गेल्या काही दिवसांमध्ये वाचनात आणि लोकांशी बोलण्यात लहानपणी शाळेत केलेल्या गोष्टींचे बरेच किस्से आले. परवा शिल्पाच्या भावाशी बोलताना ज्ञानप्रबोधिनीतल्या बर्याच गोष्टींचा उल्लेख आला आणि त्यामुळे जिज्ञासाने मायबोलीवर लिहिलेले ज्ञानप्रबोधिनीतले अनुभव पुन्हा एकदा चाळले. नंतर डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रात ते बनारस हिंदू विद्यापिठाच्या आवारातल्या शाळेत असतानाचे अनेक किस्से वाचले. शिवाय शिल्पाही अनेकदा तिने शाळेत असताना केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल सांगत असते. डॉ. नारळीकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य होतं "शाळेतल्या आठवणी गोड असतात तश्या आंबटही.. पुन्हा पुन्हा आठवाव्या अश्याही आणि शक्य तितक्या लवकर विसरून जाव्या अश्याही." माझ्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या आठवणी तराजूत घालून तोलल्यास आंबट आठवणी नक्कीच जास्त भरतील! आंबट आठवणी जास्त असण्याची कारणं नंतर कधीतरी.. पण गोड आठवणी फार कमी असण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेतली संस्कृती. आमच्या शाळेत अभ्यास आणि मार्क ह्यांना प्रचंड जास्त महत्त्त्व होतं. पाया पक्का करून घेण्यात त्याचा फायदा झाला हे काही प्रमाणात बरोबर असलं तरी कधी कधी ते जास्त व्हायचं आणि त्यामुळे इतर उपक्रम जवळ जवळ नसल्यासारखेच होते. आमच्या शाळेला वार्षिक सहल तसेच अल्पोपहार (किंवा कुठल्याही प्रकारची annual refreshment) नसायची. शाळेचं गॅदरींग इतकं लो-बजेट पध्दतीने व्हायचं की बस. सर्वसाधारणपणे गॅदरींग संध्याकाळी असतं कारण छान रोषणाई, स्टेजवर प्रकाशयोजना वगैरे करता येते. आमचं गॅदरींग सकाळी सात वाजता असायचं! सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टेज, पडणारा पडदा वगैरे सगळं असायचं पण नंतर नंतर सिमेंटच्या बांधलेल्या स्टेजला एक बॅकड्रॉप लाऊन नाटकं वगैरे सादर केली जात (वर छप्पर नाहीच!). नंतर असं ऐकलं की ऑडीयो सिस्टीम वगैरे बंद करून फक्त तबला पेटीवर सादर करता येण्याजोगी गाणीच नाच वगैरेंसाठी बसवायची असा नियम निघाला!! वार्षिक खेळांचं आयोजन आणि माझा स्वत:चा त्यातला सहभाग ह्या दोन्ही गोष्टींचा एकंदरीत आनंदच होता. मी ना त्यावेळी उंच होतो, ना माझ्यात ताकद होती ना दम. त्यामुळे फक्त एकमेव सांघिक खेळ असलेल्या कबड्डीमध्ये मी कधीच संघात येऊ शकलो नाही. वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, गोळाफेक वगैरे स्पर्धा असायच्या. त्यातला गोळा तर मला उचलताच यायचा नाही त्यामुळे तो फेकणं तर दुरच. आता मी जरी ३०० किलोमिटर सायकलींग, २०० किलोमिटर ट्रेकिंग, १० किलोमिटर/ हाफ मॅराथॉन पळणे असले प्रकार करत असलो तरी तेव्हा मला २०० मिटरही धडपणे धावता यायचं नाही. त्यामुळे खेळांबद्दलच्या आठवणी शुन्य. ("एकंदरीत ह्या परिस्थितीला आमच्या त्यावेळच्या शिक्षकवृंदाचं आणि संचालक मंडळाचं वैचारीक आणि आर्थिक "डावेपण" कारणीभुत असावं" असं एक 'गिरिश कुबेरीय' वाक्य इथे टाकून द्यायचा मोह होतो आहे.)
ह्या अश्या सगळ्या परिस्थितीतही मला अगदी आवडलेला, जवळचा वाटलेला, मी प्रत्येक वर्षी उत्साहाने सहभाग घेतलेला आणि त्यामुळेच अजूनही बारिक सारिक तपशिलांसह लख्ख आठवत असलेला एक उपक्रम होता आणि तो म्हणजे 'हस्तलिखित'. पाचवी पासूनच्या प्रत्येक तुकडीने एक विषय घेऊन त्यावर स्वनिर्मित किंवा संकलीत साहित्याचं हाताने लिहिलेलं अर्थात हस्तलिखित पुस्तक तयार करायचं. ह्यासाठी शाळा वेगळ्या प्रकारचे रंगीत कागद आणि मधे मधे चित्र काढायला, मुखपृष्ठ वगैरेसाठी चित्रकलेचे पांढरे कार्डपेपर देत असे. दिलेल्या मुदतीत सगळं बाड कार्यालयात नेऊन पोहोचवलं की महिन्या-पंधरा दिवसांनी बाईंड केलेलं हस्तलिखित पुस्तक तयार होऊन येत असे. शाळेच्या ग्रंथालयात सगळ्या वर्गांची हस्तलिखितं ठेवलेली असत आणि आम्हांलाही कधीतरी जुन्या वर्गांची हस्तलिखितं वाचायला मिळत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्या सत्रात वर्गशिक्षक आपापल्या वर्गात हस्तलिखिताच्या विषयांची चर्चा घडवून आणून त्यावर्षीचा विषय ठरवत असतं. विषयांना तसच साहित्यप्रकाराला कुठलही बंधन नसे. (त्यामुळे डायनोसोरबद्दलच्या आमच्या एका हस्तलिखितात कोणीतरी डायनोसोर ह्या विषयी स्वतः केलेली कविताही दिली होती!). विषय निवडण्यात तसेच साहित्य निवडण्यात शिक्षकांचा हस्तक्षेप नसे, त्यांचं काम फक्त गाडी योग्य मार्गावर आहे ना ह्याची काळजी घेणे इतकच. साहित्य जमवणे (त्याकाळी इंटरनेट नसल्याने हे एक मोठच काम होतं), चांगलं अक्षर असलेल्या मुलांनी ते रंगीत कागदांवर लिहीणे, चित्र काढणे, अनुक्रमणिका, संपादकीय वगैरे लिहिणे अशी कामं वर्गशिक्षकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं करत असू. एकंदरीतच वय लहान असल्यान शक्यतो कोणी एक विद्यार्थी संपादक म्हणून नेमला जात नसे. अनुक्रमणिका / श्रेयनामावलीत आपलं नाव यावं म्हणून बरेच जण एखादं अगदी छोटं काम अंगावर घेत. लहान इयत्तांमध्ये आपण ठरवलेला विषय बाकीच्या वर्गांना कळू नये ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाई. पण साधारण आठवी नंतर सगळं सगळ्यांना आधीपासून माहीत असे आणि त्याचं फार काही वाटतही नसे. एकदा रंगीत कागदावर लिहिलं की ती अंतिम प्रत. मुद्रितशोधन वगैरे करायची संधी नाहीच. त्यामुळे मग शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी आणि झाल्याच तर त्या सुधारण्यासाठी बरेच कुटाणे करावे लागत. हस्तलिखिताचे कागद कामासाठी घरी नेणं म्हणजे एक मोठी जबाबदारी वाटत असे आणि त्यामुळे ते खराब होऊ नयेत म्हणून वर्तमानपत्राच्या कागदात लपेटणं, मग त्याला चुरगळू नये म्हणून पुठ्ठा लावणं, त्यावर प्लॅस्टिकची पिशवी लावणं आणि मग दप्तरात ठेवणं एव्हडे सोपस्कार केले जात.
पाचवीच्या वर्गात हा सगळाच प्रकार नवीन होता त्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. विषय काय घ्यायचा, नक्की लिहायचं काय वगैरे काहीच कल्पना येत नव्हता. चांगली गोष्ट म्हणजे त्या वर्षीच्या वर्गशिक्षिका शोभा साळुंके बाईंनी त्यांची मतं आम्हांला न सांगता काय काय विषय घेता येतील ह्याची छान चर्चा वर्गात घडवून आणली. खूप चर्चेअंती (आणि त्यामुळे झालेल्या गोंधळाअंती) आम्ही "अंकुर" असा विषय निवडला. आमचं माध्यमिक शाळेतलं पहिलचं वर्ष त्यामुळे आमची अवस्था नुकत्याच रुजलेल्या बिजातून निघालेल्या अंकुरासारखी आहे अशी काहीतरी अचाट कल्पना होती. आता ह्या विषयाबद्दल नक्की काय लिहायचं हे न कळल्याने सगळेच विषय चालतील असं ठरलं. गोष्टी, कविता, विनोद, माहितपर लेख, चित्र, व्यंगचित्र, कोडी असं अक्षरशः (स्वत: लिहिलेलं किंवा इकडून तिकडून ढापलेलं) मिळेल ते सगळं त्या अंकात होतं! साहित्य इतकं जास्त झालं की सांळुके बाईंनी बाकीच्या शिक्षकांंकडून त्यांच्या वर्गांचे उरलेले कागदही मागून आणले होते. एका मुलीने (ती पाचवीनंतर शाळा सोडून गेली, मला तिचं नाव आठवत नाहीये) चित्र आणि त्यावर काहीबाही कलाकुसर करून छान मुखपृष्ठ बनवलं होतं. आमचा विषय ठरल्यादिवशीच फुटला आणि त्यामुळे आमची खूपच नाचक्की झाली. त्यामुळे तो कोणी फोडला असेल ह्याकरता बाईंपासून प्रत्येकावर संशय घेऊन झाला होता! मी, प्रथमेश, चित्रलेखा, मृणाल, आदित्य गोगटे, मिरा पटवर्धन वगैरे मंडळींनी त्या अंकासाठी बरच काम केलं होतं. (अजुनही असतील पण मला ही नावं नक्की आठवत आहेत.) मी स्वतः त्या अंकात बरच काही लिहिलंही होतं. उगीच ओढून ताणून जमवलेली एक गोष्टही लिहिली होती.
सहावीला 'फळ-एक वरदान' असा सोपा-सुटसुटीत विषय होता. अगदी नेहमीच्या आंबा, पेरू वगैरे फळांपासून ते भारतात न मिळणार्या परदेशी फळांपर्यंत बर्याच फळांच्या माहितीचं संकलन ह्या अंकात होतं. आमच्या बॅचचा नावाजलेला चित्रकार तुषार शिरसाटने क्रेयॉन्स (किंवा त्याकाळी मिळणारे तत्सम खडू वापरून) सगळ्या फळांची फार सुंदर चित्र काढली होती. तुषार पेशंट्चे दात काढण्याबरोबर अजून चित्रही काढतो का ते त्याला विचारायला हवं. खरतर आमचे चित्रांचे कागद संपले होते पण आमच्या वर्गशिक्षिका पाखरे बाई चित्रकलेच्या शिक्षिका असल्याने त्यांनी वशिला लाऊन जास्तीचे कागद मिळवून दिले होते. एका मुलीने तिच्या आईच्या मार्गदर्शनाखाली (त्या ही बहुतेक चित्रकला शिक्षक होत्या) फळांच्या परडीचं मस्त चित्र मुखपृष्ठासाठी काढून आणलं होतं.
आम्ही सातवीत होतो त्यावर्षी मराठी साहित्य संमेलन होतं. आमचे वर्गशिक्षक राठोड सर आम्हांला मराठी शिकवायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आम्ही साहित्य संमेलनासंबंधी काहीतरी विषय निवडावा. पण आम्ही मुलांनी फारसा उत्साहं न दाखवल्याने त्यांनी आग्रह सोडून दिला. अखेर आम्ही 'तिर्थक्षेत्रे' असा विषय निवडला होता. देशभरातल्या बर्याच तिर्थक्षेत्रांची आणि देवळांची माहिती आणि फोटो त्या अंकात होते. माझी आज्जी त्याआधी काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन आली होती आणि तिने पिट्सबर्गला तिरूपती बालाजीचं देऊळ पाहिलं होतं. मी त्या अंकात कुठून कुठून शोधून त्या देवळाची माहिती लिहिली होती. (बहुतेक) हर्षद कुलकर्णीने कापूस आणि रंग वापरून मुखपृष्ठाला थ्री-डी इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला होता.
ज्युरासिक पार्क सिनेमा आदल्याच वर्षी आलेला असल्याने आमच्या आठवीचा हस्तलिखिताचा विषय 'डायनोसोर्स पार्क' असा होता. डायनोसोर्स बद्दलची बरीच माहिती आणि चित्र ह्या अंकात होती. वर म्हटल्याप्रमाणे एक कविता आणि स्वप्नात डायनोसोर आला वगैरे काहीतरी कथानक असलेली एक कथाही ह्या अंकात होती. ह्या हस्तलिखिताचं काम करत असताना मुलं विरूद्ध मुली अशी बरीच भांडाभांडी झालेली. मुलींनी बनवलेल्या मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिकेवर आम्ही थोडी(शीच) टिका केली म्हणून चिडून वृषाली गटणेने तो कागद टराटरा फाडून टाकला आणि बाईंकडे तक्रार केली! मग आम्ही मुलांनी नवीन अनुक्रमणिका बनवून त्यावर मुलींच्या नावांमध्ये मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करणे इत्यादी प्रकार केले. शेवटी आमच्या वर्गशिक्षिका गोरबाळकर बाईंनी हस्तक्षेप करून त्या चुका सुधारायला लावल्या. सौमित्र देशपांडेने ह्या अंकात बरीच चित्र काढली होती. मुखपृष्ठही त्यानेच बनवलं होतं. एकंदरीत भांडाभांडीमुळे काम पूर्ण व्हायला बराच उशीर लागला होता आणि अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी मी, प्रथमेश आणि सौमित्रने एकत्र घरी बसून बरेच लेख लिहून काढले होते. पुढे इंजिनिअरींगला करायच्या 'सबमिशन'ची थोडीफार प्रॅक्टीस तेव्हा झाली होती हे नंतर समजलं.
