडीयो बूक प्रकारात आहे आणि पुस्तक वाचनाबरोबर मागे जंगलातले आवाज प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेले आहेत. एकदंरीत पहिला प्रयोग म्हणून एकदम मस्त आहे!.

मकरंद साठे लिखित 'गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी' हे पुस्तक वाचले. गार्डन ऑफ इडन ही पुण्याबाहेरील एक उच्चभ्रु वसाहत. ह्याच्या आवारात असलेल्या साई मंदिरामुळे ह्याला लोकं साई सोसायटी असं म्हणायला लागतात. पुस्तकातली कथा ही ह्या वसाहतीत रहाणार्‍या लोकांसंबधी किंवा थेट त्या वसाहतीसंबंधी नाही पण तरीही कथेचा ह्या वसाहतीशी संबंध आहे. सहा पात्रे आणि त्यांची पूर्वायुष्ये ह्यांबद्दल सांगत मुळ कथा पुढे सरकते आणि शेवटी सगळे धागे एकत्र गुंफले जातात. हे पुस्तक वाचताना मला काही ठिकाणी 'दंशकाल'ची आठवण झाली. फक्त हे पुस्तक दंशकाल इतकं भडक नाहीये. 'दंशकाल' वाचतना मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे चालू कथानकात मध्येच एखादं पिल्लू सोडून देऊन त्याचा पुढे मोठा संदर्भ येतो. ह्यातही थोडसं तसं आहे फक्त ह्यात लेखक अगदी स्पष्टपणे सांगतो की ह्याबद्दलचे आणखी तपशील पुढे येतीलच पण आत्तापुरतं एव्हडं माहिती असू द्या. बाकीच्याची आत्ता गरज नाही. ( म्हणजे ११ वीच्या फिजीक्समध्ये इंटीग्रेशनचा संदर्भ आला की तेव्हा सांगायचे आत्तापुरतं एव्हड फक्त माहिती असू द्या, पुढच्या वर्षी इंटीग्रेशन शिकलात की नीट कळेल.. तसं काहितरी! ) अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे कथेतले सगळे काळाचे संदर्भ भारतातल्या राजकीय, सामाजिक घटनांच्या संदर्भाने येतात (म्हणजे गांधीहत्येच्या एक वर्षानंतर, शिख हत्याकांडाच्या सुमारास, मोदी सरकार निवडुन आलं तेव्हा वगैरे. कथा सांगता सांगता भारतातल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दलही भाष्य येतं फक्त त्यातून अधेमधे (स्युडो)सेकुलिरीजम डोकावतं पण ते असो. एकंदरीत कादंबरीतली 'कथा', सांगण्याची शैली आणि शेवटची गुंफण ह्यामुळे वाचायला आवडली. ह्यावर 'ल्युडो' किंवा 'बेबेल' टाईलचा सिनेमा निघू शकेल.

पुढच्या वर्षीच्या वाचन 'विशलिस्ट'मध्ये विशेष काही घातलेलं नाहीये. नुकतेच हाती पडलेले थोडे फार दिवाळी अंक, त्यांच्याचबरोबर मागवलेला मिलिंद बोकीलांचा 'पतंग'  नावाचा कथासंग्रह, हॅरी पॉटर सिरीजमधली उरलेली पुस्तकं (सध्या फक्त दीड पुस्तक वाचून झालय. रिया खूपच पुढे गेलीये!), अगाथा ख्रिस्तीची अजून काही पुस्तकं आणि घरात असलेली पण न वाचलेली इतर काही मराठी पुस्तकं हे वाचायचं आहे. स्टिव्ह वॉने आपल्या आत्मचरित्रात त्याच्या संघाच्या कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लिश संघाबद्दल फारसं बरं लिहिलेलं नाहीये. त्यामुळे मला एखाद्या स्मकालिन इंग्लिश क्रिकेटपटूचं आत्मचरित्र वाचायचं होतं. अगदी समकालिन नसला तरी माजी इंग्लिश कर्णधार आणि नुकताच राणीच्या हस्ते 'सर' पदवी देऊन गौरवल्या गेलेल्या अ‍ॅलिस्टर कूकचं पुस्तक मागवलं आहे. बघू किती वाचून होतय. एकवेळ थोडं कमी वाचून (आणि पाहून) झालां तरी चालेल पण पुन्हा हे लॉक डाऊन आणि महामारीचं संकट नको!

सगळ्यांना नववर्षाच्या खूप शुभेच्छा ! २०२१ हे २०२० पेक्षा बरं जावो!