'मायबोली.कॉम' ह्यावर्षी होणार्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशानाची माध्यम प्रायोजक आहे. माध्यम प्रायोजक उपक्रमांअंतर्गत 'गोष्ट एका काळाची.. काळ्या पांढर्या पडद्याची' ह्या कार्यक्रमातल्या कलाकारांशी साधलेला हा संवाद
----
----
कल्पनेच्या भरार्या मारत भविष्यकाळात डोकावून बघायला आपल्याला जितकं आवडतं, त्यापेक्षा काकणभर जास्तच गतकाळाच्या आठवणींमध्ये रमून जायला आवडतं. आठवणीतले चित्रपट, आठवणींतली गाणी, गतआयुष्यातल्या घटना किंवा विशिष्ट प्रसंगांच्या आठवणी यांत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. श्री. मिलींद ओक निर्मित आणि श्री. आशय वाळंबे दिग्दर्शित 'गोष्ट एका काळाची... काळ्या पांढर्या पडद्याची' या सांगीतिक कार्यक्रमात अशीच स्मृतीची अद्भुत दुनिया आपल्यासमोर उभी राहते. स्मृती म्हणजे स्मरण, स्मृती म्हणजे आठवण. स्मृती एका माणसाची, तशीच एका कालखंडाची. हा कालखंड म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ. एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते ती उत्कृष्ट संहिता, सुरेल गाणी, कलाकारांचा सशक्त अभिनय आणि जोडीला चित्रकला तसेच नृत्य यांच्या साहाय्याने.
श्री. मिलींद ओक ह्यांच्या 'नीश एंटरटेन्मेंट' या संस्थेने या आधी सांगीतिकांचे कार्यक्रम रंगमंचावर आणले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल काळातली सदाबहार गाणी घेऊन त्यावर आधारित 'ब्लॅक अँड व्हाईट' हा कार्यक्रम. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. भारतात त्याचे भरपूर प्रयोग झालेच, पण या कार्यक्रमाने दोनदा अमेरिकावारी करून एकूण ३७ प्रयोग अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांत सादर केले. हे सगळं चालू असताना ह्या कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक श्री. मिलींद ओक यांच्या मनात मराठी चित्रपटसृष्टीचा 'ब्लॅक अँड व्हाईट' काळही रेंगाळत होता, शिवाय रंगभूमीचा अनुभव आणि संगीताचे संस्कार जोडीला होतेच. डॉ.समीर कुलकर्णी यांची कथा आणि श्री.आशय वाळंबे यांच्या दिग्दर्शनाने या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळालं आणि या नवीन कार्यक्रमाचा पुण्यात शुभारंभ झाला.
या कार्यक्रमातली गोष्ट तीन पातळ्यांवर पुढे सरकते. निवृत्तीच्या आसपास पोहोचलेले एक प्राध्यापक काही कारणामुळे आपल्या गतआयुष्याच्या आठवणींत गढून जातात. हे कारण समजून घेताना मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास उलगडतो आणि त्याच दरम्यान सांगीतिक प्रवासही घडतो. प्राध्यापक आपल्या आयुष्यातल्या घटनांचा आढावा घेत असताना आपल्या स्मृतीशी संवाद साधतात आणि ती स्मृती थेट व्यक्तिरेखा बनून आपल्यासमोर येते. कथेतल्या प्रसंगांना अनुरूप गाणी गायक आपल्यासमोर सादर करतात. रंगमंच्याच्या पडद्यावर त्या चित्रपटातली किंवा गाण्यांमधली दृश्ये किंवा त्यासंबंधीची माहिती आपल्याला बघायला मिळते. कार्यक्रमादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल युगातील अनेक कलाकार आपल्याला भेटतात. कधी संवादांतून, कधी मागच्या पडद्यावर दिसणार्या दृश्यांमधून, तर कधी थेट गाण्यांमधून. मागच्या पडद्यावर चित्रपटांची नावं दिसतात, कधी जाहिराती तर कधी त्यासंबंधी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती. या सगळ्यांचा उत्तम परिणाम साधला जाऊन मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल काळाचा एक सुंदर कोलाज कार्यक्रमादरम्यान उभा राहतो.
प्रकाशचित्र १ : राहुल सोलापूरकर आणि स्वानंदी टिकेकर
कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे कलांचे इतके विविध प्रकार आपल्यासमोर साजरे होतात की, ज्याला जे हवं त्याने ते पाहावं. कोणी प्राध्यापकांच्या कथेत गुंगून जातो, तर कोणी गाणी ऐकत राहतो, कोणाला कलाकारांचा अभिनय आवडतो, तर कोणाला मिलींद मुळीकांची चित्रं पाहायला मिळतात.
लॉस एंजेलीस इथे यंदा होणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाचा अमेरिकेतला हा पहिलाच प्रयोग. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे निर्माते श्री. मिलींद ओक, दिग्दर्शक श्री. आशय वाळंबे, कलाकार श्री. राहुल सोलापूरकर आणि स्वानंदी टिकेकर, तसंच गायक श्री. जितेंद्र अभ्यंकर, श्री. चैतन्य कुलकर्णी आणि स्वरदा गोडबोले यांच्याशी साधलेला हा संवाद -
'ब्लॅक अँड व्हाईट'च्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल कालखंडाबद्दलचा हा कार्यक्रम बसवताना काय विचार केला होता? कार्यक्रमाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल सांगाल का?
मिलींद - 'नीश एंटरटेन्मेंट' गेली आठ वर्ष संकल्पनाधारीत सांगीतिकांचा कार्यक्रम सादर करीत आहे. या प्रवासाची सुरुवात झाली ती 'भैरव ते भैरवी' या कार्यक्रमापासून. पुढे आम्ही 'पंचम', 'हंड्रेड इयर्स ऑफ बॉलीवुड', 'गझल का सफर' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' हे कार्यक्रम केले. परदेशांत ब्रॉडवे-शोमध्ये सगळे कलाप्रकार एकत्र सादर केलेले बघायला मिळतात. मराठी रंगमंचावर संगीतनाटकांमध्ये हे थोड्याफार प्रमाणात बघायला मिळत असे. पुढे संगीतनाटकंच कमी होत गेली. आता फिरोदिया करंडकासारख्या महाविद्यालयीन स्पर्धेत जर अनेक कलाप्रकार एका मंचावर सादर केले जाऊन शकतात, तर मग हे व्यावसायीक स्वरूपात करणं अशक्य अजिबात नाही. या सगळ्या विचारमंथनातून आधी 'ब्लॅक अँड व्हाईट' तयार झालं आणि ते करत असतानाच या कार्यक्रमाची संकल्पना साकारत गेली. या कार्यक्रमात विविध पातळ्यांवर विविध माध्यमांद्वारे आम्ही एक काळ उभा केला आहे. खरंतर हा काळ प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे असतोच. प्रत्येक व्यक्तीचं एक भावविश्व असतं आणि त्या भावविश्वाची किल्ली या कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या, म्हणजे प्राध्यापकांच्या हाती आहे. प्रत्येकाला आठवणींमध्ये रमून जाण्यासाठी एका 'ट्रीगर'ची आवश्यकता असते आणि या गोष्टीत तो ट्रीगर आहे ती म्हणजे प्राथ्यापकाची स्मृती. यंदाच्या 'बीएमएम'चं जे घोषवाक्य आहे, 'मैत्र पिढ्यांचे जपे वारसा, कला संस्कृती मायबोलीचा' त्याप्रमाणे पिढ्यांचे मैत्र या कार्यक्रमात उलगडत जातं.
आशय - मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ हा खरंतर मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळच म्हणायला हवा. 'संत तुकाराम'पासून थेट 'सामना', 'सिंहासन'पर्यंत अनेक अजोड चित्रपट या काळात निर्माण झाले. त्यामुळे तसं बघायला गेलं तर कार्यक्रमाचा आवाका खूप मोठा होता. हल्ली गाण्यांचे अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमांतून सादर होत असतात. निवेदन, गाण्यांचं सादरीकरण, ते गाण कसं तयार झालं, त्यामागची भूमिका, गप्पागोष्टी, आठवणी अशा ठरावीक स्वरूपात ते बसवलेले असतात. त्यामुळे त्या साच्यात न अडकता आपल्या कार्यक्रमात वेगळं काय करता येईल, असा विचार सुरू होता. कृष्णधवल काळातले चित्रपट हे साधारण मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण पार्श्वभूमी असलेले होते, त्या काळातली किंवा या चित्रपटांमधली माणसं भाबडी होती. आज मागे वळून या काळकडे बघताना फक्त गाणी दाखविण्याऐवजी हा काळ, ही माणसं उभी करता आली तर, त्यांचा अधिक शोध घेता आला तर, असा विचार सुरू झाला. परदेशात होणारे ब्रॉडवे-शो किंवा आपल्या इथे फिरोदिया करंडकादरम्यान होणारं सादरीकरण, ज्यांत वेगवेगळे कलाप्रकार एकत्र साजरे केले जातात, तशा पद्धतीचं स्वरूप या कार्यक्रमाला द्यायचं ठरलं. डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संहितेवर आधारित असा हा कार्यक्रम उभा राहिला.
राहुल - आमचे मित्र डॉ.समीर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कथेमुळे गाण्याच्या कार्यक्रमात नाट्य आणण्याऐवजी नाटकामध्ये गाणी गुंफली गेली. कार्यक्रमाचं स्वरूप हे फक्त निवेदन आणि गाणी हे न राहता एक नाटकच तयार झालं. यातलं प्रमुख पात्र हे आजच्या काळातलं निवृत्तीच्या वयाच्या आसपासचं, त्याची मुलं म्हणजे पुढची पिढी परदेशी गेलेली, तर आई-वडिलांनी, म्हणजे आधीच्या पिढीने स्वातंत्र्याच्या आसपासचा, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा कृष्णधवल काळ अनुभवलेला. त्यामुळे ही कथा तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करते. माझी भूमिका ही फक्त निवेदकाची नसून मी नाटकातलं एक पात्रही आहे. कथेला साजेसं असं नेपथ्य प्राध्यापकाचं घर दाखवतंच, पण त्याबरोबर कथेतले प्रसंग, गाणी ज्या ठिकाणी घडतात ती ठिकाणंही दाखवतं. या सगळ्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्टीने हा फक्त एक गाण्यांचा कार्यक्रम न राहता एक अनुभव ठरतो.
तुमच्या मते या कार्यक्रमाचं बलस्थान कोणतं ?
आशय - माझ्या मते या कार्यक्रमाची संहिता, संहितेतली तसंच कार्यक्रमाच्या गाण्यांमधली भाषा ही या कार्यक्रमाची बलस्थानं आहेत. हल्ली अशा प्रकारची भाषा आपण बोलत नाही. किंबहुना ऐकतही नाही. त्याकाळातली गाणी ऐकली तर गाण्यांचे शब्दही अतिशय सोपे, रोजच्या वापरातले असायचे. या कार्यक्रमानिमित्त ही भाषा प्रेक्षकांना ऐकायला मिळावी, अनुभवायला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे.
राहुल - अर्थातच संहिता. कार्यक्रमात गायली जाणारी गाणी ही ग्रेट आहेतच. त्यांनी इतिहास घडवलेला आहे. मात्र संहिता त्या गाण्यांची अनुभूती आपल्याला देण्याचं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांनी काढलेली जलरंगांमधली चित्रं आणि नेपथ्य हीसुद्धा कार्यक्रमाची बलस्थानं आहेत, असं मी म्हणेन. प्रोजेक्टरचा वापर अशाप्रकारे फारच कमी वेळेला केला जातो आणि या कार्यक्रमात तो अतिशय परिणामकारक ठरतो.
चैतन्य - या कार्यक्रमामधली गाणी अजरामर आहेतच, पण संहितेमुळे त्याचं सादरीकरण अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं. शिवाय कार्यक्रमाचं नेपथ्यही सुंदर आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना या गोष्टींकडे साधारणपणे दुर्लक्ष होतं. पण आमच्या कार्यक्रमात आम्ही नेपथ्याचा सुयोग्य वापर करतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने संहिता आणि नेपथ्य हे कार्यक्रमाचे 'हायलाईट्स्' आहेत, वेगळेपण आहे.
'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात गाणी ही कालानुक्रमे आली होती. या कार्यक्रमात ती कथेच्या गरजेप्रमाणे येतात. तर यामुळे काही वेगळा परिणाम साधाला जातो का?
आशय - ही एका प्राध्यापकाची कथा आहे आणि तो स्वत:च्या स्मृतीशी संवाद साधतो आहे. आपल्याला आठवणी कधी कुठल्या क्रमाने येत नाहीत. एकातून एक आठवणी निघत जातात. जर कालानुक्रमाप्रमाणे फक्त घटनांचा आढावा घ्यायचा झाला तर ते इतिहासाचं पुस्तक वाचल्यासारखं होतं, आठवणींना उजाळा दिल्याची भावना त्यात येत नाही. त्यामुळे या कथेतल्या प्राध्यापकांना त्यांचं गतआयुष्य जसं आठवत जातं तशी गाणी येतात. गाण्यांवर कालानुक्रमाचं कुठलही बंधन आम्ही ठेवलेलं नाही.
राहुल - गाण्यांवर कालानुक्रमाचं बंधन नसलं, तरी त्यांचा क्रम अगदीच रँडम नाहीये. कारण चित्रपटांवर शेवटी त्या त्या काळाचं प्रतिबिंब पडतच. कथेतल्या प्राध्यापकांचं आयुष्य जसं पुढे सरकतं त्या प्रमाणे त्या काळातली चित्रपटसृष्टीही पुढे सरकते. त्यामुळे आम्ही कालानुक्रमाचं बंधन जरी घालून घेतलेलं नसलं तरी काळाचं भान मात्र राखलेलं आहे.
कृष्णधवल काळातली गाणी हा कार्यक्रमाचा एक मुख्य भाग आहे. तर एवढ्या मोठ्या संखेतून तुम्ही गाण्यांची निवड केली ?
आशय - गाण्यांची निवड हा एक महत्त्वाचा आणि अवघड भाग होता. आधी आम्ही कार्यक्रमात 'घेता येतील' अशा गाण्यांची एक मोठी यादी केली होती. काहीकाही गाणी ही मैलाचे दगड असतात, त्यांनी इतिहास घडवलेला असतो. त्यामुळे अशी गाणी आधी निवडली. मग जास्तीत जास्त वेगवेगळे कलाकार, गायक, संगीतकार, महत्त्वाचे चित्रपट या सगळ्यांना स्थान मिळेल, त्यांच्या किमान उल्लेख तरी केला जाईल अशा पद्धतीने बाकीची गाणी निवडली. तसंच एकसारख्या जातकुळीची चांगली आणि प्रसिद्ध अशी दोनतीन गाणी असतील, तर त्यांपैकी एकच निवडलं. जिथे जिथे शक्य होतं तिथे अनवट गाणी निवडली, जेणेकरून कार्यक्रमात नावीन्यही राहील. पण तरीही मराठी चित्रपटसृष्टीचा इतका मोठा कालावधी एवढ्या कमी वेळात दाखवायचा असेल तर कुठली ना कुठली गाणी राहून गेल्यासारखं वाटतंच. त्यामुळे कधी कधी आम्हांला वेगळी गाणी घेऊन या कार्यक्रमाचं 'व्हर्जन २' काढावं, असं वाटतं.
स्वानंदीसाठी एक प्रश्न, तुम्हांला घरून संगीत आणि अभिनय या दोन्हींचा वारसा आहे. तर तुमचा अशा प्रकारच्या कार्यक्रमात काम करण्याचा अनुभव कसा होता?
स्वानंदी - माझ्यासाठी एक कलाकार म्हणून, तसंच एक माणूस म्हणून हा कार्यक्रम अतिशय 'क्लोज टू हार्ट' आहे. यातल्या कथेचा विषय खूप वेगळा आहे. शिवाय मला या सगळ्या गाण्यांबद्दल इतकी तपशीलवार माहिती याआधी नव्हती. कार्यक्रमानिमित्त गाण्यांबद्दलची किंवा एकूणच त्या काळाबद्दलची बरीच माहिती समजली. आमच्या संवांदांमधली भाषा अवघड आहे. सुरुवातीला सगळ्या संवादांचा अर्थ समजावून घेण्यात बराच वेळ गेला. जवळजवळ पंधरा दिवस मी फक्त संहिता वाचून ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही भाषा मला बोलायला मिळते आहे, हेही मला खूप महत्त्वाचं वाटतं. जीभ आणि मेंदू या दोन्हींना चांगला व्यायाम होतो, असं म्हटलं तरी हरकत नाही!
प्रकाशचित्र २ : जितेंद्र अभ्यंकर
या कार्यक्रमात रंगमंचावर वाद्यवृंद नसतो. गायक अगोदर ध्वनिमुद्रण केलेल्या वाद्यरचनेवर गाणी गातात. शिवाय प्रोजेक्टरचा बराच वापर कार्यक्रमात केलेला आहे. एकंदरीत तंत्रज्ञानाच्या वापराचे फायदे कोणते?
आशय - आधी म्हटल्याप्रमाणे हा फक्त गाण्यांचा कार्यक्रम न राहता प्रेक्षकांच्या दृष्टीने एक 'अनुभव' झाला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हे शक्य होतं. उदाहरण द्यायचं झालं, तर प्रोजेक्टरचा वापर. आपलं असं बर्याचदा होतं की, आपल्या आठवणीतली एखादी जागा स्पष्ट आठवते, आपण ती डोळ्यांसमोर पाहू शकतो, पण त्या जागेचे फोटो वगैरे काढलेले नसतात. प्राध्यापकांचा त्यांच्या स्मृतीशी चाललेला संवाद हा त्यांच्या अभ्यासिकेत घडतो, त्यामुळे नेपथ्यात ही अभ्यासिका आपल्यासमोर असते. परंतु त्यांच्या मनात, डोळ्यांसमोर मात्र ती बालपणीची दृश्यं असतात. इतक्या सगळ्या दृश्यांना अनुरूप असं नेपथ्य उभं करणं शक्य नसतं, तसंच त्यावेळचे फोटोही उपलब्ध नसतात. मग ही दृश्यं आम्ही चित्रकार श्री. मिलिंद मुळीक यांच्या जलरंगांमधल्या चित्रांमार्फत प्रोजेक्टरद्वारे दाखवतो. कार्यक्रमात एक प्रकारची नाट्यनिर्मिती होण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो. ध्वनिमुद्रण केलेल्या ट्रॅक्समुळे कार्यक्रमात नेमकेपणा आणायला खूप मदत होते. कारण अमुक इतक्या मिनिटांचं संगीत, मग इतक्या मिनिटांचं गाणं, मग इतके मिनिट कलाकारांचे संवाद, मग पुढचं गाणं असा सगळा आराखडा तयार केलेला असतो. गायक, तसंच कलाकारांचा सराव झालेला असला की प्रयोग खूप नेटका आणि नेमका होतो आणि हे तंत्रज्ञानाच्या वापरानेच शक्य होऊ शकतं.
राहुल - निर्मितीच्या दृष्टीने सांगायचं, तर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ सहा-सात कलाकारांना घेऊन आम्ही इतका मोठा कालावधी दाखवणारा कार्यक्रम उभा करू शकतो, त्या कार्यक्रमाचे इतके दौरे करू शकतो. जर रंगमंचावर वाद्यवृंद ठेवायचं म्हटलं, तर टीममध्ये अजून पाच-सहा, किंवा जास्तच कलाकार घ्यावे लागतात. मग एवढ्या मोठ्या टीमच्या तालमी घेणं, सगळ्यांची वेळापत्रकं बघून प्रयोगांच्या तारखा ठरवणं, दौरे आयोजित करणं हे सगळंच अवघड होत जातं. त्याऐवजी आधी ध्वनिमुद्रण करून ठेवलेल्या ट्रॅक्सवर गाणी बसवून ती सादर करणं हा सरावाचा भाग आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कधी काही मर्यादा आल्यासारखं वाटतं का? समजा तुम्हांला कार्यक्रमाचा अवधी वाढवायचा किंवा कमी करायचा असेल तर ते शक्य होतं का?
आशय - जर आधीपासून कल्पना असेल तर ते करता येऊ शकतं. सुरुवातीला आम्ही तीन अंकी प्रयोग करायचो पण सगळीकडेच तेवढा वेळ उपलब्ध असेल असं नसतं, त्यामुळे आधीपासून माहीत असेल तर कमी कालावधीच्या कार्यक्रमाची आम्ही रूपरेषा ठरवू शकतो. शिवाय लॅपटॉप, प्रोजेक्टर इत्यादी उपकरणांवरचं अवलंबित्व वाढतं. पण आम्ही त्यादृष्टीने 'बॅकअप प्लॅन्स'ही तयार ठेवतो. पण तरीही कधी काही गडबड झालीच, तर या तांत्रिक गोष्टी प्रेक्षक नक्की समजून घेतात.
राहुल - मर्यादा अशी वाटत नाही. आम्हां कलाकारांचे एकमेकांशी सूर जुळलेले असले की कार्यक्रम व्यवस्थित सादर केला जाऊ शकतो. कलाकार, गायक, तांत्रिक बाजू संभाळणारी आमची टीम असे सगळे मिळून प्रेक्षकांना एक 'वाह!' अनुभव देऊ शकतात आणि हे फक्त तंत्रज्ञानाच्या वापरानेच शक्य होतं. प्रेक्षकांच्या दृष्टीने एक मर्यादा म्हणजे प्रेक्षकांनी एखाद्या गाण्याला 'वन्समोअर' दिला तर तो मात्र आम्हांला घेता येत नाही, कारण त्या गाण्याचा ट्रॅक पुढे सरकलेला असतो. पण त्यावर आम्ही असं म्हणू की, प्रेक्षकांनी अगदी जरूर पुन्हा एकदा येऊन कार्यक्रम बघावा. त्या विशिष्ट गाण्याच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेलच, पण एखादी वेगळी गोष्ट, जागाही गवसेल.
स्वानंदी - मर्यादा नाही म्हणता येणार, पण आव्हान मात्र नक्कीच वाटतं. अभिनय करत असताना वेगवेगळ्या भावना दाखवणं हे काही साचेबद्ध नसतं. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. कधी एखाद्या सीनला पॉज जास्त घेतला जातो, कधी एखाद्या संवादाला कमी जास्त वेळ लागू शकतो. पण पुढचा सगळा क्रम मात्र अगदी मिनिटांच्या हिशोबात ठरलेला असतो. त्यामुळे कार्यक्रम सादर करताना अभिनय उत्तम झाला पाहिजे, वेळ पाळली पाहिजे, नाहीतर आमचा सीन संपेपर्यंत पुढच्या गाण्याचं संगीत सुरूही होऊन जातं, सहकलाकारांबरोबर जमवूनही घेतलं पाहिजे, अशा बर्याच गोष्टींचं भान राखावं लागतं. मग मी आणि राहुलदादा काही युक्त्या वापरून एकमेकांना संकेत देत असतो, जेणेकरून काही गोंधळ होऊ नये.
गायकांचं याबाबत काय मत ?
जितेंद्र - काही प्रकारची गाणी, जसं शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, काहीवेळा भावगीतसुद्धा, गायक आपल्या मनाप्रमाणे कितीही वेळ गाऊ शकतो, खुलवू शकतो. एखादं नाट्यसंगीत अगदी पंधरा, वीस मिनिटंही चालू शकतं किंवा दोनतीन मिनिटांत संपूही शकतं. पण जर साथीला वाद्यवृंद असेल तरच हे शक्य आहे. या कार्यक्रमात वाद्यवृंद नसतो. आधी रेकोर्ड केलेल्या ट्रॅक्सवर आम्ही गाणी म्हणतो. त्यामुळे अशाप्रकारची सूट आम्हां गायकांना ऐनवेळी मिळत नाही. पण आम्ही कार्यक्रम बसवतानाच याचा विचार केलेला आहे.
चैतन्य - जितेंद्रने सांगितलं तसं ऐनवेळी गायकाला गाण्यात बदल करता येत नाहीत. पण गाणं बसवताना ते जास्तीत जास्त चांगलं होण्याच्या दृष्टीने मी ते कसं गाणार आहे, कुठल्या जागा घेणार आहे, एखादी ओळ वेगवेगळ्या पद्धतीने जास्तवेळा म्हणणार आहे का, वगैरे गोष्टींचा आधीच विचार करतो. त्यामुळे मी जे गाणं गाणार आहे, त्याचा ट्रॅक मला हवा तसा रेकॉर्ड केलेला असतो. एवढी सगळी तयारी आधीच केल्याने मी ऐनवेळी गाण्यात बदल करण्याची शक्यता जवळजवळ नसतेच आणि मग तंत्रज्ञानाच्या वापराची मर्यादा राहत नाही.
स्वरदा - तंत्रज्ञानाच्या मर्यादा जाणवत नाहीत, पण कधीकधी आव्हानात्मक प्रसंग मात्र समोर उभे राहतात, कारण शेवटी ती सगळी यंत्रं आहेत आणि बंद पडूच शकतात. उदाहरणासाठी एक प्रसंग सांगते. या कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येकजण हेडसेट-माईक वापरतो. एका प्रवेशादरम्यान मी माझं गाण संपवून विंगेत जात असतानाच आमची सहगायिका असलेली रमा गाणं सुरू करते. त्यावेळी माझा माईक बंद होतो आणि मी बाहेर जाईपर्यंत तिच्या गाण्याची एक ओळ म्हणून झालेलीही असते. एका प्रयोगादरम्यान रमाचा माईक बंद पडला. मी विंगेबाहेर पोहोचले तरी मला रमाचा आवाज ऐकू आला नाही, म्हणून मी मागे वळून पाहिलं तर जितेंद्र मला खूण करत होता. आमच्या साऊंडची व्यवस्था बघणार्या सागरने प्रसंगावधान राखून माझा माईक सुरू केला आणि ते पूर्ण गाणं मी विंगेतून गायलं आणि रमाने लिपसिंक केलं. हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की प्रेक्षकांना काही समजलं नाही. पण तेव्हापासून आम्ही सगळे मात्र कायम सतर्क असतो!
प्रकाशचित्र ३ : स्वरदा गोडबोले आणि चैतन्य कुलकर्णी
हा साधा गाण्यांचा कार्यक्रम नाही. यात गायकांनाही वेशभूषा, अभिनय, थोडंफार नृत्य हे सगळं करावं लागतं. यामुळे गाण्यावर काही परिणाम होतो असं वाटतं का? आणि तो होत असेल तर तो टाळण्यासाठी काय प्रयत्न करता ?
जितेंद्र - गाण्यावर परिणाम होतो, पण तो चांगला परिणाम होतो. वेषभूषा, थोडाफार अभिनय, हालचाली यांमुळे गाण्याचं सादरीकरण अधिक परिणामकारक होतं, असं मला वाटतं. मी स्वतः कार्यक्रमात 'जग हे बंदिशाला' गाणं गातो आणि त्यावेळी मला कैद्याची वेषभूषा असते. टीपिकल गाण्याच्या कार्यक्रमात असते तशी झब्बा-सलवार किंवा नेहरूशर्ट यापेक्षा गाण्याच्या विषयाला अनुसरून असलेली ही वेशभूषा गाणं प्रभावी करते. तसंच अशा प्रकाराची प्रेक्षकांना फार सवय नसते, त्यामुळे हे नावीन्य त्यांनाही आवडतं. अजून एक मुद्दा म्हणजे रंगमंचावर वाद्यवृंद असला की संगीत चालू असताना प्रेक्षकांचं लक्ष त्या वाद्यवृंदाकडे असतं. पण आमच्या बाबतीत ध्वनिमुद्रित ट्रॅक्स असल्याने संगीत सुरू असताना रंगमंचावर काहीतरी घडणं अपेक्षित आहे. अन्यथा प्रेक्षकांना कोर्या चेहर्याचे गायक बघत बसावं लागून एक प्रकारची पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे गायकांचा अभिनय, वेशभूषा हे ती पोकळी निर्माण होऊ देत नाहीत. अशा सादरीकरणाची अजून माहिती व्हावी, तांत्रिक बाबी कळाव्या म्हणून परदेशदौर्यांच्या दरम्यान जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही ब्रॉडवे-शो, संगीतिका आवर्जून पाहतो. हल्ली तर या आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमामुळे फक्त गाण्याच्या कार्यक्रम सादर करायची माझी सवयच मोडली आहे.
चैतन्य - आपल्याकडे संगीतनाटकांची परंपरा आहे. त्यामुळे गायकांनी अभिनय करणं किंवा अभिनेत्यांनी गाणं हे मराठी रंगमंचासाठी काही नवीन नाही. हल्ली अशाप्रकारचे कार्यक्रम कमी होतात. पण गाताना गाण्याच्या विषयाप्रमाणे किंवा मूडप्रमाणे अभिनय, थोड्याफार हालचाली, नृत्य वगैरे केल्यास गाणं अधिक मोकळेपणाने गायलं जातं, गायक ते एंजॉय करतो आणि त्यामुळे समोरच्यापर्यंत अधिक पोहोचतं. अर्थात हे सगळ्याच गाण्यांच्या बाबतीत शक्य नसतं, पण शक्य असतं तिथे आम्ही करतो आणि त्याचा फायदाच होतो. गाणं ऐकायला छान वाटतंच, पण ते स्टेजवर 'दिसतंही' छान.
स्वरदा - आमच्या कार्यक्रमातले कलाकार जसा आणि जेवढा अभिनय करतात, तितका अभिनय आम्ही गायक करत नाही. आमचा अभिनय हा गाण्याचा मूड दाखवणारा असतो. त्यामुळे सरावाने गाणं आणि अभिनय, नृत्य हे सगळं एकत्र करणं जमतं आणि या गोष्टी एकमेकांना पूरक ठरतात, एकंदरीत सादरीकरण अधिक परिणामकारक करतात. गाणी प्रेक्षकांच्या फक्त कानापर्यंत न पोहोचवता थेट हृदयापर्यंत पोहोचवतात.
तुम्हा गायकांना अभिनय करण्याचा आधी काही अनुभव होता का ?
जितेंद्र - नाही, अभिनयाचा काहीच अनुभव नव्हता. किंबहुना मी गाणं आणि अभिनय या दोन्हीचं शिक्षण घेतलेलं नाही. दोन्ही गोष्टी या सरावाच भाग. मी कार्यक्रमात जे गातो किंवा अभिनय करतो त्याचं श्रेय मी कार्यक्रमाचे निर्माते श्री. मिलींद ओक यांना देईन. एकतर त्यांनी माझ्यावर, माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला संधी आणि संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. दुसरं म्हणजे प्रयोग झाल्यावर आम्ही चर्चा करतो. कुठला भाग अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल, अजून सुधारता येईल, हे तपासतो आणि त्याप्रमाणे बदल करतो. त्यामुळे प्रयोग करताकरताच सराव आणि सुधारणा होत जाते.
चैतन्य - मला अगदी योगायोगाने संगीतनाटकाचा अनुभव मिळाला. मी दहावीत असताना गाणं शिकत होतो आणि तेव्हा आमची टीम एका स्पर्धेकरता 'संगीत मानापमान'चा प्रयोग बसवत होती. आमच्यातले एक कलाकार ऐनवेळी आजारी पडले आणि त्यांच्या जागी मला संधी मिळाली. तसंच सध्या मी 'संगीत कट्यार काळजात घुसली'मध्ये काम करतो. त्या नाटकाच्यावेळी आम्हांला मार्गदर्शन करायला सुबोध भावे आले होते. या दोन्ही अनुभवांचा मला या प्रयोगादरम्यान खूपच उपयोग होतो.
स्वरदा - अभिनयाचा असा काहीच अनुभव नव्हता. पण या कार्यक्रमाआधी 'ब्लॅक अँड व्हाईट'चे आम्ही बरेच प्रयोग केले आणि त्या दरम्यान अशाप्रकारच्या सादरीकरणाचा भरपूर सराव झाला होता. आतातर सवयीचा भाग होऊन गेला आहे. शिवाय जसजसे प्रयोग होतात तसं हे सगळं अधिकाधिक सुधारतं, परिणामकारक होतं.
या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत जे प्रयोग झाले, त्यांत प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय होती ? तुमच्या लक्षात राहिलेल्या काही प्रतिक्रिया कोणत्या ?
राहुल - बर्याच वेळेला असं होतं की, आपण आपल्या आईवडिलांच्या किंवा त्या आधीच्या पिढीला समजून घेऊ शकत नाही. ती माणसं आपल्याला भाबडी वाटतात. पण कार्यक्रमातल्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखेची गोष्ट पाहून आधीच्या पिढीला समजून घ्यायचा प्रयत्न करावासा वाटणं, त्यांच्याशी खुला संवाद साधावासं वाटणं किंवा त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटणं इतकं जरी झालं तरी आमच्यासाठी ती मोठी दाद आहे. काही प्रेक्षक नंतर सांगतात की, कार्यक्रम पाहून झाल्यावर खडबडून जागं झाल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे आम्ही येऊन तुमच्याशी काही बोलूच शकलो नाही! अगदी लक्षात राहिलेली प्रतिक्रिया म्हणजे, एकदा एकाने सांगितलं होतं की मी आत्ताच्या आत्ता घरी जाऊन आईवडिलांना 'थँक्स' म्हणणार आहे.
आशय - बर्याचदा प्रेक्षक येऊन घडाघडा बोलत नाहीत. पण हल्ली आम्ही कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षकांकडून आभिप्राय गोळा करतो. त्यांत अनेकजण बर्याच हृद्य प्रतिक्रिया देतात. आम्ही महिला दिनाला बडोद्याला कार्यक्रम साजरा केला होता. तेव्हा काही ज्येष्ठ महिलांनी 'हा कार्यक्रम म्हणजे महिला दिनानिमित्त आम्हांला मिळालेलं सर्वोत्कृष्ठ गिफ्ट आहे' असं सांगितलं होतं. कधीकधी प्रेक्षक म्हणतात की, कथेमधली भाषा जरा जड वाटते. आजकाल मराठी भाषेचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी त्या काळातली किंवा त्या स्वरूपातली आपली भाषा आत्ताच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, आपण तशी भाषा आता बोलत नसलो तरी निदान ऐकायची संधी मिळावी, हाच आमचा हेतू आहे.
स्वानंदी - अनेक प्रेक्षक येऊन कार्यक्रम खूप आवडला, तुमचं काम आवडलं, असं सांगतात, भरभरून बोलतात. पण एक अगदी लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे, एकदा कार्यक्रम संपल्यावर एक बाई भेटायला आल्या. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्या एकही शब्द बोलू शकलया नाहीत. फक्त माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन निघून गेल्या. ही अशी मुक दाद मला खूप महत्त्वाची वाटली. कारण त्या बाई स्वतःशीच काही विचार करत होत्या, चिंतन करत होत्या आणि आपला कार्यक्रम पाहिल्यामुळे हे घडलेलं आहे, हे पाहून बरं वाटलं.
चैतन्य - या कार्यक्रमाची संहिता इतकी सुंदर आहे की, ती प्रेक्षकांना अगदी हलवून टाकते. कथेतल्या प्राध्यापकांच्या तोंडी एक वाक्य आहे, 'प्रत्येक मुलाला आपला बाप नेहमीच खुजा वाटतो!' या वाक्याला हमखास टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या संदर्भात एक प्रसंग म्हणजे, आमचा मस्कतला कार्यक्रम झाला त्यावेळी एक गृहस्थ येऊन आम्हांला म्हणाले, "आपल्याला आपण जेवढी गोष्ट बघतो, तेवढीच संपूर्ण आहे, असं वाटतं. पण काही गोष्टी आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाहीत! मी आजच माझ्या वडिलांना अशा न पोहोचलेल्या गोष्टींबद्दल विचारणार आहे." ही प्रतिक्रिया मला खूप बोलकी आणि प्रातिनिधिक वाटली.
जितेंद्र - मला एक प्रतिक्रिया लक्षात राहिली आहे. माझ्या ओळखीतले नाटकात काम करणारे गृहस्थ कार्यक्रम बघायला आले होते. कार्यक्रम झाल्यावर ते मला म्हणाले की, 'तुझा गाण्यांचा पाया पक्का आहेच, पण अभिनयही उत्तम करतोस, त्यामुळे आता नाटकात काम करायला लाग'. मी आजपर्यंत कधीही अभिनय केलेला नसल्याने जाणकार व्यक्तीने केलेलं हे कौतुक मला खूप महत्त्वाचं वाटलं.
स्वरदा - कार्यक्रम पाहायला संगीतक्षेत्रातली काही ज्येष्ठ मंडळी आत्तापर्यंत आली आहेत. त्यांची दाद, अभिप्राय हे नेहमीच लक्षात राहतात. तसंच त्यांच्या सूचनांचाही उपयोग होतो. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दादही अतिशय महत्त्वाची वाटते. कारण त्यामुळे प्रयोग योग्य मार्गावर आहे ह्याची खात्री होते. इथे एक गंमत सांगाविशी वाटते. कार्यक्रमात मी 'ऐरणीच्या देवा तुला' हे गाणं गाते. मी आणि अमित वझे ते मूळ गाण्यासारखं सादर करतो. गाणं सुंदर आहे, सगळ्यांचं आवडतं आहे. आमच्या मते आमचं सादरीकरण, पडद्यावर दिसणारं मूळ गाण्यातलं दृश्य, गाण्यासंबंधी सांगितली जाणारी एक आठवण हे सगळं छान जमून येतं. पण सांगायची गोष्ट अशी की, एवढ्या प्रयोगांमध्ये आत्तापर्यंत आमच्या या गाण्याला एकदाही टाळ्या मिळालेल्या नाहीत. प्रेक्षक प्रयोगानंतर ह्या गाण्याबद्दल आवर्जून सांगतात मात्र प्रयोगादरम्यान या गाण्याआधीचा सीन आणि नंतर लगेच सुरू होणारा सीन ह्यात इतके गढून जातात की ह्या टाळ्या वाजवणंही राहून जातं!
तुम्ही जेव्हा परदेशात कार्यक्रम सादर करता, तेव्हा कार्यक्रमात काही बदल करावे लागतात का? तसंच आता अमेरिकेतल्या अधिवेशनामध्ये कार्यक्रम सादरा करणार आहात, तर त्या दृष्टीने तयारी कशी सुरू आहे?
मिलींद - आम्ही आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांचे सुमारे दिडशे प्रयोग अमेरिकेत सादर केले. त्या दरम्यान अमेरिकतल्या रसिक प्रेक्षकांची जी ओळख झाली त्यावरून त्यांना नात्यांचा हा संवेदनशील पदर नक्की आवडेल अशी खात्री वाटते. आम्ही ह्या कार्यक्रमाचा अमेरिकेतला पहिला प्रयोग खास बीएमएमसाठी राखून ठेवला होता. हा प्रयोग झाल्यानंतर भविष्यात अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ह्या कार्यक्रमाचे प्रयोग सादर करण्याची इच्छा आहे. ह्या प्रयोगांनाही आधीच्या कार्यक्रमांप्रमाणे रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित रहातील ह्याचीही खात्री आहे.
आशय - कार्यक्रमाच्या परदेशातल्या सादरीकरणाच्या दृष्टीने काही बदल करावे लागत नाहीत. काही वेळा स्टेजचा आकार किंवा इतर तांत्रिक बाबींकरता बदल करावे लागतात. बीएमएममधल्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं, तर हा आमच्या अमेरीकेतला पहिला कार्यक्रम आहे. मध्यंतरी एका लघुपटात एक वाक्य ऐकलं होतं, 'अमेरिका डज नॉट गिव्ह सेकंड ऑपॉरच्युनिटी टू एनीवन'. त्यामुळे पहिला शो अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत! 'ब्लॅक अँड व्हाईट' हा कार्यक्रम अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. तसाच हाही आवडेल, याची आम्हांला खात्री आहे.
स्वानंदी - बीएमएमचा कार्यक्रम हा माझ्यासाठी अमेरीकेतला पाहिलाच कार्यक्रम असणार आहे आणि त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. सध्या अमेरिकेला जाण्याच्या तयारीबद्दल आमच्या सगळ्या ग्रूपची खूप धांदल, गडबड सुरू आहे. त्यासाठी फोन, मेसेजेस सुरू असतात. हे सगळं मला मनापासून आवडत आहे. सध्या मी 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या शूटींगमध्ये खूपच व्यग्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हवासा चांगला बदल मिळेल. शिवाय कार्यक्रमाच्या किंवा मालिकेच्या / नाटकांच्या प्रेक्षकांना भेटणं, बोलणं हेही खूप आवडतं, कारण त्या निमित्ताने त्यांचा थेट अभिप्राय मिळू शकतो. अशी संधीही बीएमएमच्या निमित्ताने मिळेल.
जितेंद्र - मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे, मग तो भारतातला असो किंवा अमेरिकेतला. त्यामुळे जास्तीत जास्त चांगला प्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न असेलच. हा प्रयोग पुण्यातल्या प्रेक्षकांना आवडला, त्यांनी उचलून धरला, त्यामुळे अमेरिकेतल्या प्रेक्षकांनाही तो नक्की आवडेल.
चैतन्य - अमेरिकेत आम्ही या आधी कार्यक्रम सादर केलेले आहेत. पण बीएमएमचा स्तरच वेगळा आहे. पुण्यात शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम करणे आणि तेच गाणं 'सवाई गंधर्व महोत्सवा'च्या मंचावर सादर करणे, यांत जो फरक असतो, जे आव्हान किंवा दडपण असतं तसच काहीसं बीएमएमच्या बाबतीत आहे. शिवाय परदेशातले प्रेक्षकही तितकेच चोखंदळ असतात. इतक्या लांब येऊन चांगला कार्यक्रम सादर केल्याबद्दल कौतुक होतं, पण त्याचबरोबर कार्यक्रमात काही कमीजास्त झालं, तर लगेच अगदी थेट प्रतिक्रियाही मिळते. त्यामुळे आम्ही कार्यक्रम उत्तम व्हावा म्हणून कसून तयारी करत आहोत.
स्वरदा - बीएमएममधल्या कार्यक्रमाची उत्सुकता आहेच आणि त्या दृष्टीने तयारीही सुरू आहे. आमचा दुसर्या एका कार्यक्रमानिमित्त परदेश दौरा सुरू होता. तो संपल्यावर आता जोरात तयारी सुरू आहे. येत्या वीस तारखेला आमच्या या कार्यक्रमाचा पुण्यात प्रयोग आहे. बीएमएमच्या आधी होणार्या या प्रयोगाचा आम्हांला सरावाच्या दृष्टीने नक्कीच उपयोग होईल.
तुमच्या सगळ्या टीमला बृहन्महाराष्ट मंडळाच्या अधिवेशनातल्या प्रयोगासाठी, तसंच यापुढील सर्व कार्यक्रमांसाठी अनेक शुभेच्छा!
या प्रयोगाची थोडक्यात ओळख :
----
मुलाखत मायबोली.कॉमवर पूर्वप्रकाशित :
http://www.maayboli.com/node/54301
0 प्रतिसाद:
Post a Comment