"मी सुसुंगगडी!"

१९ मे म्हणजे माझ्या आज्जीचा वाढदिवस. ती आज असती तर एकोणनव्वद वर्षांची झाली असती. आम्ही लहान असताना आज्जी आम्हांला खूप गोष्टी सांगायची. रोज दुपारी, रात्री झोपताना गोष्टी ऐकून मगच झोपायचो . तिच्याकडून मी आणि भावाने ज्या गोष्टी ऐकल्या, त्या पुढे भावाच्या मुलांनीही ऐकल्या. माझी मुलगी रिया सव्वा महिन्याची असताना आज्जी गेली त्यामुळे रियाला मात्र त्या गोष्टी आज्जीकडून (म्हणजे तिच्या पणजीकडून) ऐकायला मिळत नाहीत. आम्ही आठवतील तश्या सांगत असतो पण ती सर काही येत नाही. ही सुसुंगगड्याची गोष्ट रियासकट आमच्या सर्वांच्या आवडीची. आज्जीने कुठे वाचली की कोणाकडून ऐकली की स्वतःच रचली ते माहित नाही कारण आत्तापर्यंत मी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात कधी गोष्ट सापडली नाही. त्यामुळे आज्जीच्या वाढदिवसानिम्मित इथे लिहून ठेवतो आहे.
--------------
एक असतं जंगल. त्या जंगलात रहात असतात खूप सारे प्राणी. वघोबा, सिंह, कोल्हा, लांडगा, हत्ती, रेडा, अस्वल वगैरे.. आणि बरेच पक्षी, कावळा, चिमणी, मोर, पोपट, कोंबडा वगैरे.. एकदा काय झालं, वाघोबा आपल्या गुहेतून निघून जंगलात फिरायला गेला. तिथेच जवळ खेळत असलेला कोंबडा खेळता खेळता चुकून वाघोबाच्या गुहेत शिरला. आधी तो घाबरला पण मग गंमत म्हणून त्याने गुहेचं दार बंद केलं आणि आतून कडी लावून घेतली. थोड्यावेळा वाघोबा आपल्या गुहेकडे परतला. येऊन बघतो तर काय, गुहेचं दार आतून बंद!
मग त्याने दार वाजवलं आणि दरडावून विचारलं, "आत कोणे ?"
कोंबड्याला कळेना की आता काय करावं. मग त्याने उत्तर दिलं, "मी सुसुंगगडी."
वाघोबाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो!"
वाघोबाने विचार केला, वाघाचं तंगडं मोडतो म्हणजे नक्कीच कोणतरी भला मोठा प्राणी असणार आणि मग घाबरून धुम पळत सुटला. आपल्याला वाघ घाबरला हे बघून कोंबड्याला मजा वाटली. पळता पळता वाघोबाला रस्त्यात भेटलं अस्वलं.
अस्वल म्हणालं, "अहो वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
वाघोबा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ, तुला काय सांगू! माझ्या गुहेत सुसुंगगडी शिरलाय, तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो."
अस्वल म्हणालं, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते दोघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता अस्वलाने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
अस्वलाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
ते ऐकल्यावर वाघ आणि अस्वल दोघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला रेडा.
रेडा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
अस्वल म्हणालं, "अरे रेडेदादा, काय सांगू तुला. वाघोबाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
रेडा म्हणाला, "अरे असा कोणी सुसुंगगडी असतो का? तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते तिघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता रेड्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
रेड्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
ते ऐकल्यावर वाघ, अस्वल आणि रेडा तिघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला कोल्हा.
रेडा म्हणाला, "अरे रेडेदादा, अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
रेडा म्हणाला, "अरे कोल्होबा, काय सांगू तुला. वाघाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
कोल्हा म्हणाला, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते चौघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता कोल्ह्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
कोल्ह्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो आणि कोल्ह्याचं शेपुट तोडतो!"
पण कोल्हा होता हुषार आणि लबाड. तो काही घाबरला नाही. त्याने विचार केला हा आवाज तर ओळखीचा वाटतो आहे. मग त्याने काय केलं, ह्ळूच गुहेच्या मागच्या बाजूला गेला आणि तिथल्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि बघितलं तर कोंबडा! मग त्याने वाघ, अस्वल आणि रेड्या बोलावून सांगितलं की "बघा सुसुंगगडी वगैरे काही नाही. हा तर साधा कोंबडा आहे!!". त्या सगळ्यांनी मिळून मागची खिडकी हळूच उघडली, त्या कोंबड्याला धरून बाहेर काढलं आणि जोरात बदडायला सुरूवात केली. मग कोंबडा रडून गयावया करायला लागला, "सॉरी सॉरी, मी परत असं करणार नाही! कोणाला फसवणार नाही."
मग सगळ्यांनी त्याला सांगितलं की पुन्हा असं केलस तर तुला अजून मोठी शिक्षा करू. कोबंड्याने परत खोटं न बोलण्याचं आणि कोणाला न फसवण्याचं कबूल केल्यावर त्याला सोडून दिलं!
म्हणून खोटं कधी बोलू नये आणि कोणाला कधी फसवू नये!