पयलं नमन..

ह्यावर्षी उगीच काहीतरी फॅड म्हणून वर्ष पालटत असताना ब्लॉग अपडेट करायचं ठरवलं. म्हणजे तसं ठरवलं नव्हतं, पण रियाने ठरवलेल्या प्लॅननुसार सिनेमा बघण्यासाठी जागत बसेलेलो असल्याने वेळ झालीच आणि मग ठरवलं होतं ते लिहायला घेतलं. ह्या वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकांबद्दल लिहिलं होतं. घरात असलेल्या पुस्तकांची यादी केली होती आणि ह्यातली न वाचलेली जास्तीत जास्त पुस्तकं वाचून काढायची असं ठरवलं होतं.  सगळी वाचून संपलेली नाहीत पण गेल्यावर्षीपेक्षा जाणवण्याइतपत वाचन जास्त झालं, आहे हे ही नसे थोडके. तर आज ह्या वाचून झालेल्या पुस्तकांविषयी.

आत्ता आढावा घेत असताना असं लक्षात आलं आहे की इंग्रजीतलं फक्त एकच पुस्तक वाचून झालं आहे आणि ते म्हणजे क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मणचे आत्मचरित्र. त्या काळातल्या चार प्रसिद्ध भारतीय खेळाडूंपैकी (किंवा बॅट्समनपैकी) लक्ष्मण हा माझा सर्वात कमी आवडता. एकतर त्याच्या खेळात सातत्याचा अभाव होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे मुंबईच्या अमोल मुझुमदारवर अन्याय झाला असं मुंबई फॅन म्हणून मला वाटायचं. पण त्याचं आत्मचरित्र हे सचिन आणि गांगुलीच्या आत्मचरित्रांपेक्षा खूपच उजवं वाटलं. सचिनचं पुस्तक हे जरा जास्तच सहज सोपं आणि 'पॉलीटीकली करेक्ट' प्रकारातलं आहे तर गांगुलीचं जरा जास्तच नकारात्मक आणि उथळ आहे. त्यामानाने लक्ष्मणने पुस्तक प्रामाणीकपणे लिहिलं आहे. विवादास्पद गोष्टी बर्‍याच परखडपणे लिहून टाकल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे जडणघडणीतले सगळे टप्पे नीट लिहिले आहेत. आता द्रविड आणि कुंबळे आपापली पुस्तके कधी लिहितात ह्याची वाट बघतो आहे.

मराठी पुस्तकांपैकी वाचलेलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे चार नगरांतले माझे विश्व' हे डॉ. जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र. सुमारे ६०० पानांमध्ये डॉ. नारळीकरांनी बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे इथे रहातानांचे आपले अनुभव तपशीलवार सांगितले आहेत. अर्थात ह्यात बनारस आणि केंब्रिजबद्दलचे वर्णन बरेच जास्त आहे. साधारणपेण कर्तुत्ववान माणसांच्या आत्मचरित्राचा हालाखीतले लहानपण, लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत, मग यशाची 'पहिली पायरी' आणि मग यश असा ढाचा परिचित असताना, ह्या पुस्तकात मात्र घरची शैक्षणिक पार्श्व्भुमी (वडील रँगलर, बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक, आई संस्कृत शिकलेली, काका, मामा सगळे विविध विषयातले तज्ज्ञ), आर्थिक सुबत्ता, उपजत हुशारी, खणखणीत यश आणि मोठ्या लोकांचा परिचय आणि सहवास हा वेगळा पॅटर्न वाचायला छान वाटला. केंब्रिजच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी पाहिलेलं ब्रिटन आणि इतर युरोप ह्याचं वर्णन वाचायला छान वाटतं. क्रेंब्रिजमध्यल्या त्यांच्या संशोधनाबद्दलही त्यांनी अतिशय सोप्प्या शब्दांत लिहिलं आहे. त्यामानाने TIFR मध्ये असताना केलेल्या संशोधनाबद्दल फार तपशिल येत नाहीत. अनेक मोठ्या लोकांची नावं आणि त्यांच्याशी डॉ. नारळीकरांनी केलेला सुसंवाद, व्यवहार ह्याबद्दल वाचायला भारी वाटतं. (उदा. लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, स्टिफन हॉकिंग, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. अब्दुल कलाम, राणी इलिझाबेथ, डॉ. मनमोहन सिंग, महाष्ट्राचे विविध मुख्यमंत्री, विक्रम साराभाई ई).
काही खटकलेल्या गोष्टींबद्दल त्यांनी बर्‍यापैकी स्पष्ट हातचं न राखता लिहिलं आहे. उदा. अपूर्वाई पुस्तकात पुलंनी केलेला डॉ. नारळीकरांचा अनुल्लेख, त्यांच्या करियर मुळे पत्नीच्या करीयरची झालेली ओढाताण, TIFR आणि नंतर आयुका दरम्यान अनुभवलेलं राजकारण
आयुकाच्या स्थापनेच्या आणि जडणघडणीच्या काळातले अनुभव अतिशय वाचनीय आहेत! इतकी वर्ष पुण्यात राहून मी एकदाही आयुकात गेलेलो नाही ह्याची हे पुस्तक वाचल्यावर फारच खंत वाटली.

ऋषिकेश गुप्ते लिखीत 'दंशकाल' वाचलं. मागच्यावर्षीच आणून ठेवलं होतं पण वाचायचं राहून जात होतं. पुस्तकातलं 'स्टोरी टेलिंग' खूप भारी आहे. शृंगार, शौर्य, क्रौर्य, बिभत्स, गुढ, रहस्य, भिती असे अनेक रस ह्या 'नानू'च्या कथेत येतात. कथेतला नानू जसा मोठा होत जातो तशी पुस्तकातली भाषाही बदलत जाते, त्या वयाला साजेशी होत जाते. लेखकाने उभ्या केलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा एकदम जोरदार आहेत. गावातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथली भाषा ह्याचं बरोबर नंतर शहरातलं वातावरण हे सगळं लेखकाने एकदम बारकाव्यांनिशी उभं केलं आहे. गोष्ट सांगताना, मधेच पुडी सोडून दिल्यासारखा एखादा मुद्दा येतो आणि नंतर त्याबद्दलचा सविस्तर तपशिल येतो. त्यामुळे असा कुठला नवीन उल्लेख दिसला की पुढे काय असेल ह्याबद्दल उत्सुकता वाटत रहाते. काही ठिकाणी मधली मधली विवेचनं जरा रेंगाळतात. तर काही ठिकाणी बिभत्स आणि अतिवास्तववादी वर्णन खूप अंगावर येतात! एकदा तर रात्री झोपायच्या आधी हे पुस्तक वाचल्यावर मला भितीदायक स्वप्न वगैरे पडून मध्यरात्री जाग आली होती!

असाराम लोमट्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचला. लेखकाच्या आधीच्या वर्षी दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या दीर्घकथा ह्यात आहे. सगळ्या कथा ग्रामिण पार्श्वभुमीच्या असल्या तरीही गोष्ट सांगायची भाषा ही प्रमाण भाषा आहे, शिवाय सहज कुठल्याही पार्श्वभुमीवर 'पोर्ट' करता येतील अश्या कथा असल्याने मला हा कथासंकथाह खूप आवडला. कथांमधली वर्णन घटना आणि व्यक्तिरेखा अगदी डोळ्यासमोर उभ्या करतात.

जंगलावरची पुस्तकं हवी होती म्हणून दत्ता मोरसे लिखित 'झुंड' आणलं होतं,  ते वाचलं. हे पुस्तक वाचताना मला गेम ऑफ थ्रोनची आठवण होत होती. म्हणजे काहीतरी चांगलं छान सुरू आहे असं वाटताना अचानक एखादी भयंकर पण वास्तववादी घटना येते आणि सगळा नुरच बदलतो. वारंवार धक्के देण्यार्‍या ह्या पुस्तकात जंगलाच सुंदर पण वास्तववादी वर्णन आहे.

झी मराठीवरच्या सिरीयलमुळे माहित झालेलं नारायण धारपांचं 'ग्रहण' वाचलं. पुस्तक ठिकच वाटलं आणि त्यावरून म्हणून काढलेली सिरीयल अगदी काहीच्या काही होती! कदाचित ज्या काळात आलं, त्या काळात हे पुस्तक भारी वाटलेलं असू शकेल.
'कॉफी टेबल बूक्स' प्रकारातली प्रिया तेंडूलकरांचं 'असही' आणि जयप्रकाश प्रधानांची 'ऑफबीट भटकंती' ही पुस्तकं अधेमधे वाचत असतो. दोन्ही पुस्तकं छान आहेत. सलग बसून वाचण्यासारखी नाहीत पण अधेमधे एखादा लेख वाचायला छान वाटतं. 
यंदा जरा शहाणपणा करून फक्त चारच दिवाळी अंक मागवले होते. मुशाफिरी, मौज, समदा आणि लोकसत्ता. जेव्हडं वाचून झालय त्यावरून चारही अंक चांगले वाटले. त्यातल्या आवडलेल्या लेखांबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन.

ह्यावर्षी बरच वाचून झालेलं असलं तरी बरच वाचायचं बाकीही आहे! निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे 'बूक अबाऊट बूक्स' प्रकारातलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. सुरुवातीला बरीचशी पानं सलग वाचली पण नंतर मात्र कंटाळा आला. आता ते पूर्ण करेन.  शिवाय हॅरी पॉटर सिरीज सुरू केली आहे ती पण पूर्ण करायची आहे! इंग्रजी वाचनही जरा वाढवायचं आहे. नवीन लेखकांची इंगजी पुस्तक वाचायची आहेत. नॉन-फिक्शन प्रकारातली पुस्तकं विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतीय  राजकारणाबद्दल वाचायची आहेत आणि एकूणच नॉन-फिक्शन कसं आवडून घ्यावं ह्याबद्दल प्रयत्न करायचे आहे. बघूया कसं काय जमतय ते! 

सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा !

0 प्रतिसाद: