'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

परिचितांमधले अपरिचित : 'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

ओठांवरचं हलकं स्मित, गालातल्या गालात हसू ते सप्तमजली हास्यापर्यंत विनोदाचे अनेक प्रकार आहेत. विनोदाची हळूवार फुंकर दु:खाच्या वेदना बोथट करते. जीवनाचा निखळ आनंद हा हास्यातूनच फुलत असतो. आनंद द्या, आनंद घ्या, जीवनाकडे निरागस-सकस दृष्टीने पहा हाच मुलमंत्र घेऊन 'सकाळ' तसेच मध्यंतरी 'लोकसत्ता' वृत्तपत्रामधून 'चिंटू' गेली १८ वर्ष आपल्या भेटीला येतो आहे. मध्यंतरी माझ्या एका मित्राशी, रोहितशी,  बोलत असताना असं समजलं की, चिंटूकार चारूहास पंडित हा त्याचा चुलत भाऊ. इतके वर्ष 'चिंटू' वाचत असल्याने माझं आणि रोहितचं बर्‍याचदा चिंटूबद्दल बोलणं व्हायचं. नंतर एकदा त्याने चारूहास पंडितांशीच माझी गाठ घालून दिली. मायबोली गणेशोत्सवानिमित्त चारूहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर ह्यांच्याशी मारलेल्या ह्या गप्पा.



आमची पिढी पेपर वाचायला लागली तेव्हापासून त्यात 'चिंटू'  दिसतोच. तर सर्वप्रथम आम्हांला 'चिंटू' हे सदर सुरु कसे झाले हे जाणून घ्यायला आवडेल.

चारूहास : माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ही कला क्षेत्रातलीच. मी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलंय. आणि नंतर मी स्वत:ची अ‍ॅडव्हरटायजिंग एजन्सी चालवत असे. व्यंगचित्रे काढायची तसेच वाचायची आवड लहानपणापासूनच होती. पूर्वी 'पुण्याची क्षितीजे' हे सदर 'सकाळ' वृत्तपत्रामधे प्रसिध्द होत असे. त्यात मी व्यंगचित्र काढत असे. इंग्रजी वृत्तपत्रांमधे येणार्‍या गारफिल्ड, डिलबर्ट ह्यांसारख्या व्यंगचित्रमालिका अगदी न चुकता वाचत असे. पण अशी एखादी भारतीय मालिका का नाही, असाही विचार नेहमी मनात येत असते. ह्या सगळ्या मालिका निश्चितपणे उत्तम आहेत, त्यांतला विनोद, त्यांतलं नाविन्य हेदेखील चांगलं असतं. पण तरीही कधीकधी त्यांचं भारतीय नसणं हे मनाला खटकतं किंबहुना त्यांतल्या काही काही गोष्टी आपल्याला अजिबातच जवळच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ बर्फ पडण्यावरून केले जाणारे विनोद. आपल्या इथे तसे हवामानच नसल्याने ते आपण appereciate करू शकत नाही. ह्याशिवाय रोजच्या वृत्तपत्रात साधारण अनेक नकारात्मक बातम्या असतात. त्यामुळे ह्यामध्ये काहीतरी हलकंफुलकं असावं असं मला स्वत:लाही वृत्तपत्र वाचताना जाणवत असे. असा एखादातरी  कोपरा त्यात असावा जो वाचकाच्या चेहेर्‍यावर स्मित आणेल, त्याला रोजच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं देईल आणि शिवाय ते आपल्या जवळचंही असेल. ह्यातूनच भारतीय मातीतलं असं एखादं व्यक्तिमत्त्व व्यंगचित्रमालिकेद्वारे तयार करायचा विचार चालू झाला आणि पुढे पुढे तो प्रबळ होतं गेला. On a lighter note, हा सगळा विचार चालू असतानाच मला भेटलेलं एक 'कॅरॅक्टर' म्हणजे प्रभाकर वाडेकर. :)

प्रभाकर : मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करत असे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मला लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशी तिन्ही बक्षिसं एकाच वर्षी मिळाली होती. व्यवसायाने मी इंडियन एक्सप्रेसमध्ये advertising management करत असे. तसेच कॉपीरायटरचं कामपण केलं आहे. नंतर टिव्हीवरील मालिका, एकांकीका ह्यांचं लेखनही करत होतो/करतो. भोपाळ दुर्घटनेच्या वेळी मी आणि चारूहासने मिळून एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली होती. चारूहास जसं म्हणाला तसंच वृत्तपत्रांतल्या नकारात्मक बातम्यांमधून काहीतरी वेगळं समोर आणणारा एखादा कोपरा पाहिजे असं वाटतच होतं. आम्ही कामानिमित्त भेटायचो त्यावेळीही काम सोडून इतर सगळ्या गोष्टींबद्दलच गप्पा मारत रहायचो. आणि अशाचं एका गप्पांच्या सत्रात 'चिंटू' ही कल्पना 'क्लिक' झाली. :)

चारूहास: 'सकाळ'चे त्यावेळचे संपादक विजय कुवळेकर ह्यांनीही एखादी व्यंगचित्र मालिका किंवा तत्सम काहीतरी सुरु करता येईल का, ह्यासंबंधी विचारणा केली होती. प्रभाकरचा आणि माझा विचार पक्का झाल्यावर ह्यातूच पुढे 'चिंटू' साकार झाला. आम्ही काही नमुने 'सकाळ' संपादक मंडळाला सादर केले आणि त्यांनी हिरवा कंदिल दिल्यावर आज १८ वर्षे अव्याहतपणे चिंटू आपल्या भेटीला येत आहे.

चिंटू हा पूर्णपणे काल्पनिक आहे की आजूबाजूच्या कोणा लहान मुलाचा किंवा तुमच्या स्वतःच्याच बालपणीचा प्रभाव त्याच्यावर आहे?

चारूहास : चिंटू हा आपल्या प्रत्येकामध्ये थोडा थोडा असतोच. तो खट्याळ आहे, मिश्कील आहे, निरागस आहे, त्याबरोबरच कधीकधी तो बावळटही आहे. चिंटूच्या पोशाखावरून, त्याच्या दिसण्यावरूनही आम्ही हेच दाखवायचा प्रयत्न करतो. चिंटूचा चेहरा निरागस आहे, पण त्याच्या कपाळावर येणारी बट त्याला एकप्रकारचा खट्याळपणा देऊन जाते. त्याचा पट्ट्यांचा टीशर्ट त्याच्यातलं खोड्याळ लहान मूल दाखवतो. त्यामुळे चिंटू सगळ्यांमधला थोडा थोडा अर्क आहे. तो कोणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर बेतेलेला नाही. त्याचप्रमाणे तो पूर्णपणे काल्पनिकही नाही. तो आपल्या सगळयांच्या आसपास कुठे ना कुठे तरी दिसतो.

प्रभाकर : आम्ही दोघेही मुळचे पुण्याचेच. नारायण पेठेत लहानाचे मोठे झालेलो. त्यामुळे वाडा संस्कृती अगदी जवळून बघितलेली. कोणी ना कोणी मित्र नेहमीच बरोबर असायचे. कट्ट्यावर बसून टाईमपास करणे, शेजार्‍यांच्या खोड्या काढणे हेसुध्दा लहानपणी केले होते. त्यामुळे बालपणीचा प्रभाव थोडाफार आहेच. चिंटूचं घर बघितलं तर ते आतमधून आधुनिक काळातलं आहे, पण त्याला वाड्यासारखं किंवा स्वतंत्र घरासारखं रूप आहे. तो आत्तासारखा इमारतीतला फ्लॅट नाहिये. चिंटू, मिनी, पप्पू हे अधूनमधून कट्ट्यावर, ओट्यावर बसून गप्पा मारताना दिसतात. त्यांचा खेळायच्या जागा, आजूबाजूच्या गोष्टी हे अगदी तंतोतंत आमच्या लहानपणीच नसलं तरी सगळं कुठेतरी परिचयाचं आहे.

'चिंटू' मधली बाकीची जी पात्र आहेत, त्यातली काही अगदी सुरुवातीपासून होती की काही नंतर आली. तुम्ही ह्यासंदर्भात आधीपासूनच काही ठरवून ठेवलं होतं की काळाबरोबर ती फुलत/स्पष्ट होत गेली ?

'चिंटू' मधली सगळी पात्र ह्या सगळ्या व्यक्ती नसून प्रवृत्ती आहेत. उदाहरणार्थ पप्पू. आपल्या आजूबाजूला एखादा मित्र हमखास असतो जो नेहमी आपल्याबरोबर असतो, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला साथ देतो. पण योग्य वेळी आपल्याला टोकतोदेखील. त्यामुळे त्याचं पात्र हे आधीपासून पूर्णपणे लिहून ठेवायची गरज नव्हती. चिंटूच्या मित्रमंडळींमध्ये एका वेंधळ्या मित्राची गरज नंतर वाटली . म्हणून मग बगळ्याचे पात्र आणले गेले. अनेकांनी आपल्या आजूबाजूला बगळ्या निश्चितपणे पाहिला असेल. एकूण प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना 'चिंटू' ही मालिका जवळची वाटण्यासाठी त्या त्या वयोगटातलं एखादं तरी पात्र 'चिंटू'मध्ये दिसतं. कधीकधी मनात येत गेलं तसं किंवा गरज लागेल तसं त्याला वळण दिलं, पण आधीपासून ठरवून काहीच ठेवलेलं नव्हतं.



चिंटू कधी मोठा होणार का? किंवा त्याला भविष्यात एखादं त्याच्यापेक्षा जास्त खट्याळ भावंडं यायची शक्यता आहे का?

अरे, एकट्या चिंटूचाच 'दंगा' आम्हांला भारी पडतोय, त्यात आणखीन भावंडं कुठे ? आणि दुसरं म्हणजे हल्लीच्या काळात २ -२ मुलं असणं परवडलं पाहिजे ना चिंटूच्या आई वडिलांना. :) 
'चिंटू'ची पूर्ण मालिका ही सगळ्यांना जवळची वाटली पाहिजे, तसेच ती कालानुरूप असली पाहिजे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. 'चिंटू' जेव्हा सुरु झाली, साधारण तेव्हापासून साधारण single child family ह्या संकल्पनेची सुरुवात झाली होती. आतातर अशाप्रकारची कुटुंबं सर्रास बघायला मिळतात. शिवाय 'सोनू' हे जे पात्र आहे ते चिंटूपेक्षा लहान आहे. त्यामुळे चिंटूपेक्षा वयाने लहान पात्राची जागा सोनू भरून काढू शकतो. त्यामुळे चिंटूला भविष्यात भावंडं यायची आत्तातरी शक्यता दिसत नाही.
चिंटू मोठा होणार का हा प्रश्न आम्हाला नेहमीच विचारला जातो. वास्तविक चिंटू जर वाढत्या वयाचा दाखवला असता तर सुरुवातीपासूनचा काळ लक्षात घेता तो आतापर्यंत लग्नाचा झाला असता. :)
शिवाय ह्या मालिकेत प्रत्येक वयोगटातले लोकं स्वतःला बघू शकतील असे एक तरी पात्र आहे. जसं मघाशी म्हंटलं तसं लहान मुलांसाठी 'सोनू' आहे, कॉलेजमधल्या वयोगटासाठी 'सतीशदादा' आहे. आई-पप्पा आहेत, जोशीकाकू आहेत, आज्जी आजोबा आहेत. त्यामुळे चिंटूचं वय वाढलच पाहिजे, असं काही नाही. ह्याशिवाय चिंटू जरी वयाने मोठा होतं नसला तरी त्याच्या आजूबाजूचं वातावरण हे कालानुरुप बदलतं आहे. सुरुवातीला इंटरनेट, मोबाईल फोन ही माध्यमं आपण वापरत नव्हतो, लहान मुलं कॉंप्युटरवर गेम खेळत नव्हती. पण गेल्या काही वर्षांमधले हे बदल 'चिंटू' मालिकेतही दिसतात. आता चिंटूच्या घरी काँप्युटर आहे, चिंटूच्या पप्पांकडे मोबाइल आहे. चिंटूला ह्या दोन्ही गोष्टी वापरायचं चांगलं ज्ञान आहे. हे सगळं आत्ताच्या काळातल्या चिंटूच्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसून येतं. चिंटूचं वय कधी वाढत नाही पण त्याच्या आजूबाजूचं वातावरण कालानुरूप बदलतय आणि यापुढेही नक्कीच बदलेल. आणि ह्या बदलांमुळेच 'चिंटू' मालिकेतला ताजेपणा, टवटवीतपणा हा नेहमीच टिकून रहायला मदत होते. 





रोजच्या 'चिंटू'ची साधारण निर्मितीप्रक्रिया काय असते? तसच तुमच्या कामांची साधारण विभागणी झालेली आहे का? चित्र काढणे, शब्द लिहिणे इ. ?

रोजचा 'चिंटू' तयार व्हायला साधारण ४ तासांचा वेळ लागतो. आम्ही दोघं रोज भेटतोच. त्यावेळी कामाव्यतिरिक्त इतर घडामोडींबद्दलही बर्‍याच गप्पा होतात. किंबहूना बर्‍याचदा त्याच जास्त होतात !
अशाच गप्पांमधून काहीतरी विषय सुचतो आणि पुढे तो फुलत जातो. कधीकधी कल्पनेवरून चित्र बनवून त्यात सुधारणा केल्या जातात. लहानसहान बदल करून ते अधिकाधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ह्या सगळ्या कामांसाठी जरी साधारण ४ तास लागत असले तरी विचारप्रक्रिया तसं म्हटलं तर कायमच चालू असते. आजूबाजूला सतत कुठेतरी वावरत असणरा चिंटू शोधून काढणं हे ह्या विचारप्रक्रियेमुळे शक्य होतें आणि म्हणूनच ही विचारप्रक्रियाच जास्त महत्त्वाची असते.  कामाची विभागणी अशी काहीच केलेली नाही. परस्पर सामंजस्यावर आमचं संपूर्ण काम चालतं. कधीकधी तर काढलेली स्केचेस आणि लिखाण इतकं कच्च्या स्वरूपात असतं की, इतरांना ते पाहून काहीच अर्थबोध होतं नाही. तरी आम्हांला एकमेकांना ते काय आहे हे बरोबर समजतं. आमच्या घरचे आम्हाला चिडवतातही की, ह्या दोघांनी एकमेकांना कोरे कागद दिले तरी त्यात ह्यांना 'चिंटू' दिसेल !
आमच्या जबाबदार्‍यांमधली सीमारेषा खूपच धूसर आहे. एकमेकांच्या कामात आम्ही खूपच जास्त लुडबूड करतो आणि कदाचित त्यामुळेच चिंटू एकजिनसी होतो.

तुमचा साधारण क्रम काय असतो ? म्हणजे स्केचिंग करताना शब्द सुचतात की शब्द आधी ठरवून त्यावर स्केच काढता?

बरेचदा शब्द किंवा कल्पना आधी ठरवून मग त्यावर चित्र काढली जातात पण कधीकधी असं ही होतं की, स्केच काढता काढता एखादं स्केच सुरेख जमून जातं आणि मग ते मुख्य चित्रात वापरण्यासाठी त्यावर अनुरूप असे शब्द लिहिले जातात. पण ह्याबाबतही काही ठामपणे ठरवलेलं नसतं. शेवटी चितारलेला चिंटू चांगला आणि परिणामकारक होणं हे महत्त्वाचं !

रोजचा 'चिंटू' हा प्रसिध्द होण्याच्या किती आधी तयार होतो ? सर्वसाधारण विषयांवरचे काही 'चिंटू' तुम्ही आधीच तयार करून ठेवलेले असतात का ?

'चिंटू' सुरु झाल्यापासून आमचं ते स्वप्न आहे की २/३ महिने आधी भरपूर 'चिंटू' बनवून ठेवावे. पण ते अजून तरी शक्य झालेलं नाहिये. आम्ही जेव्हा 'सकाळ'च्या संपादकांना 'चिंटू' सगळ्यांत प्रथम सादर केला, त्यावेळी आम्ही ४/५ 'चिंटू'चे भाग तयार करून नेले होते. आमची अशी अपेक्षा होती की, संपादक आम्हांला सांगतील की आम्ही विचार करून कळवू किंवा पुढच्या महिन्यापासून सुरु करू. मग आपल्याला मध्ये वेळ मिळेल जेव्हा भरपूर चित्रं आधीपासूनच बनवून ठेवता येतील. पण त्यांचा प्रतिसाद फारच अनपेक्षित होता. त्यांनी आम्हांला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि नंतर परत ऑफिसमध्ये बोलावून सांगितलं की, "तुम्ही दाखवलेल्या चित्रांपैकी पहिलं उद्याच्या अंकात छापण्यासाठी पाठवून दिलंय. तर उद्यापासून इतक्या वाजेपर्यंत 'चिंटू' आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे!" त्या वेळेपासूनच आमचं खूप सारे 'चिंटू' आधीपासून बनवून ठेवायचं स्वप्न अधुरं राहिलय ते आत्तापर्यंत. फक्त गावाला जायचं असेल किंवा इतर काही अगदीच टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे वेळ देता येणार नसेल तरच आम्ही आधीपासून थोडीफार तयारी करून ठेवतो. अन्यथा आपल्याला 'सकाळ'मध्ये दिसणारा 'चिंटू' हा साधारण एक किंवा दोन दिवस आधी तयार झालेला असतो. अगदी ऐनवेळी काम केल्यामुळे विषयांमधला, कल्पनांमधला ताजेपणा टिकून रहायला मदत होते. तसेच आजूबाजूच्या घटना, घडामोडी ह्या सगळ्यांचा अंतर्भाव करणं सोप्पं जातं. शिवाय 'डेडलाईन'चं दडपण हे फक्त तुम्हां आयटीवाल्यांनीच घ्यावं असं काही नाही.. ते दडपण आल्याशिवाय काम चोख पार पडतच नाही. :)

चिंटू आता सुमारे १८ वर्षे सुरु आहे. ह्या वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी येणार्‍या प्रसंगांना, जसे सणवार (दिवाळी, गणपती), शाळा सुरु होण्याचा काळ, पावसाळा, नववर्ष इ .नवनवीन कल्पना लढवताना कधी अडचण जाणवली नाही का? किंवा कधी 'अजिबात काही सुचतच नाही' असा प्रसंग आलाय का?

चारूहास : तू जर बघितलंस तर हे सगळे प्रसंग, जसे दिवाळी, गणपती, स्वातंत्र्यदिन, पाऊस, परीक्षा ह्या सगळ्यांचं हळूहळू वातावरण तापायला लागतं. वृत्तपत्र, बातमीपत्र ह्यांमध्ये त्याबद्दलच्या बातम्या यायला लागतात. बाजारपेठा, दुकानं ह्या सगळ्यांवर ह्या गोष्टींचे परिणाम जाणवायला लागतात. त्यामुळे सतत आसपास असणारा 'चिंटू' ह्या प्रसंगांमधेही नवीन रुपात आजूबाजूलाच सापडतो. तसच 'चिंटू'मधून आम्ही कधीही उपदेश करत नसलो तरी प्रत्येकवेळी त्यात विनोदच असेल असंही नाही. कधी कधी चिंटू आणि त्याची मित्रमंडळी आजूबाजूच्या परिस्थिती वर एखादी त्यांच्या वयाला शोभेल अशी पण मार्मिक टिप्पणी करून जातात. आसपासच्या वातारवणाचा पारिणाम ह्या मंडळींवर दिसतोच. त्यामुळे ह्या नेमेची येणार्‍या प्रसंगांमध्येही नाविन्य राखता येतं.

प्रभाकर : काहीच सुचत नाही असं होत नाही. आपल्या रोजच्या जीवनातले साधे साधे क्षणदेखील आनंददायी असतात. फक्त ते तुम्हांला पकडता आले पाहिजेत आणि योग्य पध्दतीने मांडता आले पाहिजेत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर चौकात रस्ता शोधत असण्यार्‍या पाहुण्यांचा आणि चिंटू व मित्रमंडळींचा संवाद आम्ही एकदा दाखवला होता. वास्तविक हा प्रसंग आपणदेखील अनेकदा अनुभवतो, म्हणजे एकतर आपण कोणाला पत्ता विचारतो किंवा इतर कोणी आपल्याला पत्ता चिचारतं पण अशा साध्या प्रसंगांतही विनोद घडू शकतात आणि ते योग्य पध्दतीने आणि योग्य वेळी पकडता आले पाहिजेत आणि मांडता आले पाहिजेत.
आम्ही ह्या मांडणीबाबतही सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. तांत्रिक बाबींमधे नावीन्य आणायचा प्रयत्न करत रहातो. ह्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे साधारणपणे 'चिंटू' ३ चौकटींमधे दिसतो. पण आम्ही एका चौकटीपासून ते अगदी दहा चौकटींपर्यंतचेदेखील प्रयोग केले आहेत. ह्याशिवाय चिंत्रांमधले कॅमेर्‍याचे कोन, आता रंगीत 'चिंटू' सुरु झाल्यापासून विविध रंगांचे प्रयोग हेसुध्दा करून पाहिले आहेत. कधी नुसतीच चित्र, तर कधी नुसतेच शब्द असेही 'चिंटू' प्रसिद्ध झालेले आहेत. दिवे गेल्याच्या प्रसंगावरच्या चित्रामधे नुसतेच शब्द होते. बाकीची पूर्ण चौकट काळी होती. तरी तो 'चिंटू' ही खूप आवडल्याचे अभिप्राय आले. कित्येकांनी असं ही नमूद केलं की, चिंटू किंवा इतर पात्र दिसत नसूनही आम्ही ती पाहू शकलो. ह्या सगळ्यां तांत्रिक बाबींमधले फरक वाचकांच्या कित्येकदा लक्षातदेखील येत नाहीत, पण त्यातून त्यांना एक वेगळा, नवीन अनुभव नक्कीच मिळतो आणि आम्हालाही ह्या प्रयोगांचा 'चिंटू'मधला ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि तोचतोचपणा न येऊ देण्याच्या दृष्टीने खूपच फायदा होतो.





इतक्यावर्षांमधला तुमचा सर्वात आवडता 'चिंटू' कोणता ?

हा प्रश्नसुध्दा आम्हांला नेहमीच विचारला जातो पण दरवेळी आम्ही तो ऑप्शनलाच टाकतो. आत्तापर्यंत ५००० च्या वर 'चिंटू' ची चित्रं प्रसिद्ध झाली. त्यामुळे ह्या सगळ्यांमधून आवडता एक ठरवणं शक्यच नाही. शिवाय आम्ही रोज जो 'चिंटू' प्रसिद्ध करतो तो आमचा त्या दिवशीचा सगळ्यात आवडता असतो. तो 'चिंटू' जर आम्हांलाच आवडलेला नसेल, आम्हीच त्यातून आनंद घेउ शकत नसू तर तो आनंद आम्ही  इतरांनाही देऊ शकणार नाही. एकदा का आम्ही बनवलेलं चित्र वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं की, आम्ही त्यात फार अडकून पडत नाही. नाहीतर मग येणार्‍या पुढच्या चित्रावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आत्तापर्यंतचे सगळे 'चिंटू' हे आमचे आवडतेच आहेत.

पु.ल. देशपांड्यांचं निधन झालं त्याच्या दुसर्‍या दिवशी जो 'चिंटू' वृत्तपत्रात दिसला, तो सगळ्यांनाच खूप हेलावून गेला होता. त्या चित्राच्या मागची तुमची विचारप्रक्रिया काय होती ? तसंच त्यावेळचा तुमचा एकंदर अनुभव कसा होता?

