झिम्मा - आठवणींचा गोफ

          मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात. पहिल्याने केलेल्या खुर्च्या पाहून खुष होतात आणि सगळ्या खुर्च्या लगोलग विकत घेऊन टाकतात. नंतर बेटाच्या दुसर्‍या बाजुला जातात आणि तिथे असलेलं शिल्प पाहून निश:ब्द होतात. पुढे अनेक जण ते शिल्प पहायला येऊ लागतात आणि त्या बेटाला शिल्पकाराचं म्हणजे दुसर्‍या मित्राचं नाव दिलं जातं. गोष्टीचं तात्पर्य काय तर अगदी गरज असेल तेव्हाच आणि तेव्हड्याच खुर्च्या बनवाव्या पण त्यात अडकून न पडता निरंतर टिकणारं शिल्प बनवायचा ध्यास घ्यावा. ही गोष्ट अगदी लक्षात राहिली आणि ती सांगणार्‍या प्रमुख पाहुण्या विजया मेहेताही! त्या आधी विजया मेहेतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता. पुढे 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ह्यांनी विजया बाईंचं नाव आदराने घेऊन, त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं. थोड्याच दिवसात विजया बाईंच आत्मचरित्र 'झिम्मा' प्रकाशित होणार अशी बातमी आली आणि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या ते घेऊन वाचायचं हे ठरवून टाकलं.

          'झिम्मा - आठवणींचा गोफ' अश्या शीर्षकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना बाई आधी वाचकांना शुभेच्छा देतात!!! तर शेवटी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच, प्रेक्षक आणि त्या स्वतः अश्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरे आणि संस्थांची संचालकपदे अश्या बर्‍याच गोष्टी. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मोठच काम. पण नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या बाजात सांगितलेल्या घटना उत्सुकता कायम ठेवतात. हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहेता चार टप्प्यांमध्ये लिहिलं आहे. ह्यातलं 'विजया मेहेता' हे त्यांचं आजचं रुप. आणि म्हणून बाकीच्या तिघींबद्दल तृतीय पुरुषी एकवचनात लिहिलं आहे. स्वतःच्या गतरुपांकडे असं त्रयस्थ नजरेने पहाणं मला फार आवडलं.

          विजया बाईंच्या बालपणीच्या म्हणजे बेबीच्या गोष्टी सुरस आहे. जयवंत परिवाराच्या मोठ्या कुटुंबकबिल्याची आणि बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्तींची वर्णनं येतात. भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं आपल्या डोळ्यासमोर त्या जागा उभ्या करतात. पुढे पुढे नाटकांच्या नेपथ्यांबद्दलचीही अशी वर्णनं वाचून न कळत आपण तो रंगमंच डोळ्यासमोर बघायला लागतो आणि बाईंनी वर्णन केलेल प्रवेश रंगमंचावर कसे घडत असतील ह्याची कल्पना करायला लागतो.

          विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ. बाई म्हणतात संपूर्ण भारतात ह्या काळात एक सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या, जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या, नवनवे कलाकार उदयाला येत होते आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट होती. ह्या सगळ्याचच छोटखानी रूप म्हणजे भुलाबाई इंस्टिट्युट. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या आणि त्यांना घडवण्यात ह्या इमारातीचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे चित्रपट माध्यमात काम करायला लागल्यावर 'वास्तू बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात.; असं बाईंचं ठाम मत पडलं त्याची सुरुवातही कदाचित भुलाबाई इंस्टिट्युट पासुन झाली असावी.

          विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास पुढील भागात उलगडतो. सुरुवातीच्या काळात पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका 'रंगायन'ने केल्या. बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची तसेच प्रशासकाची जडणघडण ह्या भागांमध्ये पहायला मिळते. दिग्दर्शनाही विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाततचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेले काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत. वयाने आणि अनुभवाने तुलनेने तरूण दिग्दर्शिकेने पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसाख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेले पाहून बाईंच्या ठाम विचारांचे आणि धैर्याचे कौतूक वाटते.

          भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटके भारतात तसेच जर्मनीत केली. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मित्र जोडले. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावे आपले माहेरच वाटू लागली. ह्या सगळ्या प्रकल्पांदरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत. शांकुतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी नाट्यप्रशिक्षण घेतले. तिथले अनुभव, तिथे पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत. रंगायन बंद पडल्यानंतर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं परंतु ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता 'लोकमान्य' रंगभुमी म्हणायचं ठरवलं. ह्या लोकमान्य रंगभूमीवर बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक अजोड नाटकं दिली. इतके वेगवेगळे विषय! ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल. प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींदरम्यान लागलेल्या ठेचांबद्दल बाईंनी अगदी विस्ताराने लिहिलेलं आहे. पुस्तकामधला लोकमान्य रंगभूमीबद्दलचा हा भाग मला सर्वात जास्त आवडला. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो.

          पुढे दुरर्शनकरता काही कार्यक्रमांवर तसचं काही चित्रपटांवर बाईंनी काम केलं. त्यांच्याच काही नाटकांचं रुपांतर चित्रपटांमध्ये केलं. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये कसे बदल केले, कुठला भाग माध्यम बदलामुळे जास्त खुलला, कुठला भाग नीट झाला नाही ह्यांबद्दलची माहिती पण छान आहे. ह्या माध्यमांमध्ये तुलना जरूर केली आहे पण आमचं जुनं तेच सोनं असा सुर कुठेही जाणवला नाही. पुस्तकातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? असा प्रश्न पडतो. एव्हड्या मोठ्या कारकिर्दीत बाईंना अनेक जण भेटले. भेटलेल्या मंडळीबरोबर आलेले चांगले अनुभव लिहिलेले आहेतच पण खटकलेल्या गोष्टी उदा. तेंडूलकरांबरोबर तुटलेली युती, भक्ती बर्वेंचा खटकेलेला अभिनय, नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद, वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग इ. कुठलीही सनसनाटी निर्माण न करता पुस्तकात नमुद केलेल्या आहेत. स्वतःच्या चुकाही कबूल करण्यात बाईंना काहीही कमीपणा वाटलेला नाही, एव्हडचं काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे. मी आधी वाचलेल्या चरित्र/आत्मचरित्रांच्या तुलनेत वैयक्तिक आयुष्याबद्दल जरा कमी लिहिलय का काय असं वाटलं पण कला/व्यवसाय ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं असताना, वैयक्तिक आयुष्याबद्दल कोण कशाला सांगेल असंही वाटलं.

          पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का? सध्या काही कलाकार मंडळी जुनी नाटकं नव्या संचात परत रंगभुमीवर आणण्याचे उपक्रम करत आहेत. बाईंची तसेच इतरही गाजलेली नाटकं मिळतील तितकी पाहून घ्यायची असं हे पुस्तक वाचल्यावर ठरवलं आहे. त्यावेळच्या प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळायची ती अनुभूती नाहीसुद्धा मिळणार कदाचीत, पण मिळतं आहे तितकं तरी बघुन घ्यायचं ठरवलय!

-----------------------------------------------------------------------------------------------------------
          'झिम्मा' नुकतच वाचून संपवलं. बाईंच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की त्याबद्दलच्या पुस्तकाचं परिक्षण/ परिचय/रसग्रहण माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पुस्तक वाचून संपल्यावर जे मनात आलं ते लिहिलय. अनेक जण सध्या 'झिम्मा' वाचत आहे. त्यांनाही पुस्तक वाचल्यावर काय वाटलं हे वाचायला नक्की आवडेल.

पुन्हा पळापळी...

