उद्यानगाथा

 वसंत ऋतू

ह्या शहरात घर शोधायला सुरुवात केली तेव्हा पहिली अट होती ती म्हणजे किंमत! बाकी ढिगभर चांगल्या गोष्टी असूनही ते परवडलच नाही तर काय करणार ?! त्यानंतर अजून एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे पुढे मागे छोटसं का होईना पण अंगण हवं. आम्हांला दोघांनाही झाडं लावायची, बागकामाची आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी जागा हवी. गेल्या दहा वर्षात कोव्हिडची वर्षं सोडता एका घरी सलग दोन वर्षांपेक्षा जास्त रहाणच झालं नाही. शिवाय फक्त घरं आणि शहरंच नाही तर देशही बदलले! त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागेत लावलेली थोडी फार झाडं प्रत्येकवेळी सोडून यावी लागली. पेरेनियल झाडांचं पुढे काय झालं माहीतही नाही.
*
PXL_20240916_211942576.jpg
*
हे घर बघायला आलो, तेव्हा सगळ्यांत आवडलेली गोष्ट म्हणजे पुढचं मागचं अंगण! पुढच्या बाजूला मुख्य दार आणि त्याला लागून असलेल्या गॅरेजपासून पुढे रस्त्यापर्यंत उतार. ह्या उतारावर ड्राईव्ह-वे. ड्राईव्ह-वे च्या एका बाजूला चिंचोळा हिरवा पट्टा तर दुसर्‍या बाजूला मोठी हिरवळ.. दोन्ही बाजूंना अर्ध्यापर्यंत कुंपण. हिरवळीवर उतरंड छेदणारा एक मोठा चौथरा आणि त्यावर लावलेली विविधरंगी पानांची झुडपं. हिरवळीवर घराच्या बाजूला बॉक्सवूडच्या झुडपांची मोठी रांग. सगळं कसं नीटनेटकं. मागच्या बाजूला तर सलग मोठं अंगण, त्यात हॉट टब, ट्रँपोलिन, कोबा घालून टेबल खुर्च्या ठेवायची सोय. मागे कुंपणाच्या बाहेर मोठी मोठी पाईन आणि सेडारची झाडं. ती इतकी जुनी आणि उंच की सूर्य डोक्यावर आल्याखेरीज जमिनीपर्यंत ऊन पोहोचतही नाही! घराच्या डाव्या बाजूला शेजारच्यांचं कुंपण आणि उजव्या बाजूचा एक त्रिकोणी पट्टाही कुंपणाच्या हद्दीत. तिथली झाडांची सावली इतकी गडद की भर उन्हातही थंड वाटावं. एकूण बागकामाची हौस भागवायला एकदम योग्य. हौस भागवता भागवता दमायलाही होईल कदाचित, पण तेव्हाचं तेव्हा बघू!
*
PXL_20241011_200312636.PORTRAIT.ORIGINAL.jpg
*
उन्हाळ्याची सुरूवात
ह्या घरी रहायला यायचं ठरल्यावर आमच्या मनात बागेचे इमले सुरू झाले. ड्राईव्ह-वेच्या उतारावर डॅफोडील्स, ट्युलिप आणि हायासिंथचे बल्व लावू. पुढे हिरवळीच्या भोवती छान फुलझाडांचं कुंपण करू. एका बाजूला झेंडूची रोपं, दुसरीकडे गुलाबाची झाडं. चौथर्‍यावर जागा मिळेल तशी शेवंती, अ‍ॅस्टर शिवाय जर्बेराचे कंद. म्हणजे कशी जवळजवळ फेब्रुवारी ते ऑक्टोबर फुलं फुलतील. उताराच्या दुसर्‍या बाजून लालभडक पानांचं लेसलिफ मेपल आणि अजून एखादं शोभेचं झाड चांगलं वाटेल. तिथे फार लहान झाडं नको, मोठी, स्पष्ट दिसणारी हवी. ड्राईव्ह-वे वरून गाडी मागे घेताना कोणी डगमगलं तर बिचार्‍या झाडांचा जीव जायचा! मागच्या बाजूला फार काही नको करायला. मुलांना खेळायला मोकळी जागा हवी थोडी. डाव्या बाजूला स्वयंपाक घराच्या दारापाशी व्हेजी पॅच करू. मिरच्या, कोथिंबीर, भाज्या लावता येतील. म्हणजे अगदी फोडणीचं तेल तापायला ठेवलं की जाऊन मिरच्या तोडून आणायच्या! मागच्या कुंपणाच्या भोवती सावलीत फुलतील अशी फुलझाडं लावू. उजवीकडच्या त्रिकोणी तुकड्यावर सेडार, पाईनच्या फांद्यांची काटछाट करून फळबाग करावी. सफरचंद, अंजीर, द्राक्षांची वेल, इथल्या हवेत जगत असतील तर डाळींबाचं झाड, शिवाय पेअर. अजून थोडी जागा उरलीच तर एक गाय पण आणून ठेऊ म्हणजे तिचं दूध घालून फ्रुट सॅलडही करता येईल!
*
PXL_20241011_200416805.PORTRAIT.jpg
*
उन्हाळा
अखेर ह्या घरी रहायला आलो आणि आता मनात बांधलेले इमले प्रत्यक्ष उतरवायची वेळ आली आहे. सामान हलवण्यात आणि लावण्यात खूप वेळ गेला आणि दमायला झालं. बागेचे इमले हवेतच राहणार की काय असं वाटतय. सुरुवात करायची म्हणून दुकानातून मातीची दोन-तीन पोती आणली. ती आणली कुंड्यांच्या अंदाजाने. जमिनीवरच्या झाडांसाठी वापरली तर एका कोपर्‍यात घालून संपली पण. मग अजून फेर्‍या माराव्या लागल्या. इथल्या उन्हाळ्यात गवत इतकं भसाभसा वाढतं की ते वाढण्याचा वेग आणि कापण्याचा वेग ह्यात कधीच मेळ न बसल्याने ते कायम वाढलेलच दिसतं. अगदी लहान मुलांचे केस कापल्यावर कसे लगेचच दोन चार दिवसात पुन्हा वाढलेले दिसतात तसं.
*
PXL_20250609_145216260.jpg
*
शरद ऋतू
कंद, नवीन रोपं लावेपर्यंत उन्हाळा संपून थंडी, पाऊसच सुरू झाला आणि मग पानगळ, पाईन निडल्स ह्यांचा खच पडून बाग झाडायचं काम तेवढं वाढलं. झाडांचं काम नाही तर निदान कुंपणाची डागडुजी करून घेऊ असा विचार करून सरत्या उन्हाळ्यात कुंपणाचं काम करून घेतलं . देश कुठलाही असो, काम करायला येणारी माणसं वेळेवर येतील तर शपथ. दसर्‍याला छान तयार होईल असं वाटलेलं कुंपण कसंबसं थँक्सगिव्हिंगपर्यंत तयार झालं. स्वयंपाकघराच्या दाराजवळ सफरचंदाचं झाड आहे ह्याचा नुकताच शोध लागलाय. त्याला लगडलेली सफरचंद चांगली मोठी होऊन पानांमधून डोकी बाहेर काढायला लागली आहेत. पण ते झाड घराच्या फारच जवळ आहे. फळांचा बहर संपल्यावर कुंपणाचं काम करणारा माणूस म्हणे की ते थोडं दूर लावूया. त्याला विचारलं जगेल ना ते? तर म्हणे देवाची कृपा असेल तर जगेल. म्हंटल झाड उपटणार तू, मग ते जगवायची जबाबदारी देवावर का टाकतोस? तर तो नुसताच हसला. पण मग खरंच देवाचं नाव घेऊन ते अख्खं झाड काढून मागे लावलं. तिथेच दोन र्‍हॉडोडेंड्रॉनची (rhododendron)झाडं होती. ती मागच्या दारी कशाला? पुढे छान दिसतील म्हणून ती काढून पुढे लावली. एका कोपर्‍यात वेल चढवायला लाकडी जाळीही करून घेतली. आता थंडीत कसली वेल लावणार असा विचार करत असतानाच 'विंटर जॅस्मिन' ह्या वेलीची माहिती समजली आणि जवळच्या नर्सरीत ती मिळालीही! आणून ती जाळीजवळ लावून टाकली. कॉस्टकोतून (Costco) आणलेले ट्युलिप आणि डॅफोडिल्सचे बल्ब थंडीत कुडकुडत एकदाचे लावले. नर्सरीत भेटलेल्या आज्जींची आज्ञा शिरसावंद्य मानून पिवळी शेवंती जमिनीत लावली. जगेल म्हणे नक्की! लाल आणि गुलबट रंगाची मात्र कुंड्यांमध्येच ठेवली आहे.
*
PXL_20241011_201108874.jpg
*
हिवाळा
हिवाळ्यात परिसरातली फुलझाडं आणि फळझाडं निष्पर्ण झाली पण पाईन, सेडारनी हिरवा रंग मात्र टिकवून ठेवला आहे. अमेरिकेतल्या इतर भागांमध्ये जसे खराटे दिसतात, ततेवढे खराटे काही ह्या भागात होत नाहीत आणि त्यामुळे भर थंडीतही निसर्गाच्या जिवंतपणाची लक्षणं दिसत रहातात. नवीन वर्षाचं स्वागत नुकत्यात लावलेल्या विंटर जॅस्मिनच्या कळ्यांनी केलं. पाना गणीक एक कळी. पुढे पानं झडून गेली आणि सुंदर नाजूक पिवळ्या फुलांनी वेल बहरली! अश्यातच हिमवृष्टी झाली. गोठवणारी थंडी, साठलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या पार्श्वभुमीवर ती पिवळ्या फुलांची वेल! नेहमीच्या हिवाळ्यापेक्षा हे एकदम वेगळच दृष्य आहे!. ट्युलिप आणि डॅफोडील्सना सिझन बदलायची कॉस्टकोपेक्षाही जास्त घाई असते. त्यामुळे बर्फ सरता सरता ट्युलिप आणि डॅफोडील्सच्या कोंबांनी डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. हायासिंथ त्यामानाने निवांत! तश्यातच दोन-तीन दिवस पावसाने उघडीप घेतली. बाहेर बघितलं तर शेजारच्या घरातले आज्जी-आजोबा पूर्णवेळ बाहेर! वाफ्यांची डागडूजी करणं, वाळक्या काटक्या काढून टाकणं, वाफ्यांंमध्ये मल्च टाकणं, मोठ्या झाडांची छाटणी करणं, हिरवळीवर खत फवारणं, थोड्या बिया टाकणं वगैरे बरीच कामं करत आहेत. थंडी होती पण पूर्ण जामानीमा करून काम करत आहेत. त्यांना विचारलं की हे एवढया लवकर करायचं का? तर म्हणे हो, नंतर वेळ कसा जातो कळत नाही.
*
PXL_20250422_162544794.jpg
*
वसंत ऋतू
आज्जी आजोबांकडून धडे घेऊनही आम्हांला हलायला जरा वेळच लागला. पण दरम्यान बागेत काही सुखद धक्के बसायला लागले आहेत. आम्ही लावलेले ट्युलिप आणि डॅफोडील्स फुललेच होते पण अजूनही काही ठिकाणी एक एक ट्युलिपची फुलं दिसायला लागली. पुढच्या दारी असलेल्या चौथर्‍यावर अगदी जमिनीलगत फुलाच्या आकारात मस्त पोपटी-हिरवी पानं फुटलेली दिसतायत. इंटरनेटवर शोधलं तर समजलं की ते 'होस्टा'. त्यांना मध्यभागी तुरा येतो. आधी इथे रहाणार्‍यांनी कंद लावले असावे. र्‍हॉडोडेंड्रॉनची पानं थंडीत गळलीच नव्हती आणि त्याच्या पानांच्या बेचक्यात छोट्या छोट्या कळ्या दिसायला लागल्या आहेत. र्‍हॉडोडेंड्रॉन आधी एवढी दिसली नव्हती पण आता मात्र बाहेर सगळीकडे तिच दिसत आहेत! पांढरी, गुलाबी, केशरी आणि लाल भडक. आमच्या बागेतला रंग कुठला येतोय बघूया. ह्यांचा फुलोरा सुंदर दिसतो. गेल्यावर्षी आणलेल्या स्ट्रॉबेरीची रोपटी वाढायला लागली आहेत. आणली तेव्हा अगदीच लहान होती. जीव आहे की नाही असं वाटलं तेव्हा! त्यांना नखाएवढी लहान पांढरी फुलं दिसत आहेत. सगळ्यात भारी म्हणजे सफरचंदालाही फुलं आली आहेत. सफरचंदाची फुलं आधी कधी पाहिलीच नव्हती! सुरेख पांढरी, गुलाबी फुलं आहेत. म्हणजे इकडून तिकडे हलवलेली सगळी झाडं रुजली तर! गेल्यावर्षी जमिनीत लावलेले एशियन लिलीजचे कंदही फुलायला लागलेले दिसत आहेत. बागेत अजून झाडं लावायला हवी. मागे ठरवलं होतं तशी झेंडूची रोप बॉर्डर म्हणून लावायची आहेत. फॉलमध्ये जमिनीत लावलेल्या पिवळ्या मम्सचं काय झालं काय माहित? अजून तरी फुट दिसत नाहीये. मागच्या उन्हाळ्यात जे हरीण दिसायचं ते परवा खूप दिवसांनी दिसलं. खूप जाड वाटलं. नंतर समजलं की तिला लवकरच पाडस होणार आहे तर! आजूबाजूला डॉगवुडची झाडं छान फुलायला लागली आहेत. आपल्याहीकडे एक असावं म्हणून गुलाबी रंगाचं डॉगवुड आणून पुढच्या आंगणात उतारावर लावलं. ह्या परिसरात अतिशय उत्तम दर्जाच्या रेनियर चेरी मिळतात. म्हणून ते ही लावलं. नंतर समजलं की त्याला 'सोबत' लागते. ते एकटं फुलत, फळत नाही. म्हणजे आता अजून एक चेरीचं झाड आणावं लागणार!
*
PXL_20250927_191553551.jpg
*
उन्हाळ्याची सुरूवात
बागेतले धक्के अजूनही सुरूच आहेत पण ते तेवढेसे सुखद राहिलेले नाहीत आता. र्‍हॉडोडेंड्रॉनच्या पानांमधल्या बेचक्यांमध्ये जे काही होतं त्या कळ्या नव्हत्याच! ते कोंब उमलले आणि त्यातून नवीन पानच फुटली आणखी. ड्राईव्ह-वेच्या शेजारच्या हिरवळीवर अचानक मातीची ढेकळं दिसायला लागली. जरा इंटरनेटवर शोधाशोध केली तर.. हे देवा! ते तर मोल नाहीतर गोफर (Gopher) असतील असं समजलं. आता ह्यांचा बंदोबस्त करायचा ह्याची शोधाशोधी करा. इंटरनेटवर बघितलं तर नानाविध उपाय दिसले. त्यांच्या बिळांवर कुत्र्याला शी करायला लावा इथपासून ते अ‍ॅमेझॉनवर मिळणारं कोल्हामूत्र त्यावर शिंपडा इथपर्यंत! ह्या असल्या वासाळ उपायांनी त्या मोल-गोफरांपेक्षा आपल्यालाच त्रास व्हायचा. मग जरा शेजारीपाजारी विचारलं की अजून शी-सू नसलेले काही साधे उपाय नाहीत का? एकानी औषध सुचवलं. त्याच्या कांड्या मिळतात. त्या त्यांच्या बिळाच्या तोंडाशी खुपसून ठेवायच्या मग ते मरतात. दुसर्‍यांनी सांगितलं की गोफरांचा बंदोबस्त करणार्‍या कंपनीला बोलवा त्या शिवाय गोफर जात नाहीत. गोफरांची अख्खी नगरी असते जमिनीखाली. मला रात्री स्वप्नातही ते न बघितलेले गोफर यायला लागले! दुसर्‍या एक काकू म्हणाल्या, चांगलं आहे की ते मोल्स आले ते, त्यावरून हे सिद्ध होतं की तुमची जमीन छान सुपिक आहे. म्हंटलं उपयोग काय, ती जाणार त्या मोल आणि गोफरांच्या बोडख्यावर (शब्दश:). आता होमडेपोमधून त्या कांड्या आणणं आलं. सकाळी सकाळी हरिण आणि त्याचं नुकतच जन्मलेलं गोजिरवाणं पाडस दिसलं. अगदी रामायणात वर्णन असतं सोनेरी ठिपके असलेलं आहे. हे असं हरिण पाहून सीतेने "मज आणून द्या हो हरिण आयोध्यानाथा!" असं आर्जव केलं नसतं तरच नवल. आई-बापाच्या मागे मागे टणाटणा उड्या मारत फिरत असतं. आमच्या ज्योईला मात्र ते अजिबात आवडत नाही. आवाज बसेपर्यंत भुंकतो त्याच्यावर. स्ट्रॉबेर्‍या, सफरचंद ह्यांना छान फळं धरली आहेत. काकडीचा वेल, टोमॅटो, मिरच्यांची झाडं छान वाढत आहेत. होस्टाची पानंही छान मोठी झालीयेत , कधीही तुरा येईल आता. डॉगवूडची पानंही मस्त रंगली! पण माझी आवडती पिवळ्या रंगाची मम्स नाहीच उगवली. कुंडीतली दोन्ही छान फुटली आहेत.

उन्हाळा
औषधाच्या कांड्यांचा उपयोग झालेला दिसतो आहे. मोल, गोफरांची बिळं आणि त्यांनी उकरलेली माती इतक्यात दिसली नाही! गोजिरवाणं पाडस आता थोडं मोठं झालय. पण वाढत्या वयाबरोबर भयंकर खादाड झालय! सारखी येऊन बागेतली पानं फस्त करतं. होस्टाचं एकही पान शिल्लक ठेवलं नाही. इतकं सफाचट केलं की तिथे पूर्वी पानं होती हे ही कळू नये. चेरी, डॉगवूड, चौथर्‍यावरची शोभेची झाडं सगळ्यांची पानं खाऊन खराटे केले. भर उन्हाळ्यात फॉल आल्यासारखं वाटायला लागलं. गुलाबाची पानं आणि सूर्यफुलं पण खाल्ली. गुलाबाची पानं, फुलं खाताना त्याच्या तोंडाला काटे टोचून चांगली अद्दल घडायला हवी होती असा दुष्ट विचारही माझ्या मनात येऊन गेला. पुढे पाडसाचे उद्योग तर मागे खारी आणि गोगलगाई टपलेल्या. डांबरट खारींनी एकही स्ट्रॉबेरी आमच्या तोंडी लागू दिली नाही. अगदी आमच्या समोर स्ट्रॉबेर्‍या पळवून कुंपणावर बसून वाकुल्या दाखवत त्या खातात. गोगलगायी दिसतात गरीब बिचार्‍या पण एकदा टोमॅटो त्यांच्या तावडीत सापडला की काही खैर नाही. कुरतडून कुरतडून भोकं पाडतात त्याला. सफरचंद नक्की कोणी पळवली ते कळायलाही मार्ग नाही. पक्ष्यांनी खाल्ली तर तुकडे खाली पडलेले असतात पण इथे अख्खीच्या अख्खी सफरचंदं गायब झाली आणि आम्हांला त्याचा अंशही दिसला नाही! एकतर ते खादाड पाडस परसदारीही येऊन गेलं असावं किंवा मग एक-दोनदा अचानक उगवलेल्या ढोल्या रॅकुन (raccoon) परिवाराची वक्रदृष्टी आमच्या सफरचंदांवर पडली असावी! इथे पडलेल्या कडक उन्हाळ्याने हिरवळंही होरपळली आहे आणि काही काही ठिकाणी वाळलेल्या गवताचे पट्टेही दिसायला लागले आहेत.

शरद ऋतू
आता पुन्हा फॉल आला, एक चक्र पूर्ण झालं. मागे लावलेले कंद आता थंडीत बेगमी करून पुन्हा फुलायला तयार होतील. बाकीची झाडं आधी फॉलचे रंग दाखवून मग विरक्ती आल्यासारखी फुलोरा, पानं झटकून टाकतील. उन्हाळ्यात आम्हांला त्रास दिलेले प्राणी आता थंडीची चाहूल लागून आपापल्या बिळा-गुहांमध्ये गुडूप होतील. हिरवळीची वाढ होणं बंद होईल. सप्टेंबर अखेरी एकदा वर्षातलं शेवटचं गवत कापून झालं की ते ही गप पडून राहील. वर्षभरात बागेने भरपूर गंमती जमती दाखवल्या. हल्लीच्या तीस सेकंदाचा 'रिल'च्या जमान्यात बागकाम खूप संयम शिकवतं. सुरूवातीला दर दोन तासांनी बागेत काही फुललं आहे का? हे जाऊन बघणार्‍या मला, सूर्यफुलाचं रोप थेट मोठं झाल्यावरच दिसलं!
स्वत: लावलेली, पाणी, खत घालून वाढवलेली झाडं वाढताना फुलताना फळताना बघण्यासारखं समधान नाही. मग भले फळं प्राणी पक्ष्यांनी खाऊन का टाकेना! शिवाय स्वत:चं अन्न स्वतः शोधणारी आणि तयार करणारी, स्वत:च्या प्रजननासाठी दुसर्‍यांना म्हणजे प्राणी, किटक, पक्षी एवढंच काय पण माणसांनाही कामाला लावणारी, आहेत त्या परिस्थितीत मार्ग काढणारी झाडं हीच सजीव सृष्टीतला सगळ्यात बलवान जीव आहे हा माझा जरा विचित्र विचार आता अधिकाधिक दृढ होत चालला आहे. एका नर्सरीमधली कर्मचारी आम्हांला म्हणाली होती "Don’t worry, they know what to do. They will take care of themselves” आणि हे आता अगदी १००% पटलं आहे. ही सगळी झाडं पुढच्यावर्षी आणखी मोठी होतील. नवीन झाडंही लावली जातील. यंदा आलेल्या झेंडू, झिनियाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवून पुढच्यावर्षीचं बियाण तयार करायचं आहे. पुढच्या वर्षी सुवासिक फुलांची झाडं लावायची आहेत. थंडी संपता संपता भाज्यांच्या बीया कुंड्यांमध्ये पेरून त्यांची रोपं तयार करून ठेवायची आहेत. येणारी फळं खादाड प्राण्यांपासून वाचवायची आहेत! पुढच्या वर्षी बाग आपल्या पोतडीतून काय काढते आणि कुठले नवे अनुभव, धडे देते हे बघायची आता उत्सुकता आहे.

---
मागे मायबोलीच्या दिवाळी अंकात राजसगौरी नावाच्या लेखिकेने बागेची रोजनिशी लिहिली होती. त्या धरतीवर ही बागेची ऋतूमानानुसार डायरी. 

निसर्ग जेव्हा गंमत दाखवतो...

 २०२४चं वर्ष आमच्यासाठी भटकंतीच्या दृष्टीने फार चांगलं गेलं. नवीन देश पाहिले, नवीन शहरं पाहिली, काही आधी पाहिलेली शहरं, ठिकाणं, पुन्हा पाहिली, नवे अनुभव घेतले. घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याबरोबर भटकंती केली. आणि ह्या भटकंतीदरम्यान निसर्गाने काहीश्या अनपेक्षितपणे भरपूर गमती-जमती दाखवल्या.

पुण्यात पूर्वी म्हणजे उंच इमारतींचं जंगल व्हायच्या आधी पर्वती कुठूनही दिसायची तसा सिअ‍ॅटल शहरातून कुठूनही माउंट रेनियर दिसतो. जवळ जवळा बारही महिने बर्फाच्छादित असलेलं ते काहीस गंभीर, पोक्त, गुढ हिमशिखर प्रत्येक वेळी नवीन उर्जा देतं हे नक्की. सिअ‍ॅटलहून माउंट रेनियर नॅशनल पार्क जेमतेम तास-सव्वातासाच्या अंतरावर असल्याने आत्तापर्यंत तिथे बर्‍याच फेर्‍या झाल्या आहेत. शिवाय कोणी फिरायला इथे आलं की त्यांच्याही यादीत ते असतं. ह्या उन्हाळ्यात बे-एरीयातले काही मित्र मैत्रिणी इथे आले होते. आमची ठरलेली भेटाभेटी झाल्यानंतर एक दिवस त्यांचा "रेनियरला चलताय का ?" असं विचारायला फोन आला. त्यांना म्हंटलं तुम्ही सुट्टीवर आला आहात पण आम्हांला सुट्टी नाहीये. तर ते म्हणे हरकत नाही. कामं संपवून संध्याकाळी उशिरा या, आम्ही रात्रभर जागणार आहोत. सुर्योदय पाहून उद्या सकाळी परतूया. रेनियरच्या इतक्या फेर्‍यांमध्ये आधी कधी सुर्योदय पहायला जाणं जमलं नव्हतं. त्यामुळे हो म्हंटलं. काम, जेवणं आटोपून घरून निघायला उशीरच झाला. रेनियरच्या पायथ्याशी पोहोचून सन राईज पॉईंटच्या रस्त्याला लागेपर्यंततर अगदी मिट्ट काळोख झाला. योगायोगानं त्याच एक दोन दिवसात अमावस्या होती, त्यामुळे चंद्रप्रकाशही फार नव्हता. हे सगळं पथ्यावरच पडलं. का ते नंतर समजलं. पार्किंगला पोचलो आणि मित्र मंडळी भेटले. पार्किंग पासून एक छोटीसी पाऊलवाट होती. साधारण १० मिनिटं चढून गेल्यावर मोकळं पठार होतं. समोर रेनियरचं शिखर होतं आणि वर खुलं आकाश. पठारावर जाऊन बघतो तर आकाशात चांदण्यांचा सडा! त्या परिसरापासून शहरं लांब असल्याने प्रकाशाचा स्त्रोत नाही आणि शिवाय चंद्रही नाही. मानस सरोवराच्या काठावरून पाहिल्या होत्या, त्या नंतर इतक्या चांदण्या पहिल्यांदाच पाहिल्या. जराशी सपाट जागा बघून आम्ही पथार्‍या पसरल्या. पडल्या पडल्या हात जरा लांब करून मुठभर चांदण्या उचलून घ्याव्या असं वाटून गेलं. सप्तर्षी, शुक्राची चांदणी, ध्रुव तारा वगैरे तांत्रिक बाबींमध्ये न अडकता ती लुकलुक बघत किती वेळ गेला कळलच नाही. वेळ जात होता तशी त्या ग्रह तार्‍यांची स्थितीही बदलत होती. साधारण मध्यरात्री नंतर मध्यभागी तारकापुंज एकत्र व्हायला लागले आणि दुधाळ पट्टा दिसायला लागला. ट्युब पेटली.. मिल्की वे.. हीच तर आपली आकाशगंगा! भूगोलाचा पुस्तकात शिकलो होतो, कधीतरी शोधायचा प्रयत्न केला होता, इंटरनेटवर फोटोही बघितले होते पण ही अशी अचानक आणि इतकं स्पष्ट दर्शन देईल असं वाटलं नव्हतं. इतक्या प्रचंड मोठ्या आणि अगणित तारे असलेल्या आकाशगंगेतल्या, एका लहानश्या तार्‍याच्या, लहानश्या उपग्रहावरचे आपण! निसर्गाच्या त्या भव्यतेपुढे आपण किती नगण्य आहोत ह्याची कल्पनाही करता आली नाही. बर्फाच्छिदीत रेनियरच्या मस्तकी विराजमान झालेलं ते आकाशगंगेचं दृष्य फार सुंदर दिसलं. फोटो काढायच्या फार फंदात न पडता फक्त डोळे भरून बघून घेतलं. दोन अडीच नंतर चांदण्या कमी झाल्यासारखं वाटलं आणि थंडीही फार वाजायला लागली म्हणून जरावेळ गाडीत येऊन उबेत बसलो. उन्हाळ्याचे मोठे दिवस आणि त्यात आम्ही एव्हडे उंचावर, त्यामुळे चार सव्वाचारच्या सुमारास फटफटायला लागलं. आम्ही पुन्हा त्या आधीच्या पठारावर गेलो. झुंजूमुंजू प्रकाशात रेनियरचं शिखर चढू बघणार्‍या गिर्यारोहकांच्या बॅटर्‍यांच्या प्रकाशाची अंधूक लुकलूक दुरवर दिसत होती. शिखराच्या विरूद्ध बाजूने सुर्योदय होतो. तिथेही डोंगररांग असल्याने हळूहळू उजाडत होतं. एका क्षणी सुर्यकिरणं एका विशिष्ठ कोनात त्या बर्फाच्छादित शिखरावर पडली आणि ते शिखर सोनेरी रंगात झळाळू लागलं! पूर्ण उजाडलेलं नसल्याने त्या मंद पार्श्वभुमीवर तो सोनेरी गुलबट रंग फारच उठून दिसत होता. सेकंदागणीक झळाळी वाढत गेली आणि एका क्षणी त्या स्वर्णिम आविष्काराने सर्वोच्च बिंदू गाठला. हा असाच सोनेरी रंगाचा खेळ मी मागे हिमालयातल्या कौसानीला आणि कॅनडातल्या बॅम्फ नॅशनल पार्कमधल्या लेक मोरेनला बघितला होता. पण इथे शिखर फारच जवळ होतं. डोळे भरून ते पहात असताना किरणांचा कोन बदलला आणि धगधगती आग शांत व्हावी तसं ते सोनेरी शिखर हळूहळू राखाडी होत नेहमीसारखा पांढुरकं झालं. काही क्षणांचा खेळ पण रंगांच्या इतक्या छटा की हल्लीचं आधुनिक 'डिजीटल कलर पॅलेट' कमी पडावं!

आकाशगंगा-१ (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
Milky-way 1_1.jpeg

आकाशगंगा-२ (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
Milky-way 2.jpeg

सोनेरी रेनियर
PXL_20240708_123006138~2.jpg

ह्याच्या जरा दोन महिने आधीची गोष्ट. २०१७ नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच खग्रास सूर्यग्रहण होणार होतं. २०१७ साली आम्ही अटलांटाला होतो आणि तिथून खग्रास ग्रहणाचा पट्टा अगदी जवळ म्हणजे २५-३० मैलांवर होता. पण तेव्हा काही कारणांनी तिथे जायला जमलं नाही. ह्यावेळी एका खगोलप्रेमी मित्राने येणार का विचारलं म्हणून टेक्सासला जायची तयारी केली. डॅलस, ऑस्टीन परिसरातून हवामानानुसार कुठूनतरी बघू ह्या हिशोबाने तीन-चार ठिकाणी हॉटेलं घेतली होती. शेवटच्या दिवशी पर्यंत हवामानाच अंदाज घेऊन अखेरीस डॅलसच्या जवळ एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. माझ्या मित्राने टेलिस्कोप आणि बाकी उपकरणं कुठे लावता येतील ह्याची रात्रीच चाचपणी करून घेतली. सगळी तयारी झाली, मात्र सकाळी उठून बघतो तर आकाश ढगाळ आणि पावसाची शक्यता! एव्हड्या सगळ्या तयारीवर पाणी फिरणार का? आता काय करायचं ह्याचा विचार करत असताना त्या परिसरात रहाणार्‍या माझ्या चुलत भावाचा फोन आला. म्हणाला तुम्ही आहात त्यापेक्षा त्याच्या घराच्या इथे पावसाची शक्यता कमी आहे आणि ढग उघडू शकतात तर तुही इकडेच या. मग सगळी उपकरणं आणि माणसं ह्यांच्या लवाजमा घेऊन आम्ही तिकडे जायला निघालो. रस्त्यात पावसाची जोरात सर आली. भावाच्या घरी पोचलो. आकाशात ढग होतेच पण काहीतरी चमत्कार होईल ह्या अपेक्षेने टेलिस्कोप आणि इतर सामानाची पुन्हा मांडामांड केली. ग्रहण घटीका जवळ येत चालली होती, टिव्हीवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या स्थितीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती पण सूर्यासमोर ढगांचा एक मोठा पुंजका होता. खग्रास स्थितीला साधारण २० मिनीटं राहिलेली असताता खरच चमत्कार झाला आणि ढगांचा पडदा दूर झाला आणि झाकोळत चाललेला सूर्य स्पष्ट दिसू लागला. वातावरणातले बदल म्हणजे प्रकाश, तापमान, वारा स्पष्ट जावणू लागले. हळूहळू करत संपूर्ण सूर्य झाकोळला गेला. कंकणाकृती दिसायला लागली. अखेर तो क्षण आला.. सूर्य दुसर्‍या बाजूने खुला व्हायला लागला आणि ती अफाट सुंदर डायमंड रिंग चमकायला लागली. अंगठीला लावलेल्या हिर्‍याची प्रभा फाकावी तसा तो सूर्याच्या कंकणावरचा हिरा चकाकू लागला. इतकं अभूतपूर्व सुंदर दृष्य होतं ते की आधी आम्ही देह भान हरपून बघत बसलो आणि नंतर सगळ्यांनी जोरदार चित्कार केले. त्याही वेळी मोबाईलवर फोटो न काढता निव्वळ अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. आता 'हिर्‍याच्या खड्याची अंगठी' असा दागिना तयार करायची कल्पना माणसाला ह्या ग्रहणाच्या दृष्यावरून सुचली की दागिन्यावरून त्या ग्रहणस्थितीला हे नाव दिलं गेलं कोणास ठाऊक पण ती नैसर्गिक हिर्‍याची अंगठी फार सुंदर दिसली एव्हडं मात्र नक्की.

डायमंड रिंग (फोटो श्रेय: शैलेश भाटे)
Grahan.jpg

आमच्या घराच्या जवळ एक तळं आहे. तळ्याच्या एका बाजूला व्यवस्थित बांधलेला ट्रेल आहे तर दुसर्‍या बाजूला फुटपाथ असलेला रस्ता आहे. तळं खोलगट भागात असून दोन्ही बाजूंना टेकड्या आहेत. थोड्या थोड्या अंतरावर ह्या टेकड्यांवरून येणारं पावसाचं पाणी (सांडपाणी नाही) तळ्यात सोडण्यासाठी ओहळ (स्ट्रीम्स) तयार केलेले आहेत. शेजारून जाणारा रस्ता तसेच ट्रेल ह्यांच्या खालून हे ओहळ जातात. आम्ही बर्‍याचदा ह्या ट्रेलवर फिरायला, सायकल चालवायला जातो. सरत्या उन्हाळ्यात आमच्या लक्षात आलं की ह्यातल्या एका ओहळाच्या पुलावरून चालताना आमचा ज्योई खूप वेळ रेंगाळत रहातो आणि कधीकधी थोडा भुंकतोही. काही दिवसांनी पाण्याच्या प्रवाहापाशी थोडासा वेगळा वासही यायला लागला. ताज्या वाहत्या पाण्याचा खरतर कधी वास येत नाही, त्यामुळे आम्हांला जरा आश्चर्य वाटलं. नंतर एकदा थांबून आम्ही नीट बघितलं तर निसर्गातली अजून एक गंमत तिथे घडत होती ते म्हणजे 'सालमन होमकमिंग'. सालमन हे समुद्री मासे. खुल्या समुद्रात ते त्यांचं बालपण आणि वाढीचं वय घालवतात. तिथे मिळणारं खाणं खाऊन चांगले धष्टपुष्ट होतात. पुढे प्रजननाच्या वयात ते समुद्राला मिळणार्‍या गोड्या पाण्याच्या प्रवाहांमधून म्हणजे नद्या, झरे ह्यांमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध उलटे पोहत जातात आणि तिथे सुरक्षित जागा शोधून अंडी घालतात. प्रवाहाच्या उलट पोहून त्यांनी आधी कमावलेली शक्ती जवळ जवळ संपलेली असते आणि त्यामुळे अंडी घालून झाल्यावर त्यांचं आयुष्यमान संपतं. ह्या अंड्यांतून पुढे पिल्लं जन्माला येऊन ती आपले आई-वडील ज्या मार्गाने आले, त्या मार्गाने पुन्हा खुल्या पाण्यात जातात. असं म्हणतात की ह्या प्रवासादरम्यान त्यांना पाण्याची चव, वास ह्यावरून तो मार्ग बरोबर लक्षात रहातो आणि वयात आल्यावर ते पुन्हा तिथेच परतात. आता आमचं तळं काही खार्‍या पाण्याचं नाही, पण त्यातही हे सालमन मासे आहेत. खारं पाणी असो किंवा गोडं निसर्ग नियम न पाळायला ती काही माणसं नाहीत. त्यामुळे त्यांचा निसर्गक्रम ते इथेही चालवतात. त्या ओहळामध्ये ज्योईला, आणि त्याच्यामुळे आम्हांलाह, हे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला पोहणारे सालमन मासे दिसले! जे पोहतात किंवा कयाकिंग करतात त्यांना चांगलच माहीत असेल की असं प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणं अजिबात सोपं नाही. त्यात इथे चांगलाच चढ आहे. आम्ही पाहिलं तेव्हा पुलाच्या एका बाजून तीन मासे पाण्याशी झगडत होते. दोन पुढे होते आणि एक थोडासा मागे होता. जरावेळ थांबून बघितलं तर अक्षरशः एक पाऊल पुढे आणि दोन पावलं मागे अशी त्यांची अवस्था होती. आम्ही आमची फेरी संपवून परत आलो तर तो मागे असलेल्या मासा इतर दोघांपर्यंत आलेला होता. नंतर आम्हांला रोज त्या पुलावरून डोकावून बघायची सवयच लागली. दोन एक दिवसांनी माश्यांच त्रिकूट पुलाच्या दुसर्‍या बाजूला दिसलं पण ते एकमेकांपासून पुढे मागे गेलेले होते शिवाय जरा खालच्या बाजूला अजूनही काही मासे होते. आता ते त्रिकूट आम्ही आधी पाहिलेलच होतं की वेगळं ते माहित नाही. पण एकंदरीत प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा सगळ्यांचा झगडा चालू होता हे मात्र खरं. आमच्या परिसरात बॉबकॅट, कायोटी, क्वचित कधीतरी अस्वलं वगैरेही दिसतं. पाणी पिण्यासाठी आलेल्या ह्या प्राण्यांची ते मासे मेजवानी ठरले की खरोखरीच योग्य स्थळी पोहोचून अंडी घालू शकले हे माहीत नाही. पण ह्यावर्षी आमच्या तळ्यात गेल्या काही वर्षांतली विक्रमी सालमन पैदास झाली अशी बातमी काउंटीच्या समाजमाध्यमांमध्ये वाचली, त्यामुळे त्या माश्यांचं इप्सित साध्य झालं असावं!

आता थोडी म्हणजे एक तीन चार महिने पुढची आमच्या न्युझिलंड ट्रीप दरम्यानची गोष्ट. तिथे रहाणार्‍या माझ्या मित्राने अगदी आग्रहाने सांगितलं की टिमारू-ओमारू ह्या गावांना नक्की जा! आधी आम्ही जे ठरवलं होतं त्यात ही नावं फारशी आली नव्हती. साऊथ आयलंडच्या पूर्व किनार्‍यावर म्हणजे पॅसिफीक महासागरावर पण जरा दक्षिणेकडे वळलेले हे समुद्रकिनारे आहेत. आम्ही ठरवलेल्या मार्गाच्या फार आड नव्हतं म्हणून जायचं ठरवलं. ख्राईस्टचर्चहून दक्षिणेकडे जाताना आधी टिमारू लागतं. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. तिथून आमचा मुक्काम असलेलं ओमारू असून दोन तासांवर होतं. तिथे आसपास बघण्याच्या बाकी गोष्टी होत्याच पण नंतर जाताना समजलं की तिथे निळ्या रंगाचे पेंग्विन येतात आणि ते सूर्यास्तानंतर ते मध्यरात्रीपर्यंत असतात! तिकडे उन्हाळा असल्याने सूर्यास्त व्हायला अजून दोनेक तास होते. मग ठरवलं की टिमारूलाच रात्रीची जेवणं उकरून घेऊ आणि किनार्‍यावर पेग्विनांची वाट बघत बसू. निळे पेंग्विन कसे दिसत असतील, किती मोठे असतील, ते नक्की कुठून येतात, का येतात हे काही माहिती नव्हतं आणि गुगल करून बघावसं वाटत नव्हतं. आम्ही किनार्‍यावरचं गाडी लावली आणि जवळ बांधलेल्या जेट्टी स्वरून रस्त्यावर चांगली जागा बघून थांबलो. हळूहळू लोकं जमायला लागली. एकंदरीत पक्षांना त्रास होऊ नये तसेच ते घाबरू नयेत म्हणून सगळे शांतता पाळत होते. समुद्राच्या लाटांची गाज होती. शिवाय एखादा बगळा, तिथे वावरणार्‍या डॉल्फीनने शेपूट दाखवत डुबकी मारली की येणार्‍या पाण्याचा आवाज, कुठल्यातरी पक्ष्याचं ओरडणं असं काही बाही ऐकू येत होतं. अचानक एक वेगळाच जरा केकाटण्याकडे झुकणारा आवाज आला आणि पलिकडे थांबलेल्या घोळक्यात कुजबूजीपेक्षा मोठा आणि चित्कारांपेक्षा लहान अश्या आवाजात बडबड सुरू झाली. त्या दिवशीचं पहिलं पेंग्विन दर्शन झालं होतं. आम्हीही पुढे जाऊन बघितलं. जेट्टीखालच्या दगडांमधून एक लहानसं पेग्विंन उड्या मारत होतं. थोड्या वेळाने अजून दोन तीन दिसली. ज्योई आणि त्याचे डॉग फ्रेंड्स जसे खेळतान एकमेकांच्या अंगावर उड्या मारतात, चावे (प्ले बाईट्स) घेतात अगदी तसेच ते तिघे एकत्र खेळत होते. नंतर एक थोडं मोठं आणि जरासं पोक्त पेग्विंन तिकडे आलं आणि त्यातल्या एकाला चोचीतून काहीतरी भरवलं. ते बघून बाकीचेही येऊन खाऊ मागायला लागले आणि मग तिघेही दगडांखाली गेले. आपण फोटोंमध्ये किंवा व्हिडीयोमध्ये जे पाहिलेले असतात, त्यापेक्षा हे पेग्विंन खूपच लहान होते आणि त्यांची पाठ अगदी काळी नसून अगदी गडद निळ्या रंगाची होती! आम्हांला तेव्हड्यात तिथे नॅशनल पार्कची गाईड दिसली. ती उन्हाळ्याचे महिने रोज रात्री तिथे येऊन ह्या पेग्विंनांचा अभ्यास करते आणि नोंदी ठेवते. तिच्या म्हणण्याप्रमाणे ह्या उन्हाळ्यात साधारण २५- ३० पेग्विंन रोज येत आहेत. आत्ता जे तीन मस्ती करणारे पेग्विंन होते, ती भावंड आहेत आणि ते मोठं पेग्विंन पालक आहे. आम्ही बाकीही माहिती विचारली. तर हे पक्षी उन्हाळ्यात दक्षिणेकडील थंड समुद्रातून सुमारे चाळीस मैल पोहून सूर्यास्तानंतर ह्या किनार्‍यावर येतात. साधारण मध्यरात्रीपर्यंत थांबतात आणि परत जातात. त्यांना किनार्‍याच्या परिसरात मुबलक अन्न मिळते आणि त्यासाठी ते येत असावेत असा अंदाज आहे. त्यांच्या बरोबर त्याच वर्षी जन्मलेली पिल्लही असतात. फक्त खाण्यासाठीच येतात की बाकी काही कारणं जसं की सुरक्षितता, प्रजनन की अजून काही ? निवडक किनारेच का? ह्याबद्दल संशोधन गेली काही वर्षे सुरू आहे. आम्ही नंतर बराच वेळ थांबलो होतो. अजून पेग्विंन आणि त्यांचे खेळ, ओरडणं बघितलं. 'पेग्विंन इफेक्ट' असं म्हणतात, त्याचं प्रात्यक्षिकही बघितलं. ते मध्यरात्रीपर्यंत थांबणार होते पण आम्हांला पुढे प्रवास होतं. निळ्या पेग्विंनांच्या ह्या अनपेक्षित दर्शानाचा आणि रोज इतकं पोहायच्या ह्या सुरस आणि काहीश्या चमत्कारीक सवयीचा विचार करत आम्ही पुढे निघालो.

BluePenguine_0.jpg

आम्ही न्युझिलंडला जायच्या थोडसं आधी म्हणजे इथे सिअ‍ॅटलला हिवाळा सुरू झाला तेव्हाची गोष्ट. नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात आमच्या परिसरात बॉम्ब सायक्लॉन येणार अश्या बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्या. ह्या दरम्यान हवामान खात्याने ताशी ४० ते ६० मैल प्रतितास इतक्या वेगाने वारे वहातील अशी शक्यता वर्तवली. सिअ‍ॅटल शहराच्या परिसरात सुचिपर्णी वृक्ष म्हणजे पाईन, सेडार वगैरेंची जुनी आणि उंच उंच झाडं आहेत. इतक्या जोरात वारा येणार म्हणजे सगळ्यात मोठा धोका म्हणजे झाडं किंवा फांद्या पडण्याचा. त्यामुळे रस्ते बंद होणं, मोडतोड होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वीजवाहिन्या जमिनीखालून नसल्याने त्यांवर झाड पडून वीज जाणं हे सगळे धोकेही आलेच. इथे गेल्या काही वर्षात असे काही अंदाज असले की लोकं जरा जास्तच आचरटपणा करून प्रचंड खरेदी करतात. ह्याही वेळी तश्याच बातम्या यायला लागल्या. आम्ही थोडीफार तयारी केली आणि बाकी होईल तसं बघू असं ठरवलं. ज्या दिवशी वार्‍याचा अंदाज होता, त्या दिवशी दुपार पर्यंत सगळं शांत होतं. अगदी वादळापूर्वीची शांतता म्हणतात ती हीच. दुपार नंतर मात्र हळूहळू पाऊस, वारा सुरू झाला. नंतर पाऊस थांबला पण वारा मात्र खरोखर खूप सोसाट्याचा होता. ताशी ५० ते ६० मैल प्रतितास वेगाने वारा वहात होता. शिवाय ह्या परिसरात सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून उत्तरेला वारा असतो आणि त्यामुळे झाडांना त्या वार्‍याला तोंड द्यायची सवय असते. पाण्यातली लव्हाळी कशी प्रवाहाच्या दिशेने न मोडता वाकू शकतात तसच. पण ह्यावेळी मात्र हा वारा वायव्येहून आग्नेयेकडे होता, त्यामुळे झाडांची पडझड लगेचच व्हायला लागली आणि थोड्याच वेळात वीज गेली. ढग खूप होते, त्यामुळे चंद्रप्रकाशही नव्हता. त्या किर्र काळोखात वार्‍याचा जोराचा आवाज आणि गदागदा हलणार्‍या मोठ मोठ्या झाडांच्या आकृत्या हे प्रचंड भितीदायक दृकश्राव्य वातावरण होतं. रात्री बराचवेळा वार्‍या पावसाचं थैमान सुरू होतं. सुदैवाने आमच्या अंगणात फार पडझड झाली नाही. पण शेजारी झाड पडून आमच्या कॉलनीतून बाहेर जायचा रस्ता बंद झाला. शहरातल्या सुमारे सहा लाख घरांमध्ये पुढे जवळजवळ पाच दिवस वीज नव्हती.

https://youtube.com/shorts/xxnrs16a2l4

खग्रास सूर्यग्रहण, माऊंट रेनियर वरून दिसणारा सूर्योदय आणि आकाशगंगा, प्रवाहाच्या विरुद्ध जाणरे सालमन मासे, अन्नासाठी
रोज मैलोन मैल पोहणारे निळे पेंग्विन, ह्यांशिवाय अगदी अंगणातून दिसलेले नॉर्दन लाईट्स, फक्त न्युझिलंडमध्येच दिसणारे गुहांमधल्या भिंती उजळवून टाकणारे ग्लो-वर्मस ह्या सगळ्यांपुढे वादळा वारा ही गंमत नव्हती. पण असं म्हणतात की समतोल पाळणे हा निसर्ग नियमच आहे. त्याला अनुसरून निसर्गाने आधीच्या गंमतींबरोबरच बॉम्ब सायक्लॉनचा बडगा दाखवला आणि ह्या निसर्गायणाला हलक्यात किंवा फक्त मजेतच न घेण्याची एक प्रकारची समजच दिली!