झिम्मा - आठवणींचा गोफ

          मागे झी-मराठीच्या किंवा कुठल्यातरी अवॉर्ड सेरेमनीमधल्या प्रमुख पाहुण्यांनी बोट भरकटून एका निर्जन बेटावर अडकेल्या दोन मित्रांची गोष्ट सांगितली होती. हे मित्र त्या बेटावर अडकून पडतात आणि कोणीतरी आपल्याला शोधायला येईलच या आशेवर निवांत असतात. निर्जन बेटावर भरपूर लाकडं आहेत आणि बोटीत अवजारंही आहेत म्हणून एकजण वेळेचा सदुपयोग करून लाकडाच्या खुर्च्या बनवतो. दुसरा बेटावरचं रम्य वातावरण बघत हरखून जातो आणि बेटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन एक भलमोठं आणि सुंदर शिल्प बनवतो. काही वेळाने ह्या दोघांचा शोध घेत गावकरी खरच बेटावर पोचतात. पहिल्याने केलेल्या खुर्च्या पाहून खुष होतात आणि सगळ्या खुर्च्या लगोलग विकत घेऊन टाकतात. नंतर बेटाच्या दुसर्‍या बाजुला जातात आणि तिथे असलेलं शिल्प पाहून निश:ब्द होतात. पुढे अनेक जण ते शिल्प पहायला येऊ लागतात आणि त्या बेटाला शिल्पकाराचं म्हणजे दुसर्‍या मित्राचं नाव दिलं जातं. गोष्टीचं तात्पर्य काय तर अगदी गरज असेल तेव्हाच आणि तेव्हड्याच खुर्च्या बनवाव्या पण त्यात अडकून न पडता निरंतर टिकणारं शिल्प बनवायचा ध्यास घ्यावा. ही गोष्ट अगदी लक्षात राहिली आणि ती सांगणार्‍या प्रमुख पाहुण्या विजया मेहेताही! त्या आधी विजया मेहेतांचं नाव फक्त आज्जीच्या तोंडून 'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करायची..' एव्हड्या एकाच संदर्भात ऐकलं होतं. ते वगळता त्यांच्याबद्दल ना काही ऐकलं होतं ना कुठल्या नाटक/सिनेमात त्यांना पाहिलं होता. पुढे 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ह्यांनी विजया बाईंचं नाव आदराने घेऊन, त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं. थोड्याच दिवसात विजया बाईंच आत्मचरित्र 'झिम्मा' प्रकाशित होणार अशी बातमी आली आणि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या ते घेऊन वाचायचं हे ठरवून टाकलं.

          'झिम्मा - आठवणींचा गोफ' अश्या शीर्षकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना बाई आधी वाचकांना शुभेच्छा देतात!!! तर शेवटी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच, प्रेक्षक आणि त्या स्वतः अश्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरे आणि संस्थांची संचालकपदे अश्या बर्‍याच गोष्टी. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना. ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणं म्हणजे मोठच काम. पण नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या बाजात सांगितलेल्या घटना उत्सुकता कायम ठेवतात. हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहेता चार टप्प्यांमध्ये लिहिलं आहे. ह्यातलं 'विजया मेहेता' हे त्यांचं आजचं रुप. आणि म्हणून बाकीच्या तिघींबद्दल तृतीय पुरुषी एकवचनात लिहिलं आहे. स्वतःच्या गतरुपांकडे असं त्रयस्थ नजरेने पहाणं मला फार आवडलं.

          विजया बाईंच्या बालपणीच्या म्हणजे बेबीच्या गोष्टी सुरस आहे. जयवंत परिवाराच्या मोठ्या कुटुंबकबिल्याची आणि बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्तींची वर्णनं येतात. भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं आपल्या डोळ्यासमोर त्या जागा उभ्या करतात. पुढे पुढे नाटकांच्या नेपथ्यांबद्दलचीही अशी वर्णनं वाचून न कळत आपण तो रंगमंच डोळ्यासमोर बघायला लागतो आणि बाईंनी वर्णन केलेल प्रवेश रंगमंचावर कसे घडत असतील ह्याची कल्पना करायला लागतो.

          विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ. बाई म्हणतात संपूर्ण भारतात ह्या काळात एक सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या, जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या, नवनवे कलाकार उदयाला येत होते आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट होती. ह्या सगळ्याचच छोटखानी रूप म्हणजे भुलाबाई इंस्टिट्युट. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या आणि त्यांना घडवण्यात ह्या इमारातीचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे चित्रपट माध्यमात काम करायला लागल्यावर 'वास्तू बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात.; असं बाईंचं ठाम मत पडलं त्याची सुरुवातही कदाचित भुलाबाई इंस्टिट्युट पासुन झाली असावी.

          विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास पुढील भागात उलगडतो. सुरुवातीच्या काळात पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका 'रंगायन'ने केल्या. बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची तसेच प्रशासकाची जडणघडण ह्या भागांमध्ये पहायला मिळते. दिग्दर्शनाही विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाततचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेले काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत. वयाने आणि अनुभवाने तुलनेने तरूण दिग्दर्शिकेने पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसाख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेले पाहून बाईंच्या ठाम विचारांचे आणि धैर्याचे कौतूक वाटते.

          भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटके भारतात तसेच जर्मनीत केली. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मित्र जोडले. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावे आपले माहेरच वाटू लागली. ह्या सगळ्या प्रकल्पांदरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत. शांकुतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी नाट्यप्रशिक्षण घेतले. तिथले अनुभव, तिथे पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत. रंगायन बंद पडल्यानंतर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं परंतु ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता 'लोकमान्य' रंगभुमी म्हणायचं ठरवलं. ह्या लोकमान्य रंगभूमीवर बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक अजोड नाटकं दिली. इतके वेगवेगळे विषय! ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल. प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींदरम्यान लागलेल्या ठेचांबद्दल बाईंनी अगदी विस्ताराने लिहिलेलं आहे. पुस्तकामधला लोकमान्य रंगभूमीबद्दलचा हा भाग मला सर्वात जास्त आवडला. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो.

          पुढे दुरर्शनकरता काही कार्यक्रमांवर तसचं काही चित्रपटांवर बाईंनी काम केलं. त्यांच्याच काही नाटकांचं रुपांतर चित्रपटांमध्ये केलं. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये कसे बदल केले, कुठला भाग माध्यम बदलामुळे जास्त खुलला, कुठला भाग नीट झाला नाही ह्यांबद्दलची माहिती पण छान आहे. ह्या माध्यमांमध्ये तुलना जरूर केली आहे पण आमचं जुनं तेच सोनं असा सुर कुठेही जाणवला नाही. पुस्तकातला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलय. तो भाग अगदीच गुंडाळल्यासारखा वाटतो. तब्बल बारा वर्षांच्या कारकिर्दीत सांगण्याजोगं एव्हडच घडलं का? असा प्रश्न पडतो. एव्हड्या मोठ्या कारकिर्दीत बाईंना अनेक जण भेटले. भेटलेल्या मंडळीबरोबर आलेले चांगले अनुभव लिहिलेले आहेतच पण खटकलेल्या गोष्टी उदा. तेंडूलकरांबरोबर तुटलेली युती, भक्ती बर्वेंचा खटकेलेला अभिनय, नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद, वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग इ. कुठलीही सनसनाटी निर्माण न करता पुस्तकात नमुद केलेल्या आहेत. स्वतःच्या चुकाही कबूल करण्यात बाईंना काहीही कमीपणा वाटलेला नाही, एव्हडचं काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे. मी आधी वाचलेल्या चरित्र/आत्मचरित्रांच्या तुलनेत वैयक्तिक आयुष्याबद्दल जरा कमी लिहिलय का काय असं वाटलं पण कला/व्यवसाय ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं असताना, वैयक्तिक आयुष्याबद्दल कोण कशाला सांगेल असंही वाटलं.

          पुस्तक वाचल्यावर काही प्रश्नही पडले. पुस्तकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाणीचे करार, राष्ट्रीय पातळीवरचे कलाविषयक उपक्रम, राज्यसभेतल्या खासदारांनी नाट्यसंस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न वगैरे बाबींचे उल्लेख येतात. हल्ली अश्या काही गोष्टी होत नाहीत का? तसच विजयाबाईंनी सांगितलेल्या नाटकांच्या गोष्टींमध्ये इतकं वैविध्य आहे! अश्या प्रकारची नाटकं लोकमान्य रंगभुमीवर हल्ली तयारच होत नाहीत का? सध्या काही कलाकार मंडळी जुनी नाटकं नव्या संचात परत रंगभुमीवर आणण्याचे उपक्रम करत आहेत. बाईंची तसेच इतरही गाजलेली नाटकं मिळतील तितकी पाहून घ्यायची असं हे पुस्तक वाचल्यावर ठरवलं आहे. त्यावेळच्या प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळायची ती अनुभूती नाहीसुद्धा मिळणार कदाचीत, पण मिळतं आहे तितकं तरी बघुन घ्यायचं ठरवलय!

-----------------------------------------------------------------------------------------------------------
          'झिम्मा' नुकतच वाचून संपवलं. बाईंच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की त्याबद्दलच्या पुस्तकाचं परिक्षण/ परिचय/रसग्रहण माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पुस्तक वाचून संपल्यावर जे मनात आलं ते लिहिलय. अनेक जण सध्या 'झिम्मा' वाचत आहे. त्यांनाही पुस्तक वाचल्यावर काय वाटलं हे वाचायला नक्की आवडेल.

पुन्हा पळापळी...

परवा परत एकदा 'रन'मध्ये भाग घेतला.. जवळ जवळ दिड वर्षांनी. पण यंदा मात्र भारतात.. पुण्यात. परत आल्यावर बरीच गडबड सुरु होती. पुणे मॅरॅथॉम साधारण डिसेंबरमध्ये असते हे माहित होतं. त्यामुळे सप्टेंबरपासून वेबसाईट चेक करत होतो पण ती नोव्हेंबरपर्यंत अपडेट झालीच नाही. शेवटी मॅरॅथॉनभवनला फोन करून विचारलं आणि नाव नोंदणी सुरु झाल्याझाल्या लगेच १० किलोमिटर स्पर्धेत नोंदणी केली. हाफ मॅरॅथॉनची तयारी करणं शक्य नव्हतं आणि वेळही नव्हता. यंदा घरी पण सगळ्यांना उत्साहं होता. शिल्पाने डॉक्टरांना विचारून ३.५ किलोमिटरमध्ये नाव नोंदवलं त्यांच्याबरोबर वहिनी, नीरज आणि निशांतनेही नोंदवलं. दादाने हो-नाही करता करता शेवटी १० किलोमिटरमध्ये नाव दिलं. शिल्पाची भावंड श्वेता, अमित आणि सुहासपण १० किलोमिटरमध्ये भाग घ्यायला तयार झाले आणि आमची फॅमिली रनच झाली! एकंदरीत रेस बरी झाली. रूट चांगला होता. फार चढ उतार नव्हते. खंडूजी बाबा चौक ते बंड गार्डन व्ह्याया लक्ष्मी रोड, सेव्हन लव्हज चौक, एमजी रोड असा मार्ग होता. १० के मला साठी ७० मिनिटं लागली. आत्तापर्यंतच्या १० के मधला सगळ्यात जास्त वेळ! व्यायाम आणि सरावाचा अभाव आणि ऐनवेळी झालेली सर्दी ह्या सगळ्याचा परिणाम. पण पुण्यात भर गावात सकाळी सकाळी पळायला मजा आली. ट्रॅफिकला शिस्त लावली तर पुण्यातले रस्ते एकदम मस्त आहेत हे जाणवलं. सुरुवातीला खंडूजी बाबा चौकात आणि लक्ष्मी रोडला अधे मधे ढोल ताशांचा गजर सुरु होता. रास्ता पेठेत आणि सेव्हन लव्हज चौकात फुलांच्या पायघड्या होत्या. मधेमधे रस्त्यात लोकं आणि शाळांमधली मुलं उभी होती. रस्ते झाडणार्‍या बायका थांबून टाळ्या वाजवत होत्या. रास्ता पेठेत ऑफिसला चाललेल्या दोन काकू एकदम उत्साहात टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या. पेठांमध्ये बरीच पुणेरी मंडळी हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या चेहेर्‍यांनी पळणार्‍यांकडे बघत उभी होती. एम्जी रोडच्या सुरुवातीला अचानक सन्नाटा पसरला. अगदी पीन ड्रॉप सायलेन्स. कारण सकाळी फारशी वर्दळ नव्हती आणि वहानंही नव्हती. मग पुढे कॅम्पात इंग्लिश गाणी सुरु असलेल्या स्पिकर्सच्या भिंती लागल्या होत्या. एरवी पादचार्‍यांना न जुमानणार्‍या पुणेरी ट्रॅफिककडे तुच्छ कटाक्ष टाकत पळायला फारच मजा येत होती ! २७वी स्पर्धा म्हणून इतका गवगवा केला जात असताना आयोजनात मात्र तो अनुभव अजिबात दिसून आला नाही. हाफ आणि फुल मॅरॅथॉनच्या ट्रॅकवर पुरेसे स्वयंसेवक आणि पोलिस नव्हते. पळणार्‍यांच्या मधेमधे वहाने येत होती. ३.५ किमी रनवाल्यांना दिशादर्शक बोर्ड नव्हते. कुंटे चौकात वळायच्या ऐवजी सगळं पब्लिक लक्ष्मी रस्त्यावरून पुढे जाऊन सेव्हन लव्हज चौकापर्यंत पोचलं. २ डिसेंबरला स्पर्धा आणि वेबसाईट १० नोव्हेंबरला अपडेट झाली. तोपर्यंतं गेल्यावर्षीचेच डिटेल्स होते. हाफ, फुल आणि १० के वाल्यांना 'Vest' म्हणून साधा पांढरा बनियन स्पर्धेच्या लोगोचा छप्पा मारून दिला होता !!!! तिथल्या माणसाला म्हंटलं आता एक चट्ट्यापट्याची चड्डी किंवा लेंगा पण द्या.. म्हणजे शॉर्ट्स किंवा ट्रॅकपँटच्या ऐवजी तेच घालून अगदी ऐतिहासिक वेशभुषा होईल.. ! (सकाळच्या थंडीत बरेच जण टीशर्ट वर तो बनियन घालून 'सुपरमॅन' होऊन आले होते ... !! आमच्या ग्रुपमध्येही असा एक सुपरमॅन होता. :) अजून एक खटकलेली बाब म्हणजे भेटलेले सगळे स्वयंसेवक, पाणी देणारी मंडळी, मॅरॅथॉन भवनात नंबर वाटणारी लोकं अमराठी होते. मराठी मंडळींना अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट का नाही कोण जाणे. पळापळी असलं की छान असतं. आधी बरेच दिवस तयारीत जातात आणि नंतर परिक्षा संपल्यासारखं वाटून स्वतःचे लाड करून घेता येतात. २ पाच के, २ हाफ मॅरॅथॉन आणि आता तिसर्‍या १० के नंतर फुल मॅरॅथॉन करायची खूप इच्छा आहे. पण ४२ किलोमिटर करायची मानसिक आणि शारिरीक तयारी कशी आणि कधी होणार काय माहित ! एकंदरीत पुण्यात हाफ मॅरॅथॉन आणि १० के मिळून जवळ जवळ दोन हजार आणि चॅरीटी रनमध्ये ५००० च्या वर लोकांना पळताना पाहून मस्त वाटलं. शिवाय आम्ही घरचेही बरेच जण मिळून कंपू करून गेलो होतो त्यामुळे अजून मजा आली !!! -------------------------------------------------------------------------------------------------------------- परवा एका पार्टीत ब्लॉगर स्नेहा भेटली. मराठी ब्लॉग विश्व बाळसं धरत असताना आम्ही जे काही ब्लॉगर नियमीतपणे लिहायचो त्यातली एक स्नेहा. त्या वेळचे ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्यांच्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. अनेकांच्या अनेक पोस्ट्सची उजळणी करून झाली. दोघांनीही एकमेकांना 'इतक्यात ब्लॉगवर काहीच का लिहिलं नाहीस?' असा प्रश्न विचारला...उत्तर माहित असूनही. :) परवा पळापळी झालीच होती. आदल्या दिवशी जुन्या ब्लॉग्जची उजळणीही झाली होती. त्यामुळे ब्लॉगवरची धुळ झटकायला निमित्त मिळालं. मस्त वाटतय एकदम इथे लिहून. शिवाय २०१२चं वर्ष ब्लॉगवर एकही पोस्ट न पडून भाकड जाता जाता वाचलं! त्याबद्दल थॅंक्न स्नेहा. :)

रसग्रहण - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर

मायबोली.कॉम वर नुकतीच रसग्रहण स्पर्धा पार पडली. त्यातली ही माझी प्रवेशिका.
सगळ्या प्रवेशिका इथे पहायला मिळतील. http://www.blogger.com/img/blank.gif

*********************************************************

पुस्तकाचे नावः वास्तव नावाचं झेंगट
लेखक: सुमित खाडिलकर
प्रकाशन संस्था- नविन प्रकशन
प्रथम आवृत्ती- एप्रिल २०१०

वास्तव नावाचं झेंगट

इंग्रजी पुस्तकं किंवा ब्लॉगविश्वावर नजर टाकली तर असं दिसतं की सर्व वयोगटांतली लोकं आपल्या अनुभवांवर आधारित भरभरून लिहीत असतात. नोकरी करणारे, नोकरी न करणारे, विद्यार्थी , प्रवास करणारे, खेळाडू, कलाकार, तंत्रज्ञ असे कुठल्याही क्षेत्रातले असले तरी लिहितात. आपल्याला आलेले अनुभव जमतील तसे जमतील त्या पद्धतीने आणि शक्य असेल त्या माध्यमात लिहितात. मराठीतही अशाप्रकारचं लिखाण वाचायला मिळतं पण त्याचं प्रमाण इंग्रजीपेक्षा बरंच कमी आहे. इतके दिवस लिखाणातली ही 'तरूणाई' थोडीफार पुस्तकं, काही ठरावीक ब्लॉग किंवा इतर माध्यमांमधून कमीअधिक प्रमाणात दिसणार्‍या लेखनापुरतीच मर्यादित होती. पण हल्ली संपादक तसेच प्रकाशकांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे आणि वाचकांकडून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकं, मासिकं, ब्लॉग, संकेतस्थळं ह्या सगळ्या माध्यमांमध्ये अश्या नविन लेखकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे.

नुकतच अश्याच एका नविन आणि तरूण लेखकाने, सुमित खाडिलकरने, लिहिलेलं 'वास्तव नावाचं झेंगट' हे पुस्तक वाचलं. लेखक अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण नुकतंच संपवलेला. ह्याचा उल्लेख इथे अशासाठी केला जेणेकरून लेखकाच्या वयोगटाचा आणि त्या अनुषंगाने असणार्‍या अनुभवविश्वाचा थोडाफार अंदाज यावा.
पुस्तकातली दोन प्रकरणे "मी - आम्ही- आमची टीम" आणि "वास्तव नावाचं झेंगट" एका अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतात. या कथांमधला कथानायक आणि त्याच्या कॉलेजमधले इतर विद्यार्थी एका सांघिक स्पर्धेत भाग घेतात आणि ती स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली विद्यार्थी वयोगटाला साजेशी धडपड, त्यांना आलेले अनुभव तसेच हाती न लागलेलं आणि लागलेलं बरच काही सांगणारी ही गोष्ट. अतिशय उत्स्फूर्त आणि मुख्य म्हणजे कथानायकाच्या वयाला साजेशी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि त्या प्रवासाचा भाग बनवून टाकते.

ह्यातला कथानायक हा भवानी शिक्षण मंडळाच्या प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल ब्रँचचा विद्यार्थी. परीक्षेनंतरच्या सुट्टीत ठरलेल्या एका कम्पनी व्हिजिटच्या मिटींगसाठी तो कॉलेजला जातो आणि त्यांचे सर तिथे एकदम वेगळाच विषय काढतात. 'एस.ए.इ. इंडिया' ह्या संस्थेतर्फे आयोजित 'ऑल टेरेन व्हेईकल' बनवण्याच्या स्पर्धेबद्दल ते सांगतात. कथानायक आणि त्याचा मित्र त्यात नाव देऊन टाकतात आणि नंतर त्याबद्दल विसरूनही जातात. सुट्टी संपल्यावर कळतं की त्यांच्याशिवाय अजून फक्त दोघांनी ह्या स्पर्धेसाठी नावं दिलेली आहेत. सर आणि हे चार जण ह्या स्पर्धेची कॉलेजमध्ये जोरदार प्रसिद्धी करतात, आपापल्या मित्रांना ह्यात खेचायचा प्रयत्न करतात आणि सरतेशेवटी दुसर्‍या वर्षाची सतरा आणि फक्त बाहेरून मदत करायला तयार झालेली शेवटच्या वर्षाची तीन, अशी एकूण वीस जणं गोळा होतात. ह्यातल्या कोणाला किंवा अगदी सरांनाही गाडी बनवायचा अनुभव सोडाच पण त्याबद्दल फारशी माहितीही नसते. त्यात अगदी शेवटच्या क्षणी असं कळतं की स्पर्धेचे संचालक स्पर्धेपूर्वी इंटरव्ह्यू घेणार आहेत. टीम मधल्या कोणालाच इंटरव्ह्यूला काय विचारणार हे माहीत नसतं किंबहुना काहीही विचारलं तरी सांगता येणार नाहीये ह्याची खात्रीच असते. अश्याच एका गोंधळातल्या मिटींगमध्ये रघुनाथ भावे नावाचा एक मुलगा येऊन स्वतःची ओळख करून देतो आणि पुढे "कुणाला असं वाटतं का, मी कॅप्टन बनू नये, किंवा दुसर्‍या कुणी बनावे?" असा सरळ प्रश्न विचारतो. अर्थातच कोणाकडूनही काहीच उत्तर न आल्याने हा रघुनाथ भावे टीमचा कॅप्टन बनतो आणि तिथून सुरु होते एका ध्यासाची सुरस कथा.

कॉलेजमधल्या टीमच्या संदर्भात जे जे काही घडू शकतं ते सगळं ह्या टीमच्या बाबतीत घडतं. दोन नेत्यांमध्ये मध्ये भांडणं होतात, ज्युनियर पोरांवर सिनियर्स दादागिरी करतात. काही जणं ही दादागिरी सहन करून पाट्या टाकत राहतात पण काही जण मात्र टीम सोडून जातात. सोडून गेलेल्यांपैकी काही जण तो राग मनात ठेऊन ह्या टीमच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करतात. ह्या सगळ्या प्रकारांमुळे टीम आणि कॉलेजमधले शिक्षक तसच व्यवस्थापन ह्यांचे संबंध बिघडतात. कॉलेज वेळच्या वेळी पैसे तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवत नाही. टीममधली मुलं आपल्या पालकांकडून पैसे घेऊन गाडीचं काम पुढे नेतात. अश्या परिस्थितीत पैसे देणार्‍या पण काम न करणार्‍या मुलांशी काम करणार्‍या मुलांना जुळवून घ्यावं लागतं. स्पर्धेच्या सुरुवातीला सगळेच जण भन्नाट कल्पना लढवून डिझाइन करतात पण ते प्रत्यक्षात उतरवणं जवळजवळ अशक्य ठरतं. मग ऐनवेळची धावपळ. त्यात तोंडावर आलेल्या परीक्षा. काही जण एखाददोन पेपर बुडवतात मात्र गाडी चाकांवर पळवायचीच ह्या एका इर्ष्येने पेटून उठतात. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडतो. जे जे शक्य होईल ते ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं जातं मात्र स्वप्न १०० % पूर्ण होतंच नाही. कल्पनांच्या कितीही भरार्‍या मारल्या आणि ध्येयपूर्तीचा कितीही ध्यास घेतला तरी वास्तव नावाचं झेंगट त्यांच्या स्वप्नाच्या आड येतं !
पुढच्या वर्षी टीम नव्या दमाने कामाला लागते. आदल्या वर्षी झालेल्या चुका टाळायची जबाबदारी कथानायक आपल्या खाद्यांवर घेतो, नवे वर्ष, नवी टीम आणि त्यांच्या पुढच्या नव्या समस्या ! फक्त आता गाठीशी असतं एका वर्षाच्या अनुभवाचं पाठबळ आणि आदल्यावर्षीच्या चुका टाळण्याचा निश्चय. टीमचा नविन वर्षातला स्पर्धेच्या दिवसापर्यंतचा प्रवासही अतिशय रंजक आहे. कथानायक म्हणतो, "पहिलं वर्ष स्वप्नवत होतं तर दुसरं वास्तव. या वेळी आम्ही आंधळेपणाने झपाटून नाही तर डोळसपणे कष्ट केले होते. पण त्यामुळेच बहूतेक ह्यावेळी कमी मजा आल्यासारखं वाटतं होतं."

काही काही प्रसंग लेखकाच्या शैलीमुळे तसेच नाट्यमय वर्णनांमुळे आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहातात. पहिल्यांदा गाडी चाकांवर चालवली जाते त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना आपल्यालाही स्फुरण चढतं. स्पर्धेच्या दिवशीची धावपळ, ऐनवेळची कामं आपल्याला तिथल्या वेगवान वातावरणात घेऊन जातात. लेखकाने पुस्तकात सांगितलेते इंजिनीयरिंग कॉलेजमधल्या शिक्षकांबद्दलचे अनुभव तर अगदी वास्तवदर्शी आहेत.
कॉलेजमधल्या शिक्षिकेशी संबंध बिघडलेल्या एका मुलाला लेखी परिक्षेत ७० मार्क मिळतात मात्र कॉलेजमधल्या शिक्षकांच्या हातात असलेल्या त्याच विषयाच्या तोंडी परीक्षेत तो नापास होतो. ह्या प्रसंगाबद्दल लेखक म्हणतो, "लायकी नसताना अधिकार मिळाले तर काय होतं याचं आमच्या मॅडम जिंवत उदाहरण होत्या."
किंवा अनेक वर्ष शिक्षकी पेशातच असलेले आणि बाहेरच्या कॉर्पोरेट जगात काय सुरु आहे ह्याची फारशी कल्पना नसलेले एक सर कथानायकाला टीमचा "मॅनेजर" कसा असावा ह्या बद्दल बरच काही ऐकवतात. ह्या प्रसंगाबद्दल लेखक लिहितो, "सर मला मॅनेजर बनवायच्या दृष्टीने लेक्चर द्यायला लागले. माझा टीशर्ट किंवा वरची एक दोन बटणे उघडी ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला शर्ट, जीन्स, सँडल, हातातलं कडं, गळ्यातला गंडा, चेहेर्‍यावरची बेफिकिरी, एवढंच काय पण माझी चालण्याची पद्धतसुद्धा 'त्यांच्या' मॅनेजरच्या श्रेणीत बसणारी नव्हती. त्यांना माझं हसणं सुद्धा मॅनेजरसारखं वाटायचं नाही. ते मला म्हणाले होते हसताना माझे डोळे खूप बारिक होतात. भरपूर मोठं लेक्चर ऐकून मला हसावं की रडावं ते कळेनासं झालं. रोहन मात्र पोट धरून हसत होता." अर्थात पुस्तकातले हे विद्यार्थी फक्त शिक्षकांच्या विरोधातच आहेत असं नाही. तसच या मुलांच्या वयाला अनुसरून असणारा समजुतदारपणा दाखवणारे काही प्रसंगही लेखाकाने भाषेचा बाज न सोडता लिहिले आहेत. एका प्रसंगात लेखक लिहितो, "त्यांना चढलेल्या धुंदीचा हेवा वाटून मलाही क्षणभरासाठी बडवायजरचा मोह झाला, पण मी तो यशस्वीरीत्या आवरला. जवळपासचा काही नातेवाईकांचा इतिहास ह्या बाबतीत चांगला नव्हता आणि तो आठवला की, मला या गोष्टीचा मोह आवरता यायचा. माझ्यासमोर माझ्या आईचा चेहेरा यायचा आणि मग मी असं काही करणं अशक्य व्हायचं. मी दारू प्यायल्याचं आईला नुसतं कळलं, तर तेव्हड्यानंच तिला काही तरी होऊन बसलं असतं."

स्पर्धेबद्दलची कहाणी सांगताना लेखक टीममधल्या मुलांची व्यक्तिचित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. विषयातली भरपूर आणि अचूक माहिती असलेला, समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच स्वभावात उद्दामपणा आलेला टीमचा कॅप्टन रघुनाथ, रघुनाथ इतकीच माहिती असणारा पण आपलं म्हणणं दुसर्‍यासमोर न मांडू शकल्याने मागे पडणारा रोहन, 'वन मॅन आर्मी' असलेला पण मुखदुर्बळ प्रसाद, दोघांच्या भांडणात न बोलून शहाणे ठरणारे कुंटे आणि शेट्टे आणि आपल्या क्षमतांची आणि उणिवांची पुरेपुर जाणीव असणारा आणि एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटली की त्यात स्वतःला झोकून देणारा कथानायक हे सगळेच जण आपल्या अवतीभवती कुठे ना कुठे सापडायला लागतात.

ही संपूर्ण कहाणी सांगताना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता लेखकाने अचूकपणे टिपली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अश्याप्रकारच्या सांघिक स्पर्धांमध्ये भाग न घेतलेल्या वाचकांना
ह्या पुस्तकानिमित्त एक आगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन होतं तर अश्याप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले वाचक नकळत "अगदी अगदी !" अशी दाद देऊन जातात. पुस्तकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यात मांडललेलं सगळं अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याची सतत जाणिव होते आणि म्हणूनच पुस्तक फार जवळच वाटतं आणि आवडून जातं !

ब्लॉगर्स आणि त्यांचे मला आवडलेले ब्लॉग

त्याकाळी, म्हणजे २००५/२००६ साली मराठी ब्लॉगविश्व फारच छोटं होतं. (कदाचित त्यामुळेच ?) खूप छान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. ब्लॉग आवडले तर सांगायचे, नाही आवडले तर ते ही सांगायचे, कोणी थोडे दिवस नाही लिहिलं तर लगेच मेल, कमेंट्स मधून चौकश्या व्हायच्या. तेव्हा आज आहे तितका युनीकोडचा सर्रास वापर सगळ्या ठिकाणी होत नव्हता. ब्लॉग असला तरी त्यावर टाईप करायला बरहा वापरायला लागायचं. मला मराठी ब्लॉगविश्वाचा शोध अचानकच लागला होता. "मासा आणि मासोळी" हे मी तेव्हा वाचलेलं मराठी ब्लॉगवरच पहिलं पोस्ट. नंतर मी रेग्युलरली ब्लॉग्ज वाचायला लागलो. काही काही ब्लॉग्ज अगदी खूप लक्षात राहिले. नंतर ते परत परत वाचले गेले.

मधे एकदा बोलता बोलता विषय निघाला तेव्हा परत काही ब्लॉग पोस्ट शोधून काढले आणि वाचले. पुढच्यावेळी एकेठिकाणी सापडावे म्हणून लिंक्स एकत्र टाकतोय.

१. मराठी ब्लॉगविश्वातला माझा सगळ्यात आवडता ब्लॉग म्हणजे ट्युलिपचा ब्लॉग. ह्यातले बरेच पोस्ट्स माझे अक्षरशः शेकडो वेळा वाचून पाठ झाले आहेत ! त्यातल्या माझ्या आवडत्या काही पोस्टच्या लिंक्स.

- जोशी आणि जोशीण : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/09/blog-post_12.html
- मुंबईतला पाऊस : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post.html
- चारुलता, स्वारोव्स्की आणि सरत्या उन्हाळ्यातली एक संध्याकाळ.. : http://tulipsintwilight.blogspot.com/2007/10/blog-post.html
- पांथविराम उचलण्यापूर्वी : http://tulipsintw
ilight.blogspot.com/2007/05/blog-post.html
- सुंदरबन : Sundarban: http://tulipsintwilight.blogspot.com/2007/04/blog-post.html

२. मी वर म्हंटलं तसं मी वाचलेलं पहिलं पोस्ट (पामरच्या ब्लॉग वरचं) : मासा आणि मासोळी : http://paamar.blogspot.com/2005/09/blog-post.html

३. नंदनच्या 'मराठी साहित्य' ब्लॉगवरचे बरेचसे पोस्ट खूप वाचनीय आहेत. त्यातला सखाराम गटणेवरचा पोस्ट खूप लक्षात राहिला. नंतर तो इमेलवरुनही बराच फिरला होता.
http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html

४. संवेदचा पूर्ण ब्लॉगच खूप सही असतो. अगदी ब्लॉगच्या नावला शोभेल असा !
http://samvedg.blogspot.com/

५. त्या काळी अभिजीत बाठे हा ब्लॉगर खूप अ‍ॅक्टीव असायचा. हल्ली फारसं लिहित नाही बहूतेक तो.
त्याचा 'एक डाव भुताचा' (आयटमच भुत) हा पोस्टपण खूप आवडला होता.
http://abhijitbathe.blogspot.com/2007/03/blog-post.html.

६. गायत्रीचं 'समईच्या शुभ्र कळ्या' गाण्याचं रहग्रहण फार सुंदर आहे. सारेगमप मध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं सादर झालं तेव्हा मी हे पोस्ट काढून वाचलय. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html

७. केतन कुलकर्णीचा ब्लॉग पण मला फार आवडायचा. त्याचं लिखाणं खूप ड्रिमी असायचं.
त्यातलं हे एक पोस्ट आणि VOF चं प्रवासवर्णन आवडलं होतं. http://asach-aapla.blogspot.com/2008/08/post-50.html

८. संवादिनीचा ब्लॉग एकदम हलकाफुलका असायचा. त्यातली काही पोस्ट वाचून 'अगदी अगदी' असं म्हणावसं वाटायचं. त्यातले काही लक्षात राहिलेले पोस्ट.
जग्गू : http://samvaadini.blogspot.com/2008/01/blog-post.html
दिल्ली आणि नेलपॉलीश : http://samvaadini.blogspot.com/2008/06/blog-post_19.html
लग्न : http://samvaadini.blogspot.com/2009/01/blog-post_29.html ह्यातलं 'नविन सूनबाईंच विविध गूणदर्शन' वाचून फार हसलो होतो !!

९. विद्या भूतकरचा ब्लॉगही मी फॉलो करायचो. साधा सिंपल छान असायचा. http://vidyabhutkar.blogspot.com/

१०. अभिजीत कुलकर्णीचा ब्लॉगपण सही असायचा. पण त्याने तो आता डिलीट केला की काय माहित नाही. आता सापडत नाहिये. :|

पुढे ब्लॉगविश्वाशी संपर्क थोडा कमी झाला. आता परत ब्लॉग्ज वाचणं सुरु करायचं आहे. सध्याच्या "पिढीतल्या" आपल्या आवडत्या ब्लॉग्जच्या लिंक कोणी इथे टाकल्यास माझी काही हरकत नाही.

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना...

सध्या मायबोली संकेतस्थळावर महिला दिनाच्या शतकमोहोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत. मुख्य म्हणजे हे कार्यक्रम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांसाठी खुले ठेवले आहेत. ह्यापैकी एका कार्यक्रमात संयोजकांनी सगळ्यांना 'स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना' ह्या विषयावर आपले मनोगत मांडण्याचं आवाहन केलं होतं.
तर मी लिहिलेला परिच्छेद खाली देत आहे....
--------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर लिहायला बसल्यावर स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे विषयांबद्दल सर्वप्रथम कधी विचार केला होता हे आठवायचा प्रयत्न करत होतो.
वैयक्तिक पातळीवर बघायला गेलं तर आमच्या घरातल्या सर्वच स्त्रिया फार कर्तबगार आहेत. आज्जीने नाशिक सारख्या ठिकाणी साधारण १९३० च्या आसपास वयाच्या आठ-दहाव्या वर्षी पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आणि बक्षिसे मिळवून क्रांती घडवली होती. नंतरही आजोबांच्या आजारपणामुळे एकटीने निर्णय घेऊन, पैशांची सोय करून ७० च्या दशकात पुण्यात जमीन घेतली. घरातले सगळे व्यवहार वगैरे तिच बघत असे. माझी आई आमच्या कुटूंबातली पहिली डबल ग्रॅज्युएट सून म्हणून आज्जीला तिचे फार कौतुक. आईनेही २२ वर्ष नोकरी करून बाबांच्या बरोबरीने किंवा थोडेफार जास्तच सगळे व्यवहार संभाळणे, महत्त्वाचे निर्णय घेणे वगैरे सगळं केलं. पुढे वहीनी आणि माझी बायको ह्या मार्कांनुसार, मिळवलेली बक्षिसे, sincerity वगैरेंनुसार आमच्यापेक्षा जास्त हुषार आहेत असं कौतुक माझी आई करत असते आणि त्या दोघींचाही घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच पूर्ण सहभाग असतो. त्यामुळे घरातल्या स्त्रियांकडे बघता त्यांना कधी 'मुक्ती' वगैरेची गरज आहे असं वाटलच नाही (hopefully !) आणि आजुबाजूचं जग बघेपर्यंत ह्याची कधी जाणिवच झाली नाही. घरातल्या स्त्रियांना कधी त्रास झाला नसेल असं नाही (म्हणजे घरी लवकर ये, परिक्षा आहे तर बाहेर नको जाऊ, घरात आजारपण आहे तर दांडी मार वगैरे हे फक्त आईला किंवा आज्जीलाच सांगितलं गेलं, बाबांना नाही) पण त्या स्त्रिया आहेत म्हणून तो झाला ह्यापेक्षा हक्काच्या भावनेतून तो झाला असावा असं मला वाटतं.

नंतर खटकलेली अगदी जवळची तीन उदाहरणं आठवली. एकामध्ये सासरच्या अतिधार्मिक वातावरणामुळे मुळात तसा स्वभाव नसतानाही आयुष्यभर करावी लागणारी तडजोड होती. दुसर्‍यामध्ये दोन्ही मुली झाल्या म्हणून आयुष्यभर सासूने टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे प्रकार होते. तर तिसर्‍यामध्ये सुनेने साडीच नेसली पाहिजे, असच वागलं पाहिजे, तसच केलं पाहिजे वगैरे गोष्टी होत्या. ह्या तीनही उदाहरणांचा विचार करताना वाटलं की मला ह्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतय. पण त्यांना तसं वाटतय का ? त्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव आहे का? पाहिल्या दोन्ही उदाहरणांमधल्या स्त्रिया ह्या अत्ताच्या काळातल्या, भरपूर शिकलेल्या, उत्तम नोकरी करणार्‍या अश्या आहेत. पण जर सासरी असणार्‍या इतर काही चांगल्या गोष्टींमुळे अन्यायाची जाणीव असूनही त्यांना हा अन्याय दुय्यम वाटत असेल आणि त्यांची तडजोडीची तयारी असेल तर 'मुक्ती' मुळात हवी का?
हा सगळा विचार करायला लागल्यावर स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय ह्याबद्दलच डोक्यात गोंधळ झाला !
स्त्रियांची मुक्ती नक्की कोणापासून करायची ? पुरुषांपासून, इतर स्त्रियांपासून, संपूर्ण समाजापासून की अजून कश्यापासून ? म्हंटलं तर ह्या सगळ्यांपासूनच, म्हंटलं तर कश्यापासूनच नाही.

स्त्रीमुक्ती झाली असं नक्की कधी म्हणायचं ?
- अन्याय होत असेल तर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव होण्याइतपत जागरुकता समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये आलेली असेल. जेणेकरून होण्यार्‍या अन्यायाचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल आणि कुठलीच जाचक गोष्ट परंपरा म्हणून सुरु होणार नाही.
- नैसर्गिक वेगळेपण वगळता बाकी कोणतीही लेबलं न लावता स्त्रीला सर्वसाधारण माणूस म्हणून वागवलं जाईल. स्त्री आहे म्हणून अन्याय होणार नाही किंवा स्त्री आहे म्हणून वेगळे मानसन्मान मिळणार नाहीत.
तसच ज्या कारणासाठी स्त्री आणि पुरूष ही नैसर्गिक रचना आहे ते कारण वगळता इतर गोष्टीत एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यांने फरक पडणार नाही.
- स्त्रियांच्या स्त्रीत्त्वाचा वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून वापर केला जाणार नाही (शारीरीक/मानसिक त्रास देणे, स्त्री आहे म्हणून संधी नाकारणे, पगार कमी देणे इत्यादी) किंवा स्त्री स्वत:ही तसा वापर करणार नाही ('कॉर्पोरेट' पिक्चरमध्ये बिपाशा बासू जे करते त्यासारखं काही, घरातल्या जबाबदार्‍यांची खोटी कारणे सांगून काम टाळणे, emotional blackmailing सारखे प्रकार इत्यादी ).
- मुलगी झाली म्हणून घरात दु:ख होणार नाही किंवा उलट टोक म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस केले जाणार नाहीत.
- समाजातले पुरुष आणि स्त्रियांमधले प्रमाण निसर्गाद्वारे ठरवले जाईल, त्यात माणसाची ढवळाढवळ असणार नाही.
- संयुक्ता सारखे वेगळे गट स्थापन करायची, स्त्री मुक्ती वर लिखाण करायची, त्यासाठी आंदोलने करायची गरज पडणार नाही.

हे साध्य होणं ही एका दिवसातली गोष्ट नक्कीच नाही. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल ते वेगवेगळ्या संस्था करतच आहेत. पण मुळात mentality बदलण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी जे शक्य होईल प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. समाजप्रबोधन आणि घरातले संस्कार ह्या सगळ्यातल्या मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि थोडेफार सकारात्मक बदल हे येणार्‍या पिढ्यांमध्ये दिसतच आहेत. मुलांच्या समोर "पोरीचं/बायकांचं असच असतं.. त्यांना काही झेपत नाही.. त्यांच्याशी कसही वागलं तरी काय फरक पडतो" वगैरे वाक्य किंवा मुलींना "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही.." वगैरे फंडे देणं लहानपणापासूनच टाळलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाचाच व्यक्ती म्हणून आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे.

वीस वर्षापूर्वी घरातल्या भांडीवाल्या बाईचे जे प्रश्न होते तेच आजही आहेत ! आणि हे बदलणं शिक्षण समाजातल्या तळागाळात पोचलं तरच शक्य होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर आपण जे शिकतो, आचरतो ते अगदी प्रत्येकाने, प्रसंगी इतरांचा विरोध पत्करून, थोडाफार धोकाही पत्करून सार्वजनिक जिवनातही आचरणात आणले तर परिस्थितीत नक्कीच लवकर फरक पडेल.

"ओपन" अगासी...

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता. मग मायबोलीकर लालूने पुस्तक घेतल्याचं ती म्हणाली आणि अगासीच्याच गावाला म्हणजे लास-वेगसला आमची भेट होणार होती तेव्हा मी ते तिच्या कडून घ्यायचं ठरलं. लास-वेगस ला आम्ही भेटेपर्यंत तिचं ते वाचून झालं नाही आणि मीही नंतर त्याबद्दल विसरून गेलो. पण नंतर जेव्हा आमची डिसीत परत भेट झाली तेव्हा तिने ते आठवणीने मला दिलं. पुस्तक वाचल्यानंतर मात्र जर मी ते वाचलं नसतं तर मी एका चांगल्या पुस्तकाला आणि एका चांगल्या खेळाडूच्या खेळाबद्दल, एकंदरीत करीयर बद्दल मांडलेल्या दृष्टीकोनाला आणि अनेक उत्कंठावर्धक सामन्यांच्या (ज्यातले बरेच मी पाहिले देखील आहेत) वर्णनाला मुकलो असतो असं निश्चीतपणे वाटलं !!

आत्तापर्यंत मी वाचलेल्या खेळाडूंच्या चरित्र-आत्मचरित्रांमधलं हे सगळ्यात "anti-sports" म्हणता येईल असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती अगासीच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या विजयापासून, जो त्याने खेळलेला शेवटून दुसरा सामना होता. अमेरीकन ओपन स्पर्धेतला बघदातीस विरुध्दचा हा सामना जिंकत असूनही त्याने अनेकदा मनात विचार केला होता की हे सगळं एकदाचं संपू दे !! पुस्तक ह्या प्रकरणापासूनच इतकं पकड घेतं की आपण त्यातला घटना त्या जागी उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटायला लागतं.
अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या माईक अगासी नामक इराण्याच्या पोटी जन्मलेलं आंद्रे हे चौथं आणि सगळ्यात धाकटं अपत्य. माईक स्वतः ऑलिंपियन आहेत आणि आपल्या मुलांपैकी एकाला तरी टेनीसपटू करायचचं असं त्यांचं स्वप्न होतं. मोठ्या तिनही मुलांना त्यांनी टेनीसचे धडे द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्यामते मोठ्या तीनही मुलांमधे मुळातच 'किलर इंस्टींक्ट' चा अभाव होता. मात्र आंद्रेची गोष्ट वेगळी होती. हा मुलगा नक्की यशस्वी खेळाडू बनू शकेल ह्याची त्यांना खात्री वाटली आणि त्यांनी आपल्या बॅकयार्डात टेनीस कोर्ट आणि बॉल्सचा मारा करणारं ड्रॅगनच्या आकाराचं मशिन बनवलं. सात वर्षाचा आंद्रे रोज २००० ते २५०० बॉल्स मारून सराव करत असे. बॉल्सचा मारा करणारं ते मशिन हे आपलं सर्वात नावडतं खेळणं होतं आणि आजही ते आपल्या स्वप्नात येतं असं आंद्रे म्हणतो. एकूणच त्याला ते बालपण अजिबातच आवडलं नाही असं दिसतं. इतक्या लहान वयात बराच वेळ चालणारा सराव, सतात अंगावर खेकसणारे वडील, लास वेगसचं गरम हवामान आणि ते बॅकयार्ड हे त्याला कित्येकदा नकोसं व्हायचं आणि काही वेळापुरता का होईना ती प्रॅक्टीस थांबवण्यासाठी तो मुद्दाम बॉल बाहेर मारायचा. ह्याबद्दल अगासी म्हणतो, "The game I mastered was a prison, I spent some 30 years trying to escape and the first cell was the backyard court." इतर टेनीसपटूंच्या तुलनेत ऊचीने कमी असलेल्या आंद्रेला सर्व्हीसवर थोड्याफार मर्यादा येत असतं त्यामुळे वडिलांनी ह्याच कोर्टवर त्याच्या कडून रिटर्नचे धडे गिरवून घेतले. पुढे प्रतिस्पर्ध्याने केलेल्या घणाघाती सर्व्हिसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आंद्रे प्रसिध्द झाला आणि ते त्याचं महत्त्वाचं शक्तिस्थान झालं !
लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये आंद्रेने चांगली चुणूक दाखवली आणि पुढे त्या विभागातली जवळजवळ सर्व विजेतेपदं देखील मिळवली. एव्हडं झाल्यावर आता आणखी प्रगती व्हावी म्हणून वडिलांनी आंद्रेची रवानगी फ्लोरीडा मधल्या Bollettieri Academy मधे केली. ह्यालाही आंद्रे "glorified prison camp" म्हणतो. ह्या कँपमधले अनुभव लिहिताना तो म्हणतो, "The constant pressure, the cutthroat competition, the total lack of adult supervision — it slowly turns us into animals,”

ह्या कँपमधेही आंद्रेचा खेळ इतर खेळाडूंपेक्षा सरस ठरला आणि संचालक निक, जो पुढे बरेच वर्ष त्याचा कोच होता, आंद्रेकडून कोणतीही फी न घेता तिथे रहायची परवानगी द्यायला तयार झाला. आंद्रेच्या हे खूपच मनाविरुध्द होतं कारण त्याला त्याचं घर, त्याचा मोठा भाऊ फिली, त्याचा जिवलग मित्र पेरी आणि मैत्रीण वेंडी ह्यांच्या शिवाय इथे रहाणं अजिबातच आवडत नव्हतं. टेनीस खेळणं मनापासून आवडत नसल्याने, तसेच मनाविरुध्द तिथे रहावं लागल्याने त्याने शाळेचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. निदान ह्यामुळेतरी आपल्याला इथून हाकलून देतील अशी त्याला आशा होती. पण झालं उलटच ! कोच निकने त्याचा सगळ्या मुलांसमोर अपमान केला आणि त्याला साफसफाई करणे, हॉस्टेल बाहेर न जाणे इत्यादी शिक्षा सुनावल्या. आंद्रेने नंतर निकशी कोणत्याही प्रकारे संवाद साधणं बंद केलं आणि एकदा निकच्या ऑफिसमधे त्याच्या सगळ्या संतापाचा स्फोट झाला. निकलाही आपल्या हातून हे रत्न घालवायचं नव्हतं कारण अगासी जितका जास्त जिंकेल तितकी त्याला आणि त्याच्या अ‍ॅकॅडमीला प्रसिध्दी आणि पैसा मिळणार होता. निकने आंद्रेच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि ही त्याची व्यवसायिक टेनीसपटू होण्याच्या दृष्टीने पहिली पायरी होती. बंडखोरीची सुरुवात इथूनच झाली होती आणि हीच बंडखोर वृत्ती पुढे विंबल्डन मधे पांढरे कपडे घालायला लागतात म्हणून त्यावर बहिष्कार टाकणे, वडिल/शिक्षक नको सांगत असतानाही कानात डूल घालणे/ केस वाढवणे, टेनीसचा पोशाख म्हणून सहसा कोणी वापरत नसलेली डेनिम शॉर्ट्स वापरणे अश्या गोष्टींमधून आणि सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्याचं शक्तिस्थान ओळ्खून त्यावरच हल्ला चढवण्याच्या मनोवृत्तीतून दिसली.

आंद्रे ह्या ना त्या कारणाने नेहमीच प्रसिध्दीच्या झोतात राहिला. सुरुवातीच्या काळात त्याचा पोशाख, त्याचे केस, त्याचं काही स्पर्धांमधे भाग ने घेणं/ काही स्पर्धांमध्ये दरवर्षी भाग घेणं, पीट सँप्रस/जीम कुरीयर/मायकेल चँग ह्या त्याच्या समकालीन खेळाडूंनी त्याच्या आधी मिळवले ग्रँडस्लॅम विजेतेपद, त्याने एका कॅमेर्‍याच्या जाहिरातीत बोललेलं "Image is everything" हे वाक्य अश्या गोष्टींवरून पत्रकारांनी त्याच्यावर टिकेची झोड उठवली. तर नंतरच्या काळात ब्रूक शिल्ड आणि स्टेफी ग्राफ ह्यांच्याबरोबरचे प्रेम-संबंध, लग्न, ब्रूक बरोबर झालेला घटस्फोट ह्या वरून माध्यामांनी टिका केली. तर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात निवृत्ती कधी स्विकारणार हे विचारून किंवा निवृत्त होण्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे सांगून भंडावून सोडलं.

अगासी हा कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅमची विजेतेपदं आणि ऑलिंपीक सुवर्णपदक अशी दुर्मिळ कामगिरी करणारा टेनीसपटू आहे. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला साथ देणारी आणि मदत करणारी काही लोकं होती त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचा फिटनेस ट्रेनर गील. तो ट्रेनर बरोबरच त्याचा मित्र, बॉडीगार्ड, सल्लागार सर्वकाही होता. "Gil was standing there for me, as always" असं अगासी पुस्तकात बर्‍याचदा म्हणतो. सुरुवातीच्या काळात शारीरि़क क्षमता काहीशी कमी पडत असताना गील भेटल्याचा त्याला खूपच फायदा झाला. कारकिर्दीच्या ऐन भरात असताना आणि तीन वेळेला ग्रँडस्लॅम विजेता झालेला असताना तो अचानक फॉर्म हरवून बसला आणि त्याची अधोगती होत तो क्रमवारीतही बराच घसरला त्यात त्याचा कोच निक त्याला सोडून गेला. पुढे तो ड्रग्जसेवनाच्या सवयीलाही बळी पडला. परंतु ह्यातून सावरून आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने आणि त्याचे मित्र, गील आणि नविन कोच ह्यांच्या मदतीने पुन्हा अग्रस्थानी पोचला. ह्या प्रवासादरम्यान त्याने जिंकलेल्या, खेचून आणलेल्या अनेक सामन्यांची अतिशय सुरस वर्णनं पुस्तकात येतात !

पुस्तक वाचायला सुरुवात करायच्या आधी मला काही काही गोष्टींबद्दल अगासीने काय लिहिलय हे वाचायची खूप उत्सुकता होती. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पीट सँप्रस आणि त्याची स्पर्धा. पुस्तकात पीटचा पहिला उल्लेख येतो तो "My next game was lined up with a kid named Pete something.. Sampras I think.." असा. :) ग्रँडस्लॅमचा बर्‍याच अंतिम सामन्यांमधे पीट ने अगासीला हरवलं आणि तरीही त्यांच्यामधली स्पर्धा ही नेहमीच निखळ स्पर्धा राहिली आणि त्याचा प्रत्यय पुस्तकातून पण मिळतो. अगासीच्या मते पीटसाठी टेनीस हे सर्वस्व होतं आणि तो प्रामाणिकपणे पण जिद्दीने खेळत असे आणि त्यासाठी पीट बद्दल अगासीला आदर वाटतो. ह्या उलट कुरीयर, बेकर, कॉनर्स ह्या खेळाडूंबरोबर त्याचे संबंध कधीच चांगले नव्हते. एकाच अ‍ॅकॅडमीत असून अगासीमधल्या उपजत गुणांमूळे आपल्याला दुय्यम वागणूक मिळते ह्या कारणाने कुरियर चिडलेला असायचा तर बेकरचे आणि त्याचे बर्‍याचदा खटके उडायचे. विंबल्डनच्या एका उपांत्य फेरी मधे बेकर जिंकूनही बेकरने पत्रकार परिषदेत अगासीला संयोजकांकडून आपल्यापेक्षा वरची वागणूक मिळाल्याची तक्रार केली. मिडीयानेही ती उचलून धरली. ह्या वर चिडून अगासी आणि त्याच्या कोचने "summer of revenge" जाहिर केला आणि बेकरला त्या उन्हाळ्यातल्या सगळ्या स्पर्धांमधे तसच युएस ओपन मधेही हरवलं. अगासीचा कारकिर्दीतला शेवटचा सामना बेंजामीन बेकर नावाच्या नवोदीत खेळाडूबरोबर झाला. बोरीस बेकरच्या आणि त्याच्यातल्या तेढीचा संदर्भ देऊन तो म्हणतो, "How is it possible that my final opponent is a guy named B.Becker?" :)

दुसरी एक गोष्ट जी मी पीटच्या पुस्तकात वाचली होती, त्याबद्दल अगासीचं मत. १९९० च्या युएस ओपन मधे अगासी वि पीट अशी फायनल होऊन त्यात पीट जिंकला होता. उपांत्य फेरीत पोचलेल्या तीन अमेरीकन खेळाडूंपैकी एकाला प्रेसिडेंट बुश फोन करणार होते. पीट जिंकलेला असूनही त्यांनी अगासीला फोन केला होता. नेहमीप्रमाणे कुठल्याही वादात न पडता पीटने "माझा फोन त्यावेळी बंद होता" असं पत्रकारांना सांगितलं होतं. ह्या घटनेबद्दल अगासीचं मत मला जाणून घ्यायचं होतं पण त्याबद्दल पुस्तकात काहीच उल्लेख दिसत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे १९९६ च्या अटलांटा ऑलिंपीक मधे अगासीला सुवर्ण पदक मिळालं होतं आणि त्यात त्याचा उपांत्य फेरीचा सामना लिएंडर पेस बरोबर झाला होता. मला त्याचं लिएंडर बद्दलच मत वाचायचं होतं. अगासी ह्या सामन्या बद्दल लिहीतो, "He's a flying jumping bean, a bundle of hyperkinetic energy, with the tour's quickest hands. Still, he's never learned to hit a tennis ball. He hits off speed, hacks, chips, lobs - he's the Brad of Bombay. Then, behind all his junk, he flies to the net and covers so well that it all seems to work. After an hour you feel as if he hasn't one ball cleanly and yet he's beating you soundly. Because I am prepared, I stay patient, stay calm, and beat Paes 7-6, 6-3."

जोडीदार आपल्या क्षेत्रातला असावा की नसावा ह्याबद्दल बर्‍याच ठिकाणी चर्चा चालू असतात. अगासीच्या गोष्टीतही हा मुद्दा दिसतो. ब्रूक शिल्डची आणि त्याची क्षेत्रं पूर्णपणे वेगळी. सुरुवातीचे "छान-छान" दिवस गेल्यानंतर दोघांनाही एकमेकांचे प्रश्न, मित्रमैत्रीणी, कामातल्या अडचणी, आनंदाच्या/यशाच्या कल्पना हे सगळच समजून घेणं अवघड जाऊ लागलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. ह्या उलट स्टेफीची आणि त्याची प्रेम काहाणी सुरु झाली तीच विंबल्डन दरम्यान. ती स्पर्धा स्टेफीची शेवटची विंबल्डन स्पर्धा ठरली पण त्यांनी त्या स्पर्धेत एकत्र सराव केला होता. स्टेफीला व्यावसायीक टेनीसपटूच्या आयुष्यातल्या समस्या, ताण-तणाव, आनंदाचे क्षण व्यवस्थित माहित असल्याने तीने नेहमीच आंद्रेला योग्य ती साथ दिली. अर्थात टेनीस मधे दोघांनीही सुमारे १५ ते २० वर्ष काढलेली असल्याने आपल्या मुलांसाठी बॅकयार्डात टेनीस कोर्ट न बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. :)

ह्याच संदर्भात एक गमतीदार प्रसंग अगासीने पुस्तकात सांगितला आहे. आंद्रे आणि स्टेफीच्या लग्नाच्या काही दिवस आधी स्टेफीचे वडिल, पीटर, आंद्रेच्या वडिलांना भेटायला लास-वेगसला गेले होते. त्यांना तेव्हा आंद्रेच्या सरावासाठी बनवलं गेलेलं सुप्रसिध्द ड्रॅगन मशिन पण बघायचं होतं. पीटर म्हणजे माईक अगासी ह्यांचं जर्मन रूप आहे. स्टेफीला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ड्रॅगन मशिनचा उपयोग समजून घेण्यासाठी त्यांनी आंद्रेला बॉल मारायला सांगितले आणि आंद्रेच्या वडिलांकडे दुर्लक्ष करून ते आंद्रेला त्याने कोणता शॉट मारायला हवा होता हे सांगायला सुरुवात केली. ७ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या आपल्या मुलाला दुसर्‍या कोणी येऊन धडे द्यावे हे माईकला अजिबातच आवडलं नाही आणि त्यातून सुरु झालं ते जोरदार भांडण ! ह्या बद्दल अगासी लिहितो,
"The two men can't understand each other and yet they're managing a heated argument. My father comes around the net shouting. The slice is bullshit ! If Stefanie had this shot, she would been better off. He then demonstrated two-handed backhand he taught me. With this shot, my father says, Stefanie would have won thirty-two slams ! Occasionally I hear Peter mentioning my rivals, Pete and Rafter, and then my father responds with Stefanie's nemeses, Monica Seles and Lindsey Davenport." नवरा-बायको होऊ घातलेल्या दोन स्टार खेळाडूंचे वडिल आणि एकेकाळचे गुरु असे कोर्टवर भांडत असताना आंद्रेची काय अवस्था झाली असेल ह्या विचाराने हसू येतं. :)

मध्यंतरी सेरेनाचं विल्यम्सचं पुस्तक वाचलं होतं, त्याआधी पीटचं वाचलं होतं. सेरेना(आणि व्हिनस सुध्दा), पीट आणि आता आंद्रे, स्टेफी ह्या सगळ्या बड्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं दिसून येतं. ह्या सगळ्यांमधे गुणवत्ता अर्थातच आहे. पण त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी ती गुणवत्ता ओळ्खून आणि दुरदृष्टीने त्यांची केलेई घडण हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण असू शकेल का ?

आंद्रेने पुस्तकात सांगितलेली स्वतःच्या आयुष्याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे, त्याचबरोबर अतिशय प्रामाणिक आहे. ड्र्ग्ज प्रकरणापासून सगळ्या गोष्टी काहीही हातच राखून न ठेवता आपल्या चाहत्यांना सांगून टाकल्या आहेत हे जाणवतं पण काही गोष्टी इतक्या नाट्यमय रितीने खरोखरच घडल्या असतीला का की त्या नाट्यमय रितीने आपल्या समोर मांडण्याचं श्रेय पुस्तकाचा Ghost writer J.R. Moehringer ह्याला द्यावं असा प्रश्नही पडतो.
पण एकंदरीत पुस्तक संपल्यावर "Hats off to this great player !!!! " अशी वाचकाची अवस्था होते हे मात्र नक्की. :)

वेगे वेगे धावू

इथे अमेरीकेत कुठल्याही प्रकारच्या हवामानात एखादातरी उत्साही कानात हेडफोन लावून पळताना दिसतोच. जर हवा चांगली असेल तर पळण्याजोग्या जागी अगदी झुंबड उडालेली दिसते. तरूण लोकं, बाया-बापे, त्यांची पोरं-टोरं आणि अगदी त्यांची कुत्री-मांजरी सुध्दा पळत असतात ! भारतात पळण्याचं प्रमाण त्यामानाने इतकं दिसत नाही. "रोज सकाळी उठून जॉगिंगला जायचं" हा माझ्याप्रमाणेच कित्येक जणांच्या बाबतीत अनेक नववर्ष संकल्पांपैकी एक असतो ! लहानपणापासून 'धावणे' ह्या प्रकाराचं मला अजिबातच आकर्षण नव्हतं. शाळेमधल्या १०० मिटर वगैरे सारख्या शर्यतींमधे कधी विशेष उत्साहं नव्हता कारण तितकं वेगाने धावता यायचं नाही. लांबपल्ल्याच्या शर्यतींमधे भाग घेता यायचा नाही कारण तेवढा स्टॅमिना नव्हता. नंतर "तू बारीक आहेस त्यामुळे ट्रेडमिल करायची गरज नाही" असं जिममधे सांगितल्यामुळे कॉलेजमधे असताना तसेच ऑफिसमधल्या जिम मधे ट्रेड मिलच्या वाटेलाही गेलो नाही (आणि तेव्हा मी खरच बारीक होतो. ;) ). नंतर मग ट्रेडमिल करायची खरज गरज पडायला लागली आणि नियमीतपणे खेळणे, पोहणे ह्यामुळे स्टॅमिना वाढून २०-२५ मिनीटं पळणंही शक्य व्हायला लागलं.

इथे अटलांटात आल्यापासून तर घराच्या मागेच असलेल्या सुंदर ट्रेल मुळे आठवड्यातून २-३ वेळा तरी (मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात वगैरे वगैरे) पळणं व्हायला लागलं. स्टॅमिना वाढत होताच आणि पळणं तितकं बोर नाहिये असं वाटून त्यात रसही वाटायला लागला. त्यात आवडती गाणी आयपॉडवर असली तर पळण तितकं कष्टदायी पण वाटेनासं झालं.

हे सगळं आज आठवायचं आणि लिहायचं कारण म्हणजे नुकताच गेलेला "मॅराथॉन" विकएंड ! मागच्या वर्षी इथे ट्रेल वर धावायला सुरुवात केल्यावर आधी जरा बारीक होणे, मग रोजचं धावण्याचं अंतर वाढवणे, मग न चालता सलग पळणे असे काही-बाही गोल ठेवून स्वतःला धावतं ठेवलं होतं. त्यातच ऑफिसमधल्या कॉफी-रूम मधे ५ आणि १० किलोमिटर रनची एक जाहिरात चिकटवलेली दिसली. लगेच उत्साही मित्रमंडळींना तसेच ऑफिसमधल्यांना विचारून आम्ही टिम वगैरे फॉर्म केली. ऑफिसमधल्या एका कलीगने खूपच प्रोत्साहन दिलं. तो स्वत: अगदी पट्टीचा पळणारा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ५ किलोमिटर फारच किरकोळ होतं. ठरल्या-ठरल्या लगेच पैसे भरून टाकले जेणेकरून निदान भरलेल्या पैशांमुळे तरी कोणी रद्द करणार नाही. :) मग जोरदार प्रॅक्टीस सुरु केली. त्याचा उत्साहं पण बर्‍यापैकी टिकला. आणि पहिली ५ किलोमिटर रन ३० मिनीटांच्या आत पूर्ण करून स्वतःची पाठही थोपटून घेतली !

एक रेस पूर्ण केल्यानंतर उत्साहं तर वाढला होता पण वाढती थंडी, मधली भारत वारी, ऑफिसतले काम, लहान झालेला दिवस अश्या अनेक गोष्टींमुळे पळणं परत कमी झालं. मधे समिरचा लेख वाचून परत एकदा उत्साहाने पळणं सुरु केलं. तेव्हाच नेटसर्फिंग करत असताना जॉर्जिया मॅराथॉन २०१० ची वेबसाईट सापडली. समिरचा लेखाच्या प्रभावामुळे लगेहात हाफ मॅराथॉन साठी नाव नोंदवूनच टाकावं असं फार वाटत होतं पण दुसर्‍या दिवशी पळायला गेल्यावर ५ किलोमिटर साठी २९ च्या जागी ४० मिनीटे लागतायत ह्यावरून स्टॅमिनाची किती वाट लागली आहे हे लक्षात आलं ! त्यामुळे मग आपल्या लायकीला योग्य अश्या 5K रन साठीच नावं दिली. हाफ आणि फुल मॅराथॉन दुसर्‍या दिवशी असल्याने आपण भाग घेत नाही आहोत तर निदान वॉलेंटियर म्हणून जाऊ हा शिल्पाचा सल्ला मानून त्यासाठीही नावं नोंदवली. परत एकदा उत्साहाने तयारी सुरु केली. शिल्पा कुठल्याही स्पोर्ट्स इव्हेंट मधे पहिल्यांदाच भाग घेत असल्याने ती पण खूप उत्साहात होती. इथल्या नको झालेल्या हिवाळ्याचा कृपेने जमेल तसा सराव केला.

रेसच्या ठिकाणी सकाळी आपल्या इथे नरकचतुर्दशीला असतं तसं वातावरण होतं. सगळे अगदी उत्साहात sports accesories नी नटून-थटून तिथे आले होते. चांगली थंडी होती. ग्रँटपार्क वसंत ऋतुच्या फुलोर्‍याने मस्त फुललेलं होतं आणि स्पर्धकांनी गजबजलेलं होतं. ह्या स्पर्धेत साधारण ३००० स्पर्धक होते. आणि मुख्यत: जे दुसर्‍या दिवशी मॅराथॉन किंवा हाफ मॅराथॉन पळणार होते ते वॉर्म-अप रेस म्हणून आलेले होते. हा कोर्स चांगलाच चढ-उताराचा होता. धावताना एक वेळी "कशाला पैसे भरून स्वतःच्या जिवाला त्रास ! द्यावं सोडून" असा विचार जोरदार आला होता पण वेबसाईट वर म्हंटल्याप्रमाणे असा दिवस रोज येत नाही जेव्हा तुम्ही पळताय आणि आजुबाजूला अनेक लोकं टाळ्या वाजवतायत, तुमचं कौतुक करतायत, तुमचे फोटो काढतायत आणि रेस पूर्ण केल्यावर तुमचं अभिनंदन करयातय !! त्यामुळे उगाच येणारे निगेटिव्ह विचार बाजूला सारत ५ किलोमिटर अंतर मी ३२ मिनीटांत आणि शिल्पाने ५० मिनीटांत पूर्ण केलं. रेस झाल्यावर खूपच भारी वाटलं !!!!!!

आम्ही ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या मुख्य मॅराथॉनच्या दिवशी सकाळी ६:३० ला अटलांटा डाऊनटाऊन मधे हजर झालो. डाउनटाऊन अक्षरश: भरून वहात होतं. पहाटे पहाटे ऑलिंपीक पार्क मधे अगदी प्रसन्न वाटत होतं. खूपच मोठ्या प्रमाणावरची स्पर्धा असल्याने सगळी अगदी चोख व्यवस्था होती. ह्या स्पर्धेत सुमारे १८००० स्पर्धक आणि ३००० स्वयंसेवक होते. आमची नेमणूक "फुड अँड बिवरेजेस अ‍ॅट फिनीश लाईन" ह्या टिम मधे होती. ह्यात रेस संपवून आलेल्या स्पर्धकांना हिट-शीट्स, पाणी, केळी, सफरचंद, ग्रॅनोलाबार, स्नॅक्स, दही ई गोष्टी वाटायच्या होत्या. कॅरोल नामक एक आज्जी आमची टिमलीडर होती आणि ह्या विभागात आम्ही साधारण ५० जणं होतो.

हाफ तसेच फुल मॅराथॉन एकाच वेळी सुरु झाल्याने साधारण तासभरातच स्पर्धक यायला लागले. सगळे जण त्यांच जोरदार स्वागत करत होते आणि त्यांना मेडल्स तसेच खाणं-पिणं देत होते. संयोजकांचा तसेच स्वयंसेवकांचा हा उत्साहं अगदी ६-७ तासांनंतरही तितकाच टिकून होता ! अगदी १५ वर्षांच्या मुलांपासून आज्जी-आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांमधले स्पर्धक होते. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर आनंदाबरोबरच लक्ष्य पूर्ण केल्याचं विलक्षण समाधान दिसत होतं. कितीतरी स्पर्धक आम्हालाच धन्यवाद देत होते की तुम्ही सगळे काम करयात म्हणून ही स्पर्धा पार पडत्ये ! इथे एकमेकांच्या अगदी लहान कामाबद्दल, यशाबद्दल कौतूक तसेच आदर व्यक्त करण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे त्याचच हे एक उदाहरण. कॅरोल अधे-मधे सगळी कडे हवं-नको बघून जात होती. अगदी प्रत्येक स्वयंसेवकाला तुम्ही कॉफी घेतली का? खाल्लं का वगैरे विचारून जात होती. तिथे अनेक स्वयंसेवक याआधी बर्‍याच ठिकाणी हे काम केलेल होते त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायलाही मजा आली. काही जणांची मुलं, नवरा/बायको, मित्र/मैत्रिणी स्पर्धक होते आणि त्यामुळे ते काम करायला आले होते तर काही जण "I have to return something to the sports !" ह्या भावनेतून काम करत होते. आम्ही साधारण ७ तास काम करून १ वाजता तिथून निघालो. त्यावेळी रेस अंतिम टप्प्यात होती आणि आवरा-आवरी पण सुरु झाली होती. नंतर थोडावेळ फिनीश लाईन पाशी उगीच थोडावेळ रेंगाळत राहिलो. स्पर्धकांपैकी कोणीच ओळखीचं नसूनही त्यांना रेस पूर्ण करताना बघून खूप छान वाटत होतं.

एकंदरीत एक खूप वेगळा आणि सुंदर अनुभव होता. आम्ही स्पर्धक म्हणून त्यात नसलो तरी कुठल्यातरी प्रकारे ह्या "घरच्या कार्यात" सहभागी होतो ह्याचं खूप समाधान वाटलं ! होपफुली आम्हीही कधीतरी हाफ/फुल मॅराथॉन मधे सहभागी होऊ, संयोजक आमच्या गळ्यात मेडल घालतील, लोकं आम्हाला चिअर करतील आणि मग आम्हीही स्वयंसेवकांना धन्यवाद देत "बिकॉजाफ यॉल.. वी आ रनिंग..." असं म्हणू शकू.. :)

"ऑन द लाईन" - सेरेना विल्यम्स

"ऑन द लाईन" हे सेरेना विल्यम्सचे आत्मचरित्र नुकतेच वाचले. सगळ्यात पहिले वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आत्मचरित्र लिहिता येईल एव्हडं जबरदस्त अनुभवविश्व असल्याबद्दल सेरेनाचा खूप हेवा वाटला. सध्याच्या सगळ्याच तरूण खेळाडूंनी वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी पासून खेळायला सुरुवात केलेली असल्याने तिशीच्या आसपासच त्यांचं साधारण वीस वर्षांचं करियर झालेलं असतं !
एक अफ्रिकन - अमेरिकन खेळाडू, घरातील सगळ्यात लहान अपत्य आणि त्यात एका प्रसारमाध्यमांचं विशेष लक्ष असलेल्या खेळाडूची धाकटी बहिण म्हणून आलेले अनुभव सेरेनाने अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहेत. व्हिनसच्या प्रगतीबद्दल, वडिलांनी तसेच प्रसारमाध्यमांनी बालपणात व्हिनसला दिलेल्या अधिक प्रसिध्दीबद्दल वाटलेला हेवा तसेच जरी सख्खी बहीण असली तरी कोर्टवर समोरा-समोर आल्यावर व्हिनस फक्त एक प्रतिस्पर्धी आहे ही असलेली जाणिव सेरेनाने अतिशय स्पष्ट पण संयतपणे मांडली आहे. सेरेनाच्या वडिलांनी दोन जागतीक दर्जाचे टेनिसपटू घडवण्यासाठी घेतलेली मेहेनत तसेच लहान्-सहान गोष्टींबद्दलची त्यांची दुरदृष्टी पाहून खरच थक्क व्हायला होतं. सेरेनेना जिंकलेल्या बर्‍याचशा स्पर्धा अगदी आत्ताच्या काळातल्या असल्याने त्यातल्या सामन्यांचे वर्णन वाचायला मस्त वाटलं. बर्‍याचदा सामने डोळ्यासमोर आले. हातातून निसटून चाललेला सामना खेचून आणणे ही सेरेनाची खासियत. अश्या सामन्यांमधे तिने केलेले विचारही वाचायलाही खूप मस्त वाटले. ह्या पुस्तकात २००९ च्या युएस ओपन मधली घटना अर्थातच नाहिये कारण पुस्तकाचे काम त्या सुमाराच पूर्ण झालेले होते. पण त्यावरही सेरेनाने प्रामाणिकपणे आणि कुठलाही आवेश न आणता टिप्पणी केली असती अशी खात्री वाटते.
पुस्तकातला फॅशन आणि ड्रेसेस बद्दलचा भाग आवडला नाही कारण त्यात विशेष रस नव्हता. तसेच काही वैयक्तीक घटना नसत्या तरी चाललं असतं असं वाटलं. पण अर्थात ते आत्मचरित्र असल्याने त्या येणारच.
पण एकूणात जेव्हा स्वत:लाच प्रोत्साहन द्यायची गरज भासेल तेव्हा वाचायला नक्कीच उपयुक्त असे पुस्तक आहे. स्मित
या पुस्तकाशिवाय खेळाडूंनी लिहिलेली "ओपन" - आंद्रे अगासी, "आऊट ऑफ द कंफर्ट झोन" - स्टीव्ह वॉ आणि मायकेल फेल्प्सची दोन पुस्तकं वाचायची आहेत.

वाढदिवस...

इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. :) ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्‍याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमधून उतरणारी माणसं बघत छान वेळ जातो... बर्‍याचदा हातातलं पुस्तक नुसतच धरलं जातं आणि एक पानही पूर्ण वाचून होतं नाही..

आज सकाळी डंकीन मधे जायला रूढार्थाने तसं काहीच कारण नव्हतं... म्हणजे मला ना अँटी-सोशलाईझिंगचा अ‍ॅटॅक आला होता, ना डोक्याला शॉट बसला होता, ना पुस्तक वाचायचं होतं पण का कोण जाणे मी देवळातून परत येताना डंकीन डोनट च्या दिशेने गाडी वळवली...नेहमी प्रमाणे कॉफी घेऊन ती खूप गरम असल्याने नुसतचं प्यायल्या सारखं करत मी ट्रॅफीक बघत बसून राहिलो.. गेल्या दोन दिवसातल्या बड्डे जश्न बद्दल विचार करत बसलो...

वाढदिवस... ! कधीकधी मला वाटतं वाढदिवस हा वर्षातला एका असा दिवस असतो की ज्या दिवशी तुमचं स्वतःचं काही कर्तुत्व नसताना उगीच तुमचं भारी कौतूक केलं जातं !!!!! हो म्हणजे आपल्याला जन्माला घालणं हे आपल्या आई-बाबांचं कर्तुत्व.. नंतर वाढवणं मोठं करणं हे पण त्यांचंच काम.. थोड्या वर्षांनी आपण आपोआपच मोठे होतं असतो.. ह्या सगळ्यात आपला स्वतःचा सहभाग् किती ? ते कौतूक आपण खरचं डिसर्व्ह करतो का? असा प्रश्न कधीकधी पडतो.. ! तसंच माझं ही बरच कौतूक आणि लाड त्यादिवशी झाले.. १२.०१ वाजता आलेल्या शिल्पाच्या फोन पासून दुसर्‍या दिवशी ११.५० वाजता तिच्या भावाच्या आलेल्या फोन पर्यंत दिवसभर फोन चालूच होते. अनेक जणांनी ऑर्कूट, फेसबूक, इमेल वर शुभेच्छा दिल्या. मायबोलीवरही पार्ले बीबी मला दिलेल्या शुभेच्छांनीच भरला होता.

इथल्या प्रथेप्रमाणे माझे मित्र रात्री १२ वाजता केक घेऊन आले. पण ह्या वेळचं वेगळेपण म्हणजे माझ्या मित्राने आणि त्याच्या रूमी ने स्वतः घरी केक बनवून आणला होता. फार भारी वाटलं मला.!!!! घरच्या व्यतिरिक्त बहूदा पहिल्यांदांच इतर कोणी केक केला होता.. ! मागच्या वर्षी मला साधं विश पण न करणारे माझे ऑफिसमधले काही कलिग्ज रात्री १२ ला घरी आलेले बघून मला भरून वगैरेच यायचं बाकी राहिलं होतं. :) खूप दंगा झाला एकूण... दुसर्‍या दिवशी देसी बुफे ला तुडूंब खाणं झालं.. नंतर छान झोप ही झाली. माझा मित्र, त्याचा रूमी, माझा रूमी, ऑफिसमधली काही जनता, त्यातले कोणाकोणाचे बाकीचे मित्र अश्या सगळ्या मंडळींचा मिळून रात्रीचा प्लॅन पण तयार झाला होता. इथे एका क्लब मधे देसी पार्टी होती. ११:३० पर्यंत गेलं तर फ्री एंट्री वगैरे ऑफर्स पण होत्या. खर म्हणजे मला पब/ क्लब मधे जायचा फारसा उत्साहं नसतो.. पण चांगला ग्रुप असेल आणि ग्रुप मधलं एकतरी कोणी ड्रिंक्स न घेणारं असेल (किंवा मग तो पब मायामी किंवा न्यू ऑर्लीन्स चा असेल ;) ) तर मग मी जातो. का माहित नाही पण एकूणातच मला तिथली सगळी एंजॉयमेंट ही बर्‍याचदा बुरखा पांघरल्यासारखी किंवा उसना आवेश आणल्या सारखी वाटते.. म्हणजे वर सगळ्यांचे चेहेरे हसरे, आनंदी दिसतात पण मागे काहितरी वेगळचं दडलय की काय असं वाटतं..

रस्ते चुकणे, पार्किंग शोधणॅ असे सगळे नेहमीचे प्रकार करत आम्ही एकदाचे त्या पब मधे जाऊन पोचलो. पार्टीच्या वेळेपेक्षा जरा जास्तच लवकर पोचल्याने तिथे त्या वेळी काहिच चालू नव्हतं. सो त्याच्याच शेजारी असलेल्या एका फिरंगी पब मधे गेलो. तिथे लाईव्ह बँड चालू होता. म्युझिक एकदम छान होतं.. आमची जनता पण एकूण खुष झाली आणि त्यांचं पेयपान ही एकीकडे चालू झालं.. मी आणि माझा मित्र स्प्राईट पित त्यांना कंपनी देत होतो.. :) पेय आणि गाण्यांबरोबर पार्टीचा रंग हळूहळू चढत होता.. तिथे हॅलोवीन बॅश असल्याने बँड पण एकदम उत्साहात होता.. २/३ ड्रिंक्स झाल्यावर सगळ्यांना परत देसी पार्टीची आठवण झाली आणि आम्ही एकूण रागरंग बघायला त्या जागी परत आलो. त्यावेळपर्यंत इकडचा माहोल एकदम बदलला होता.. आता तिथे चांगलीच गर्दी झाली होती आणि गाणी पण जोरदार सुरु होती. लोकांच्या पोटात गेलेल्या पेयाचा परीणाम होऊन सगळ्यांची पावलं गाण्यांवर थिरकायला लागली होती... माझा रूमी अगदी टिपीकल नॉर्थी असल्याने त्याचं पार्टी-शार्टी / डान्स- वान्स एकदम जोरात चालू होतं.. :) भुतापेक्षा ही डान्सफ्लोरला भिणार्‍या आणि ड्रिंक्स न घेणार्‍या मला वास्तविक तिथे करण्यासारखं काहीच नव्ह्तं. पण मित्र मंडळींबरोबर टाईमपास आणि "इकडे तिकडे चोहीकडे" बघणे ह्यात वेळ छान चालला होता.. आमच्या जनतेच्या ड्रिंक्सची लेव्हल पण बियर सोडून वर गेली होती आणि त्याची पातळी डोक्यातही वर वर जात असल्याने एकूण मजा मजा चालली होती. लोकाग्रहास्तव मीही १/२ वेळा डान्सफ्लोर वर जाऊन आलो पण एकूण माझे रंग बघता त्यांनी मला आग्रह करणं सोडून दिलं.

दरम्यान तिथे एक एबीसिडी ग्रुप आला..चाळीशीच्या वरच्या स्त्रिया आणि पुरुषांचा हा ग्रुप अगदी साड्या, कुरते वगैरे ट्रॅडिशनल अवतारात आणि ते सगळे जणं बोलण्याचालण्या वरून अगदी "क्युल" वाटत होते.. ! आमची मित्र मंडळी जिकडे नाचत होती त्याच्याच आसपास त्यांचाही नृत्याविष्कार चालू होता.. रात्रीचे अडीच वाजले आणि पार्टी संपायला अर्धाच तास उरला.. तो पर्यंत माझा रूमी बराच हाय झाला होता.. आणि त्यामुळे आपण आता निघावं असं माझा मित्र मला येऊन सांगून गेला.. पण नंतर अचानक अर्धाच तास राहिलाय सो ३ लाच जाऊन असं ठरलं.. दरम्यान तो देसी ग्रुप आणि आमचा ग्रुप सगळे एकत्र नाचायला लागले... त्यातल्या एक बाई फारच उत्साहात येऊन माझ्या रूमी बरोबर नाचायला लागल्या.. बघता बघता मर्यादेपेक्षा जास्तच जवळ येत गेले आणि अचानक त्या बाईंनी मला उचल असा आग्रह माझ्या रुमीला सुरु केला.. त्यानेही तो तात्काळ मान्य करुन प्रयत्न केले आणि ते दोघेही खाली पडले.. एकूण प्रकार जरा अवघड होणार हे (बहूतेक) त्याच्या लक्षात आल्याने तो तिथून दुर गेला.. त्या बाईंच्या नवर्‍याने त्यांना उचलून काही बाही प्रकार केले.. एकूणात त्या बाईंचं वागणं मला तरी फारच डेस्पो वाटतं होतं. नंतर लक्षात आल्यावर त्या परत माझ्या रूमी ला शोधायला लागल्या आणि तो सापडल्यावर परत त्यांचं नाचणं सुरू झालं ते शेवटपर्यंत .. मला त्यातल्या काही स्टेप्स आणि तो सगळा प्रकारच बर्‍यापैकी हिडीस वाटला.. नंतर गाणी बंद झाल्यावर सगळ्यांचं एकमेकांच्या गळ्यात पडून "इट वॉज सो नाईस.. सो क्यूल" वगैरे करून झालं.. आमच्या ग्रुप ने माझ्या रूमी ला त्याच्या डांसिंग "स्कील्स" करता डोक्यावर घेतलं... नंतर गाडीतून घरी परतताना भ, फ च्या सर्व बाराखड्या वापरून त्या बाईंना, नवर्‍याला आणि फॉर दॅट मॅटर जे काय सुचेल त्या सगळ्याला शिव्या घालून झाल्या.. !! मला सगळ्या प्रकरात नक्की काय रिअ‍ॅक्ट व्हावं हेच कळेना कारण मुळात मला काय खटकलं होतं ते कळत नव्हतं..
तो सगळा प्रकार बघून मला कल्चरल शॉक बसला होता ?? पण त्यासाठी काही मी अमेरीकेतल्या पब मधे पहिल्यांदा गेलो नव्हतो,
देसी बाईच्या जागी फिरंग बाई असती तर परिस्थिती बदलली असती ? कदाचित नाही !
मग झाल्या प्रकाराची पूर्ण शुध्दीत असलेल्या माझ्या मित्रासकट सगळ्यांनी केलेली भलावण मला आवडली नव्हती? कोणी काय एंजॉय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. माझ्या अपेक्षांचा संबंधच कुठे येतो??
माझ्या रूमी ची भाषा मला खटकली होती? ते ही नसावं कारण मी काही त्याच्या तोंडून वल्गर गोष्टी पहिल्यांदाच ऐकत नव्हतो..
की मग सगळं जग एंजॉय करत असताना न पिणारा आणि डांस फ्लोर वर न जाणारा मीच एकटा करंटा ह्याची मला खंत वाटतं होती ? पण ती ही शक्यता कमीच होती कारण ही सिचुएशन पण पहिल्यांदा आली नव्हती... अँड इट वॉज नॉट माय कप ऑफ टी.. वास्तवीक माझा रूमी, त्या बाई, आमच्या ग्रुप मधली बाकीची मंडळी, त्या डांस फ्लोर वरची ईतर मंडळी ह्या कोणालाच त्या प्रकाराबद्दल काही वाटत नसताना माझ्या सारख्या बाहेर बसून मजा बघणार्‍याने त्याबद्दल काही विचार करायचा संबंधच नव्हता.

पण तरीही परतीचा वाटेवर ना मी काही ऐकू शकलो ना काहॉ बोलू शकलो...

डंकीन मधे बसून विचार केल्यावर सहज जाणवलं.. आपण एखादं चांगलं मासिक वाचतो, चांगल सिनेमा पहातो. एखाद्या चांगल्या बुफे ला जातो.. पण कधी कधी त्यातला एखादा लेख, एखादं प्रसंग/ गाणं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही म्हणून संपूर्ण गोष्टीचा आनंद का घालवा... खटकलेला अर्धा तास सोडून वाढदिवसाच्या दिवशीचे खूप आनंदात गेलेले बाकी साडे- तेवीस तास परत एकदा आठवत मी डंकीन मधून बाहेर पडलो.. :)

SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे

परिचितांमधले अपरिचित : SOPEC चे संस्थापक आणि संचालक तसेच ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. पेठे

डॉ. श्री. लक्ष्मण दत्तात्रय पेठे हे नात्याने माझे काका, माझ्या वडिलांचे आतेभाऊ. ते मुळचे मुंबईचे पण शेतीमध्ये संशोधन करता यावं म्हणून औरंगाबादला स्थाईक झाले होते. माझ्या आज्जीला शिक्षणाचं विशेष कौतुक असल्याने तिचा तो अगदी लाडका भाचा. त्यामुळे त्यांच्याबद्दल तिच्याकडूनही खूप ऐकत आलो आहे. त्यांनी आधी रसायनशास्त्रात पीएच.डी केली, नंतर त्यात संशोधन केलं, पुढे औरंगाबादला अध्यापन तसेच शेतीविषयक संशोधन केलं, त्यानंतर ते संशोधनासाठी जर्मनीला गेले आणि निवृत्तीनंतर पेठे काका आता पुण्याला स्थाईक झाले आहेत. सध्या ते, त्यांचे मित्र आणि सहकारी मिळून Society For Public Education and Concern (सोपेक) नावाची संस्था चालवतात. मध्यंतरी पेठे काकांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सोपेकबद्दल तसेच त्यांच्या इतर अनुभवांबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. मायबोली गणेशोत्सवानिमित्त "परिचितांमधले अपरिचित" मालिकेमधला हा शेवटचा संवाद आणखी एका हरहुन्नरी व्यक्तीबरोबर.

काका, तुम्ही सोपेक ही संस्था औरंगाबादला असताना स्थापन केलीत. ह्या संस्थेद्वारे आपण नक्की काय साध्य केले? तसेच ह्या कार्याची दिशा आपणास कुठून मिळाली ?

"प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने साध्य करता येऊ शकते", ही माझी श्रध्दा नव्हे खात्रीच आहे. सोपेक ही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात, देशात आणि परदेशात वेगेवेगळ्या पदांवर काम केलेल्या उच्चशिक्षित आणि अनुभवी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. असे सगळे लोकं एकत्र आले आणि त्यांनी एका दिशेने, एका प्रेरणेने प्रयत्न केले तर आजुबाजूच्या गोष्टी सुधारायला वेळ लागणार नाही. सोपेकने आत्तापर्यंत अनेक उपक्रम हाती घेतले आणि ते यशस्वी पणे पार पाडले. मग ह्यात स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रयत्न तसेच त्यांची अंमलबजावणी झाली आहे.
अनेकदा सरकारी कामकाजावर टीका केली जाते. आमचा असा प्रयत्न असतो की एखाद्या पध्दतीतल्या त्रुटी संबंधितांच्या नजरेत आणून देणे आणि त्या सुधारण्यासाठी योग्य त्या सुचना देणे. तसेच काही काही पद्धती ह्या कालबाह्य झालेल्या असतात, त्या बदलणे गरजेचे असते. अशा बदलांविषयी गरज पडेल तितका अभ्यास करणे, नवीन कल्पना संबंधितांसमोर मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ह्या सगळ्या गोष्टी सोपेकतर्फे केल्या जातात.

सोपेकने हाती घेतलेले आणि अंमलबजावणी केलेले महत्त्वाचे प्रकल्प कोणते?

सोपेकचा सगळ्यांत पहिला मोठा प्रकल्प म्हणजे स्पर्धा पोस्ट कार्ड. त्यावेळी टिव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये मतदान तसेच उत्तरे गोळा करणे हे साध्या पोस्टकार्डांद्वारे होत असे. १५ पैशाचं कार्ड वापरून कित्येक जण लाखो रुपये जिंकत असतं. शिवाय अशा कार्यक्रमांना लाखांच्या संख्येत उत्तरं/मतं दिली जात असतं. सरकारी यंत्रणेचा वापर करून घडणार्‍या गोष्टीचा सरकारला काहीतरी फायदा झाला पाहिजे असा एक विचार सोपेक सदस्यांच्या मनात आला. ह्या विषयाशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती गोळा करून लिखित तसेच योग्य त्या स्वरूपात आणि सर्व पूरक संदर्भांसह केंद्र सरकारसमोर मांडली. आमचा केंद्र सरकारशी अनेक दिवस पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा चालू होता. आमच्या प्रयत्नांनी म्हणा केव्हा आणखी कशाने म्हणा, शेवटी केंद्रसरकारने निर्णय घेतला आणि ह्या स्पर्धा पोस्टकार्डची देशभर अंमलबजावणी झाली. स्पर्धा पोस्टकार्डचा फक्त रंग वेगळा होता. त्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी काहीही अतिरिक्त खर्च न पडता सरकारला खूपच महसुल ह्यातून मिळत असे.

ह्यानंतर आम्ही १ तसेच २ रुपयांच्या नाण्यांसबंधी प्रकल्पावर काम केलं. ही दोन्ही नाणी समान आकाराची तसेच रंगांची होती आणि त्यामुळे ती वापरताना सामान्य माणसाची गैरसोय होतं असे. आम्ही अर्थमंत्रालयाशी ह्याबाबत संपर्क साधून नाण्यांचे डिझाईन, धातू, वजन, आकार इ. ठरवण्यासंबंधी माहितीची विचारणी केली. ह्याबद्दलचे प्रश्न कोणाच्या अखत्यारीत येतात हे जाणून घेतलं आणि त्यावरून आमचा त्यासंबंधी असलेल्या समितीशी पत्रव्यवहार सुरु झाला. पुढे ह्या समितीने निर्णय घेऊन १ आणि २ रुपयांच्या नाण्यांचे आकार, रंग, वजन ह्यात बदल केले. सामान्य माणसाशी होणारी गैरसोय ह्या निर्णयाने टळली.

मग पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्याकाळात सोपेकने युटीआयची US-64 स्किम तसेच रिजर्व्ह बँकेचे टॅक्स-फी बाँड ह्याबद्दलही अर्थमंत्रालयाशी अनेकदा संपर्क साधला होता आणि काही बदल सुचवले होते. ह्यातल्याही काही बदलांची अंमलबजावणी नंतर झालेली दिसली.

म्हणजे सोपेकने हाती घेतलेले प्रकल्प हे प्रामुख्याने अर्थ मंत्रालयाशी संबंधितच असतात का?

नाही. सोपेक जे प्रकल्प हाती घेते ते प्रामुख्याने सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी/रहाणीमानाशी संबंधित असे असतात. त्यामुळे अर्थकारण हे महत्त्वाचे असतेच. ह्याशिवाय सोपेकचे सर्व सदस्य हे आपापले व्याप संभाळून ह्या प्रकल्पांवर काम करतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवताना त्याचे महत्त्व, आधी म्हटल्याप्रमाणे दैनंदिन जीवनावरचा थेट परिणाम, भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता तसेच सदस्यांची त्या विषयांमधली आवड, त्यांसंबंधीची जाण ह्या सगळ्या गोष्टीदेखील विचारात घ्याव्या लागतात.

आपल्या इथे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. सोपेकने श्री. लालकृष्ण आडवाणी गृहमंत्री असताना वाहनांच्या काचांचा रंग तसेच त्यावरचे काळे आवरण ह्यासंबंधीचे निकष कडक करण्यासाठी काही पत्रव्यवहार गृहमंत्रालयाशी केला होता. परंतु त्यावरचा अंतिम निर्णय अजूनही घेतला गेलेला नाही आणि आम्ही अजूनही गृहमंत्रालयाशी त्याबद्दल पाठपुरावा करत आहोत. तसेच वाहनांच्या दिव्यांची वरची अर्धी बाजू काळ्या रंगात रंगवण्याबद्दलही काही अभ्यास करून प्रस्ताव रस्ते वहातूक महामंडळासमोर मांडले होते. रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या वाहनांच्या दिव्यामुळे डोळे दिपून होणार्‍या अपघातांचे प्रमाण ह्यातून कमी होण्यास मदत होईल अशी आमची अपेक्षा होती. ह्यासंबंधीच्या निर्णयाची काही अंमलबजावणी झाली आहे.

काही शैक्षणिक प्रकल्पही आम्ही चालवले. विशेषत: पीएच.डी संबधित. देशामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अनेक पीएच.डी करणार्‍या विद्यार्थ्यांकडून शोधनिबंध, प्रबंध सादर केले जातात. परंतु आवश्यक ते निकष पूर्ण न करूनही ते नाकारले जाण्याचे प्रमाण त्यामानाने खूपच कमी असते ज्यामुळे पीएच.डीची एकूण गुणवत्ता ढासळू शकते. ह्याकरीता काही निकष ठरवून ते सगळीकडे पाळले जाण्यासंबंधी सोपेकने पाठपुरावा केला. माझ्या स्वतःचा अध्यापन तसेच पीएच. डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असलेला अनुभव ह्याबद्दल उपयोगी पडला. ह्याशिवाय मोठ्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये काही महागडी उपकरणे वापराविना पडून असतात. त्यांचा वापर त्या ठिकाणी होत नसला तरी इतर ठिकाणी त्यांची गरज असू शकते. अशा सर्व उपकरणांची माहिती गोळा करून त्यांचा वापर वाढवण्यासंबंधीचे काम सध्या चालू आहे.

नुकतेच उद्घाटन झालेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूबद्दलही एक प्रस्ताव आम्ही सरकारसमोर मांडला आहे. हया पुलाच्या खांबांच्या जवळ असलेल्या जागेचा तसेच त्या खांबांचा वापर करून वीज निर्मीती करता येऊ शकते, जी वीज पुलावरच्या दिव्यांसाठी वापरली जाईल. ह्यासंबंधी सोपेकचे सदस्य सागरी सेतूच्या प्रमुख अभियंत्यांच्या तसेच Institute of Oceanogrpahy, Mumbai ह्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मघाशी म्हंटल्याप्रमाणे सोपेकचे सगळेच प्रकल्प हे अर्थकराणाशी संबंधीत नाहीत.

सोपेकची सुरुवात औरंगाबादला झाली. तिथे अगदी सुरुवातीला चालवलेला प्रकल्प कोणता?

टि.एन. शेषन जेव्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख होते तेव्हा औरंगाबादमध्ये निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोलपंपांवर सर्व वाहनांच्या नोंदी तसेच पेट्रोलखरेदीसंबंधीची माहिती ठेवणे बंधनकारक केले होते. हे ग्राहकांच्या तसेच पेट्रोलपंपचालकांच्या दृष्टीने खूपच गैरसोईचे होत असे. सोपेकने ह्या नियमाविरुध्द तक्रार केली आणि पुढे तो नियम बदलला गेला. सुरुवात मुळात ह्यातून झाली.

तुम्ही मुळचे मुंबईचे असूनही औरंगाबादला कसे काय स्थाईक झालात? मुंबई सोडून औरंगाबादला जाणं हा अनुभव कसा होता? ह्यात अडचणी नाही जाणवल्या? लहानपणापासून असलेली शेतीची आवड जपण्यासाठी हा निर्णय घेतला होतात का?

माझे वडील, काका तसेच बाकी सगळे नातेवाईक हे मुंबईचे असते तरी माझं आजोळ हे वैभवसंपन्न अशा खानदेशातलं होतं. माझ्या लहानपणी मी आईबरोबर नेहमी तिथे जात असे. तिथे मामांच्या शेतीचे प्रयोग बघत असे. त्यावेळेपासूनच शेतीची आवड उत्पन्न झाली. जर तुम्हांला शेतीसारख्या विषयात संशोधनाची आवड असेल तर मुंबईपेक्षा महाराष्ट्राच्या इतर भागातच त्याला जास्त वाव होता. अशा संधी तिथेच जास्त उपलब्ध होत्या. औरंगाबादची निवड करण्यामागचं कारण म्हणजे हे शहर मागसलेलं असूनही विकसनशील आहे. ते त्याकाळी संपूर्ण आशियामधलं सगळ्यांत जास्त वेगाने वाढणारं शहर होतं. ह्याशिवाय मुंबईतली दगदग, कामावर जाण्यायेण्यातला वेळ तसेच शक्ती वाचवून मी ती संशोधन कार्यासाठी लावू शकणार होतो. औरंगाबादला जाण्याचा निर्णय योग्यच होता असं आता म्हणावं लागेल. आणि मुंबईसारख्या शहरातून खेड्यात जाणं अवघड असलं तरी शेवटी तुम्हांला तुमचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.

औरंगाबादला शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे संशोधन केलेत?

रसायनशास्त्रामधले माझे शिक्षण शेतीविषयक संशोधनात खूपच उपयोगी पडले. अगदी सुरुवातीला प्रयोगशाळेतल्या प्रयोगांमधून असे लक्षात आले की, नैसर्गिक खत तयार करताना जर १ मीटरपेक्षा जास्त खोलीचा खड्डा तयार केला तर त्यात खत तयार होऊ शकत नाही. त्यात घातलेल्या कचर्‍याचा नुसताच रंग बदलतो. आणि असे खत जर शेतीसाठी वापरले तर त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. ह्या संदर्भात इंडियन काउंन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चच्या सहाय्याने अधिक संशोधन केलं आणि निश्चित निष्कर्ष हाती आल्यानंतर ते शेतकर्‍यांसमोर मांडले. पुढारलेल्या शेतकर्‍यांनी हे निष्कर्ष मानले आणि नंतर त्याचे चांगले परिणाम त्यांनाही दिसले.

त्यानंतर एकदा बाभळी तसेच शेवग्याच्या शेंगांवर संशोधन करायचे होते. पण त्याकरीता स्वतःचे शेत असणे गरजेचं होतं. मग औरंगाबादच्या जवळ शेत विकत घेतलं. शेवग्याच्या शेंगांसंबंधी संशोधन करत असताना पहिल्या प्रयत्नात ते सपशेल फसलं. १०० झाडं लावलेली असून त्यात १०० शेंगा देखील आल्या नाहित. मग त्यामागची कारणमीमांसा करत असताना लक्षात आलं की शेंगा न येण्याचं कारण हे शेतातला प्रचंड वारा हे आहे. वार्‍यामुळे शेवग्याची फुलं उडून जातात आणि शेंग धरतच नाही. मग ही फुलं वाचवण्यासाठी झाडांचं वार्‍यापासून संरक्षण करणं गरजेचं होतं. त्यात बाभळीच्या झाडांची मदत झाली.
बर्‍याचदा शेतात एकावेळी दोन पिकं घेतली की ती एकमेकांना पूरक ठरतात आणि त्यामुळे दोन्ही पिकांच्या उत्पन्नात वाढ होते. ह्यासंबंधीचे अनेक प्रयोग शेतात केले. आणि हे सगळे प्रयोग वार्षिक असतात. म्हणजे एखाद्या हंगामात एखादा प्रयोग फसला तर तो सुधारणा करण्यासाठी वर्षभर थांबावं लागतं.
ह्याशिवाय गाईम्हशी पाळल्या. त्यांचे दूधदुभते वाढवण्यासंबंधी प्रयोग केले. हे सर्व संशोधन करताना काही प्रयोग प्रयोगशाळेत केलेच पण मुख्य म्हणजे शेतात अगदी नांगर चालवण्यापासून ते गोठा साफ करण्यापर्यंत सर्व काही केलं.

जाताजाता, शेतीच्या ह्या संशोधना बरोबरच आणखीनही एक गोष्ट केली. केवळ आवड आणि सहज शक्य झाली म्हणून. औरंगाबादजवळ सुमारे ४० एकर जागा सरकारकडून मी विकत घेतली. ह्या जागेवर एका वकिलाची तसेच आर्कीटेक्टची नेमणूक करून त्याचे भुखंड पाडले. कुठल्याच प्रकारची घाई नसल्याने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थीत सरकारी पध्दतीने तसेच कायदेशीर मार्गाने झाल्या. आज ह्या जागेवर पेठेनगर उभं आहे.

ह्या सर्व गोष्टी करणं औरंगाबादला गेल्यामुळेच शक्य झालं. माझा मुख्य पेशा म्हणजे रसायनशास्त्रातले संशोधन आणि विद्यापीठात अध्यापन हे संभाळून मुंबईत हे सगळं शक्य झालं नसतं.

तुम्ही रसायनशास्त्रात MSc तसचं पीएच.डी. केलंत आणि नंतर जर्मनीला जाऊन काही संशोधन कार्य केलंत. त्याबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल.

लहान सहान प्रयोग करून बघायची हौस मला लहानपणापासूनच होती. लहानपणी दारावर आलेल्या मदार्‍याने दाखवलेली जादूची काडी मी १ आण्याला विकत घेतली होती. नंतर घरी जाऊन तेच प्रयोग स्वत: करून दाखवले. तेव्हापासून आजोबा म्हणत की हा पुढे जाऊन शास्त्रज्ञ होणार. आणि नंतर मी खरच संशोधन कार्यात उतरलो. MSc नंतर पुढे मी N.C.L. मधून 'Solid Sate Chemistry' ह्या विषयात पीएच.डी केलं. N.C.L. मधल्या ६ वर्षांच्या काळात मला आयुष्यभर पुरेल इतका अनुभव मिळाला. पुढे मी पीएच.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हे करत असताना मला अजून शिकावं, संशोधन करावं अशी इच्छा होती आणि तशी संधी मला लवकरच मिळाली. यु.एस. स्टील कंपनीमार्फत लोखंडावर येणार्‍या गंजासंबंधीचं संशोधन करण्यासाठी मी जर्मनीतल्या ग्योटींगन विद्यापिठात गेलो होतो. हा अनुभवही अतिशय उत्तम होता. तिथे मला अनेक मित्र मिळाले, चिकाटीने काम करण्याची वृत्ती जर्मन लोकांकडून शिकता आली आणि अजून एक म्हणजे हे संशोधन अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्याने आसपासचे देश पाहून येण्याची संधीही मिळाली. आमच्या प्रयोगाचे परिणाम जाणून घेण्यासाठी मध्ये काही वेळ जाणं आवश्यक होतं. प्रोफेसर हौफे ह्यांनी मला त्यादरम्यान प्रवासाला जाण्याची मुभा दिली आणि ती संधी साधून मी थेट उत्तर धृवापर्यंत भटकंती करून आलो.

उत्तरधृवाच्या प्रवासाचा अनुभव कसा होता?

उत्तरधृवाचा प्रवास आम्ही बोटीतून केला. त्याप्रवासात समुद्रातले डोंगर पहायला मिळाले. त्यांचे आकार खूपच विलोभनीय होते. आम्ही उन्हाळ्यात तिथे गेल्यामुळे सूर्य क्षितिजाखाली जात नसे. २४ तास सूर्यप्रकाश. रात्र झाली तरी अंधार नाही. समुद्राच्या पाण्यावर आभाळातल्या ढगांतून झिरपणार्‍या प्रकाशामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर सोन्याचांदीचा चुरा सांडल्यासारखा दिसत होता. वातावरण थंड, शुध्द हवा, शांत निर्मळ वातावरण सगळंच देखणं होतं. उत्तरधृवावरच्या 'हॅमर फेस्ट' ह्या गावी अगदी शब्दश: मध्यरात्रीचा सूर्य पाहिला. त्यावेळची "I am on top of the world" ही भावना फारच सुखद होती. पण दुसर्‍याच क्षणी विचार आला की "But none in the world knows me". मला वामनावताराची आठवण झाली. उत्तरधृवावर प्रवासाची नोंद करत असताना जन्मठिकाण लिहायचं होतं. तिथे मी माझं जन्मगाव "भडगांव, पूर्वखानदेश, महाराष्ट्र, भारत " असे लिहिले. त्यावेळी मला माझ्या जन्मगावचा व आजोळचा खूपच अभिमान वाटला. एकूण उत्तरधृवावरचा प्रवास, तिथले अनुभव, त्यावेळी मनात आलेले विचार हे सगळं खूप विलक्षण आणि वेगळं होतं !

एकूण तुमच्यावर आजोळचा खूपच प्रभाव जाणवतो. तुमच्या आजोळाची पार्श्वभूमी काय?

पूर्व खानदेशातलं जळगाव जिल्ह्यातलं भडगांव हे माझं आजोळ. तुझे आजोबा आणि त्यांचे ३ बंधू हे माझे मामा. तू त्यांतल्या कोणाचच कार्य जवळून पाहिलेलं नाहीस पण ते चौघेही अतिथय हरहुन्नरी. ते सगळे मिळून भडगांवला शेती, पिठाच्या गिरण्या, बस सर्व्हिस असे उद्योग चालवत. प्रत्येक उद्योग कष्टाने आणि सचोटीने करायचा हे त्यांचे तत्त्व. ह्याशिवाय त्याकाळातही ते अतिशय प्रयोगशील आणि सुधारक वृत्तीचे होते. मामांच्या शेतीतले प्रयोग मी लहानपणापासून बघितले. घरचं उसाचं गुर्‍हाळ, केळी, कापूस, कांदे ह्यांची पिके ह्या सगळ्यांत पण त्यांनी खूप नवनविन प्रयोग करून बघितले. आणि कदाचित ह्या सगळ्यांमुळे मला शेती, प्रयोग, संशोधन ह्याची आवड निर्माण झाली. काम करणारी सगळी गडी माणसं ही जणू त्यांच्या घरचीच. त्यांच्या घरच्या अडीअडचणी, लग्नकार्य ह्या सगळ्यांमध्ये मामांची खूपच मदत असे. त्यामुळे ती लोकं ही आपलेपणाने काम करीत. एकूण त्या लहान गावातलं हे एक संस्थानच होतं आणि तिथला खूपच प्रभाव माझ्यावर आहे.

तुमचं संशोधन कार्य, त्यानंतर औरंगाबादला शेती विषयक संशोधन, मग जर्मनी आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्यामधे आपल्या कुटूंबाची साथ आणि वाटा काय ?

सुरुवातीच्या काळात माझे हे सगळे प्रयोग, संशोधन चालू असताना आईवडिलांचा भक्कम मानसिक आधार आणि आर्थिक पाठबळ होतं त्यामुळे मी हे करू शकलो. वडिलांकडून तसेच मामांकडून एक संशोधक, व्यवसायिक वृत्ती शिकता आली. तसेच हे सगळे संस्कार पुढे आयुष्यात फार उपयोगी पडले. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या यशात, आयुष्यात माझी पत्नी सौ. सुगंधा हिचा खूपच मोठा वाटा आहे. माझ्या संशोधनाच्या काळात कधीकधी मी तिला वेळ देऊ शकत नसे. पण तीने कधीही तक्रार केली नाही. माझ्या आईवडिलांकडे, मुलींकडे तिच बघत असे. औरंगाबादला असताना तिचेही भरपूर कार्यक्रम चालू असतं. शिवाय औरंगाबादला आमच्याकडे पाहुण्यांचाही सतत राबता आहे. हे सगळंही तिनेच निभावलं. आताही आम्ही दोधे काँप्युटर वापरायला शिकलो. मला कंपवाताचा थोडा त्रास असल्याने सोपेकचा सर्व पत्रव्यवहार, इमेल संपर्क हे तीच संभाळते. तसेच इंटरनेट वरून माहिती शोधण्याच्या कामातही ती मदत करते.

पुन्हा एकदा सोपेककडे वळतो. सोपेकचे आगामी प्रकल्प कोणते ?

दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हांला हाती घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे सायकलच्या वापर वाढवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे. भविष्यात येऊ घातलेली इंधन टंचाई आणि प्रदुषण ह्यावर सायकलचा वाढता वापर नक्कीच परिणामकारक ठरू शकेल. तसच दुसरं म्हणजे शाळांमधे प्रवेश देताना त्या परिसरात रहाणार्‍यांना प्राधान्य मिळणे. ह्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्या-येण्याचे श्रम तसेच वेळ वाचून तो इतर गोष्टींकरता देता येतो. ह्या दोन्ही गोष्टींवर काम सुरु करण्यासाठी आमचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाहिये तसेच लोकांची आणि तज्ञांची मते अजमावण्याचे कामही सुरू आहे. इतरही अनेक उपक्रमांवर विचार चालू आहे परंतु आधी म्हंटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यावर कामे सुरू होतील.

आधी रसायनशास्त्रातलं शिक्षण आणि संशोधन, त्यानंतर शेतीविषयक संशोधन, ह्याशिवाय औरंगाबादला अनेक उपक्रमांमधे सहभाग आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही कसं काय योगदान देऊ शकलात? त्यामागचं रहस्य काय?

मुळात एखाद्या विषयाची आवड असेल तर त्यात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती हवी. कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आपल्याला जे आवडतं आहे, ज्यात काही करावसं वाटतं आहे ते नक्की करून पहावं. त्यातुन आपल्याला शिकायला मिळतं, मानसिक समाधान मिळतं आणि कधीकधी समाजाला त्याचा उपयोगही होऊ शकतो. आधी मी म्हंटलं तसं प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने करणं शक्य आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर हे जग बदलणं नक्कीच शक्य आहे.

ह्या वयातही इतक्या उत्साहाने काम करणार्‍या पेठे काकांकडून आपल्या आपल्या सगळ्यांनाच शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे अनुभव आपल्यालाही काही करण्याची प्रेरणा देतील अशी आशा आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काका काकूंना तसेच सोपेकच्या आगामी प्रकल्पांसाठी काकांना शुभेच्छा देऊन मी ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले

-------
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित :
http://www.maayboli.com/node/10565

'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

परिचितांमधले अपरिचित : 'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर

ओठांवरचं हलकं स्मित, गालातल्या गालात हसू ते सप्तमजली हास्यापर्यंत विनोदाचे अनेक प्रकार आहेत. विनोदाची हळूवार फुंकर दु:खाच्या वेदना बोथट करते. जीवनाचा निखळ आनंद हा हास्यातूनच फुलत असतो. आनंद द्या, आनंद घ्या, जीवनाकडे निरागस-सकस दृष्टीने पहा हाच मुलमंत्र घेऊन 'सकाळ' तसेच मध्यंतरी 'लोकसत्ता' वृत्तपत्रामधून 'चिंटू' गेली १८ वर्ष आपल्या भेटीला येतो आहे. मध्यंतरी माझ्या एका मित्राशी, रोहितशी,  बोलत असताना असं समजलं की, चिंटूकार चारूहास पंडित हा त्याचा चुलत भाऊ. इतके वर्ष 'चिंटू' वाचत असल्याने माझं आणि रोहितचं बर्‍याचदा चिंटूबद्दल बोलणं व्हायचं. नंतर एकदा त्याने चारूहास पंडितांशीच माझी गाठ घालून दिली. मायबोली गणेशोत्सवानिमित्त चारूहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर ह्यांच्याशी मारलेल्या ह्या गप्पा.



आमची पिढी पेपर वाचायला लागली तेव्हापासून त्यात 'चिंटू'  दिसतोच. तर सर्वप्रथम आम्हांला 'चिंटू' हे सदर सुरु कसे झाले हे जाणून घ्यायला आवडेल.

चारूहास : माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ही कला क्षेत्रातलीच. मी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलंय. आणि नंतर मी स्वत:ची अ‍ॅडव्हरटायजिंग एजन्सी चालवत असे. व्यंगचित्रे काढायची तसेच वाचायची आवड लहानपणापासूनच होती. पूर्वी 'पुण्याची क्षितीजे' हे सदर 'सकाळ' वृत्तपत्रामधे प्रसिध्द होत असे. त्यात मी व्यंगचित्र काढत असे. इंग्रजी वृत्तपत्रांमधे येणार्‍या गारफिल्ड, डिलबर्ट ह्यांसारख्या व्यंगचित्रमालिका अगदी न चुकता वाचत असे. पण अशी एखादी भारतीय मालिका का नाही, असाही विचार नेहमी मनात येत असते. ह्या सगळ्या मालिका निश्चितपणे उत्तम आहेत, त्यांतला विनोद, त्यांतलं नाविन्य हेदेखील चांगलं असतं. पण तरीही कधीकधी त्यांचं भारतीय नसणं हे मनाला खटकतं किंबहुना त्यांतल्या काही काही गोष्टी आपल्याला अजिबातच जवळच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ बर्फ पडण्यावरून केले जाणारे विनोद. आपल्या इथे तसे हवामानच नसल्याने ते आपण appereciate करू शकत नाही. ह्याशिवाय रोजच्या वृत्तपत्रात साधारण अनेक नकारात्मक बातम्या असतात. त्यामुळे ह्यामध्ये काहीतरी हलकंफुलकं असावं असं मला स्वत:लाही वृत्तपत्र वाचताना जाणवत असे. असा एखादातरी  कोपरा त्यात असावा जो वाचकाच्या चेहेर्‍यावर स्मित आणेल, त्याला रोजच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं देईल आणि शिवाय ते आपल्या जवळचंही असेल. ह्यातूनच भारतीय मातीतलं असं एखादं व्यक्तिमत्त्व व्यंगचित्रमालिकेद्वारे तयार करायचा विचार चालू झाला आणि पुढे पुढे तो प्रबळ होतं गेला. On a lighter note, हा सगळा विचार चालू असतानाच मला भेटलेलं एक 'कॅरॅक्टर' म्हणजे प्रभाकर वाडेकर. :)

प्रभाकर : मी कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करत असे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मला लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशी तिन्ही बक्षिसं एकाच वर्षी मिळाली होती. व्यवसायाने मी इंडियन एक्सप्रेसमध्ये advertising management करत असे. तसेच कॉपीरायटरचं कामपण केलं आहे. नंतर टिव्हीवरील मालिका, एकांकीका ह्यांचं लेखनही करत होतो/करतो. भोपाळ दुर्घटनेच्या वेळी मी आणि चारूहासने मिळून एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली होती. चारूहास जसं म्हणाला तसंच वृत्तपत्रांतल्या नकारात्मक बातम्यांमधून काहीतरी वेगळं समोर आणणारा एखादा कोपरा पाहिजे असं वाटतच होतं. आम्ही कामानिमित्त भेटायचो त्यावेळीही काम सोडून इतर सगळ्या गोष्टींबद्दलच गप्पा मारत रहायचो. आणि अशाचं एका गप्पांच्या सत्रात 'चिंटू' ही कल्पना 'क्लिक' झाली. :)

चारूहास: 'सकाळ'चे त्यावेळचे संपादक विजय कुवळेकर ह्यांनीही एखादी व्यंगचित्र मालिका किंवा तत्सम काहीतरी सुरु करता येईल का, ह्यासंबंधी विचारणा केली होती. प्रभाकरचा आणि माझा विचार पक्का झाल्यावर ह्यातूच पुढे 'चिंटू' साकार झाला. आम्ही काही नमुने 'सकाळ' संपादक मंडळाला सादर केले आणि त्यांनी हिरवा कंदिल दिल्यावर आज १८ वर्षे अव्याहतपणे चिंटू आपल्या भेटीला येत आहे.

चिंटू हा पूर्णपणे काल्पनिक आहे की आजूबाजूच्या कोणा लहान मुलाचा किंवा तुमच्या स्वतःच्याच बालपणीचा प्रभाव त्याच्यावर आहे?

चारूहास : चिंटू हा आपल्या प्रत्येकामध्ये थोडा थोडा असतोच. तो खट्याळ आहे, मिश्कील आहे, निरागस आहे, त्याबरोबरच कधीकधी तो बावळटही आहे. चिंटूच्या पोशाखावरून, त्याच्या दिसण्यावरूनही आम्ही हेच दाखवायचा प्रयत्न करतो. चिंटूचा चेहरा निरागस आहे, पण त्याच्या कपाळावर येणारी बट त्याला एकप्रकारचा खट्याळपणा देऊन जाते. त्याचा पट्ट्यांचा टीशर्ट त्याच्यातलं खोड्याळ लहान मूल दाखवतो. त्यामुळे चिंटू सगळ्यांमधला थोडा थोडा अर्क आहे. तो कोणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर बेतेलेला नाही. त्याचप्रमाणे तो पूर्णपणे काल्पनिकही नाही. तो आपल्या सगळयांच्या आसपास कुठे ना कुठे तरी दिसतो.

प्रभाकर : आम्ही दोघेही मुळचे पुण्याचेच. नारायण पेठेत लहानाचे मोठे झालेलो. त्यामुळे वाडा संस्कृती अगदी जवळून बघितलेली. कोणी ना कोणी मित्र नेहमीच बरोबर असायचे. कट्ट्यावर बसून टाईमपास करणे, शेजार्‍यांच्या खोड्या काढणे हेसुध्दा लहानपणी केले होते. त्यामुळे बालपणीचा प्रभाव थोडाफार आहेच. चिंटूचं घर बघितलं तर ते आतमधून आधुनिक काळातलं आहे, पण त्याला वाड्यासारखं किंवा स्वतंत्र घरासारखं रूप आहे. तो आत्तासारखा इमारतीतला फ्लॅट नाहिये. चिंटू, मिनी, पप्पू हे अधूनमधून कट्ट्यावर, ओट्यावर बसून गप्पा मारताना दिसतात. त्यांचा खेळायच्या जागा, आजूबाजूच्या गोष्टी हे अगदी तंतोतंत आमच्या लहानपणीच नसलं तरी सगळं कुठेतरी परिचयाचं आहे.

'चिंटू' मधली बाकीची जी पात्र आहेत, त्यातली काही अगदी सुरुवातीपासून होती की काही नंतर आली. तुम्ही ह्यासंदर्भात आधीपासूनच काही ठरवून ठेवलं होतं की काळाबरोबर ती फुलत/स्पष्ट होत गेली ?

'चिंटू' मधली सगळी पात्र ह्या सगळ्या व्यक्ती नसून प्रवृत्ती आहेत. उदाहरणार्थ पप्पू. आपल्या आजूबाजूला एखादा मित्र हमखास असतो जो नेहमी आपल्याबरोबर असतो, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला साथ देतो. पण योग्य वेळी आपल्याला टोकतोदेखील. त्यामुळे त्याचं पात्र हे आधीपासून पूर्णपणे लिहून ठेवायची गरज नव्हती. चिंटूच्या मित्रमंडळींमध्ये एका वेंधळ्या मित्राची गरज नंतर वाटली . म्हणून मग बगळ्याचे पात्र आणले गेले. अनेकांनी आपल्या आजूबाजूला बगळ्या निश्चितपणे पाहिला असेल. एकूण प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना 'चिंटू' ही मालिका जवळची वाटण्यासाठी त्या त्या वयोगटातलं एखादं तरी पात्र 'चिंटू'मध्ये दिसतं. कधीकधी मनात येत गेलं तसं किंवा गरज लागेल तसं त्याला वळण दिलं, पण आधीपासून ठरवून काहीच ठेवलेलं नव्हतं.



चिंटू कधी मोठा होणार का? किंवा त्याला भविष्यात एखादं त्याच्यापेक्षा जास्त खट्याळ भावंडं यायची शक्यता आहे का?

अरे, एकट्या चिंटूचाच 'दंगा' आम्हांला भारी पडतोय, त्यात आणखीन भावंडं कुठे ? आणि दुसरं म्हणजे हल्लीच्या काळात २ -२ मुलं असणं परवडलं पाहिजे ना चिंटूच्या आई वडिलांना. :) 
'चिंटू'ची पूर्ण मालिका ही सगळ्यांना जवळची वाटली पाहिजे, तसेच ती कालानुरूप असली पाहिजे असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. 'चिंटू' जेव्हा सुरु झाली, साधारण तेव्हापासून साधारण single child family ह्या संकल्पनेची सुरुवात झाली होती. आतातर अशाप्रकारची कुटुंबं सर्रास बघायला मिळतात. शिवाय 'सोनू' हे जे पात्र आहे ते चिंटूपेक्षा लहान आहे. त्यामुळे चिंटूपेक्षा वयाने लहान पात्राची जागा सोनू भरून काढू शकतो. त्यामुळे चिंटूला भविष्यात भावंडं यायची आत्तातरी शक्यता दिसत नाही.
चिंटू मोठा होणार का हा प्रश्न आम्हाला नेहमीच विचारला जातो. वास्तविक चिंटू जर वाढत्या वयाचा दाखवला असता तर सुरुवातीपासूनचा काळ लक्षात घेता तो आतापर्यंत लग्नाचा झाला असता. :)
शिवाय ह्या मालिकेत प्रत्येक वयोगटातले लोकं स्वतःला बघू शकतील असे एक तरी पात्र आहे. जसं मघाशी म्हंटलं तसं लहान मुलांसाठी 'सोनू' आहे, कॉलेजमधल्या वयोगटासाठी 'सतीशदादा' आहे. आई-पप्पा आहेत, जोशीकाकू आहेत, आज्जी आजोबा आहेत. त्यामुळे चिंटूचं वय वाढलच पाहिजे, असं काही नाही. ह्याशिवाय चिंटू जरी वयाने मोठा होतं नसला तरी त्याच्या आजूबाजूचं वातावरण हे कालानुरुप बदलतं आहे. सुरुवातीला इंटरनेट, मोबाईल फोन ही माध्यमं आपण वापरत नव्हतो, लहान मुलं कॉंप्युटरवर गेम खेळत नव्हती. पण गेल्या काही वर्षांमधले हे बदल 'चिंटू' मालिकेतही दिसतात. आता चिंटूच्या घरी काँप्युटर आहे, चिंटूच्या पप्पांकडे मोबाइल आहे. चिंटूला ह्या दोन्ही गोष्टी वापरायचं चांगलं ज्ञान आहे. हे सगळं आत्ताच्या काळातल्या चिंटूच्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसून येतं. चिंटूचं वय कधी वाढत नाही पण त्याच्या आजूबाजूचं वातावरण कालानुरूप बदलतय आणि यापुढेही नक्कीच बदलेल. आणि ह्या बदलांमुळेच 'चिंटू' मालिकेतला ताजेपणा, टवटवीतपणा हा नेहमीच टिकून रहायला मदत होते. 





रोजच्या 'चिंटू'ची साधारण निर्मितीप्रक्रिया काय असते? तसच तुमच्या कामांची साधारण विभागणी झालेली आहे का? चित्र काढणे, शब्द लिहिणे इ. ?

रोजचा 'चिंटू' तयार व्हायला साधारण ४ तासांचा वेळ लागतो. आम्ही दोघं रोज भेटतोच. त्यावेळी कामाव्यतिरिक्त इतर घडामोडींबद्दलही बर्‍याच गप्पा होतात. किंबहूना बर्‍याचदा त्याच जास्त होतात !
अशाच गप्पांमधून काहीतरी विषय सुचतो आणि पुढे तो फुलत जातो. कधीकधी कल्पनेवरून चित्र बनवून त्यात सुधारणा केल्या जातात. लहानसहान बदल करून ते अधिकाधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ह्या सगळ्या कामांसाठी जरी साधारण ४ तास लागत असले तरी विचारप्रक्रिया तसं म्हटलं तर कायमच चालू असते. आजूबाजूला सतत कुठेतरी वावरत असणरा चिंटू शोधून काढणं हे ह्या विचारप्रक्रियेमुळे शक्य होतें आणि म्हणूनच ही विचारप्रक्रियाच जास्त महत्त्वाची असते.  कामाची विभागणी अशी काहीच केलेली नाही. परस्पर सामंजस्यावर आमचं संपूर्ण काम चालतं. कधीकधी तर काढलेली स्केचेस आणि लिखाण इतकं कच्च्या स्वरूपात असतं की, इतरांना ते पाहून काहीच अर्थबोध होतं नाही. तरी आम्हांला एकमेकांना ते काय आहे हे बरोबर समजतं. आमच्या घरचे आम्हाला चिडवतातही की, ह्या दोघांनी एकमेकांना कोरे कागद दिले तरी त्यात ह्यांना 'चिंटू' दिसेल !
आमच्या जबाबदार्‍यांमधली सीमारेषा खूपच धूसर आहे. एकमेकांच्या कामात आम्ही खूपच जास्त लुडबूड करतो आणि कदाचित त्यामुळेच चिंटू एकजिनसी होतो.

तुमचा साधारण क्रम काय असतो ? म्हणजे स्केचिंग करताना शब्द सुचतात की शब्द आधी ठरवून त्यावर स्केच काढता?

बरेचदा शब्द किंवा कल्पना आधी ठरवून मग त्यावर चित्र काढली जातात पण कधीकधी असं ही होतं की, स्केच काढता काढता एखादं स्केच सुरेख जमून जातं आणि मग ते मुख्य चित्रात वापरण्यासाठी त्यावर अनुरूप असे शब्द लिहिले जातात. पण ह्याबाबतही काही ठामपणे ठरवलेलं नसतं. शेवटी चितारलेला चिंटू चांगला आणि परिणामकारक होणं हे महत्त्वाचं !

रोजचा 'चिंटू' हा प्रसिध्द होण्याच्या किती आधी तयार होतो ? सर्वसाधारण विषयांवरचे काही 'चिंटू' तुम्ही आधीच तयार करून ठेवलेले असतात का ?

'चिंटू' सुरु झाल्यापासून आमचं ते स्वप्न आहे की २/३ महिने आधी भरपूर 'चिंटू' बनवून ठेवावे. पण ते अजून तरी शक्य झालेलं नाहिये. आम्ही जेव्हा 'सकाळ'च्या संपादकांना 'चिंटू' सगळ्यांत प्रथम सादर केला, त्यावेळी आम्ही ४/५ 'चिंटू'चे भाग तयार करून नेले होते. आमची अशी अपेक्षा होती की, संपादक आम्हांला सांगतील की आम्ही विचार करून कळवू किंवा पुढच्या महिन्यापासून सुरु करू. मग आपल्याला मध्ये वेळ मिळेल जेव्हा भरपूर चित्रं आधीपासूनच बनवून ठेवता येतील. पण त्यांचा प्रतिसाद फारच अनपेक्षित होता. त्यांनी आम्हांला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि नंतर परत ऑफिसमध्ये बोलावून सांगितलं की, "तुम्ही दाखवलेल्या चित्रांपैकी पहिलं उद्याच्या अंकात छापण्यासाठी पाठवून दिलंय. तर उद्यापासून इतक्या वाजेपर्यंत 'चिंटू' आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे!" त्या वेळेपासूनच आमचं खूप सारे 'चिंटू' आधीपासून बनवून ठेवायचं स्वप्न अधुरं राहिलय ते आत्तापर्यंत. फक्त गावाला जायचं असेल किंवा इतर काही अगदीच टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे वेळ देता येणार नसेल तरच आम्ही आधीपासून थोडीफार तयारी करून ठेवतो. अन्यथा आपल्याला 'सकाळ'मध्ये दिसणारा 'चिंटू' हा साधारण एक किंवा दोन दिवस आधी तयार झालेला असतो. अगदी ऐनवेळी काम केल्यामुळे विषयांमधला, कल्पनांमधला ताजेपणा टिकून रहायला मदत होते. तसेच आजूबाजूच्या घटना, घडामोडी ह्या सगळ्यांचा अंतर्भाव करणं सोप्पं जातं. शिवाय 'डेडलाईन'चं दडपण हे फक्त तुम्हां आयटीवाल्यांनीच घ्यावं असं काही नाही.. ते दडपण आल्याशिवाय काम चोख पार पडतच नाही. :)

चिंटू आता सुमारे १८ वर्षे सुरु आहे. ह्या वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी येणार्‍या प्रसंगांना, जसे सणवार (दिवाळी, गणपती), शाळा सुरु होण्याचा काळ, पावसाळा, नववर्ष इ .नवनवीन कल्पना लढवताना कधी अडचण जाणवली नाही का? किंवा कधी 'अजिबात काही सुचतच नाही' असा प्रसंग आलाय का?

चारूहास : तू जर बघितलंस तर हे सगळे प्रसंग, जसे दिवाळी, गणपती, स्वातंत्र्यदिन, पाऊस, परीक्षा ह्या सगळ्यांचं हळूहळू वातावरण तापायला लागतं. वृत्तपत्र, बातमीपत्र ह्यांमध्ये त्याबद्दलच्या बातम्या यायला लागतात. बाजारपेठा, दुकानं ह्या सगळ्यांवर ह्या गोष्टींचे परिणाम जाणवायला लागतात. त्यामुळे सतत आसपास असणारा 'चिंटू' ह्या प्रसंगांमधेही नवीन रुपात आजूबाजूलाच सापडतो. तसच 'चिंटू'मधून आम्ही कधीही उपदेश करत नसलो तरी प्रत्येकवेळी त्यात विनोदच असेल असंही नाही. कधी कधी चिंटू आणि त्याची मित्रमंडळी आजूबाजूच्या परिस्थिती वर एखादी त्यांच्या वयाला शोभेल अशी पण मार्मिक टिप्पणी करून जातात. आसपासच्या वातारवणाचा पारिणाम ह्या मंडळींवर दिसतोच. त्यामुळे ह्या नेमेची येणार्‍या प्रसंगांमध्येही नाविन्य राखता येतं.

प्रभाकर : काहीच सुचत नाही असं होत नाही. आपल्या रोजच्या जीवनातले साधे साधे क्षणदेखील आनंददायी असतात. फक्त ते तुम्हांला पकडता आले पाहिजेत आणि योग्य पध्दतीने मांडता आले पाहिजेत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर चौकात रस्ता शोधत असण्यार्‍या पाहुण्यांचा आणि चिंटू व मित्रमंडळींचा संवाद आम्ही एकदा दाखवला होता. वास्तविक हा प्रसंग आपणदेखील अनेकदा अनुभवतो, म्हणजे एकतर आपण कोणाला पत्ता विचारतो किंवा इतर कोणी आपल्याला पत्ता चिचारतं पण अशा साध्या प्रसंगांतही विनोद घडू शकतात आणि ते योग्य पध्दतीने आणि योग्य वेळी पकडता आले पाहिजेत आणि मांडता आले पाहिजेत.
आम्ही ह्या मांडणीबाबतही सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. तांत्रिक बाबींमधे नावीन्य आणायचा प्रयत्न करत रहातो. ह्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे साधारणपणे 'चिंटू' ३ चौकटींमधे दिसतो. पण आम्ही एका चौकटीपासून ते अगदी दहा चौकटींपर्यंतचेदेखील प्रयोग केले आहेत. ह्याशिवाय चिंत्रांमधले कॅमेर्‍याचे कोन, आता रंगीत 'चिंटू' सुरु झाल्यापासून विविध रंगांचे प्रयोग हेसुध्दा करून पाहिले आहेत. कधी नुसतीच चित्र, तर कधी नुसतेच शब्द असेही 'चिंटू' प्रसिद्ध झालेले आहेत. दिवे गेल्याच्या प्रसंगावरच्या चित्रामधे नुसतेच शब्द होते. बाकीची पूर्ण चौकट काळी होती. तरी तो 'चिंटू' ही खूप आवडल्याचे अभिप्राय आले. कित्येकांनी असं ही नमूद केलं की, चिंटू किंवा इतर पात्र दिसत नसूनही आम्ही ती पाहू शकलो. ह्या सगळ्यां तांत्रिक बाबींमधले फरक वाचकांच्या कित्येकदा लक्षातदेखील येत नाहीत, पण त्यातून त्यांना एक वेगळा, नवीन अनुभव नक्कीच मिळतो आणि आम्हालाही ह्या प्रयोगांचा 'चिंटू'मधला ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि तोचतोचपणा न येऊ देण्याच्या दृष्टीने खूपच फायदा होतो.





इतक्यावर्षांमधला तुमचा सर्वात आवडता 'चिंटू' कोणता ?

हा प्रश्नसुध्दा आम्हांला नेहमीच विचारला जातो पण दरवेळी आम्ही तो ऑप्शनलाच टाकतो. आत्तापर्यंत ५००० च्या वर 'चिंटू' ची चित्रं प्रसिद्ध झाली. त्यामुळे ह्या सगळ्यांमधून आवडता एक ठरवणं शक्यच नाही. शिवाय आम्ही रोज जो 'चिंटू' प्रसिद्ध करतो तो आमचा त्या दिवशीचा सगळ्यात आवडता असतो. तो 'चिंटू' जर आम्हांलाच आवडलेला नसेल, आम्हीच त्यातून आनंद घेउ शकत नसू तर तो आनंद आम्ही  इतरांनाही देऊ शकणार नाही. एकदा का आम्ही बनवलेलं चित्र वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं की, आम्ही त्यात फार अडकून पडत नाही. नाहीतर मग येणार्‍या पुढच्या चित्रावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आत्तापर्यंतचे सगळे 'चिंटू' हे आमचे आवडतेच आहेत.

पु.ल. देशपांड्यांचं निधन झालं त्याच्या दुसर्‍या दिवशी जो 'चिंटू' वृत्तपत्रात दिसला, तो सगळ्यांनाच खूप हेलावून गेला होता. त्या चित्राच्या मागची तुमची विचारप्रक्रिया काय होती ? तसंच त्यावेळचा तुमचा एकंदर अनुभव कसा होता?

पु.ल. हे महाराष्ट्रातल्या लहान थोरांचं दैवत होतं. आमच्यासारखे जे 'विनोद' ह्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी तर ते आदराचं स्थान होते. त्यांना 'चिंटू'च्या माध्यमातून आदरांजली वाहणं हे आम्हांला आवश्यक वाटलं. शिवाय अशा भावना एखाद्या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करणं हे खूप मोठं आव्हान होतं, कारण व्यंगचित्रांमधून व्यक्त होणार्‍या ह्या भावनांचा कधीही विपर्यास होऊ शकतो / केला जाऊ शकतो.

कधीकधी आपल्याला झालेलं दु:ख हे शब्दांमधूनच व्यक्त करावं लागतं असं नाही. मुकपणे, निशःब्दपणेही ते समोरच्याला समजते. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 'चिंटू'मध्ये चिंटू पाठमोरा होता, तसेच नि:शब्द होता. पण तरीही त्याच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील, मनात काय विचार चालू असतील हे वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचलं. वाचकांच्या प्रतिक्रिया चिकार आल्या. अगदी सकाळपासून सुरु झालेला फोन दिवसभर वाजत होता. एका वाचकाने कळवलं होतं की 'सकाळ'मध्ये पु.लं. देशपांड्यांच्या निधनाची बातमी वाचून वाईट वाटलं पण चिंटूला असं नि:शब्द झालेलं बघून डोळ्यात पाणी आलं.
हा प्रसंग दु:खी होता पण आमच्या कलेच्या माध्यमातून योग्य ती आदरांजली वाहिल्याचं समाधान आम्हांला मिळालं.



'चिंटू' आवडतो असं सांगणार्‍या अनेक प्रतिक्रिया येतच असतील पण कधी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत का?

'चिंटू' चा वाचकवर्ग हा बराच मोठा आहे. त्यात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतले वाचक येतात. कधीकधी एखादा 'चिंटू' हा लहान मुलांसाठी बनवलेला असतो तर कधी मोठ्यांसाठी. मोठ्या वयाचा वाचकवर्गाला एकदम आवडून जातो असा विनोद कधीकधी लहान मुलांना कळतच नाही. किंवा अगदी लहान वयाच्या मुलांना खूप आवडेल असा विनोद मोठ्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे कधीकधी नकरात्मक प्रतिक्रिया उमटू शकते, पण ती तेवढ्यापुरतीच असते. आणि आम्ही आधी जसं म्हटलं की, चांगल्या प्रतिक्रियांमधे जास्त वेळ अडकून पडता येत नाही कारण त्यामुळे येणार्‍या पुढील चित्रांवर परिणाम होतो. तसच अशा नकारात्मक प्रतिक्रियांमध्येही फार काळ अडकून न पडता आम्ही पुढच्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. कधीकधी असही होतं की, तुम्ही नेहमीच सगळ्यांनाच हवं ते देऊ शकत नाही. त्यामुळे ते मागे ठेवून पुढे जायलाच हवं आणि पुढचं काम अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल, हे पहायला हवं.

तुम्ही दोघेही मुळचे पुण्यातले. मग तुमचा चिंटूही पुण्यातला पुणेकरच का?

तुला तसं वाटतं का ? 
आम्हांला बरेच जण विचारतात की चिंटू कोणत्या गावचा? त्याचं आडनाव काय?
मुळात चिंटूच्या वयाचे असताना आपल्याला आडनावाची खरच 'गरज' असते का? ते सगळं नंतर कधीतरी आपल्याला येऊन चिकटतं. लहान मुलांमधली मैत्री ही निरागस असते. लहान मुलं आडनाव, जातपात, धर्म, प्रांत हे काहीही लक्षात न घेता एकमेकांमध्ये मिसळून जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम होत नाही. आणि त्यामुळेच चिंटूला आडनाव नाही. तसच तो कोणत्याही विशिष्ट शहरातला नाही, विशिष्ट धर्माचा नाही. तुम्ही कुठल्याही शहरात जा, कुठल्याही घरात जा, प्रत्येक लहान मुलाचे आईवडील त्याला चांगलं वळण लावायचा प्रयत्न करतात, अभ्यास कर, म्हणून रागवतात, सगळ्या भाज्या खा म्हणून आग्रह करतात, लाड, कौतुकही करतात. तसच प्रत्येक लहान मूल दंगा करतं, मित्र मैत्रिणींबरोबर मस्ती, भांडण करतं, आईवडिलांकडे हट्ट करतं, आज्जी आजोबांकडून हक्काने लाड करून घेतं. त्यामुळे चिंटूला आडनाव, जातपात, धर्म, शहर हे असण्याची गरजच नाही. आणि म्हणून सगळ्यांनाच तो आपला वाटतो. 'चिंटू'मध्ये फक्त एकच 'जोशीकाकू' आडनाव असलेलं पात्र आहे. पण तिथेही दुसरं काहीही आडनाव असतं तरी त्याने काहीच फरक पडला नसता. कारण 'जोशीकाकू' ही एक विशिष्ट व्यक्ती नसून एक सगळीकडे आढळणारे 'शेजार' आहे. प्रसंगी त्या मुलांना रागवतात, वेळ आली की लाड करतात, खाऊ देतात. अशाप्रकारचे शेजारी आपल्यापैकी अनेकांना असतील. हल्ली 'चिंटू' कर्नाटकातल्या एका वृत्तपत्रातही प्रसिध्द होतो. तिथेही हीच सगळी पात्र आहेत. शिवाय हिंदी, इंग्रजी, गुजराथी ह्या भाषांमधेही 'चिंटू' तयार होतो. त्या त्या भाषेचा बाज संभाळावा लागतो पण शेवटी 'चिंटू' सगळीकडे सारखाच आहे.



मध्यंतरी 'चिंटू' दृक्-श्राव्य माध्यामातही आला होता. त्याबद्दलचे पुढचे प्लॅन काय? त्यावेळची प्रतिक्रिया काय होती?

एखादं व्यंगचित्र जेव्हा दृक्-श्राव्य माध्यमात लोकांसमोर पहिल्यांदा येतं तेव्हा सुरुवातीला लोकांना त्याचा आवाज 'ऐकायची' सवय नसते. कारण स्वत: वाचताना मनात आपण एकप्रकारचा आवाज त्यांना दिलेला असतो. त्यामुळे असा आवाज सवयीने पचनी पडतो. आम्ही दृक्-श्राव्य माध्यमातून आणलेला 'चिंटू' हा एक प्रयोग होता आणि आता त्यावर काम चालू आहे. अनेक पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. मग ह्यात कार्टून फिल्म, व्हिडीयो गेम, मोबाईल फोनवर दिसू शकतील असे व्हिडीयो ते चित्रपट अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्याबद्दल आधिक माहिती आत्ता ह्या घडीला देता येणार नाही पण लवकरच काहीतरी ठरेल आणि 'चिंटू' वाचकांसाठी नवीन अनुभव घेऊन येईल.

परदेशी व्यंगचित्र ही वृत्तपत्रांशिवाय चित्र, मग, स्टिकर, टीशर्ट, टोप्या अशा विविध माध्यमांमधूनही आपल्याला दिसत असतात. 'चिंटू'बद्दल तशा काही योजना आहेत का?

नक्कीच. सध्या 'चिंटू'ला दृक्-श्राव्य माध्यमातून पुढे आणणे, ह्यावर आमचं मुख्य काम चालू आहे. सध्याच्या काळात त्यासाठी टिव्ही, इंटरनेट, मोबाईल अशी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. पण हे आम्ही मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता देशपातळीवर हे करण्याचा विचार सुरु आहे. 'चिंटू'ची पुस्तकं पण प्रसिद्ध होतातच. आत्तापर्यंत ३३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि अजून तीन नवीन लवकरच येणार आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात 'चिंटू'ची स्टिकर्स यायची. पण त्यावेळी आपल्या इथली बाजारपेठ अशा गोष्टींसाठी तयार झालेली नव्हती. आताच्या परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी बाजारपेठ ही अनुकूल आहे आणि 'चिंटू'च्या ब्रँडनेही चांगलाच जम बसवलाय. त्यामुळे योजना भरपूर आहेत आणि लवकरच त्याबद्दल वाचकांना कळेल.

'चिंटू'विषयी आलेल्या आणि तुमच्या विशेष लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया आणि अनुभव कोणते?

येणार्‍या प्रतिक्रियांमधे अडकून न राहता पुढे जायचं असं म्हटलं तरी काही काही अनुभव/ प्रतिक्रिया लक्षात रहातातच. 'चिंटू'ची सुरुवात झाली तेव्हाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातल्या कर्माळा गावातून एका आजोबांचं पत्र आलं होतं, "मला नातवंडांची खूप आवड होती आणि आता मला माझा नातू मिळाला".
मागे एकदा आम्ही मुलींच्या अंधशाळेत गेलो होतो. तिथल्या शिक्षिकांनी सांगितलं की, सगळ्या मुलींना रोज सकाळी सगळ्यात आधी 'चिंटू' वाचून दाखवावा लागतो. नंतर त्या मुलींनी 'चिंटू'मधले काही काही प्रसंग अभिनित करून दाखवले. दृष्टीहीन अशा त्या मुलींपर्यंत देखील आमचा चिंटू पोहोचलेला पाहून आम्हांला खूपच समाधान वाटलं. ह्याशिवाय बर्‍याच लहान मुलांचे पालक सांगतात की, आमची मुलं अजिबात मराठी वाचायची नाहीत, 'चिंटू'च्या निमित्ताने ती वाचायला लागली. अशा प्रतिक्रीया मिळाल्या की पुढचे काम करायचा उत्साह खूपच वाढतो.

'चिंटू' शिवाय तुम्ही वुडकार्व्हिंगचं ही काम करता असं रोहितकडून समजलं. त्याबद्दल आम्हांला अधिक जाणून घ्यायला आवडेल.

चारुहास : अगदी सुरुवातीला शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही नोकरी करत होतो. त्यात पैसे कमी मिळतात म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आम्ही अ‍ॅड एजंसी चालवत असू. नंतर 'चिंटू'चं काम चालू झालं.
अ‍ॅड एजंसीमध्ये पैसे चांगले मिळत असले तरी कलाकार म्हणून जे एक मानसिक समाधान मिळालयला हवं ते मिळत नाही, कारण तिथे दुसर्‍याच्या मताप्रमाणे काम करावं लागतं. हा विचार प्रबळ होत गेला आणि कलेची भूक भागवण्यासाठी वुडकार्व्हिंग सुरु केलं. नोकरी मागेच सोडली होती, पुढे अ‍ॅड एजंसी पण बंद केली आणि आता पूर्णवेळ 'चिंटू' आणि वुडकार्व्हिंग असं काम सुरु आहे. वुडकार्व्हिंगचं हे काम संपूर्ण भारतात आमच्याखेरीज इतर कोणीही करत नाही.
लाकूड वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतं. लाकडाचे हे नैसर्गिक रंग जतन करून त्यावर आम्ही लेझरच्या साहाय्याने कोरीव काम करतो. ह्यातून तयार होणारी कलाकृती ही अस्सल भारतीय दिसते आणि शिवाय अतिशय नवीन अशी ही कल्पना आहे. हे कामही आम्ही सुरु केल्यानंतर हळूहळू फुलत गेलं. वेगवेगळ्या आयटी कंपन्या त्यांच्या परदेशी ग्राहकांना भेट म्हणून देण्यासाठी आमच्याकडून हे कोरीवकाम केलेले शोपिस घेतात. हे सगळं काम सृजन आर्ट च्या रुपात चालवलं जातं आणि ह्यात माझी पत्नी भाग्यश्री हीचादेखील सहभाग आहे.

व्यंगचित्र काढण्याची कला ही दिसायला सोपी वाटते पण प्रत्यक्षात खूपच अवघड आहे.  व्यंगचित्रकारीता ह्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायच्या दृष्टीने कोणत्या गोष्टीं महत्त्वाच्या आहेत?

भारतात कुठेही व्यंगचित्रकारीतेचं शिक्षण उपलब्ध नसल्याने ही कला आपली आपणच शिकावी लागते. तसच व्यंगचित्र हे माध्यम अतिशय संवेदनशील आहे. ते नीट हाताळलं नाही तर कोणीही दुखावलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे खुल्या नजरेने, मोकळेपणाने बघणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळेच लहानसहान गोष्टींमधून आपल्याला आनंद घेता येतो तसच तो दुसर्‍याला देता येतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या घडामोडींबद्दल सतर्क रहावं लागतं, भरपूर वाचन करावं लागतं, विनोदबुद्धीला संवेदनशीलतेची जोडही असावी लागते. व्यंगचित्रांमघले संवाद लिहिण्यासाठी भाषेवर, लिखाणावर प्रभुत्त्व असावं लागतं. कमीत कमी शब्दांत योग्य तो संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणं ह्यामुळे शक्य होतं. तांत्रिक बाबी बघता रेखाटनांवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. ह्या विषयाचा आवाका खूपच मोठा आहे आणि शिक्षणापेक्षा अनुभवातूनच जास्त हे शिकता येते.

रोजच्या वृत्तपत्राचा अविभाज्य भाग बनून गेलेल्या आणि आपल्याला रोजच्या दैनंदिन कार्यातून दोन हलके फुलके क्षण देऊन जाणार्‍या ह्या छोट्याश्या 'चिंटू' मागे एव्हडी मेहेनत, विचारप्रक्रिया आहे हे चारूहास आणि प्रभाकर ह्यांच्याशी झालेल्या ह्या गप्पांमधून समजलं आणि 'चिंटू' अधिकच आवडू लागला. मायबोलीकरांसाठी वेळ दिल्याबद्दल मी चारूहास आणि प्रभाकर ह्यांचे आभार मानून आणि 'चिंटू'च्या आगामी सर्व योजनांना शुभेच्छा देऊन ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले
इतर साहाय्य: रोहित पंडित, पूनम छत्रे
----
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित
http://www.maayboli.com/node/10453