स.न. वि. वि.

मायबोलीवरच्या मराठी भाषा गौरवदिनानिमित्त लिहिलेला हा छोटासा लेख

---------------------------------------------------------------------------------

प्रिय बाबा,

पुढच्या महिन्यात तुम्हांला जाऊन एक वर्ष होईल. ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपली भेट रोज रात्री माझ्या स्वप्नात होतेच आहे. गेली दहा वर्ष अगदी दररोज आज्जी स्वप्नात येते. आता तुम्हीही येता. ही सगळी स्वप्नं घडतात कुठे तर आपल्या डोंबिवलीच्या घरात. डोंबिवली सोडून आता २५ वर्ष झाली आणि त्यानंतर मी भारत, अमेरिका आणि कॅनडा मिळून १० पेक्षा जास्त घरांमध्ये राहिलो तरीही घर म्हणजे डोंबिवलीचं! अशी एक जाणीव मेंदूत खोलवर रुजलेली आहे. पण हे सगळं असो. ह्या पत्राचा उद्देश उगीच इमोशनल मारून अश्रुपात वगैरे घडवणे हा नाहीच्चे.

आज सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली आणि आपलं "फॅमिली रियुनियन" आटोपलं. नेहमीप्रमाणे मी ऑफिसचे इमेल बॉक्स , स्लॅक, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, मायबोली, पेपरातल्या बातम्या ह्या सगळ्यावर नजर टाकली. तेव्हा लक्षात आलं की माझ्या अनेक फॅडांपैकी एक असलेल्या मायबोलीवर मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याचा आज शेवटचा दिवस आहे. विचार केला की तुम्ही आयुष्यभर आमच्या मराठी शब्दसंपदेत जी भर घातलीत त्याबद्दलच थोडसं ह्या मराठी भाषा दिनानिमित्त लिहावं. मला खात्री आहे की हे असं काही घडलं ह्याची तुम्हांला अजिबात कल्पना नसेल त्यामुळे तुम्हांलाच हे पत्राद्वारे कळवावं.

तर हल्लीचीच गोष्ट. रियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेतल्या विविध देशीय आणि भाषीय मित्र-मैत्रिणींना घेऊन इथल्या एका पार्टी प्लेसला गेलो होतो. तिथे ही पोरं गेम वगैरे खेळली, नंतर खाणं पिणं झालं. त्यांच्यातल्या एकीने टूम काढली की आता रियाच्या घरी जाऊ आणि उरलेलं खेळू. सगळ्यांचे आई बाबा म्हणाले की रियाच्या आई बाबांना विचारा. मी आपलं सेफ खेळून "आईलाच विचार" असं सांगितलं. तर शिल्पा चक्क नको म्हणाली (माझा वाण नाही पण गूण लागला म्हणायचा). नंतर तिला विचारलं काय झालं ? तर म्हणे ह्या पार्टीची दोन-तीन दिवस तयारी करण्यात मी दमले त्यामुळे आता मला झोपायचं आहे. हे सगळं "हडवाळ" आत्ता घरी आलं तर पुन्हा तीन-चार तासांची निश्चिंती. हडवाळ हा शब्द बर्‍याच दिवसांनी ऐकून मी खूप हसलो. तर ती म्हणे अरे बाबा म्हणायचे ना नेहमी! हडवाळ हा अगदी तुमचा खास शब्द. आपल्या घरी "यू नो हू" सारखच हडवाळ गोळाअ करत असल्याने तुम्हांला तो सारखाच वापरावा लागत असे. पलटण, गँग, गर्दी वगैरे शब्दांमध्ये "हडवाळ" सारखे खास भाव नाहीत हे मात्र अगदी नक्की.

नंतर एकदा रियाच्या बाकीच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. बराच दंगा करून झाला. ज्योईशीपण खेळून झालं. मग त्या म्हणे आम्ही बाहेर जाऊन खेळतो. म्हंटलं बरं जा आणि जाताना त्या "शेणफड्या" ला पण घेऊन जा. खानदेशात दगडू, धोंडू वगैरे सारखं "शेणफडू" असं पण नाव ठेवतात म्हणे पण तुम्ही ते "येड्या" ह्या अर्थाने किंवा टोनमध्ये वापरायचात आणि अगदी रियाला पण हे "शेणफड्या" किंवा "शेणफडी" अगदी पक्कं लक्षात राहिलं आहे!

म्हणी आणि वाक्प्रचार ह्या तर किती सांगाव्या! ह्या म्हणी नेहमी वापरल्या जाण्यामागे अर्थात खानदेशी भाषा आणि घराण्यात वापरली जाणारी भाषा ह्यांचा मोठा हात आहे. स्वतः एका जागी बसून दुसर्‍यांना सतत ऑर्डरी सोडत रहाणे ह्याला "बसल्या जागी ऑर्डर सोडू नको" असं काहीतरी साध्या भाषेत म्हणता आलं असतं पण तुमचा आवडता वाक्प्रचार म्हणजे "हXल्या गुवावरून ऑर्डरी सोडणे". आता ऑर्डरी सोडायला हXला गू कशाला हवा हे म्हणकर्त्याला आणि तुम्हांलाच माहित पण हे ऐकून आम्ही अगदी दरवेळी आम्ही तितक्याच उत्साहाने हसायचो हे मात्र खरं.
शिवाय "बैल गेल्यावर झोपा करून काय उपयोग" ह्याला "पी गेल्यावर जी आवळून काय उपयोग?" हा तुमचा एकदम चपखल वाक्प्रचार आहे. आता पी आणि जी म्हणजे काय हे इथे उलगडून सांगायला नकोच. "जी" हा तर तुमच्या म्हणी, वाक्प्रचारांमधला अगदी आवडता अवयव! जी.पी.एल, जी वर ऊन येईपर्यंत झोपणे, जी ला पाय लाऊन पळणे वगैरे वगैरे बर्‍याच प्रकारे तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करत आला आहात.
"जी" वरून अति कंजूस लोकांसाठी खास वापरलेली म्हण म्हणजे "जी धुवून कढी आणि उरलेल्याचे वडे!". तुम्हांला आठवत असेल तर आधी शिल्पाला ही म्हण कळलीच नव्हती. नंतर संदर्भासह स्पष्टीकरण दिल्यावर ती कितीतरी दिवस कढी आणि वडे दोन्ही खातच नव्हती!

"बुडाखाली आग लावणे" हा ही तुमचा अगदी रोजच्या वापरातला वाक्प्रचार मग तो जेवायला बसायच्या आधी भाजी, आमटी गरम करण्यासाठी पातेल्याखालचा गॅस पेटवण्यासाठी असो, निवडणूका आल्यावर सत्ताधारी पक्ष कामाला लागल्यावर असो की परिक्षा जवळ आल्यावर आम्ही एकदम अभ्यासाला लागल्यावर असो. सगळ्यांच्या बुडाखाली लागणार्‍या आगीची धग अगदी सारखीच!

तर सांगायचा मुद्दा काय की जनुकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेले तुमचे गुण (आणि अवगुण) आपोआप पुढे जातीलच पण हे "भाषासौंदर्य" मात्र आम्ही अगदी जाणीवपूर्वक जतन करू. कारण आम्हांला ही शब्दसंपत्ती "रिलेट" होतेच पण आमची पुढची पिढी हे शब्द / वाक्य ऐकताना खदखदून हसते.

बाकी सर्व क्षेमकुशल. इतर विषय पुन्हा केव्हातरी.

आपला,
बोली भाषाप्रेमी.

कंफर्ट फूड

सध्या वर्क फ्रॉम होमच्या काळात नवीन नवीन खाद्यपदार्थ घरी करून बघणं सुरू आहे कारण बाहेर जाऊन  खाणं किंवा बाहेर जाणं तितकं शक्य नाहीये. कधी चवी, अंदाज बरोबर येतात कधी चुकतात. तसच एकदा अंदाज चुकून काही बाही उरलं होतं आणि त्यामुळे सकाळच्या जेवणाला असच बरच उरलं सुरलं खाल्लं गेलं. संध्याकाळी फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि गरम गरम वरण भात, त्यावर लिंबू आणि तुप असं कालवून पहिला घास खाल्ल्यावर एकदम "अहाहा!" झालं. रियाला म्हंटलं "वरण भात म्हणजे माझं अगदी कंफर्ट फूड आहे!" तिने विचारलं "कंफर्ट फूड म्हणजे काय?" तिला म्हटलं असं फूड जे खाल्ल्यावर अतिशय समाधान मिळतं किंवा मराठीत सांगायचं तर 'कंटेट फिलींग' येतं. 


नंतर विचार करत  होतो की खरच माझ्यासाठी अश्या 'कंफर्ट फूड' प्रकारात काय काय येतं?
वर लिहिलं तसं गरम वरण भात तर नक्कीच. पण एकंदरीतच 'भात'. मागे आम्ही यल्लोस्टोन नॅशनल पार्कला गेलो होतो त्यावेळी आम्हाला पार्कच्या आत हॉटेल बुकींग मिळालं होतं. ते प्रवासाच्या दृष्टीने फायद्याचं होतं. पाच दिवस पार्कात मनसोक्त भटकंती झाली, निसर्गाचे भरपूर अविष्कार पाहून झाले. पार्कच्या आतल्या हॉटेलांमध्ये खाण्याची सोय चांगली होती. इटालियन, अमेरिकन, तसेच ब्रेकफास्टचे पदार्थ चांगले मिळायचे. पण सहाव्या दिवशी जेव्हा आम्ही सॉल्ट लेक सिटी एअरपोर्टवर विमानात बसण्याअधी जेवणाचा विचार करत होतो, तेव्हा दोघांनाही एकदम भात खायची इच्छा झाली. तिथे एअरपोर्टवर तर वरण भात मिळणं शक्य नव्हतं. मग एक चायनीज रेस्टॉरंट शोधून मस्त एग राईस खाल्ला!  गेल्यावर्षी पॅरिसमध्ये फिरत असताना खादाडीही मनसोक्त केली. फ्रेंच खाणं तसच तिथल्या बेकर्‍या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बरेच वेगवेगळे पदार्थ चाखले. ट्रीपच्या शेवटी एका संध्याकाळी मोनमार्ट एरियातल्या बेसिलीकाला गेलो. अंधार पडल्यावर आणि डोंगरमाथ्यावर थंडी वाजायला लागल्यावर पायवाटेने खाली आलो. पायथ्याशीच्या गल्ल्यांमध्ये मोठ्यासंख्येने विविध प्रकारची रेस्टॉरंट होती. सहज बघत असताना एक भारतीय रेस्टॉरंट दिसलं! रिया पटकन म्हणाली, चला तिकडे जाऊया. साधारण परदेशातली भारतीय रेस्टॉरंट म्हणजे पंजाबी असतात पण हे बंगाली / बांग्लादेशी निघालं. काहीतरी फॅन्सी नाव असलेली एक डाळ मागवली. पंचफोडण घातलेली तुपाची फोडणी दिलेली हरभर्‍याची डाळ आणि त्याबरोबर तुप जिर्‍यात हलकेच परतलेला जरासा फडफडीत भात. आम्ही खरतर ट्रीपला गेल्यावर भारतीय रेस्टॉरंटांमध्ये जाणं टाळतो पण हे कॉम्बिनेशन इतकं चविष्ट तरीही सात्त्विक लागलं की पूर्ण ट्रीपभर खालेल्ल्या मैदा, साखर, बटर, चॉकॉलेट, चिकन, मासे आणि विविध जलचरयुक्त पदार्थांचं एकदम उद्यापन झाल्यासारखं वाटलं.
अमेरिकेत आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकंती करत असतो. ट्रीपला गेल्यावर सकाळी भरपेट नाश्ता करून निघायचं, दुपारचं जेवण अगदी साग्रसंगीत न करता काहीतरी सटरफटर खायचं आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं असा आमचा साधारण दीनक्रम असतो. संध्याकाळ झाली की हे बघून मग जेऊ, ते बघून जेऊ करता करता सगळ्यांना एकदम भुकेचा अ‍ॅटॅक येतो आणि मग डोकी फिरून भांडाभांडी व्हायला लागते. अश्यावेळी मदतीला धाऊन येतं ते म्हणजे 'चिपोटले'! चिपोटले ह्या मेक्सिकन चेनमध्ये मिळणारा 'बरिटो बोल' म्हणजे मोकळा पण मऊ शिजवलेला लेमन सिलँट्रो राईस, त्यावर परतलेल्या भाज्या, शिजवलेला राजमा, सालसा, तिखट सॉस, अगदी अर्धा चमचा सावर क्रीम आणि लेट्युसची बारीक चिरलेली पानं. अगदी पटकन मिळणारं, चविष्ट आणि स्वस्त असं हे खाणं अगदी 'कंफर्ट फूड' आहे कारण अर्थातच त्यातला भात!
पुलाव, मसालेभात, बिर्याणी बरोबरच लोकांकडून ऐकून, कधी नेटवर बघून आम्ही भाताचे बरेच प्रकार म्हणजे बिसीवेळे अन्ना, लेमन राईस, पुदीना राईस, कुकरमध्ये शिजवलेला नारळीभात, टँमरींड राईस, पावभाजी मसाला घातलेला तवा पुलाव, पनीर राईस वगैरे बरेच प्रकार घरी करत असतो. सगळ्यात जास्त म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडीही तर अगदी दर आठवड्याला होते. गोड पदार्थ जसे बिघडले तरी संपायचा कधीही प्रश्न येत नाही तसेच मुळात भात सगळ्यांना आवडत असल्याने भातही खूप उरला, कोणी खातच नाही वगैरे प्रश्नच येत नाही!

कंफर्ट फूड मध्ये मोडणारा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे भाताचच मावस भावडं असलेले पोहे!  आमच्या घरी अनेक वर्षांपासूनची पद्धत म्हणजे रविवारी सकाळी नाश्याला पोहे! गोळा न झालेले, तसच कोरडे न पडलेले, नीट शिजलेले पण फडफडीत न झालेले, दाणे नसलेले, लिंबू पिळलेले आणि वरून खोबरं कोथिंबीर घातलेले पोहे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख. मला पोह्यांंमध्ये दाणे खरतर आवडत नाहीत कारण ते मधेमधे येतात. पण सासर सोलापुरी असल्याने आमच्या पोह्यांमध्ये हल्ली दाणे आले आणि खोबरं गेलं!  पोह्यांच्यावर काही घालायचं असेल तर मला फक्त बारीक (नायलॉन) शेव आवडते, फरसाण किंवा स्वतःची वेगळी चव असलेल्या इतर शेवा वगैरे नाही आवडत. फोडणीचे पोहे हे एकतर घरचे खावे किंवा ट्रेकला जाताना गडाच्या पायथ्यापशी असलेल्या गावांमधले.  शहरांमधले पोहे मला तरी खाववत नाहीत. फोडणीच्या पोह्यांच्या दोन अगदी लक्षात राहीलेल्या चवींपैकी एक म्हणजे दिवेआगरला बापटांच्या घरी नाश्त्याला मिळालेलेल पोहे. कुठल्याही प्रकारची फॅन्सी रेसिपी नसलेले अगदी घरगुती आणि वर घरामागच्या झाडाच्या नारळाचं पांढरं शुभ्र खोबरं! केवळ अफाट चव. आणि दुसरे म्हणजे अटलांटाला 'स्नो-डे'च्या दिवशी आमचे मित्र विनायक आणि पूर्वा ह्यांच्या घरी खालेल्ले खमंग कांदे पोहे. खरतर स्नो फॉलमुळे रस्ते बंद व्हायच्या आधी घरी पोहोचायचं होतं पण पूर्वा म्हणाली पटकन पोहे करते ते खाऊन जा. थांबलो ते बर झालं! ह्या दोन्ही पोह्यांची चव आजही लक्षात आहे. 

मागे माझ्या ऑफिसमध्ये अचानक मध्यप्रदेशी लोकांची संख्या वाढली होती. त्यांच्याकदून इंदुरी वाफवलेल्या पोह्यांबद्दल ऐकलं ते दिसतात फोडणीच्या पोह्यांसारखेच पण फोडणी नसते आणि अगदी कमी तेल लागतं. आम्ही नेटवर रेसिपी बघून ते करून बघितले. हल्ली कधीकधी ते पण करतो. चव वेगळी लागते आणि फोडणीच्या पोह्यांइतके खमंग नसल्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवा त्यावर घालून खाण्याची पद्धत असावी.  पोह्यांचा अजून एक प्रकार म्हणजे दडपे पोहे. आम्ही इथे दडपे पोहे फार केले नाहीत पण हल्ली हल्ली करायला लागलो आहोत.
पोह्यांच्या अजून एक इंटरेस्टींग प्रकार म्हणजे कोळाचे पोहे. हे आम्ही पहिल्यांदा खाल्ले ते दादाचं लग्न झाल्यावर वहिनीच्या माहेरी. दिवाळीला फराळाबरोबर अजून एक काहितरी 'मेन डिश' पाहिजे म्हणून चिंचेचा कोळ आणि नारळाचं दुध घालून केलेल हे पोहे एकदम मस्त लागले. फराळाच्या तळलेल्या पदार्थांबरोबर हा एकदम हलकी आंबट गोडसर चव असलेला पदार्थ छान वाटतो. आता आमच्या घरीही नरकचतुर्दशीला फराळाबरोबर हे पोहे करतात. मराठी लोकांमध्ये 'कांदेपोहे' सुप्रसिध्द आहेतच पण गंमत म्हणजे इतक्या 'बघाबघ्या' करूनही मला एकदाही कांदेपोहे मिळाले नाहीत. फारच घिसपिटं नको म्हणून हल्ली लोकांनी मेन्यू बदलला असावा. पोहे आवडत असले तरी मला भाजक्या पोह्यांचा चिवडा मात्र फारसा आवडत नाही!  एकंदरीतच चिवडा (लक्ष्मीनारायणचा आणि चितळ्यांचा बटाट्याचा चिवडा वगळता) आवडत नाही. 

कंफर्ट फूड प्रकारात मोडणारा तिसरा प्रकार म्हणजे चहा! चहाबद्दल इतकं बोललं आणि लिहिलं जातं की चहाचं वर्णन करण्याकरता अजून नवीन लिहिण्यासारखं काही नाही. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही हवामानात, कुठल्याही ऋतुत आणि कशाही बरोबर (किंवा शिवाय) चहा चालतो.  सगळ्यात आवडणारा चहाचा प्रकार अर्थातच आपला भारतीय पध्दतीने उकळून, त्यात साखर, दुध घालून केलेला चहा. डिपडिप, ग्रीन टी, लेमन टी वगैरे हा खरा चहा नाहीच! चहाच काही घालायचच असेल तर आलं किंवा फारतर गवती चहा. वेलची-बिलची घालून केलेला चहा घशाखाली जात नाही. गेल्या वर्षाभरापासून आम्ही बिनसाखरेचा चहा पितो. सुरुवातीला चव आवडायला वेळ लागला पण आता तसाच बरा वाटतो. इथे अमेरिकेत बाहेर गेल्यावर आपल्या सारखा चहा मिळणं कठीण होतं पण ती तहान काही प्रमाणात स्टारबक्सच्या चाय-टी लाटेवर भागवता येते. 'फाईव्ह पंप्स, नो वॉटर, एक्स्ट्रा हॉट' अशी ऑर्डर दिली की जे काय मिळतं ते आपल्या शंकर विलास हिंदू हॉटेलच्या बरच जवळ जाणारं असतं! बिनसाखरेचा चहा प्यायला लागल्यापासून हा चायटी लॅटेही फार गोड लागायला लागला आहे. प्रवासादरम्यान खूप तंगडतोड झाली असेल तर मात्र तो चांगला वाटतो.  माझ्या दोन्ही आज्जा एकदम चहाबाज! मला लहानपणी दुध पचत नसल्याने मला आठवतं तेव्हा पासून मी सकाळी आणि दुपारी चहाच पित आलो आहे. दोन्ही आज्जा 'काही होत नाही.. पिऊ देत चहा' असं म्हणून त्याचं समर्थनच करायच्या. मला खात्री आहे की दोघींनी मला तान्हेपणी बाटली घालून चहा पाजला असणार. दुपारी विचित्र वेळेला शाळा, कॉलेज, क्लासला जायच्या आधी आज्जी न कंटाळता उठून मला चहा करून द्यायची.
मोडक आज्जीकडे तर त्यांच्या घरी जाऊन चहाला नको म्हणणारी व्यक्ती तिच्याकरता कायमची 'बॅड बुक' मध्ये जात असे. त्यामुळे आमचं लग्न ठरल्यावर शिल्पाला जेव्हा पहिल्यांदा आज्जीला भेटायला नेलं होतं तेव्हा बजावलं होतं की बाकी कशीही वाग / बोल / खा / खाऊ नकोस पण चहाला नाही म्हणू नको, नाहीतर काही खरं नाही! शिल्पाला चहा फारसा आवडत नसल्याने सध्या बरेचदा माझा मलाच चहा करून प्यावा लागतो. पण रिया थोडी मोठी झाली की मी तिला शिकवणार आहे. ती मी सांगेन तेव्हा चहा करून देईल ह्याची अजिबात खात्री नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? 

हे सगळे माझ्यासाठी कंफर्ट फूडचे प्रकार असले तरी आम्ही 'आऊट ऑफ कंफर्ट झोन' मधलेही प्रकार खूपदा खाऊन बघतो. त्या सगळ्या प्रकारांबद्दल नंतर कधीतरी...

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०२० हे सर्वाथाने अत्यंत विचित्र वर्ष होतं! पूर्वी कधीही न अनुभवलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षात घडल्या. महायुद्धाची झळ न पोहोचलेल्या आमच्या पिढीला युध्यसदृष्य परिस्थिती काय असू शकते ह्याची चुणूक ह्या निमित्ताने बघायला मिळाली. घरात अडकून पडावं लागणं,  प्रवासाचे बेत रद्द होणं, शाळा बंद होणं, रनिंग/सायकलींग इत्यादींचे कार्यक्रम रद्द होणं वगैरे त्रास झाला पण अनेकांना नोकरीवर गदा येणे, धंदा तात्पुरता बंद करावा लागणे, स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तींना करोनाची लागण होणे ह्या सारखे आयुष्य बदलून टाकणारे त्रास सोसावे लागले! अशी वेळ पुन्हा कधीही कोणावरही न येवो अशी प्रार्थनाच आपण फक्त करून शकतो. घरात अडकून पडल्यामुळे वाचन, टिव्ही, मालिका, खेळांचे सामने हे मात्र बरच बघून झालं.  गेल्या दोन वर्षांप्रमाणेच ह्या वर्षीही गेल्या वर्षी वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल.

डॉ. नारळीकरांनी लिहिलेलं व्हायरस नावाचं पुस्तक वाचलं. ते टीआयआरएफ मध्ये असताना संचालक पदाच्या निवडीवरून झालेल्या नाट्याबद्द्ल त्यांनी आत्मचरित्रात मोघम लिहिलं होतं. त्याबद्दल सविस्तर त्यांनी ह्या कादंबरीत कथेचा भाग म्हणून लिहिलं आहे असं एक मित्र म्हणाला होता. त्यामुळेही हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. १९९६ साली ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. भारतात तेव्हा इंटरनेट घरोघरी पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे नेटवर्क, इंटरनेट वगैरेंबद्दलची वर्णनं एकदम बेसिक स्वरूपातली आहेत. एकंदरीत कथा चांगली आहे फक्त मी वर म्हटलेला भाग त्या कथेत नसता तरी काही फरक पडला नसता असं वाटलं. 'व्हायरस' ही नुसती कथा म्हणूनही वाचायला आवडलं असतं.

बर्‍याच दिवसांपासून यादीत असलेलं 'स्मृतिचित्रे' वाचलं. इंग्रजीचा अजिबात प्रभाव नसलेली भाषा आणि साधी सरळ, "आहे हे असं आहे" (किंवा "होतं हे असं होतं") छाप वर्णनाची शैली ह्यामुळे आवडलं. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं एकदम वास्तव चित्रण आहे पण त्यात कुठलीही बाजू न घेतल्याने किंवा आवेश आणून न लिहिल्याने अजून चांगलं वाटतं. 'मांगिण', 'ब्राह्मणीण' असे जातिवाचक शब्द वापरणं तेव्हा एकदम कॉमन असावं. शिवाय स्पृश्यास्पृश्यता असूनही खेडेगावात सलोख्याचं वातावरण असे कारण त्या त्या नियमांमध्ये राहून लोकं अडीअडचणीला एकमेकांना मदत करत, आनंदाचे क्षण साजरे करत हे वाचून आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं की गावात अधिक कडक आणि कटटरता असेल. लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या विचारातं झालेल्या बदलांबद्दल सविस्तर लिहिलं आहे पण मुळात टिळकांनी ख्रिस्ती धर्म का स्विकारला ह्या मागची कारणं सविस्तर येत नाहीत (किंवा मला नीट कळली नसावी). बाकी टिळकांचं असं आवेगपूर्ण आणि धरसोड वागणं बघता त्यांनी संसार कसा केला असेल कोण जाणे. पुस्तक एकदम संपल्यासारखं वाटलं. कदाचित जेव्हडं लिहून तयार होतं तेव्हडं प्रकाशित केलं असं काहितरी असावं.

मिलिंद बोकील लिखित 'गवत्या' वाचलं. मिलिंद बोकीलांच्या पुस्तकांमधली निसर्गाची वर्णनं आणि गोष्ट सांगायची शैली हे नेहमीच आवडतं. गोष्टींमध्ये वर्णन केलेली परिस्थिती वास्तववादी असते पण अतिवास्तवावादी आणि त्यामुळे उगीच आव आणलेली नसते. शिवाय त्यांची भाषाशैली खूपच आवडते. ह्या ही पुस्तकात निसर्गाची अतिशय सुंदर वर्णनं आणि त्या अनुषंगाने नायकाच्या मनस्थितीची वर्णनं आहे. गावातली माणसं आणि दृष्य मस्त उभी केलेली आहेत. आनंदच्या पूर्वायुष्यातली प्रेमकहाणी अतिशय संयतपणे कुठेही ड्रामॅटीक न करता मांडली आहे. अधेमधे कथानायकाची लांबलचक स्वगतं येतात पण ती कंटाळवाणी होत आहेत की काय असं वाटायला लागेपर्यंत संपतात! पुस्तकाचा विषय बघता 'कोसला'ची आठवण झालीच पण पुस्तकातल्या एकंदरीत सकारात्मक सुरामुळे आणि मुख्य म्हणजे सकारात्मक शेवटामुळे कोसलापेक्षा मला हे पुस्तक जास्त आवडले. 

राम पटवर्धन ह्यांनी अनुवाद केलेलं 'पाडस' वाचलं. पुस्तकातली 'गोष्ट' खूप सुंदर आहे! ज्योडी, मा, पेनी, बक आणि पाडस सगळी पात्र मस्त रंगवली आहेत. फक्त मला अनुवाद करताना वापरलेली भाषा खूप कृत्रिम वाटली. मुळच्या इंग्रजी भाषेचं मराठीकरण न करता जसंच्या तसं अनुवादित केलेलं आहे. उदा. "अरे ज्योडी, त्या सदगृहस्थाला आत तरी येउ दे" हे अगदी Let the gentleman come in ह्याचं शब्दशः भाषांतर आहे. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ सुरुवातील न कळाल्याने दृष्य डोळ्यासमोर उभं रहायला अडचण वाटली. उदा. 'तक्तपोशी' हा शब्द मी बहुतेक याआधी ऐकलेला नव्हता. भाषांतर जुनं आहे म्हणायचं तर नुकत्याच वाचलेल्या त्यापूर्वीच्या 'स्मृतीचित्रे' मध्येही अशी भाषा नाहीये. हे मला पहिल्या अर्ध्या भागात जास्त जाणवलं नंतर बहुतेक सवय झाली. मायबोलीवरही 'पाडस' हा मराठीतला सर्वोत्कृष्ठ अनुवाद आहे अश्या कमेंट वाचल्या आहेत. मला तरी तसं वाटलं नाही किंवा मग माझ्या बुद्धीचा दोष. आधी म्हटलं तसं गोष्ट मस्त आहे. त्यामुळे पुस्तक आवडलं. मुळ इंग्रजी पुस्तक शोधून वाचेन.

यंदाच्या लॉकडाऊनचा फायदा म्हणजे बर्‍याच दिवसांपासून वाचायचं राहिलेलं  माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅप्टन 'स्टिव्ह वॉ'चं 'आऊट ऑफ माय कंफर्ट झोन' हे आत्मचरित्र हे पुस्तक वाचलं.  ह्या ७००+ पानी ठोकळ्यात एक सामान्य क्रिकेटपटू ते ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन अशा प्रवासाचं वर्णन वाचायला खूप मस्त वाटतं. पाहिलेल्या बर्‍याच मॅचेस, स्पर्धा, दौरे ह्यांची वर्णन वाचायला आवडलच पण त्याच बरोबर ऑस्ट्रेलियन संघाच्या जडणघडणीचं पण सविडणीचं पण सविस्तर वर्णन येतं. फक्त स्टीव्ह वॉ स्वतःला तसेच बाकी ऑस्ट्रेलियन खेळाडू, अंपायर्स, इतर पदाधिकारी ह्यांना फारच "साधं" / "सभ्य" दाखवतो आणि तसे ते अजिबात नव्हते. दौर्‍यावर येणार्‍या प्रत्येक संघांबरोबर काही ना काही विवादास्पद घटना घडल्या होत्या आणि त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची वागणूक अजिबात धुतल्या तांदळाजोगी नव्हती. ह्या पुस्तकातला सगळ्यात मजेदार भाग कुठला असेल तर तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाच्या २००१ च्या भारत दौर्‍यादरम्यानच्या कलकत्ता कसोटीतला ऑस्ट्रेलियाचा पराभव! पराभूत कॅप्टन कडून त्या सामन्याचं तसेच एकंदरीत ह्या दौर्‍यादरम्यान सौरव गांगुली ह्या भारतीय कर्णधाराच्या खडूसपणाचं वर्णन ऐकताना मनात अगदी आनंदाची कारंजी वगैरे उडाली. ह्या पुस्तकाती प्रस्तावना दस्तुरखुद्द राहूल द्रविडने लिहिलेली आहे. आता 'फॅब-४' भारतीय खेळाडूंपैकी फक्त त्याचच आत्मचरीत्र यायचं बाकी आहे आणि ते वाचायची खूप उत्सुकता आहे !  

२०२० मध्ये याआधी न वाचलेल्या इंग्रजी लेखकाचं किमान एक पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. वर्षाच्या सुरूवातीला जॉन ग्रिशमचं एक आणि वूडहाऊसची दोन अशी पुस्तकं आणली होती. तिनही पुस्तकांनी पकड घेतली नाही आणि मग ते राहूनच गेलं. मध्यंतरी  मायबोलीवर अगाथा ख्रिस्ती फॅन क्लब ही चर्चा दिसली. तो वाचून आणि मग लायब्ररीतून अगाथा ख्रिस्तीचं 'अ मर्डर इज अनाऊन्स्ड' हे पुस्तक मिळेपर्यंत वर्षाचा शेवटचा आठवडा उजाडला. अखेर हे पुस्तक परवा वाचायला घेतलं आणि काल वाचून संपलं. नावावरून समजतय त्याप्रमाणे 'मर्डर मिस्ट्री' आहे. टिपीकल ब्रिटिश व्यक्तिरेखा, सेट-अप आणि भाषा वाचायला छान वाटतं.  लोकांनी लिहिलं तसं पहिली पंचवीस तीस पानं प्रचंड बोअर झाली पण नंतर इतकी भारी पकड आली की बसं. हे पुस्तक आवडलच आता तिची बाकीची प्रसिद्ध पुस्तकंही वाचेन.

खालिद हुसैनीचं "And the mountains echoed" वाचलं. बर्‍याच दिवसांपासून वाचायचं होतं. ह्याच लेखकाच्या पहिल्या दोन पुस्तकांइतकं नाही आवडलं. सुमारे ६० वर्ष इतक्या मोठ्या कालावधीत घडणारी कथा अफगाणीस्तान, पॅरीस, सॅन फ्रँसिस्को आणि ग्रीस अश्या विविधं ठिकाणी घडते. दुसर्‍या महायुद्धापासून ते तालिबानोत्तर कालावधी एव्हड्या सगळ्या राजकीय कालखंडाचे संदर्भ येत रहातात. मुख्य कथानक चांगलं आहे पण अधेमधे नवीन नवीन पात्र येतात आणि त्यांची उपकथानकं सुरू होतात. त्यांचा मुख्य कथेही संबंध काय हे कळायला बरीच पानं खर्ची पडतात. काही धागे चांगले गुंफले आहेत पण काही उपकथानकं इतकी सविस्तर नसती तर काहीही फरक पडला नसता असं वाटतं. पुस्तकाच्या उत्तरार्धात सुरू झालेलं एक कथानक वाचता वाचता मला चक्क झोपच लागली आणि ते संपल्यावर "बरं मग?" असा प्रश्न पडला. विशेषतः ग्रीसमध्ये घडलेले प्रसंग तर केवळ पानं भरायला लिहिले आहेत की काय असं वाटलं. काईट रनरमध्ये अफगाणिस्तानातल्या निसर्गाचंही बरच वर्णन आहे. तसं ह्यात फारसं नाहीये. नेहमी प्रमा़णे पात्र आणि त्यांच्यातले संबंध छान फुलवले आहेत. लहान बहीण भावाचं गाणं आणि पुस्तकाचं नाव ज्यावरून स्फुरलं त्या कवितेबद्दल लेखकाने थोडक्यात लिहिलं आहे, ते वाचायला चांगलं वाटलं. एकंदरीत खालीद हुसैनीचं पण डॅन ब्राऊन सारखं होणार की काय असं वाटलं.

रियाच्या बारश्याच्या वेळेला विकत घेतलेलं कविता महाजन लिखित 'कुहू' नावाचं पुस्तक वाचलं. ही एक रूपक कथा आहे. ही मराठीतली पहिली 'मल्टीमिडीया' कादंबरी. सुंदर रंगित प्रिटींग, हाताने काढलेली चित्रं आणि बरोबर येणारी सिडी. ह्या सिडीत हे पुस्तक ऑडीयो बूक प्रकारात आहे आणि पुस्तक वाचनाबरोबर मागे जंगलातले आवाज प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेले आहेत. एकदंरीत पहिला प्रयोग म्हणून एकदम मस्त आहे!.

मकरंद साठे लिखित 'गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी' हे पुस्तक वाचले. गार्डन ऑफ इडन ही पुण्याबाहेरील एक उच्चभ्रु वसाहत. ह्याच्या आवारात असलेल्या साई मंदिरामुळे ह्याला लोकं साई सोसायटी असं म्हणायला लागतात. पुस्तकातली कथा ही ह्या वसाहतीत रहाणार्‍या लोकांसंबधी किंवा थेट त्या वसाहतीसंबंधी नाही पण तरीही कथेचा ह्या वसाहतीशी संबंध आहे. सहा पात्रे आणि त्यांची पूर्वायुष्ये ह्यांबद्दल सांगत मुळ कथा पुढे सरकते आणि शेवटी सगळे धागे एकत्र गुंफले जातात. हे पुस्तक वाचताना मला काही ठिकाणी 'दंशकाल'ची आठवण झाली. फक्त हे पुस्तक दंशकाल इतकं भडक नाहीये. 'दंशकाल' वाचतना मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे चालू कथानकात मध्येच एखादं पिल्लू सोडून देऊन त्याचा पुढे मोठा संदर्भ येतो. ह्यातही थोडसं तसं आहे फक्त ह्यात लेखक अगदी स्पष्टपणे सांगतो की ह्याबद्दलचे आणखी तपशील पुढे येतीलच पण आत्तापुरतं एव्हडं माहिती असू द्या. बाकीच्याची आत्ता गरज नाही. ( म्हणजे ११ वीच्या फिजीक्समध्ये इंटीग्रेशनचा संदर्भ आला की तेव्हा सांगायचे आत्तापुरतं एव्हड फक्त माहिती असू द्या, पुढच्या वर्षी इंटीग्रेशन शिकलात की नीट कळेल.. तसं काहितरी! ) अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे कथेतले सगळे काळाचे संदर्भ भारतातल्या राजकीय, सामाजिक घटनांच्या संदर्भाने येतात (म्हणजे गांधीहत्येच्या एक वर्षानंतर, शिख हत्याकांडाच्या सुमारास, मोदी सरकार निवडुन आलं तेव्हा वगैरे. कथा सांगता सांगता भारतातल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दलही भाष्य येतं फक्त त्यातून अधेमधे (स्युडो)सेकुलिरीजम डोकावतं पण ते असो. एकंदरीत कादंबरीतली 'कथा', सांगण्याची शैली आणि शेवटची गुंफण ह्यामुळे वाचायला आवडली. ह्यावर 'ल्युडो' किंवा 'बेबेल' टाईलचा सिनेमा निघू शकेल.

पुढच्या वर्षीच्या वाचन 'विशलिस्ट'मध्ये विशेष काही घातलेलं नाहीये. नुकतेच हाती पडलेले थोडे फार दिवाळी अंक, त्यांच्याचबरोबर मागवलेला मिलिंद बोकीलांचा 'पतंग'  नावाचा कथासंग्रह, हॅरी पॉटर सिरीजमधली उरलेली पुस्तकं (सध्या फक्त दीड पुस्तक वाचून झालय. रिया खूपच पुढे गेलीये!), अगाथा ख्रिस्तीची अजून काही पुस्तकं आणि घरात असलेली पण न वाचलेली इतर काही मराठी पुस्तकं हे वाचायचं आहे. स्टिव्ह वॉने आपल्या आत्मचरित्रात त्याच्या संघाच्या कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लिश संघाबद्दल फारसं बरं लिहिलेलं नाहीये. त्यामुळे मला एखाद्या स्मकालिन इंग्लिश क्रिकेटपटूचं आत्मचरित्र वाचायचं होतं. अगदी समकालिन नसला तरी माजी इंग्लिश कर्णधार आणि नुकताच राणीच्या हस्ते 'सर' पदवी देऊन गौरवल्या गेलेल्या अ‍ॅलिस्टर कूकचं पुस्तक मागवलं आहे. बघू किती वाचून होतय. एकवेळ थोडं कमी वाचून (आणि पाहून) झालां तरी चालेल पण पुन्हा हे लॉक डाऊन आणि महामारीचं संकट नको!

सगळ्यांना नववर्षाच्या खूप शुभेच्छा ! २०२१ हे २०२० पेक्षा बरं जावो!

🙏🏻 नैवेद्यम् समर्पयामी 🙏🏻

ह्या कोविडच्या लॉकडाऊनमध्ये बर्‍याच जणांच्या पाककलेला उधाण आलं होतं. आम्हीही त्या लाटेत होतो. भटुरे, कचोर्‍या, साटोर्‍या, भाकर्‍या, खिचड्या, सुपं, वेगवेगळे सँडविच, केक, पास्ताचे प्रकार वगैरे करून आणि खाऊन झाल्यावर एकदा संपूर्ण थाळी बनवून बघायला हवी असा किडा वळवळत होता. तश्यातच मायबोलीवर गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण नैवेद्याचं ताट घरी करायची स्पर्धा जाहीर झाली. 

 

आमच्या थाळी रांधायच्या किड्यालामायबोलीच्या गणेशोत्सवाचं निमित्तं मिळालं आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजा झाल्यावर दोघांनी मिळून सगळा स्वयंपाक केला. ह्यावर्षी इथल्या महाराष्ट्रमंडळातर्फे  'Do along' गणपतीची पूजा होती. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठ वगैरे करून पूजा केली होती आणि मग साग्रसंगीत नैवेद्यही झाला.

एकंदरीत आढावा घेता बरेच पदार्थ चांगले झाले. बासुंदी थोडी अजून दाट चाललीअसती आणि भजी अजून हलकी होऊ शकली असती. सुरळीच्या वड्या आणि पंचामृत हे सगळ्यात छान झालं होतं असं आम्हांला वाटलं. एकंदरीत आम्हांला सगळं करायला खूप मजा आली. यंदा गणपतीला कोणाचं येणं जाणं नसल्याने पुढचा आठवडाभर स्वंयपाक करायची गरज भासली नाही!

तर आम्ही गणपतीला दाखवलेला हा नैवेद्य गणपतीबाप्पाने गोड मानून घेतला असेल अशी आशा आहे.

Full Taat 1.jpg

*
चेकलिस्टः
१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. : होय
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत. : होय
३) नैवेद्याच्या ताटातले पदार्थः
2 भाज्या: पालक मेथी पातळ भाजी , पंचकडधान्यांची उसळ
चटणी: कोथिंबीर, खोबरं, पुदीना
मेतकूट: ह्याचं प्रसादाच्या ताटात नक्की काय करतात माहीत नाही. त्यामुळे त्याऐवजी 'पंचामृत' केलं.
2 कोशिंबीरी:
काकडी टमॅटो आणि कोबी-गाजर
भात: वरण-भात आणि मसाले भात
पोळी/ पुरी: पोळी
तळणीचा पदार्थ: कोथिंबीरीची भजी
एखादे गोड पक्वान्न : बासुंदी
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक: घरी केलेल खव्याचे मोदक
ह्या शिवाय : सुरळीच्या वड्या, खीर आणि पुरण केलं होतं.
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. : होय
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. : केळीचे पान

पदार्थांची माहिती:
१. पालक मेथीची पातळ भाजी : आळू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी करतात त्या सारखीच पालक आणि मेथीची भाजी केली. दोन्ही भाज्या आणि डाळ, दाणे वाफवून घेतले. भाज्या एकत्र घोटून त्यात दही आणि डाळीच पीठ घातलं. फोडणीला घालून गुळ, मीठ आणि तिखट घातलं. मेथीच्या चवीप्रमाणे गुळ, तिखट घालावं.
२. पंचकडधान्यांची उसळ: मुग, मटकी, मसूर, छोले आणि चवळी धान्ये १:१ प्रमाणात घेऊन १ रात्र भिजत घालून, त्यांना मोड आणले. आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि जिरं ह्यांच वाटणा करून त्यात ही उसळ केली. चवीनुसार मिठ आणि चिमुटभर साखर घातली.
*
Usal.jpg
*
३. काकडी टमॅटो कोशिंबीरः नेहमीची कोशिंबीर
*
Koshibeer_2.jpg
*
४. कोबी गाजर कोशिंबीर: कोबी आणि गाजर किसून त्याला वरून जिर्‍याची फोडणी घातली. ह्यात डाळींबाचे दाणेही घालायचे होते. पण ऐनवेळी डाळींब मिळालं नाही.
*
Koshimbeer_1.jpg
*
५. वरण-भात
६. मसाले भातः फ्लॉवर, मटार आणि तोंडली ह्या भाज्या आणि खडा मसाला भाजून घेऊन त्याची पावडर करून त्याचा इंस्टापॉट मध्ये मसाले भात केला. शिजवताना त्यात काजू घातले आणि खाताना खोबरं कोथिंबीर आणि तुप घेतलं.
*
Masala bhat_1.jpg
*
Masala bhat_2.jpg
*
७. चटणी: खोबरं, कोथिंबीर आणि पुदीना मिक्सरवर वाटून त्यात मिठ, लिंबू घालून चटणी केली.
८. पंचामृतः दाणे, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, सिमला मिरच्या आणि तिळकुट अश्या पाच अमृतांमध्ये चिंच, गुळ घालून पंचामृत केलं. हे आम्ही पहिल्यांदाच केलं. आंबट, तिखट, गोड अश्या सगळ्या चवी मिळून एकदम चटकदार लागलं. एका पंचामृत एक्सपर्टांकडून हिरव्या मिरच्या घालण्याची टीप मिळाली होती, ती खूपच चांगली होती.
*
Panchamrut.jpg
*
९. पोळी
१०. कोथिंबीरीची भजी: कोथिंबीर एकदम बारीक चिरून भज्यांच्या पिठात भिजवली. पिठाची कंसिस्टंन्सी नीट जमून आल्यावर हलकी आणि कोथिंबीरीच्या सुंदर स्वादाची भजी झाली.
१२. सुरळीच्या वड्या: ह्या ही पहिल्यांदाच केल्या. डाळीच पिठ, ताक आणि पाणी १:१:२ प्रमाणात एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या पूर्ण मोडायच्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट घालून मंद गॅसवर ठेवायचं. उलतन्याने सतत हलवायचं. ते पटापट घट्ट व्हायला लागलं. उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं!) स्टिलच्या ताटाच्या मागच्या बाजुला उलतन्याने भराभर पीठ फासायचं. वरून खाली फासायचं आणि जाड थर द्यायचा. खोवरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांच मिश्रण त्यावर भुरभुरायचं. मोहरी, जिरं तीळ ह्यांची खमंग फोडणी द्यायची. सुरीने पट्ट्या पाडून वड्या वळायच्या. वरून पुन्हा थोडीशी फोडणी घालायची.
*
Suralichi wadi.jpg
*
१३. बासुंदी: ८ कप फुल फॅट दुध. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क हे एकत्र करून इंस्टंट पॉटमध्ये बासुंदी केली. आधी सगळं मिश्रण 'सॉटे मोड' वर उकळून घेतलं आणि नंतर स्लो कुकींग मोड वर सुमार सहा तास ठेवलं. मधे मधे ढवळलं. चव बघून अगदी थोडी साखर घातली. बदामाचे काप, जायफळ आणि केशराच्या काड्या घातल्या.
१४. खव्याचे मोदकः यंदा उकडीचे मोदक आमचे एक शेजारी देणार होते. त्यामुळे नैवेद्यासाठी खव्याचे मोदक केले. खवा थोडा भाजून घेऊन त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मोदक केले.
१५. नैवेद्याचं ताट होतं म्हणून खीर आणि पुरण केलं होतं. शास्त्र असतं ते!
इथे एका जपानी दुकानात केळीची पानं मिळाली. ती मोठ्या पानाची कापलेली होती. त्यातल्या त्यात चांगल्या आकाराची पानं वापरली. गंमतीचा भाग म्हणजे आमच्या ताटाला मायबोलीवरच्या स्पर्धेत पहिला नंबर मिळाला!

गणपती बाप्पा मोरया !!

(त.टी. काही काही फोटो ऑफ फोकस्ड आहेत की काय असं तुम्हांला वाटेल, पण ते तसं नसून इकडून तिकडून ब्लर करून 'कलात्मक' करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Wink

पयलं नमन..

ह्यावर्षी उगीच काहीतरी फॅड म्हणून वर्ष पालटत असताना ब्लॉग अपडेट करायचं ठरवलं. म्हणजे तसं ठरवलं नव्हतं, पण रियाने ठरवलेल्या प्लॅननुसार सिनेमा बघण्यासाठी जागत बसेलेलो असल्याने वेळ झालीच आणि मग ठरवलं होतं ते लिहायला घेतलं. ह्या वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकांबद्दल लिहिलं होतं. घरात असलेल्या पुस्तकांची यादी केली होती आणि ह्यातली न वाचलेली जास्तीत जास्त पुस्तकं वाचून काढायची असं ठरवलं होतं.  सगळी वाचून संपलेली नाहीत पण गेल्यावर्षीपेक्षा जाणवण्याइतपत वाचन जास्त झालं, आहे हे ही नसे थोडके. तर आज ह्या वाचून झालेल्या पुस्तकांविषयी.

आत्ता आढावा घेत असताना असं लक्षात आलं आहे की इंग्रजीतलं फक्त एकच पुस्तक वाचून झालं आहे आणि ते म्हणजे क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मणचे आत्मचरित्र. त्या काळातल्या चार प्रसिद्ध भारतीय खेळाडूंपैकी (किंवा बॅट्समनपैकी) लक्ष्मण हा माझा सर्वात कमी आवडता. एकतर त्याच्या खेळात सातत्याचा अभाव होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे मुंबईच्या अमोल मुझुमदारवर अन्याय झाला असं मुंबई फॅन म्हणून मला वाटायचं. पण त्याचं आत्मचरित्र हे सचिन आणि गांगुलीच्या आत्मचरित्रांपेक्षा खूपच उजवं वाटलं. सचिनचं पुस्तक हे जरा जास्तच सहज सोपं आणि 'पॉलीटीकली करेक्ट' प्रकारातलं आहे तर गांगुलीचं जरा जास्तच नकारात्मक आणि उथळ आहे. त्यामानाने लक्ष्मणने पुस्तक प्रामाणीकपणे लिहिलं आहे. विवादास्पद गोष्टी बर्‍याच परखडपणे लिहून टाकल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे जडणघडणीतले सगळे टप्पे नीट लिहिले आहेत. आता द्रविड आणि कुंबळे आपापली पुस्तके कधी लिहितात ह्याची वाट बघतो आहे.

मराठी पुस्तकांपैकी वाचलेलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे चार नगरांतले माझे विश्व' हे डॉ. जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र. सुमारे ६०० पानांमध्ये डॉ. नारळीकरांनी बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे इथे रहातानांचे आपले अनुभव तपशीलवार सांगितले आहेत. अर्थात ह्यात बनारस आणि केंब्रिजबद्दलचे वर्णन बरेच जास्त आहे. साधारणपेण कर्तुत्ववान माणसांच्या आत्मचरित्राचा हालाखीतले लहानपण, लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत, मग यशाची 'पहिली पायरी' आणि मग यश असा ढाचा परिचित असताना, ह्या पुस्तकात मात्र घरची शैक्षणिक पार्श्व्भुमी (वडील रँगलर, बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक, आई संस्कृत शिकलेली, काका, मामा सगळे विविध विषयातले तज्ज्ञ), आर्थिक सुबत्ता, उपजत हुशारी, खणखणीत यश आणि मोठ्या लोकांचा परिचय आणि सहवास हा वेगळा पॅटर्न वाचायला छान वाटला. केंब्रिजच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी पाहिलेलं ब्रिटन आणि इतर युरोप ह्याचं वर्णन वाचायला छान वाटतं. क्रेंब्रिजमध्यल्या त्यांच्या संशोधनाबद्दलही त्यांनी अतिशय सोप्प्या शब्दांत लिहिलं आहे. त्यामानाने TIFR मध्ये असताना केलेल्या संशोधनाबद्दल फार तपशिल येत नाहीत. अनेक मोठ्या लोकांची नावं आणि त्यांच्याशी डॉ. नारळीकरांनी केलेला सुसंवाद, व्यवहार ह्याबद्दल वाचायला भारी वाटतं. (उदा. लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, स्टिफन हॉकिंग, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. अब्दुल कलाम, राणी इलिझाबेथ, डॉ. मनमोहन सिंग, महाष्ट्राचे विविध मुख्यमंत्री, विक्रम साराभाई ई).
काही खटकलेल्या गोष्टींबद्दल त्यांनी बर्‍यापैकी स्पष्ट हातचं न राखता लिहिलं आहे. उदा. अपूर्वाई पुस्तकात पुलंनी केलेला डॉ. नारळीकरांचा अनुल्लेख, त्यांच्या करियर मुळे पत्नीच्या करीयरची झालेली ओढाताण, TIFR आणि नंतर आयुका दरम्यान अनुभवलेलं राजकारण
आयुकाच्या स्थापनेच्या आणि जडणघडणीच्या काळातले अनुभव अतिशय वाचनीय आहेत! इतकी वर्ष पुण्यात राहून मी एकदाही आयुकात गेलेलो नाही ह्याची हे पुस्तक वाचल्यावर फारच खंत वाटली.

ऋषिकेश गुप्ते लिखीत 'दंशकाल' वाचलं. मागच्यावर्षीच आणून ठेवलं होतं पण वाचायचं राहून जात होतं. पुस्तकातलं 'स्टोरी टेलिंग' खूप भारी आहे. शृंगार, शौर्य, क्रौर्य, बिभत्स, गुढ, रहस्य, भिती असे अनेक रस ह्या 'नानू'च्या कथेत येतात. कथेतला नानू जसा मोठा होत जातो तशी पुस्तकातली भाषाही बदलत जाते, त्या वयाला साजेशी होत जाते. लेखकाने उभ्या केलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा एकदम जोरदार आहेत. गावातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथली भाषा ह्याचं बरोबर नंतर शहरातलं वातावरण हे सगळं लेखकाने एकदम बारकाव्यांनिशी उभं केलं आहे. गोष्ट सांगताना, मधेच पुडी सोडून दिल्यासारखा एखादा मुद्दा येतो आणि नंतर त्याबद्दलचा सविस्तर तपशिल येतो. त्यामुळे असा कुठला नवीन उल्लेख दिसला की पुढे काय असेल ह्याबद्दल उत्सुकता वाटत रहाते. काही ठिकाणी मधली मधली विवेचनं जरा रेंगाळतात. तर काही ठिकाणी बिभत्स आणि अतिवास्तववादी वर्णन खूप अंगावर येतात! एकदा तर रात्री झोपायच्या आधी हे पुस्तक वाचल्यावर मला भितीदायक स्वप्न वगैरे पडून मध्यरात्री जाग आली होती!

असाराम लोमट्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचला. लेखकाच्या आधीच्या वर्षी दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या दीर्घकथा ह्यात आहे. सगळ्या कथा ग्रामिण पार्श्वभुमीच्या असल्या तरीही गोष्ट सांगायची भाषा ही प्रमाण भाषा आहे, शिवाय सहज कुठल्याही पार्श्वभुमीवर 'पोर्ट' करता येतील अश्या कथा असल्याने मला हा कथासंकथाह खूप आवडला. कथांमधली वर्णन घटना आणि व्यक्तिरेखा अगदी डोळ्यासमोर उभ्या करतात.

जंगलावरची पुस्तकं हवी होती म्हणून दत्ता मोरसे लिखित 'झुंड' आणलं होतं,  ते वाचलं. हे पुस्तक वाचताना मला गेम ऑफ थ्रोनची आठवण होत होती. म्हणजे काहीतरी चांगलं छान सुरू आहे असं वाटताना अचानक एखादी भयंकर पण वास्तववादी घटना येते आणि सगळा नुरच बदलतो. वारंवार धक्के देण्यार्‍या ह्या पुस्तकात जंगलाच सुंदर पण वास्तववादी वर्णन आहे.

झी मराठीवरच्या सिरीयलमुळे माहित झालेलं नारायण धारपांचं 'ग्रहण' वाचलं. पुस्तक ठिकच वाटलं आणि त्यावरून म्हणून काढलेली सिरीयल अगदी काहीच्या काही होती! कदाचित ज्या काळात आलं, त्या काळात हे पुस्तक भारी वाटलेलं असू शकेल.
'कॉफी टेबल बूक्स' प्रकारातली प्रिया तेंडूलकरांचं 'असही' आणि जयप्रकाश प्रधानांची 'ऑफबीट भटकंती' ही पुस्तकं अधेमधे वाचत असतो. दोन्ही पुस्तकं छान आहेत. सलग बसून वाचण्यासारखी नाहीत पण अधेमधे एखादा लेख वाचायला छान वाटतं. 
यंदा जरा शहाणपणा करून फक्त चारच दिवाळी अंक मागवले होते. मुशाफिरी, मौज, समदा आणि लोकसत्ता. जेव्हडं वाचून झालय त्यावरून चारही अंक चांगले वाटले. त्यातल्या आवडलेल्या लेखांबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन.

ह्यावर्षी बरच वाचून झालेलं असलं तरी बरच वाचायचं बाकीही आहे! निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे 'बूक अबाऊट बूक्स' प्रकारातलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. सुरुवातीला बरीचशी पानं सलग वाचली पण नंतर मात्र कंटाळा आला. आता ते पूर्ण करेन.  शिवाय हॅरी पॉटर सिरीज सुरू केली आहे ती पण पूर्ण करायची आहे! इंग्रजी वाचनही जरा वाढवायचं आहे. नवीन लेखकांची इंगजी पुस्तक वाचायची आहेत. नॉन-फिक्शन प्रकारातली पुस्तकं विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतीय  राजकारणाबद्दल वाचायची आहेत आणि एकूणच नॉन-फिक्शन कसं आवडून घ्यावं ह्याबद्दल प्रयत्न करायचे आहे. बघूया कसं काय जमतय ते! 

सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा !

जिंदगी "गुलझार" है!

आमचं व्हॅंकुअरला यायचं ठरल्यापासूनच इथे आल्यावर काय काय करायचं, कुठे कुठे जायचं ह्याविषयीची ठरवाठरवी करणं सुरू झालं होतं. तेव्हाच दरम्यान स्वरदाकडून समजलं की त्यांचा गाण्याचा कार्यक्रम व्हॅंकुअरला ठरतो आहे आणि ह्यावेळी गुलझारांच्या गाण्यांचा आहे. नीश एंटरटेनमेंटतर्फे वेगवेगळ्या विषयांवरचे सांगितीक कार्यक्रम सादर केले जातात, त्याच प्रकारचा कार्यक्रम असेल असं आम्हांला वाटलं पण जसा त्यांच्या अमेरिका दौरा सुरू झाला आणि फेसबूकवर अपडेट यायला लागले तेव्हा कळलं की हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, 'गुलझार - एक एहसास' असं ह्या कार्यक्रमाचं नाव असून 'नीश'चे कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असं समजलं. ह्यावेळी गुलझार साहेब स्वतःही येणार आहेत. त्यांच्याशी गप्पा, शेरोशायरी आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्यांची मैफिल असं काहीसं कार्यक्रमाच स्वरूप असणार आहे!  भारतातून इथे येणार्‍या कलाकारांच्या विशेषतः मराठी कलाकरांच्या कार्यक्रमांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर ते इथे यायचं कमी किंवा बंद करतील, त्यामुळे तसं होऊ न देण्याला तेव्हडाच आपला हातभार म्हणून अश्या कार्यक्रमांना तसच नाटकं, सिनेमे इथे येतात त्यांच्या प्रयोगांना आम्ही एकानेतरी जायचा प्रयत्न करतो. त्यातून नीश एंटरटेनमेंटचे कार्यक्रम तर नेहमीच दर्जेदार असतात त्यामुळे त्यातली कलाकार मंडळी आणि ती ही नात्यातली / चांगल्या ओळखीची, त्यामुळे आम्ही आमची तिकीटं काढली होतीच पण गुलझार साहेब स्वतः येणार आहेत हे कळल्यावर उत्साहं अजूनच वाढला.

स्वरदा आणि टीम कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी व्हॅंकुअरला पोहोचणार होती. त्यामुळे ते परस्पर थिएटरलाच जाणार होते. शिल्पाने स्वरदाला फोन करून विचारलं की तुमच्या टीमसाठी काही खायला प्यायला आणायचं आहे का? त्या त्या शहरातले संयोजक तशी सोय करतातच पण तरीही मोठ्या दौर्‍यात घरचं खाणं आणि त्यातही विशेषत: आपला उ़कळलेला चहा ह्याची आठवण होते.  स्वरदानेही चहा नक्की आण, खायचं काय ते कळवते असं सांगितलं. थोड्यावेळाने फोन आला की टीमशी बोलत असताना गुलजार साहेब म्हणाले की घरून काही आणणार असतील तर त्यांना पोहे आणायला सांग, मला महाराष्ट्रीयन पोहे खूप आवडतात. नंतर तिचा पुन्हा मेसेज आला की खूप पोहे आण असं टीम म्हणते आहे! बाकी मंडळी ओळखीची घरची होती, पण साक्षात गुलजारांसाठी पोहे न्यायचे म्हणजे मोठच काम. शिवाय क्वांटीटी वाढली की क्वालीटीचा भरोसा नाही. त्यामुळे शिल्पा आणि आईला पोह्यांचं एकदम टेन्शनच आलं. शिवाय गुलजार साहेब स्वतः भेटणार तर त्यांच्याशी बोलायचं काय हा अजून एक प्रश्न. कारण आपल्या हिंदीचा आनंद आणि कविता/गजलांची समज ह्याचा तर त्याहूनही आनंद! त्यामुळे मी विकीवर वाचायला सुरुवात केली आणि कार्यक्रम आधी पाहून आलेल्या आणि कविता-गझलांमधल्या तज्ज्ञ आणि गुजझार फॅन असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला पिंग केलं. एकीकडे पोहे तयार होत होते. चहासाठी थर्मास काढला, काहीतरी गोड हवं म्हणून इथल्या स्पेशल मेपल कुकीज आणल्या. सगळं पॅक केलं आणि आम्ही कार्यक्रमाच्या तब्बल तीन तास आधी घरून निघालो (एरवी असतं तर कदाचित पहीलं गाणं बुडलं असतं!!).

थिएटरमध्ये पोहोचलो तर फक्त मिलिंद ओक आणि तेजस देवधर दोघेच जणं आले होते. बाकी मंडळी एअरपोर्टवरून हॉटेलला गेली होती. तेजस आणि ओक सरांचा सेटअप तसेच साऊंड चेक सुरू होता. त्यांच्याशी अधेमधे बोलणं सुरू असतानाच स्वरदा आणि बाकीची टीम म्हणजे गायक जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे आणि स्थानिक संयोजक मंडळीही  आली. गुलझार साहेब आणि कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेणार्‍या रक्षंदा जलिल अजून आल्या नव्हत्या. सगळ्यांनी चहा, खाणं सुरू केलं, ग्रीन रूममध्ये गप्पा टप्पा, एकीकडे त्यांची तयारी सुरू असतानाच थिएटरमधल्या मंडळींनी गुलझार साहेबांची गाडी येऊन पोहोचल्याचं सांगितलं. त्यांना बसण्यासाठी ग्रीनरूमच्या मध्यावर असलेली जागा तयार केली होती. तिथे चांगले सोफे, चांगल्या कपबश्या, प्लेट वगैरे मांडणी होती. आणि गुलझार साहेब आणि रक्षंदा बाईंनी ग्रीन रूममध्ये प्रवेश केला. पांढरा शुभ्र लखनवी कुर्ता पायजमा, त्यावर पांघरलेली शाल, चष्मा आणि चेहेर्‍यावर दिसणारं कलेचं तेज.. असच तेज कलेची आयुष्यभर उपासना करणार्‍या किशोरी आमोणकर, लतादिदी, आशाताई ह्यांच्या चेहर्‍यांवरही जाणवतं. ८६ वय असूनही स्वतःच स्वतः ताठ चालणं, सुस्पष्ट बोलणं आणि रुबाबदार पण तितकच अतिशय डाऊन टू अर्थ, समोरच्याला आपलसं करून टाकणार व्यक्तिमत्त्व. आल्यावर ते दोघेही बाहेरच्या सोफ्यांवर न बसता थेट खोलीत येऊन आम्ही बसलो होतो तिथे येऊन आमच्या बरोबर साध्या खुर्च्यांवरच बसले. सगळ्यांची विचारपूर केली. स्वरदाने आमची ओळख करून दिल्यावर आमचीही चौकशी केली. मला खरतर कोणालाही पटकन नमस्कार करायचं लक्षात येत नाही पण गुलजार साहेबांना मात्र उत्स्फूर्तपणे वाकून नमस्कार केला गेला. गुलजार साहेब मला बस म्हणाले पण खरतर त्यावेळी काहीच सुचत नसल्याने मी नुसताच तिकडे उभा होतो. शिल्पाने दरम्यान त्यांना पोहे दिले. तर ते पुन्हा एकदा "बैठो बेटा, खडे मत रेहेना" म्हणाले.  आणि मला अचानक उर्दू मिश्रीत हिंदी बोलायचा अ‍ॅटॅक आला! मी त्यांना म्हटलं, आपके सामने बैठने की हम जुर्र्त नही कर सकते..  (मनातल्या मनात कपाळाला हात लावला!) आता बोलून तर बसलो होतो, बरोबर आहे नाही माहीत नाही. त्यावर ते म्हणाले, "नही बेटा इतनी तकल्लूफ ना करो". आता तकल्लूफ म्हणजे काय हे अर्थातच मला माहीत नसल्याने नक्की काय करायचं नाही हे न कळून मी चुपचाप शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलो. (माझी ती मैत्रिण म्हणाली होती की उर्दू contagious असते. ते खरं होतं म्हणायचं.). दरम्यान रक्षंदा बाई काही काही बोलत / विचारत होत्या. मधेच त्या म्हणाल्या, "अच्छा तो आप स्वरदा के ननंदोई हो इसलिये यहा आये हो ?" आता पुन्हा ननंदोई म्हणजे काय ते कळायला काही सेकंद गेले. पण मी हो म्हणून टाकलं. अर्थ लागल्यावर म्हटलं तश्या बर्‍याच ओळखी आहेत आमच्या ! ओक सरांना बरेच वर्ष ओळखतोय, स्वरदा माझ्या मित्राच्या मित्राची बहीण म्हणून आधीपासून माहीत होती, शिवाय तो तेजस माझ्या बहीणीचा मित्र आहे.. फक्त बायकोच्या माहेरची ओळख नाही कै! अर्थात हे सगळं मनातल्या मनात!! त्यांनी उर्दूमिश्र हिंदीत अजून काही विचारलं असतं तर काय घ्या? दरम्यान गुलझार साहेबांना तुमची गाणी खूप आवडतात, अनेक वर्ष ऐकत आलो आहे, वगैरे ठरवलेल्या गोष्टी सांगितल्या. मेरा कुछ सामानची गोष्ट तुमच्या तोंडून प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकायला मिळेल ना असं विचारलं. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. नंतर त्यांनी पोह्यात कलौंजी घातली आहे का? चहात मसाला घातला आहे का? वगैरे एकदम घरगुती प्रश्न विचारले. शिल्पाने सरसो आहे सांगितल्यावर रक्षंदा बाईंनी हे सरसो नाही, ही राई, सरसो म्हणजे राईची मोठी बहीण अशी माहिती दिली. पुन्हा मघाचचाच विचार करून हो म्हणून गप्प बसलो. गुलझार साहेबांनी सगळ्यांना तुम्ही खाल्लं का? चहा घेतला का वगैरे चौकशी केली. ह्या मोठ्या लोकांना आपण त्या ग्लॅमरमधून बघतो पण अर्थात ती घरात साधी माणासच असतात. गुलझार साहेबांना भेटून तर हे फार जाणवलं. थोड्यावेळाने स्टेज तयार आहे, इथले फोटो काढून झाले की कार्यक्रम सुरू करू असं संयोजक सांगायला आले आणि मग सगळ्यांना शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर गेलो. स्वरदा, जितेंद्र ह्यांना मी आधी भेटलेलो होतो पण ऋषिकेश रानडेला मी पाहिल्यांदाच भेटलो, तो पण सध्याचा प्रसिद्ध गायक आहे त्यामुळे एकदम सेलिब्रिटी आहे. सुरूवातीला मला त्याच्याशी बोलताना जरा फॉर्मल वाटत होतं. पण गुलझार साहेब आल्यावर आणि त्यांच्याशी एकदम घरगुती स्वरूपातलं बोलणं झाल्यावर  ऋषिकेश एकदम आपल्यातला, घरचाच वाटायला लागला!

कार्यक्रमाच्या सुरूवातीला रक्षंदा जलिल आणि गुलझार साहेब ह्यांची ओळख करून देणारा लहानसा व्हिडीयो दाखवला गेला आणि मग एका क्षणी गुलझार साहेब स्टेजवर आले. टाळ्यांच्या कडकडात संपूर्ण सभागृह उभं राहिलं. त्यांनी स्वागताचा नम्रपणे स्विकार केला पण कडकडाट काही थांबेना. नंतर तर अनेकदा असा कडकडाट होत होता. स्वरदा आणि जितेंद्र ह्यांचं 'नाम गुम जाएगा' अतिशय सुरेख झालं. नंतरच्या मुलाखतीतही गुलझार साहेब अगदी धिरगंभीर वगैरे नव्हते. रक्षंदा बाईंनी विचारलेल्या एका प्रश्नावर म्हणाले, "कुठल्या 'सफर' बद्दल सांगू? उर्दूतल्या की इंग्रजीतल्या!?' मग पुढे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं, चित्रपटात नसेलेली शेरो शायरी सादर केली.

गीतकारांना मुलाखतीत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "शब्द आधी की चाल आधी?" रक्षंदाबाईंनी तो विचारलाच, शिवाय पुढे म्हणाल्या की तयार चालीवर शब्द लिहायचे म्हणजे तयार कबरीत फिट बसणार्‍या मापाचे मुडदे पाडण्यासारखं नाही का? मुख्य प्रश्नाचं उत्तर देण्याआधी गुलझार साहेब म्हणाले की मी लिहिलेले शब्द मग ते चालीवर असो किंवा चालीआधी, ते मला मुडद्यांसारखे मुळीच वाटत नाहीत! ते जिवंत असतात. स्वतःचा कामाबद्दलचा हा विश्वासच ह्या मंडळींना थोर करून जातो. त्यानंतर त्यांच्या पहिल्या गाण्याची गोष्ट सांगितली. ते गाणही चालीवर लिहिलं गेलं. आधी चाल मग शब्द. स्वरदाने 'मेरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दै दे' हे गाणं ही खूप छान गायलं.

पुढे, उर्दू भाषा आता फार बदलली आहे का ? कालबाह्य होत आहे का? "पूर्वीची उर्दू राहिली नाही" असं वाटतं का? ह्या प्रश्नावर त्यांनी भाषा .. कुठलीही.. आणि तिचं प्रवाहीपण ह्याबद्दल अतिशय सुरेख विवेचन केलं. कुठलीही भाषा ही समाजाची असते, लोकांची असते त्यामुळे समाज जसा बदलतो तशी भाषा बदलणार आणि बदलायलाच हवी, त्यात धर्म, जात वगैरे काही नसतं. एखाद्याला एखादी भाषा आली (किंवा नुसती समजली) म्हणजे ती त्याची झाली. भाषा कधीच मृत होत नाही. आजची हिंदी, आजची गुजराथी, आजची मराठी ही ५०-७० वर्षांपूर्वी बोलली जायची तशीच राहिली आहे का? मग उर्दू कडूनच ती अपेक्षा का? शिवाय भारतात उर्दू अधिकृत भाषा असणारं फक्त एक १ राज्य आहे. त्यामुळे ही खरं म्हणजे लोकांची समजाची भाषा आहे आणि त्यामुळे समाजाच्या बदलाचं प्रतिबिंब भाषेवर पडणारच. त्यात वावगं काही नाही.

रक्षंदा बाईंनी ' हम सब आपके 'अफेअर' के बारे मै जानना चाहते है' अशी गुगली टाकून 'गालिब'च्या विषयाला हात घातला. ८० च्या दशकात दुरदर्शन वर सादर झालेल्या कार्यक्रमाच्या अनेक मनोरजंक आठवणी  गुलझार साहेबांनी सांगितल्या. नसरूद्दिन शहाच का? ह्यावर ते म्हणाले दिग्दर्शक नकोच म्हणत होता कारण तो फार पैसे मागतो ! मग त्याला बोलावलं चर्चेला आणि सांगितलं की बाकीही काही कलाकार बघतो आहोत तर तू पैसे कमी कर. त्यावर नसरूद्दीन भडकला. पैसे कमी न करता शेवटी त्यानेच काम केलं आणि आज गालिब म्हंटलं की लोकांना त्याचाच चेहरा आठवतो!  पुढे गालिबच्या शायरीबद्दलचे बरेच बारकावे उलगडून सांगितले. पुढे चर्चेत 'मेरा कुछ सामान'चा सुप्रसिद्ध किस्सा आला. गुलझारांनी लिहिलेले शब्द वाचून एसडी बर्मन म्हणाले 'आज हे लिहिलत, उद्या टाईम्स ऑफ इंडीया घेऊन याल आणि त्याला चाल लावा म्हणाल!' अखेर बर्‍याच चर्चेनंतर गुलझार साहेबांनीही चाल लावायच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन ते अजोड गाणं तयार झालं. त्याही गाण्याला स्वरदाचा आवाज अफाट लागला होता!

कार्यक्रम शेवटाकडे येत असताना "नज्म के बिना मै नंगा हू" ह्यावरून सुरू झालेली शायरी, लोक  अक्षरशः प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजवत होते. पुढे 'अजनबी'ची कथा शायरीतून सांगताना 'एक अजनबी को एक बार कहीसे आवाज देना था...' असं म्हणून अलगद 'दिलसे' कडे घेऊन गेले. मला स्वतःला ते 'दिल से' च्या गाण्यांबद्दल काय बोलतात ह्याबद्दल फार उत्सुकता होती कारण 'दिल से'च्या प्रदर्शनपूर्व जाहिरातींमध्ये मणीरत्नम, ए. आर. रेहेमान, गुलझार, शहारूख खान, लता मंगेशकर अशी त्या काळातली यशाच्या शिरखावर असलेली मंडळी एकत्र येणार आहेत ह्या बाबीवर खूप भर दिला होता. गुलझार साहेबांबद्दल माहीती होऊन, त्यांचा फॅन मी तेव्हा पासून झालो.  ते चित्रपटातल्या गाण्यांबद्द्ल काही बोलले नाहीत पण ह्या चित्रपटातलं 'ए अजनबी' हे अजरामर गाणं ऋषिकेश रानडेने आपल्या स्वतःच्या शैलीत सादर केलं.  

गुलझार साहेबांना उर्दू भाषेबद्दल जबरदस्त ओढा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाचा शेवटही भाषेबद्दलच्या शायरीनेच केला. पुढे प्रेक्षकांनी समाधान न झाल्याचं सांगितल्याने आणखी काही शायरी सादर करण्याची विनंती केल्यावर 'किताबे' आणि 'उर्दू नज्म' ह्या रचना सादर केल्या. कानावर पडत होतं ते सगळच समजत नव्हत आणि त्यावेळी गझला, कवितांमध्ये जरातरी गती असायला हवी होती अशी तीव्र जाणीव होऊन गेली. कार्यक्रमाचा शेवट गायकांनी सादर केलेल्या मेडलेने झाला. सगळीच गाणी सुरेल झाली आणि ती ऐकताना गुलझारांच्या लेखणीच्या कक्षा किती रूंद आहेत हे ही जाणवलं. 'नाम गुम जाएगा' आणि 'मेरा कुछ सामान' लिहिणारी व्यक्तीच 'बिडी जलायले'ही लिहू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं.

मागे अनपेक्षितपणे सचिन तेंडूलकर भेटला होता, आता गुलझारसाहेब भेटले.  अतिशय भिन्न क्षेत्रातल्या, भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती पण दोन्ही वेळी आलेलं 'हाय' फिलींग मात्र अगदी सारखं होतं!

हस्तलिखित

गेल्या काही दिवसांमध्ये वाचनात आणि लोकांशी बोलण्यात लहानपणी शाळेत केलेल्या गोष्टींचे बरेच किस्से आले. परवा शिल्पाच्या भावाशी बोलताना ज्ञानप्रबोधिनीतल्या बर्‍याच गोष्टींचा उल्लेख आला आणि त्यामुळे जिज्ञासाने मायबोलीवर लिहिलेले ज्ञानप्रबोधिनीतले अनुभव पुन्हा एकदा चाळले. नंतर डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रात ते बनारस हिंदू विद्यापिठाच्या आवारातल्या शाळेत असतानाचे अनेक किस्से वाचले. शिवाय शिल्पाही अनेकदा तिने शाळेत असताना केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल सांगत असते. डॉ. नारळीकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य होतं "शाळेतल्या आठवणी गोड असतात तश्या आंबटही.. पुन्हा पुन्हा आठवाव्या अश्याही आणि शक्य तितक्या लवकर विसरून जाव्या अश्याही." माझ्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या आठवणी तराजूत घालून तोलल्यास आंबट आठवणी नक्कीच जास्त भरतील! आंबट आठवणी जास्त असण्याची कारणं नंतर कधीतरी.. पण गोड आठवणी फार कमी असण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेतली संस्कृती. आमच्या शाळेत अभ्यास आणि मार्क ह्यांना प्रचंड जास्त महत्त्त्व होतं. पाया पक्का करून घेण्यात त्याचा फायदा झाला हे काही प्रमाणात बरोबर असलं तरी कधी कधी ते जास्त व्हायचं आणि त्यामुळे इतर उपक्रम जवळ जवळ नसल्यासारखेच होते. आमच्या शाळेला वार्षिक सहल तसेच अल्पोपहार (किंवा कुठल्याही प्रकारची annual refreshment) नसायची. शाळेचं गॅदरींग इतकं लो-बजेट पध्दतीने व्हायचं की बस. सर्वसाधारणपणे गॅदरींग संध्याकाळी असतं कारण छान रोषणाई, स्टेजवर प्रकाशयोजना वगैरे करता येते. आमचं गॅदरींग सकाळी सात वाजता असायचं! सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टेज, पडणारा पडदा वगैरे सगळं असायचं पण नंतर नंतर सिमेंटच्या बांधलेल्या स्टेजला एक बॅकड्रॉप लाऊन नाटकं वगैरे सादर केली जात (वर छप्पर नाहीच!). नंतर असं ऐकलं की ऑडीयो सिस्टीम वगैरे बंद करून फक्त तबला पेटीवर सादर करता येण्याजोगी गाणीच नाच वगैरेंसाठी बसवायची असा नियम निघाला!! वार्षिक खेळांचं आयोजन आणि माझा स्वत:चा  त्यातला सहभाग ह्या दोन्ही गोष्टींचा एकंदरीत आनंदच होता. मी ना त्यावेळी उंच होतो, ना माझ्यात ताकद होती ना दम. त्यामुळे फक्त एकमेव सांघिक खेळ असलेल्या कबड्डीमध्ये मी कधीच संघात येऊ शकलो नाही. वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, गोळाफेक वगैरे स्पर्धा असायच्या. त्यातला गोळा तर मला उचलताच यायचा नाही त्यामुळे तो फेकणं तर दुरच.  आता मी जरी ३०० किलोमिटर सायकलींग, २०० किलोमिटर ट्रेकिंग, १० किलोमिटर/ हाफ मॅराथॉन पळणे असले प्रकार करत असलो तरी तेव्हा मला २०० मिटरही धडपणे धावता यायचं नाही. त्यामुळे खेळांबद्दलच्या आठवणी शुन्य. ("एकंदरीत ह्या परिस्थितीला आमच्या त्यावेळच्या शिक्षकवृंदाचं आणि संचालक मंडळाचं वैचारीक आणि आर्थिक  "डावेपण" कारणीभुत असावं" असं एक 'गिरिश कुबेरीय' वाक्य इथे टाकून द्यायचा मोह होतो आहे.)
ह्या अश्या सगळ्या परिस्थितीतही मला अगदी आवडलेला, जवळचा वाटलेला, मी प्रत्येक वर्षी उत्साहाने सहभाग घेतलेला आणि त्यामुळेच अजूनही बारिक सारिक तपशिलांसह लख्ख आठवत असलेला एक उपक्रम होता आणि तो म्हणजे 'हस्तलिखित'. पाचवी पासूनच्या प्रत्येक तुकडीने एक विषय घेऊन त्यावर स्वनिर्मित किंवा संकलीत साहित्याचं हाताने लिहिलेलं अर्थात हस्तलिखित पुस्तक तयार करायचं. ह्यासाठी शाळा वेगळ्या प्रकारचे रंगीत कागद आणि मधे मधे चित्र काढायला, मुखपृष्ठ वगैरेसाठी चित्रकलेचे पांढरे कार्डपेपर देत असे. दिलेल्या मुदतीत सगळं बाड कार्यालयात नेऊन पोहोचवलं की महिन्या-पंधरा दिवसांनी बाईंड केलेलं हस्तलिखित पुस्तक तयार होऊन येत असे. शाळेच्या ग्रंथालयात सगळ्या वर्गांची हस्तलिखितं ठेवलेली असत आणि आम्हांलाही कधीतरी जुन्या वर्गांची हस्तलिखितं वाचायला मिळत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्‍या सत्रात वर्गशिक्षक आपापल्या वर्गात हस्तलिखिताच्या विषयांची चर्चा घडवून आणून त्यावर्षीचा विषय ठरवत असतं. विषयांना तसच साहित्यप्रकाराला कुठलही बंधन नसे. (त्यामुळे डायनोसोरबद्दलच्या आमच्या एका हस्तलिखितात कोणीतरी डायनोसोर ह्या विषयी स्वतः केलेली कविताही दिली होती!). विषय निवडण्यात तसेच साहित्य निवडण्यात शिक्षकांचा हस्तक्षेप नसे, त्यांचं काम फक्त गाडी योग्य मार्गावर आहे ना ह्याची काळजी घेणे इतकच. साहित्य जमवणे (त्याकाळी इंटरनेट नसल्याने हे एक मोठच काम होतं), चांगलं अक्षर असलेल्या मुलांनी ते रंगीत कागदांवर लिहीणे, चित्र काढणे, अनुक्रमणिका, संपादकीय वगैरे लिहिणे अशी कामं वर्गशिक्षकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं करत असू. एकंदरीतच वय लहान असल्यान शक्यतो कोणी एक विद्यार्थी संपादक म्हणून नेमला जात नसे. अनुक्रमणिका / श्रेयनामावलीत आपलं नाव यावं म्हणून बरेच जण एखादं अगदी छोटं काम अंगावर घेत. लहान इयत्तांमध्ये आपण ठरवलेला विषय बाकीच्या वर्गांना कळू नये ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाई. पण साधारण आठवी नंतर सगळं सगळ्यांना आधीपासून माहीत असे आणि त्याचं फार काही वाटतही नसे. एकदा रंगीत कागदावर लिहिलं की ती अंतिम प्रत. मुद्रितशोधन वगैरे करायची संधी नाहीच. त्यामुळे मग शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी आणि झाल्याच तर त्या सुधारण्यासाठी बरेच कुटाणे करावे लागत. हस्तलिखिताचे कागद कामासाठी घरी नेणं म्हणजे एक मोठी जबाबदारी वाटत असे आणि त्यामुळे ते खराब होऊ नयेत म्हणून वर्तमानपत्राच्या कागदात लपेटणं, मग त्याला चुरगळू नये म्हणून पुठ्ठा लावणं, त्यावर प्लॅस्टिकची पिशवी लावणं आणि मग दप्तरात ठेवणं एव्हडे सोपस्कार केले जात.
पाचवीच्या वर्गात हा सगळाच प्रकार नवीन होता त्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. विषय काय घ्यायचा, नक्की लिहायचं काय वगैरे काहीच कल्पना येत नव्हता. चांगली गोष्ट म्हणजे त्या वर्षीच्या वर्गशिक्षिका शोभा साळुंके बाईंनी त्यांची मतं आम्हांला न सांगता काय काय विषय घेता येतील ह्याची छान चर्चा वर्गात घडवून आणली. खूप चर्चेअंती (आणि त्यामुळे झालेल्या गोंधळाअंती) आम्ही "अंकुर" असा विषय निवडला. आमचं माध्यमिक शाळेतलं पहिलचं वर्ष त्यामुळे आमची अवस्था नुकत्याच रुजलेल्या बिजातून निघालेल्या अंकुरासारखी आहे अशी काहीतरी अचाट कल्पना होती. आता ह्या विषयाबद्दल नक्की काय लिहायचं हे न कळल्याने सगळेच विषय चालतील असं ठरलं. गोष्टी, कविता, विनोद, माहितपर लेख, चित्र, व्यंगचित्र, कोडी असं अक्षरशः (स्वत: लिहिलेलं किंवा इकडून तिकडून ढापलेलं) मिळेल ते सगळं त्या अंकात होतं! साहित्य इतकं जास्त झालं की सांळुके बाईंनी बाकीच्या शिक्षकांंकडून त्यांच्या वर्गांचे उरलेले कागदही मागून आणले होते. एका मुलीने (ती पाचवीनंतर शाळा सोडून गेली, मला तिचं नाव आठवत नाहीये) चित्र आणि त्यावर काहीबाही कलाकुसर करून छान मुखपृष्ठ बनवलं होतं. आमचा विषय ठरल्यादिवशीच फुटला आणि त्यामुळे आमची खूपच नाचक्की झाली. त्यामुळे तो कोणी फोडला असेल ह्याकरता बाईंपासून प्रत्येकावर संशय घेऊन झाला होता! मी, प्रथमेश, चित्रलेखा, मृणाल, आदित्य गोगटे, मिरा पटवर्धन वगैरे मंडळींनी त्या अंकासाठी बरच काम केलं होतं. (अजुनही असतील पण मला ही नावं नक्की आठवत आहेत.)  मी स्वतः त्या अंकात बरच काही लिहिलंही होतं. उगीच ओढून ताणून जमवलेली एक गोष्टही लिहिली होती.
सहावीला 'फळ-एक वरदान' असा सोपा-सुटसुटीत विषय होता. अगदी नेहमीच्या आंबा, पेरू वगैरे फळांपासून ते भारतात न मिळणार्‍या परदेशी फळांपर्यंत बर्‍याच फळांच्या माहितीचं संकलन ह्या अंकात होतं. आमच्या बॅचचा नावाजलेला चित्रकार तुषार शिरसाटने क्रेयॉन्स (किंवा त्याकाळी मिळणारे तत्सम खडू वापरून) सगळ्या फळांची फार सुंदर चित्र काढली होती.  तुषार पेशंट्चे दात काढण्याबरोबर अजून चित्रही काढतो का ते त्याला विचारायला हवं. खरतर आमचे चित्रांचे कागद संपले होते पण आमच्या वर्गशिक्षिका पाखरे बाई चित्रकलेच्या शिक्षिका असल्याने त्यांनी वशिला लाऊन जास्तीचे कागद मिळवून दिले होते. एका मुलीने तिच्या आईच्या मार्गदर्शनाखाली (त्या ही बहुतेक चित्रकला शिक्षक होत्या) फळांच्या परडीचं मस्त चित्र मुखपृष्ठासाठी काढून आणलं होतं.
आम्ही सातवीत होतो त्यावर्षी मराठी साहित्य संमेलन होतं. आमचे वर्गशिक्षक राठोड सर आम्हांला मराठी शिकवायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आम्ही साहित्य संमेलनासंबंधी काहीतरी विषय निवडावा. पण आम्ही मुलांनी फारसा उत्साहं न दाखवल्याने त्यांनी आग्रह सोडून दिला. अखेर आम्ही 'तिर्थक्षेत्रे' असा विषय निवडला होता. देशभरातल्या बर्‍याच तिर्थक्षेत्रांची आणि देवळांची माहिती आणि फोटो त्या अंकात होते. माझी आज्जी त्याआधी काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन आली होती आणि तिने पिट्सबर्गला तिरूपती बालाजीचं देऊळ पाहिलं होतं. मी त्या अंकात कुठून कुठून शोधून त्या देवळाची माहिती लिहिली होती. (बहुतेक) हर्षद कुलकर्णीने कापूस आणि रंग वापरून मुखपृष्ठाला  थ्री-डी इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला होता.
ज्युरासिक पार्क सिनेमा आदल्याच वर्षी आलेला असल्याने आमच्या आठवीचा हस्तलिखिताचा विषय 'डायनोसोर्स पार्क' असा होता. डायनोसोर्स बद्दलची बरीच माहिती आणि चित्र ह्या अंकात होती. वर म्हटल्याप्रमाणे एक कविता आणि स्वप्नात डायनोसोर आला वगैरे काहीतरी कथानक असलेली एक कथाही ह्या अंकात होती. ह्या हस्तलिखिताचं काम करत असताना मुलं विरूद्ध मुली अशी बरीच भांडाभांडी झालेली. मुलींनी बनवलेल्या मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिकेवर आम्ही थोडी(शीच) टिका केली म्हणून चिडून वृषाली गटणेने तो कागद टराटरा फाडून टाकला आणि बाईंकडे तक्रार केली! मग आम्ही मुलांनी नवीन अनुक्रमणिका बनवून त्यावर मुलींच्या नावांमध्ये मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करणे इत्यादी प्रकार केले. शेवटी आमच्या वर्गशिक्षिका गोरबाळकर बाईंनी हस्तक्षेप करून त्या चुका सुधारायला लावल्या. सौमित्र देशपांडेने ह्या अंकात बरीच चित्र काढली होती. मुखपृष्ठही त्यानेच बनवलं होतं. एकंदरीत भांडाभांडीमुळे काम पूर्ण व्हायला बराच उशीर लागला होता आणि अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी मी, प्रथमेश आणि सौमित्रने एकत्र घरी बसून बरेच लेख लिहून काढले होते. पुढे इंजिनिअरींगला करायच्या 'सबमिशन'ची थोडीफार प्रॅक्टीस तेव्हा झाली होती हे नंतर समजलं.
नववीत जरा शिंग फुटली होती आणि त्यामुळे बरेच दिवस आम्ही हस्तलिखिताचा विषयच ठरवलाच नाही. शेवटी वेळ कमी उरल्यावर फार काही करता येणं शक्य नसल्याने 'निबंध' हा विषय आम्ही निवडला. थोडक्यात आमचं हे हस्तलिखित म्हणजे निबंधाचं पुस्तक होतं. मी दोन तीन विषयांवर निबंध लिहिले होते पण त्यातला एक विषय मला पक्का आठवतो आहे तो म्हणजे 'जाहिरातींचे युग'. तो निबंध मी सहामाही परिक्षेच्या पेपरात लिहिला होता आणि मराठी शिकवणार्‍या मनिषा कुलकर्णी बाईंनी तो वर्गात वाचून दाखवला होता. त्यामुळे लगेच रिसायकल केला. पुढे मी ऑफिसात आणि MBAच्या अभ्यासक्रमात डिजीटल अ‍ॅडव्हर्टाजींगच्या प्रोजेक्ट्स वर काम केलं पण जाहिरातींशी पहिला संबंध शाळेतच आला! ह्या अंकासंबंधी अजून एक गोष्ट म्हणजे ह्या अंकांच संपादकीय मी लिहिलं होतं. मी लिहिलेल्या मसुद्यात आमच्या वर्गशिक्षिका जोग बाईंनी अगदी किरकोळ बदल सुचवून ते फायनल केलं होतं. त्यावेळी खूप भारी वाटलं होतं!!
दहावीला महत्त्वाचं वर्ष असल्याने हस्तलिखितावर फार काम केलं नव्ह्तं किंबहुना शाळेने करू दिलं नव्हतं. लिहायला कमी हवं म्हणून आमचा विषय होता 'कविता'. दहावीचं वर्ष असल्याने आमच्या वर्गशिक्षिका अत्रे बाई अंकाचं काम घरी नेऊ द्यायच्या नाहीत. जे काय करायचं ते वर्गात करा. त्या अंकासंबंधी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात देण्यासाठी मी एक कविता केली होती! मला कविता अजिबात कळत नाहीत आणि त्यामुळे आवडत नाहीत. पण तेव्हा काय स्फुरण चढलं काय माहीत. ती कविता लिहिलेलं चिठोरं माझी आज्जी नंतर बरीच वर्ष तिच्या पर्समध्ये घेऊन फिरायची आणि लोकांना  कौतूकाने दाखवायची. ते आठवून आता फार हसू येतं. ह्या अंकाच्या निमित्ताने सुमंत तांबेने खूप अवघड, न कळणार्‍या कविता केल्याचं आठवतं आहे. सुमंतने नंतर कविता केल्या का ते माहीत नाही. बहुतेक ऋच्या मुळेने ही ह्या अंकात एकापेक्षा जास्त कविता लिहिल्या होत्या. ह्या अंकाने बर्‍याच जणांना काव्यस्फुरण दिलं हे मात्र खरं. 'काव्यसरिता' असं नाव नदीच्या प्रवाहाच्या आकारात लिहिलेलं मुखपृष्ठ सौमित्रने बनवलेलं आठवतय.
हस्तलिहखितांचा हा उपक्रम शाळेत अजून सुरू आहे की नाही ते माहीत नाही आणि असल्यास त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो की नाही ह्याबद्दल उत्सुकता आहे. नेहमीचे प्रचलित उपक्रम नसलेल्या किंवा अगदीच साध्या पद्धतीने पार पाडणार्‍या आमच्या शाळेने ह्या हस्तलिखिताच्या उपक्रमाद्वारे एक वेगळाच अनुभव आम्हाला दिला आणि त्यामुळे त्याच्या चांगल्या आठवणी आज  माझ्याजवळ आहेत. शाळेचे ह्याबद्द्ल नक्कीच आभार मानायला हवेत!