जिंदगी "गुलझार" है!

आमचं व्हॅंकुअरला यायचं ठरल्यापासूनच इथे आल्यावर काय काय करायचं, कुठे कुठे जायचं ह्याविषयीची ठरवाठरवी करणं सुरू झालं होतं. तेव्हाच दरम्यान स्वरदाकडून समजलं की त्यांचा गाण्याचा कार्यक्रम व्हॅंकुअरला ठरतो आहे आणि ह्यावेळी गुलझारांच्या गाण्यांचा आहे. नीश एंटरटेनमेंटतर्फे वेगवेगळ्या विषयांवरचे सांगितीक कार्यक्रम सादर केले जातात, त्याच प्रकारचा कार्यक्रम असेल असं आम्हांला वाटलं पण जसा त्यांच्या अमेरिका दौरा सुरू झाला आणि फेसबूकवर अपडेट यायला लागले तेव्हा कळलं की हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, 'गुलझार - एक एहसास' असं ह्या कार्यक्रमाचं नाव असून 'नीश'चे कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असं समजलं. ह्यावेळी गुलझार साहेब स्वतःही येणार आहेत. त्यांच्याशी गप्पा, शेरोशायरी आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्यांची मैफिल असं काहीसं कार्यक्रमाच स्वरूप असणार आहे!  भारतातून इथे येणार्‍या कलाकारांच्या विशेषतः मराठी कलाकरांच्या कार्यक्रमांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर ते इथे यायचं कमी किंवा बंद करतील, त्यामुळे तसं होऊ न देण्याला तेव्हडाच आपला हातभार म्हणून अश्या कार्यक्रमांना तसच नाटकं, सिनेमे इथे येतात त्यांच्या प्रयोगांना आम्ही एकानेतरी जायचा प्रयत्न करतो. त्यातून नीश एंटरटेनमेंटचे कार्यक्रम तर नेहमीच दर्जेदार असतात त्यामुळे त्यातली कलाकार मंडळी आणि ती ही नात्यातली / चांगल्या ओळखीची, त्यामुळे आम्ही आमची तिकीटं काढली होतीच पण गुलझार साहेब स्वतः येणार आहेत हे कळल्यावर उत्साहं अजूनच वाढला.

स्वरदा आणि टीम कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी व्हॅंकुअरला पोहोचणार होती. त्यामुळे ते परस्पर थिएटरलाच जाणार होते. शिल्पाने स्वरदाला फोन करून विचारलं की तुमच्या टीमसाठी काही खायला प्यायला आणायचं आहे का? त्या त्या शहरातले संयोजक तशी सोय करतातच पण तरीही मोठ्या दौर्‍यात घरचं खाणं आणि त्यातही विशेषत: आपला उ़कळलेला चहा ह्याची आठवण होते.  स्वरदानेही चहा नक्की आण, खायचं काय ते कळवते असं सांगितलं. थोड्यावेळाने फोन आला की टीमशी बोलत असताना गुलजार साहेब म्हणाले की घरून काही आणणार असतील तर त्यांना पोहे आणायला सांग, मला महाराष्ट्रीयन पोहे खूप आवडतात. नंतर तिचा पुन्हा मेसेज आला की खूप पोहे आण असं टीम म्हणते आहे! बाकी मंडळी ओळखीची घरची होती, पण साक्षात गुलजारांसाठी पोहे न्यायचे म्हणजे मोठच काम. शिवाय क्वांटीटी वाढली की क्वालीटीचा भरोसा नाही. त्यामुळे शिल्पा आणि आईला पोह्यांचं एकदम टेन्शनच आलं. शिवाय गुलजार साहेब स्वतः भेटणार तर त्यांच्याशी बोलायचं काय हा अजून एक प्रश्न. कारण आपल्या हिंदीचा आनंद आणि कविता/गजलांची समज ह्याचा तर त्याहूनही आनंद! त्यामुळे मी विकीवर वाचायला सुरुवात केली आणि कार्यक्रम आधी पाहून आलेल्या आणि कविता-गझलांमधल्या तज्ज्ञ आणि गुजझार फॅन असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला पिंग केलं. एकीकडे पोहे तयार होत होते. चहासाठी थर्मास काढला, काहीतरी गोड हवं म्हणून इथल्या स्पेशल मेपल कुकीज आणल्या. सगळं पॅक केलं आणि आम्ही कार्यक्रमाच्या तब्बल तीन तास आधी घरून निघालो (एरवी असतं तर कदाचित पहीलं गाणं बुडलं असतं!!).

थिएटरमध्ये पोहोचलो तर फक्त मिलिंद ओक आणि तेजस देवधर दोघेच जणं आले होते. बाकी मंडळी एअरपोर्टवरून हॉटेलला गेली होती. तेजस आणि ओक सरांचा सेटअप तसेच साऊंड चेक सुरू होता. त्यांच्याशी अधेमधे बोलणं सुरू असतानाच स्वरदा आणि बाकीची टीम म्हणजे गायक जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे आणि स्थानिक संयोजक मंडळीही  आली. गुलझार साहेब आणि कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेणार्‍या रक्षंदा जलिल अजून आल्या नव्हत्या. सगळ्यांनी चहा, खाणं सुरू केलं, ग्रीन रूममध्ये गप्पा टप्पा, एकीकडे त्यांची तयारी सुरू असतानाच थिएटरमधल्या मंडळींनी गुलझार साहेबांची गाडी येऊन पोहोचल्याचं सांगितलं. त्यांना बसण्यासाठी ग्रीनरूमच्या मध्यावर असलेली जागा तयार केली होती. तिथे चांगले सोफे, चांगल्या कपबश्या, प्लेट वगैरे मांडणी होती. आणि गुलझार साहेब आणि रक्षंदा बाईंनी ग्रीन रूममध्ये प्रवेश केला. पांढरा शुभ्र लखनवी कुर्ता पायजमा, त्यावर पांघरलेली शाल, चष्मा आणि चेहेर्‍यावर दिसणारं कलेचं तेज.. असच तेज कलेची आयुष्यभर उपासना करणार्‍या किशोरी आमोणकर, लतादिदी, आशाताई ह्यांच्या चेहर्‍यांवरही जाणवतं. ८६ वय असूनही स्वतःच स्वतः ताठ चालणं, सुस्पष्ट बोलणं आणि रुबाबदार पण तितकच अतिशय डाऊन टू अर्थ, समोरच्याला आपलसं करून टाकणार व्यक्तिमत्त्व. आल्यावर ते दोघेही बाहेरच्या सोफ्यांवर न बसता थेट खोलीत येऊन आम्ही बसलो होतो तिथे येऊन आमच्या बरोबर साध्या खुर्च्यांवरच बसले. सगळ्यांची विचारपूर केली. स्वरदाने आमची ओळख करून दिल्यावर आमचीही चौकशी केली. मला खरतर कोणालाही पटकन नमस्कार करायचं लक्षात येत नाही पण गुलजार साहेबांना मात्र उत्स्फूर्तपणे वाकून नमस्कार केला गेला. गुलजार साहेब मला बस म्हणाले पण खरतर त्यावेळी काहीच सुचत नसल्याने मी नुसताच तिकडे उभा होतो. शिल्पाने दरम्यान त्यांना पोहे दिले. तर ते पुन्हा एकदा "बैठो बेटा, खडे मत रेहेना" म्हणाले.  आणि मला अचानक उर्दू मिश्रीत हिंदी बोलायचा अ‍ॅटॅक आला! मी त्यांना म्हटलं, आपके सामने बैठने की हम जुर्र्त नही कर सकते..  (मनातल्या मनात कपाळाला हात लावला!) आता बोलून तर बसलो होतो, बरोबर आहे नाही माहीत नाही. त्यावर ते म्हणाले, "नही बेटा इतनी तकल्लूफ ना करो". आता तकल्लूफ म्हणजे काय हे अर्थातच मला माहीत नसल्याने नक्की काय करायचं नाही हे न कळून मी चुपचाप शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलो. (माझी ती मैत्रिण म्हणाली होती की उर्दू contagious असते. ते खरं होतं म्हणायचं.). दरम्यान रक्षंदा बाई काही काही बोलत / विचारत होत्या. मधेच त्या म्हणाल्या, "अच्छा तो आप स्वरदा के ननंदोई हो इसलिये यहा आये हो ?" आता पुन्हा ननंदोई म्हणजे काय ते कळायला काही सेकंद गेले. पण मी हो म्हणून टाकलं. अर्थ लागल्यावर म्हटलं तश्या बर्‍याच ओळखी आहेत आमच्या ! ओक सरांना बरेच वर्ष ओळखतोय, स्वरदा माझ्या मित्राच्या मित्राची बहीण म्हणून आधीपासून माहीत होती, शिवाय तो तेजस माझ्या बहीणीचा मित्र आहे.. फक्त बायकोच्या माहेरची ओळख नाही कै! अर्थात हे सगळं मनातल्या मनात!! त्यांनी उर्दूमिश्र हिंदीत अजून काही विचारलं असतं तर काय घ्या? दरम्यान गुलझार साहेबांना तुमची गाणी खूप आवडतात, अनेक वर्ष ऐकत आलो आहे, वगैरे ठरवलेल्या गोष्टी सांगितल्या. मेरा कुछ सामानची गोष्ट तुमच्या तोंडून प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकायला मिळेल ना असं विचारलं. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. नंतर त्यांनी पोह्यात कलौंजी घातली आहे का? चहात मसाला घातला आहे का? वगैरे एकदम घरगुती प्रश्न विचारले. शिल्पाने सरसो आहे सांगितल्यावर रक्षंदा बाईंनी हे सरसो नाही, ही राई, सरसो म्हणजे राईची मोठी बहीण अशी माहिती दिली. पुन्हा मघाचचाच विचार करून हो म्हणून गप्प बसलो. गुलझार साहेबांनी सगळ्यांना तुम्ही खाल्लं का? चहा घेतला का वगैरे चौकशी केली. ह्या मोठ्या लोकांना आपण त्या ग्लॅमरमधून बघतो पण अर्थात ती घरात साधी माणासच असतात. गुलझार साहेबांना भेटून तर हे फार जाणवलं. थोड्यावेळाने स्टेज तयार आहे, इथले फोटो काढून झाले की कार्यक्रम सुरू करू असं संयोजक सांगायला आले आणि मग सगळ्यांना शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर गेलो. स्वरदा, जितेंद्र ह्यांना मी आधी भेटलेलो होतो पण ऋषिकेश रानडेला मी पाहिल्यांदाच भेटलो, तो पण सध्याचा प्रसिद्ध गायक आहे त्यामुळे एकदम सेलिब्रिटी आहे. सुरूवातीला मला त्याच्याशी बोलताना जरा फॉर्मल वाटत होतं. पण गुलझार साहेब आल्यावर आणि त्यांच्याशी एकदम घरगुती स्वरूपातलं बोलणं झाल्यावर  ऋषिकेश एकदम आपल्यातला, घरचाच वाटायला लागला!

कार्यक्रमाच्या सुरूवातीला रक्षंदा जलिल आणि गुलझार साहेब ह्यांची ओळख करून देणारा लहानसा व्हिडीयो दाखवला गेला आणि मग एका क्षणी गुलझार साहेब स्टेजवर आले. टाळ्यांच्या कडकडात संपूर्ण सभागृह उभं राहिलं. त्यांनी स्वागताचा नम्रपणे स्विकार केला पण कडकडाट काही थांबेना. नंतर तर अनेकदा असा कडकडाट होत होता. स्वरदा आणि जितेंद्र ह्यांचं 'नाम गुम जाएगा' अतिशय सुरेख झालं. नंतरच्या मुलाखतीतही गुलझार साहेब अगदी धिरगंभीर वगैरे नव्हते. रक्षंदा बाईंनी विचारलेल्या एका प्रश्नावर म्हणाले, "कुठल्या 'सफर' बद्दल सांगू? उर्दूतल्या की इंग्रजीतल्या!?' मग पुढे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं, चित्रपटात नसेलेली शेरो शायरी सादर केली.

गीतकारांना मुलाखतीत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "शब्द आधी की चाल आधी?" रक्षंदाबाईंनी तो विचारलाच, शिवाय पुढे म्हणाल्या की तयार चालीवर शब्द लिहायचे म्हणजे तयार कबरीत फिट बसणार्‍या मापाचे मुडदे पाडण्यासारखं नाही का? मुख्य प्रश्नाचं उत्तर देण्याआधी गुलझार साहेब म्हणाले की मी लिहिलेले शब्द मग ते चालीवर असो किंवा चालीआधी, ते मला मुडद्यांसारखे मुळीच वाटत नाहीत! ते जिवंत असतात. स्वतःचा कामाबद्दलचा हा विश्वासच ह्या मंडळींना थोर करून जातो. त्यानंतर त्यांच्या पहिल्या गाण्याची गोष्ट सांगितली. ते गाणही चालीवर लिहिलं गेलं. आधी चाल मग शब्द. स्वरदाने 'मेरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दै दे' हे गाणं ही खूप छान गायलं.

पुढे, उर्दू भाषा आता फार बदलली आहे का ? कालबाह्य होत आहे का? "पूर्वीची उर्दू राहिली नाही" असं वाटतं का? ह्या प्रश्नावर त्यांनी भाषा .. कुठलीही.. आणि तिचं प्रवाहीपण ह्याबद्दल अतिशय सुरेख विवेचन केलं. कुठलीही भाषा ही समाजाची असते, लोकांची असते त्यामुळे समाज जसा बदलतो तशी भाषा बदलणार आणि बदलायलाच हवी, त्यात धर्म, जात वगैरे काही नसतं. एखाद्याला एखादी भाषा आली (किंवा नुसती समजली) म्हणजे ती त्याची झाली. भाषा कधीच मृत होत नाही. आजची हिंदी, आजची गुजराथी, आजची मराठी ही ५०-७० वर्षांपूर्वी बोलली जायची तशीच राहिली आहे का? मग उर्दू कडूनच ती अपेक्षा का? शिवाय भारतात उर्दू अधिकृत भाषा असणारं फक्त एक १ राज्य आहे. त्यामुळे ही खरं म्हणजे लोकांची समजाची भाषा आहे आणि त्यामुळे समाजाच्या बदलाचं प्रतिबिंब भाषेवर पडणारच. त्यात वावगं काही नाही.

रक्षंदा बाईंनी ' हम सब आपके 'अफेअर' के बारे मै जानना चाहते है' अशी गुगली टाकून 'गालिब'च्या विषयाला हात घातला. ८० च्या दशकात दुरदर्शन वर सादर झालेल्या कार्यक्रमाच्या अनेक मनोरजंक आठवणी  गुलझार साहेबांनी सांगितल्या. नसरूद्दिन शहाच का? ह्यावर ते म्हणाले दिग्दर्शक नकोच म्हणत होता कारण तो फार पैसे मागतो ! मग त्याला बोलावलं चर्चेला आणि सांगितलं की बाकीही काही कलाकार बघतो आहोत तर तू पैसे कमी कर. त्यावर नसरूद्दीन भडकला. पैसे कमी न करता शेवटी त्यानेच काम केलं आणि आज गालिब म्हंटलं की लोकांना त्याचाच चेहरा आठवतो!  पुढे गालिबच्या शायरीबद्दलचे बरेच बारकावे उलगडून सांगितले. पुढे चर्चेत 'मेरा कुछ सामान'चा सुप्रसिद्ध किस्सा आला. गुलझारांनी लिहिलेले शब्द वाचून एसडी बर्मन म्हणाले 'आज हे लिहिलत, उद्या टाईम्स ऑफ इंडीया घेऊन याल आणि त्याला चाल लावा म्हणाल!' अखेर बर्‍याच चर्चेनंतर गुलझार साहेबांनीही चाल लावायच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन ते अजोड गाणं तयार झालं. त्याही गाण्याला स्वरदाचा आवाज अफाट लागला होता!

कार्यक्रम शेवटाकडे येत असताना "नज्म के बिना मै नंगा हू" ह्यावरून सुरू झालेली शायरी, लोक  अक्षरशः प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजवत होते. पुढे 'अजनबी'ची कथा शायरीतून सांगताना 'एक अजनबी को एक बार कहीसे आवाज देना था...' असं म्हणून अलगद 'दिलसे' कडे घेऊन गेले. मला स्वतःला ते 'दिल से' च्या गाण्यांबद्दल काय बोलतात ह्याबद्दल फार उत्सुकता होती कारण 'दिल से'च्या प्रदर्शनपूर्व जाहिरातींमध्ये मणीरत्नम, ए. आर. रेहेमान, गुलझार, शहारूख खान, लता मंगेशकर अशी त्या काळातली यशाच्या शिरखावर असलेली मंडळी एकत्र येणार आहेत ह्या बाबीवर खूप भर दिला होता. गुलझार साहेबांबद्दल माहीती होऊन, त्यांचा फॅन मी तेव्हा पासून झालो.  ते चित्रपटातल्या गाण्यांबद्द्ल काही बोलले नाहीत पण ह्या चित्रपटातलं 'ए अजनबी' हे अजरामर गाणं ऋषिकेश रानडेने आपल्या स्वतःच्या शैलीत सादर केलं.  

गुलझार साहेबांना उर्दू भाषेबद्दल जबरदस्त ओढा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाचा शेवटही भाषेबद्दलच्या शायरीनेच केला. पुढे प्रेक्षकांनी समाधान न झाल्याचं सांगितल्याने आणखी काही शायरी सादर करण्याची विनंती केल्यावर 'किताबे' आणि 'उर्दू नज्म' ह्या रचना सादर केल्या. कानावर पडत होतं ते सगळच समजत नव्हत आणि त्यावेळी गझला, कवितांमध्ये जरातरी गती असायला हवी होती अशी तीव्र जाणीव होऊन गेली. कार्यक्रमाचा शेवट गायकांनी सादर केलेल्या मेडलेने झाला. सगळीच गाणी सुरेल झाली आणि ती ऐकताना गुलझारांच्या लेखणीच्या कक्षा किती रूंद आहेत हे ही जाणवलं. 'नाम गुम जाएगा' आणि 'मेरा कुछ सामान' लिहिणारी व्यक्तीच 'बिडी जलायले'ही लिहू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं.

मागे अनपेक्षितपणे सचिन तेंडूलकर भेटला होता, आता गुलझारसाहेब भेटले.  अतिशय भिन्न क्षेत्रातल्या, भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती पण दोन्ही वेळी आलेलं 'हाय' फिलींग मात्र अगदी सारखं होतं!

हस्तलिखित

गेल्या काही दिवसांमध्ये वाचनात आणि लोकांशी बोलण्यात लहानपणी शाळेत केलेल्या गोष्टींचे बरेच किस्से आले. परवा शिल्पाच्या भावाशी बोलताना ज्ञानप्रबोधिनीतल्या बर्‍याच गोष्टींचा उल्लेख आला आणि त्यामुळे जिज्ञासाने मायबोलीवर लिहिलेले ज्ञानप्रबोधिनीतले अनुभव पुन्हा एकदा चाळले. नंतर डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रात ते बनारस हिंदू विद्यापिठाच्या आवारातल्या शाळेत असतानाचे अनेक किस्से वाचले. शिवाय शिल्पाही अनेकदा तिने शाळेत असताना केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल सांगत असते. डॉ. नारळीकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य होतं "शाळेतल्या आठवणी गोड असतात तश्या आंबटही.. पुन्हा पुन्हा आठवाव्या अश्याही आणि शक्य तितक्या लवकर विसरून जाव्या अश्याही." माझ्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या आठवणी तराजूत घालून तोलल्यास आंबट आठवणी नक्कीच जास्त भरतील! आंबट आठवणी जास्त असण्याची कारणं नंतर कधीतरी.. पण गोड आठवणी फार कमी असण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेतली संस्कृती. आमच्या शाळेत अभ्यास आणि मार्क ह्यांना प्रचंड जास्त महत्त्त्व होतं. पाया पक्का करून घेण्यात त्याचा फायदा झाला हे काही प्रमाणात बरोबर असलं तरी कधी कधी ते जास्त व्हायचं आणि त्यामुळे इतर उपक्रम जवळ जवळ नसल्यासारखेच होते. आमच्या शाळेला वार्षिक सहल तसेच अल्पोपहार (किंवा कुठल्याही प्रकारची annual refreshment) नसायची. शाळेचं गॅदरींग इतकं लो-बजेट पध्दतीने व्हायचं की बस. सर्वसाधारणपणे गॅदरींग संध्याकाळी असतं कारण छान रोषणाई, स्टेजवर प्रकाशयोजना वगैरे करता येते. आमचं गॅदरींग सकाळी सात वाजता असायचं! सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टेज, पडणारा पडदा वगैरे सगळं असायचं पण नंतर नंतर सिमेंटच्या बांधलेल्या स्टेजला एक बॅकड्रॉप लाऊन नाटकं वगैरे सादर केली जात (वर छप्पर नाहीच!). नंतर असं ऐकलं की ऑडीयो सिस्टीम वगैरे बंद करून फक्त तबला पेटीवर सादर करता येण्याजोगी गाणीच नाच वगैरेंसाठी बसवायची असा नियम निघाला!! वार्षिक खेळांचं आयोजन आणि माझा स्वत:चा  त्यातला सहभाग ह्या दोन्ही गोष्टींचा एकंदरीत आनंदच होता. मी ना त्यावेळी उंच होतो, ना माझ्यात ताकद होती ना दम. त्यामुळे फक्त एकमेव सांघिक खेळ असलेल्या कबड्डीमध्ये मी कधीच संघात येऊ शकलो नाही. वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, गोळाफेक वगैरे स्पर्धा असायच्या. त्यातला गोळा तर मला उचलताच यायचा नाही त्यामुळे तो फेकणं तर दुरच.  आता मी जरी ३०० किलोमिटर सायकलींग, २०० किलोमिटर ट्रेकिंग, १० किलोमिटर/ हाफ मॅराथॉन पळणे असले प्रकार करत असलो तरी तेव्हा मला २०० मिटरही धडपणे धावता यायचं नाही. त्यामुळे खेळांबद्दलच्या आठवणी शुन्य. ("एकंदरीत ह्या परिस्थितीला आमच्या त्यावेळच्या शिक्षकवृंदाचं आणि संचालक मंडळाचं वैचारीक आणि आर्थिक  "डावेपण" कारणीभुत असावं" असं एक 'गिरिश कुबेरीय' वाक्य इथे टाकून द्यायचा मोह होतो आहे.)
ह्या अश्या सगळ्या परिस्थितीतही मला अगदी आवडलेला, जवळचा वाटलेला, मी प्रत्येक वर्षी उत्साहाने सहभाग घेतलेला आणि त्यामुळेच अजूनही बारिक सारिक तपशिलांसह लख्ख आठवत असलेला एक उपक्रम होता आणि तो म्हणजे 'हस्तलिखित'. पाचवी पासूनच्या प्रत्येक तुकडीने एक विषय घेऊन त्यावर स्वनिर्मित किंवा संकलीत साहित्याचं हाताने लिहिलेलं अर्थात हस्तलिखित पुस्तक तयार करायचं. ह्यासाठी शाळा वेगळ्या प्रकारचे रंगीत कागद आणि मधे मधे चित्र काढायला, मुखपृष्ठ वगैरेसाठी चित्रकलेचे पांढरे कार्डपेपर देत असे. दिलेल्या मुदतीत सगळं बाड कार्यालयात नेऊन पोहोचवलं की महिन्या-पंधरा दिवसांनी बाईंड केलेलं हस्तलिखित पुस्तक तयार होऊन येत असे. शाळेच्या ग्रंथालयात सगळ्या वर्गांची हस्तलिखितं ठेवलेली असत आणि आम्हांलाही कधीतरी जुन्या वर्गांची हस्तलिखितं वाचायला मिळत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्‍या सत्रात वर्गशिक्षक आपापल्या वर्गात हस्तलिखिताच्या विषयांची चर्चा घडवून आणून त्यावर्षीचा विषय ठरवत असतं. विषयांना तसच साहित्यप्रकाराला कुठलही बंधन नसे. (त्यामुळे डायनोसोरबद्दलच्या आमच्या एका हस्तलिखितात कोणीतरी डायनोसोर ह्या विषयी स्वतः केलेली कविताही दिली होती!). विषय निवडण्यात तसेच साहित्य निवडण्यात शिक्षकांचा हस्तक्षेप नसे, त्यांचं काम फक्त गाडी योग्य मार्गावर आहे ना ह्याची काळजी घेणे इतकच. साहित्य जमवणे (त्याकाळी इंटरनेट नसल्याने हे एक मोठच काम होतं), चांगलं अक्षर असलेल्या मुलांनी ते रंगीत कागदांवर लिहीणे, चित्र काढणे, अनुक्रमणिका, संपादकीय वगैरे लिहिणे अशी कामं वर्गशिक्षकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं करत असू. एकंदरीतच वय लहान असल्यान शक्यतो कोणी एक विद्यार्थी संपादक म्हणून नेमला जात नसे. अनुक्रमणिका / श्रेयनामावलीत आपलं नाव यावं म्हणून बरेच जण एखादं अगदी छोटं काम अंगावर घेत. लहान इयत्तांमध्ये आपण ठरवलेला विषय बाकीच्या वर्गांना कळू नये ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाई. पण साधारण आठवी नंतर सगळं सगळ्यांना आधीपासून माहीत असे आणि त्याचं फार काही वाटतही नसे. एकदा रंगीत कागदावर लिहिलं की ती अंतिम प्रत. मुद्रितशोधन वगैरे करायची संधी नाहीच. त्यामुळे मग शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी आणि झाल्याच तर त्या सुधारण्यासाठी बरेच कुटाणे करावे लागत. हस्तलिखिताचे कागद कामासाठी घरी नेणं म्हणजे एक मोठी जबाबदारी वाटत असे आणि त्यामुळे ते खराब होऊ नयेत म्हणून वर्तमानपत्राच्या कागदात लपेटणं, मग त्याला चुरगळू नये म्हणून पुठ्ठा लावणं, त्यावर प्लॅस्टिकची पिशवी लावणं आणि मग दप्तरात ठेवणं एव्हडे सोपस्कार केले जात.
पाचवीच्या वर्गात हा सगळाच प्रकार नवीन होता त्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. विषय काय घ्यायचा, नक्की लिहायचं काय वगैरे काहीच कल्पना येत नव्हता. चांगली गोष्ट म्हणजे त्या वर्षीच्या वर्गशिक्षिका शोभा साळुंके बाईंनी त्यांची मतं आम्हांला न सांगता काय काय विषय घेता येतील ह्याची छान चर्चा वर्गात घडवून आणली. खूप चर्चेअंती (आणि त्यामुळे झालेल्या गोंधळाअंती) आम्ही "अंकुर" असा विषय निवडला. आमचं माध्यमिक शाळेतलं पहिलचं वर्ष त्यामुळे आमची अवस्था नुकत्याच रुजलेल्या बिजातून निघालेल्या अंकुरासारखी आहे अशी काहीतरी अचाट कल्पना होती. आता ह्या विषयाबद्दल नक्की काय लिहायचं हे न कळल्याने सगळेच विषय चालतील असं ठरलं. गोष्टी, कविता, विनोद, माहितपर लेख, चित्र, व्यंगचित्र, कोडी असं अक्षरशः (स्वत: लिहिलेलं किंवा इकडून तिकडून ढापलेलं) मिळेल ते सगळं त्या अंकात होतं! साहित्य इतकं जास्त झालं की सांळुके बाईंनी बाकीच्या शिक्षकांंकडून त्यांच्या वर्गांचे उरलेले कागदही मागून आणले होते. एका मुलीने (ती पाचवीनंतर शाळा सोडून गेली, मला तिचं नाव आठवत नाहीये) चित्र आणि त्यावर काहीबाही कलाकुसर करून छान मुखपृष्ठ बनवलं होतं. आमचा विषय ठरल्यादिवशीच फुटला आणि त्यामुळे आमची खूपच नाचक्की झाली. त्यामुळे तो कोणी फोडला असेल ह्याकरता बाईंपासून प्रत्येकावर संशय घेऊन झाला होता! मी, प्रथमेश, चित्रलेखा, मृणाल, आदित्य गोगटे, मिरा पटवर्धन वगैरे मंडळींनी त्या अंकासाठी बरच काम केलं होतं. (अजुनही असतील पण मला ही नावं नक्की आठवत आहेत.)  मी स्वतः त्या अंकात बरच काही लिहिलंही होतं. उगीच ओढून ताणून जमवलेली एक गोष्टही लिहिली होती.
सहावीला 'फळ-एक वरदान' असा सोपा-सुटसुटीत विषय होता. अगदी नेहमीच्या आंबा, पेरू वगैरे फळांपासून ते भारतात न मिळणार्‍या परदेशी फळांपर्यंत बर्‍याच फळांच्या माहितीचं संकलन ह्या अंकात होतं. आमच्या बॅचचा नावाजलेला चित्रकार तुषार शिरसाटने क्रेयॉन्स (किंवा त्याकाळी मिळणारे तत्सम खडू वापरून) सगळ्या फळांची फार सुंदर चित्र काढली होती.  तुषार पेशंट्चे दात काढण्याबरोबर अजून चित्रही काढतो का ते त्याला विचारायला हवं. खरतर आमचे चित्रांचे कागद संपले होते पण आमच्या वर्गशिक्षिका पाखरे बाई चित्रकलेच्या शिक्षिका असल्याने त्यांनी वशिला लाऊन जास्तीचे कागद मिळवून दिले होते. एका मुलीने तिच्या आईच्या मार्गदर्शनाखाली (त्या ही बहुतेक चित्रकला शिक्षक होत्या) फळांच्या परडीचं मस्त चित्र मुखपृष्ठासाठी काढून आणलं होतं.
आम्ही सातवीत होतो त्यावर्षी मराठी साहित्य संमेलन होतं. आमचे वर्गशिक्षक राठोड सर आम्हांला मराठी शिकवायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आम्ही साहित्य संमेलनासंबंधी काहीतरी विषय निवडावा. पण आम्ही मुलांनी फारसा उत्साहं न दाखवल्याने त्यांनी आग्रह सोडून दिला. अखेर आम्ही 'तिर्थक्षेत्रे' असा विषय निवडला होता. देशभरातल्या बर्‍याच तिर्थक्षेत्रांची आणि देवळांची माहिती आणि फोटो त्या अंकात होते. माझी आज्जी त्याआधी काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन आली होती आणि तिने पिट्सबर्गला तिरूपती बालाजीचं देऊळ पाहिलं होतं. मी त्या अंकात कुठून कुठून शोधून त्या देवळाची माहिती लिहिली होती. (बहुतेक) हर्षद कुलकर्णीने कापूस आणि रंग वापरून मुखपृष्ठाला  थ्री-डी इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला होता.
ज्युरासिक पार्क सिनेमा आदल्याच वर्षी आलेला असल्याने आमच्या आठवीचा हस्तलिखिताचा विषय 'डायनोसोर्स पार्क' असा होता. डायनोसोर्स बद्दलची बरीच माहिती आणि चित्र ह्या अंकात होती. वर म्हटल्याप्रमाणे एक कविता आणि स्वप्नात डायनोसोर आला वगैरे काहीतरी कथानक असलेली एक कथाही ह्या अंकात होती. ह्या हस्तलिखिताचं काम करत असताना मुलं विरूद्ध मुली अशी बरीच भांडाभांडी झालेली. मुलींनी बनवलेल्या मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिकेवर आम्ही थोडी(शीच) टिका केली म्हणून चिडून वृषाली गटणेने तो कागद टराटरा फाडून टाकला आणि बाईंकडे तक्रार केली! मग आम्ही मुलांनी नवीन अनुक्रमणिका बनवून त्यावर मुलींच्या नावांमध्ये मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करणे इत्यादी प्रकार केले. शेवटी आमच्या वर्गशिक्षिका गोरबाळकर बाईंनी हस्तक्षेप करून त्या चुका सुधारायला लावल्या. सौमित्र देशपांडेने ह्या अंकात बरीच चित्र काढली होती. मुखपृष्ठही त्यानेच बनवलं होतं. एकंदरीत भांडाभांडीमुळे काम पूर्ण व्हायला बराच उशीर लागला होता आणि अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी मी, प्रथमेश आणि सौमित्रने एकत्र घरी बसून बरेच लेख लिहून काढले होते. पुढे इंजिनिअरींगला करायच्या 'सबमिशन'ची थोडीफार प्रॅक्टीस तेव्हा झाली होती हे नंतर समजलं.
नववीत जरा शिंग फुटली होती आणि त्यामुळे बरेच दिवस आम्ही हस्तलिखिताचा विषयच ठरवलाच नाही. शेवटी वेळ कमी उरल्यावर फार काही करता येणं शक्य नसल्याने 'निबंध' हा विषय आम्ही निवडला. थोडक्यात आमचं हे हस्तलिखित म्हणजे निबंधाचं पुस्तक होतं. मी दोन तीन विषयांवर निबंध लिहिले होते पण त्यातला एक विषय मला पक्का आठवतो आहे तो म्हणजे 'जाहिरातींचे युग'. तो निबंध मी सहामाही परिक्षेच्या पेपरात लिहिला होता आणि मराठी शिकवणार्‍या मनिषा कुलकर्णी बाईंनी तो वर्गात वाचून दाखवला होता. त्यामुळे लगेच रिसायकल केला. पुढे मी ऑफिसात आणि MBAच्या अभ्यासक्रमात डिजीटल अ‍ॅडव्हर्टाजींगच्या प्रोजेक्ट्स वर काम केलं पण जाहिरातींशी पहिला संबंध शाळेतच आला! ह्या अंकासंबंधी अजून एक गोष्ट म्हणजे ह्या अंकांच संपादकीय मी लिहिलं होतं. मी लिहिलेल्या मसुद्यात आमच्या वर्गशिक्षिका जोग बाईंनी अगदी किरकोळ बदल सुचवून ते फायनल केलं होतं. त्यावेळी खूप भारी वाटलं होतं!!
दहावीला महत्त्वाचं वर्ष असल्याने हस्तलिखितावर फार काम केलं नव्ह्तं किंबहुना शाळेने करू दिलं नव्हतं. लिहायला कमी हवं म्हणून आमचा विषय होता 'कविता'. दहावीचं वर्ष असल्याने आमच्या वर्गशिक्षिका अत्रे बाई अंकाचं काम घरी नेऊ द्यायच्या नाहीत. जे काय करायचं ते वर्गात करा. त्या अंकासंबंधी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात देण्यासाठी मी एक कविता केली होती! मला कविता अजिबात कळत नाहीत आणि त्यामुळे आवडत नाहीत. पण तेव्हा काय स्फुरण चढलं काय माहीत. ती कविता लिहिलेलं चिठोरं माझी आज्जी नंतर बरीच वर्ष तिच्या पर्समध्ये घेऊन फिरायची आणि लोकांना  कौतूकाने दाखवायची. ते आठवून आता फार हसू येतं. ह्या अंकाच्या निमित्ताने सुमंत तांबेने खूप अवघड, न कळणार्‍या कविता केल्याचं आठवतं आहे. सुमंतने नंतर कविता केल्या का ते माहीत नाही. बहुतेक ऋच्या मुळेने ही ह्या अंकात एकापेक्षा जास्त कविता लिहिल्या होत्या. ह्या अंकाने बर्‍याच जणांना काव्यस्फुरण दिलं हे मात्र खरं. 'काव्यसरिता' असं नाव नदीच्या प्रवाहाच्या आकारात लिहिलेलं मुखपृष्ठ सौमित्रने बनवलेलं आठवतय.
हस्तलिहखितांचा हा उपक्रम शाळेत अजून सुरू आहे की नाही ते माहीत नाही आणि असल्यास त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो की नाही ह्याबद्दल उत्सुकता आहे. नेहमीचे प्रचलित उपक्रम नसलेल्या किंवा अगदीच साध्या पद्धतीने पार पाडणार्‍या आमच्या शाळेने ह्या हस्तलिखिताच्या उपक्रमाद्वारे एक वेगळाच अनुभव आम्हाला दिला आणि त्यामुळे त्याच्या चांगल्या आठवणी आज  माझ्याजवळ आहेत. शाळेचे ह्याबद्द्ल नक्कीच आभार मानायला हवेत!

सिअ‍ॅटलमधलं 'गुरुकुल'

गेलं शतक सरताना कॉलेजात शिकलेल्या आमच्या पिढीला 'गुरुकुल' म्हटलं की मिश्या फुरफुरत परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनाचे फंडे देणारा बच्चन आणि थंडी असूनही स्वेटर अंगात न घालता तो खांद्यांवर लटकवून फिरणारा शहारूख आठवतात. पण मी म्हणतोय ते 'गुरूकुल' हे नव्हे. आमचं गुरूकुल म्हणजे सुमारे वीस वर्षांपूर्वी सिअ‍ॅटलला सुरू झालेली भारतीय भाषा शिकवणारी शाळा. सुरुवातीला हिंदी आणि आता हिंदी बरोबरच मराठी, कानडी आणि गुजराथी ह्या भाषांचं केजी ते सहावीपर्यंतच शिक्षण गुरुकुलमध्ये दिलं जातं.

आम्ही अटलांटाला असताना तिथल्या मराठी शाळेने रियाला जन्मदिनांकाचे कारण सांगून प्रवेश नाकारला होता. रियाला एलिमेंटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पण दहा दिवसांच्या फरकामुळे मराठी शाळेतला प्रवेश हुकला.  त्यांचे वयाचे निकष इलिमेंटरी स्कूलच्या निकषांपेक्षा वेगळे होते. तसे निकष ठरवण्याचा निर्णय हा त्यांनी "अत्यंत विचारपूर्वक" घेतलेला होता म्हणे! अर्थात आम्ही वर्षाच्या मध्यात सिअ‍ॅटलला आलो त्यामुळे फार काही फरक पडला नाही. झी मराठीच्या मालिका, आमच्या भारतवार्‍या आणि रियाच्या आजीआजोबांच्या अमेरीकावार्‍या ह्यांच्याआधारे रिया मराठी व्यवस्थित बोलत होती.

अमेरिकेत वाढणार्‍या मुलांनी मराठी नक्की का शिकावं? अश्या विषयावर मध्यंतरी मायबोलीवर चर्चा झाली होती. तेव्हा रिया नव्हतीच त्यामुळे त्या विषयावर कधी खोलात शिरून विचार केला नव्हता पण आता करायची वेळ आली. पुढे-मागे मिळेल तेव्हा मिळणारे हायस्कूल क्रेडीट तसेच व्हिसाचे झोल किंवा इतर कुठल्याही कारणाने अचानक भारतात परतायची वेळ आली तर तिथे गेल्यानंतर अडचण व्ह्यायला नको हे काही प्रत्यक्ष फायदे आहेतच पण त्याखेरीज अजूनही काही कारणं महत्त्वाची वाटली. आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे सगळेच मराठीतून विचार करतो, मराठीत बोलतो, मराठी वाचतो, सिनेमे/ मालिका पहातो, गाणी ऐकतो आणि आम्हांला ते सर्व आवडतं. हे सगळं आपल्या मुलीलाही आवडलच पाहिजे असं नाही पण त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तरी तिच्यात असावी हा आमचा तिला मराठी शिकवायचा हेतू आहे. शिवाय आम्ही (तिला किंवा एकमेकांना किंवा इतर कोणालाही) मारलेले टोमणे, कुजकट बोलणं आणि "माझं नाव काय? आणि मी कुठे जाते आहे? ह्याचं उत्तर एकच आहे!" छापाचे मराठीतले अत्यंत पांचट विनोद तिला कळावे हा एक छुपा हेतूही आहेच.

गुरूकुलमध्ये रियाचं नाव नोंदवल्यावर संचालकांतर्फे पालकांसाठी एक माहितीपर मिटींग होती. त्यात संस्थेच्या संस्थापकांनी गुरुकुलची माहिती सांगितली तसेच वर्षभराची साधारण रुपरेषा सांगितली. हल्ली एकदंरीत सगळ्यांना प्रत्येक गोष्टीचे "प्लॅटफॉर्म" बनवायचे असतात, त्यात गुरूकुल तर साक्षात मायक्रोसॉफ्ट, अमेझॉमच्या जन्मभुमीत जन्माला आलेलं, त्यामुळे गुरुकुल हा भारतीय भाषा शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे. नवीन भाषा शिकवणं सहज सुरू येऊ शकतं म्हणे. (मला वाटलं आता आमचे सेल्फ सर्व्हिस API आहेत असंही सांगतात की काय पुढे! पण नाही अजून तेव्हडं "अ‍ॅटोमॅटीक्क" झालेलं नाही ते.) ही संस्था स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते आणि बहुतांशी शिक्षक हे शिकायला येणार्‍या मुलांचे पालक असतात. अर्थात अभ्यासक्रम वगैरे ठवरण्यासाठी त्या क्षेत्रातले अनुभवी असतातच. दर रविवारी तीन तास भरणार्‍या ह्या शाळेत तीन भाग असतात लेखी भाषा, बोलीभाषा आणि कल्चर. कल्चरमध्ये भारतासंबंधीची सगळी माहिती म्हणजे इतिहास, भुगोल, समाजशास्त्र वगैरे शिकवले जाते. कल्चरचा भाग इंग्रजीतून शिकवला जातो आणि तो सर्व भाषांच्या वर्गांना सारखाच असतो.

आम्ही दोघांनीही शिकवण्यासाठी इच्छुकांच्या यादीत नाव दिलं (आणि आम्ही बर्‍यापैकी 'अनकल्चर्ड' लोकं आहोत, त्यामुळे शक्यतो कल्चर शिकवायला देऊ नका असा एक पिजेही मारून घेतला). पुढे आम्हांला प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून वर्गाचं कामकाज बघण्याची संधी मिळाली तसेच मराठीच्या curriculum team बरोबर बातचीतही झाली. यथाअवकाश शिक्षकांच्या नेमणूका झाल्या. मला पाचवीच्या वर्गाला 'बोलीभाषा' म्हणजे Spoken शिकवायचं होतं. शिल्पाला एक कुठला वर्ग न देता लागेल तसं substitute म्हणून यायला सांगितलं.  सगळेच शिक्षक स्वयंसेवक असतात आणि हे कोणाचच पूर्णवेळ काम नसतं त्यामुळे वैयक्तिक अडीअडचणींच्या वेळी substitute लागतातच. काही कारणांनी शिल्पाला पुढे हे करण जमलं नाही पण मला फुम टाईम वर्ग मिळाल्याने आणि तिला पार्ट टाईम मिळाल्याने मला तिला चिडवायची आयतीच संधी मिळाली! पहिल्याच वर्षी एकदम पाचवीच्या वर्गाला शिकवायचं ह्या विचाराने थोडसं टेन्शनही आलं. पण माझ्या दोन्ही सहशिक्षिका मेघना आणि शुभा अनुभवी होत्या. हे त्यांचं गुरुकुल मधलं अनुक्रमे तिसरं आणि दुसरं वर्ष. त्यांच्या अनुभवाचा मला वर्गात शिकवण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम तसेच खेळ घेण्यासाठी आणि मुख्यतः मी लिहीलेल्या इमेल्स, क्लास रिव्ह्यू, स्टुडंट रिव्ह्यू ह्यांचं "मुळमुळीकरण" करण्यासाठी खूपच फायदा झाला! हवा तो मेसेज द्यावा पण मधाचं बोट लावून, नाहीतर पुढे फार गुंता होते हा त्यांचा सल्ला मला फार उपयोगी पडला. प्रत्येक वर्गाला Curriculum coordinator असतो. आमच्या CC मानसीताई ह्या गुरुकुल मराठीच्या संस्थापक सदस्य आहेत. (आमच्या गुरुकुलमधलं "बच्चन" म्हणता येईल असं व्यक्तिमत्त्व त्यातल्या त्यात हेच.. ). शिक्षकी पेश्याचं औपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव असलेल्या त्या (बहुतेक) एकट्याच. त्यांच्या अनुभवाचा आमच्यासारख्या कामचलाऊ शिक्षकांना खूपच फायदा होतो. काहीकाही बाबतीत मतभिन्नता झालीही पण चर्चेअंती मार्ग निघाला. चर्चा, मतं, सुचना विधायक असतील तर त्या स्विकारायला काहीच हरकत नाही हे त्यांचं तत्व आम्हांला नेहमीच उपयोगी पडतं.

मी शाळेत शिकवणार हे ठरल्यावर घरून पहिली प्रतिक्रिया आली की तुझ्यात पेशन्स इतका कमी आहे त्यामुळे एकतर तू शाळ सोडशील किंवा तुझ्या वर्गातली मुलं शाळा सोडतील!  पण हे दोन्ही झालं नाही कारण आमचा वर्ग एकदम मस्त होता. तीन मुलं आणि सात मुली. त्यापैकी प्रसन्न, आदित्य, रिथ्वी, सची ही एकदम अतिउत्साही, तुडतुडी मंडळी. अभ्यासापासून दंगा मस्ती पर्यंत सगळं करायला कायम पुढे. इशा, आर्या, तन्वी, अक्षत ही जरा शांत पण तरीही लिखाण, वाचन सगळं एकदम समजून-उमजून करणारी. रिया, सची, मिताली आणि रिथ्वी ही चांडाळ चौकडी वर्गात इतकी बोलायची की बस!  एकदा जरा एकमेकांच्या ओळखी झाल्यावर वर्गात मस्त मजा यायची. एकदा रिथ्वी जांभया देत होती म्हणून मी हटकलं तर "तूच इतका जास्त होमवर्क दिलास. तो संपण्यासाठी मला जागावं लागलं त्यामुळे आता झोप येते आहे!" असं म्हणत अगदी डोळे मोठ्ठे करून तिनेच मला झापलं! मानसीताईंकडे Audio books किंवा Audio visual प्रकारातील बर्‍याच गोष्टींचा खजिना आहे. त्यातले काही गोष्टी आम्ही गृहपाठात ऐकायला देऊन त्यावर पुढच्या तासाला चर्चा करायचो. मुलांनाही तो प्रकार आवडायचा. एका आठवड्यात मी अरूणीमाची गोष्ट मुलांना वाचायला /ऐकायला सांगितली होती. त्यावर "अशी अ‍ॅक्सिंडेटमध्ये पाय तुटलेल्या मुलीची गोष्टी आमच्या सारख्या लहान मुलांना वाचायला लावणारा तू किती insensitive आहेस!" असं म्हणून आदित्यने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकले. एका तासाला चितळे मास्तरांची गोष्ट आम्ही मुलांना ऐकायला दिली होती. त्यावर "हे फनी नाही आहे. It just doesn't make any sense!" अशी खरमरीत प्रतिक्रिया प्रसन्नने दिली. कारण मुलांनी शिक्षकांच्या घरी शिकायला जाणं, शिक्षकांनी वर्गातील मुलींच्या लग्नाबद्दल काही बोलणं हे इथे अमेरिकेत शिकणार्‍या मुलांच्या पचनीच पडू शकलं नाही. खरतर चितळे मास्तरांची गोष्ट मुलांना ऐकायला द्यायला मीच फार उत्सुक नव्हतो कारण त्यातले प्रासंगिक विनोद मुलांना कळणार नाही असं मला वाटलं पण एक प्रयोग म्हणून तो करून बघितला पाहिजे असा मानसीताईंचा आग्रह होता आणि तो रास्त होता कारण मराठीतल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीं मुलांपर्यंत पोहोचवणे हाच तर मराठी शाळेचा हेतू आहे. आता पुढच्या वर्षी चितळे मास्तरांऐवजी पुलंचं अजून कुठलंतरी जरा सोपं कथाकथन देऊन बघू.

पहिल्या सत्र परिक्षेचा तोंडी परिक्षेत आम्ही एक प्रयोग केला. मुलांना पुस्तकातले धडे वाचून दाखवायला सांगायच्या ऐवजी बाहेरचे परिच्छेद वाचायला देऊन त्यावर प्रश्न विचारले. इथे एलिमेंटरी किंवा मिडल स्कूलमध्ये शिकणारी ही मुलं बहुतांशी वेळा इंग्रजीतून विचार करतात. अश्यावेळी माहित नसलेला मराठी परिच्छेद वाचणे, तो समजून घेणे, त्यावर विचार करून मराठीत उत्तरं देणे ही मोठीच क्रिया. कौतुस्कापद गोष्ट म्हणजे सगळ्यांने जवळ जवळ ९०% भाग बरोबर वाचला आणि प्रश्नांची उत्तरही दिली.

पाचवी आणि सहावीच्या वर्गाला एका विषयावर प्रोजेक्ट करायचं असतं. आमच्या वर्गाला 'युगप्रवर्तक श्रीकृष्ण' असा विषय होता. श्रीकृष्णाची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दाखवणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी मुलांनी वर्गात सांगितल्या. पुढे वार्षिक दिनाला ह्यातल्याच चार गोष्टी घेऊन आमच्या वर्गाने छोटसं नाटक सादर केलं. केवळ दोन-तीन  रविवार प्रॅक्टीस करून मुलांनी नाटक उत्तम सादर केलं पण कदाचित मोठे मोठे शब्द, पल्लेदार वाक्य ह्यांचा मोह आम्ही शिक्षकच आवरू शकलो नाही. मल स्वतःला तिसरी, चौथीच्या वर्गांनी सादर केलेल्या संहिता जास्त आवडल्या कारण त्यांचे विषय, त्यातली भाषा ह्या मुलांच्या वयाला साजेसे आणि जास्त वास्तववादी होते. मात्र ह्या नाटकाच्या तयारी दरम्यानही आम्ही चिकार धमाल केली. खूप हसलो. एकमेकांना चिडवलं, खोड्या काढल्या. अगदी आमच्या शाळेच्या गॅदरींगची आठवण झाली.

मला बाकीच्या वर्गांच्या अभ्यासक्रमाबद्दल माहीत नाही पण आमच्या वर्गाच्या अभ्यासक्रमात पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींवर खूप जास्त भर वाटला. वर्षभरात श्रीकृष्णाचा तर अगदी ओव्हरडोस झाला. 'गंमत-गोष्टी' ह्या प्रश्नमंजुषेच्या उपक्रमाच्या वेळी मी म्हटलं काहीतरी "उथळ आणि पांचट" गोष्ट द्यायला हवी आता नाहीतर ह्या मुलांना वाटायचं की मराठी भाषेतल्या गोष्टी म्हणजे कायमच काही हजार वर्षांपूर्वीच्या आणि गंभीर वगैरे असतात. अभ्यासक्रम निर्मितीतलं माझं ज्ञान किंवा शिक्षण शून्य. अभ्यासक्रम ठरवणं हे प्रचंड अवघड आणि विचारपूर्वक करायचं काम असणार आणि गुरुकुलमध्येही ते विचारपूर्वक केलं गेलं असणार हे खरच पण एक अजिबात अनुभव नसलेला शिक्षक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मला हलक्या फुलक्या गोष्टी, सोप्या कविता, इथल्या मुलांना जवळचे वाटणारे विषय (जस की इथल्या एखाद्या मोठ्या शहराबद्दलचा किंवा राष्ट्रीय उद्द्यानाबद्दलचा लेख, इथल्या कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीचं व्यक्तीचित्रण, Diary of a wimpy kid पद्धतीची विनोदी गोष्ट वगैरे) शिकायला/शिकवायलाही आवडलं असतं. दर रविवारी वर्ग सुरू व्हायच्या आधी कॉमन एरियात सगळ्या शाळांची असेंब्ली होते. त्यात पाचवी आणि सहावीच्या मुलांपैकी एकाला आठवड्यातील घडामोडी दोन-तीन वाक्यांत सांगायच्या असायच्या. बहुतांशी जण मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्या लिहून आणायचे. पण आमच्या वर्गातल्या सचीने इथल्या अमेरिकन फुटबॉटच्या टीमबद्दलची (सीहॉक्स) एक बातमी स्वतःच्या शब्दांत सांगितली. मला अगदी खात्री आहे की ही बातमी तिला मराठी वर्तमानपत्रांत सापडली नसणार! सहावीच्या एका मुलाने मायक्रॉसॉफ्ट करत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा त्याने वापरलेला "आपली कंपनी मायक्रोसॉफ्ट" असा शब्दप्रयोग आठवून मला आजही हसू येतं. मायक्रोसॉफ्ट शब्दश: बॅकयार्डात असल्याने इथल्या मुलांना ते "आपलं" वाटत असणार नक्की! स्वतःला जवळचे वाटतील असे विषय मुलांनी मराठीत बोलले की दर रविवारी इथे आल्याचं सार्थक झालं असं वाटायचं.

गुरूकुल संस्थेचा एकंदरीत पसारा मोठा आहे! फक्त मराठीचा विचार केला तरी २००+ विद्यार्थी, जवळ जवळ ३० शिक्षक, कमिटीतले लोकं, Parent volunteers सगळ्यांनाचे वर्षभराचे काम बघितले तर बरेच Person hours खर्ची पडतात. हे सगळं स्वयंप्रेरणेने असलं तरीही कष्ट घ्यावे लागताततच. ह्या सगळ्यांतून मुर्त स्वरूपातला फायदा अजूनतरी मिळत नाही कारण मराठीसाठीचे हायस्कूल क्रेडीट मिळायला सुरुवात झालेली नाही. हिंदी आणि गुजराथी नंतर आता मराठीसाठीही प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच ते फलद्रुप झाले तर नवीन विद्यार्थ्यांचा सहभाग असून वाढेल.

संस्थेचे संचालक, मराठीचे चेअर तसेच पालक आम्ही शिक्षक करत असलेल्या कामाबद्दल वेळोवेळी खूप कृतज्ञता व्यक्त करत असतात. मला स्वत:ला आपण खूप मोठं सामाजिक कार्य वगैरे करत आहोत असं कधी अजिबातच वाटलं नाही. मुळात हे मला करून बघायचं होतं, आवडेल असं वाटलं होतं म्हणून नाव नोंदवलं होतं. काम किती असणार, काय असणार ह्याची आधी कल्पना होतीच. संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक आधी माहीत होतं. त्यामुळे रविवारी सकाळी उठून गुरुकुलला जायचं कधीच जिवावर आलं नाही. किंबहुना रविवार सकाळची वाटच बघितली जाते. इथे सगळेच स्वयंसेवक असल्याने कसलीच स्पर्धा नाही, संस्थेचे नियम पाळले जावे म्हणून काही पदांना (जसे की Curriculum coordinator, committee, chair etc) निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतात त्यामुळे त्या बाबतीतही फार गुंतागुंत नसते. काही काही वेळा चर्च्यांच्या गुर्‍हाळापेक्षा असे व्हिटो बरे पडतात. आमच्या वर्गाचे आम्ही तिघं शिक्षक मस्त मजा करतो, गप्पा मारतो. कामं बिनबोभाट होऊन जातात. एखाद्या कडून एखादी गोष्ट राहिली तर दुसरा ती करून टाकतो. शिकवतानाही "हा माझा विषय हा तुझा" असं कधीच झालं नाही. मला कवितांचं फार प्रेम नाही त्यामुळे पाठांतराची एक कविता मेघनाने घेतली आणि ती घेणार होती तो व्याकरणाचा भाग मी घेतला. शुभा तर कल्चरचा भाग स्वतः घेतेच शिवाय मराठीच्या दोन्ही भागांमध्ये तिचा एकदम सक्रिय सहभाग असतो. शिवाय मेघना कडून पिशवी भरून मराठी पुस्तक मिळाली आणि मेघना आणि शुभा दोघींकडूनही अधूनमधून खाऊचे डब्बे मिळतात ते वेगळच. मागे एकदा ट्रेकिंग संदर्भातल्या एका लेखात मी लिहिलं होतं की मधेमधे स्वतःच्या क्षमता ताणून बघाव्यात. ते अर्थातच शारिरिक क्षमतेबद्दल होतं पण गुरुकुलमधलं हे एक वर्षसुद्धा एक नवीन अनुभव, वेगळं काम आणि पेशन्स ह्या दृष्टीने क्षमता ताणून बघणार ठरलं. माझ्या वर्गात बसून मुलांचं मराठी किती सुधारलं ते माहित नाही पण त्यांना वर्गात बसून टवाळक्या करायला मजा आली असणार एव्हडं मात्र नक्की!

नववर्षाच्या शुभेच्छा

ही पोस्ट वाचणार्‍या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. गेल्यावर्षी अपूर्ण राहिलेल्या तसच यंदाच्या यादीतल्या नवीन इच्छा ह्या वर्षात पूर्ण होवोत ही सदिच्छा! "दिसांमाजी काहीतरी" लिहायला जमत नाहीच (आणि लिहूही नये) पण निदान महिन्यामाजी लिहीण्याचा संकल्पही गेले काही वर्ष मोडीत निघाला. मधली दोन वर्षे ब्लॉगवर एकही पोस्ट न पडता भाकड गेली. २०१८ला STP ने तारले. त्यामुळे ह्या वर्षी पहिल्याच दिवशी पोस्ट टाकून "वर्षामागे काहीतरी"ची सोय करावी असा सुज्ञ विचार करून हा पोस्टप्रपंच.

यंदाच्या हॉलिडे सिझनमध्ये ठरवलेली बरीच कामं पूर्ण केली. त्यातलं एक काम होतं ते म्हणजे पुस्तकं आवरणे आणि त्यांची यादी करणे. इतके दिवस यादी करण्याएव्हडी पुस्तकच नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बरीच पुस्तकं घेतली गेली. प्रत्येक भारतवारीत यादी करून ती आणली गेली. त्यातली बरीच अजून वाचायची आहेत. पण पुस्तकांची दोन मोठी शेल्फ भरवून टाकण्याची इच्छा हळूहळू पूर्ण होते आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे पुस्तकांची दोन मोठी शेल्फ वाचून झालेल्या पुस्तकांनी भरवून टाकणे अशी ठेवावी लागेल. केलेली यादी कुठेतरी लिहून ठेवायची म्हणून ती आज ब्लॉगवर टाकायचं ठरवलं.

२०१८ मध्ये वाचलेली काही पुस्तकं खूप आवडली, काहींनी अपेक्षाभंग केला.
सौरव गांगुली हा माझा सर्वात आवडता भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन. त्याची एकंदरीत कारकीर्द बघता, त्याच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण "Century is not enough" हे त्याचं पुस्तक वाचल्यावर निराशा झाली. एकंदरीत पूर्ण पुस्तक एका नकारात्मक भावनेतून लिहिल्यासारखं वाटतं रहातं. लहानपण, क्रिकेटचं प्रशिक्षण, घरातली मंडळी ह्यांच्याबद्दल काहीच येत नाही. चॅपेल बॅशिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहेच पण ते ही सचिनने जास्त चांगलं केलं आहे असं मला वाटलं.
सई परांजपे ह्यांचं सय हे पुस्तक वाचलं. पुस्तकातल्या घटना कालानुक्रमे न येता, आठवणी जशा येतील तसं सांगितलं आहे. काही ठिकाणी ते चांगलं वाटतं पण काही ठिकाणी घटनांची संगती लागत नाही. संदर्भ न कळल्याने कारण आणि परिणाम ह्यांची जरा गल्लत होते. पुस्तकातली भाषा एकदम ओघवती आहे.
पुस्तकांच्या दुकानात दिसलं आणि तिथल्या काकांनी सुचवलं म्हणून मधुकर देशमुख ह्यांचं शिकारनामा हे पुस्तक आणलं. माहुरच्या संस्थानचे राजे आणि शिकारी असलेल्या लेखकाने जंगलाचं तसच शिकारींच वर्णन मस्त केलं आहे. बिबट्याच्या शिकारींचे काही प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.
बाकी अजून काही पुस्तकं तसेच दिवाळी अंक अर्धवट वाचून झाले आहेत ते जसजसे वाचून होतील तसं त्यांच्याबद्दल लिहायचा प्रयत्न करेन.

ही यादी


No.  Name Author  Tag
1 काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे   य.न. केळकर  Non fiction
2 आम्ही माडिया   एम.डी.रामटेके Non fiction
3 टाटायन   गिरिष कुबेर  Non fiction
4 एका तेलियाने   गिरिष कुबेर  Non fiction
5 शिखरावरून   एडमंड हिलरी (Auto)biography
6 गोष्टी जम्नांतरीच्या   रेणू गावस्कर  Fiction 
7 पर्यटन एक संजिवनी   डॉ. लिली जोशी Travel 
8 तोत्तोचान   तेत्सुकी कुरोयानागी (अनुवाद) Fiction 
9 शोध   मुरलीधर खैरनार Fiction 
10 वॉर्सा ते हिरोशिमा   वि.स.वाळींबे Non fiction
11 व्हिन्स्टन चर्चिल   वि.ग. कानिटकर  (Auto)biography
12 नाझी भस्मासुराचा उदयास्त   वि.ग. कानिटकर Non fiction
13 बालकळ्यांच्या झिरमिळ माळा   अपर्णा पाटणकर Non fiction
14 Little woman 
Non fiction
15 उत्तमोत्तम एकांकिका पुरूषोत्तमच्या   खंड १ आणि २  Non fiction
16 कहाणी नमोची   किंगशुक नाग (अनुवाद) (Auto)biography
17 सय   सई परांजपे (Auto)biography
18 द ब्लड टेलिग्राम   गॅरी बास (अनुवाद) Non fiction
19 वॉल्ट डिस्ने द अल्टीमेट फँटसी   यशवंत रांगणेकर  (Auto)biography
20 पूर्वरंग हिमरंग   डॉ. प्रतिभा फाटक Travel 
21 रण दूर्ग   मिलिंद बोकील  Fiction 
22 एकम   मिलिंद बोकील Fiction 
23 शिस्तीतलं मुक्तांगण  Non fiction
24 कुहू   कविता महाजन Fiction 
25 लाकूड कोरताना   डॉ. अनिल अवचट  Non fiction
26 दंशकाल   हृषिकेश गुप्ते  Fiction 
27 वाचत सुटलो त्याची गोष्ट   निरंजन घाटे Non fiction
28 आलोक   असाराम लोमटे  Fiction 
29 पर्व   भैरप्पा Fiction 
30 गोंदण   रत्नाकर मतकरी Fiction 
31 पाडस   राम पटवर्धन (अनुवाद)  Fiction 
32 मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास   पु.ल. देशपांडे Fiction 
33 उरलं सुरलं   पु.ल. देशपांडे Fiction 
34 झुंड   दत्ता मोरसे  Nature
35 पूर्वरंग   पु.ल. देशपांडे Travel 
36 अपूर्वाई   पु.ल. देशपांडे Travel 
37 नस्ती उठाठेव   पु.ल. देशपांडे Fiction 
38 असामी असामी   पु.ल. देशपांडे Fiction 
39 व्यक्ती आणि वल्ली   पु.ल. देशपांडे Fiction 
40 माझा प्रवास   गोडसे गुरूजी  Travel 
41 चार नगरांतले झाले विश्व   डॉ. जयंत नारळीकर (Auto)biography
42 ग्रहण   नारायण धारप  Fiction 
43 असंही   प्रिया तेंडूलकर Non fiction
44 ऑफबीट भटकंती २/३   जयप्रकाश प्रधान  Travel 
45 कलजयी कुमार गंधर्व   कलापिनी कोमकली (Auto)biography
46 एका रानवेड्यांची शोधयात्रा   कृष्णमेघ कुंटे  Nature
47 झिम्मा   विजया मेहता (Auto)biography
48 तें दिवस   विजय तेंडूलकर (Auto)biography
49 शिकारनामा   मधूकर देशमुख Nature
50 एका खेळीयाने   दिलीप प्रभावळकर (Auto)biography
51 वास्तव नावाचं झेंगट   सुमित खाडीलकर Fiction 
52 281 and beyong   व्हिव्हिएस लक्ष्मण  (Auto)biography
53 Playing in my way   सचिन तेंडूलकर  (Auto)biography
54 A century is not enough   सौरव गांगुली (Auto)biography
55 2 states   चेतन भगत Fiction 
56 Five Point someone   चेतन भगत Fiction 
57 Out of my comfort zone   स्टीव्ह वॉ (Auto)biography

गुरुकुल मधली माझी सहशिक्षिका मेघना हिच्याकडून काही पुस्तक मिळाली. त्यांची ही अपडेटेड यादी.


58 निसर्गवाचन मारूती चित्तमपल्ली Nature
59 धार्मिक  डॉ. अनिल अवचट  Non fiction
60 निसर्गसूक्त ज्ञानदा नाईक Nature
61 स्व देश! भूषण केळकर Non fiction
62 पुण्यभूमी भारत सुधा मूर्ती Non fiction
63 धागे आडवे उभे  डॉ. अनिल अवचट  Non fiction
64 सोनाली डॉ. पूर्णपात्रे Non fiction
65 फुलराणी बालकवी Poetry 
66 मनुस्मृती नरहर कुरुंदकर Non fiction
67 शिवरात्र नरहर कुरुंदकर
68 डॉ. अल्बर्ट स्वाईटझर सुमती देवस्थळे (Auto)biography
69 रानवाटा मारूती चित्तमपल्ली Nature
70 कृष्णविवर मोहन आपटे Non fiction
71 आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव (Auto)biography
72 स्वत:विषयी  डॉ. अनिल अवचट  (Auto)biography
73 कुंपणापलीकडचा देश मनीषा टिकेकर Non fiction
74 नागझिरा व्यंकटेश माडगुळकर Nature
75 काश्मिर - एक शापित नंदनवन  शेषराव मोरे Non fiction