पु.ल. हे महाराष्ट्रातल्या लहान थोरांचं दैवत होतं. आमच्यासारखे जे 'विनोद' ह्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी तर ते आदराचं स्थान होते. त्यांना 'चिंटू'च्या माध्यमातून आदरांजली वाहणं हे आम्हांला आवश्यक वाटलं. शिवाय अशा भावना एखाद्या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करणं हे खूप मोठं आव्हान होतं, कारण व्यंगचित्रांमधून व्यक्त होणार्‍या ह्या भावनांचा कधीही विपर्यास होऊ शकतो / केला जाऊ शकतो.

कधीकधी आपल्याला झालेलं दु:ख हे शब्दांमधूनच व्यक्त करावं लागतं असं नाही. मुकपणे, निशःब्दपणेही ते समोरच्याला समजते. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 'चिंटू'मध्ये चिंटू पाठमोरा होता, तसेच नि:शब्द होता. पण तरीही त्याच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील, मनात काय विचार चालू असतील हे वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचलं. वाचकांच्या प्रतिक्रिया चिकार आल्या. अगदी सकाळपासून सुरु झालेला फोन दिवसभर वाजत होता. एका वाचकाने कळवलं होतं की 'सकाळ'मध्ये पु.लं. देशपांड्यांच्या निधनाची बातमी वाचून वाईट वाटलं पण चिंटूला असं नि:शब्द झालेलं बघून डोळ्यात पाणी आलं.
हा प्रसंग दु:खी होता पण आमच्या कलेच्या माध्यमातून योग्य ती आदरांजली वाहिल्याचं समाधान आम्हांला मिळालं.



'चिंटू' आवडतो असं सांगणार्‍या अनेक प्रतिक्रिया येतच असतील पण कधी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत का?

'चिंटू' चा वाचकवर्ग हा बराच मोठा आहे. त्यात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतले वाचक येतात. कधीकधी एखादा 'चिंटू' हा लहान मुलांसाठी बनवलेला असतो तर कधी मोठ्यांसाठी. मोठ्या वयाचा वाचकवर्गाला एकदम आवडून जातो असा विनोद कधीकधी लहान मुलांना कळतच नाही. किंवा अगदी लहान वयाच्या मुलांना खूप आवडेल असा विनोद मोठ्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे कधीकधी नकरात्मक प्रतिक्रिया उमटू शकते, पण ती तेवढ्यापुरतीच असते. आणि आम्ही आधी जसं म्हटलं की, चांगल्या प्रतिक्रियांमधे जास्त वेळ अडकून पडता येत नाही कारण त्यामुळे येणार्‍या पुढील चित्रांवर परिणाम होतो. तसच अशा नकारात्मक प्रतिक्रियांमध्येही फार काळ अडकून न पडता आम्ही पुढच्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. कधीकधी असही होतं की, तुम्ही नेहमीच सगळ्यांनाच हवं ते देऊ शकत नाही. त्यामुळे ते मागे ठेवून पुढे जायलाच हवं आणि पुढचं काम अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल, हे पहायला हवं.

तुम्ही दोघेही मुळचे पुण्यातले. मग तुमचा चिंटूही पुण्यातला पुणेकरच का?

तुला तसं वाटतं का ? 
आम्हांला बरेच जण विचारतात की चिंटू कोणत्या गावचा? त्याचं आडनाव काय?
मुळात चिंटूच्या वयाचे असताना आपल्याला आडनावाची खरच 'गरज' असते का? ते सगळं नंतर कधीतरी आपल्याला येऊन चिकटतं. लहान मुलांमधली मैत्री ही निरागस असते. लहान मुलं आडनाव, जातपात, धर्म, प्रांत हे काहीही लक्षात न घेता एकमेकांमध्ये मिसळून जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम होत नाही. आणि त्यामुळेच चिंटूला आडनाव नाही. तसच तो कोणत्याही विशिष्ट शहरातला नाही, विशिष्ट धर्माचा नाही. तुम्ही कुठल्याही शहरात जा, कुठल्याही घरात जा, प्रत्येक लहान मुलाचे आईवडील त्याला चांगलं वळण लावायचा प्रयत्न करतात, अभ्यास कर, म्हणून रागवतात, सगळ्या भाज्या खा म्हणून आग्रह करतात, लाड, कौतुकही करतात. तसच प्रत्येक लहान मूल दंगा करतं, मित्र मैत्रिणींबरोबर मस्ती, भांडण करतं, आईवडिलांकडे हट्ट करतं, आज्जी आजोबांकडून हक्काने लाड करून घेतं. त्यामुळे चिंटूला आडनाव, जातपात, धर्म, शहर हे असण्याची गरजच नाही. आणि म्हणून सगळ्यांनाच तो आपला वाटतो. 'चिंटू'मध्ये फक्त एकच 'जोशीकाकू' आडनाव असलेलं पात्र आहे. पण तिथेही दुसरं काहीही आडनाव असतं तरी त्याने काहीच फरक पडला नसता. कारण 'जोशीकाकू' ही एक विशिष्ट व्यक्ती नसून एक सगळीकडे आढळणारे 'शेजार' आहे. प्रसंगी त्या मुलांना रागवतात, वेळ आली की लाड करतात, खाऊ देतात. अशाप्रकारचे शेजारी आपल्यापैकी अनेकांना असतील. हल्ली 'चिंटू' कर्नाटकातल्या एका वृत्तपत्रातही प्रसिध्द होतो. तिथेही हीच सगळी पात्र आहेत. शिवाय हिंदी, इंग्रजी, गुजराथी ह्या भाषांमधेही 'चिंटू' तयार होतो. त्या त्या भाषेचा बाज संभाळावा लागतो पण शेवटी 'चिंटू' सगळीकडे सारखाच आहे.



मध्यंतरी 'चिंटू' दृक्-श्राव्य माध्यामातही आला होता. त्याबद्दलचे पुढचे प्लॅन काय? त्यावेळची प्रतिक्रिया काय होती?

एखादं व्यंगचित्र जेव्हा दृक्-श्राव्य माध्यमात लोकांसमोर पहिल्यांदा येतं तेव्हा सुरुवातीला लोकांना त्याचा आवाज 'ऐकायची' सवय नसते. कारण स्वत: वाचताना मनात आपण एकप्रकारचा आवाज त्यांना दिलेला असतो. त्यामुळे असा आवाज सवयीने पचनी पडतो. आम्ही दृक्-श्राव्य माध्यमातून आणलेला 'चिंटू' हा एक प्रयोग होता आणि आता त्यावर काम चालू आहे. अनेक पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. मग ह्यात कार्टून फिल्म, व्हिडीयो गेम, मोबाईल फोनवर दिसू शकतील असे व्हिडीयो ते चित्रपट अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्याबद्दल आधिक माहिती आत्ता ह्या घडीला देता येणार नाही पण लवकरच काहीतरी ठरेल आणि 'चिंटू' वाचकांसाठी नवीन अनुभव घेऊन येईल.

परदेशी व्यंगचित्र ही वृत्तपत्रांशिवाय चित्र, मग, स्टिकर, टीशर्ट, टोप्या अशा विविध माध्यमांमधूनही आपल्याला दिसत असतात. 'चिंटू'बद्दल तशा काही योजना आहेत का?

नक्कीच. सध्या 'चिंटू'ला दृक्-श्राव्य माध्यमातून पुढे आणणे, ह्यावर आमचं मुख्य काम चालू आहे. सध्याच्या काळात त्यासाठी टिव्ही, इंटरनेट, मोबाईल अशी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. पण हे आम्ही मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता देशपातळीवर हे करण्याचा विचार सुरु आहे. 'चिंटू'ची पुस्तकं पण प्रसिद्ध होतातच. आत्तापर्यंत ३३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि अजून तीन नवीन लवकरच येणार आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात 'चिंटू'ची स्टिकर्स यायची. पण त्यावेळी आपल्या इथली बाजारपेठ अशा गोष्टींसाठी तयार झालेली नव्हती. आताच्या परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी बाजारपेठ ही अनुकूल आहे आणि 'चिंटू'च्या ब्रँडनेही चांगलाच जम बसवलाय. त्यामुळे योजना भरपूर आहेत आणि लवकरच त्याबद्दल वाचकांना कळेल.

'चिंटू'विषयी आलेल्या आणि तुमच्या विशेष लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया आणि अनुभव कोणते?

येणार्‍या प्रतिक्रियांमधे अडकून न राहता पुढे जायचं असं म्हटलं तरी काही काही अनुभव/ प्रतिक्रिया लक्षात रहातातच. 'चिंटू'ची सुरुवात झाली तेव्हाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातल्या कर्माळा गावातून एका आजोबांचं पत्र आलं होतं, "मला नातवंडांची खूप आवड होती आणि आता मला माझा नातू मिळाला".
मागे एकदा आम्ही मुलींच्या अंधशाळेत गेलो होतो. तिथल्या शिक्षिकांनी सांगितलं की, सगळ्या मुलींना रोज सकाळी सगळ्यात आधी 'चिंटू' वाचून दाखवावा लागतो. नंतर त्या मुलींनी 'चिंटू'मधले काही काही प्रसंग अभिनित करून दाखवले. दृष्टीहीन अशा त्या मुलींपर्यंत देखील आमचा चिंटू पोहोचलेला पाहून आम्हांला खूपच समाधान वाटलं. ह्याशिवाय बर्‍याच लहान मुलांचे पालक सांगतात की, आमची मुलं अजिबात मराठी वाचायची नाहीत, 'चिंटू'च्या निमित्ताने ती वाचायला लागली. अशा प्रतिक्रीया मिळाल्या की पुढचे काम करायचा उत्साह खूपच वाढतो.

'चिंटू' शिवाय तुम्ही वुडकार्व्हिंगचं ही काम करता असं रोहितकडून समजलं. त्याबद्दल आम्हांला अधिक जाणून घ्यायला आवडेल.

चारुहास : अगदी सुरुवातीला शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही नोकरी करत होतो. त्यात पैसे कमी मिळतात म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आम्ही अ‍ॅड एजंसी चालवत असू. नंतर 'चिंटू'चं काम चालू झालं.
अ‍ॅड एजंसीमध्ये पैसे चांगले मिळत असले तरी कलाकार म्हणून जे एक मानसिक समाधान मिळालयला हवं ते मिळत नाही, कारण तिथे दुसर्‍याच्या मताप्रमाणे काम करावं लागतं. हा विचार प्रबळ होत गेला आणि कलेची भूक भागवण्यासाठी वुडकार्व्हिंग सुरु केलं. नोकरी मागेच सोडली होती, पुढे अ‍ॅड एजंसी पण बंद केली आणि आता पूर्णवेळ 'चिंटू' आणि वुडकार्व्हिंग असं काम सुरु आहे. वुडकार्व्हिंगचं हे काम संपूर्ण भारतात आमच्याखेरीज इतर कोणीही करत नाही.
लाकूड वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतं. लाकडाचे हे नैसर्गिक रंग जतन करून त्यावर आम्ही लेझरच्या साहाय्याने कोरीव काम करतो. ह्यातून तयार होणारी कलाकृती ही अस्सल भारतीय दिसते आणि शिवाय अतिशय नवीन अशी ही कल्पना आहे. हे कामही आम्ही सुरु केल्यानंतर हळूहळू फुलत गेलं. वेगवेगळ्या आयटी कंपन्या त्यांच्या परदेशी ग्राहकांना भेट म्हणून देण्यासाठी आमच्याकडून हे कोरीवकाम केलेले शोपिस घेतात. हे सगळं काम सृजन आर्ट च्या रुपात चालवलं जातं आणि ह्यात माझी पत्नी भाग्यश्री हीचादेखील सहभाग आहे.

व्यंगचित्र काढण्याची कला ही दिसायला सोपी वाटते पण प्रत्यक्षात खूपच अवघड आहे.  व्यंगचित्रकारीता ह्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायच्या दृष्टीने कोणत्या गोष्टीं महत्त्वाच्या आहेत?

भारतात कुठेही व्यंगचित्रकारीतेचं शिक्षण उपलब्ध नसल्याने ही कला आपली आपणच शिकावी लागते. तसच व्यंगचित्र हे माध्यम अतिशय संवेदनशील आहे. ते नीट हाताळलं नाही तर कोणीही दुखावलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे खुल्या नजरेने, मोकळेपणाने बघणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळेच लहानसहान गोष्टींमधून आपल्याला आनंद घेता येतो तसच तो दुसर्‍याला देता येतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या घडामोडींबद्दल सतर्क रहावं लागतं, भरपूर वाचन करावं लागतं, विनोदबुद्धीला संवेदनशीलतेची जोडही असावी लागते. व्यंगचित्रांमघले संवाद लिहिण्यासाठी भाषेवर, लिखाणावर प्रभुत्त्व असावं लागतं. कमीत कमी शब्दांत योग्य तो संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणं ह्यामुळे शक्य होतं. तांत्रिक बाबी बघता रेखाटनांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. ह्या विषयाचा आवाका खूपच मोठा आहे आणि शिक्षणापेक्षा अनुभवातूनच जास्त हे शिकता येते.

रोजच्या वृत्तपत्राचा अविभाज्य भाग बनून गेलेल्या आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन कार्यातून दोन हलके फुलके क्षण देऊन जाणार्‍या ह्या छोट्याश्या 'चिंटू' मागे एव्हडी मेहेनत, विचारप्रक्रिया आहे हे चारूहास आणि प्रभाकर ह्यांच्याशी झालेल्या ह्या गप्पांमधून समजलं आणि 'चिंटू' अधिकच आवडू लागला. मायबोलीकरांसाठी वेळ दिल्याबद्दल मी चारूहास आणि प्रभाकर ह्यांचे आभार मानून आणि 'चिंटू'च्या आगामी सर्व योजनांना शुभेच्छा देऊन ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले
इतर साहाय्य: रोहित पंडित, पूनम छत्रे
----
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित
http://www.maayboli.com/node/10453

0 प्रतिसाद: