आमची आज्जी लहान बाळांना झोपवताना काही विशिष्ट ओव्या म्हणायची. त्या अगदी पुर्वंपार चालत आलेल्या ओव्या असल्याने माझ्या बाबांच्या लहानपणी, मग आमच्या आणि मग नीरज, निशांत लहान असताना त्या म्हंटल्या गेल्या. आईच्या माहेरीही तिची काकू, आज्जी, आमची तिकडची आज्जी अशाच ओव्या म्हणत असत. दोन्ही कडच्या काही ओव्या वेगळ्या होत्या त्यामुळे आता त्यांचा एक सुपरसेट तयार झालाय!
रिया झाल्यावर महिन्या सव्वामहिन्यात आज्जी गेली. एखाद दिवसाचा अपवाद वगळता तिने रियाला झोपवण्यासाठी ओव्या म्हंटल्याही नाहीत कारण तिची स्वतःचीच तब्येत बरी नसायची. आता रियाला झोपवताना बाकी सगळे जण ओव्या म्हणतात आणि रोजच आज्जीची आठवण निघते. ह्या ओव्या कानाला फारच गोड वाटतात. त्यातला संकल्पना कालानुरूप नसल्या किंवा त्यात फार काही लॉजिक नसलं तरी छान वाटतात आणि मुख्य म्हणजे त्या बर्यापैकी लिंगनिरपेक्ष आहेत !आज्जी एकंदरीतच त्या इतक्या आश्वासक सुरात म्हणायची सगळीच बाळं अगदी शांत झोपून जायची. ह्यातल्याच काही ओव्या आज ब्लॉगवर टाकतोय.
अंगाई रे बाळा, तुझा लागून दे रे डोळा.
पापिणी चांडळा, दृष्ट लागी... ||१||
अंगाई, अंगाई, बाळ झोपी जाई.
बाळाला म्हणूनी, दुदु देई ||२||
नीज रे तान्हीया, आपुले पाळणी.
तुला राखण गवळणी, गोकूळाच्या ||३||
मोठे मोठे डोळे, हरणी पाडसाचे,
जसे माझ्या राजसाचे, नीरज बाळाचे ||४||
मोठे मोठे डोळे, भिवया चंद्रज्योती,
चांगली म्हणू किती, रिया बाळाला ||५||
मोठे मोठे डोळे, भिवया लांबरूंद
कपाळी लावा गंध, निशांत बाळाला ||६||
रिया बाळ खेळे, तिच्या पाई घालू वाळे,
निवतील डोळे, सखियांचे ||७||
नीरजबाळचा खेळ, कोणी गं मांडियेला,
राखफुलाला धाडीला, निशांत बाळ ||८||
आमंचा निशांता बाळ, आम्हांला आवडे,
दारीचे केवडे, जून झाले ||९||
आमंचा नीरज बाळ, आम्हांला हवा हवा,
देवाजीने द्यावा, जन्मभरी ||१०||
माझ्या गं अंगणातं, सांडिला दुधभातं,
जेविला रघुनाथ, निशांत बाळ ||११||
माझ्या गं अंगणातं, सांडिली दुधपोळी,
जेविली चाफेकळी, रियाबाई ||१२||
नीरज बाळ खेळे, अंगणी ओसरी,
त्याला संगत दुसरी, निशांत बाळाची ||१३||
माझ्या गं दारावरनं, दहापंधरा गाड्या गेल्या,
भावाने बाहिणी नेल्या, दिवाळीला ||१४||
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
2 प्रतिसाद:
अरे सही. आमच्याकडे पण अशी पारंपारिक गाणी/ओव्या आई म्हणायची. त्यात तेव्हा तान्ही असतील त्या नातवंडांची नावं :) हे एक मला आठवतेय -
गायी गं गायी गायी, गायी गेल्या दूर दूर
ईशान बाळासाठी दुधाचा आला पूर
गायी गं गायी गायी, गायींची झाली दाटी
ईशान बाळासाठी दुधाने भरली वाटी
गायी गं गायी गायी, गायींनी भरला गोठा
ईशान बाळासाठी दुधाला नाही तोटा
तिन्ही सांजा झाल्या सखे, दिवे लावु कोठे कोठे
ईशान बाळाचे गं चिरेबंदी वाडे मोठे
ekdam mast ovya ahet mazi aai sudha thode shabd vegale asalelya ovya amha sarvasathi ani ata mazya mulisath bolate. vachun junya athavani jagya zalya.
Post a Comment