मायबोलीवरच्या मराठी भाषा गौरवदिनानिमित्त लिहिलेला हा छोटासा लेख
---------------------------------------------------------------------------------
प्रिय बाबा,
पुढच्या महिन्यात तुम्हांला जाऊन एक वर्ष होईल. ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपली भेट रोज रात्री माझ्या स्वप्नात होतेच आहे. गेली दहा वर्ष अगदी दररोज आज्जी स्वप्नात येते. आता तुम्हीही येता. ही सगळी स्वप्नं घडतात कुठे तर आपल्या डोंबिवलीच्या घरात. डोंबिवली सोडून आता २५ वर्ष झाली आणि त्यानंतर मी भारत, अमेरिका आणि कॅनडा मिळून १० पेक्षा जास्त घरांमध्ये राहिलो तरीही घर म्हणजे डोंबिवलीचं! अशी एक जाणीव मेंदूत खोलवर रुजलेली आहे. पण हे सगळं असो. ह्या पत्राचा उद्देश उगीच इमोशनल मारून अश्रुपात वगैरे घडवणे हा नाहीच्चे.
आज सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली आणि आपलं "फॅमिली रियुनियन" आटोपलं. नेहमीप्रमाणे मी ऑफिसचे इमेल बॉक्स , स्लॅक, व्हॉट्सअॅप, फेसबूक, मायबोली, पेपरातल्या बातम्या ह्या सगळ्यावर नजर टाकली. तेव्हा लक्षात आलं की माझ्या अनेक फॅडांपैकी एक असलेल्या मायबोलीवर मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याचा आज शेवटचा दिवस आहे. विचार केला की तुम्ही आयुष्यभर आमच्या मराठी शब्दसंपदेत जी भर घातलीत त्याबद्दलच थोडसं ह्या मराठी भाषा दिनानिमित्त लिहावं. मला खात्री आहे की हे असं काही घडलं ह्याची तुम्हांला अजिबात कल्पना नसेल त्यामुळे तुम्हांलाच हे पत्राद्वारे कळवावं.
तर हल्लीचीच गोष्ट. रियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेतल्या विविध देशीय आणि भाषीय मित्र-मैत्रिणींना घेऊन इथल्या एका पार्टी प्लेसला गेलो होतो. तिथे ही पोरं गेम वगैरे खेळली, नंतर खाणं पिणं झालं. त्यांच्यातल्या एकीने टूम काढली की आता रियाच्या घरी जाऊ आणि उरलेलं खेळू. सगळ्यांचे आई बाबा म्हणाले की रियाच्या आई बाबांना विचारा. मी आपलं सेफ खेळून "आईलाच विचार" असं सांगितलं. तर शिल्पा चक्क नको म्हणाली (माझा वाण नाही पण गूण लागला म्हणायचा). नंतर तिला विचारलं काय झालं ? तर म्हणे ह्या पार्टीची दोन-तीन दिवस तयारी करण्यात मी दमले त्यामुळे आता मला झोपायचं आहे. हे सगळं "हडवाळ" आत्ता घरी आलं तर पुन्हा तीन-चार तासांची निश्चिंती. हडवाळ हा शब्द बर्याच दिवसांनी ऐकून मी खूप हसलो. तर ती म्हणे अरे बाबा म्हणायचे ना नेहमी! हडवाळ हा अगदी तुमचा खास शब्द. आपल्या घरी "यू नो हू" सारखच हडवाळ गोळाअ करत असल्याने तुम्हांला तो सारखाच वापरावा लागत असे. पलटण, गँग, गर्दी वगैरे शब्दांमध्ये "हडवाळ" सारखे खास भाव नाहीत हे मात्र अगदी नक्की.
नंतर एकदा रियाच्या बाकीच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. बराच दंगा करून झाला. ज्योईशीपण खेळून झालं. मग त्या म्हणे आम्ही बाहेर जाऊन खेळतो. म्हंटलं बरं जा आणि जाताना त्या "शेणफड्या" ला पण घेऊन जा. खानदेशात दगडू, धोंडू वगैरे सारखं "शेणफडू" असं पण नाव ठेवतात म्हणे पण तुम्ही ते "येड्या" ह्या अर्थाने किंवा टोनमध्ये वापरायचात आणि अगदी रियाला पण हे "शेणफड्या" किंवा "शेणफडी" अगदी पक्कं लक्षात राहिलं आहे!
म्हणी आणि वाक्प्रचार ह्या तर किती सांगाव्या! ह्या म्हणी नेहमी वापरल्या जाण्यामागे अर्थात खानदेशी भाषा आणि घराण्यात वापरली जाणारी भाषा ह्यांचा मोठा हात आहे. स्वतः एका जागी बसून दुसर्यांना सतत ऑर्डरी सोडत रहाणे ह्याला "बसल्या जागी ऑर्डर सोडू नको" असं काहीतरी साध्या भाषेत म्हणता आलं असतं पण तुमचा आवडता वाक्प्रचार म्हणजे "हXल्या गुवावरून ऑर्डरी सोडणे". आता ऑर्डरी सोडायला हXला गू कशाला हवा हे म्हणकर्त्याला आणि तुम्हांलाच माहित पण हे ऐकून आम्ही अगदी दरवेळी आम्ही तितक्याच उत्साहाने हसायचो हे मात्र खरं.
शिवाय "बैल गेल्यावर झोपा करून काय उपयोग" ह्याला "पी गेल्यावर जी आवळून काय उपयोग?" हा तुमचा एकदम चपखल वाक्प्रचार आहे. आता पी आणि जी म्हणजे काय हे इथे उलगडून सांगायला नकोच. "जी" हा तर तुमच्या म्हणी, वाक्प्रचारांमधला अगदी आवडता अवयव! जी.पी.एल, जी वर ऊन येईपर्यंत झोपणे, जी ला पाय लाऊन पळणे वगैरे वगैरे बर्याच प्रकारे तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करत आला आहात.
"जी" वरून अति कंजूस लोकांसाठी खास वापरलेली म्हण म्हणजे "जी धुवून कढी आणि उरलेल्याचे वडे!". तुम्हांला आठवत असेल तर आधी शिल्पाला ही म्हण कळलीच नव्हती. नंतर संदर्भासह स्पष्टीकरण दिल्यावर ती कितीतरी दिवस कढी आणि वडे दोन्ही खातच नव्हती!
"बुडाखाली आग लावणे" हा ही तुमचा अगदी रोजच्या वापरातला वाक्प्रचार मग तो जेवायला बसायच्या आधी भाजी, आमटी गरम करण्यासाठी पातेल्याखालचा गॅस पेटवण्यासाठी असो, निवडणूका आल्यावर सत्ताधारी पक्ष कामाला लागल्यावर असो की परिक्षा जवळ आल्यावर आम्ही एकदम अभ्यासाला लागल्यावर असो. सगळ्यांच्या बुडाखाली लागणार्या आगीची धग अगदी सारखीच!
तर सांगायचा मुद्दा काय की जनुकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेले तुमचे गुण (आणि अवगुण) आपोआप पुढे जातीलच पण हे "भाषासौंदर्य" मात्र आम्ही अगदी जाणीवपूर्वक जतन करू. कारण आम्हांला ही शब्दसंपत्ती "रिलेट" होतेच पण आमची पुढची पिढी हे शब्द / वाक्य ऐकताना खदखदून हसते.
बाकी सर्व क्षेमकुशल. इतर विषय पुन्हा केव्हातरी.
आपला,
बोली भाषाप्रेमी.
0 प्रतिसाद:
Post a Comment