मागे नववीच्या सुट्टीत आईची एक मैत्रिण कैलास मानससरोवरच्या यात्रेला जाऊन आली आणि तिने तिच्या प्रवासवर्णनाची हस्तलिखित प्रत वाचायला पाठवली होती. तेव्हा कैलास मानससरोवराबद्दल पहिल्यांदा ऐकलं. लगेच मी दहावीच्या सुट्टीत जाऊ ? असं घरी विचारलं. पण एकंदरीत बर्याच अटींमध्ये ते बसणारं नव्हतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेच पडलं. मग दिड वर्षांपूर्वी अनयाची मायबोलीवरची कैलास मानस यात्रेबद्दलची सुंदर लेखमाला वाचली आणि भारतात परतल्यावर लगेच इथे जायचच हे ठरवून टाकलं.
जानेवारीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाहिरात वाचल्या वाचल्या लगेच अर्ज भरून टाकला आणि इंटरनेटवर, पुस्तकांमध्ये जे जे काय सापडेल ते सगळं वाचून काढलं. अनयाच्या लेखमालेची पारायणं करून झाली! एकीकडे व्यायाम वगैरे करणं सुरु होतचं. यात्रेसाठी निवड लकी ड्रॉ द्वारे केली जाते. आमचं कधी काही पहिल्या फटक्यात होतच नाही! इथेही नियमाला अपवाद नव्हताच. निवड न होता अर्ज वेट लिस्टमध्ये गेला. वेट लिस्ट क्रमांकही ५१ !!! त्यामुळे निवड व्हायची काही शक्यताच नाही असं गृहीत धरून टाकलं पण तरी एकदा अनयाला फोन केला. तिने खूपच धीर दिला आणि दिल्लीला फोन कर, निवड नक्की होईल असं सांगितलं. दिल्लीला फोनाफोनी, मेलामेली सगळं चालूच होतं. परराष्ट्र खात्याच्या लोक अगदी दिल्ली स्टाईलमध्ये.."हां हां.. जरूर यहा आजाईये भोलेबाबाकी कृपासे हो जायेगा कन्फर्म.. " म्हंटलं मला लेखी द्या की काहितरी.. मी ऑफिसमध्ये रजेच्या अर्जाबरोबर काय भोलेबाबांचा दाखला लाऊ का?! तर म्हणे कळवू तुम्हांला लवकरच.
त्याच दरम्यान कॉलेजमधला एक मित्र ऑफिसच्या बसमध्ये भेटला. त्याला म्हंटलं शनिवारी सकाळी सिंडगडावर येणार का ? तर तो हो म्हणाला. मग दर शनिवारी सकाळी सिंडगड, इतर दिवशी सकाळी ५-६ किलोमीटर चालणं असा व्यायाम सुरु केला. शेवटी एकदाचं परराष्ट्र खात्याकडून कन्फर्मेशनच पत्र आलं! ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मोर्चेबांधणी सुरुच होती. यात्रेचा अर्ज भरण्याचं नक्की केल्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मधल्या एका आजारपणा व्यतिरिक्त एकही सुट्टी न घेता रोज पाट्या टाकून टाकून बरीच सुट्टी जमा केली होती. सुट्टीचंही नक्की झालं. एव्हडं सगळं ठरल्यावर तयारीला एकदम जोर आला. इंटरनेट, पुस्तकं पुन्हा वाचली. खरेदीची यादी केली. अनयाला भेटून आलो आणि तिच्याकडूनही टिप्स घेतल्या. एकंदरीत सगळेच कपडे घेऊन जावे असं वाटायला लागलं!! बुट, सॅक, कपडे, खाऊ, आठवतील त्या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी केली. योगायोगाने आईची ती हस्तलिखित पाठवणारी मैत्रिणी मी निघायच्या आदल्या दिवशी पुण्यात होती. मी जाणार आहे हे कळल्यावर ती आमच्या घरीच आली. ती स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिने दिलेल्या टिप्स नुसार पुन्हा सामानात फेरफार केली. तिकडे सरकारला आपल्या कडून इन्डेम्निटी बाँड भरून दयावा लागतो, इतरही कागदपत्रं द्यावी लागतात त्याची सोय केली. कैलास मानससरोवरला जाणार्या प्रत्येक बॅचबरोबर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक लायझनींग ऑफिसर (ग्रेड १ अधिकारी) असतो. हा पूर्ण बॅचचा प्रमुख आणि त्याला/तिला सगळे अधिकार असतात. आमच्या बॅचच्या एल.ओ. म्हणून तिहार जेलच्या डायरेक्टर जनरल श्रीमती विमला मेहेरा ह्यांची निवड झाली आणि त्यांच्या ऑफिसमधून माहिती विचारणा करण्यासाठी फोन आला.
अखेर सर्व सामान/सुमान, कागदपत्र, पैसे घेऊन एकदाचं आमच्या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केलं. एअरपोर्टवर पेपरमध्ये वाचलं की दिल्लीला मान्सुन पोचला म्हणे आणि उत्तरेत काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. दिल्लीला जाऊन बघतो तर व्यवस्थित उन! म्हंटलं पडून गेला असेल पाऊस. दिल्लीला दिल्ली सरकारतर्फे सगळ्या यात्रींची तीन दिवस रहायची-खायची सोय केली जाते. गुजराथी समाजमध्ये ही सोय मोफत असते. गुजराथी समाज म्हणजे गुजराथची एम्बसी आहे !! बोलण, खाणं, लोकं सर्व गुजराथीत. हिंदीत बोलल्यावर कपाळावर सुक्ष्म अठी उमटते. तिथल्या एसी डॉर्मिटेरीत बेड मिळाला. तिथेच दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन श्री. उदय कौशिक ह्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आल्याची नोंद केली. गुजराथी समाजात पोहोचल्यावर हाय, हॅलो, नमस्ते, गूड मॉर्निंग वगैरे सगळी अभिवादनं विसरून कोणालाही भेटल्यावर, निघताना वगैरे 'ओम नमःशिवाय' असच म्हणायचं हे कळलं! तिथे बाकीच्या यात्रींची ओळख झाली. दर बॅच प्रमाणे आमच्या बॅचमध्येही गुज्जूभाईंचा जोरदार भरणा होताच. मराठीचा झेंडा फडकवायला आम्ही एकटेच! मुंबई पुण्याचे दोन जण होते पण एकजण तमिळ तर एकजण तेलुगु भाषिक.
नंतर सगळ्या बॅचही ओळख परेड, देवाची पूजा, आरती वगैरे झाली. बॅच बाकी एकदम हायप्रोफाईल होती!! ४ डॉक्टर, ३ वेगवेगळ्या विषयांतले पीचडी डॉक्टर, १ शास्त्रज्ञ, १ डिसिपी, १ रेल्वे मत्रांलयातल्या अधिकारी (ह्या मागे एलओ म्हणून जाऊन आलेल्या होत्या.), २ कॉलेज प्रोफेसर, ३/४ शालेय शिक्षक! आणखी दोन आयटीवालेही सापडले. तिशीच्या आसपासचे आम्ही जवळजवळ दहा जणं होतो. त्यातल्या जवळ जवळ सगळ्यांना एक वर्षाच्या आसपासची मुलं होती आणि बायका मुलांची देखभाल करायला घरी थांबल्या होत्या. एकट्या आलेल्या बाया मात्र चाळीशीच्या पुढच्या होत्या. मुलं कॉलेज/नोकर्यांपर्यंत पोहोचली म्हणून आता यात्रेला आल्या.
दुसर्या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग इंस्टीट्यूट मध्ये सगळ्या मेडीकल तपासण्या झाल्या. त्या फारच जोरदार आणि डिटेलवार होत्या. दरम्यान आमच्या पुढे गेलेल्या दोन बॅचेस बुधी आणि अलमोडा इथे अडकून पडल्याची बातमी आली. उद्या त्या पुढे सरकतील त्यामुळे आम्ही वेळेत निघू असही सांगितलं. मी तिथे अगदी दारासमोर बसून कसलातरी फॉर्म भरत असताना आमच्या एलओ मॅडम आल्या. माझ्या बॅजमुळे मी यात्री आहे हे त्यांनी ओळखलं आणि बोलायला आल्या. नाव वगैरे विचारल्यावर म्हणाल्या ' यू मस्ट बी अ स्टुडंट. वॉट डू यू स्टडी?' हा निष्कर्ष कशावरून काढला माहित नाही पण त्यावर 'स्टुडंट और मै ? ही ही ही .. मेरी त्त्वचा से मेरी उमर का पता ही नही चलता.. ही ही ही' असं उत्तर द्यायची फार फार इच्छा झाली!! पण म्हंटलं आधीच त्या तिहार जेलच्या प्रमुख.. उगीच पहिल्याच भेटीत अतरंगीपणा नको करायला.. ! एकंदरीत मॅडमचं व्यक्तिमत्त्व फारच रुबाबदार होतं.
गुजराथी समाजात कौशिकजींच्या ऑफिसमध्ये रोज हवन, पूजा, आध्यात्त्मिक पाठ वगैरे होतं असे. त्यातल सगळं पटलं नाही तरी आधी जाऊन आलेल्यांच्या सल्ल्यानुसार फार कंट्रोल करून शांतपणे सगळं ऐकून घेत असे.
दुसर्या दिवशी इंडोतिबेटन बॉर्डर फोर्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल रिपोर्टची तपासणी आणि त्यावरून सिलेक्ट की रिजेक्ट हे ठरणार होतं. तिथे सुरुवातीच्या सुचना झाल्यावर एकेकाची तपासणी सुरु झाली. भोलेबाबाच्या कृपेने आमच्या बॅचमधल्या ५९ साठ यात्रींपैकी ५७ जण पास झाले! सग़ळी कडे आनंदी आनंद पसरला. तिथे एका समितीतर्फे जेवण दिलं. ते लोकं फारच अदबीने वागत आणि आमची सेवा वगैरे करत होते. म्हणे यात्रींची सेवा केली की आम्हांला पुण्य मिळतं पण आपल्याला फारच अवघडल्यासारखं होतं.
नंतर गुजराथी समाजात परतल्यावर पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेल्याची बातमी आली. मी घरी फोन वगैरे करून कळवलं की आम्ही वेळेवर निघू. मग काही जणांना सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. दिल्ली मेट्रोने छान फिरून परत गुजराथी समाजात आलो आणि येऊन बघतो तर...........................तिथे एकदम शोककळा पसरली होती. काय झालं ते विचारलं तर कळलं की उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे यात्रेच्या मार्गाचं खूपच नुकसान झालं आहे. बरेच पुल वाहून गेले आहेत. पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेली कारण गुंजीला हेलिकॉप्टर उतरू शकतं आणि लोकांना परत आणता येऊ शकतं. शक्य झालं तर ते पुढे जाऊन यात्रा करून येऊ शकतात आणि आल्यावर हेलिकॉप्टरने परतू शकतील. बुधीहून मागे फिरणं शक्यच नाहीये. दुसरी बॅच उद्या अलमोड्याहून परत फिरणार आहे आणि आमच्या पासून पुढच्या ८ बॅचेस रद्द केल्या आहेत. सगळ्यांची एक मिटींग झाली आणि कौशिकजींनी परतीच्या प्रवासाची सोय करायला सांगितली. सगळे खूपच उदास झाले. बंगलोरच्या सुमती मॅडम रडायलाच लागल्या. पहिली उदासीची एक लाट ओसरल्यावर सगळ्यांना उत्तरांचलमधल्या गंभीर परिस्थितीची जाणिव झाली. आणि परत भोलेबाबाच्या कृपेनेच आपण वाचलो असं ठरलं. (एकंदरीत गुजराथी समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भोलेबाबांनीच घडवलेली असते.) नंतर सगळेजण सुटलेच. स्वतःवरचं हसण्यासारखी गोष्ट होती. सगळ्यांनी आपापल्या बॅगांमधले पदार्थ काढले. माझ्याजवळचे डिंकाचे लाडू गुज्जू गँगमधल्या एकाने प्रसाद म्हणून सगळ्यांना अग्राह करून करून खायला लावले. त्यांचे ठेपले, रोटवगैरेही दिले. त्या दिवशी गप्पांची मैफील रात्री १/१:३० वाजेपर्यंत सुरु होती. एकतर मेडिकल पास झाल्याने सगळे जरा मोकळेपणाने बोलायला लागले होते आणि त्यातच ही बातमी समजली.
दुसर्या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्रालयात सगळ्यांना बोलवलं होतं. चायनीज विसा काढून आमचे पासपोर्ट परत आले होते आणि आता पुढे काय हे ठरवायचं होतं. आमच्या एलओ मॅडमही हजर होत्या. जर ह्यावर्षी यात्रा सुरु झाली तर नंबर दोनच्या आणि आमच्या बॅचला प्राधान्य दिलं जाईल आणि जर कोणाला ह्यावर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षीच्या निवडीत आमच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकार्यांनी सांगितलं. यायच्या आधी दिल्लीत परत एकदा मेट्रोने फिरून घेतलं आणि तिथे मस्त पंजाबी जेवणही जेऊन आलो. दिल्ली मेट्रो, रस्ते, पूल सगळं एकंदरीत फारच सुरेख, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलं आहे.
जवळ जवळ सहा महिने तयारी करून, मेडिकल टेस्ट पास होऊन अगदी ऐनवेळी यात्रा रद्द झाल्याने फार म्हणजे फारच वाईट वाटलं. बॅच चांगली होती, बरोबरीची बरीच जणं होती. त्यामुळे मजा आली असती असं वाटतय. घरीही सगळे जण हळहळले. घरी कोणाचाच जाण्यासाठी विरोध नव्हता. सगळ्यांनी अगदी जोरदार पाठींबा दिला होता. ऑफिसमधली सुट्टी वगैरे सगळच जुळून आलं होतं. पण योग नव्हता हेच खरं. उत्तरांचलमधली एकंदरीत परिस्थिती बघता मधे कुठे जाऊन अडकलो नाही आणि वेळेवर परत आलो ते ही बरच झालं. ही खरोखर भोलेबाबांची कृपा म्हणायची!
सरकारी पातळीवर यात्रेचं आयोजन, पत्रव्यवहार सगळं फारच व्यवसायिक पद्धतीने केलं जातं. एकंदरीत सरकारने सगळे निर्णयही खूप विचारपूर्वक घेतल्याचं जाणवलं. आमच्या एलओ मॅडम, भेटलेले एक दोन माजी एलओ, परराष्ट्र मंत्रालयातले इतर अधिकारी इतके व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने बोलत होते की 'सरकारी अधिकारी' म्हंटल्यावर जी प्रतिमा डोक्यात होती ती निश्चितपणे बदलली. आता ह्यावर्षी/पुढच्या वर्षी किंवा कधी यात्रेला जायला जमेल काहीच माहित नाही. पण आता यात्रेबद्दल आता इतकं वाचलं आहे की अगदी कधीही त्याबद्दल कन्सल्टेशन करू शकेन. यात्रेला जाण्याच्यानिमित्ताने चांगला नियमीत व्यायाम झाला आणि मेडिकल चेकअपही झाला. (तुका म्हणे त्यातल्या त्यात!)
जायच्या आधी ह्यावर्षीचं विंबल्डन बघता येणार नाही हे लक्षात आलं होतं. आता यात्रेच्या निमित्ताने रजा घेतलेलेलीच आहे तर ती रद्द न करता दोन आठवडे संपूर्ण विंबल्डन बघावं का असा विचार आता करतो आहे!
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !