कंफर्ट फूड

सध्या वर्क फ्रॉम होमच्या काळात नवीन नवीन खाद्यपदार्थ घरी करून बघणं सुरू आहे कारण बाहेर जाऊन  खाणं किंवा बाहेर जाणं तितकं शक्य नाहीये. कधी चवी, अंदाज बरोबर येतात कधी चुकतात. तसच एकदा अंदाज चुकून काही बाही उरलं होतं आणि त्यामुळे सकाळच्या जेवणाला असच बरच उरलं सुरलं खाल्लं गेलं. संध्याकाळी फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि गरम गरम वरण भात, त्यावर लिंबू आणि तुप असं कालवून पहिला घास खाल्ल्यावर एकदम "अहाहा!" झालं. रियाला म्हंटलं "वरण भात म्हणजे माझं अगदी कंफर्ट फूड आहे!" तिने विचारलं "कंफर्ट फूड म्हणजे काय?" तिला म्हटलं असं फूड जे खाल्ल्यावर अतिशय समाधान मिळतं किंवा मराठीत सांगायचं तर 'कंटेट फिलींग' येतं. 


नंतर विचार करत  होतो की खरच माझ्यासाठी अश्या 'कंफर्ट फूड' प्रकारात काय काय येतं?
वर लिहिलं तसं गरम वरण भात तर नक्कीच. पण एकंदरीतच 'भात'. मागे आम्ही यल्लोस्टोन नॅशनल पार्कला गेलो होतो त्यावेळी आम्हाला पार्कच्या आत हॉटेल बुकींग मिळालं होतं. ते प्रवासाच्या दृष्टीने फायद्याचं होतं. पाच दिवस पार्कात मनसोक्त भटकंती झाली, निसर्गाचे भरपूर अविष्कार पाहून झाले. पार्कच्या आतल्या हॉटेलांमध्ये खाण्याची सोय चांगली होती. इटालियन, अमेरिकन, तसेच ब्रेकफास्टचे पदार्थ चांगले मिळायचे. पण सहाव्या दिवशी जेव्हा आम्ही सॉल्ट लेक सिटी एअरपोर्टवर विमानात बसण्याअधी जेवणाचा विचार करत होतो, तेव्हा दोघांनाही एकदम भात खायची इच्छा झाली. तिथे एअरपोर्टवर तर वरण भात मिळणं शक्य नव्हतं. मग एक चायनीज रेस्टॉरंट शोधून मस्त एग राईस खाल्ला!  गेल्यावर्षी पॅरिसमध्ये फिरत असताना खादाडीही मनसोक्त केली. फ्रेंच खाणं तसच तिथल्या बेकर्‍या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बरेच वेगवेगळे पदार्थ चाखले. ट्रीपच्या शेवटी एका संध्याकाळी मोनमार्ट एरियातल्या बेसिलीकाला गेलो. अंधार पडल्यावर आणि डोंगरमाथ्यावर थंडी वाजायला लागल्यावर पायवाटेने खाली आलो. पायथ्याशीच्या गल्ल्यांमध्ये मोठ्यासंख्येने विविध प्रकारची रेस्टॉरंट होती. सहज बघत असताना एक भारतीय रेस्टॉरंट दिसलं! रिया पटकन म्हणाली, चला तिकडे जाऊया. साधारण परदेशातली भारतीय रेस्टॉरंट म्हणजे पंजाबी असतात पण हे बंगाली / बांग्लादेशी निघालं. काहीतरी फॅन्सी नाव असलेली एक डाळ मागवली. पंचफोडण घातलेली तुपाची फोडणी दिलेली हरभर्‍याची डाळ आणि त्याबरोबर तुप जिर्‍यात हलकेच परतलेला जरासा फडफडीत भात. आम्ही खरतर ट्रीपला गेल्यावर भारतीय रेस्टॉरंटांमध्ये जाणं टाळतो पण हे कॉम्बिनेशन इतकं चविष्ट तरीही सात्त्विक लागलं की पूर्ण ट्रीपभर खालेल्ल्या मैदा, साखर, बटर, चॉकॉलेट, चिकन, मासे आणि विविध जलचरयुक्त पदार्थांचं एकदम उद्यापन झाल्यासारखं वाटलं.
अमेरिकेत आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकंती करत असतो. ट्रीपला गेल्यावर सकाळी भरपेट नाश्ता करून निघायचं, दुपारचं जेवण अगदी साग्रसंगीत न करता काहीतरी सटरफटर खायचं आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं असा आमचा साधारण दीनक्रम असतो. संध्याकाळ झाली की हे बघून मग जेऊ, ते बघून जेऊ करता करता सगळ्यांना एकदम भुकेचा अ‍ॅटॅक येतो आणि मग डोकी फिरून भांडाभांडी व्हायला लागते. अश्यावेळी मदतीला धाऊन येतं ते म्हणजे 'चिपोटले'! चिपोटले ह्या मेक्सिकन चेनमध्ये मिळणारा 'बरिटो बोल' म्हणजे मोकळा पण मऊ शिजवलेला लेमन सिलँट्रो राईस, त्यावर परतलेल्या भाज्या, शिजवलेला राजमा, सालसा, तिखट सॉस, अगदी अर्धा चमचा सावर क्रीम आणि लेट्युसची बारीक चिरलेली पानं. अगदी पटकन मिळणारं, चविष्ट आणि स्वस्त असं हे खाणं अगदी 'कंफर्ट फूड' आहे कारण अर्थातच त्यातला भात!
पुलाव, मसालेभात, बिर्याणी बरोबरच लोकांकडून ऐकून, कधी नेटवर बघून आम्ही भाताचे बरेच प्रकार म्हणजे बिसीवेळे अन्ना, लेमन राईस, पुदीना राईस, कुकरमध्ये शिजवलेला नारळीभात, टँमरींड राईस, पावभाजी मसाला घातलेला तवा पुलाव, पनीर राईस वगैरे बरेच प्रकार घरी करत असतो. सगळ्यात जास्त म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडीही तर अगदी दर आठवड्याला होते. गोड पदार्थ जसे बिघडले तरी संपायचा कधीही प्रश्न येत नाही तसेच मुळात भात सगळ्यांना आवडत असल्याने भातही खूप उरला, कोणी खातच नाही वगैरे प्रश्नच येत नाही!

कंफर्ट फूड मध्ये मोडणारा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे भाताचच मावस भावडं असलेले पोहे!  आमच्या घरी अनेक वर्षांपासूनची पद्धत म्हणजे रविवारी सकाळी नाश्याला पोहे! गोळा न झालेले, तसच कोरडे न पडलेले, नीट शिजलेले पण फडफडीत न झालेले, दाणे नसलेले, लिंबू पिळलेले आणि वरून खोबरं कोथिंबीर घातलेले पोहे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख. मला पोह्यांंमध्ये दाणे खरतर आवडत नाहीत कारण ते मधेमधे येतात. पण सासर सोलापुरी असल्याने आमच्या पोह्यांमध्ये हल्ली दाणे आले आणि खोबरं गेलं!  पोह्यांच्यावर काही घालायचं असेल तर मला फक्त बारीक (नायलॉन) शेव आवडते, फरसाण किंवा स्वतःची वेगळी चव असलेल्या इतर शेवा वगैरे नाही आवडत. फोडणीचे पोहे हे एकतर घरचे खावे किंवा ट्रेकला जाताना गडाच्या पायथ्यापशी असलेल्या गावांमधले.  शहरांमधले पोहे मला तरी खाववत नाहीत. फोडणीच्या पोह्यांच्या दोन अगदी लक्षात राहीलेल्या चवींपैकी एक म्हणजे दिवेआगरला बापटांच्या घरी नाश्त्याला मिळालेलेल पोहे. कुठल्याही प्रकारची फॅन्सी रेसिपी नसलेले अगदी घरगुती आणि वर घरामागच्या झाडाच्या नारळाचं पांढरं शुभ्र खोबरं! केवळ अफाट चव. आणि दुसरे म्हणजे अटलांटाला 'स्नो-डे'च्या दिवशी आमचे मित्र विनायक आणि पूर्वा ह्यांच्या घरी खालेल्ले खमंग कांदे पोहे. खरतर स्नो फॉलमुळे रस्ते बंद व्हायच्या आधी घरी पोहोचायचं होतं पण पूर्वा म्हणाली पटकन पोहे करते ते खाऊन जा. थांबलो ते बर झालं! ह्या दोन्ही पोह्यांची चव आजही लक्षात आहे. 

मागे माझ्या ऑफिसमध्ये अचानक मध्यप्रदेशी लोकांची संख्या वाढली होती. त्यांच्याकदून इंदुरी वाफवलेल्या पोह्यांबद्दल ऐकलं ते दिसतात फोडणीच्या पोह्यांसारखेच पण फोडणी नसते आणि अगदी कमी तेल लागतं. आम्ही नेटवर रेसिपी बघून ते करून बघितले. हल्ली कधीकधी ते पण करतो. चव वेगळी लागते आणि फोडणीच्या पोह्यांइतके खमंग नसल्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवा त्यावर घालून खाण्याची पद्धत असावी.  पोह्यांचा अजून एक प्रकार म्हणजे दडपे पोहे. आम्ही इथे दडपे पोहे फार केले नाहीत पण हल्ली हल्ली करायला लागलो आहोत.
पोह्यांच्या अजून एक इंटरेस्टींग प्रकार म्हणजे कोळाचे पोहे. हे आम्ही पहिल्यांदा खाल्ले ते दादाचं लग्न झाल्यावर वहिनीच्या माहेरी. दिवाळीला फराळाबरोबर अजून एक काहितरी 'मेन डिश' पाहिजे म्हणून चिंचेचा कोळ आणि नारळाचं दुध घालून केलेल हे पोहे एकदम मस्त लागले. फराळाच्या तळलेल्या पदार्थांबरोबर हा एकदम हलकी आंबट गोडसर चव असलेला पदार्थ छान वाटतो. आता आमच्या घरीही नरकचतुर्दशीला फराळाबरोबर हे पोहे करतात. मराठी लोकांमध्ये 'कांदेपोहे' सुप्रसिध्द आहेतच पण गंमत म्हणजे इतक्या 'बघाबघ्या' करूनही मला एकदाही कांदेपोहे मिळाले नाहीत. फारच घिसपिटं नको म्हणून हल्ली लोकांनी मेन्यू बदलला असावा. पोहे आवडत असले तरी मला भाजक्या पोह्यांचा चिवडा मात्र फारसा आवडत नाही!  एकंदरीतच चिवडा (लक्ष्मीनारायणचा आणि चितळ्यांचा बटाट्याचा चिवडा वगळता) आवडत नाही. 

कंफर्ट फूड प्रकारात मोडणारा तिसरा प्रकार म्हणजे चहा! चहाबद्दल इतकं बोललं आणि लिहिलं जातं की चहाचं वर्णन करण्याकरता अजून नवीन लिहिण्यासारखं काही नाही. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही हवामानात, कुठल्याही ऋतुत आणि कशाही बरोबर (किंवा शिवाय) चहा चालतो.  सगळ्यात आवडणारा चहाचा प्रकार अर्थातच आपला भारतीय पध्दतीने उकळून, त्यात साखर, दुध घालून केलेला चहा. डिपडिप, ग्रीन टी, लेमन टी वगैरे हा खरा चहा नाहीच! चहाच काही घालायचच असेल तर आलं किंवा फारतर गवती चहा. वेलची-बिलची घालून केलेला चहा घशाखाली जात नाही. गेल्या वर्षाभरापासून आम्ही बिनसाखरेचा चहा पितो. सुरुवातीला चव आवडायला वेळ लागला पण आता तसाच बरा वाटतो. इथे अमेरिकेत बाहेर गेल्यावर आपल्या सारखा चहा मिळणं कठीण होतं पण ती तहान काही प्रमाणात स्टारबक्सच्या चाय-टी लाटेवर भागवता येते. 'फाईव्ह पंप्स, नो वॉटर, एक्स्ट्रा हॉट' अशी ऑर्डर दिली की जे काय मिळतं ते आपल्या शंकर विलास हिंदू हॉटेलच्या बरच जवळ जाणारं असतं! बिनसाखरेचा चहा प्यायला लागल्यापासून हा चायटी लॅटेही फार गोड लागायला लागला आहे. प्रवासादरम्यान खूप तंगडतोड झाली असेल तर मात्र तो चांगला वाटतो.  माझ्या दोन्ही आज्जा एकदम चहाबाज! मला लहानपणी दुध पचत नसल्याने मला आठवतं तेव्हा पासून मी सकाळी आणि दुपारी चहाच पित आलो आहे. दोन्ही आज्जा 'काही होत नाही.. पिऊ देत चहा' असं म्हणून त्याचं समर्थनच करायच्या. मला खात्री आहे की दोघींनी मला तान्हेपणी बाटली घालून चहा पाजला असणार. दुपारी विचित्र वेळेला शाळा, कॉलेज, क्लासला जायच्या आधी आज्जी न कंटाळता उठून मला चहा करून द्यायची.
मोडक आज्जीकडे तर त्यांच्या घरी जाऊन चहाला नको म्हणणारी व्यक्ती तिच्याकरता कायमची 'बॅड बुक' मध्ये जात असे. त्यामुळे आमचं लग्न ठरल्यावर शिल्पाला जेव्हा पहिल्यांदा आज्जीला भेटायला नेलं होतं तेव्हा बजावलं होतं की बाकी कशीही वाग / बोल / खा / खाऊ नकोस पण चहाला नाही म्हणू नको, नाहीतर काही खरं नाही! शिल्पाला चहा फारसा आवडत नसल्याने सध्या बरेचदा माझा मलाच चहा करून प्यावा लागतो. पण रिया थोडी मोठी झाली की मी तिला शिकवणार आहे. ती मी सांगेन तेव्हा चहा करून देईल ह्याची अजिबात खात्री नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? 

हे सगळे माझ्यासाठी कंफर्ट फूडचे प्रकार असले तरी आम्ही 'आऊट ऑफ कंफर्ट झोन' मधलेही प्रकार खूपदा खाऊन बघतो. त्या सगळ्या प्रकारांबद्दल नंतर कधीतरी...

0 प्रतिसाद: