जे जे उत्तम..

"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "

नंदन नी चालू केलेल्या ह्या साखळीत ट्युलिप ने मला गोवलं आणि वर ऑर्कुट, मेसेंजर इत्यादी वर धमक्या पण दिल्या.. त्यामूळे बाकी सगळी काम ठेवून लगेच हा उतारा लिहायला घेतोय.. :)

मध्यंतरी गदिमां च्या "मंतरलेले दिवस" ह्या अनुभव आणि व्यक्तिचित्र संग्रहामधला "बामणाचा पत्रा" हा लेख वाचण्यात आला.. त्यातला हा एक भावलेला उतारा..
-------------------------------------------------------------
" गांवांतील सर्व घरे धाब्याची आहेत. आमच्या ह्या झोपडीच्या माथ्यावरच फक्त पत्रा आहे. वैशिष्ट्याने वस्तूची ओळख जलद पटते.माळावरचा द्न्यानोबा, ढांगुळा सिताराम, तसाच हा बामणाचा पत्रा..
माझ्या येण्याची वार्ता लागताच आमच्या मळ्यावरील माहारीण 'बामाणाच्या पत्र्याखालील जमीन मेंडराच्या हिरव्यागार लिशाने सारावून घेते.मोटर स्टॅंडवरून आणलेले माझे आणि मित्राचे सामान रामिशाची पोरे व्यवस्थितपणे लावून ठेवतात.आईच्या भेटीनंतर मी ताबड्तोब ह्या झोपडीच्या भेटीला येतो. भर उन्हात देखिल या झोपडीच्या दर्शनाने माझे डॊळे थंड होतात.केवळ तीनच बाजूला भिंती असल्याने झोपडीचे स्वरूप धर्मशाळेसारखे दिसते. पाठभिंतीला असलेल्या खुंट्यांवर नाडा, सौंदर, सापत्या इ. शेतीच्या वस्तू लटकत असतात.कोनाड्यांतूण बी बियाणांची गाडगी मृगाची वाट पहात असतात. मी गेलो की तिथल्या ह्या वस्तू अदृश्या होतात. त्या जागी कडक इस्रीचे सदरे, कोट, जाकीटे लटकू लागतात. कोनाड्यामधल्या बियांणांच्या जागा संदर्भग्रंथ घेतात. गोठा म्हणून बांधलेल्या ह्या जागेवर गादी तक्यांची शुभ्र बैठक जमते. तसू तसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून मी लेखन सुरु करतो.
झोपडीला दारच नसल्याने आपण मुक्त आहोत याची सुखद जाण मनात सदैव रहाते. अडथळा नसल्याने पहाटेचा गार वारा सरळ अंगावर येतो आणि झोप जागवतो. अंथरूणावर उठून बसले की पूर्वाकाशांत प्रकाशत असलेला शुक्र पहिले दर्शन देतो. गावात चाललेल्या जात्यांवरील ओव्या झोपलेल्या कावित्त्वशक्तीला जागं करतात. पहाटे वार्यावर येणारा वाढत्या पिकाचा वास हिरव्या चाफ्यासारखा उत्तेजक वाटतो. सारे वातावरणच असे असते की पुन्हा झोप नको वाटते. अश्यावेळी मी एकटाच उठून उभ्या पिकातून हिंडून येतो. दवात भिजलेली जोंधळ्याची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो. तर करडईची काटेरी पाने पायावर पांढर्या बोचर्या रेघोट्या मारतात.
झोपडी मागील विहीरीचे पाणी पहाटे पहाटे अगदी गरम असते. झुंजुरकाच्या प्रकाशात त्यातून निघत असलेल्या वाफादेखिल नजरेस पडतात. बजरंगाचे नाव घेऊन त्या पाण्यात सुळकांडी मारण्यात जो आनंद असतो तो भोगल्यावाचून कळणार नाही. सुस्नात अवस्थेत परत झोपडीवर येईपर्यंत सूर्य उगवून येतो. रानारानातून शेतकर्यांच्या हालचाली चालू होतात. मी बैठकीवर येतो आणि लिहिण्यास प्रारंभ करतो. एकांताच्या परीणामामूळे असो की बीज अंकुरीत करण्याच्या भूमी च्या सामर्थ्याने असो, डोक्यातल्या कल्पना साकार होण्यासाठी धडपडू लागतात. लिहिण्याचे काम एकदा सुरू झाले की मग ते अड्खळत नाही. विचारांची चाती फिरत रहाते, मेंदू कापसासारखा हलका आणि फुगिर होतो; कथानकाचा पिळ्दार धागा अतूट्पणे निघत रहातो. मधेच घराकडून न्याहारी येते. त्यात बाजरीची खरपूस भकरी, लसणीची खमंग चटणी, सायीचे दही अश्या खास ग्रामीण वस्तू असतात. त्यांच्या सेवनाने पोट आहरत नाही की कंटाळा आसपास फिरकत नाही. न्याहारीच्या वेळी सोडलेले बैल पुन्ह्या शिवळ खांद्यावर घेतात तसा मेंदू पुन्हा विचाराखाली मन देतो आणि लिखाणाचे काम निष्ठेने सुरू होते.
झोपडी पूर्वाभिमुख असल्याने सूर्याचा उष्ण उजेड विचारांना आणखीच चैतन्य देतो. अंगाला चटके बसू लागेतोपर्यंत कामाचा वेग उतरत नाही.
दुपार मात्र पोळू लागले. पुन्ह्या स्नानाची गरज भासते. सकाळी गरम असलेले विहीरिचे पाणी दुपारी केळीच्या कालासारखे थंडगार होते. डोळे तांबडेलाला होईपर्यंत मी त्यात डुंबत रहातो. तोवर घरून जेवणाचे बोलावणे येते. आपल्या स्वत:च्या रानात पिकलेल्या शाळूची पांढरी शुभ्र भाकरी, उसातल्या पालेभाज्या, घरच्या गाई म्ह्शींचे दूध दूभते, माणदेशात पिकणार्या गुलाबी तांदळाचा चवदार भात आणि वाढनारी प्रत्यक्ष आई ! जगातल्या कुठल्याही पक्वांन्नाने होणार नाही एव्हडी तृप्ती ह्या जेवणाने होते. मेंदूतले विचार हातपाय पसरतात. त्यांना धावपळ नको वाटते. घरांत उकाडा होत असतो. रानातला पत्रा देखिल त्यावेळी तव्या सारखा तापतो. पाटाच्या कडावर उभ्या असलेल्या गुल्मोहोराच्या गार सावलीचे आकर्षण मला त्यावेळी झोपडी पर्यंत जआऊ देत नाही. उजव्या हाताची उशी करून मी मातितच आडवा होतो. त्या भूमीतली ढेकळे मला रुतत नाहीत, खडे टोचत नाहीत. अगदी गाढ झोप लागले.
चार साडेचार ला उन्हे खाली येतात. कुठून तरी कुणाला तरी कुणीतरी मारत असलेल्या हका ऐकू येत असतात. मग आपोआप जाग येते. गावातील माणसे लोंबत्या चंच्या हातात धरून बोलत बोलत झोपडी कडे येतात. गावात घडून गेलेल्या घटनांवर बातचीत करत ती माणसे झापडं पडेपर्यंत बसून रहातात, पाच साडेपाच वाजता सूर्य मावळतिला जातो. झांजड पड्ते. रानातली गुरे परतू लागतात. कुंभाराच्या लिंबावर कावळ्यांचे संमेलन भरते. पांढर्या बगळ्य़ांचा थवा आकाश उल्लंघून जाताना दिसतो, मग मी फिरायला म्हणून उठतो. बोलत बसलेली मंडळीही येतात. त्यांच्या सुखदु:खाच्या कहाण्यांतून अनेक कथाबिजे निर्माण होतात. पुढल्या मृगासाठी म्हणून ती बियाणे मी डोक्यात साठवून ठेवतो.
किर्रर्र रात्र होते. घराघरांतून दिवे लुकलुकूं लागतात. तो अंधार भयाण वाटत नाही. शांत, अल्ह्याददायक वाटतो.
गावातून जेवणखाण आटोपून आठ-साडेआठ वाजता मी पुन्हा झोपडीत येतो. मध्ये पूर्णपणे विसरलेला लिखाणाचा धागा ठरल्यासारखा विनासायास सापडतो. पुन्हा काम सुरू होते..... "
-----------------------------------------------------------------

मला हे सगळं वर्णन विलक्षण वाटलं. दिवसातल्या प्रत्येक प्रहराचं अतिशय जिवंत वर्णन केलं आहे. शेत, ती झोपडी सगळं कसं डोळ्यासमोर उभं रहातं..

तर आता खो द्यायाचा माझा नंबर... मी ह्यांना टॅग करतो..

पूनम
श्रिष
अभिजीत
संवेद
योगेश