नववीत जरा शिंग फुटली होती आणि त्यामुळे बरेच दिवस आम्ही हस्तलिखिताचा विषयच ठरवलाच नाही. शेवटी वेळ कमी उरल्यावर फार काही करता येणं शक्य नसल्याने 'निबंध' हा विषय आम्ही निवडला. थोडक्यात आमचं हे हस्तलिखित म्हणजे निबंधाचं पुस्तक होतं. मी दोन तीन विषयांवर निबंध लिहिले होते पण त्यातला एक विषय मला पक्का आठवतो आहे तो म्हणजे 'जाहिरातींचे युग'. तो निबंध मी सहामाही परिक्षेच्या पेपरात लिहिला होता आणि मराठी शिकवणार्या मनिषा कुलकर्णी बाईंनी तो वर्गात वाचून दाखवला होता. त्यामुळे लगेच रिसायकल केला. पुढे मी ऑफिसात आणि MBAच्या अभ्यासक्रमात डिजीटल अॅडव्हर्टाजींगच्या प्रोजेक्ट्स वर काम केलं पण जाहिरातींशी पहिला संबंध शाळेतच आला! ह्या अंकासंबंधी अजून एक गोष्ट म्हणजे ह्या अंकांच संपादकीय मी लिहिलं होतं. मी लिहिलेल्या मसुद्यात आमच्या वर्गशिक्षिका जोग बाईंनी अगदी किरकोळ बदल सुचवून ते फायनल केलं होतं. त्यावेळी खूप भारी वाटलं होतं!!
दहावीला महत्त्वाचं वर्ष असल्याने हस्तलिखितावर फार काम केलं नव्ह्तं किंबहुना शाळेने करू दिलं नव्हतं. लिहायला कमी हवं म्हणून आमचा विषय होता 'कविता'. दहावीचं वर्ष असल्याने आमच्या वर्गशिक्षिका अत्रे बाई अंकाचं काम घरी नेऊ द्यायच्या नाहीत. जे काय करायचं ते वर्गात करा. त्या अंकासंबंधी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात देण्यासाठी मी एक कविता केली होती! मला कविता अजिबात कळत नाहीत आणि त्यामुळे आवडत नाहीत. पण तेव्हा काय स्फुरण चढलं काय माहीत. ती कविता लिहिलेलं चिठोरं माझी आज्जी नंतर बरीच वर्ष तिच्या पर्समध्ये घेऊन फिरायची आणि लोकांना कौतूकाने दाखवायची. ते आठवून आता फार हसू येतं. ह्या अंकाच्या निमित्ताने सुमंत तांबेने खूप अवघड, न कळणार्या कविता केल्याचं आठवतं आहे. सुमंतने नंतर कविता केल्या का ते माहीत नाही. बहुतेक ऋच्या मुळेने ही ह्या अंकात एकापेक्षा जास्त कविता लिहिल्या होत्या. ह्या अंकाने बर्याच जणांना काव्यस्फुरण दिलं हे मात्र खरं. 'काव्यसरिता' असं नाव नदीच्या प्रवाहाच्या आकारात लिहिलेलं मुखपृष्ठ सौमित्रने बनवलेलं आठवतय.
हस्तलिहखितांचा हा उपक्रम शाळेत अजून सुरू आहे की नाही ते माहीत नाही आणि असल्यास त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो की नाही ह्याबद्दल उत्सुकता आहे. नेहमीचे प्रचलित उपक्रम नसलेल्या किंवा अगदीच साध्या पद्धतीने पार पाडणार्या आमच्या शाळेने ह्या हस्तलिखिताच्या उपक्रमाद्वारे एक वेगळाच अनुभव आम्हाला दिला आणि त्यामुळे त्याच्या चांगल्या आठवणी आज माझ्याजवळ आहेत. शाळेचे ह्याबद्द्ल नक्कीच आभार मानायला हवेत!