वाढदिवस...

इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. :) ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्‍याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमधून उतरणारी माणसं बघत छान वेळ जातो... बर्‍याचदा हातातलं पुस्तक नुसतच धरलं जातं आणि एक पानही पूर्ण वाचून होतं नाही..

आज सकाळी डंकीन मधे जायला रूढार्थाने तसं काहीच कारण नव्हतं... म्हणजे मला ना अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला होता, ना डोक्याला शॉट बसला होता, ना पुस्तक वाचायचं होतं पण का कोण जाणे मी देवळातून परत येताना डंकीन डोनट च्या दिशेने गाडी वळवली...नेहमी प्रमाणे कॉफी घेऊन ती खूप गरम असल्याने नुसतचं प्यायल्या सारखं करत मी ट्रॅफीक बघत बसून राहिलो.. गेल्या दोन दिवसातल्या बड्डे जश्न बद्दल विचार करत बसलो...

वाढदिवस... ! कधीकधी मला वाटतं वाढदिवस हा वर्षातला एका असा दिवस असतो की ज्या दिवशी तुमचं स्वतःचं काही कर्तुत्व नसताना उगीच तुमचं भारी कौतूक केलं जातं !!!!! हो म्हणजे आपल्याला जन्माला घालणं हे आपल्या आई-बाबांचं कर्तुत्व.. नंतर वाढवणं मोठं करणं हे पण त्यांचंच काम.. थोड्या वर्षांनी आपण आपोआपच मोठे होतं असतो.. ह्या सगळ्यात आपला स्वतःचा सहभाग् किती ? ते कौतूक आपण खरचं डिसर्व्ह करतो का? असा प्रश्न कधीकधी पडतो.. ! तसंच माझं ही बरच कौतूक आणि लाड त्यादिवशी झाले.. १२.०१ वाजता आलेल्या शिल्पाच्या फोन पासून दुसर्‍या दिवशी ११.५० वाजता तिच्या भावाच्या आलेल्या फोन पर्यंत दिवसभर फोन चालूच होते. अनेक जणांनी ऑर्कूट, फेसबूक, इमेल वर शुभेच्छा दिल्या. मायबोलीवरही पार्ले बीबी मला दिलेल्या शुभेच्छांनीच भरला होता.

इथल्या प्रथेप्रमाणे माझे मित्र रात्री १२ वाजता केक घेऊन आले. पण ह्या वेळचं वेगळेपण म्हणजे माझ्या मित्राने आणि त्याच्या रूमी ने स्वतः घरी केक बनवून आणला होता. फार भारी वाटलं मला.!!!! घरच्या व्यतिरिक्त बहूदा पहिल्यांदांच इतर कोणी केक केला होता.. ! मागच्या वर्षी मला साधं विश पण न करणारे माझे ऑफिसमधले काही कलिग्ज रात्री १२ ला घरी आलेले बघून मला भरून वगैरेच यायचं बाकी राहिलं होतं. :) खूप दंगा झाला एकूण... दुसर्‍या दिवशी देसी बुफे ला तुडूंब खाणं झालं.. नंतर छान झोप ही झाली. माझा मित्र, त्याचा रूमी, माझा रूमी, ऑफिसमधली काही जनता, त्यातले कोणाकोणाचे बाकीचे मित्र अश्या सगळ्या मंडळींचा मिळून रात्रीचा प्लॅन पण तयार झाला होता. इथे एका क्लब मधे देसी पार्टी होती. ११:३० पर्यंत गेलं तर फ्री एंट्री वगैरे ऑफर्स पण होत्या. खर म्हणजे मला पब/ क्लब मधे जायचा फारसा उत्साहं नसतो.. पण चांगला ग्रुप असेल आणि ग्रुप मधलं एकतरी कोणी ड्रिंक्स न घेणारं असेल (किंवा मग तो पब मायामी किंवा न्यू ऑर्लीन्स चा असेल ;) ) तर मग मी जातो. का माहित नाही पण एकूणातच मला तिथली सगळी एंजॉयमेंट ही बर्‍याचदा बुरखा पांघरल्यासारखी किंवा उसना आवेश आणल्या सारखी वाटते.. म्हणजे वर सगळ्यांचे चेहेरे हसरे, आनंदी दिसतात पण मागे काहितरी वेगळचं दडलय की काय असं वाटतं..

रस्ते चुकणे, पार्किंग शोधणॅ असे सगळे नेहमीचे प्रकार करत आम्ही एकदाचे त्या पब मधे जाऊन पोचलो. पार्टीच्या वेळेपेक्षा जरा जास्तच लवकर पोचल्याने तिथे त्या वेळी काहिच चालू नव्हतं. सो त्याच्याच शेजारी असलेल्या एका फिरंगी पब मधे गेलो. तिथे लाईव्ह बँड चालू होता. म्युझिक एकदम छान होतं.. आमची जनता पण एकूण खुष झाली आणि त्यांचं पेयपान ही एकीकडे चालू झालं.. मी आणि माझा मित्र स्प्राईट पित त्यांना कंपनी देत होतो.. :) पेय आणि गाण्यांबरोबर पार्टीचा रंग हळूहळू चढत होता.. तिथे हॅलोवीन बॅश असल्याने बँड पण एकदम उत्साहात होता.. २/३ ड्रिंक्स झाल्यावर सगळ्यांना परत देसी पार्टीची आठवण झाली आणि आम्ही एकूण रागरंग बघायला त्या जागी परत आलो. त्यावेळपर्यंत इकडचा माहोल एकदम बदलला होता.. आता तिथे चांगलीच गर्दी झाली होती आणि गाणी पण जोरदार सुरु होती. लोकांच्या पोटात गेलेल्या पेयाचा परीणाम होऊन सगळ्यांची पावलं गाण्यांवर थिरकायला लागली होती... माझा रूमी अगदी टिपीकल नॉर्थी असल्याने त्याचं पार्टी-शार्टी / डान्स- वान्स एकदम जोरात चालू होतं.. :) भुतापेक्षा ही डान्सफ्लोरला भिणार्‍या आणि ड्रिंक्स न घेणार्‍या मला वास्तविक तिथे करण्यासारखं काहीच नव्ह्तं. पण मित्र मंडळींबरोबर टाईमपास आणि "इकडे तिकडे चोहीकडे" बघणे ह्यात वेळ छान चालला होता.. आमच्या जनतेच्या ड्रिंक्सची लेव्हल पण बियर सोडून वर गेली होती आणि त्याची पातळी डोक्यातही वर वर जात असल्याने एकूण मजा मजा चालली होती. लोकाग्रहास्तव मीही १/२ वेळा डान्सफ्लोर वर जाऊन आलो पण एकूण माझे रंग बघता त्यांनी मला आग्रह करणं सोडून दिलं.

दरम्यान तिथे एक एबीसिडी ग्रुप आला..चाळीशीच्या वरच्या स्त्रिया आणि पुरुषांचा हा ग्रुप अगदी साड्या, कुरते वगैरे ट्रॅडिशनल अवतारात आणि ते सगळे जणं बोलण्याचालण्या वरून अगदी "क्युल" वाटत होते.. ! आमची मित्र मंडळी जिकडे नाचत होती त्याच्याच आसपास त्यांचाही नृत्याविष्कार चालू होता.. रात्रीचे अडीच वाजले आणि पार्टी संपायला अर्धाच तास उरला.. तो पर्यंत माझा रूमी बराच हाय झाला होता.. आणि त्यामुळे आपण आता निघावं असं माझा मित्र मला येऊन सांगून गेला.. पण नंतर अचानक अर्धाच तास राहिलाय सो ३ लाच जाऊन असं ठरलं.. दरम्यान तो देसी ग्रुप आणि आमचा ग्रुप सगळे एकत्र नाचायला लागले... त्यातल्या एक बाई फारच उत्साहात येऊन माझ्या रूमी बरोबर नाचायला लागल्या.. बघता बघता मर्यादेपेक्षा जास्तच जवळ येत गेले आणि अचानक त्या बाईंनी मला उचल असा आग्रह माझ्या रुमीला सुरु केला.. त्यानेही तो तात्काळ मान्य करुन प्रयत्न केले आणि ते दोघेही खाली पडले.. एकूण प्रकार जरा अवघड होणार हे (बहूतेक) त्याच्या लक्षात आल्याने तो तिथून दुर गेला.. त्या बाईंच्या नवर्‍याने त्यांना उचलून काही बाही प्रकार केले.. एकूणात त्या बाईंचं वागणं मला तरी फारच डेस्पो वाटतं होतं. नंतर लक्षात आल्यावर त्या परत माझ्या रूमी ला शोधायला लागल्या आणि तो सापडल्यावर परत त्यांचं नाचणं सुरू झालं ते शेवटपर्यंत .. मला त्यातल्या काही स्टेप्स आणि तो सगळा प्रकारच बर्‍यापैकी हिडीस वाटला.. नंतर गाणी बंद झाल्यावर सगळ्यांचं एकमेकांच्या गळ्यात पडून "इट वॉज सो नाईस.. सो क्यूल" वगैरे करून झालं.. आमच्या ग्रुप ने माझ्या रूमी ला त्याच्या डांसिंग "स्कील्स" करता डोक्यावर घेतलं... नंतर गाडीतून घरी परतताना भ, फ च्या सर्व बाराखड्या वापरून त्या बाईंना, नवर्‍याला आणि फॉर दॅट मॅटर जे काय सुचेल त्या सगळ्याला शिव्या घालून झाल्या.. !! मला सगळ्या प्रकरात नक्की काय रिअ‍ॅक्ट व्हावं हेच कळेना कारण मुळात मला काय खटकलं होतं ते कळत नव्हतं..
तो सगळा प्रकार बघून मला कल्चरल शॉक बसला होता ?? पण त्यासाठी काही मी अमेरीकेतल्या पब मधे पहिल्यांदा गेलो नव्हतो,
देसी बाईच्या जागी फिरंग बाई असती तर परिस्थिती बदलली असती ? कदाचित नाही !
मग झाल्या प्रकाराची पूर्ण शुध्दीत असलेल्या माझ्या मित्रासकट सगळ्यांनी केलेली भलावण मला आवडली नव्हती? कोणी काय एंजॉय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. माझ्या अपेक्षांचा संबंधच कुठे येतो??
माझ्या रूमी ची भाषा मला खटकली होती? ते ही नसावं कारण मी काही त्याच्या तोंडून वल्गर गोष्टी पहिल्यांदाच ऐकत नव्हतो..
की मग सगळं जग एंजॉय करत असताना न पिणारा आणि डांस फ्लोर वर न जाणारा मीच एकटा करंटा ह्याची मला खंत वाटतं होती ? पण ती ही शक्यता कमीच होती कारण ही सिचुएशन पण पहिल्यांदा आली नव्हती... अँड इट वॉज नॉट माय कप ऑफ टी.. वास्तवीक माझा रूमी, त्या बाई, आमच्या ग्रुप मधली बाकीची मंडळी, त्या डांस फ्लोर वरची ईतर मंडळी ह्या कोणालाच त्या प्रकाराबद्दल काही वाटत नसताना माझ्या सारख्या बाहेर बसून मजा बघणार्‍याने त्याबद्दल काही विचार करायचा संबंधच नव्हता.

पण तरीही परतीचा वाटेवर ना मी काही ऐकू शकलो ना काहॉ बोलू शकलो...

डंकीन मधे बसून विचार केल्यावर सहज जाणवलं.. आपण एखादं चांगलं मासिक वाचतो, चांगल सिनेमा पहातो. एखाद्या चांगल्या बुफे ला जातो.. पण कधी कधी त्यातला एखादा लेख, एखादं प्रसंग/ गाणं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही म्हणून संपूर्ण गोष्टीचा आनंद का घालवा... खटकलेला अर्धा तास सोडून वाढदिवसाच्या दिवशीचे खूप आनंदात गेलेले बाकी साडे- तेवीस तास परत एकदा आठवत मी डंकीन मधून बाहेर पडलो.. :)

SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे

परिचितांमधले अपरिचित : SOPEC चे संस्थापक आणि संचालक तसेच ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. पेठे

डॉ. श्री. लक्ष्मण दत्तात्रय पेठे हे नात्याने माझे काका, माझ्या वडिलांचे आतेभाऊ. ते मुळचे मुंबईचे पण शेतीमध्ये संशोधन करता यावं म्हणून औरंगाबादला स्थाईक झाले होते. माझ्या आज्जीला शिक्षणाचं विशेष कौतुक असल्याने तिचा तो अगदी लाडका भाचा. त्यामुळे त्यांच्याबद्दल तिच्याकडूनही खूप ऐकत आलो आहे. त्यांनी आधी रसायनशास्त्रात पीएच.डी केली, नंतर त्यात संशोधन केलं, पुढे औरंगाबादला अध्यापन तसेच शेतीविषयक संशोधन केलं, त्यानंतर ते संशोधनासाठी जर्मनीला गेले आणि निवृत्तीनंतर पेठे काका आता पुण्याला स्थाईक झाले आहेत. सध्या ते, त्यांचे मित्र आणि सहकारी मिळून Society For Public Education and Concern (सोपेक) नावाची संस्था चालवतात. मध्यंतरी पेठे काकांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सोपेकबद्दल तसेच त्यांच्या इतर अनुभवांबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. मायबोली गणेशोत्सवानिमित्त "परिचितांमधले अपरिचित" मालिकेमधला हा शेवटचा संवाद आणखी एका हरहुन्नरी व्यक्तीबरोबर.

काका, तुम्ही सोपेक ही संस्था औरंगाबादला असताना स्थापन केलीत. ह्या संस्थेद्वारे आपण नक्की काय साध्य केले? तसेच ह्या कार्याची दिशा आपणास कुठून मिळाली ?

"प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने साध्य करता येऊ शकते", ही माझी श्रध्दा नव्हे खात्रीच आहे. सोपेक ही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात, देशात आणि परदेशात वेगेवेगळ्या पदांवर काम केलेल्या उच्चशिक्षित आणि अनुभवी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. असे सगळे लोकं एकत्र आले आणि त्यांनी एका दिशेने, एका प्रेरणेने प्रयत्न केले तर आजुबाजूच्या गोष्टी सुधारायला वेळ लागणार नाही. सोपेकने आत्तापर्यंत अनेक उपक्रम हाती घेतले आणि ते यशस्वी पणे पार पाडले. मग ह्यात स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रयत्न तसेच त्यांची अंमलबजावणी झाली आहे.
अनेकदा सरकारी कामकाजावर टीका केली जाते. आमचा असा प्रयत्न असतो की एखाद्या पध्दतीतल्या त्रुटी संबंधितांच्या नजरेत आणून देणे आणि त्या सुधारण्यासाठी योग्य त्या सुचना देणे. तसेच काही काही पद्धती ह्या कालबाह्य झालेल्या असतात, त्या बदलणे गरजेचे असते. अशा बदलांविषयी गरज पडेल तितका अभ्यास करणे, नवीन कल्पना संबंधितांसमोर मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ह्या सगळ्या गोष्टी सोपेकतर्फे केल्या जातात.

सोपेकने हाती घेतलेले आणि अंमलबजावणी केलेले महत्त्वाचे प्रकल्प कोणते?

सोपेकचा सगळ्यांत पहिला मोठा प्रकल्प म्हणजे स्पर्धा पोस्ट कार्ड. त्यावेळी टिव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये मतदान तसेच उत्तरे गोळा करणे हे साध्या पोस्टकार्डांद्वारे होत असे. १५ पैशाचं कार्ड वापरून कित्येक जण लाखो रुपये जिंकत असतं. शिवाय अशा कार्यक्रमांना लाखांच्या संख्येत उत्तरं/मतं दिली जात असतं. सरकारी यंत्रणेचा वापर करून घडणार्‍या गोष्टीचा सरकारला काहीतरी फायदा झाला पाहिजे असा एक विचार सोपेक सदस्यांच्या मनात आला. ह्या विषयाशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती गोळा करून लिखित तसेच योग्य त्या स्वरूपात आणि सर्व पूरक संदर्भांसह केंद्र सरकारसमोर मांडली. आमचा केंद्र सरकारशी अनेक दिवस पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा चालू होता. आमच्या प्रयत्नांनी म्हणा केव्हा आणखी कशाने म्हणा, शेवटी केंद्रसरकारने निर्णय घेतला आणि ह्या स्पर्धा पोस्टकार्डची देशभर अंमलबजावणी झाली. स्पर्धा पोस्टकार्डचा फक्त रंग वेगळा होता. त्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी काहीही अतिरिक्त खर्च न पडता सरकारला खूपच महसुल ह्यातून मिळत असे.

ह्यानंतर आम्ही १ तसेच २ रुपयांच्या नाण्यांसबंधी प्रकल्पावर काम केलं. ही दोन्ही नाणी समान आकाराची तसेच रंगांची होती आणि त्यामुळे ती वापरताना सामान्य माणसाची गैरसोय होतं असे. आम्ही अर्थमंत्रालयाशी ह्याबाबत संपर्क साधून नाण्यांचे डिझाईन, धातू, वजन, आकार इ. ठरवण्यासंबंधी माहितीची विचारणी केली. ह्याबद्दलचे प्रश्न कोणाच्या अखत्यारीत येतात हे जाणून घेतलं आणि त्यावरून आमचा त्यासंबंधी असलेल्या समितीशी पत्रव्यवहार सुरु झाला. पुढे ह्या समितीने निर्णय घेऊन १ आणि २ रुपयांच्या नाण्यांचे आकार, रंग, वजन ह्यात बदल केले. सामान्य माणसाशी होणारी गैरसोय ह्या निर्णयाने टळली.

मग पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्याकाळात सोपेकने युटीआयची US-64 स्किम तसेच रिजर्व्ह बँकेचे टॅक्स-फी बाँड ह्याबद्दलही अर्थमंत्रालयाशी अनेकदा संपर्क साधला होता आणि काही बदल सुचवले होते. ह्यातल्याही काही बदलांची अंमलबजावणी नंतर झालेली दिसली.

म्हणजे सोपेकने हाती घेतलेले प्रकल्प हे प्रामुख्याने अर्थ मंत्रालयाशी संबंधितच असतात का?

नाही. सोपेक जे प्रकल्प हाती घेते ते प्रामुख्याने सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी/रहाणीमानाशी संबंधित असे असतात. त्यामुळे अर्थकारण हे महत्त्वाचे असतेच. ह्याशिवाय सोपेकचे सर्व सदस्य हे आपापले व्याप संभाळून ह्या प्रकल्पांवर काम करतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवताना त्याचे महत्त्व, आधी म्हटल्याप्रमाणे दैनंदिन जीवनावरचा थेट परिणाम, भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता तसेच सदस्यांची त्या विषयांमधली आवड, त्यांसंबंधीची जाण ह्या सगळ्या गोष्टीदेखील विचारात घ्याव्या लागतात.

आपल्या इथे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. सोपेकने श्री. लालकृष्ण आडवाणी गृहमंत्री असताना वाहनांच्या काचांचा रंग तसेच त्यावरचे काळे आवरण ह्यासंबंधीचे निकष कडक करण्यासाठी काही पत्रव्यवहार गृहमंत्रालयाशी केला होता. परंतु त्यावरचा अंतिम निर्णय अजूनही घेतला गेलेला नाही आणि आम्ही अजूनही गृहमंत्रालयाशी त्याबद्दल पाठपुरावा करत आहोत. तसेच वाहनांच्या दिव्यांची वरची अर्धी बाजू काळ्या रंगात रंगवण्याबद्दलही काही अभ्यास करून प्रस्ताव रस्ते वहातूक महामंडळासमोर मांडले होते. रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या वाहनांच्या दिव्यामुळे डोळे दिपून होणार्‍या अपघातांचे प्रमाण ह्यातून कमी होण्यास मदत होईल अशी आमची अपेक्षा होती. ह्यासंबंधीच्या निर्णयाची काही अंमलबजावणी झाली आहे.

काही शैक्षणिक प्रकल्पही आम्ही चालवले. विशेषत: पीएच.डी संबधित. देशामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अनेक पीएच.डी करणार्‍या विद्यार्थ्यांकडून शोधनिबंध, प्रबंध सादर केले जातात. परंतु आवश्यक ते निकष पूर्ण न करूनही ते नाकारले जाण्याचे प्रमाण त्यामानाने खूपच कमी असते ज्यामुळे पीएच.डीची एकूण गुणवत्ता ढासळू शकते. ह्याकरीता काही निकष ठरवून ते सगळीकडे पाळले जाण्यासंबंधी सोपेकने पाठपुरावा केला. माझ्या स्वतःचा अध्यापन तसेच पीएच. डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असलेला अनुभव ह्याबद्दल उपयोगी पडला. ह्याशिवाय मोठ्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये काही महागडी उपकरणे वापराविना पडून असतात. त्यांचा वापर त्या ठिकाणी होत नसला तरी इतर ठिकाणी त्यांची गरज असू शकते. अशा सर्व उपकरणांची माहिती गोळा करून त्यांचा वापर वाढवण्यासंबंधीचे काम सध्या चालू आहे.

नुकतेच उद्घाटन झालेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूबद्दलही एक प्रस्ताव आम्ही सरकारसमोर मांडला आहे. हया पुलाच्या खांबांच्या जवळ असलेल्या जागेचा तसेच त्या खांबांचा वापर करून वीज निर्मीती करता येऊ शकते, जी वीज पुलावरच्या दिव्यांसाठी वापरली जाईल. ह्यासंबंधी सोपेकचे सदस्य सागरी सेतूच्या प्रमुख अभियंत्यांच्या तसेच Institute of Oceanogrpahy, Mumbai ह्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मघाशी म्हंटल्याप्रमाणे सोपेकचे सगळेच प्रकल्प हे अर्थकराणाशी संबंधीत नाहीत.

सोपेकची सुरुवात औरंगाबादला झाली. तिथे अगदी सुरुवातीला चालवलेला प्रकल्प कोणता?

टि.एन. शेषन जेव्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख होते तेव्हा औरंगाबादमध्ये निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोलपंपांवर सर्व वाहनांच्या नोंदी तसेच पेट्रोलखरेदीसंबंधीची माहिती ठेवणे बंधनकारक केले होते. हे ग्राहकांच्या तसेच पेट्रोलपंपचालकांच्या दृष्टीने खूपच गैरसोईचे होत असे. सोपेकने ह्या नियमाविरुध्द तक्रार केली आणि पुढे तो नियम बदलला गेला. सुरुवात मुळात ह्यातून झाली.

तुम्ही मुळचे मुंबईचे असूनही औरंगाबादला कसे काय स्थाईक झालात? मुंबई सोडून औरंगाबादला जाणं हा अनुभव कसा होता? ह्यात अडचणी नाही जाणवल्या? लहानपणापासून असलेली शेतीची आवड जपण्यासाठी हा निर्णय घेतला होतात का?

माझे वडील, काका तसेच बाकी सगळे नातेवाईक हे मुंबईचे असते तरी माझं आजोळ हे वैभवसंपन्न अशा खानदेशातलं होतं. माझ्या लहानपणी मी आईबरोबर नेहमी तिथे जात असे. तिथे मामांच्या शेतीचे प्रयोग बघत असे. त्यावेळेपासूनच शेतीची आवड उत्पन्न झाली. जर तुम्हांला शेतीसारख्या विषयात संशोधनाची आवड असेल तर मुंबईपेक्षा महाराष्ट्राच्या इतर भागातच त्याला जास्त वाव होता. अशा संधी तिथेच जास्त उपलब्ध होत्या. औरंगाबादची निवड करण्यामागचं कारण म्हणजे हे शहर मागसलेलं असूनही विकसनशील आहे. ते त्याकाळी संपूर्ण आशियामधलं सगळ्यांत जास्त वेगाने वाढणारं शहर होतं. ह्याशिवाय मुंबईतली दगदग, कामावर जाण्यायेण्यातला वेळ तसेच शक्ती वाचवून मी ती संशोधन कार्यासाठी लावू शकणार होतो. औरंगाबादला जाण्याचा निर्णय योग्यच होता असं आता म्हणावं लागेल. आणि मुंबईसारख्या शहरातून खेड्यात जाणं अवघड असलं तरी शेवटी तुम्हांला तुमचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.

औरंगाबादला शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे संशोधन केलेत?

रसायनशास्त्रामधले माझे शिक्षण शेतीविषयक संशोधनात खूपच उपयोगी पडले. अगदी सुरुवातीला प्रयोगशाळेतल्या प्रयोगांमधून असे लक्षात आले की, नैसर्गिक खत तयार करताना जर १ मीटरपेक्षा जास्त खोलीचा खड्डा तयार केला तर त्यात खत तयार होऊ शकत नाही. त्यात घातलेल्या कचर्‍याचा नुसताच रंग बदलतो. आणि असे खत जर शेतीसाठी वापरले तर त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. ह्या संदर्भात इंडियन काउंन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चच्या सहाय्याने अधिक संशोधन केलं आणि निश्चित निष्कर्ष हाती आल्यानंतर ते शेतकर्‍यांसमोर मांडले. पुढारलेल्या शेतकर्‍यांनी हे निष्कर्ष मानले आणि नंतर त्याचे चांगले परिणाम त्यांनाही दिसले.

त्यानंतर एकदा बाभळी तसेच शेवग्याच्या शेंगांवर संशोधन करायचे होते. पण त्याकरीता स्वतःचे शेत असणे गरजेचं होतं. मग औरंगाबादच्या जवळ शेत विकत घेतलं. शेवग्याच्या शेंगांसंबंधी संशोधन करत असताना पहिल्या प्रयत्नात ते सपशेल फसलं. १०० झाडं लावलेली असून त्यात १०० शेंगा देखील आल्या नाहित. मग त्यामागची कारणमीमांसा करत असताना लक्षात आलं की शेंगा न येण्याचं कारण हे शेतातला प्रचंड वारा हे आहे. वार्‍यामुळे शेवग्याची फुलं उडून जातात आणि शेंग धरतच नाही. मग ही फुलं वाचवण्यासाठी झाडांचं वार्‍यापासून संरक्षण करणं गरजेचं होतं. त्यात बाभळीच्या झाडांची मदत झाली.
बर्‍याचदा शेतात एकावेळी दोन पिकं घेतली की ती एकमेकांना पूरक ठरतात आणि त्यामुळे दोन्ही पिकांच्या उत्पन्नात वाढ होते. ह्यासंबंधीचे अनेक प्रयोग शेतात केले. आणि हे सगळे प्रयोग वार्षिक असतात. म्हणजे एखाद्या हंगामात एखादा प्रयोग फसला तर तो सुधारणा करण्यासाठी वर्षभर थांबावं लागतं.
ह्याशिवाय गाईम्हशी पाळल्या. त्यांचे दूधदुभते वाढवण्यासंबंधी प्रयोग केले. हे सर्व संशोधन करताना काही प्रयोग प्रयोगशाळेत केलेच पण मुख्य म्हणजे शेतात अगदी नांगर चालवण्यापासून ते गोठा साफ करण्यापर्यंत सर्व काही केलं.

जाताजाता, शेतीच्या ह्या संशोधना बरोबरच आणखीनही एक गोष्ट केली. केवळ आवड आणि सहज शक्य झाली म्हणून. औरंगाबादजवळ सुमारे ४० एकर जागा सरकारकडून मी विकत घेतली. ह्या जागेवर एका वकिलाची तसेच आर्कीटेक्टची नेमणूक करून त्याचे भुखंड पाडले. कुठल्याच प्रकारची घाई नसल्याने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थीत सरकारी पध्दतीने तसेच कायदेशीर मार्गाने झाल्या. आज ह्या जागेवर पेठेनगर उभं आहे.

ह्या सर्व गोष्टी करणं औरंगाबादला गेल्यामुळेच शक्य झालं. माझा मुख्य पेशा म्हणजे रसायनशास्त्रातले संशोधन आणि विद्यापीठात अध्यापन हे संभाळून मुंबईत हे सगळं शक्य झालं नसतं.

तुम्ही रसायनशास्त्रात MSc तसचं पीएच.डी. केलंत आणि नंतर जर्मनीला जाऊन काही संशोधन कार्य केलंत. त्याबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल.

लहान सहान प्रयोग करून बघायची हौस मला लहानपणापासूनच होती. लहानपणी दारावर आलेल्या मदार्‍याने दाखवलेली जादूची काडी मी १ आण्याला विकत घेतली होती. नंतर घरी जाऊन तेच प्रयोग स्वत: करून दाखवले. तेव्हापासून आजोबा म्हणत की हा पुढे जाऊन शास्त्रज्ञ होणार. आणि नंतर मी खरच संशोधन कार्यात उतरलो. MSc नंतर पुढे मी N.C.L. मधून 'Solid Sate Chemistry' ह्या विषयात पीएच.डी केलं. N.C.L. मधल्या ६ वर्षांच्या काळात मला आयुष्यभर पुरेल इतका अनुभव मिळाला. पुढे मी पीएच.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हे करत असताना मला अजून शिकावं, संशोधन करावं अशी इच्छा होती आणि तशी संधी मला लवकरच मिळाली. यु.एस. स्टील कंपनीमार्फत लोखंडावर येणार्‍या गंजासंबंधीचं संशोधन करण्यासाठी मी जर्मनीतल्या ग्योटींगन विद्यापिठात गेलो होतो. हा अनुभवही अतिशय उत्तम होता. तिथे मला अनेक मित्र मिळाले, चिकाटीने काम करण्याची वृत्ती जर्मन लोकांकडून शिकता आली आणि अजून एक म्हणजे हे संशोधन अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्याने आसपासचे देश पाहून येण्याची संधीही मिळाली. आमच्या प्रयोगाचे परिणाम जाणून घेण्यासाठी मध्ये काही वेळ जाणं आवश्यक होतं. प्रोफेसर हौफे ह्यांनी मला त्यादरम्यान प्रवासाला जाण्याची मुभा दिली आणि ती संधी साधून मी थेट उत्तर धृवापर्यंत भटकंती करून आलो.

उत्तरधृवाच्या प्रवासाचा अनुभव कसा होता?

उत्तरधृवाचा प्रवास आम्ही बोटीतून केला. त्याप्रवासात समुद्रातले डोंगर पहायला मिळाले. त्यांचे आकार खूपच विलोभनीय होते. आम्ही उन्हाळ्यात तिथे गेल्यामुळे सूर्य क्षितिजाखाली जात नसे. २४ तास सूर्यप्रकाश. रात्र झाली तरी अंधार नाही. समुद्राच्या पाण्यावर आभाळातल्या ढगांतून झिरपणार्‍या प्रकाशामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर सोन्याचांदीचा चुरा सांडल्यासारखा दिसत होता. वातावरण थंड, शुध्द हवा, शांत निर्मळ वातावरण सगळंच देखणं होतं. उत्तरधृवावरच्या 'हॅमर फेस्ट' ह्या गावी अगदी शब्दश: मध्यरात्रीचा सूर्य पाहिला. त्यावेळची "I am on top of the world" ही भावना फारच सुखद होती. पण दुसर्‍याच क्षणी विचार आला की "But none in the world knows me". मला वामनावताराची आठवण झाली. उत्तरधृवावर प्रवासाची नोंद करत असताना जन्मठिकाण लिहायचं होतं. तिथे मी माझं जन्मगाव "भडगांव, पूर्वखानदेश, महाराष्ट्र, भारत " असे लिहिले. त्यावेळी मला माझ्या जन्मगावचा व आजोळचा खूपच अभिमान वाटला. एकूण उत्तरधृवावरचा प्रवास, तिथले अनुभव, त्यावेळी मनात आलेले विचार हे सगळं खूप विलक्षण आणि वेगळं होतं !

एकूण तुमच्यावर आजोळचा खूपच प्रभाव जाणवतो. तुमच्या आजोळाची पार्श्वभूमी काय?

पूर्व खानदेशातलं जळगाव जिल्ह्यातलं भडगांव हे माझं आजोळ. तुझे आजोबा आणि त्यांचे ३ बंधू हे माझे मामा. तू त्यांतल्या कोणाचच कार्य जवळून पाहिलेलं नाहीस पण ते चौघेही अतिथय हरहुन्नरी. ते सगळे मिळून भडगांवला शेती, पिठाच्या गिरण्या, बस सर्व्हिस असे उद्योग चालवत. प्रत्येक उद्योग कष्टाने आणि सचोटीने करायचा हे त्यांचे तत्त्व. ह्याशिवाय त्याकाळातही ते अतिशय प्रयोगशील आणि सुधारक वृत्तीचे होते. मामांच्या शेतीतले प्रयोग मी लहानपणापासून बघितले. घरचं उसाचं गुर्‍हाळ, केळी, कापूस, कांदे ह्यांची पिके ह्या सगळ्यांत पण त्यांनी खूप नवनविन प्रयोग करून बघितले. आणि कदाचित ह्या सगळ्यांमुळे मला शेती, प्रयोग, संशोधन ह्याची आवड निर्माण झाली. काम करणारी सगळी गडी माणसं ही जणू त्यांच्या घरचीच. त्यांच्या घरच्या अडीअडचणी, लग्नकार्य ह्या सगळ्यांमध्ये मामांची खूपच मदत असे. त्यामुळे ती लोकं ही आपलेपणाने काम करीत. एकूण त्या लहान गावातलं हे एक संस्थानच होतं आणि तिथला खूपच प्रभाव माझ्यावर आहे.

तुमचं संशोधन कार्य, त्यानंतर औरंगाबादला शेती विषयक संशोधन, मग जर्मनी आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्यामधे आपल्या कुटूंबाची साथ आणि वाटा काय ?

सुरुवातीच्या काळात माझे हे सगळे प्रयोग, संशोधन चालू असताना आईवडिलांचा भक्कम मानसिक आधार आणि आर्थिक पाठबळ होतं त्यामुळे मी हे करू शकलो. वडिलांकडून तसेच मामांकडून एक संशोधक, व्यवसायिक वृत्ती शिकता आली. तसेच हे सगळे संस्कार पुढे आयुष्यात फार उपयोगी पडले. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या यशात, आयुष्यात माझी पत्नी सौ. सुगंधा हिचा खूपच मोठा वाटा आहे. माझ्या संशोधनाच्या काळात कधीकधी मी तिला वेळ देऊ शकत नसे. पण तीने कधीही तक्रार केली नाही. माझ्या आईवडिलांकडे, मुलींकडे तिच बघत असे. औरंगाबादला असताना तिचेही भरपूर कार्यक्रम चालू असतं. शिवाय औरंगाबादला आमच्याकडे पाहुण्यांचाही सतत राबता आहे. हे सगळंही तिनेच निभावलं. आताही आम्ही दोधे काँप्युटर वापरायला शिकलो. मला कंपवाताचा थोडा त्रास असल्याने सोपेकचा सर्व पत्रव्यवहार, इमेल संपर्क हे तीच संभाळते. तसेच इंटरनेट वरून माहिती शोधण्याच्या कामातही ती मदत करते.

पुन्हा एकदा सोपेककडे वळतो. सोपेकचे आगामी प्रकल्प कोणते ?

दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हांला हाती घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे सायकलच्या वापर वाढवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे. भविष्यात येऊ घातलेली इंधन टंचाई आणि प्रदुषण ह्यावर सायकलचा वाढता वापर नक्कीच परिणामकारक ठरू शकेल. तसच दुसरं म्हणजे शाळांमधे प्रवेश देताना त्या परिसरात रहाणार्‍यांना प्राधान्य मिळणे. ह्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्या-येण्याचे श्रम तसेच वेळ वाचून तो इतर गोष्टींकरता देता येतो. ह्या दोन्ही गोष्टींवर काम सुरु करण्यासाठी आमचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाहिये तसेच लोकांची आणि तज्ञांची मते अजमावण्याचे कामही सुरू आहे. इतरही अनेक उपक्रमांवर विचार चालू आहे परंतु आधी म्हंटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यावर कामे सुरू होतील.

आधी रसायनशास्त्रातलं शिक्षण आणि संशोधन, त्यानंतर शेतीविषयक संशोधन, ह्याशिवाय औरंगाबादला अनेक उपक्रमांमधे सहभाग आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही कसं काय योगदान देऊ शकलात? त्यामागचं रहस्य काय?

मुळात एखाद्या विषयाची आवड असेल तर त्यात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती हवी. कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आपल्याला जे आवडतं आहे, ज्यात काही करावसं वाटतं आहे ते नक्की करून पहावं. त्यातुन आपल्याला शिकायला मिळतं, मानसिक समाधान मिळतं आणि कधीकधी समाजाला त्याचा उपयोगही होऊ शकतो. आधी मी म्हंटलं तसं प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने करणं शक्य आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर हे जग बदलणं नक्कीच शक्य आहे.

ह्या वयातही इतक्या उत्साहाने काम करणार्‍या पेठे काकांकडून आपल्या आपल्या सगळ्यांनाच शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे अनुभव आपल्यालाही काही करण्याची प्रेरणा देतील अशी आशा आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काका काकूंना तसेच सोपेकच्या आगामी प्रकल्पांसाठी काकांना शुभेच्छा देऊन मी ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले

-------
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित :
http://www.maayboli.com/node/10565

'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

परिचितांमधले अपरिचित : 'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

ओठांवरचं हलकं स्मित, गालातल्या गालात हसू ते सप्तमजली हास्यापर्यंत विनोदाचे अनेक प्रकार आहेत. विनोदाची हळूवार फुंकर दु:खाच्या वेदना बोथट करते. जीवनाचा निखळ आनंद हा हास्यातूनच फुलत असतो. आनंद द्या, आनंद घ्या, जीवनाकडे निरागस-सकस दृष्टीने पहा हाच मुलमंत्र घेऊन 'सकाळ' तसेच मध्यंतरी 'लोकसत्ता' वृत्तपत्रामधून 'चिंटू' गेली १८ वर्ष आपल्या भेटीला येतो आहे. मध्यंतरी माझ्या एका मित्राशी, रोहितशी,  बोलत असताना असं समजलं की, चिंटूकार चारूहास पंडित हा त्याचा चुलत भाऊ. इतके वर्ष 'चिंटू' वाचत असल्याने माझं आणि रोहितचं बर्‍याचदा चिंटूबद्दल बोलणं व्हायचं. नंतर एकदा त्याने चारूहास पंडितांशीच माझी गाठ घालून दिली. मायबोली गणेशोत्सवानिमित्त चारूहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर ह्यांच्याशी मारलेल्या ह्या गप्पा.आमची पिढी पेपर वाचायला लागली तेव्हापासून त्यात 'चिंटू'  दिसतोच. तर सर्वप्रथम आम्हांला 'चिंटू' हे सदर सुरु कसे झाले हे जाणून घ्यायला आवडेल.

चारूहास : माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ही कला क्षेत्रातलीच. मी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलंय. आणि नंतर मी स्वत:ची अ‍ॅडव्हरटायजिंग एजन्सी चालवत असे. व्यंगचित्रे काढायची तसेच वाचायची आवड लहानपणापासूनच होती. पूर्वी 'पुण्याची क्षितीजे' हे सदर 'सकाळ' वृत्तपत्रामधे प्रसिध्द होत असे. त्यात मी व्यंगचित्र काढत असे. इंग्रजी वृत्तपत्रांमधे येणार्‍या गारफिल्ड, डिलबर्ट ह्यांसारख्या व्यंगचित्रमालिका अगदी न चुकता वाचत असे. पण अशी एखादी भारतीय मालिका का नाही, असाही विचार नेहमी मनात येत असते. ह्या सगळ्या मालिका निश्चितपणे उत्तम आहेत, त्यांतला विनोद, त्यांतलं नाविन्य हेदेखील चांगलं असतं. पण तरीही कधीकधी त्यांचं भारतीय नसणं हे मनाला खटकतं किंबहुना त्यांतल्या काही काही गोष्टी आपल्याला अजिबातच जवळच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ बर्फ पडण्यावरून केले जाणारे विनोद. आपल्या इथे तसे हवामानच नसल्याने ते आपण appereciate करू शकत नाही. ह्याशिवाय रोजच्या वृत्तपत्रात साधारण अनेक नकारात्मक बातम्या असतात. त्यामुळे ह्यामध्ये काहीतरी हलकंफुलकं असावं असं मला स्वत:लाही वृत्तपत्र वाचताना जाणवत असे. असा एखादातरी  कोपरा त्यात असावा जो वाचकाच्या चेहेर्‍यावर स्मित आणेल, त्याला रोजच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं देईल आणि शिवाय ते आपल्या जवळचंही असेल. ह्यातूनच भारतीय मातीतलं असं एखादं व्यक्तिमत्त्व व्यंगचित्रमालिकेद्वारे तयार करायचा विचार चालू झाला आणि पुढे पुढे तो प्रबळ होतं गेला. On a lighter note, हा सगळा विचार चालू असतानाच मला भेटलेलं एक 'कॅरॅक्टर' म्हणजे प्रभाकर वाडेकर. :)

प्रभाकर : मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करत असे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मला लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशी तिन्ही बक्षिसं एकाच वर्षी मिळाली होती. व्यवसायाने मी इंडियन एक्सप्रेसमध्ये advertising management करत असे. तसेच कॉपीरायटरचं कामपण केलं आहे. नंतर टिव्हीवरील मालिका, एकांकीका ह्यांचं लेखनही करत होतो/करतो. भोपाळ दुर्घटनेच्या वेळी मी आणि चारूहासने मिळून एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली होती. चारूहास जसं म्हणाला तसंच वृत्तपत्रांतल्या नकारात्मक बातम्यांमधून काहीतरी वेगळं समोर आणणारा एखादा कोपरा पाहिजे असं वाटतच होतं. आम्ही कामानिमित्त भेटायचो त्यावेळीही काम सोडून इतर सगळ्या गोष्टींबद्दलच गप्पा मारत रहायचो. आणि अशाचं एका गप्पांच्या सत्रात 'चिंटू' ही कल्पना 'क्लिक' झाली. :)

चारूहास: 'सकाळ'चे त्यावेळचे संपादक विजय कुवळेकर ह्यांनीही एखादी व्यंगचित्र मालिका किंवा तत्सम काहीतरी सुरु करता येईल का, ह्यासंबंधी विचारणा केली होती. प्रभाकरचा आणि माझा विचार पक्का झाल्यावर ह्यातूच पुढे 'चिंटू' साकार झाला. आम्ही काही नमुने 'सकाळ' संपादक मंडळाला सादर केले आणि त्यांनी हिरवा कंदिल दिल्यावर आज १८ वर्षे अव्याहतपणे चिंटू आपल्या भेटीला येत आहे.

चिंटू हा पूर्णपणे काल्पनिक आहे की आजूबाजूच्या कोणा लहान मुलाचा किंवा तुमच्या स्वतःच्याच बालपणीचा प्रभाव त्याच्यावर आहे?

चारूहास : चिंटू हा आपल्या प्रत्येकामध्ये थोडा थोडा असतोच. तो खट्याळ आहे, मिश्कील आहे, निरागस आहे, त्याबरोबरच कधीकधी तो बावळटही आहे. चिंटूच्या पोशाखावरून, त्याच्या दिसण्यावरूनही आम्ही हेच दाखवायचा प्रयत्न करतो. चिंटूचा चेहरा निरागस आहे, पण त्याच्या कपाळावर येणारी बट त्याला एकप्रकारचा खट्याळपणा देऊन जाते. त्याचा पट्ट्यांचा टीशर्ट त्याच्यातलं खोड्याळ लहान मूल दाखवतो. त्यामुळे चिंटू सगळ्यांमधला थोडा थोडा अर्क आहे. तो कोणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर बेतेलेला नाही. त्याचप्रमाणे तो पूर्णपणे काल्पनिकही नाही. तो आपल्या सगळयांच्या आसपास कुठे ना कुठे तरी दिसतो.

प्रभाकर : आम्ही दोघेही मुळचे पुण्याचेच. नारायण पेठेत लहानाचे मोठे झालेलो. त्यामुळे वाडा संस्कृती अगदी जवळून बघितलेली. कोणी ना कोणी मित्र नेहमीच बरोबर असायचे. कट्ट्यावर बसून टाईमपास करणे, शेजार्‍यांच्या खोड्या काढणे हेसुध्दा लहानपणी केले होते. त्यामुळे बालपणीचा प्रभाव थोडाफार आहेच. चिंटूचं घर बघितलं तर ते आतमधून आधुनिक काळातलं आहे, पण त्याला वाड्यासारखं किंवा स्वतंत्र घरासारखं रूप आहे. तो आत्तासारखा इमारतीतला फ्लॅट नाहिये. चिंटू, मिनी, पप्पू हे अधूनमधून कट्ट्यावर, ओट्यावर बसून गप्पा मारताना दिसतात. त्यांचा खेळायच्या जागा, आजूबाजूच्या गोष्टी हे अगदी तंतोतंत आमच्या लहानपणीच नसलं तरी सगळं कुठेतरी परिचयाचं आहे.

'चिंटू' मधली बाकीची जी पात्र आहेत, त्यातली काही अगदी सुरुवातीपासून होती की काही नंतर आली. तुम्ही ह्यासंदर्भात आधीपासूनच काही ठरवून ठेवलं होतं की काळाबरोबर ती फुलत/स्पष्ट होत गेली ?

'चिंटू' मधली सगळी पात्र ह्या सगळ्या व्यक्ती नसून प्रवृत्ती आहेत. उदाहरणार्थ पप्पू. आपल्या आजूबाजूला एखादा मित्र हमखास असतो जो नेहमी आपल्याबरोबर असतो, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला साथ देतो. पण योग्य वेळी आपल्याला टोकतोदेखील. त्यामुळे त्याचं पात्र हे आधीपासून पूर्णपणे लिहून ठेवायची गरज नव्हती. चिंटूच्या मित्रमंडळींमध्ये एका वेंधळ्या मित्राची गरज नंतर वाटली . म्हणून मग बगळ्याचे पात्र आणले गेले. अनेकांनी आपल्या आजूबाजूला बगळ्या निश्चितपणे पाहिला असेल. एकूण प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना 'चिंटू' ही मालिका जवळची वाटण्यासाठी त्या त्या वयोगटातलं एखादं तरी पात्र 'चिंटू'मध्ये दिसतं. कधीकधी मनात येत गेलं तसं किंवा गरज लागेल तसं त्याला वळण दिलं, पण आधीपासून ठरवून काहीच ठेवलेलं नव्हतं.चिंटू कधी मोठा होणार का? किंवा त्याला भविष्यात एखादं त्याच्यापेक्षा जास्त खट्याळ भावंडं यायची शक्यता आहे का?

अरे, एकट्या चिंटूचाच 'दंगा' आम्हांला भारी पडतोय, त्यात आणखीन भावंडं कुठे ? आणि दुसरं म्हणजे हल्लीच्या काळात २ -२ मुलं असणं परवडलं पाहिजे ना चिंटूच्या आई वडिलांना. :) 
'चिंटू'ची पूर्ण मालिका ही सगळ्यांना जवळची वाटली पाहिजे, तसेच ती कालानुरूप असली पाहिजे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. 'चिंटू' जेव्हा सुरु झाली, साधारण तेव्हापासून साधारण single child family ह्या संकल्पनेची सुरुवात झाली होती. आतातर अशाप्रकारची कुटुंबं सर्रास बघायला मिळतात. शिवाय 'सोनू' हे जे पात्र आहे ते चिंटूपेक्षा लहान आहे. त्यामुळे चिंटूपेक्षा वयाने लहान पात्राची जागा सोनू भरून काढू शकतो. त्यामुळे चिंटूला भविष्यात भावंडं यायची आत्तातरी शक्यता दिसत नाही.
चिंटू मोठा होणार का हा प्रश्न आम्हाला नेहमीच विचारला जातो. वास्तविक चिंटू जर वाढत्या वयाचा दाखवला असता तर सुरुवातीपासूनचा काळ लक्षात घेता तो आतापर्यंत लग्नाचा झाला असता. :)
शिवाय ह्या मालिकेत प्रत्येक वयोगटातले लोकं स्वतःला बघू शकतील असे एक तरी पात्र आहे. जसं मघाशी म्हंटलं तसं लहान मुलांसाठी 'सोनू' आहे, कॉलेजमधल्या वयोगटासाठी 'सतीशदादा' आहे. आई-पप्पा आहेत, जोशीकाकू आहेत, आज्जी आजोबा आहेत. त्यामुळे चिंटूचं वय वाढलच पाहिजे, असं काही नाही. ह्याशिवाय चिंटू जरी वयाने मोठा होतं नसला तरी त्याच्या आजूबाजूचं वातावरण हे कालानुरुप बदलतं आहे. सुरुवातीला इंटरनेट, मोबाईल फोन ही माध्यमं आपण वापरत नव्हतो, लहान मुलं कॉंप्युटरवर गेम खेळत नव्हती. पण गेल्या काही वर्षांमधले हे बदल 'चिंटू' मालिकेतही दिसतात. आता चिंटूच्या घरी काँप्युटर आहे, चिंटूच्या पप्पांकडे मोबाइल आहे. चिंटूला ह्या दोन्ही गोष्टी वापरायचं चांगलं ज्ञान आहे. हे सगळं आत्ताच्या काळातल्या चिंटूच्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसून येतं. चिंटूचं वय कधी वाढत नाही पण त्याच्या आजूबाजूचं वातावरण कालानुरूप बदलतय आणि यापुढेही नक्कीच बदलेल. आणि ह्या बदलांमुळेच 'चिंटू' मालिकेतला ताजेपणा, टवटवीतपणा हा नेहमीच टिकून रहायला मदत होते. 

रोजच्या 'चिंटू'ची साधारण निर्मितीप्रक्रिया काय असते? तसच तुमच्या कामांची साधारण विभागणी झालेली आहे का? चित्र काढणे, शब्द लिहिणे इ. ?

रोजचा 'चिंटू' तयार व्हायला साधारण ४ तासांचा वेळ लागतो. आम्ही दोघं रोज भेटतोच. त्यावेळी कामाव्यतिरिक्त इतर घडामोडींबद्दलही बर्‍याच गप्पा होतात. किंबहूना बर्‍याचदा त्याच जास्त होतात !
अशाच गप्पांमधून काहीतरी विषय सुचतो आणि पुढे तो फुलत जातो. कधीकधी कल्पनेवरून चित्र बनवून त्यात सुधारणा केल्या जातात. लहानसहान बदल करून ते अधिकाधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ह्या सगळ्या कामांसाठी जरी साधारण ४ तास लागत असले तरी विचारप्रक्रिया तसं म्हटलं तर कायमच चालू असते. आजूबाजूला सतत कुठेतरी वावरत असणरा चिंटू शोधून काढणं हे ह्या विचारप्रक्रियेमुळे शक्य होतें आणि म्हणूनच ही विचारप्रक्रियाच जास्त महत्त्वाची असते.  कामाची विभागणी अशी काहीच केलेली नाही. परस्पर सामंजस्यावर आमचं संपूर्ण काम चालतं. कधीकधी तर काढलेली स्केचेस आणि लिखाण इतकं कच्च्या स्वरूपात असतं की, इतरांना ते पाहून काहीच अर्थबोध होतं नाही. तरी आम्हांला एकमेकांना ते काय आहे हे बरोबर समजतं. आमच्या घरचे आम्हाला चिडवतातही की, ह्या दोघांनी एकमेकांना कोरे कागद दिले तरी त्यात ह्यांना 'चिंटू' दिसेल !
आमच्या जबाबदार्‍यांमधली सीमारेषा खूपच धूसर आहे. एकमेकांच्या कामात आम्ही खूपच जास्त लुडबूड करतो आणि कदाचित त्यामुळेच चिंटू एकजिनसी होतो.

तुमचा साधारण क्रम काय असतो ? म्हणजे स्केचिंग करताना शब्द सुचतात की शब्द आधी ठरवून त्यावर स्केच काढता?

बरेचदा शब्द किंवा कल्पना आधी ठरवून मग त्यावर चित्र काढली जातात पण कधीकधी असं ही होतं की, स्केच काढता काढता एखादं स्केच सुरेख जमून जातं आणि मग ते मुख्य चित्रात वापरण्यासाठी त्यावर अनुरूप असे शब्द लिहिले जातात. पण ह्याबाबतही काही ठामपणे ठरवलेलं नसतं. शेवटी चितारलेला चिंटू चांगला आणि परिणामकारक होणं हे महत्त्वाचं !

रोजचा 'चिंटू' हा प्रसिध्द होण्याच्या किती आधी तयार होतो ? सर्वसाधारण विषयांवरचे काही 'चिंटू' तुम्ही आधीच तयार करून ठेवलेले असतात का ?

'चिंटू' सुरु झाल्यापासून आमचं ते स्वप्न आहे की २/३ महिने आधी भरपूर 'चिंटू' बनवून ठेवावे. पण ते अजून तरी शक्य झालेलं नाहिये. आम्ही जेव्हा 'सकाळ'च्या संपादकांना 'चिंटू' सगळ्यांत प्रथम सादर केला, त्यावेळी आम्ही ४/५ 'चिंटू'चे भाग तयार करून नेले होते. आमची अशी अपेक्षा होती की, संपादक आम्हांला सांगतील की आम्ही विचार करून कळवू किंवा पुढच्या महिन्यापासून सुरु करू. मग आपल्याला मध्ये वेळ मिळेल जेव्हा भरपूर चित्रं आधीपासूनच बनवून ठेवता येतील. पण त्यांचा प्रतिसाद फारच अनपेक्षित होता. त्यांनी आम्हांला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि नंतर परत ऑफिसमध्ये बोलावून सांगितलं की, "तुम्ही दाखवलेल्या चित्रांपैकी पहिलं उद्याच्या अंकात छापण्यासाठी पाठवून दिलंय. तर उद्यापासून इतक्या वाजेपर्यंत 'चिंटू' आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे!" त्या वेळेपासूनच आमचं खूप सारे 'चिंटू' आधीपासून बनवून ठेवायचं स्वप्न अधुरं राहिलय ते आत्तापर्यंत. फक्त गावाला जायचं असेल किंवा इतर काही अगदीच टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे वेळ देता येणार नसेल तरच आम्ही आधीपासून थोडीफार तयारी करून ठेवतो. अन्यथा आपल्याला 'सकाळ'मध्ये दिसणारा 'चिंटू' हा साधारण एक किंवा दोन दिवस आधी तयार झालेला असतो. अगदी ऐनवेळी काम केल्यामुळे विषयांमधला, कल्पनांमधला ताजेपणा टिकून रहायला मदत होते. तसेच आजूबाजूच्या घटना, घडामोडी ह्या सगळ्यांचा अंतर्भाव करणं सोप्पं जातं. शिवाय 'डेडलाईन'चं दडपण हे फक्त तुम्हां आयटीवाल्यांनीच घ्यावं असं काही नाही.. ते दडपण आल्याशिवाय काम चोख पार पडतच नाही. :)

चिंटू आता सुमारे १८ वर्षे सुरु आहे. ह्या वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी येणार्‍या प्रसंगांना, जसे सणवार (दिवाळी, गणपती), शाळा सुरु होण्याचा काळ, पावसाळा, नववर्ष इ .नवनवीन कल्पना लढवताना कधी अडचण जाणवली नाही का? किंवा कधी 'अजिबात काही सुचतच नाही' असा प्रसंग आलाय का?

चारूहास : तू जर बघितलंस तर हे सगळे प्रसंग, जसे दिवाळी, गणपती, स्वातंत्र्यदिन, पाऊस, परीक्षा ह्या सगळ्यांचं हळूहळू वातावरण तापायला लागतं. वृत्तपत्र, बातमीपत्र ह्यांमध्ये त्याबद्दलच्या बातम्या यायला लागतात. बाजारपेठा, दुकानं ह्या सगळ्यांवर ह्या गोष्टींचे परिणाम जाणवायला लागतात. त्यामुळे सतत आसपास असणारा 'चिंटू' ह्या प्रसंगांमधेही नवीन रुपात आजूबाजूलाच सापडतो. तसच 'चिंटू'मधून आम्ही कधीही उपदेश करत नसलो तरी प्रत्येकवेळी त्यात विनोदच असेल असंही नाही. कधी कधी चिंटू आणि त्याची मित्रमंडळी आजूबाजूच्या परिस्थिती वर एखादी त्यांच्या वयाला शोभेल अशी पण मार्मिक टिप्पणी करून जातात. आसपासच्या वातारवणाचा पारिणाम ह्या मंडळींवर दिसतोच. त्यामुळे ह्या नेमेची येणार्‍या प्रसंगांमध्येही नाविन्य राखता येतं.

प्रभाकर : काहीच सुचत नाही असं होत नाही. आपल्या रोजच्या जीवनातले साधे साधे क्षणदेखील आनंददायी असतात. फक्त ते तुम्हांला पकडता आले पाहिजेत आणि योग्य पध्दतीने मांडता आले पाहिजेत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर चौकात रस्ता शोधत असण्यार्‍या पाहुण्यांचा आणि चिंटू व मित्रमंडळींचा संवाद आम्ही एकदा दाखवला होता. वास्तविक हा प्रसंग आपणदेखील अनेकदा अनुभवतो, म्हणजे एकतर आपण कोणाला पत्ता विचारतो किंवा इतर कोणी आपल्याला पत्ता चिचारतं पण अशा साध्या प्रसंगांतही विनोद घडू शकतात आणि ते योग्य पध्दतीने आणि योग्य वेळी पकडता आले पाहिजेत आणि मांडता आले पाहिजेत.
आम्ही ह्या मांडणीबाबतही सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. तांत्रिक बाबींमधे नावीन्य आणायचा प्रयत्न करत रहातो. ह्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे साधारणपणे 'चिंटू' ३ चौकटींमधे दिसतो. पण आम्ही एका चौकटीपासून ते अगदी दहा चौकटींपर्यंतचेदेखील प्रयोग केले आहेत. ह्याशिवाय चिंत्रांमधले कॅमेर्‍याचे कोन, आता रंगीत 'चिंटू' सुरु झाल्यापासून विविध रंगांचे प्रयोग हेसुध्दा करून पाहिले आहेत. कधी नुसतीच चित्र, तर कधी नुसतेच शब्द असेही 'चिंटू' प्रसिद्ध झालेले आहेत. दिवे गेल्याच्या प्रसंगावरच्या चित्रामधे नुसतेच शब्द होते. बाकीची पूर्ण चौकट काळी होती. तरी तो 'चिंटू' ही खूप आवडल्याचे अभिप्राय आले. कित्येकांनी असं ही नमूद केलं की, चिंटू किंवा इतर पात्र दिसत नसूनही आम्ही ती पाहू शकलो. ह्या सगळ्यां तांत्रिक बाबींमधले फरक वाचकांच्या कित्येकदा लक्षातदेखील येत नाहीत, पण त्यातून त्यांना एक वेगळा, नवीन अनुभव नक्कीच मिळतो आणि आम्हालाही ह्या प्रयोगांचा 'चिंटू'मधला ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि तोचतोचपणा न येऊ देण्याच्या दृष्टीने खूपच फायदा होतो.

इतक्यावर्षांमधला तुमचा सर्वात आवडता 'चिंटू' कोणता ?

हा प्रश्नसुध्दा आम्हांला नेहमीच विचारला जातो पण दरवेळी आम्ही तो ऑप्शनलाच टाकतो. आत्तापर्यंत ५००० च्या वर 'चिंटू' ची चित्रं प्रसिद्ध झाली. त्यामुळे ह्या सगळ्यांमधून आवडता एक ठरवणं शक्यच नाही. शिवाय आम्ही रोज जो 'चिंटू' प्रसिद्ध करतो तो आमचा त्या दिवशीचा सगळ्यात आवडता असतो. तो 'चिंटू' जर आम्हांलाच आवडलेला नसेल, आम्हीच त्यातून आनंद घेउ शकत नसू तर तो आनंद आम्ही  इतरांनाही देऊ शकणार नाही. एकदा का आम्ही बनवलेलं चित्र वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं की, आम्ही त्यात फार अडकून पडत नाही. नाहीतर मग येणार्‍या पुढच्या चित्रावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आत्तापर्यंतचे सगळे 'चिंटू' हे आमचे आवडतेच आहेत.

पु.ल. देशपांड्यांचं निधन झालं त्याच्या दुसर्‍या दिवशी जो 'चिंटू' वृत्तपत्रात दिसला, तो सगळ्यांनाच खूप हेलावून गेला होता. त्या चित्राच्या मागची तुमची विचारप्रक्रिया काय होती ? तसंच त्यावेळचा तुमचा एकंदर अनुभव कसा होता?

पु.ल. हे महाराष्ट्रातल्या लहान थोरांचं दैवत होतं. आमच्यासारखे जे 'विनोद' ह्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी तर ते आदराचं स्थान होते. त्यांना 'चिंटू'च्या माध्यमातून आदरांजली वाहणं हे आम्हांला आवश्यक वाटलं. शिवाय अशा भावना एखाद्या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करणं हे खूप मोठं आव्हान होतं, कारण व्यंगचित्रांमधून व्यक्त होणार्‍या ह्या भावनांचा कधीही विपर्यास होऊ शकतो / केला जाऊ शकतो.

कधीकधी आपल्याला झालेलं दु:ख हे शब्दांमधूनच व्यक्त करावं लागतं असं नाही. मुकपणे, निशःब्दपणेही ते समोरच्याला समजते. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 'चिंटू'मध्ये चिंटू पाठमोरा होता, तसेच नि:शब्द होता. पण तरीही त्याच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील, मनात काय विचार चालू असतील हे वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचलं. वाचकांच्या प्रतिक्रिया चिकार आल्या. अगदी सकाळपासून सुरु झालेला फोन दिवसभर वाजत होता. एका वाचकाने कळवलं होतं की 'सकाळ'मध्ये पु.लं. देशपांड्यांच्या निधनाची बातमी वाचून वाईट वाटलं पण चिंटूला असं नि:शब्द झालेलं बघून डोळ्यात पाणी आलं.
हा प्रसंग दु:खी होता पण आमच्या कलेच्या माध्यमातून योग्य ती आदरांजली वाहिल्याचं समाधान आम्हांला मिळालं.'चिंटू' आवडतो असं सांगणार्‍या अनेक प्रतिक्रिया येतच असतील पण कधी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत का?

'चिंटू' चा वाचकवर्ग हा बराच मोठा आहे. त्यात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतले वाचक येतात. कधीकधी एखादा 'चिंटू' हा लहान मुलांसाठी बनवलेला असतो तर कधी मोठ्यांसाठी. मोठ्या वयाचा वाचकवर्गाला एकदम आवडून जातो असा विनोद कधीकधी लहान मुलांना कळतच नाही. किंवा अगदी लहान वयाच्या मुलांना खूप आवडेल असा विनोद मोठ्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे कधीकधी नकरात्मक प्रतिक्रिया उमटू शकते, पण ती तेवढ्यापुरतीच असते. आणि आम्ही आधी जसं म्हटलं की, चांगल्या प्रतिक्रियांमधे जास्त वेळ अडकून पडता येत नाही कारण त्यामुळे येणार्‍या पुढील चित्रांवर परिणाम होतो. तसच अशा नकारात्मक प्रतिक्रियांमध्येही फार काळ अडकून न पडता आम्ही पुढच्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. कधीकधी असही होतं की, तुम्ही नेहमीच सगळ्यांनाच हवं ते देऊ शकत नाही. त्यामुळे ते मागे ठेवून पुढे जायलाच हवं आणि पुढचं काम अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल, हे पहायला हवं.

तुम्ही दोघेही मुळचे पुण्यातले. मग तुमचा चिंटूही पुण्यातला पुणेकरच का?

तुला तसं वाटतं का ? 
आम्हांला बरेच जण विचारतात की चिंटू कोणत्या गावचा? त्याचं आडनाव काय?
मुळात चिंटूच्या वयाचे असताना आपल्याला आडनावाची खरच 'गरज' असते का? ते सगळं नंतर कधीतरी आपल्याला येऊन चिकटतं. लहान मुलांमधली मैत्री ही निरागस असते. लहान मुलं आडनाव, जातपात, धर्म, प्रांत हे काहीही लक्षात न घेता एकमेकांमध्ये मिसळून जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम होत नाही. आणि त्यामुळेच चिंटूला आडनाव नाही. तसच तो कोणत्याही विशिष्ट शहरातला नाही, विशिष्ट धर्माचा नाही. तुम्ही कुठल्याही शहरात जा, कुठल्याही घरात जा, प्रत्येक लहान मुलाचे आईवडील त्याला चांगलं वळण लावायचा प्रयत्न करतात, अभ्यास कर, म्हणून रागवतात, सगळ्या भाज्या खा म्हणून आग्रह करतात, लाड, कौतुकही करतात. तसच प्रत्येक लहान मूल दंगा करतं, मित्र मैत्रिणींबरोबर मस्ती, भांडण करतं, आईवडिलांकडे हट्ट करतं, आज्जी आजोबांकडून हक्काने लाड करून घेतं. त्यामुळे चिंटूला आडनाव, जातपात, धर्म, शहर हे असण्याची गरजच नाही. आणि म्हणून सगळ्यांनाच तो आपला वाटतो. 'चिंटू'मध्ये फक्त एकच 'जोशीकाकू' आडनाव असलेलं पात्र आहे. पण तिथेही दुसरं काहीही आडनाव असतं तरी त्याने काहीच फरक पडला नसता. कारण 'जोशीकाकू' ही एक विशिष्ट व्यक्ती नसून एक सगळीकडे आढळणारे 'शेजार' आहे. प्रसंगी त्या मुलांना रागवतात, वेळ आली की लाड करतात, खाऊ देतात. अशाप्रकारचे शेजारी आपल्यापैकी अनेकांना असतील. हल्ली 'चिंटू' कर्नाटकातल्या एका वृत्तपत्रातही प्रसिध्द होतो. तिथेही हीच सगळी पात्र आहेत. शिवाय हिंदी, इंग्रजी, गुजराथी ह्या भाषांमधेही 'चिंटू' तयार होतो. त्या त्या भाषेचा बाज संभाळावा लागतो पण शेवटी 'चिंटू' सगळीकडे सारखाच आहे.मध्यंतरी 'चिंटू' दृक्-श्राव्य माध्यामातही आला होता. त्याबद्दलचे पुढचे प्लॅन काय? त्यावेळची प्रतिक्रिया काय होती?

एखादं व्यंगचित्र जेव्हा दृक्-श्राव्य माध्यमात लोकांसमोर पहिल्यांदा येतं तेव्हा सुरुवातीला लोकांना त्याचा आवाज 'ऐकायची' सवय नसते. कारण स्वत: वाचताना मनात आपण एकप्रकारचा आवाज त्यांना दिलेला असतो. त्यामुळे असा आवाज सवयीने पचनी पडतो. आम्ही दृक्-श्राव्य माध्यमातून आणलेला 'चिंटू' हा एक प्रयोग होता आणि आता त्यावर काम चालू आहे. अनेक पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. मग ह्यात कार्टून फिल्म, व्हिडीयो गेम, मोबाईल फोनवर दिसू शकतील असे व्हिडीयो ते चित्रपट अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्याबद्दल आधिक माहिती आत्ता ह्या घडीला देता येणार नाही पण लवकरच काहीतरी ठरेल आणि 'चिंटू' वाचकांसाठी नवीन अनुभव घेऊन येईल.

परदेशी व्यंगचित्र ही वृत्तपत्रांशिवाय चित्र, मग, स्टिकर, टीशर्ट, टोप्या अशा विविध माध्यमांमधूनही आपल्याला दिसत असतात. 'चिंटू'बद्दल तशा काही योजना आहेत का?

नक्कीच. सध्या 'चिंटू'ला दृक्-श्राव्य माध्यमातून पुढे आणणे, ह्यावर आमचं मुख्य काम चालू आहे. सध्याच्या काळात त्यासाठी टिव्ही, इंटरनेट, मोबाईल अशी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. पण हे आम्ही मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता देशपातळीवर हे करण्याचा विचार सुरु आहे. 'चिंटू'ची पुस्तकं पण प्रसिद्ध होतातच. आत्तापर्यंत ३३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि अजून तीन नवीन लवकरच येणार आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात 'चिंटू'ची स्टिकर्स यायची. पण त्यावेळी आपल्या इथली बाजारपेठ अशा गोष्टींसाठी तयार झालेली नव्हती. आताच्या परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी बाजारपेठ ही अनुकूल आहे आणि 'चिंटू'च्या ब्रँडनेही चांगलाच जम बसवलाय. त्यामुळे योजना भरपूर आहेत आणि लवकरच त्याबद्दल वाचकांना कळेल.

'चिंटू'विषयी आलेल्या आणि तुमच्या विशेष लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया आणि अनुभव कोणते?

येणार्‍या प्रतिक्रियांमधे अडकून न राहता पुढे जायचं असं म्हटलं तरी काही काही अनुभव/ प्रतिक्रिया लक्षात रहातातच. 'चिंटू'ची सुरुवात झाली तेव्हाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातल्या कर्माळा गावातून एका आजोबांचं पत्र आलं होतं, "मला नातवंडांची खूप आवड होती आणि आता मला माझा नातू मिळाला".
मागे एकदा आम्ही मुलींच्या अंधशाळेत गेलो होतो. तिथल्या शिक्षिकांनी सांगितलं की, सगळ्या मुलींना रोज सकाळी सगळ्यात आधी 'चिंटू' वाचून दाखवावा लागतो. नंतर त्या मुलींनी 'चिंटू'मधले काही काही प्रसंग अभिनित करून दाखवले. दृष्टीहीन अशा त्या मुलींपर्यंत देखील आमचा चिंटू पोहोचलेला पाहून आम्हांला खूपच समाधान वाटलं. ह्याशिवाय बर्‍याच लहान मुलांचे पालक सांगतात की, आमची मुलं अजिबात मराठी वाचायची नाहीत, 'चिंटू'च्या निमित्ताने ती वाचायला लागली. अशा प्रतिक्रीया मिळाल्या की पुढचे काम करायचा उत्साह खूपच वाढतो.

'चिंटू' शिवाय तुम्ही वुडकार्व्हिंगचं ही काम करता असं रोहितकडून समजलं. त्याबद्दल आम्हांला अधिक जाणून घ्यायला आवडेल.

चारुहास : अगदी सुरुवातीला शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही नोकरी करत होतो. त्यात पैसे कमी मिळतात म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आम्ही अ‍ॅड एजंसी चालवत असू. नंतर 'चिंटू'चं काम चालू झालं.
अ‍ॅड एजंसीमध्ये पैसे चांगले मिळत असले तरी कलाकार म्हणून जे एक मानसिक समाधान मिळालयला हवं ते मिळत नाही, कारण तिथे दुसर्‍याच्या मताप्रमाणे काम करावं लागतं. हा विचार प्रबळ होत गेला आणि कलेची भूक भागवण्यासाठी वुडकार्व्हिंग सुरु केलं. नोकरी मागेच सोडली होती, पुढे अ‍ॅड एजंसी पण बंद केली आणि आता पूर्णवेळ 'चिंटू' आणि वुडकार्व्हिंग असं काम सुरु आहे. वुडकार्व्हिंगचं हे काम संपूर्ण भारतात आमच्याखेरीज इतर कोणीही करत नाही.
लाकूड वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतं. लाकडाचे हे नैसर्गिक रंग जतन करून त्यावर आम्ही लेझरच्या साहाय्याने कोरीव काम करतो. ह्यातून तयार होणारी कलाकृती ही अस्सल भारतीय दिसते आणि शिवाय अतिशय नवीन अशी ही कल्पना आहे. हे कामही आम्ही सुरु केल्यानंतर हळूहळू फुलत गेलं. वेगवेगळ्या आयटी कंपन्या त्यांच्या परदेशी ग्राहकांना भेट म्हणून देण्यासाठी आमच्याकडून हे कोरीवकाम केलेले शोपिस घेतात. हे सगळं काम सृजन आर्ट च्या रुपात चालवलं जातं आणि ह्यात माझी पत्नी भाग्यश्री हीचादेखील सहभाग आहे.

व्यंगचित्र काढण्याची कला ही दिसायला सोपी वाटते पण प्रत्यक्षात खूपच अवघड आहे.  व्यंगचित्रकारीता ह्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायच्या दृष्टीने कोणत्या गोष्टीं महत्त्वाच्या आहेत?

भारतात कुठेही व्यंगचित्रकारीतेचं शिक्षण उपलब्ध नसल्याने ही कला आपली आपणच शिकावी लागते. तसच व्यंगचित्र हे माध्यम अतिशय संवेदनशील आहे. ते नीट हाताळलं नाही तर कोणीही दुखावलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे खुल्या नजरेने, मोकळेपणाने बघणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळेच लहानसहान गोष्टींमधून आपल्याला आनंद घेता येतो तसच तो दुसर्‍याला देता येतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या घडामोडींबद्दल सतर्क रहावं लागतं, भरपूर वाचन करावं लागतं, विनोदबुद्धीला संवेदनशीलतेची जोडही असावी लागते. व्यंगचित्रांमघले संवाद लिहिण्यासाठी भाषेवर, लिखाणावर प्रभुत्त्व असावं लागतं. कमीत कमी शब्दांत योग्य तो संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणं ह्यामुळे शक्य होतं. तांत्रिक बाबी बघता रेखाटनांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. ह्या विषयाचा आवाका खूपच मोठा आहे आणि शिक्षणापेक्षा अनुभवातूनच जास्त हे शिकता येते.

रोजच्या वृत्तपत्राचा अविभाज्य भाग बनून गेलेल्या आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन कार्यातून दोन हलके फुलके क्षण देऊन जाणार्‍या ह्या छोट्याश्या 'चिंटू' मागे एव्हडी मेहेनत, विचारप्रक्रिया आहे हे चारूहास आणि प्रभाकर ह्यांच्याशी झालेल्या ह्या गप्पांमधून समजलं आणि 'चिंटू' अधिकच आवडू लागला. मायबोलीकरांसाठी वेळ दिल्याबद्दल मी चारूहास आणि प्रभाकर ह्यांचे आभार मानून आणि 'चिंटू'च्या आगामी सर्व योजनांना शुभेच्छा देऊन ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले
इतर साहाय्य: रोहित पंडित, पूनम छत्रे
----
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित
http://www.maayboli.com/node/10453

बालरंजन केंद्राच्या संस्थापिका सौ. माधुरी सहस्रबुध्दे

परिचितांमधले अपरिचित : बालरंजन केंद्राच्या संस्थापिका आणि संचालिका सौ. माधुरी सहस्रबुध्दे

काही काही लोकं ही आपल्या दैनंदिन कामामधून, इतर व्यापांमधुन वेळ काढून आपली कला/आवड उत्तम प्रकारे जोपासतात, समाजसेवेची कास धरतात किंवा केवळ छंद म्हणून सुरू केलेली एखादी गोष्ट अगदी वैश्विक पातळीवर घेऊन जातात. आणि ह्या व्यक्ती आपल्या रोजच्या परिचयातल्या असूनही त्यांची ही अपरिचित बाजू म्हणजेच त्यांची कला किंवा कार्याविषयीचा ध्यास, अभ्यास, प्रयत्न तसेच वेगवेगळे अनुभव ह्याबद्दल आपल्याला अगदी थोड्याच प्रमाणात माहिती असते. मायबोली गणेशोत्सवानिमित्त माझ्या अश्याच काही परिचितांची माझ्यासाठीही अपरिचित असलेली अशी बाजू जाणून घ्यायचा तसेच ती मायबोलीकरांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

*****************************************************

सहस्रबुध्दे कुटुंबाची ओळख पुणेकरांना आहे ती दोन कारणांनी. एक म्हणजे त्यांची 'सकस'ची वेगवेगळी पिठं आणि पुण्यात असलेल्या १० गिरण्या आणि दुसरं म्हणजे कर्वेरोडजवळच्या भारतीनिवास कॉलनीत मुलांनी फुललेलं 'बालरंजन केंद्र'. सकसचे कामकाज सांभाळणारे श्री. श्रीराम आणि बालरंजनच्या संस्थापिका आणि संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे हे माझे काका- काकू.
समाजकार्य म्हटलं की ते केवळ वंचितांसाठी करायचं अशी एक समजूत असते. परंतु आजची विभक्त कुटुंबपध्दती, पालकांचा मुलांशी कमी झालेला संवाद, शिक्षणातली जीवघेणी स्पर्धा ह्या सगळ्यांमुळे सुखवस्तू घरातील मुलंही मनसोक्त खेळायच्या संधीला मुकतात, एकलकोंडी होत जातात. मुलांनी संध्याकाळचा वेळ मैदानावर घालवावा ह्या अपेक्षेतून 'शरीराला व्यायाम आणि मनाला शांतता' हे सूत्र ठरवून बालरंजन केंद्राची स्थापना माधुरीकाकूने १९८८ मध्ये केली. बालरंजन केंद्राच्या संकल्पनेपासून ते व्यवस्थापनापर्यंतचे संपूर्ण काम सांभाळणार्‍या आणि 'सकस'च्या कामकाजातही सक्रिय सहभाग घेणार्‍या माधुरीकाकूचे व्यक्तिमत्त्व अतिशय हरहुन्नरी. ह्या दोन मोठ्या व्यापांमधून वेळ काढून तिने सुजाण पालक केंद्र, पपेट शो आणि बालनाट्यांचे प्रयोग, स्वतःचा छंद म्हणून पत्रकारितेचा तसेच बागकामाचा अभ्यासक्रम आणि शिवाय वेळात वेळ काढून केलेली भटकंती ह्या सगळ्या गोष्टीही समर्थपणे निभावल्या. तिच्या सगळ्या कार्याची माहिती मायबोलीकरांना करून देण्यासाठी मायबोली गणेशोत्सवानिमित्त माधुरीकाकूशी साधलेला हा संवाद.बालरंजन केंद्राची सुरुवात कशी झाली आणि त्यामागची मूळ संकल्पना काय ?

साधारण २२ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी माझा मोठा मुलगा सलिल ८ वर्षांचा होता तर धाकटा निखिल ५ वर्षांचा. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते थेट पदवीधर होईपर्यंत प्रत्येक संध्याकाळ मैदानावर घालवणार्‍या मला, माझ्या मुलांनी संध्याकाळी घरी बसणं पटण्यासारखं नव्हतं. म्हणून मी सलिलला ग्राऊंडला घातलं. तिथे पोचवण्या-आणण्याकरता रिक्षाही लावली. पण रिक्षा दाराशी आली की हा रडायचा. कधी त्याच्या पोटात दुखायचं तर कधी शी लागायची. एकंदरीत ग्राऊंड हे प्रकरण त्याला आवडत नव्हतं कारण तिथला पूर्ण वेळचा शारीरिक व्यायाम त्याला मानवत नव्हता. त्याउलट गाणी म्हणणे, गोष्टी ऐकणे, चित्र काढणे, हस्तकला, बैठे खेळ ह्यात तो रमत असे. माझ्या मुलाच्या गरजा असलेलं असं ग्राऊंड कुठे मिळालं तर किती बरं होईल असा विचार मनात आला. पण मग माझ्या अपेक्षा पूर्ण करणारं, जिथे थोड्या व्यायामाबरोबरच अनेक गंमती-जमती असतील असं ग्राऊंड इतर कोणी दुसर्‍याने सुरु करण्यापेक्षा मीच का सुरू करू नये असंही वाटून गेलं.  शिवाय मला जर माझ्या मुलाच्या ह्या गरजा आहेत असं जाणवतंय तर अशी इतरही अनेक मुलं असतील ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतील असंही वाटलं. आमच्या सोसायटीचं मोकळं मैदानही जवळच होतं त्यामुळे जागेचा प्रश्न सुटल्याने ह्या विचाराला बळकटी आली. त्यातच माझं मानसशास्त्र, सोशलवर्क आणि संपर्क माध्यमाचं शिक्षणही गाठीशी होतं. पण केवळ मला वाटून किंवा माझ्याकडे संबंधित विषयांचं ज्ञान असून भागणार नव्हतं, तर त्याची गरज परिसरातल्या लोकांना, पालकांना खरंच वाटते आहे का हेही बघणं आवश्यक होतं. मग मी पाहणी (सर्वे) करायला सुरुवात केली. आमची वसाहत ही साधरण १९६० ते ६३ दरम्यान वसली होती. त्यावेळी जी मंडळी इथे रहायला आली त्यांची नातवंडे आता ३ ते १२ वयोगटात होती. म्हणजेच माझ्या ईप्सित केंद्राला नक्कीच वाव होता. मग माझ्या मनाने उचल घेतली की हे ग्राऊंड सुरु करायचं. २३ जानेवारी १९८८ रोजी माझी मुलं सलिल आणि निखिल, त्यांचे समोरच रहाणारे दोन मित्र सिद्धार्थ आणि आदित्य अशा चार मुलांना घेऊन मी बालरंजन केंद्र सुरु केलं.

ह्या केंद्राला प्रतिसाद कसा होता ? आजुबाजूच्या लोकांकडून सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया आल्या असतील ना?

बाकीच्यांच कशाला, कुठल्याही मराठी माणसाच्या मनात अपयशाची जेवढी भीती असते तेवढी मला स्वतःलाही होतीच. आपण मारे सुरु करू पण बंद पडलं तर? कोणी आलंच नाही तर? असे विचार माझ्या मनातही अनेकदा येऊन गेले. माझ्या काही मैत्रिणींनी "प्रत्येक संध्याकाळ कमिट करणं जमणार नाही, नवरा मुलं ह्यांच्या बरोबर संध्याकाळी फिरायला जायचं, सणवार साजरे करायचे, झालंच तर भिशी, मैत्रिणींची पार्टी असं काही करायचं हे सोडून ग्राऊंड कुठे..." असं सांगत सरळ नकार दिला. तर आसपाच्या काही ज्येष्ठ मंडळींनी "ह्याची गरजच काय? आम्ही नाही का लहानाचे मोठे झालो..तेव्हा कुठे होती अशी ग्राऊंडं?" असं म्हणत विरोध नोंदवला.
पण केंद्र सुरू झाल्यानंतर हळूहळू मुलांची संख्या वाढायला लागली. मग येणार्‍या शिक्षिकाही (ज्यांना सगळी मुलं "ताई" म्हणतात)  वाढायला लागल्या. महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या आपल्या मुलांना सोडायला यायच्या त्याच पुढे ताया म्हणून यायला लागल्या कारण आपल्या मुलाला ह्याचा फायदा होतोय हे लक्षात आल्यावर त्यांचा बालरंजनमधला रस तसेच सहभाग वाढला. "आपल्या सुनांना ही बिघडवत्ये” असं वाटण्यार्‍या तायांच्या सासवाही पुढे आपल्या नातवंडांचे कार्यक्रम पहायला कौतुकाने हजेरी लावू लागल्या. बालरंजन केंद्राचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मुलांनाही केंद्राची गोडी लागली. मुलं मित्रमैत्रिणींचे वाढदिवस, घरातले सणवार यापेक्ष्या अधिक प्राधान्य ग्राऊंडला देतात असं पालकांकडून माझ्यापर्यंत पोचतंच होतं. शिवाय त्याकाळी आमच्या घरी फोन नाही, माझ्याकडे स्वतंत्र वाहन नाही, आम्ही जास्त कुठे गावाला जात नाही ह्या गोष्टींबद्दल मी कुरकुरायची. पण बालरंजन केंद्र सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पथ्यावरच पडल्या. घरापासून ग्राऊंड २ मिनिटांच्या अंतरावर असल्याने मला वाहन लागलंच नाही आणि फार कुठे बाहेरगावी जाणं होत नसल्याने माझ्या अनुपस्थितीचा प्रश्नच उद्भवला नाही. मैदानावर अगदी कु़णीही नसलं, मुलं किंवा ताया, तरी मी तिथे असणारच असं ठरलेलंच होतं. अगदी भरपावसातही मी तिथे उपस्थित असे. त्यामुळे सुरुवातीला जरी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तरी त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पुढे केंद्राला मिळणारा प्रतिसाद इतका वाढला की सध्या एकावेळी ३५० मुलं आहेत आणि शिवाय ६० ते ७० मुलं प्रतीक्षायादीत आहेत!

सलिलच्या ज्या गरज्या तुला प्रातिनिधीक म्हणून लक्षात आल्या त्या आधी कोणालाच जाणवल्या नसतील का किंवा पूर्वीच्या काळच्या मुलांच्या बाबतीत असे प्रश्न पडत नसावेत का?

पूर्वीचा काळातील मुलंही या ना त्या प्रकारे आपलं मन रमवतच होती. त्यावेळी पालकांना मुलांकडे द्यायला खूप वेळ होता असंही नाही आणि आजइतकी पाल्याबाबतची जागरुकताही नव्हती.एकत्र कुटुंबात काही व्यक्ती अशा असायच्या की ज्यांच्याकडे खूप वेळ असे. त्यांची आणि मुलांची चांगली गट्टी जमत असे. त्यामुळे सुट्ट्यांदरम्यान त्यांच्यावर कुटुंबातल्या मुलांची जबाबदारी येत असे. ह्या व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे तसेच वकूबाप्रमाणे ह्या मुलांना निरनिराळे अनुभव देत आणि मुलांची जडणघडण होई. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न असे केले जात नसावेत. सुट्टीत घरात बसवलेलं नाटक असो, शनिवारवाडा किंवा पर्वतीची सहल असो, अंगणात सर्वांनी एकत्र जमून केलेलं पॉटमधलं आईस्क्रिम असो किंवा दिवाळीचा किल्ला असो त्यातला अनुभव महत्त्वाचा. पण आता विभक्त कुटुंब पध्दतीत मुलांसाठी वेळ देणारं, मुलांना गाणी-गोष्टी सांगणारं, पुस्तकं वाचून दाखवणारं, लक्ष ठेवणारं असं कोणी असेलच असं नाही आणि त्यामुळेच बालरंजन केद्रांची गरज बर्‍याच पालकांना आता जाणवली. मोठेपणी आठवण्यासाठी आता अनेक आनंदक्षण आपल्या स्मरणकुपीत साठवून ठेवूया असं आमच्या बालरंजन केंद्राचं उद्दिष्ट आहे. आज वेळेअभावी, नियोजनाअभावी जे आनंदक्षण पालक आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत ते संघटितरीत्या देण्यासाठी हा उपक्रम आहे.

Mulakhat_Photo_2.JPG

बालरंजन केंद्रातल्या रोजच्या activites चं स्वरूप काय असतं ?

हल्ली शाळा, गृहपाठ, शिकवणी, तिथला गृहपाठ आणि शाळेत तसे शिकवणीला येण्याजाण्याच्या वेळा पाळण्याचे कष्ट ह्या सगळ्याचा मुलांच्या मनावर ताण येतो. हा ताण हलका करण्यासाठी तसेच मुलांचं मूलपण वाचवण्यासाठी मुलांना मनसोक्त खेळता आलं पाहिजे. खेळ खेळल्यामुळे ताकद, गती, लवचिकता, चिकाटी व समायोजन या पातळ्यांवर मुलांचा शारीरिक विकास होतो. बालरंजन केंद्रात सुरुवातीला व्यायाम, त्यानंतर खेळ, मग गाणी, गोष्टी, प्रार्थना, प्राणायाम यामुळे शरीर दमून तर मन शांत होऊन मुलं घरी जातात.  व्यायाम तसचं खेळामुळे उत्साहीत झालेली मुलं प्राणायामामुळे शांत होतात आणि घरी जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणून खेळाबरोबरच प्राणायाम, प्रार्थना ह्यांनाही तितकंच महत्त्व आहे.  ह्या सगळ्यामध्ये स्पर्धेचा ताण नाही, तर सहभागाला महत्त्व दिलं जातं.  उपक्रमांच्या संख्यपेक्षा त्यातून मुलांपर्यंत नेमकं काय पोचतंय याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे कार्यक्रमांना, उपक्रमांना तोटाच नाही. उदाहरण द्यायचं तर मध्यंतरी आम्ही पौर्णिमेच्या रात्री ८ ते १५ वर्षे वयोगटातल्या साधारण ४० मुलांना राजाराम पूल ते सिंहगड पायथा अशा सुमारे २८ किलोमीटरच्या Moon light walk ला घेऊन गेलो होतो. रात्री १२ला निघून पहाटे ५च्या सुमारास सिंहगड पायथ्याशी पोचलो. बरोबर बस असूनही सगळे जण पूर्ण अंतर चालले. ह्यातून मुलांच्या क्षमता ताणल्या गेल्या आणि एक आयुष्यभर लक्षात राहिलेला अनुभव त्यांना मिळाला. ह्यानंतर मुलांचा आत्मविश्वास खूप वाढला असं आम्हाला जाणवलं. तसंच एकदा आम्ही मुलांचा गट घेऊन लॉ कॉलेज मैदानावरचा १४ किलो कचरा गोळा करून त्याचं वर्गीकरण केलं आणि योग्य जागी पुर्ननिर्मितीसाठी नेऊन दिला. त्यावर मुलांशी चर्चा केली. आमच्या मैदानावर आता एकही कगदाचा कपटाही शोधून सापडत नाही. शेवटी संस्कार म्हणजे काय, तर एखाद्या अनुभवाचा मुलांच्या मनावर उमटलेला ठसा. कारण ह्याच ठश्याशी मुलं नंतर येणारे अनुभव पडताळून बघतात. ह्यासाठी मुलांवर काहीही लादायची गरज नाही तर योग्य ते अनुभव त्यांना देणं गरजेचं असतं.

मुलांबरोबर काम करत असतानाचा अनुभव कसा आहे?

केंद्राच्या निमित्ताने मुलांबरोबर काम करताना आम्ही तायाही मुलांबरोबरच वाढतोय, बदलतोय, नविन गोष्टींचा अनुभव घेतोय. खूपदा आपली गृहितके चुकत आहेत की काय असंही जाणवतं. आपण योजलेल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. त्यांचं हे न आवडणंही पचवायला शिकतोय. नव्या जोमाने वेगळ्या गोष्टींची आखणी करतोय आणि आपणच समृध्द होत जातोय हा अनुभव अनुभव अनोखा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर.. एकदा मी ३ ते ५ वयोगटातील मुलांना लांब ढांगा टाकत पळण्याचं महत्त्व सांगत होते. लांब ढांगा टाकल्यास आपण जास्त अंतर कापू शकतो याचं प्रात्यक्षिक प्रोफाईलमध्ये करून दाखवत होते. मग मी मुलांना विचारलं "हरीण पळताना कोणी पाहिलंय?"
"ताई, मी !" विनित म्हणाला.
"कुठे पाहिलंस?" मी विचारलं.
"टीव्हीवर." इति विनित.
"मग कसं बरं पळतं हरीण?" असा प्रतिप्रश्न त्याला करून तो काही कृती करून दाखवेल ह्या अपेक्षेने मी त्याच्यकडे पाहिलं. "पी.टी. उषा सारखं !" विनित क्षणात म्हणाला.
पी.टी. उषा हरणासारखी पळते ह्या माझ्या डोक्यातल्या गृहीतकाला विनितने हरीण पी.टी. उषासारखं पळून चांगलाच धक्का दिला होता !
अजून एक किस्सा सांगायचा तो म्हणजे मुग्धाचा. ती नव्यानेच केंद्रात यायला लागली होती. मुग्धाची आई मला मुद्दाम भेटायला आली होती. "ताई, तुमच्या केंद्रात इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं जास्त आहेत असं ऐकलं. माझी मुग्धा मराठी शाळेत जाते. तिला त्याचा फारच न्यूनगंड आहे. म्हणून मुद्दाम तुमच्या कानावर घालायला आले."
दोनच दिवसात मला संधी मिळाली. जरा लवकरच खेळ संपवून मुलं प्रार्थनेला बसली होती. अजून १० मिनिटे शिल्लक होती. मी लगेच पाढ्यांची स्पर्धा घोषित केली. मराठी माध्यमाची मुलं विरुध्द इंग्रजी माध्यमाची मुलं. ह्या पाढ्यांच्या स्पर्धेत मराठी माध्यमाच्या गटाने बाजी मारली. मुग्धाची छाती अभिमानाने फुगली, हम भी कुछ कम नही! ह्या एकाच प्रसंगाने तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. त्यानंतर मुग्धा जी ग्राऊंडला येत राहिली ती थेट दहावीत प्रवेश करेपर्यंत.
हल्लीच्या "फास्ट चॅनल सर्फिंग" च्या जमानातल्या ह्या मुलांना सतत नविन गोष्टी हव्या असतात. त्याच त्या गोष्टींमधे, खेळांमधे ह्यांचं मन फार काळ रमत नाही. त्यामुळे सतत नविन देण्याचं एक प्रकारचं आव्हानच आमच्यासमोर असत.
Mulakhat_Photo_1.JPG

हल्ली सगळीकडे 'जनरेशन गॅप' विषयी बोललं जातं, इतक्या सगळ्या मुलांशी बालरंजन केंद्राच्या निमित्ताने संबंध येत असताना तुला असा अनुभव कधी आला का?

हो नक्कीच. आपल्या मुलांना वाढवताना पालक त्यांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवत असतात. आपल्याला त्या काळी जे आवडलं ते आजच्या आपल्या लहान मुलांनाही आवडेल असा त्यांचा ग्रह असतो. ते आजच्यापेक्षा चांगलंच होतं असा थोडाफार अट्टाहासही त्यामागे असतो. 'देवबाप्पा' हा सिनेमा मला लहानपणी खूप आवडला होता. तो मी खूप रडून रडून 'एन्जॉय' केला होता. हा मुलांसाठीचा सिनेमा आहे अशी माझी ठाम समजूत होती कारण आमच्या पालकांनी तो आम्हाला आवर्जून दाखवला होता. आता असा सिनेमा बालचित्रपट महोत्सवात दाखवला जाणार होता तेव्हा ती संधी मी खचितच सोडणार नव्हते. मी मुलांना गोळा केलं आणि अमुक एका मस्त सिनेमाला जायचयं असं घोषित केलं. त्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. "हा सिनेमा कलर्ड आहे की ब्लॅक अँड व्हाईट?" "त्यात आमच्या माहितीचे हिरो हिरॉईन आहेत का?" "व्हिलन कोण आहे? ढिशूम ढिशूम आहे का?" ह्या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरं दडवून ठेवत मी त्यांना 'नाच रे मोरा' या गाण्याचं कौतुक सांगायला सुरुवात केली. त्यात मोरपिसांचा पिसारा लावून नाच करणारी त्यातली बालनटी मला आठवत होती. सिनेमा पाहून आल्यावर माझ्या लक्षात आलं की मुलांना सिनेमा आवडला नव्हता. प्रत्यक्ष सिनेमात असलेल्या ताडाच्या किंवा तत्सम झाडाच्या झावळ्यांच्या पिसार्‍याऐवजी माझ्या मनात तो नसलेल्या मोरपंखांचा पिसारा कसा बरं फुलला होता? आता निव्वळ मारामारी नाही म्हणून मुलांना सिनेमा आवडत नाही असं म्हणावं तर 'कट्टकड कद्दू' मुलांना आवडतो. भोपळ्यांची स्पर्धा ही कल्पना, त्यातला खलनायक समशेरसिंग आणि त्यावर मात करणारी मुलांची गँग त्यांना आवडते, संथ असूनही कद्दू आवडतो. मुलं कधीकधी गोंधळात टाकतात.
काळ बदलतोय, मुलं बदलतायत, मुलांची अभिरूचीही बदलतेय.

बालरंजन केंद्रामधे 'सुजाण पालक केंद्र' पण चालवलं जातं. त्याची सुरुवात कशी झाली ?

एकदा असाच लहान मुलांचा छान सिनेमा पाहून दुसर्‍या दिवशी आम्ही त्यावर चर्चा करत होतो. मी प्रियांकाला विचारलं, "काल तू का नाही आलीस? छान होता सिनेमा. तू सिनेमा मिस केलास आणि आम्ही तुला मिस केलं.." त्यावर ती फणकारली, "काल माझ्या आईबाबांचं जोरदार भांडण झालं. मग आई एका खोलीत जाऊन झोपली आणि बाबा दुसर्‍या... मग मला कोण सोडणार?" 
"अगं, तुझ्या खालचा निषाद आहे ना त्याच्या आजीला सांगायचं.. तो आला होता काल..." मी तिच्या आईबाबांचं भांडण लाईटली घेत बोलले. पण ती पुढे म्हणाली, "आईबाबा भांडले ना की मला खूप भीती वाटते..." तिला वाटणारी असुरक्षितता तिच्या नजरेतून माझ्यापर्यंत पोचली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत "पुढच्या वेळेला नक्की ये हं.." इतकचं म्हटलं.
असे काही अनुभव आल्यावर केंद्राचं 'सुजाण पालक मंडळ' सुरू केलं. त्यात कधी तज्ज्ञांची व्याख्यानं, त्यांची प्रश्नोत्तरांचा तास, कधी एखाद्या विषयावर गटचर्चा, तर कधी आपल्या मुलांना शिस्त लावताना केलेले, पण फसलेले प्रयोग यांचीही दिलखुलास चर्चा पालकमंडळात होऊ लागली.

पालकमंडळीचा ह्यात सहभाग कसा आहे? त्यांची ह्या सगळ्या उपक्रमांवर प्रतिकिया काय आहे?

पालक मंडळींना ह्याचा निश्चितच फायदा होतो आहे आणि त्यांचा सहभाग ही चांगला आहे. ह्यातल्या उपक्रमांचे चांगले परिणाम ही दिसत आहेत. त्यातून मग "मी पूर्वी माझ्या मुलांना खूप मारत होते, पण आता सुजाण पालक मंडळात यायला लागल्यापासून बंद झालं" असं कोणाच्या आईने येऊन सांगितलं तेव्हा आनंद झाला. मुलांना मारणं थांबलं आणि समजून घेणं वाढलं तेव्हा या उपक्रमाचा फायदा होतोय असं जाणवलं. आपल्या मनातलं बोलायला व्यासपीठ मिळतंय, मुलांना वाढवताना येणार्‍या शंकाचं निराकरण होतंय असा विश्वास पालकांना वाटू लागला. अधूनमधून "आमच्या आईचं वागणं हल्ली बदललंय. सारखं सारखं अभ्यास कर अभ्यास कर म्हणत नाही.." असे रिपोर्ट मुलांकडूनही यायला लागले. 'सुजाण पालक मंडळ' रुजलं तसं पालक मदत करायला पुढे येऊ लागले. एका वर्धापनदिनानिमित्त पालकांनी वर्गणी काढून केंद्राला खो-खोचे खांब दिले तर एका वर्षी बास्केटबॉलचे पोल्स ! कुणी सुट्टीतल्या वाचनालयात स्वयंसेवक म्हणून काम करायला पुढे आलं तर कुणी सहलींना मदत करतो म्हणून तायांबरोबर यायला तयार झालं. आपल्या महाविद्यालयीन जीवनात उत्तम खेळाडू असलेले रमाचे बाबा सुट्टीत मुलांना बास्केटबॉलचं कोचिंग देण्यासाठी सकाळी सहा वाजता येऊ लागले. ही पालकांची सामाजिक वाढच नाही का? तसचं पालक-स्पर्धांच्या निमित्ताने मुलांचे आई-वडिल, आजी-आजोबा केंद्राच्या अधिक जवळ आले. पालेभाज्या ओळखणं, सुळसुळीत साडीची घडी करणं अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बाबा लोकांनी धमाल उडवून दिली. आजी-आजोबांनी चष्मा सावरत नव्या जुन्या नट-नट्या ओळखल्या. तर आया पदर खोचून पळापळीच्या खेळात भाग घेऊ लागल्या. "नंबराचं काय घेऊन बसलात, भाग घ्यायला काय हरकत आहे?" असा केवळ मुलांना उपदेश न करता पालक वर्ग तो आचरणात आणू लागला. आणि यातूनच तयार झालं बालरंजनचं मोठ्ठं कुटुंब ! ३५० मुलं , त्यांचे आई-वडिल, आजी-आजोबाच नव्हे तर त्यांचे काका, मामा, मावश्या, आत्याही ! कारण मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पहायला ही सर्व मंडळी हजेरी लावायला लावली आणि  अर्थातच बालरंजनचे ताई-दादा सुध्दा !
Mualakhat_Photo_3.JPG

बालरंजनच्या ह्या एव्हड्या मोठ्या व्यापात घरच्यांचा पाठिंबा तसच सहयोग कितपत होता?

घरच्यांची साथ असल्याशिवाय बालरंजन केंद्राचा एवढा पोठा पसारा उभा करणं शक्यच नव्हतं. बालरंजनच्या अनेक कार्यक्रमांध्येही घरच्यांचा सहभाग असतो. एका कार्यक्रमात स्टेजचा पडदा बिघडला तर बाबा (माझे सासरे) स्वत: पडदा ओढायला बसले होते. आता १९व्या वर्धानपनदिनापूर्वी ग्राऊंडची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभन श्रीरामने (यजमान) स्वतः देखरेख करून अल्पखर्चात करवून घेतलं. सलिलची नाट्यवर्गात पार्श्वसंगीत, मेकअप, लाईट्ससाठी खूप मदत होते तर निखिल गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आणि शिबिरात डान्स बसवतो. बालरंजनसारख्या उपक्रमालाही अनेक कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्या सगळ्याच्या नोंदी , फाईल्स बनवणे ह्या सगळ्यात श्रीरामची खूपच मदत होते. चोख हिशोब हे बालरंजन केंद्राचं वैशिष्ट्य जपण्याच्या कामात श्रीरामची खूप मदत होते. तसंच घरात ज्याच्या कामाचं महत्त्व ज्यावेळी असेल, त्यानुसार इतर जण आपापली कामं आखतात.  उदा. नोव्हेंबर ते जानेवारी हे बालरंजनचे निरनिराळ्या कार्यक्रमांचे, त्यामुळे मी स्वतः त्यात पूर्णपणे बुडलेली असते. तर फेब्रुवारी ते मे हे मसाल्याचे महिने, त्यावेळी सगळं कुटूंब सकस, गिरण्या ह्यांचा कामात गुंतलेलं असतं.

सकसचा तसंच गिरण्यांचा कारभारही बराच मोठा आहे. तुझा त्यात नक्की सहभाग काय असतो ?

गिरणी हा सहस्रबुद्ध्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. ’सकस’ नंतर सुरू झालं असलं तरी गिरण्या पूर्वीपासूनच होत्या. सुरुवातीच्या काळात श्रीरामला मदत लागेल तेव्हा मी स्कूटरवरून दळणं वाहून नेण्याचे काम करत असे. नंतर ह्या कामासाठी आम्ही खाजगी रिक्षा घेतली. पुढे मी रिक्षादेखील चालवत असे. ह्याचा मला पुढे ही फायदाच झाला. "संवाद" ह्या ग्रुपतर्फे आम्ही सुमारे ५०० पपेट शो पुण्याच्या विविध भागांमधे सादर केले. त्यावेळी मी सगळे सामान आणि ह्या ग्रुपचे बाकी सदस्य ह्यांची वाहतूक ह्याच रिक्षातून करत असे.
१९९५ पासून आमच्या घरी सकसचा काऊंटर आहे. तिथे सकसच्या उत्पादनांची विक्री होते तसंच दळणंही घेतली जातात. ती दळणं गिरणीत दळून आणली जातात. ह्या सगळ्यामुळे ह्या काऊंटरवर नेहमीच गर्दी असते. जनसंपर्क हे माझं इथलं मुख्य काम. इथे आमच्या ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो त्यामुळे त्यांच्या गरजा समजून घ्यायला खूपच मदत होते. ह्या भागात आम्ही अनेक वर्ष रहात आहोत तसचं बालरंजन केंद्रात येणार्‍या मुलांचा पालकवर्ग ही सकसचा ग्राहक आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांशी अगदी वैयक्तीक स्वरूपाचा ओळखी आहेत. दुकानात येणारे लोक अगदी मोकळेपणाने त्यांच्या गरजा तसंच आमच्या उत्पादनांबद्दलची त्यांची मतं सांगतात. प्रभात रोड परिसरात अनेक मान्यवर राहतात, काही परदेशी विद्यार्थी राहतात.  तसंच हे परदेशी विद्यार्थी, किंवा आपलेही परदेशी जाणारे लोक, त्यांना तिकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने खरेदी करतात. त्यांना विमान प्रवासासाठी विशिष्ठ प्रकारचे पॅकिंग आवश्यक असते. काहींना परदेशी घेऊन जाण्याच्या दृष्टीने औषधी पदार्थ, तसंच पिठं ह्यांची गरज असते. अशावेळी व्यवहार करताना स्वत: लक्ष घालावं लागतं. काम करणार्‍या मुलींना त्यांच्या विशिष्ठ गरजा तसचं त्यांचं इंग्रजी समजेलच असं नाही.
तसंच मी स्वत: दुकानात हजर असल्याने सगळ्या जनसंपर्काचा सकसच्या व्यवस्थापनाच्या आणि व्यवसायवृध्दीच्या दृष्टीने खूपच उपयोग होते. ग्राहकांना काय आवडतंय, काय आवडत नाहीये, बाजारातली एकूण स्थिती ह्याचीही चाचपणी करता येते. नवीन उत्पादनांच्या योजना तयार करता येतात, असलेल्या उत्पादनांमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतात. सकससाठी जाहिराती बनवणं, त्यांचे मजकूर तयार करणं हे सगळंदेखील मी सांभाळते. एकूण सकसच्या संदर्भात माझी मुख्य जबाबदारी ही जनसंपर्क आणि दैनंदिन व्यवस्थापन.

बालरंजन केंद्र तसेह सकस ह्या दोन्हीची जबाबदारी म्हटलं तर तशी मोठी आणि आव्हानात्मकही. तुझी माहेरची पार्श्वभूमी ही साधारण त्यादृष्टीने पूरक होती की अगदी भिन्न होती?

माझं माहेर दौंडचं आणि आमचं एकत्र कुटुंब. माझे वडिल डॉक्टर आहेत आणि आईचा समाजसेवेच्या बर्‍याच उपक्रमांमधे सहभाग असतो. वडिल डॉक्टर असले तरी त्यांचा दृष्टीकोन कधीच धंदेवाईक नव्हता. दौंडमध्ये ते गरीबांचे डॉक्टर म्हणूनच ओळखले जायचे. भाऊ आणि वहिनी पण डॉक्टर आहेत त्यामुळे साठे हॉस्पिटल दौंडमध्ये गेल्या ६० वर्षांपासून आहे. एकत्र कुटुंबाचे सगळे फायदे मी अगदी पुरेपूर अनुभवले. संस्कारक्षम वयात ज्या ज्या गोष्टी पालकांकडून पाल्याला मिळणं आवश्यक असतं ते सगळ मला भरभरून मिळालं. हेच अगळे आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव मी बालरंजन केंद्रामार्फत बाकीच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते. दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी आधी आपण आनंदी असलं पाहिजे आणि तो बालपणाचा आनंद मी स्वत: पुरेपूर लुटला होता. दौंडसारख्या लहान गावात जरी असलो तरी घरचे सगळेच पुढारलेले आणि सुधारणावादी होते. माझी आई त्याकाळी दौंडमधली पहिली महिला गाडीचालक होती, मी दौंडमधली पहिली महिला मोटरसायकल चालक होते तर पुढे मी पुण्यातली पहिली महिला रिक्षाचालक झाले. त्यामुळे एकूण माझी माहेरची पार्श्वभूमी सकस तसेच बालरंजन ह्या दृष्टीने अनुकूलच म्हणायला हवी.

तू मधे पत्रकारितेचा तसेच बागकामाचा अभ्यासक्रम केला होतास. तो फक्त छंद म्हणून की त्याविषयीसुध्दा पुढेमागे काही योजना आहेत?

मला सतत काही ना काही नविन गोष्टी शिकायला आणि करून बघायला आवडतं. फक्त त्या गोष्टी creative हव्या आणि त्या करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी साधनं सहज उपलब्ध असायला हवी. आमच्या एका गिरणीमधे बाग करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होती. तसंच निरनिराळे प्रयोग करून बघण्यासाठी ही पुष्कळ वाव होता. त्यामुळे मी बागकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम केला होता. पण पत्रकारितेचा अभ्यासक्रम ही थोड्याफार प्रमाणात गरज होती. 'निर्मळ रानवारा' हे लहान मुलांचं मासिक गेले २५ वर्ष प्रसिध्द होतं आहे. मी गेले काही वर्ष त्याच्या संपादक मंडळात आहे. लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या संदर्भात सतत काही ना काही लिखाण चालूच असतं. ह्या सगळ्या जबाबदार्‍या योग्य पध्दतीने पेलण्याकरता पत्रकारितेचा अभ्यासक्रम करणं मला गरजेचं वाटलं. त्यावेळी सलिल शेवटच्या वर्षाला होता आणि निखिल बारावीत होता. त्यामुळे घरातही अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण होतं. आम्ही तिघं जण रात्री अभ्यास करत बसायचो. अधेमधे गप्पा, कॉफी पिणं हे ही चालू असायचं. मुलांबरोबर स्वतःही परत अभ्यास करण्याचा तो छान अनुभव होता. :)

बालरंजन केंद्राच्या आगामी उपक्रम कोणते?

बालरंजन केंद्रातर्फे मुलांसाठी तसेच पालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करायचा विचार आहे. हल्ली पालकांकडून तसेच इतर आजुबाजूच्यांकडून मुलांवर एखादा विशिष्ठ शिक्का बसण्याचे प्रकार घडतात. हे अनवधानानेही असू शकतात. उदा. एखाद्या मुलाला सतत बावळट, मूर्ख, मठ्ठ असं संबोधलं जातं. अशामुळे मुलांची स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास ढासळतो. काही काही वेळा हे इतक्या जास्त प्रमाणात होतं की ही मुलं कोणती गोष्ट धड करूच शकत नाहीत. कधीकधी ह्याची विरूध्द बाजूही पहायला मिळते. पालक मुलांच्या कलागुणांचं त्याच्या कुवतीपेक्षा जास्त कौतूक करतात, ज्याची परीणती over confidence मध्ये होते. पण इतर मुलांशी स्पर्धेत किंवा तुलनेत ही मुलं मागे पडतात. अश्यावेळीही नंतर मुलं आत्मविश्वास गमावून बसतात. ह्या मुलांना तसंच त्यांच्या पालकांना जरूरी ते समुपदेशन देण्यासाठी हे केंद्र उघडायचा विचार आहे. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी तसेच पालक-शिक्षक केंद्रात असलेला ह्याच प्रकारचा अनुभव ह्यासाठी उपयोगी पडेल.  लोकमत वृत्तपत्राच्याच्या सखीमंचतर्फेही साधारण ह्याचप्रकारच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जाणार आहेत. या व्याख्यानमालांना साधारण १०००/१२०० पालक समुदाय उपस्थित असतो. आणि लेखन चालू आहेच. परवाच मी एसाआरपीच्या सुमारे ८०० पुरूष पालकांना 'पालकत्त्व' ह्या विषयावर व्याख्यान द्यायला गेले होते आणि तो ही एक अतिशय वेगळा अनुभव होता.

बालरंजनच्या तसेच सकसच्या माध्यमातून इतक्या वर्षात अनेक अनुभव आले असतील. तर ह्यातले लक्षात रहातील असे चांगले तसेच विचित्र अनुभव कोणते?

अनुभव तर अनेक आले. पण चांगले तेवढे लक्षात ठेवायचे, वाईट ते सोडून द्यायचे.

अगदी लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी इथे सांगाव्याशा वाटतात. असेच एकदा सुट्टीत पहाटे पाच-साडेपाच वाजता टेकडीवर गेलो होतो. टेकडीवरचं गवत पिवळं पडलं होतं. डिसेंबर महिन्यातल्या थंडीतलं दव त्यावर पडलं होतं, वातावरण खूपच अल्हाददायक होतं. अशा वातारणात टेकडी चढणं, भटकंती करणं हा अनुभव मुलांनी स्वतः घेण्याचा होता. हळूहळू सूर्य उगवला. सूर्याचे सोनेरी किरण गवताच्या पात्यावर पडून गवत सोनेरी दिसायला लागलं. त्यावरचे दवबिंदूही सोनेरी होऊन चमकू लागले. आम्ही सगळेच शांतपणे चाललो होतो. नि:शब्द शांतता अनुभवत होतो. प्रणवने एकदम विचारलं, "ताई, सोनेरी सकाळ म्हणतात ती हीच का?" त्याचे उद्गार ऐकून आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सोनेरी सकाळीचा फर्स्ट हँड अनुभव प्रणवला आपल्या स्मरणकुपीत ठेवायला मिळाला होता. आम्हाला समाधान वाटलं.

दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक महिन्यात आम्ही दानाची कल्पना मुलांच्या मनात रूजावी म्हणून उपक्रम घेतो. सर्व मुलांनी काहीतरी धान्य एक-एक फुलपात्र, कपडे, पैसे असं सगळं गोळा करून वंचित मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला आम्ही देतो . एका वर्षी अशी मदत घेऊन सोबत मुलांना घेऊन एका अनाथाश्रमात गेलो. अशा स्थळभेटींचा मुलांच्या मनावर ठसा उमटताना दिसतो. तिथे जाऊन आल्यावर आईबापाविना एवढी पोरकी मुलं पाहून अंबिकाला भडभडून आलं. घरी येऊन ती खूप रडली असं तिच्या आजीने दुसर्‍या दिवशी सांगितलं. आपल्याकडे सगळं असूनही कूरकूर करणार्‍या या मुलांच्या जगाविषयीच्या जाणीवेत खूप फरक पडला. एक वेगळचं शहाणपण अंबिकाला या भेटीने दिलं.

आमच्या मायबोलीच्या सभासदांमधेही बराच मोठा पालक वर्ग आहे. तुझ्या इतके वर्षांच्या अनुभवातले काही महत्वाचे बोल त्यांचासाठी सांगू शकशील का?

सर्व प्रथम मुलाला जन्म देणं ही आपण स्वत:हून स्वीकारलेली एक मोठी जबाबदारी असते किंबहूना तो एक यज्ञ असतो ज्यात वेळ, पैसा आणि इगो ह्याची आहूती द्यावी लागते. हल्ली काम, करीयर ह्यामुळे मुलांना पुरेसा आणि उपयुक्त वेळ देता येत नाही अशी पालकांची तक्रार असते. ते थोड्याफार प्रमाणत खरं असल तरी मूल जन्माला आल्यावर मूल हीच पालकांची पहिली priority असली पाहिजे. मग मुलाची जबाबदारी कशी/कोणी घ्यायची हे पालकांनी आपापसात ठरवलं पाहिजे.
दुसरं म्हणजे पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर कधीही लादू नयेत. एकाच आईवडिलांची, सारख्याच वातावरणात वाढलेली दोन मुले अगदी भिन्न असू शकतात त्यामूळे मुलांचा एकूण कल बघून त्याप्रमाणे त्याच्या करियरचे नियोजन करावे.
आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्यातल्या मतभेदांची / इगोची झळ आपल्या पाल्याला कधीही पोचू देऊ नये. दोन व्यक्तींमधे मतभेद हे असतातच पण ते आपापसातच सोडवावेत आणि मुलांसमोर येऊ देऊ नयेत कारण त्यामुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि संस्कारक्षम वयात ती हानीकारक असते. आनंदी आणि सुरक्षित बालपण हा मुलांचा हक्क आहे आणि ते मुलांना मिळवून देणं हे पालकांचे कर्तव्य आहे.

माधुरीकाकूचा अनुभव सर्व मायबोलीकरांना नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री आहे. एका तुमच्या आमच्या सारख्या घरगुती वातावरणातली स्त्रीही समाजपयोगी काम करून समाजाच्या विकासाला हातभार कशी लावू शकते, सामाजिक ऋण फेडण्याबरोबरच उद्योजिका म्हणूनही कशी यशस्वी होऊ शकते, याचं उदाहरण म्हणजे माधुरीकाकू. तिने तिच्या व्यापातून ह्या मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल मायबोलीकरांतर्फे तिचे मन:पूर्वक धन्यवाद मानून आणि तिच्या सर्व आगामी उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला.

------

मायबोली.कॉम वर पूर्व प्रकाशित :
http://www.maayboli.com/node/10250