परवा परत एकदा 'रन'मध्ये भाग घेतला.. जवळ जवळ दिड वर्षांनी. पण यंदा मात्र भारतात.. पुण्यात. परत आल्यावर बरीच गडबड सुरु होती. पुणे मॅरॅथॉम साधारण डिसेंबरमध्ये असते हे माहित होतं. त्यामुळे सप्टेंबरपासून वेबसाईट चेक करत होतो पण ती नोव्हेंबरपर्यंत अपडेट झालीच नाही. शेवटी मॅरॅथॉनभवनला फोन करून विचारलं आणि नाव नोंदणी सुरु झाल्याझाल्या लगेच १० किलोमिटर स्पर्धेत नोंदणी केली. हाफ मॅरॅथॉनची तयारी करणं शक्य नव्हतं आणि वेळही नव्हता. यंदा घरी पण सगळ्यांना उत्साहं होता. शिल्पाने डॉक्टरांना विचारून ३.५ किलोमिटरमध्ये नाव नोंदवलं त्यांच्याबरोबर वहिनी, नीरज आणि निशांतनेही नोंदवलं. दादाने हो-नाही करता करता शेवटी १० किलोमिटरमध्ये नाव दिलं. शिल्पाची भावंड श्वेता, अमित आणि सुहासपण १० किलोमिटरमध्ये भाग घ्यायला तयार झाले आणि आमची फॅमिली रनच झाली! एकंदरीत रेस बरी झाली. रूट चांगला होता. फार चढ उतार नव्हते. खंडूजी बाबा चौक ते बंड गार्डन व्ह्याया लक्ष्मी रोड, सेव्हन लव्हज चौक, एमजी रोड असा मार्ग होता. १० के मला साठी ७० मिनिटं लागली. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ! व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला अधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या. मधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्‍या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या. पेठांमध्ये बरीच पुणेरी मंडळी हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी पळणार्‍यांकडे बघत उभी होती. एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स. कारण सकाळी फारशी वर्दळ नव्हती आणि वहानंही नव्हती. मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. एरवी पादचार्‍यांना न जुमानणार्‍या पुणेरी ट्रॅफिककडे तुच्छ कटाक्ष टाकत पळायला फारच मजा येत होती ! २७वी स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्‍यांच्या मधेमधे वहाने येत होती. ३.५ किमी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं. २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता !!!! तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. ! (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... !! आमच्या ग्रुपमध्येही असा एक सुपरमॅन होता. :) अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट का नाही कोण जाणे. पळापळी असलं की छान असतं. आधी बरेच दिवस तयारीत जातात आणि नंतर परिक्षा संपल्यासारखं वाटून स्वतःचे लाड करून घेता येतात. २ पाच के, २ हाफ मॅरॅथॉन आणि आता तिसर्‍या १० के नंतर फुल मॅरॅथॉन करायची खूप इच्छा आहे. पण ४२ किलोमिटर करायची मानसिक आणि शारिरीक तयारी कशी आणि कधी होणार काय माहित ! एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली !!! -------------------------------------------------------------------------------------------------------------- परवा एका पार्टीत ब्लॉगर स्नेहा भेटली. मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरत असताना आम्ही जे काही ब्लॉगर नियमीतपणे लिहायचो त्यातली एक स्नेहा. त्या वेळचे ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्यांच्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. अनेकांच्या अनेक पोस्ट्सची उजळणी करून झाली. दोघांनीही एकमेकांना 'इतक्यात ब्लॉगवर काहीच का लिहिलं नाहीस?' असा प्रश्न विचारला...उत्तर माहित असूनही. :) परवा पळापळी झालीच होती. आदल्या दिवशी जुन्या ब्लॉग्जची उजळणीही झाली होती. त्यामुळे ब्लॉगवरची धुळ झटकायला निमित्त मिळालं. मस्त वाटतय एकदम इथे लिहून. शिवाय २०१२चं वर्ष ब्लॉगवर एकही पोस्ट न पडून भाकड जाता जाता वाचलं! त्याबद्दल थॅंक्न स्नेहा. :)