इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही. लांबपल्ल्याच्या शर्यतींमधे भाग घेता यायचा नाही कारण तेवढा स्टॅमिना नव्हता. नंतर "तू बारीक आहेस त्यामुळे ट्रेडमिल करायची गरज नाही" असं जिममधे सांगितल्यामुळे कॉलेजमधे असताना तसेच ऑफिसमधल्या जिम मधे ट्रेड मिलच्या वाटेलाही गेलो नाही (आणि तेव्हा मी खरच बारीक होतो. ;) ). नंतर मग ट्रेडमिल करायची खरज गरज पडायला लागली आणि नियमीतपणे खेळणे, पोहणे ह्यामुळे स्टॅमिना वाढून २०-२५ मिनीटं पळणंही शक्य व्हायला लागलं.
इथे अटलांटात आल्यापासून तर घराच्या मागेच असलेल्या सुंदर ट्रेल मुळे आठवड्यातून २-३ वेळा तरी (मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात वगैरे वगैरे) पळणं व्हायला लागलं. स्टॅमिना वाढत होताच आणि पळणं तितकं बोर नाहिये असं वाटून त्यात रसही वाटायला लागला. त्यात आवडती गाणी आयपॉडवर असली तर पळण तितकं कष्टदायी पण वाटेनासं झालं.
हे सगळं आज आठवायचं आणि लिहायचं कारण म्हणजे नुकताच गेलेला "मॅराथॉन" विकएंड ! मागच्या वर्षी इथे ट्रेल वर धावायला सुरुवात केल्यावर आधी जरा बारीक होणे, मग रोजचं धावण्याचं अंतर वाढवणे, मग न चालता सलग पळणे असे काही-बाही गोल ठेवून स्वतःला धावतं ठेवलं होतं. त्यातच ऑफिसमधल्या कॉफी-रूम मधे ५ आणि १० किलोमिटर रनची एक जाहिरात चिकटवलेली दिसली. लगेच उत्साही मित्रमंडळींना तसेच ऑफिसमधल्यांना विचारून आम्ही टिम वगैरे फॉर्म केली. ऑफिसमधल्या एका कलीगने खूपच प्रोत्साहन दिलं. तो स्वत: अगदी पट्टीचा पळणारा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ५ किलोमिटर फारच किरकोळ होतं. ठरल्या-ठरल्या लगेच पैसे भरून टाकले जेणेकरून निदान भरलेल्या पैशांमुळे तरी कोणी रद्द करणार नाही. :) मग जोरदार प्रॅक्टीस सुरु केली. त्याचा उत्साहं पण बर्यापैकी टिकला. आणि पहिली ५ किलोमिटर रन ३० मिनीटांच्या आत पूर्ण करून स्वतःची पाठही थोपटून घेतली !
एक रेस पूर्ण केल्यानंतर उत्साहं तर वाढला होता पण वाढती थंडी, मधली भारत वारी, ऑफिसतले काम, लहान झालेला दिवस अश्या अनेक गोष्टींमुळे पळणं परत कमी झालं. मधे समिरचा लेख वाचून परत एकदा उत्साहाने पळणं सुरु केलं. तेव्हाच नेटसर्फिंग करत असताना जॉर्जिया मॅराथॉन २०१० ची वेबसाईट सापडली. समिरचा लेखाच्या प्रभावामुळे लगेहात हाफ मॅराथॉन साठी नाव नोंदवूनच टाकावं असं फार वाटत होतं पण दुसर्या दिवशी पळायला गेल्यावर ५ किलोमिटर साठी २९ च्या जागी ४० मिनीटे लागतायत ह्यावरून स्टॅमिनाची किती वाट लागली आहे हे लक्षात आलं ! त्यामुळे मग आपल्या लायकीला योग्य अश्या 5K रन साठीच नावं दिली. हाफ आणि फुल मॅराथॉन दुसर्या दिवशी असल्याने आपण भाग घेत नाही आहोत तर निदान वॉलेंटियर म्हणून जाऊ हा शिल्पाचा सल्ला मानून त्यासाठीही नावं नोंदवली. परत एकदा उत्साहाने तयारी सुरु केली. शिल्पा कुठल्याही स्पोर्ट्स इव्हेंट मधे पहिल्यांदाच भाग घेत असल्याने ती पण खूप उत्साहात होती. इथल्या नको झालेल्या हिवाळ्याचा कृपेने जमेल तसा सराव केला.
रेसच्या ठिकाणी सकाळी आपल्या इथे नरकचतुर्दशीला असतं तसं वातावरण होतं. सगळे अगदी उत्साहात sports accesories नी नटून-थटून तिथे आले होते. चांगली थंडी होती. ग्रँटपार्क वसंत ऋतुच्या फुलोर्याने मस्त फुललेलं होतं आणि स्पर्धकांनी गजबजलेलं होतं. ह्या स्पर्धेत साधारण ३००० स्पर्धक होते. आणि मुख्यत: जे दुसर्या दिवशी मॅराथॉन किंवा हाफ मॅराथॉन पळणार होते ते वॉर्म-अप रेस म्हणून आलेले होते. हा कोर्स चांगलाच चढ-उताराचा होता. धावताना एक वेळी "कशाला पैसे भरून स्वतःच्या जिवाला त्रास ! द्यावं सोडून" असा विचार जोरदार आला होता पण वेबसाईट वर म्हंटल्याप्रमाणे असा दिवस रोज येत नाही जेव्हा तुम्ही पळताय आणि आजुबाजूला अनेक लोकं टाळ्या वाजवतायत, तुमचं कौतुक करतायत, तुमचे फोटो काढतायत आणि रेस पूर्ण केल्यावर तुमचं अभिनंदन करयातय !! त्यामुळे उगाच येणारे निगेटिव्ह विचार बाजूला सारत ५ किलोमिटर अंतर मी ३२ मिनीटांत आणि शिल्पाने ५० मिनीटांत पूर्ण केलं. रेस झाल्यावर खूपच भारी वाटलं !!!!!!
आम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या मुख्य मॅराथॉनच्या दिवशी सकाळी ६:३० ला अटलांटा डाऊनटाऊन मधे हजर झालो. डाउनटाऊन अक्षरश: भरून वहात होतं. पहाटे पहाटे ऑलिंपीक पार्क मधे अगदी प्रसन्न वाटत होतं. खूपच मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा असल्याने सगळी अगदी चोख व्यवस्था होती. ह्या स्पर्धेत सुमारे १८००० स्पर्धक आणि ३००० स्वयंसेवक होते. आमची नेमणूक "फुड अँड बिवरेजेस अॅट फिनीश लाईन" ह्या टिम मधे होती. ह्यात रेस संपवून आलेल्या स्पर्धकांना हिट-शीट्स, पाणी, केळी, सफरचंद, ग्रॅनोलाबार, स्नॅक्स, दही ई गोष्टी वाटायच्या होत्या. कॅरोल नामक एक आज्जी आमची टिमलीडर होती आणि ह्या विभागात आम्ही साधारण ५० जणं होतो.
हाफ तसेच फुल मॅराथॉन एकाच वेळी सुरु झाल्याने साधारण तासभरातच स्पर्धक यायला लागले. सगळे जण त्यांच जोरदार स्वागत करत होते आणि त्यांना मेडल्स तसेच खाणं-पिणं देत होते. संयोजकांचा तसेच स्वयंसेवकांचा हा उत्साहं अगदी ६-७ तासांनंतरही तितकाच टिकून होता ! अगदी १५ वर्षांच्या मुलांपासून आज्जी-आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांमधले स्पर्धक होते. प्रत्येकाच्या चेहेर्यावर आनंदाबरोबरच लक्ष्य पूर्ण केल्याचं विलक्षण समाधान दिसत होतं. कितीतरी स्पर्धक आम्हालाच धन्यवाद देत होते की तुम्ही सगळे काम करयात म्हणून ही स्पर्धा पार पडत्ये ! इथे एकमेकांच्या अगदी लहान कामाबद्दल, यशाबद्दल कौतूक तसेच आदर व्यक्त करण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे त्याचच हे एक उदाहरण. कॅरोल अधे-मधे सगळी कडे हवं-नको बघून जात होती. अगदी प्रत्येक स्वयंसेवकाला तुम्ही कॉफी घेतली का? खाल्लं का वगैरे विचारून जात होती. तिथे अनेक स्वयंसेवक याआधी बर्याच ठिकाणी हे काम केलेल होते त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायलाही मजा आली. काही जणांची मुलं, नवरा/बायको, मित्र/मैत्रिणी स्पर्धक होते आणि त्यामुळे ते काम करायला आले होते तर काही जण "I have to return something to the sports !" ह्या भावनेतून काम करत होते. आम्ही साधारण ७ तास काम करून १ वाजता तिथून निघालो. त्यावेळी रेस अंतिम टप्प्यात होती आणि आवरा-आवरी पण सुरु झाली होती. नंतर थोडावेळ फिनीश लाईन पाशी उगीच थोडावेळ रेंगाळत राहिलो. स्पर्धकांपैकी कोणीच ओळखीचं नसूनही त्यांना रेस पूर्ण करताना बघून खूप छान वाटत होतं.
एकंदरीत एक खूप वेगळा आणि सुंदर अनुभव होता. आम्ही स्पर्धक म्हणून त्यात नसलो तरी कुठल्यातरी प्रकारे ह्या "घरच्या कार्यात" सहभागी होतो ह्याचं खूप समाधान वाटलं ! होपफुली आम्हीही कधीतरी हाफ/फुल मॅराथॉन मधे सहभागी होऊ, संयोजक आमच्या गळ्यात मेडल घालतील, लोकं आम्हाला चिअर करतील आणि मग आम्हीही स्वयंसेवकांना धन्यवाद देत "बिकॉजाफ यॉल.. वी आ रनिंग..." असं म्हणू शकू.. :)
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
2 प्रतिसाद:
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
उंटावरून शेळ्या हाकणे हा या परदेशी पळून गेलेल्या भारतीयांचा उद्योग आहे.आमच्या उणीवा दाखवत बसवून स्वत;च कोतूक करून घेणे हा यांचा स्वार्थ. .अमेरिकेत काय जळते हे आरोग्य विमा कायद्याच्या वेळी जगाला कळले आहे. याच मुळे अनेक परदेशी भारतात इलाज करण्या साठी येतात. मातृभूमीचा कळवला असेल तर आधी येथे या.नंतर उपदेश करा . रणांगण सोडून आम्ही तुमच्या सारखे पळून जाणारे नाही. ठीक आहे आम्ही प्रगत नाही. पर्यावरणाचा बोजवारा उडालाय. मुलभूत सुविधांची वानवा आहे. दूर्गम भागात अजूनही सुविधांची सावलीही पोहोचलेली नाही. शिक्षणात सातत्य नाही. शेतकऱ्यांसमोर प्रश्नांचं पीक आहे. धनवान आणि गरीबांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमधलं अंतर वाढतंय. इत्यादी इत्यादी. पण आम्ही प्रगती आमच्या स्वबळावर करूत वेळ लागेल .केवळ संमेलने भरवून भाषा सुधारत नाही किंवा वास्तव बदलत नाही. त्या करता भाषेचे शब्द भांडार वाढवणे, मुलभूत पायाभूत सेवा निर्माण करणे हि कामे चालू आहेत. read more http://thanthanpal.blogspot.com
Hi Parag,
ha blog reader laadto aani mag niwant vachun kaadhin :)
Post a Comment