गेल्या आठवड्यात पुण्यात PIFF म्हणजेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. पिफला जायची यंदाची माझी पहिलीच वेळ. आधी पिफ बद्दल खूप ऐकलं होतं त्यामुळे पहायची खूप उत्सुकता होती. शिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी ह्या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधले चित्रपट पहायची पहिलीच वेळ असल्याने तो अनुभव कसा असेल हे ही माहित नव्हतं.
मित्रमंडळींपैकी कोण कोण आहे हे साधारण पहिल्या दुसर्या दिवशी कळलं आणि मग रोज सकाळी SMS, फोन, पिंग करून ठरवाठरवी सुरु झाली. कॅटलॉगमध्ये सिनेमाबद्दल वाचायचं, त्यातुन फार काही कळलं नाही तर गुगलवर शोधाशोध करायची. एका मित्राच्या ओळखीतले एक जण पिफच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यांच्याकडूनही काही काही चित्रपटांची नावं समजली होती. पिफचं आयोजन एकंदरीत नेटकं होतं. फार भपकेबाज नाही पण तरीही खूप व्यवसायिक पद्धतीने केलेलं. यंदाच्या पिफची मुख्य संकल्पना 'Celebrating 100 years of Indian Cinema' अशी होती. वर्ल्ड कॉम्पिटीशन, ग्लोबल सिनेमा, रेट्रो सिनेमा (ह्यात स्मिता पाटील, यश चोप्रा ह्यांचाही समावेश होता), इंडीयन सिनेम आणि आजचा मराठी चित्रपट असे विभाग ह्याशिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फिल्म्सची स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम होता. हिंदी, इंग्रजी चित्रपट बघायचे नाहीत असं ठरवलं होतं. मराठी चित्रपट संहिताचा प्रिमीयर होता म्हणून आणि 'बालक पालक' बद्दल खूपच ऐकलं होतं म्हणून जायचं होतं पण संहिताची वेळ जुळली नाही आणि बालक पालकला जागा मिळाली नाही म्हणून दोन्ही पहायचे राहिले. चार दिवसांच्या काळात एकंदर ११ चित्रपट हाती लागले. १ हिब्रू, १ टर्की, १ इटालियन, १ फिनीश, १ नॉर्वेजियन, १ फ्रेंच, १ सर्बियन आणि बाकीचे जर्मन/पोलीश.
पाहिलेल्या चित्रपटांबिषयी थोडसं :
१. एपिलॉग - हायुता अँड बर्ल : हा पिफचा उद्घाटनाचा सिनेमा होता. कहाणी एका वयस्कर इस्रायली जोडप्याची. कम्युनिस्ट विचारसरणीच्या ह्या जोडप्याला आत्ताच्या जगाशी जुळवून घेणं हळूहळू अवघड जायला लागतं. मुलगा वडिलांशी पटत नाही म्हणून अमेरिकेला निघून गेलेला. आर्थिक चणचणही भासत असते. अश्यात एका रात्री त्यांच्यात भांडण होतं. ते मिटवून ते दोघे आपल्या येऊ घातलेल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. अखेर सेवाभावी संस्था काढायचं स्वप्न बाजूला ठेवून अखेरच्या प्रवासाला निघून जातात. कम्युनिस्ट आणि आधुनिक विचारसरणीतला संघर्ष इस्राइलमध्येही आहे हे अजिबात माहित नव्ह्तं. नायक नायिका दोघांचीही कामं उत्तम झाली आहेत. सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य सिनेमा होता.
२. कुमा : तुर्कस्तान : कुमा म्हणजे सवत.व्हेनिसमध्ये रहाणार्या टर्की फॅमिलीत घडणारी ही गोष्ट मस्त फुलवली आहे. सुन म्हणून लग्न करून आणतात पण सासरी आल्यावर तिला कळतं की ती खरतर सवत आहे. तसं असण्याची कारणंही नंतर कळतात. आधी ती हादरून जाते पण नंतर जुळवून घेते. पुढे त्या दोघींमधलं नातं कसं वळणं घेत जातं ते मस्त दाखवलं आहे. प्रमुख भुमिका करणार्या दोन्ही कलाकारांची काम सुरेख झाली आहेत. सगळेच कलाकार अगदी टिपीकल टर्की चेहेरापट्टी, शरीरयष्टीचे आहेत. एकंदरीत सुरेख सिनेमा.
३. द अॅडवेंचर : रेट्रो प्रकारातला हा सिनेमा मायकेलँजेलो ह्या दिग्दर्शकाचा, साधारण १९६०च्या आसपास आलेला. इटालियन मित्र मैत्रिणींचा ग्रुप समुद सफरीला निघतो आणि एका बेटावर येऊन पोहोचतो. त्यातली एक मुलगी ह्या बेटावर गायब होते. मुलीचा मित्र आणि मैत्रिण तिचा शोध घेता घेता एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि शेवटी आपल्या हरवलेल्या मैत्रिणीला विसरून जातात. ब्लॅक आण व्हाईट सिनेमा जरा संथ वाटला तरी ज्या काळात तो बनला ते लक्षात घेतलं तर ठिक वाटतो.
४. रोझः १९४५ साली दुसर्या महायुद्धानंतरच्या पोलंडव्याप्त जर्मन भागात घडणारी ही कथा. एका मृत जर्मन सैनिकाच्या पत्नीची आणि त्या सैनिकाच्या सहकार्याची. साम्यवादी पगडा असलेल्या ह्या भागात सामान्य नागरिकांवर, स्त्रियांवर झालेले अत्याचार, दडपशाही ह्यांचं वास्तववादी चित्रण ह्यात आहे. प्रचंड अंगावर येणारा सिनेमा पाहून झाल्यावर डोकं सुन्न होतं. ह्या चित्रपटाला वर्ल्ड कॉम्पिटीशनमध्ये बक्षिस मिळालं.
५. द टो रोप : मेक्सिकोमध्ये युद्धानंतर घडणारी कथा. युद्धामध्ये आई वडिल गेल्यानंतर आपल्या दुरच्या काकांकडे एक मुलगी येते. हे काका गेस्ट हाऊस चालवत असतात. तिथे उतरायला येणारे प्रवासी सोडून सगळं असतं. ह्या काकांचा मुलगा, त्यांना ही जागा सोडून शहरात यायला सांगत असतो कारण त्याला पुन्हा युद्धाची शक्यता वाटत असते. एका सकाळी काका आणि त्यांचा मुलगा हिला एकटीला सोडून शहरात सोडून जातात. आणि युद्ध आणि नंतर युद्धाची शक्यता तिला पुन्हा एकटं पाडते. कथा अतिशय संथपणे पुढे सरकते. मेक्सिकोच्या खेड्यामधलं चित्रीकरण सुरेख आहे. सगळ्या परिसरातला निसर्ग फार सुरेख दाखवला आहे.
६. होम फॉर अ विकेंड: एका जर्मन परिवारात घडणारी ही गोष्ट. एका विकेंडला आई वडिल आपल्या मुलांना दोन महत्त्वाच्या घडामोडी सांगतात. ह्या दोन्ही गोष्टींचा त्या परिवारावर होणारा परिणाम, प्रत्येक सदस्याचे वैयक्तिक आयुष्य आणि परिवारातल्या वेगवेगळ्या नात्यांचा वेध ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत. जर्मन घर आणि वातावरण तसेच आसपासचा परिसर ह्यांचे चित्रण सुरेख आहे.
७. द परेडः सर्बियात घडणार्या ह्या सिनेमात गे लोकांच्या प्रश्नाला हात घातला आहे. गे लोकं शहरात एक परेड करायची तयारी करत असतात आणि त्यांना मानवी हक्कांची मागणी करायची असते. सनातनी लोकांचा ह्याला अर्थातच विरोध असतो आणि त्यामुळे ह्या दरम्यान त्यांना अनेक अडचणी येतात. काही घडामोडींमुळे ज्युडो कराटेचे क्लास घेणारा एक जण आणि त्याची मैत्रिण ह्यांना परेडसाठी मदत करायला तयार होतात. अखेर ही परेड पार पडते पण त्यांच्यातल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू होतो. विनोदी अंगाने जाणारे संवाद विनोदांच्या मध्ये जोरदार फटके मारतात. पूर्व युरोपिय देशांमधली स्पर्धा, शत्रृत्त्व ह्या संवाद/विनोदांमध्ये खूपदा डोकावतं. पूर्व युरोपातल्या देशांचं चित्रीकरण सुरेख आहे. एकंदरीत मस्ट वॉच सिनेमा !
८. बार्बरा: हा ही चित्रपट दुसर्या महायुद्धोत्तर काळातला. पूर्व जर्मनीवर पोलादी पडदा असताना तिथल्या नागरिकांवर अनेक निर्बंध होते. सरकारचं नागरिकांच्या हालचालींवर बारिक लक्ष असे. बार्बरा ही एक बालरोगतज्ज्ञ. तिने आपल्याला सेवेतून मुक्त करण्यासाठी अर्ज केलेला असतो. ती तिथून पळूण जाण्याचे प्रयत्नही करत असते. परंतु एक एक केस हातावेगळी करताना ती तिथल्या परिस्थित गुंतत जाते. सरकारी कामगारांच्या चेहेर्यांमागे शेवटी आपल्यासारखीच माणसे आहेत ह्याची तिला जाणीव होते आणि मग पळून जायची संधी असताना ती माघार घेते. बार्बला चित्रपटालाही स्पर्धेत बक्षिस मिळालं. प्रत्येक कलाकाराच अभिनय उत्त्म होता, तसचं वातावरण निर्मितीही सुरेख होती.
९. द ओरहॅम कंपनी: दारूडा बाप, सोशिक आई, बंडखोर मुलगा अशी अगदी भारतीय शोभेल अशी ह्या नॉर्वेजियन चित्रपटाची कथा. सगळ्या कलाकरांचे खूपच नैसर्गिक अभिनय आणि अतिशय संयत हाताळणी ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्ये. शिवाय नॉर्वेमधलं अप्रतिम निसर्ग सौंदर्यही वारंवार दिसत रहातं.
१०. हेला डब्लू : ही पुन्हा दुसर्या महायुद्धाशी संबंधीत कहाणी. अनेक युरोपिय देश त्यांची चूक किंवा इच्छा नसताना दुसर्या महायुद्धात ओढले गेले. फिनलँडही त्यातलाच एक. हेला ही फिनलँडमधली प्रथितयश उद्योजक, लेखिका, कवी, नाटककार. फिनलँडमध्ये शांतता नांदावी म्हणून ती तिच्या ओळखी आणि वजन वापरून सोव्हिएट युनियनशी वाटाघाटी करते. पण पुढे तिच्या वर फितुरी आणि देशद्रोहाचे आरोप येतात आणि तिची रवानगी तुरुंगात होते. युध्द संपल्यानंतर तिची सुटका होते. युद्ध अगदी प्रत्यक्ष दाखवलं नसलं तरी युद्ध चालू असल्याची जाणीव चित्रपटभर होत रहाते. ह्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत अतिशय उत्कृष्ठ होते. खरतर मी बालक पालक हा गाजत असलेला मराठी सिनेमा पाहायला गेलो. पण तिथे जागा न मिळाल्याने शेजारच्या स्क्रीनला जाऊन बसलो आणि हा उत्तम चित्रपट पाहायला मिळाला.
११. ३७ विटनेसेस : फ्रान्समध्ये भरवस्तीत एका महिलेलेचा खुन होतो. आसपासच्या परिसरात रहाणारे ३७ लोकं आम्ही काहीच पाहिलं किंवा ऐकलं नाही अशी साक्ष देतात. अडतिसाव्याला मात्र रहावत नाही तो नंतर जाऊन पोलिसांना किंचाळण्याचे आवाज ऐकू आल्याचं सांगतो. नंतर सगळेच जण आपली साक्ष फिरवतात. सुरुवातीला 'मर्डर मिस्ट्री' वाटणारा चित्रपट खुन कोणी केला वगैरे तपशीलात शिरण्याऐवजी झालेल्या घटनेमुळे लोकांच्या मनावर आणि वागण्यावर झालेल्या परिणामांवर जास्त भाष्य करतो.
एकंदरीत सिनेम्यांची जत्रा विविध विषय, उत्तम हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि अभिनय आणि नेत्रसुखद चित्रीकरण ह्यांच्यामुळे एक वेगळाच अनुभव देऊन गेली.(युरोपचं सौंदर्य बघून आता तिथे जायची इच्छा होते आहे!) अन्यथा हे सगळे चित्रपट मी कधी बघितले असते किंवा कधी बघितले असते का कोण जाणे!
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !