SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे

परिचितांमधले अपरिचित : SOPEC चे संस्थापक आणि संचालक तसेच ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. पेठे

डॉ. श्री. लक्ष्मण दत्तात्रय पेठे हे नात्याने माझे काका, माझ्या वडिलांचे आतेभाऊ. ते मुळचे मुंबईचे पण शेतीमध्ये संशोधन करता यावं म्हणून औरंगाबादला स्थाईक झाले होते. माझ्या आज्जीला शिक्षणाचं विशेष कौतुक असल्याने तिचा तो अगदी लाडका भाचा. त्यामुळे त्यांच्याबद्दल तिच्याकडूनही खूप ऐकत आलो आहे. त्यांनी आधी रसायनशास्त्रात पीएच.डी केली, नंतर त्यात संशोधन केलं, पुढे औरंगाबादला अध्यापन तसेच शेतीविषयक संशोधन केलं, त्यानंतर ते संशोधनासाठी जर्मनीला गेले आणि निवृत्तीनंतर पेठे काका आता पुण्याला स्थाईक झाले आहेत. सध्या ते, त्यांचे मित्र आणि सहकारी मिळून Society For Public Education and Concern (सोपेक) नावाची संस्था चालवतात. मध्यंतरी पेठे काकांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सोपेकबद्दल तसेच त्यांच्या इतर अनुभवांबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. मायबोली गणेशोत्सवानिमित्त "परिचितांमधले अपरिचित" मालिकेमधला हा शेवटचा संवाद आणखी एका हरहुन्नरी व्यक्तीबरोबर.

काका, तुम्ही सोपेक ही संस्था औरंगाबादला असताना स्थापन केलीत. ह्या संस्थेद्वारे आपण नक्की काय साध्य केले? तसेच ह्या कार्याची दिशा आपणास कुठून मिळाली ?

"प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने साध्य करता येऊ शकते", ही माझी श्रध्दा नव्हे खात्रीच आहे. सोपेक ही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात, देशात आणि परदेशात वेगेवेगळ्या पदांवर काम केलेल्या उच्चशिक्षित आणि अनुभवी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. असे सगळे लोकं एकत्र आले आणि त्यांनी एका दिशेने, एका प्रेरणेने प्रयत्न केले तर आजुबाजूच्या गोष्टी सुधारायला वेळ लागणार नाही. सोपेकने आत्तापर्यंत अनेक उपक्रम हाती घेतले आणि ते यशस्वी पणे पार पाडले. मग ह्यात स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रयत्न तसेच त्यांची अंमलबजावणी झाली आहे.
अनेकदा सरकारी कामकाजावर टीका केली जाते. आमचा असा प्रयत्न असतो की एखाद्या पध्दतीतल्या त्रुटी संबंधितांच्या नजरेत आणून देणे आणि त्या सुधारण्यासाठी योग्य त्या सुचना देणे. तसेच काही काही पद्धती ह्या कालबाह्य झालेल्या असतात, त्या बदलणे गरजेचे असते. अशा बदलांविषयी गरज पडेल तितका अभ्यास करणे, नवीन कल्पना संबंधितांसमोर मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे ह्या सगळ्या गोष्टी सोपेकतर्फे केल्या जातात.

सोपेकने हाती घेतलेले आणि अंमलबजावणी केलेले महत्त्वाचे प्रकल्प कोणते?

सोपेकचा सगळ्यांत पहिला मोठा प्रकल्प म्हणजे स्पर्धा पोस्ट कार्ड. त्यावेळी टिव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये मतदान तसेच उत्तरे गोळा करणे हे साध्या पोस्टकार्डांद्वारे होत असे. १५ पैशाचं कार्ड वापरून कित्येक जण लाखो रुपये जिंकत असतं. शिवाय अशा कार्यक्रमांना लाखांच्या संख्येत उत्तरं/मतं दिली जात असतं. सरकारी यंत्रणेचा वापर करून घडणार्‍या गोष्टीचा सरकारला काहीतरी फायदा झाला पाहिजे असा एक विचार सोपेक सदस्यांच्या मनात आला. ह्या विषयाशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती गोळा करून लिखित तसेच योग्य त्या स्वरूपात आणि सर्व पूरक संदर्भांसह केंद्र सरकारसमोर मांडली. आमचा केंद्र सरकारशी अनेक दिवस पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा चालू होता. आमच्या प्रयत्नांनी म्हणा केव्हा आणखी कशाने म्हणा, शेवटी केंद्रसरकारने निर्णय घेतला आणि ह्या स्पर्धा पोस्टकार्डची देशभर अंमलबजावणी झाली. स्पर्धा पोस्टकार्डचा फक्त रंग वेगळा होता. त्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी काहीही अतिरिक्त खर्च न पडता सरकारला खूपच महसुल ह्यातून मिळत असे.

ह्यानंतर आम्ही १ तसेच २ रुपयांच्या नाण्यांसबंधी प्रकल्पावर काम केलं. ही दोन्ही नाणी समान आकाराची तसेच रंगांची होती आणि त्यामुळे ती वापरताना सामान्य माणसाची गैरसोय होतं असे. आम्ही अर्थमंत्रालयाशी ह्याबाबत संपर्क साधून नाण्यांचे डिझाईन, धातू, वजन, आकार इ. ठरवण्यासंबंधी माहितीची विचारणी केली. ह्याबद्दलचे प्रश्न कोणाच्या अखत्यारीत येतात हे जाणून घेतलं आणि त्यावरून आमचा त्यासंबंधी असलेल्या समितीशी पत्रव्यवहार सुरु झाला. पुढे ह्या समितीने निर्णय घेऊन १ आणि २ रुपयांच्या नाण्यांचे आकार, रंग, वजन ह्यात बदल केले. सामान्य माणसाशी होणारी गैरसोय ह्या निर्णयाने टळली.

मग पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. त्याकाळात सोपेकने युटीआयची US-64 स्किम तसेच रिजर्व्ह बँकेचे टॅक्स-फी बाँड ह्याबद्दलही अर्थमंत्रालयाशी अनेकदा संपर्क साधला होता आणि काही बदल सुचवले होते. ह्यातल्याही काही बदलांची अंमलबजावणी नंतर झालेली दिसली.

म्हणजे सोपेकने हाती घेतलेले प्रकल्प हे प्रामुख्याने अर्थ मंत्रालयाशी संबंधितच असतात का?

नाही. सोपेक जे प्रकल्प हाती घेते ते प्रामुख्याने सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी/रहाणीमानाशी संबंधित असे असतात. त्यामुळे अर्थकारण हे महत्त्वाचे असतेच. ह्याशिवाय सोपेकचे सर्व सदस्य हे आपापले व्याप संभाळून ह्या प्रकल्पांवर काम करतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवताना त्याचे महत्त्व, आधी म्हटल्याप्रमाणे दैनंदिन जीवनावरचा थेट परिणाम, भविष्यकाळाच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता तसेच सदस्यांची त्या विषयांमधली आवड, त्यांसंबंधीची जाण ह्या सगळ्या गोष्टीदेखील विचारात घ्याव्या लागतात.

आपल्या इथे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. सोपेकने श्री. लालकृष्ण आडवाणी गृहमंत्री असताना वाहनांच्या काचांचा रंग तसेच त्यावरचे काळे आवरण ह्यासंबंधीचे निकष कडक करण्यासाठी काही पत्रव्यवहार गृहमंत्रालयाशी केला होता. परंतु त्यावरचा अंतिम निर्णय अजूनही घेतला गेलेला नाही आणि आम्ही अजूनही गृहमंत्रालयाशी त्याबद्दल पाठपुरावा करत आहोत. तसेच वाहनांच्या दिव्यांची वरची अर्धी बाजू काळ्या रंगात रंगवण्याबद्दलही काही अभ्यास करून प्रस्ताव रस्ते वहातूक महामंडळासमोर मांडले होते. रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या वाहनांच्या दिव्यामुळे डोळे दिपून होणार्‍या अपघातांचे प्रमाण ह्यातून कमी होण्यास मदत होईल अशी आमची अपेक्षा होती. ह्यासंबंधीच्या निर्णयाची काही अंमलबजावणी झाली आहे.

काही शैक्षणिक प्रकल्पही आम्ही चालवले. विशेषत: पीएच.डी संबधित. देशामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अनेक पीएच.डी करणार्‍या विद्यार्थ्यांकडून शोधनिबंध, प्रबंध सादर केले जातात. परंतु आवश्यक ते निकष पूर्ण न करूनही ते नाकारले जाण्याचे प्रमाण त्यामानाने खूपच कमी असते ज्यामुळे पीएच.डीची एकूण गुणवत्ता ढासळू शकते. ह्याकरीता काही निकष ठरवून ते सगळीकडे पाळले जाण्यासंबंधी सोपेकने पाठपुरावा केला. माझ्या स्वतःचा अध्यापन तसेच पीएच. डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असलेला अनुभव ह्याबद्दल उपयोगी पडला. ह्याशिवाय मोठ्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये काही महागडी उपकरणे वापराविना पडून असतात. त्यांचा वापर त्या ठिकाणी होत नसला तरी इतर ठिकाणी त्यांची गरज असू शकते. अशा सर्व उपकरणांची माहिती गोळा करून त्यांचा वापर वाढवण्यासंबंधीचे काम सध्या चालू आहे.

नुकतेच उद्घाटन झालेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूबद्दलही एक प्रस्ताव आम्ही सरकारसमोर मांडला आहे. हया पुलाच्या खांबांच्या जवळ असलेल्या जागेचा तसेच त्या खांबांचा वापर करून वीज निर्मीती करता येऊ शकते, जी वीज पुलावरच्या दिव्यांसाठी वापरली जाईल. ह्यासंबंधी सोपेकचे सदस्य सागरी सेतूच्या प्रमुख अभियंत्यांच्या तसेच Institute of Oceanogrpahy, Mumbai ह्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मघाशी म्हंटल्याप्रमाणे सोपेकचे सगळेच प्रकल्प हे अर्थकराणाशी संबंधीत नाहीत.

सोपेकची सुरुवात औरंगाबादला झाली. तिथे अगदी सुरुवातीला चालवलेला प्रकल्प कोणता?

टि.एन. शेषन जेव्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख होते तेव्हा औरंगाबादमध्ये निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोलपंपांवर सर्व वाहनांच्या नोंदी तसेच पेट्रोलखरेदीसंबंधीची माहिती ठेवणे बंधनकारक केले होते. हे ग्राहकांच्या तसेच पेट्रोलपंपचालकांच्या दृष्टीने खूपच गैरसोईचे होत असे. सोपेकने ह्या नियमाविरुध्द तक्रार केली आणि पुढे तो नियम बदलला गेला. सुरुवात मुळात ह्यातून झाली.

तुम्ही मुळचे मुंबईचे असूनही औरंगाबादला कसे काय स्थाईक झालात? मुंबई सोडून औरंगाबादला जाणं हा अनुभव कसा होता? ह्यात अडचणी नाही जाणवल्या? लहानपणापासून असलेली शेतीची आवड जपण्यासाठी हा निर्णय घेतला होतात का?

माझे वडील, काका तसेच बाकी सगळे नातेवाईक हे मुंबईचे असते तरी माझं आजोळ हे वैभवसंपन्न अशा खानदेशातलं होतं. माझ्या लहानपणी मी आईबरोबर नेहमी तिथे जात असे. तिथे मामांच्या शेतीचे प्रयोग बघत असे. त्यावेळेपासूनच शेतीची आवड उत्पन्न झाली. जर तुम्हांला शेतीसारख्या विषयात संशोधनाची आवड असेल तर मुंबईपेक्षा महाराष्ट्राच्या इतर भागातच त्याला जास्त वाव होता. अशा संधी तिथेच जास्त उपलब्ध होत्या. औरंगाबादची निवड करण्यामागचं कारण म्हणजे हे शहर मागसलेलं असूनही विकसनशील आहे. ते त्याकाळी संपूर्ण आशियामधलं सगळ्यांत जास्त वेगाने वाढणारं शहर होतं. ह्याशिवाय मुंबईतली दगदग, कामावर जाण्यायेण्यातला वेळ तसेच शक्ती वाचवून मी ती संशोधन कार्यासाठी लावू शकणार होतो. औरंगाबादला जाण्याचा निर्णय योग्यच होता असं आता म्हणावं लागेल. आणि मुंबईसारख्या शहरातून खेड्यात जाणं अवघड असलं तरी शेवटी तुम्हांला तुमचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.

औरंगाबादला शेतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे संशोधन केलेत?

रसायनशास्त्रामधले माझे शिक्षण शेतीविषयक संशोधनात खूपच उपयोगी पडले. अगदी सुरुवातीला प्रयोगशाळेतल्या प्रयोगांमधून असे लक्षात आले की, नैसर्गिक खत तयार करताना जर १ मीटरपेक्षा जास्त खोलीचा खड्डा तयार केला तर त्यात खत तयार होऊ शकत नाही. त्यात घातलेल्या कचर्‍याचा नुसताच रंग बदलतो. आणि असे खत जर शेतीसाठी वापरले तर त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. ह्या संदर्भात इंडियन काउंन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चच्या सहाय्याने अधिक संशोधन केलं आणि निश्चित निष्कर्ष हाती आल्यानंतर ते शेतकर्‍यांसमोर मांडले. पुढारलेल्या शेतकर्‍यांनी हे निष्कर्ष मानले आणि नंतर त्याचे चांगले परिणाम त्यांनाही दिसले.

त्यानंतर एकदा बाभळी तसेच शेवग्याच्या शेंगांवर संशोधन करायचे होते. पण त्याकरीता स्वतःचे शेत असणे गरजेचं होतं. मग औरंगाबादच्या जवळ शेत विकत घेतलं. शेवग्याच्या शेंगांसंबंधी संशोधन करत असताना पहिल्या प्रयत्नात ते सपशेल फसलं. १०० झाडं लावलेली असून त्यात १०० शेंगा देखील आल्या नाहित. मग त्यामागची कारणमीमांसा करत असताना लक्षात आलं की शेंगा न येण्याचं कारण हे शेतातला प्रचंड वारा हे आहे. वार्‍यामुळे शेवग्याची फुलं उडून जातात आणि शेंग धरतच नाही. मग ही फुलं वाचवण्यासाठी झाडांचं वार्‍यापासून संरक्षण करणं गरजेचं होतं. त्यात बाभळीच्या झाडांची मदत झाली.
बर्‍याचदा शेतात एकावेळी दोन पिकं घेतली की ती एकमेकांना पूरक ठरतात आणि त्यामुळे दोन्ही पिकांच्या उत्पन्नात वाढ होते. ह्यासंबंधीचे अनेक प्रयोग शेतात केले. आणि हे सगळे प्रयोग वार्षिक असतात. म्हणजे एखाद्या हंगामात एखादा प्रयोग फसला तर तो सुधारणा करण्यासाठी वर्षभर थांबावं लागतं.
ह्याशिवाय गाईम्हशी पाळल्या. त्यांचे दूधदुभते वाढवण्यासंबंधी प्रयोग केले. हे सर्व संशोधन करताना काही प्रयोग प्रयोगशाळेत केलेच पण मुख्य म्हणजे शेतात अगदी नांगर चालवण्यापासून ते गोठा साफ करण्यापर्यंत सर्व काही केलं.

जाताजाता, शेतीच्या ह्या संशोधना बरोबरच आणखीनही एक गोष्ट केली. केवळ आवड आणि सहज शक्य झाली म्हणून. औरंगाबादजवळ सुमारे ४० एकर जागा सरकारकडून मी विकत घेतली. ह्या जागेवर एका वकिलाची तसेच आर्कीटेक्टची नेमणूक करून त्याचे भुखंड पाडले. कुठल्याच प्रकारची घाई नसल्याने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थीत सरकारी पध्दतीने तसेच कायदेशीर मार्गाने झाल्या. आज ह्या जागेवर पेठेनगर उभं आहे.

ह्या सर्व गोष्टी करणं औरंगाबादला गेल्यामुळेच शक्य झालं. माझा मुख्य पेशा म्हणजे रसायनशास्त्रातले संशोधन आणि विद्यापीठात अध्यापन हे संभाळून मुंबईत हे सगळं शक्य झालं नसतं.

तुम्ही रसायनशास्त्रात MSc तसचं पीएच.डी. केलंत आणि नंतर जर्मनीला जाऊन काही संशोधन कार्य केलंत. त्याबद्दल आम्हांला जाणून घ्यायला आवडेल.

लहान सहान प्रयोग करून बघायची हौस मला लहानपणापासूनच होती. लहानपणी दारावर आलेल्या मदार्‍याने दाखवलेली जादूची काडी मी १ आण्याला विकत घेतली होती. नंतर घरी जाऊन तेच प्रयोग स्वत: करून दाखवले. तेव्हापासून आजोबा म्हणत की हा पुढे जाऊन शास्त्रज्ञ होणार. आणि नंतर मी खरच संशोधन कार्यात उतरलो. MSc नंतर पुढे मी N.C.L. मधून 'Solid Sate Chemistry' ह्या विषयात पीएच.डी केलं. N.C.L. मधल्या ६ वर्षांच्या काळात मला आयुष्यभर पुरेल इतका अनुभव मिळाला. पुढे मी पीएच.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हे करत असताना मला अजून शिकावं, संशोधन करावं अशी इच्छा होती आणि तशी संधी मला लवकरच मिळाली. यु.एस. स्टील कंपनीमार्फत लोखंडावर येणार्‍या गंजासंबंधीचं संशोधन करण्यासाठी मी जर्मनीतल्या ग्योटींगन विद्यापिठात गेलो होतो. हा अनुभवही अतिशय उत्तम होता. तिथे मला अनेक मित्र मिळाले, चिकाटीने काम करण्याची वृत्ती जर्मन लोकांकडून शिकता आली आणि अजून एक म्हणजे हे संशोधन अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्याने आसपासचे देश पाहून येण्याची संधीही मिळाली. आमच्या प्रयोगाचे परिणाम जाणून घेण्यासाठी मध्ये काही वेळ जाणं आवश्यक होतं. प्रोफेसर हौफे ह्यांनी मला त्यादरम्यान प्रवासाला जाण्याची मुभा दिली आणि ती संधी साधून मी थेट उत्तर धृवापर्यंत भटकंती करून आलो.

उत्तरधृवाच्या प्रवासाचा अनुभव कसा होता?

उत्तरधृवाचा प्रवास आम्ही बोटीतून केला. त्याप्रवासात समुद्रातले डोंगर पहायला मिळाले. त्यांचे आकार खूपच विलोभनीय होते. आम्ही उन्हाळ्यात तिथे गेल्यामुळे सूर्य क्षितिजाखाली जात नसे. २४ तास सूर्यप्रकाश. रात्र झाली तरी अंधार नाही. समुद्राच्या पाण्यावर आभाळातल्या ढगांतून झिरपणार्‍या प्रकाशामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर सोन्याचांदीचा चुरा सांडल्यासारखा दिसत होता. वातावरण थंड, शुध्द हवा, शांत निर्मळ वातावरण सगळंच देखणं होतं. उत्तरधृवावरच्या 'हॅमर फेस्ट' ह्या गावी अगदी शब्दश: मध्यरात्रीचा सूर्य पाहिला. त्यावेळची "I am on top of the world" ही भावना फारच सुखद होती. पण दुसर्‍याच क्षणी विचार आला की "But none in the world knows me". मला वामनावताराची आठवण झाली. उत्तरधृवावर प्रवासाची नोंद करत असताना जन्मठिकाण लिहायचं होतं. तिथे मी माझं जन्मगाव "भडगांव, पूर्वखानदेश, महाराष्ट्र, भारत " असे लिहिले. त्यावेळी मला माझ्या जन्मगावचा व आजोळचा खूपच अभिमान वाटला. एकूण उत्तरधृवावरचा प्रवास, तिथले अनुभव, त्यावेळी मनात आलेले विचार हे सगळं खूप विलक्षण आणि वेगळं होतं !

एकूण तुमच्यावर आजोळचा खूपच प्रभाव जाणवतो. तुमच्या आजोळाची पार्श्वभूमी काय?

पूर्व खानदेशातलं जळगाव जिल्ह्यातलं भडगांव हे माझं आजोळ. तुझे आजोबा आणि त्यांचे ३ बंधू हे माझे मामा. तू त्यांतल्या कोणाचच कार्य जवळून पाहिलेलं नाहीस पण ते चौघेही अतिथय हरहुन्नरी. ते सगळे मिळून भडगांवला शेती, पिठाच्या गिरण्या, बस सर्व्हिस असे उद्योग चालवत. प्रत्येक उद्योग कष्टाने आणि सचोटीने करायचा हे त्यांचे तत्त्व. ह्याशिवाय त्याकाळातही ते अतिशय प्रयोगशील आणि सुधारक वृत्तीचे होते. मामांच्या शेतीतले प्रयोग मी लहानपणापासून बघितले. घरचं उसाचं गुर्‍हाळ, केळी, कापूस, कांदे ह्यांची पिके ह्या सगळ्यांत पण त्यांनी खूप नवनविन प्रयोग करून बघितले. आणि कदाचित ह्या सगळ्यांमुळे मला शेती, प्रयोग, संशोधन ह्याची आवड निर्माण झाली. काम करणारी सगळी गडी माणसं ही जणू त्यांच्या घरचीच. त्यांच्या घरच्या अडीअडचणी, लग्नकार्य ह्या सगळ्यांमध्ये मामांची खूपच मदत असे. त्यामुळे ती लोकं ही आपलेपणाने काम करीत. एकूण त्या लहान गावातलं हे एक संस्थानच होतं आणि तिथला खूपच प्रभाव माझ्यावर आहे.

तुमचं संशोधन कार्य, त्यानंतर औरंगाबादला शेती विषयक संशोधन, मग जर्मनी आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्यामधे आपल्या कुटूंबाची साथ आणि वाटा काय ?

सुरुवातीच्या काळात माझे हे सगळे प्रयोग, संशोधन चालू असताना आईवडिलांचा भक्कम मानसिक आधार आणि आर्थिक पाठबळ होतं त्यामुळे मी हे करू शकलो. वडिलांकडून तसेच मामांकडून एक संशोधक, व्यवसायिक वृत्ती शिकता आली. तसेच हे सगळे संस्कार पुढे आयुष्यात फार उपयोगी पडले. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या यशात, आयुष्यात माझी पत्नी सौ. सुगंधा हिचा खूपच मोठा वाटा आहे. माझ्या संशोधनाच्या काळात कधीकधी मी तिला वेळ देऊ शकत नसे. पण तीने कधीही तक्रार केली नाही. माझ्या आईवडिलांकडे, मुलींकडे तिच बघत असे. औरंगाबादला असताना तिचेही भरपूर कार्यक्रम चालू असतं. शिवाय औरंगाबादला आमच्याकडे पाहुण्यांचाही सतत राबता आहे. हे सगळंही तिनेच निभावलं. आताही आम्ही दोधे काँप्युटर वापरायला शिकलो. मला कंपवाताचा थोडा त्रास असल्याने सोपेकचा सर्व पत्रव्यवहार, इमेल संपर्क हे तीच संभाळते. तसेच इंटरनेट वरून माहिती शोधण्याच्या कामातही ती मदत करते.

पुन्हा एकदा सोपेककडे वळतो. सोपेकचे आगामी प्रकल्प कोणते ?

दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हांला हाती घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे सायकलच्या वापर वाढवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे. भविष्यात येऊ घातलेली इंधन टंचाई आणि प्रदुषण ह्यावर सायकलचा वाढता वापर नक्कीच परिणामकारक ठरू शकेल. तसच दुसरं म्हणजे शाळांमधे प्रवेश देताना त्या परिसरात रहाणार्‍यांना प्राधान्य मिळणे. ह्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्या-येण्याचे श्रम तसेच वेळ वाचून तो इतर गोष्टींकरता देता येतो. ह्या दोन्ही गोष्टींवर काम सुरु करण्यासाठी आमचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाहिये तसेच लोकांची आणि तज्ञांची मते अजमावण्याचे कामही सुरू आहे. इतरही अनेक उपक्रमांवर विचार चालू आहे परंतु आधी म्हंटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यावर कामे सुरू होतील.

आधी रसायनशास्त्रातलं शिक्षण आणि संशोधन, त्यानंतर शेतीविषयक संशोधन, ह्याशिवाय औरंगाबादला अनेक उपक्रमांमधे सहभाग आणि आता सोपेकचं काम ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही कसं काय योगदान देऊ शकलात? त्यामागचं रहस्य काय?

मुळात एखाद्या विषयाची आवड असेल तर त्यात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती हवी. कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आपल्याला जे आवडतं आहे, ज्यात काही करावसं वाटतं आहे ते नक्की करून पहावं. त्यातुन आपल्याला शिकायला मिळतं, मानसिक समाधान मिळतं आणि कधीकधी समाजाला त्याचा उपयोगही होऊ शकतो. आधी मी म्हंटलं तसं प्रत्येक गोष्ट ही कायदेशीर मार्गाने करणं शक्य आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर हे जग बदलणं नक्कीच शक्य आहे.

ह्या वयातही इतक्या उत्साहाने काम करणार्‍या पेठे काकांकडून आपल्या आपल्या सगळ्यांनाच शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे अनुभव आपल्यालाही काही करण्याची प्रेरणा देतील अशी आशा आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काका काकूंना तसेच सोपेकच्या आगामी प्रकल्पांसाठी काकांना शुभेच्छा देऊन मी ह्या गप्पा संपवल्या.

मुद्रितशोधन साहाय्य: चिन्मय दामले

-------
मायबोली.कॉम वर पूर्वप्रकाशित :
http://www.maayboli.com/node/10565