"ओपन" अगासी...

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता. मग मायबोलीकर लालूने पुस्तक घेतल्याचं ती म्हणाली आणि अगासीच्याच गावाला म्हणजे लास-वेगसला आमची भेट होणार होती तेव्हा मी ते तिच्या कडून घ्यायचं ठरलं. लास-वेगस ला आम्ही भेटेपर्यंत तिचं ते वाचून झालं नाही आणि मीही नंतर त्याबद्दल विसरून गेलो. पण नंतर जेव्हा आमची डिसीत परत भेट झाली तेव्हा तिने ते आठवणीने मला दिलं. पुस्तक वाचल्यानंतर मात्र जर मी ते वाचलं नसतं तर मी एका चांगल्या पुस्तकाला आणि एका चांगल्या खेळाडूच्या खेळाबद्दल, एकंदरीत करीयर बद्दल मांडलेल्या दृष्टीकोनाला आणि अनेक उत्कंठावर्धक सामन्यांच्या (ज्यातले बरेच मी पाहिले देखील आहेत) वर्णनाला मुकलो असतो असं निश्चीतपणे वाटलं !!

आत्तापर्यंत मी वाचलेल्या खेळाडूंच्या चरित्र-आत्मचरित्रांमधलं हे सगळ्यात "anti-sports" म्हणता येईल असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती अगासीच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या विजयापासून, जो त्याने खेळलेला शेवटून दुसरा सामना होता. अमेरीकन ओपन स्पर्धेतला बघदातीस विरुध्दचा हा सामना जिंकत असूनही त्याने अनेकदा मनात विचार केला होता की हे सगळं एकदाचं संपू दे !! पुस्तक ह्या प्रकरणापासूनच इतकं पकड घेतं की आपण त्यातला घटना त्या जागी उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटायला लागतं.
अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या माईक अगासी नामक इराण्याच्या पोटी जन्मलेलं आंद्रे हे चौथं आणि सगळ्यात धाकटं अपत्य. माईक स्वतः ऑलिंपियन आहेत आणि आपल्या मुलांपैकी एकाला तरी टेनीसपटू करायचचं असं त्यांचं स्वप्न होतं. मोठ्या तिनही मुलांना त्यांनी टेनीसचे धडे द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्यामते मोठ्या तीनही मुलांमधे मुळातच 'किलर इंस्टींक्ट' चा अभाव होता. मात्र आंद्रेची गोष्ट वेगळी होती. हा मुलगा नक्की यशस्वी खेळाडू बनू शकेल ह्याची त्यांना खात्री वाटली आणि त्यांनी आपल्या बॅकयार्डात टेनीस कोर्ट आणि बॉल्सचा मारा करणारं ड्रॅगनच्या आकाराचं मशिन बनवलं. सात वर्षाचा आंद्रे रोज २००० ते २५०० बॉल्स मारून सराव करत असे. बॉल्सचा मारा करणारं ते मशिन हे आपलं सर्वात नावडतं खेळणं होतं आणि आजही ते आपल्या स्वप्नात येतं असं आंद्रे म्हणतो. एकूणच त्याला ते बालपण अजिबातच आवडलं नाही असं दिसतं. इतक्या लहान वयात बराच वेळ चालणारा सराव, सतात अंगावर खेकसणारे वडील, लास वेगसचं गरम हवामान आणि ते बॅकयार्ड हे त्याला कित्येकदा नकोसं व्हायचं आणि काही वेळापुरता का होईना ती प्रॅक्टीस थांबवण्यासाठी तो मुद्दाम बॉल बाहेर मारायचा. ह्याबद्दल अगासी म्हणतो, "The game I mastered was a prison, I spent some 30 years trying to escape and the first cell was the backyard court." इतर टेनीसपटूंच्या तुलनेत ऊचीने कमी असलेल्या आंद्रेला सर्व्हीसवर थोड्याफार मर्यादा येत असतं त्यामुळे वडिलांनी ह्याच कोर्टवर त्याच्या कडून रिटर्नचे धडे गिरवून घेतले. पुढे प्रतिस्पर्ध्याने केलेल्या घणाघाती सर्व्हिसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आंद्रे प्रसिध्द झाला आणि ते त्याचं महत्त्वाचं शक्तिस्थान झालं !
लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये आंद्रेने चांगली चुणूक दाखवली आणि पुढे त्या विभागातली जवळजवळ सर्व विजेतेपदं देखील मिळवली. एव्हडं झाल्यावर आता आणखी प्रगती व्हावी म्हणून वडिलांनी आंद्रेची रवानगी फ्लोरीडा मधल्या Bollettieri Academy मधे केली. ह्यालाही आंद्रे "glorified prison camp" म्हणतो. ह्या कँपमधले अनुभव लिहिताना तो म्हणतो, "The constant pressure, the cutthroat competition, the total lack of adult supervision — it slowly turns us into animals,”

ह्या कँपमधेही आंद्रेचा खेळ इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरला आणि संचालक निक, जो पुढे बरेच वर्ष त्याचा कोच होता, आंद्रेकडून कोणतीही फी न घेता तिथे रहायची परवानगी द्यायला तयार झाला. आंद्रेच्या हे खूपच मनाविरुध्द होतं कारण त्याला त्याचं घर, त्याचा मोठा भाऊ फिली, त्याचा जिवलग मित्र पेरी आणि मैत्रीण वेंडी ह्यांच्या शिवाय इथे रहाणं अजिबातच आवडत नव्हतं. टेनीस खेळणं मनापासून आवडत नसल्याने, तसेच मनाविरुध्द तिथे रहावं लागल्याने त्याने शाळेचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. निदान ह्यामुळेतरी आपल्याला इथून हाकलून देतील अशी त्याला आशा होती. पण झालं उलटच ! कोच निकने त्याचा सगळ्या मुलांसमोर अपमान केला आणि त्याला साफसफाई करणे, हॉस्टेल बाहेर न जाणे इत्यादी शिक्षा सुनावल्या. आंद्रेने नंतर निकशी कोणत्याही प्रकारे संवाद साधणं बंद केलं आणि एकदा निकच्या ऑफिसमधे त्याच्या सगळ्या संतापाचा स्फोट झाला. निकलाही आपल्या हातून हे रत्न घालवायचं नव्हतं कारण अगासी जितका जास्त जिंकेल तितकी त्याला आणि त्याच्या अ‍ॅकॅडमीला प्रसिध्दी आणि पैसा मिळणार होता. निकने आंद्रेच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि ही त्याची व्यवसायिक टेनीसपटू होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी होती. बंडखोरीची सुरुवात इथूनच झाली होती आणि हीच बंडखोर वृत्ती पुढे विंबल्डन मधे पांढरे कपडे घालायला लागतात म्हणून त्यावर बहिष्कार टाकणे, वडिल/शिक्षक नको सांगत असतानाही कानात डूल घालणे/ केस वाढवणे, टेनीसचा पोशाख म्हणून सहसा कोणी वापरत नसलेली डेनिम शॉर्ट्स वापरणे अश्या गोष्टींमधून आणि सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्याचं शक्तिस्थान ओळ्खून त्यावरच हल्ला चढवण्याच्या मनोवृत्तीतून दिसली.

आंद्रे ह्या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात राहिला. सुरुवातीच्या काळात त्याचा पोशाख, त्याचे केस, त्याचं काही स्पर्धांमधे भाग ने घेणं/ काही स्पर्धांमध्ये दरवर्षी भाग घेणं, पीट सँप्रस/जीम कुरीयर/मायकेल चँग ह्या त्याच्या समकालीन खेळाडूंनी त्याच्या आधी मिळवले ग्रँडस्लॅम विजेतेपद, त्याने एका कॅमेर्‍याच्या जाहिरातीत बोललेलं "Image is everything" हे वाक्य अश्या गोष्टींवरून पत्रकारांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली. तर नंतरच्या काळात ब्रूक शिल्ड आणि स्टेफी ग्राफ ह्यांच्याबरोबरचे प्रेम-संबंध, लग्न, ब्रूक बरोबर झालेला घटस्फोट ह्या वरून माध्यामांनी टिका केली. तर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात निवृत्ती कधी स्विकारणार हे विचारून किंवा निवृत्त होण्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे सांगून भंडावून सोडलं.

अगासी हा कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅमची विजेतेपदं आणि ऑलिंपीक सुवर्णपदक अशी दुर्मिळ कामगिरी करणारा टेनीसपटू आहे. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला साथ देणारी आणि मदत करणारी काही लोकं होती त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचा फिटनेस ट्रेनर गील. तो ट्रेनर बरोबरच त्याचा मित्र, बॉडीगार्ड, सल्लागार सर्वकाही होता. "Gil was standing there for me, as always" असं अगासी पुस्तकात बर्‍याचदा म्हणतो. सुरुवातीच्या काळात शारीरि़क क्षमता काहीशी कमी पडत असताना गील भेटल्याचा त्याला खूपच फायदा झाला. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना आणि तीन वेळेला ग्रँडस्लॅम विजेता झालेला असताना तो अचानक फॉर्म हरवून बसला आणि त्याची अधोगती होत तो क्रमवारीतही बराच घसरला त्यात त्याचा कोच निक त्याला सोडून गेला. पुढे तो ड्रग्जसेवनाच्या सवयीलाही बळी पडला. परंतु ह्यातून सावरून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने आणि त्याचे मित्र, गील आणि नविन कोच ह्यांच्या मदतीने पुन्हा अग्रस्थानी पोचला. ह्या प्रवासादरम्यान त्याने जिंकलेल्या, खेचून आणलेल्या अनेक सामन्यांची अतिशय सुरस वर्णनं पुस्तकात येतात !

पुस्तक वाचायला सुरुवात करायच्या आधी मला काही काही गोष्टींबद्दल अगासीने काय लिहिलय हे वाचायची खूप उत्सुकता होती. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पीट सँप्रस आणि त्याची स्पर्धा. पुस्तकात पीटचा पहिला उल्लेख येतो तो "My next game was lined up with a kid named Pete something.. Sampras I think.." असा. :) ग्रँडस्लॅमचा बर्‍याच अंतिम सामन्यांमधे पीट ने अगासीला हरवलं आणि तरीही त्यांच्यामधली स्पर्धा ही नेहमीच निखळ स्पर्धा राहिली आणि त्याचा प्रत्यय पुस्तकातून पण मिळतो. अगासीच्या मते पीटसाठी टेनीस हे सर्वस्व होतं आणि तो प्रामाणिकपणे पण जिद्दीने खेळत असे आणि त्यासाठी पीट बद्दल अगासीला आदर वाटतो. ह्या उलट कुरीयर, बेकर, कॉनर्स ह्या खेळाडूंबरोबर त्याचे संबंध कधीच चांगले नव्हते. एकाच अ‍ॅकॅडमीत असून अगासीमधल्या उपजत गुणांमूळे आपल्याला दुय्यम वागणूक मिळते ह्या कारणाने कुरियर चिडलेला असायचा तर बेकरचे आणि त्याचे बर्‍याचदा खटके उडायचे. विंबल्डनच्या एका उपांत्य फेरी मधे बेकर जिंकूनही बेकरने पत्रकार परिषदेत अगासीला संयोजकांकडून आपल्यापेक्षा वरची वागणूक मिळाल्याची तक्रार केली. मिडीयानेही ती उचलून धरली. ह्या वर चिडून अगासी आणि त्याच्या कोचने "summer of revenge" जाहिर केला आणि बेकरला त्या उन्हाळ्यातल्या सगळ्या स्पर्धांमधे तसच युएस ओपन मधेही हरवलं. अगासीचा कारकिर्दीतला शेवटचा सामना बेंजामीन बेकर नावाच्या नवोदीत खेळाडूबरोबर झाला. बोरीस बेकरच्या आणि त्याच्यातल्या तेढीचा संदर्भ देऊन तो म्हणतो, "How is it possible that my final opponent is a guy named B.Becker?" :)

दुसरी एक गोष्ट जी मी पीटच्या पुस्तकात वाचली होती, त्याबद्दल अगासीचं मत. १९९० च्या युएस ओपन मधे अगासी वि पीट अशी फायनल होऊन त्यात पीट जिंकला होता. उपांत्य फेरीत पोचलेल्या तीन अमेरीकन खेळाडूंपैकी एकाला प्रेसिडेंट बुश फोन करणार होते. पीट जिंकलेला असूनही त्यांनी अगासीला फोन केला होता. नेहमीप्रमाणे कुठल्याही वादात न पडता पीटने "माझा फोन त्यावेळी बंद होता" असं पत्रकारांना सांगितलं होतं. ह्या घटनेबद्दल अगासीचं मत मला जाणून घ्यायचं होतं पण त्याबद्दल पुस्तकात काहीच उल्लेख दिसत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे १९९६ च्या अटलांटा ऑलिंपीक मधे अगासीला सुवर्ण पदक मिळालं होतं आणि त्यात त्याचा उपांत्य फेरीचा सामना लिएंडर पेस बरोबर झाला होता. मला त्याचं लिएंडर बद्दलच मत वाचायचं होतं. अगासी ह्या सामन्या बद्दल लिहीतो, "He's a flying jumping bean, a bundle of hyperkinetic energy, with the tour's quickest hands. Still, he's never learned to hit a tennis ball. He hits off speed, hacks, chips, lobs - he's the Brad of Bombay. Then, behind all his junk, he flies to the net and covers so well that it all seems to work. After an hour you feel as if he hasn't one ball cleanly and yet he's beating you soundly. Because I am prepared, I stay patient, stay calm, and beat Paes 7-6, 6-3."

जोडीदार आपल्या क्षेत्रातला असावा की नसावा ह्याबद्दल बर्‍याच ठिकाणी चर्चा चालू असतात. अगासीच्या गोष्टीतही हा मुद्दा दिसतो. ब्रूक शिल्डची आणि त्याची क्षेत्रं पूर्णपणे वेगळी. सुरुवातीचे "छान-छान" दिवस गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांचे प्रश्न, मित्रमैत्रीणी, कामातल्या अडचणी, आनंदाच्या/यशाच्या कल्पना हे सगळच समजून घेणं अवघड जाऊ लागलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. ह्या उलट स्टेफीची आणि त्याची प्रेम काहाणी सुरु झाली तीच विंबल्डन दरम्यान. ती स्पर्धा स्टेफीची शेवटची विंबल्डन स्पर्धा ठरली पण त्यांनी त्या स्पर्धेत एकत्र सराव केला होता. स्टेफीला व्यावसायीक टेनीसपटूच्या आयुष्यातल्या समस्या, ताण-तणाव, आनंदाचे क्षण व्यवस्थित माहित असल्याने तीने नेहमीच आंद्रेला योग्य ती साथ दिली. अर्थात टेनीस मधे दोघांनीही सुमारे १५ ते २० वर्ष काढलेली असल्याने आपल्या मुलांसाठी बॅकयार्डात टेनीस कोर्ट न बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. :)

ह्याच संदर्भात एक गमतीदार प्रसंग अगासीने पुस्तकात सांगितला आहे. आंद्रे आणि स्टेफीच्या लग्नाच्या काही दिवस आधी स्टेफीचे वडिल, पीटर, आंद्रेच्या वडिलांना भेटायला लास-वेगसला गेले होते. त्यांना तेव्हा आंद्रेच्या सरावासाठी बनवलं गेलेलं सुप्रसिध्द ड्रॅगन मशिन पण बघायचं होतं. पीटर म्हणजे माईक अगासी ह्यांचं जर्मन रूप आहे. स्टेफीला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ड्रॅगन मशिनचा उपयोग समजून घेण्यासाठी त्यांनी आंद्रेला बॉल मारायला सांगितले आणि आंद्रेच्या वडिलांकडे दुर्लक्ष करून ते आंद्रेला त्याने कोणता शॉट मारायला हवा होता हे सांगायला सुरुवात केली. ७ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या आपल्या मुलाला दुसर्‍या कोणी येऊन धडे द्यावे हे माईकला अजिबातच आवडलं नाही आणि त्यातून सुरु झालं ते जोरदार भांडण ! ह्या बद्दल अगासी लिहितो,
"The two men can't understand each other and yet they're managing a heated argument. My father comes around the net shouting. The slice is bullshit ! If Stefanie had this shot, she would been better off. He then demonstrated two-handed backhand he taught me. With this shot, my father says, Stefanie would have won thirty-two slams ! Occasionally I hear Peter mentioning my rivals, Pete and Rafter, and then my father responds with Stefanie's nemeses, Monica Seles and Lindsey Davenport." नवरा-बायको होऊ घातलेल्या दोन स्टार खेळाडूंचे वडिल आणि एकेकाळचे गुरु असे कोर्टवर भांडत असताना आंद्रेची काय अवस्था झाली असेल ह्या विचाराने हसू येतं. :)

मध्यंतरी सेरेनाचं विल्यम्सचं पुस्तक वाचलं होतं, त्याआधी पीटचं वाचलं होतं. सेरेना(आणि व्हिनस सुध्दा), पीट आणि आता आंद्रे, स्टेफी ह्या सगळ्या बड्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. ह्या सगळ्यांमधे गुणवत्ता अर्थातच आहे. पण त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी ती गुणवत्ता ओळ्खून आणि दुरदृष्टीने त्यांची केलेई घडण हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण असू शकेल का ?

आंद्रेने पुस्तकात सांगितलेली स्वतःच्या आयुष्याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे, त्याचबरोबर अतिशय प्रामाणिक आहे. ड्र्ग्ज प्रकरणापासून सगळ्या गोष्टी काहीही हातच राखून न ठेवता आपल्या चाहत्यांना सांगून टाकल्या आहेत हे जाणवतं पण काही गोष्टी इतक्या नाट्यमय रितीने खरोखरच घडल्या असतीला का की त्या नाट्यमय रितीने आपल्या समोर मांडण्याचं श्रेय पुस्तकाचा Ghost writer J.R. Moehringer ह्याला द्यावं असा प्रश्नही पडतो.
पण एकंदरीत पुस्तक संपल्यावर "Hats off to this great player !!!! " अशी वाचकाची अवस्था होते हे मात्र नक्की. :)

वेगे वेगे धावू

इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही. लांबपल्ल्याच्या शर्यतींमधे भाग घेता यायचा नाही कारण तेवढा स्टॅमिना नव्हता. नंतर "तू बारीक आहेस त्यामुळे ट्रेडमिल करायची गरज नाही" असं जिममधे सांगितल्यामुळे कॉलेजमधे असताना तसेच ऑफिसमधल्या जिम मधे ट्रेड मिलच्या वाटेलाही गेलो नाही (आणि तेव्हा मी खरच बारीक होतो. ;) ). नंतर मग ट्रेडमिल करायची खरज गरज पडायला लागली आणि नियमीतपणे खेळणे, पोहणे ह्यामुळे स्टॅमिना वाढून २०-२५ मिनीटं पळणंही शक्य व्हायला लागलं.

इथे अटलांटात आल्यापासून तर घराच्या मागेच असलेल्या सुंदर ट्रेल मुळे आठवड्यातून २-३ वेळा तरी (मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात वगैरे वगैरे) पळणं व्हायला लागलं. स्टॅमिना वाढत होताच आणि पळणं तितकं बोर नाहिये असं वाटून त्यात रसही वाटायला लागला. त्यात आवडती गाणी आयपॉडवर असली तर पळण तितकं कष्टदायी पण वाटेनासं झालं.

हे सगळं आज आठवायचं आणि लिहायचं कारण म्हणजे नुकताच गेलेला "मॅराथॉन" विकएंड ! मागच्या वर्षी इथे ट्रेल वर धावायला सुरुवात केल्यावर आधी जरा बारीक होणे, मग रोजचं धावण्याचं अंतर वाढवणे, मग न चालता सलग पळणे असे काही-बाही गोल ठेवून स्वतःला धावतं ठेवलं होतं. त्यातच ऑफिसमधल्या कॉफी-रूम मधे ५ आणि १० किलोमिटर रनची एक जाहिरात चिकटवलेली दिसली. लगेच उत्साही मित्रमंडळींना तसेच ऑफिसमधल्यांना विचारून आम्ही टिम वगैरे फॉर्म केली. ऑफिसमधल्या एका कलीगने खूपच प्रोत्साहन दिलं. तो स्वत: अगदी पट्टीचा पळणारा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ५ किलोमिटर फारच किरकोळ होतं. ठरल्या-ठरल्या लगेच पैसे भरून टाकले जेणेकरून निदान भरलेल्या पैशांमुळे तरी कोणी रद्द करणार नाही. :) मग जोरदार प्रॅक्टीस सुरु केली. त्याचा उत्साहं पण बर्‍यापैकी टिकला. आणि पहिली ५ किलोमिटर रन ३० मिनीटांच्या आत पूर्ण करून स्वतःची पाठही थोपटून घेतली !

एक रेस पूर्ण केल्यानंतर उत्साहं तर वाढला होता पण वाढती थंडी, मधली भारत वारी, ऑफिसतले काम, लहान झालेला दिवस अश्या अनेक गोष्टींमुळे पळणं परत कमी झालं. मधे समिरचा लेख वाचून परत एकदा उत्साहाने पळणं सुरु केलं. तेव्हाच नेटसर्फिंग करत असताना जॉर्जिया मॅराथॉन २०१० ची वेबसाईट सापडली. समिरचा लेखाच्या प्रभावामुळे लगेहात हाफ मॅराथॉन साठी नाव नोंदवूनच टाकावं असं फार वाटत होतं पण दुसर्‍या दिवशी पळायला गेल्यावर ५ किलोमिटर साठी २९ च्या जागी ४० मिनीटे लागतायत ह्यावरून स्टॅमिनाची किती वाट लागली आहे हे लक्षात आलं ! त्यामुळे मग आपल्या लायकीला योग्य अश्या 5K रन साठीच नावं दिली. हाफ आणि फुल मॅराथॉन दुसर्‍या दिवशी असल्याने आपण भाग घेत नाही आहोत तर निदान वॉलेंटियर म्हणून जाऊ हा शिल्पाचा सल्ला मानून त्यासाठीही नावं नोंदवली. परत एकदा उत्साहाने तयारी सुरु केली. शिल्पा कुठल्याही स्पोर्ट्स इव्हेंट मधे पहिल्यांदाच भाग घेत असल्याने ती पण खूप उत्साहात होती. इथल्या नको झालेल्या हिवाळ्याचा कृपेने जमेल तसा सराव केला.

रेसच्या ठिकाणी सकाळी आपल्या इथे नरकचतुर्दशीला असतं तसं वातावरण होतं. सगळे अगदी उत्साहात sports accesories नी नटून-थटून तिथे आले होते. चांगली थंडी होती. ग्रँटपार्क वसंत ऋतुच्या फुलोर्‍याने मस्त फुललेलं होतं आणि स्पर्धकांनी गजबजलेलं होतं. ह्या स्पर्धेत साधारण ३००० स्पर्धक होते. आणि मुख्यत: जे दुसर्‍या दिवशी मॅराथॉन किंवा हाफ मॅराथॉन पळणार होते ते वॉर्म-अप रेस म्हणून आलेले होते. हा कोर्स चांगलाच चढ-उताराचा होता. धावताना एक वेळी "कशाला पैसे भरून स्वतःच्या जिवाला त्रास ! द्यावं सोडून" असा विचार जोरदार आला होता पण वेबसाईट वर म्हंटल्याप्रमाणे असा दिवस रोज येत नाही जेव्हा तुम्ही पळताय आणि आजुबाजूला अनेक लोकं टाळ्या वाजवतायत, तुमचं कौतुक करतायत, तुमचे फोटो काढतायत आणि रेस पूर्ण केल्यावर तुमचं अभिनंदन करयातय !! त्यामुळे उगाच येणारे निगेटिव्ह विचार बाजूला सारत ५ किलोमिटर अंतर मी ३२ मिनीटांत आणि शिल्पाने ५० मिनीटांत पूर्ण केलं. रेस झाल्यावर खूपच भारी वाटलं !!!!!!

आम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या मुख्य मॅराथॉनच्या दिवशी सकाळी ६:३० ला अटलांटा डाऊनटाऊन मधे हजर झालो. डाउनटाऊन अक्षरश: भरून वहात होतं. पहाटे पहाटे ऑलिंपीक पार्क मधे अगदी प्रसन्न वाटत होतं. खूपच मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा असल्याने सगळी अगदी चोख व्यवस्था होती. ह्या स्पर्धेत सुमारे १८००० स्पर्धक आणि ३००० स्वयंसेवक होते. आमची नेमणूक "फुड अँड बिवरेजेस अ‍ॅट फिनीश लाईन" ह्या टिम मधे होती. ह्यात रेस संपवून आलेल्या स्पर्धकांना हिट-शीट्स, पाणी, केळी, सफरचंद, ग्रॅनोलाबार, स्नॅक्स, दही ई गोष्टी वाटायच्या होत्या. कॅरोल नामक एक आज्जी आमची टिमलीडर होती आणि ह्या विभागात आम्ही साधारण ५० जणं होतो.

हाफ तसेच फुल मॅराथॉन एकाच वेळी सुरु झाल्याने साधारण तासभरातच स्पर्धक यायला लागले. सगळे जण त्यांच जोरदार स्वागत करत होते आणि त्यांना मेडल्स तसेच खाणं-पिणं देत होते. संयोजकांचा तसेच स्वयंसेवकांचा हा उत्साहं अगदी ६-७ तासांनंतरही तितकाच टिकून होता ! अगदी १५ वर्षांच्या मुलांपासून आज्जी-आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांमधले स्पर्धक होते. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर आनंदाबरोबरच लक्ष्य पूर्ण केल्याचं विलक्षण समाधान दिसत होतं. कितीतरी स्पर्धक आम्हालाच धन्यवाद देत होते की तुम्ही सगळे काम करयात म्हणून ही स्पर्धा पार पडत्ये ! इथे एकमेकांच्या अगदी लहान कामाबद्दल, यशाबद्दल कौतूक तसेच आदर व्यक्त करण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे त्याचच हे एक उदाहरण. कॅरोल अधे-मधे सगळी कडे हवं-नको बघून जात होती. अगदी प्रत्येक स्वयंसेवकाला तुम्ही कॉफी घेतली का? खाल्लं का वगैरे विचारून जात होती. तिथे अनेक स्वयंसेवक याआधी बर्‍याच ठिकाणी हे काम केलेल होते त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायलाही मजा आली. काही जणांची मुलं, नवरा/बायको, मित्र/मैत्रिणी स्पर्धक होते आणि त्यामुळे ते काम करायला आले होते तर काही जण "I have to return something to the sports !" ह्या भावनेतून काम करत होते. आम्ही साधारण ७ तास काम करून १ वाजता तिथून निघालो. त्यावेळी रेस अंतिम टप्प्यात होती आणि आवरा-आवरी पण सुरु झाली होती. नंतर थोडावेळ फिनीश लाईन पाशी उगीच थोडावेळ रेंगाळत राहिलो. स्पर्धकांपैकी कोणीच ओळखीचं नसूनही त्यांना रेस पूर्ण करताना बघून खूप छान वाटत होतं.

एकंदरीत एक खूप वेगळा आणि सुंदर अनुभव होता. आम्ही स्पर्धक म्हणून त्यात नसलो तरी कुठल्यातरी प्रकारे ह्या "घरच्या कार्यात" सहभागी होतो ह्याचं खूप समाधान वाटलं ! होपफुली आम्हीही कधीतरी हाफ/फुल मॅराथॉन मधे सहभागी होऊ, संयोजक आमच्या गळ्यात मेडल घालतील, लोकं आम्हाला चिअर करतील आणि मग आम्हीही स्वयंसेवकांना धन्यवाद देत "बिकॉजाफ यॉल.. वी आ रनिंग..." असं म्हणू शकू.. :)

"ऑन द लाईन" - सेरेना विल्यम्स

"ऑन द लाईन" हे सेरेना विल्यम्सचे आत्मचरित्र नुकतेच वाचले. सगळ्यात पहिले वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आत्मचरित्र लिहिता येईल एव्हडं जबरदस्त अनुभवविश्व असल्याबद्दल सेरेनाचा खूप हेवा वाटला. सध्याच्या सगळ्याच तरूण खेळाडूंनी वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी पासून खेळायला सुरुवात केलेली असल्याने तिशीच्या आसपासच त्यांचं साधारण वीस वर्षांचं करियर झालेलं असतं !
एक अफ्रिकन - अमेरिकन खेळाडू, घरातील सगळ्यात लहान अपत्य आणि त्यात एका प्रसारमाध्यमांचं विशेष लक्ष असलेल्या खेळाडूची धाकटी बहिण म्हणून आलेले अनुभव सेरेनाने अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहेत. व्हिनसच्या प्रगतीबद्दल, वडिलांनी तसेच प्रसारमाध्यमांनी बालपणात व्हिनसला दिलेल्या अधिक प्रसिध्दीबद्दल वाटलेला हेवा तसेच जरी सख्खी बहीण असली तरी कोर्टवर समोरा-समोर आल्यावर व्हिनस फक्त एक प्रतिस्पर्धी आहे ही असलेली जाणिव सेरेनाने अतिशय स्पष्ट पण संयतपणे मांडली आहे. सेरेनाच्या वडिलांनी दोन जागतीक दर्जाचे टेनिसपटू घडवण्यासाठी घेतलेली मेहेनत तसेच लहान्-सहान गोष्टींबद्दलची त्यांची दुरदृष्टी पाहून खरच थक्क व्हायला होतं. सेरेनेना जिंकलेल्या बर्‍याचशा स्पर्धा अगदी आत्ताच्या काळातल्या असल्याने त्यातल्या सामन्यांचे वर्णन वाचायला मस्त वाटलं. बर्‍याचदा सामने डोळ्यासमोर आले. हातातून निसटून चाललेला सामना खेचून आणणे ही सेरेनाची खासियत. अश्या सामन्यांमधे तिने केलेले विचारही वाचायलाही खूप मस्त वाटले. ह्या पुस्तकात २००९ च्या युएस ओपन मधली घटना अर्थातच नाहिये कारण पुस्तकाचे काम त्या सुमाराच पूर्ण झालेले होते. पण त्यावरही सेरेनाने प्रामाणिकपणे आणि कुठलाही आवेश न आणता टिप्पणी केली असती अशी खात्री वाटते.
पुस्तकातला फॅशन आणि ड्रेसेस बद्दलचा भाग आवडला नाही कारण त्यात विशेष रस नव्हता. तसेच काही वैयक्तीक घटना नसत्या तरी चाललं असतं असं वाटलं. पण अर्थात ते आत्मचरित्र असल्याने त्या येणारच.
पण एकूणात जेव्हा स्वत:लाच प्रोत्साहन द्यायची गरज भासेल तेव्हा वाचायला नक्कीच उपयुक्त असे पुस्तक आहे. स्मित
या पुस्तकाशिवाय खेळाडूंनी लिहिलेली "ओपन" - आंद्रे अगासी, "आऊट ऑफ द कंफर्ट झोन" - स्टीव्ह वॉ आणि मायकेल फेल्प्सची दोन पुस्तकं वाचायची आहेत.